Tuesday, February 24, 2026

घाटाचा पहारेकरी किल्ले - राजमाची



आज शिवजयंती. १९ फेब्रुवारी २०२६. वर्दळीपासून थोडा दूर व मोजकेच दुर्ग प्रेमी व पर्यटक जात असलेल्या लोणावळ्याजवळील राजमाची दुर्ग पाहण्यास निघालो. मुंबईला जाताना जुन्या पुणे-मुंबई रस्त्यावर खंडाळ्याचा घाट सुरु होताना राजमाची पॉर्इंट आहे. येथून समोर नजर टाकल्यावर एकाला एक लागून दिसणारी शिखरे म्हणजेच हा राजमाची किल्ला. लोणावळ्यापासून खंडाळाच्या दिशेने जाताना (उजव्या हाताल) कुणे नामा या गावाचा फाटा लागतो. हाच रस्ता पुढे राजमाचीला जाण्याचा मार्ग आहे. ही वाट सुमारे १५ कि.मी ची आहे. या वाटेने स्वत:चे वाहन घेऊन गेल्यास १ ते १.३० तास लागतो. आम्ही लोणावळ्यात ११.३० ला पोहाचलो व उधेवाडीला १.२० ला पायथ्याशी पोहचलो. तेथून वेळेअभावी फक्त श्रीवर्धन पाहून दुपारी ४ ला परतीच्या प्रवासाला लागलो. 


विविध झाडे, घनदाट जंगलामुळे हे क्षेत्र अनेक पक्ष्यांच्या प्रजातींचे आश्रयस्थान आहे आणि दुर्गप्रेमी आणि पर्यटकांसाठी एक लोकप्रिय ठिकाण आहे. पावसाळयात सर्वत्र प्रचंड धुके असते.  लोणावळ्यापासून जवळ परंतु निसर्गाने थोडे लांब ठेवलेले उधेवाडी ही ७० ते ७५ घरांची छोटीशी वाडी. चारही बाजुने घनदाट जंगल, पावसाळ्यात धो-धो पडणारे रौद्ररुप धारण केलेले धबधबे, सर्वत्र हिरवेगार असलेल्या या ठिकाणी आहे राजमाची. महाराष्ट्रात राजमाची हा एकच दोन बालेकिल्ले असणारा किल्ला. या किल्ल्याच्या माचीवर मनरंजन व श्रीवर्धन हे दोन बालेकिल्ले आहेत.  हे दोन बालेकिल्ले म्हणजे दोन स्वतंत्र असे किल्लेच होय. या किल्ल्याचा पसारा प्रचंड असून पुरातन अवशेष देखील मोठया प्रमाणात आहेत. लोणावळ्याकडून उधेवाडीला येताना वाटेत पुरातन तटबंदीचे काही अवशेष दिसून येतात. सुमारे १० फुट व १५ फुट उंची असलेली ही तुटकी तटबंदी पाहून पूर्वी ही तटबंदी कशी असेल याचा अंदाज येतो.   लोणावळ्याहून कुणे नामा रस्त्याने येताना गड येण्यापूर्वी अलीकडेच काही अंतरावर तटबंदी दिसते. पूर्वी ही गडाची ही वेस होती. आता  काळाच्या ओघात पडली आहे. येथून कच्चा रस्ता तयार केला आहे.  या वेशीच्या आत शिरताच डाव्या हाताला गणेश, मारुतीचे मंदिर आहे. पुढे काही अंतरावर सतीच्या शिळाही आहेत. ही वेस ओलांडली की राजमाचीची हद्द सुरू होते. 


आम्ही उधेवाडीत पोहचलो. गाडी लावून श्रीवर्धनकडे जाण्यास निघालो. येथील शांत परिसर पाहून मन प्रसन्न झाले.  उधेवाडीला पोहोचल्यावर, राजमाची ट्रेक खूपच छोटा आहे. २० ते २५ मिनिटांत आपण गडावर पोहचतो. किल्ला व्यवस्थित राखला आहे आणि उधेवाडीहून येणारा ट्रेक मार्ग दगडी  पायºयांनी तयार केला आहे. 
भैरोबा मंदिरापर्यंत दगडी पायºयांनी येथील रस्ता चांगला तयार केला.  वाटेत मोठ्या कातळात ३ पाण्याची टाकी खोदलेली दिसतात. परंतु ही वैशिष्ट्यपूर्ण टाकी आहेत. कारण कातळात संपूर्णपणे तीन खोल्यांमध्ये हे तयार केले आहे. येथे बाराही महिने पाणी असते. तीन गुहेत पाणी आहे. येथील स्थानिक लोक त्याचा वापर पिण्यासाठी करतात. मी देखील बाटलीभरून पाणी घेतले एकदम थंडगार असे हे पाणी आहे. पिण्यास देखील चांगले लागले. एकदम स्वच्छ. 





भर उन्हात दुपारी २ वाजता गडावर जाण्यास सुरूवात केली. १५ मिनिटांतच दरवाजात येऊन पोहोचलो. कधीकाळी अस्तित्वात असलेल्या भक्कम, बेलाग अशा दरवाज्यातून पण सध्या भग्न अवस्थेतल्या पाहरेकरांच्या देवडीतून किल्ल्यात प्रवेश केला. उजवीकडे जात असतानाच आमची पावले थबकली. काळजात एकदम धस्सच झालं......


तेव्हा जरा जपूनच....

मुख्य दरवाज्याच्या आतमध्ये प्रवेश केला. येथे पाहरेकºयांच्या देवड्या आहेत. जुनी जोती अजूनही येथे दिसतात. तटबंदीचा काही भाग येथून जातो. याच ठिकाणी तटबंदीवर एक घोणस जातीच्या सापाचे छोटे पिलू दिसून आले. त्याचे फोटो काढले. पुढे निघलो. दहाच फुट अंतर गेलो असू, अचानक  तटबंदीच्या भिंतीवर गवतासारखे काही तरी काहीतरी हालल्याचा भास झाला आणि पुढच्याच क्षणी एकदम धक्काच बसला. कारण भिंतीवर घोणस जातीचा साप निवांत बसला होता. आमची चाहुल लागताच दोन दगडांच्या चिºयांमध्ये तो घुसला  व एका चिºयातून बाहेर येऊन पुन्हा बाहेर डोकावू लागला. 
घोणस हा अत्यंत विषारी म्हणून ओळखला जातो.‘रसेल्स व्हायपर’ या नावाने ओळखला जातो. थोडीफार सापांची ओळख असल्याने एकदम घाबरून न जाता. आम्ही शांतपणे पुढे गेलो. आमच्या मागून सासवड येथील दोघे जण येत होते. त्यांनाही सावध केले. एकाच किल्यावर दोन घोणस सापांचे दर्शन झाल्याने एकदम मस्त वाटले. मनात पुढे जाऊन किल्ला पाहावा की नको असे वाटत होेते. पण धीर करून किल्ला पाहण्यासाठी निघालो. शेवटी हे तर त्यांचे घर आहे. आपण येथे पाहुणे म्हणून आलो आहोत. तेव्हा जपूनच पुढे पाऊल टाकले.






















रस्ता न झालेलाच चांगला :

मुळात सोपा असलेला हा ट्रेक पावसाळ्यात कठीण व अतिकठीण होऊन बसतो तो येथील रस्त्यामुळे. सध्या मातीचा व दगडांचा कच्चा रस्ता आहे. मधे आधे काही ठिकाणी डांबरी रोड तयार केलेला आहे. मात्र, काही किलोमीटर अंतर हे केवळ दगड धोंडे व कच्च्या मातीचा बनलेला आहे. जो पावसाळ्यात चिखलमय, ओढ्याचे स्वरूप व तर अतिपावसात नदीचे स्वरूप प्राप्त करतो. या ठिकाणी दुचाकी घेऊन जाणाºयांचे अनेकवेळा अपघात सुद्धा झाले आहेत. त्यामुळे नवख्यांनी याठिकाणी अनुभवी मार्गदर्शनाशिवाय जाऊ नये किंवा जायचेच असेल तर पावसाळा संपल्यानंतर महिना भरानंतर जाणेच चांगले. अनेक पर्यटक येथील पर्यटनाला वाव मिळावा अधिक पर्यटक येथे यावेत यासाठी रस्ता चांगला करावा अशी मागणी करत असतात. परंतु हे ठिकाण रस्ता न झाल्याने अजूनतरी टिकून आहे. नाहीतर याचे सिंहगड, अंधारबन, ताम्हीणीतील देवकुंड धबधब्यासारखी माणसांची गर्दी वाढून अतिउत्साही पर्यटकांनी घाण केल्याचे दिसून येईल. 
राजमाचीला पूर्व आणि दक्षिण दिशांना जी खोल दरी आहे ती ‘कातळदरा’ या नावाने ओळखली जाते. पावसाळयात दरीतून पडणाºया धबधब्यांचे सुंदर दृष्य दिसते. या दरीतूनच उल्हास नदी उगम पावते. या नदीच्या पश्चिमेकडील डोंगराला भैरोबाचा डोंगर म्हणतात. किल्ल्याला पूर्व आणि दक्षिण दिशांना खोल दरी आहे. नदीच्या पश्चिमेकडील डोंगराला ‘भैरव डोंगर’ म्हणतात. बहुतेकदा कताळधार धबधब्याचे भव्य दृश्य पाहण्यासाठी भेट दिली जाते. 

























गडावर दिसणारा परिसर : 

 किल्ल्यावरून आजुबाजुचा दिसणारा परिसर निसर्गसौंदर्याने नटलेला आहे.  वातावरण चांगले असल्यास माणिकगड, कर्नाळा, सोनगिरी, माथेरान, सोंडाई, ईशाळगड दिसतात. तसेच बालेकिल्यावरून पूर्वेला शिरोटा जलाशय दिसतो. जांभवली गाव त्याच्या खाली असलेले कोंढेश्वर मंदिराचा हा परिसर. आग्नेयला तुंगार्ली राजमाची-वळवंड मार्ग, नैऋत्येला नागफणी, समोर बोरघाटातला रेल्वे मार्ग, व सध्याचा एक्सप्रेस हायवे दिसतो. ढाकचा बहिरी, मांजर सुंभ्या दिसतो. तसेच उजवीकडे भीमाशंकर, पदरगड , कोथळीगड दिसतात. या शिवाय लोणावळ्यातील ड्युक्स नोज (नागफणी), तुंगी दुर्ग दिसतात.  कातळधार धबधब्याचा मार्ग दिसतो.  राजमाची किल्ला आणि आसपासचा परिसर पाहण्यासारखा आहे. योद्ध्याचे स्मारक,  दरवाजाचे अवशेष, गणपती आणि मारुतीरायाची मूर्ती, अर्धवट तुटलेली तटबंदी आपल्याला एकदम पुरातन काळात घेऊन जाते. 












काही आठवणी :

सुमारे २५ वर्षांपूर्वी दर हिवाळा व पावसाळ्यात आवर्जुन हिंडण्यासाठी मी येथे यायचो. तेव्हा लोकलने लोणावळ्यात उतरून तुंगार्ली धरणाच्या भिंतीशेजारून ३ ते ४ तास चालत उधेवाडीत यायचो. प्रचंड तंगडतोड व्हायची. मग कधी कोंढाणे लेणी पाहून कर्जत मार्गे घरी यायचो तर. कधी ढाकच्या मार्गे जांभवली गावातून एसटीने घरी यायचो मजा यायची. किल्यावरचा मुक्काम संपला की आमच्याकडेचे उरलेले साहित्य जसे की काडेपेटी, रॉकेल, मेणबत्ती, कांदे, बटाटे, शिदा तेथील ग्रामस्थांकडे द्यायचो. कारण येथे किरकोळ वाटणारे हे साहित्य तेथील लोकांना मिळण्यासाठी १५ किलोमीटरची पायपीट करावी लागत असे. आता तर फोर व्हीलर, टू व्हिलर थेट पायथ्यापर्यंत येता येते.  पैसे घेऊन कॅम्प सुरू आहेत. फक्त एन्जॉयमेंट बाकी काही नको... वेडेवाकडे तोंड करून फोटो, रिल्स तयार करून आम्ही फोर्ट पाहून आल्याचे सांगायचे....




येणाºया पर्यटकांसाठी सूचना :

अनेकजण तटबंदी शेजारी उभे राहून फोटो सेशन करत असतात. गवत वाढलेले असते. तटबंदीवरून जोरात पळत, चालत जाऊन व्हिडोओ शूट करत असतात. या तटबंदीच्या चिºयांमध्ये मोकळी जागा निर्माण झाल्याने अनेक साप, विंचू या फटींमध्ये जाऊन घरे करतात. भले माणसांची चाहुल लागताच ते आत जातात परंतु प्रसंगी एखादा वाईट प्रसंगही घडू शकतो. तेव्हा जरा जपूनच....

दहाच मिनिटांत किल्याच्या धान्य कोठार किंवा दारूगोळा कोठार असलेल्या एका मोठ्या  गुहेशेजारी पोहाचलो. या ठिकाणी तीन कोठार असून, २५ वर्षांपूर्वी याच ठिकाणी आम्ही रात्रीचा मुक्काम करायचो. येथून समोर जुना पुणे-मुंबई रस्ता, बोगदा व रेल्वे दिसते. रात्री अंधारात चकाकणारे गाड्यांचे दिवे सुंदर दिसतात. तेथून पुढे गडाच्या सर्वांत उंच असलेल्या ठिकाणी गड पाहण्यास निघालो. वाटेत अनेक ठिकाणी पाण्याची टाकी आहेत. परंतु सध्या वापराअभावी ती खराब झाली आहेत. गडा पाहून समोरच असलेला मनरंजन आम्हाला खुणावत होता. परंतु वेळेअभावी फक्त श्रीवर्धनलाच भेट देऊ शकलो. 

इतिहास : 

सातवाहन काळापासून प्राचीन घाटमार्गावर लक्ष ठेवण्यासाठी या डोंगरावर दुर्गाची निर्मिती करण्यात आली. कल्याण, नालासोपारा ही प्राचीन काळातील मोठी व्यापारी बंदरे. या बंदरापासून बोरघाटमार्गे पुण्याकडे जाणारा हा प्राचीन व्यापारी मार्ग.  या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक चालत असे. या व्यापारी मार्गाचे नियंत्रण करण्यासाठी कोकण आणि घाटाच्या वेशीवर असणाºया किल्ल्यांचा उपयोग केला जात असे.  राजमाचीच्या एका बाजूस पवनमावळातील तुंग, तिकोना, लोहगड, विसापूर तर एका बाजूस पेठ, भीमाशंकर, ढाकचा किल्ला, गोरखगड, सिध्दगड असा सर्व परिसर नजरेत पडतो. त्यामळे हा किल्ला म्हणजे एक लष्करी प्रमुख ठाणं असावे. किल्ल्याच्या पश्चिमेकडे बौध्द लेणं आहे. याला ‘कोंढाणे लेणी’ असे म्हणतात.  ही लेणी ख्रिस्तपूर्व दुसºया शतकात म्हणजे सातवाहनकालाच्या सुरवातीला खोदलेली आहेत. किल्ल्याने सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूल, यादव, कदंब, बहमनी, आदिलशाही, शिवशाही, पेशवाई या राजवटी पाहिल्या.
राजमाचीला किल्ल्यास कोकणचा दरवाजा देखील म्हटले जाते. कल्याणच्या १६५७ च्या स्वारीनंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी पुणे आणि कल्याण विभागात असलेल्या बोरघाटावरील राजमाची, लोहगड, तुंग, तिकोना, विसापूर स्वराज्यात दाखल करून घेतले. इसवी सन १७०४ मध्ये औरंगजेबाच्या सेनापतीने हा गड जिंकला पण औरंगजेबाची पाठ फिरताच मराठयÞांनी राजमाचीवर पुन्हा भगवा फडकवला. यानंतर १७१३ मध्ये शाहुमहाराजांनी कान्होजी आंग्रेना हा किल्ला दिला. सन १७३० मध्ये हा किल्ला पहिले बाजीराव पेशवे यांच्याकडे आला. पानिपतानंतर भाऊसाहेब पेशव्यांचा तोतयाचा येथे काही काळ आश्रय होता. पुढे १८१८ मध्ये किल्ला इंग्रजांकडे गेला. भारत सरकारने या किल्ल्याला महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.  हा किल्ला पाहण्यासाठी किमान दोन दिवस वेळ काढणे गरजेचे आहे.  श्रीवर्धन आणि मनरंजन किल्ल्यांच्या मध्ये आपण डावीकडे जाणारी वाटेने मनरंजन आणि उजवीकडच्या वाटेने श्रीवर्धन किल्ल्यावर जाता येते. याच दोन्ही किल्लयांच्या मधोमध  भैरवनाथाचे मंदिर आहे. मंदिरात भैरव आणि जोगेश्वरीच्या दगडी मूर्ती असून छत्रपती शिवाजीमहाराज, शाहूमहाराज आणि थोरले बाजीराव पेशवे यांनी वेगवेगळयÞा काळात त्या अर्पण केलेल्या आहेत. मंदिरासमोर दोन भग्न तोफा ठेवलेल्या आहेत. याशिवाय मंदिरासमोरच्या ३ दिपमाळा भोवतीने काही कोरीव शिल्पंदेखील आहेत. यातील गजान्तलक्ष्मीचे शिल्प पाहण्यासारखे आहे.  
श्रीवर्धन हा राजमाची किल्ल्यातील दोन बालेकिल्ल्यांपैकी सर्वात उंच आहे.श्रीवर्धनची तटबंदी आणि बुरुज आजही बºयापैकी चांगल्या स्थितीत आहेत.अवशेषांवरून असे दिसून येते की किल्ल्याला अनेक ठिकाणी दुहेरी तटबंदी असावी.दरवाजाची कमान बºयापैकी शाबूत आहे आणि दरवाजाच्या बाजुला पहारेर्क­यांच्या देवड्या आहेत.किल्ल्याकडे जाणाºया मार्गावरच एक गुहा आणि पाण्याची दोन टाकी आहेत. ही गुहा दारुगोळ्याचे कोठार म्हणून वापरली जात होती.बालेकिल्ल्याच्या माथ्यावर एक ध्वजस्तंभ आहे.समोरच ढाकबहिरीचा चित्तथरारक सुळका आणि त्याच्या उजव्या बाजुला शिरोट्याचा नयनरम्य तलाव दिसतो.

काही सूचना :

शक्यतो आॅक्टोबर ते जानेवारी पर्यंत किल्ल्याला भेट द्या. कारण पावसाळ्यात येथे येणे कठीण होते. रस्ते पूर्णपणे पावसाच्या पाण्याखाली गेलेले असतात. सर्वत्र धुके असते. पावसाळ्यात इथे प्रचंड पाऊस असतो. काही ठिकाणी आपले पाय गुढग्या इतक्या चिखलात जातात. खूप वर्षांपूर्वी उन्हाळा, पावसाळा, रात्री व दिवसा येथे ट्रेक केलेले असल्याने त्या वेळची आठवण येते.  उन्हाळा संपता संपता इथे आलात तर आपल्याला खूप प्रमाणात करवंद खाण्यास मिळतील. 

कसे यावे :

राजमाची हा किल्ला झाडाझुडपांनी आणि निसर्गरम्य हिरवाईने वेढलेला आहे. राजमाची किल्ल्याची समुद्रसपाटी पासूनची उंची सुमारे २७०० फुट आहे. येथे आपण दोन मार्गाने भेट देऊ शकतो. 
पहिला मार्ग म्हणजे कर्जतहून कोंडीवडे या गावात बसने अथवा रिक्षेने यावे तेथून कोंडिवडे येथून खरवंडी मार्गे किल्यावर जाणारी पाउलवाटेने उधेवाडीत पोहोचण्यास सुमारे ३ ते ४ तास लागतात. 
दुसरा सोपा मार्ग म्हणजे लोणावळ्याहून कुणे नामा (जुना पुणे मुंबई रस्ता) मार्गे उधेवाडी गावात यावे. ही वाट एकदंर १० ते १२ कि.मी ची आहे. या वाटेने स्वत:चे वाहन घेऊन गेल्यास १ ते १.३० तास लागतो. पण स्कुटर आणू नको. मोठी बाईक चालते. कार सुद्धा मोठ्या चाकांची असायला हवी. अन्यथा अडचण येऊ शकते. 
 

राहण्याची व्यवस्था : 

उधेवाडी हे किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले एक छोटेसे गाव. गावात सध्याच्या भाषेत सांगायचे तर होम स्टे आहेत जिथे तुम्ही राहू शकता. या शिवाय स्वतंत्र्य टेन्ट लावून देखील व्यवस्था होऊ शकते. भैरवनाथ मंदिर देखील राहू शकता. या शिवाय श्रीवर्धन किल्ल्यावर धान्य कोठार किंवा दारूगोळा कोठार आहे. जिथे तुम्ही राहू शकता. हे कोठार मोठे असून, येथे ३ कोठार आहे.  

हा ब्लॉग आपणास कसा वाटला या विषयी येथे जरूर लिहा...

No comments:

कॉपी करू नका