Thursday, July 18, 2013

बेडसे लेणे - ‘नासिकान अनदस सेठीस पुतस पुसणकस दान’

मुख्य स्तूप
काही कामानिमित्त मागील गुरुवारी कामशेतला जावे लागले. काम कधी होईल याची कल्पना नव्हती. एवढ्या लांब जाणार असल्याने कुठेतरी फेरफटका करावा असे मनात होते. पुणे जिल्ह्यात विशेष करून कामशेत मळवली परिसरात अद्भूत अशा काही लेण्या आहेत. पूर्वी (आताही) किल्यांवर भटकंती करायला मला खूप आवडायचे. गडांवर हिंडताना तेथील परिसरातील या लेण्या पाहण्याचा योग आला होता.    तेव्हा हिंडताना या लेण्या कोणी कोरल्या, त्याचे प्रयोजन काय असेल असे अनेक प्रश्न पडायचे. त्या विषयी थोडा बहुत अभ्यास ही केला. भाजे, कार्ला व बेडसे लेणी या त्यापैकीच काही. दुपारी १ पर्यंत काम संपले. वेळ मिळाला. कामशेतपासून जवळच असलेली बेडसे लेणी पाहण्यासाठी निघालो त्या विषयी...
पुणे-मुंबई महामार्गावरील कामशेतहून पवना धरणाकडे एक वाट गेली आहे.  पावसाची भूरभूर थोड्या प्रमाणात काही अंतरावर होती. रस्ता एवढ्या पावसात सुद्धा अजून चांगला होता. त्यामुळे दुचाकी चालवायला त्रास झाला नाही. पवनानगरकडे जाणाºया कामशेतच्या खिंडीत पोहोचल्यावर तर पाऊस धो-धो कोसळण्यास सुरूवात झाली. काही वेळ तेथल्या मंदिरात एकटाच या पावसाचे रूप पाहत होतो.  एकटाच असल्याने आणि त्यात धो-धो वरून पाऊस कोसळत असल्याने लेणी पाहायला जायचे का नाही असा मनात विचार करत होतो. पूर्वी या लेणीवर तीन-चार वेळा गेलो असल्याने जायचा रस्ता माहित होता. त्रास काही त्रास सुद्धा होणार नसल्याचे मनात होते. पण उगच मनात भीती. पूर्वी एकट्याने अनेकवेळा या परिसरातील लोहगड, विसापूर, तुंग, तिकोन्यावर गेलो होता. पण आता परिस्थिती वेगळी होती. आता दोनाचे चार हात झाले होते. बघू काय होते असे मनात म्हणत एकदाचा निश्चिय करून निघालो.  कामशेत खिंडीतून पवनानगरकडे जाणारा हा रस्ता चांगला आहे. वरून मावळ परिसर छान दिसतो. भातशेतीची काम जोरात सुरू असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत होते. २० मिनिटांतच बेडसे या गावच्या वळणावर पोहाचलो. तेथून १.५ किलोमीटरवर लेणी डोंगरात कोरलेली आहे. विशेष म्हणजे लेणीच्या पायºयांपर्यंत जाणारा हा रस्ता सुद्धा एकदम डांबरी. ‘गाव तेथे एसटी व एसटी तेथे रस्ता’ ही योजना महाराष्ट्र सरकारने चांगलीच राबविलेली दिसली. ५ मिनिटांतच लेण्यांच्या पायथ्याशी येऊन पोहोचलो.  पलिकडच्या शेतात शेतीची कामे जोरात सुरू होती. धो-धो पाऊस काही वेळ थांबत तर काही वेळ भूरभूर सुरू होती. अशातच खेकडे पाकडणारा बगळा दिसला. मस्त पांढरा शुभ्र कॅमेरा काढून त्याला कॅमेºयात टिपले. गाडी पायºयांपाशी लावून वर जाणारी वाट धरली. पाऊसचा जोर काहीचा कमी जास्त होत होताच.

पायºया

बेडसेच्या लेण्यांपर्यंत पोहचण्यासाठी शेवटपर्यंत पायºयांची सोय करण्यात आलेली आहे. काहीवर्षांपूर्वी पायºयांची दुरवस्था झाली होती. पुरातत्व विभााने आता मात्र या पायºया छान दगड कापून बांधलेल्या आहेत. आजुबाजूला डोंगरावरून आलेल्या पाण्याच्या ओहळासाठी मधेच काही ठिकाणी वाट करून देण्यात आलेली होती. तेथील थंडगार पाणी ओंजळीत भरून ‘प्वॉट’भरून पिलो व पुढे निघालो. किल्यांवर, डोंगरावर जाताना अशा काही पायºया असल्या दम लागल्याने आपोआप गप्पा-टप्पा बंद होतात व मनात १, २, ३,४ .... असे आकडे सुरू होतात. येथे तर गप्पा मारायला कोणीच नव्हते. त्यामुळे पायºया मोजण्याचा कार्यक्रम सुरू झाला. वर चढताना बाजूने विश्रांतीचे ओटे असल्यामुळे मध्येच थांबून खालील निसर्गदृश्य न्हाहळत बसलो. १५ मिनिटांतच बेडसा लेणीच्या प्रवेशदारात येऊन पोहोचलो. आकडा आठवत नाही परंतु ३५० ते ४०० पायºया सहज मोजल्या.
हुश्श....हुश्श....आता बस झाले वर्णन.  आता लेण्यांविषयी सविस्तर लिहितो.


  


बेडसे लेणी

कार्ला, भाजे अशा लेणीसमुहामधील बेडसे ही एक लेणी. नेहमीच्या सहलींच्या वर्दळीपासून दूर एकांतातील हे बौध्दकालीन लेणं. आडवाटेवरील हे लेणी असल्याने सर्व सामान्यांपासून ती आजवर तुटलेली व अपरिचित अशी राहिली. बेडसे लेणीला फारसे कोणी येत नसल्याने अर्थातच येथे खूप शांतता असते. अस्वच्छतेचा कुठे मागमूसही नाही. याचे खरे श्रेय येथे न येणाºया पर्यटकांनाच द्यायला हवे. पुरातत्व विभागाने बेडसेची निगा चांगली राखली आहे. वरपर्यंत चांगल्या पायºया तयार करून घेतल्या आहेत. कार्ला लेणीप्रमाणे या ठिकाणी प्रवेश तिकीटघर नाही. एक रखवालदार असतो तेवढाच.
आपल्याकडे पायथ्याच्या गावावरून किंवा डोंगराच्या नावावरून, मंदिराच्या नावावरून एखाद्या ठिकाणाला नाव देण्याची परंपरा आहे.  या ही लेण्यांना डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या बेडसे या गावावरून बेडसे लेणी असे नाव मिळाले. याचा अनेकजण ‘बेडसा’ असा चुकीचा इंग्रजीत उल्लेख करतात. या गावाजवळ भातराशी नावाच्या दुर्गम पहाडात ही बौद्ध लेणी आहेत. लेणी पूर्व दिशेला आहे. त्यामुळे सूर्योद्याच्या वेळी संपूर्ण आसमंत सुंदर दिसतो. पूर्वी लोहगडला जाण्यासाठी एकदा आम्ही येथे मुक्काम केला होता. सकाळी सूर्योदय पाहूनच पुढे निघालो होतो.
भव्य खांब  मंडपामधील समोरील दोन्ही भिंतींवर कलाकुसर केलेली आहे.

लेण्यांचा कालावधी :

इ.स. पूर्व २०० ते ५०० च्या काळातील हे शिल्प सौंदर्य आहे. साधारण २२०० वर्षांपूर्वीची ही लेणी. हीनयान पंथाची ही लेणी आहेत. पायथ्यापासून ते वरपर्यंत २० ते २५ मिनिटातच आपण शैलगृहाच्या प्रांगणात येतो. दक्षिणोत्तर शंभर-दोनशे मीटर लांबीच्या कातळकड्यात खोदलेल्या या लेण्या असून, एक चैत्यगृह, काही विहार, खोदीव स्तूप, पाण्याची कुंडे असा बेडसे लेणीचा अमूल्य खजिना आहे.  पायºया चढून वर आल्यावर प्रथम दिसते एक लहानसा स्तूप. याच्या डावीकडे २-३ पाण्याची टाकी. टाकीवरच पाली भाषेतील एक शिलालेखही कोरलेला आहे.
प्रत्येक मजल्यावर छोटी चैत्यतोरणे,  गवाक्षे, वेदिकापट्टी.

वैशिष्टपूर्ण ४ स्तंभ

प्रवेशाद्वारातून आत गेल्यावर समोरच व्हरांडा असलेले भले मोठे चैत्यगृह दिसते. हा व्हरांडा चार अष्टकोनी स्तंभावर उभारलेला आहे. मध्यभागी दोन पूर्ण आणि बाजूला दोन अर्धे अशा या स्तंभांनी जणू काही हा तीस फूट लांब आणि १२ फूट रूंदीचा सारा व्हरांडा आपल्या खांद्यावर तोलून धरला आहे. हे खांब पायापासून थेट छताला भिडलेले.  अंदाजे  २५ फूट उंचीचे स्तंभ आहे. हे स्तंभ म्हणजे बेडसे लेणीचे वेगळेपण ठरतात. अशा प्रकारचे स्तंभ इतरत्र आढळत नाहीत. भव्य दिव्य अशा स्तंभांना पर्सिपोलिटन धतीर्चे स्तंभ असे म्हणतात. प्राचीन पर्शिया (इराण) इथल्या एका ठिकाणाचे नाव पर्सिपोलिस. तिकडून अशा प्रकारची कला निर्माण आली.
दोन मोठे खांब, षटकोनी बांधणीचे, रांजणाच्या आकाराचा मोठा गोल, घंटेच्या आकाराचा शीर्षभाग, त्यावर असलेला चौरंग व त्यावर घोडे व बैलांवर बसलेल्या स्त्रीपुरुषांच्या जोड्या असे शिल्प येथे कोरलेले दिसते. विशेष म्हणजे घोड्यांना लगाम नाही बहुधा हे काम रंगकामातून दाखवले जात असावे. हत्तींना सुळे नाहीत, पण त्याजागी खोबणी दिसतात, तिथे खरेखुरे हस्तीदंत बसविले जात असावेत असा अंदाज बांधता येतो.
बाजूच्या दोन्ही भिंतीनाही असेच अर्धे खांब कोरलेले आहेत. त्यावरही असेच कोरीव काम. दोन खांबाच्या बरोबरमध्ये चैत्यगृहाचे पिंपळ पानाकृती कमान असलेले प्रवेशद्वार असून त्यावर नक्षीदार जाळी कोरलेली आहे. बाजूच्या दोन्ही भिंतींवर अनेक मजली प्रासादांचे देखावे. त्यामध्येच गवाक्ष, एकावर एक चढत जाणारे सुंदर असे कोरीवकामाने सजलेले. याच्या खालील बाजूस विश्रांतीसाठी दोन विहार आहेत. लेणीचे आणखीन वेगळेपण म्हणजे त्याचा सजलेला अलंकृत भव्य दर्शनी भाग. आखीव, रेखीव प्रत्येक मजल्यावर छोटी चैत्यतोरणे, गवाक्षे, वेदिकापट्टी सारं काही प्रमाणबद्ध आहे. व्हरांडाच्या अन्य भागावरही चैत्यकमानी, वेदिकापट्टींचे नक्षीकाम केलेले. या व्हरांडातच शेजारच्या भिंतीत प्रत्येकी दोन विहार आहेत.
उजवीकडच्या एका विहाराच्या वरती एक  लेख  कोरलेला आहे.
‘नासिकान अनदस सेठीस पुतस पुसणकस दान’
म्हणजे ‘नाशिकमध्ये राहणाºया आनंद श्रेष्ठीचा पूत्र पुष्पणक याचे दान.

घोडे, हत्ती, वृषभांवरती युगुल अशी कलाकुसुर.


पिंपळपानाकृती चैत्यप्रवेशद्वार

चैत्यगृह


चैत्यगृहामध्ये प्रवेश केल्यावर अष्टकोनी २४ स्तंभ आहेत.

चैत्यगृह :

चैत्यगृह बाहेरून नीटसे दिसत नाही. कारण ते खोदत असतानाच त्याच्या पुढ्यातील कातळ तसाच ठेवला असावा बहुधा छताकडील काम करण्यास आधार मिळावा, पाऊस, वादळ आत चैत्यगृहात येऊ नये  म्हणून तो ठेवलेला असावा. भाजे किंवा कार्ले लेण्यांमध्ये अशा प्रकारची व्यवस्था दिसत नाही. येथील प्रवेशमार्ग डोंगर मधोमध फोडून त्याचे दोन भाग केले आहेत. जनावरे आत येऊ नये म्हणून पुरातत्व विभागाने छोटेसे एक लोखंडी गेटही येथे उभारले आहे.  प्रवेशमार्गावर लेणीच्या वरती जाण्यासाठी कातळात काही पायºया खोदलेल्या आहेत. परंतु पावसाने घसरडे झाल्याने मला या ठिकाणी जाता आले नाही. नाहीतर स्तंभावरील मूर्तींचे छान दर्शन घडते.  आत जाताच चैत्यगृहाचे विशाल स्वरूप समोर येते. याच्या आत आहेत ४ अभूतपूर्ण स्तंभ या स्तंभाच्या मागे चैत्यगृह आहे.
चैत्यगृहाच्या दरवाजापाशी असलेल्या भिंतीच्या वरच्या बाजूस पिंपळपानाची मोठी कमान कोरलेली आहे. त्या खाली पुन्हा खाली तीन चैत्यकमानी कोरलेल्या आहेत. उजवीकडच्या कमानीखाली छोट्या-छोट्या छिद्रांच्या नक्षीतून एक सुंदर गवाक्ष कोरलेले आहे. प्रत्येक चैत्यकमानीमध्ये पुन्हा फुला-पानांची सुंदर नक्षी गुंफलेली दिसून येते. या गवाक्षांचा उपयोग सूर्यप्रकाश येण्यासाठी केला जात असे. पिंपळाकृती कमानीतून आत एका ओळीत दिसणारे स्तंभ दिसत होते. व मध्यभागी चैत्य दिसत होता. चैत्यगृहात प्रवेश केला जर जपूनच न जाणो एखादे जनावर पावसामुळे बसलेले असायचे. पण तसे काही नव्हते. एकदा खात्री करून बिनधास्त आत शिरलो. येथील सुरुवातीचे दोन खांब सोडले तर बाकी सर्व स्तंभ अष्टकोनी आहेत. यातील उजवीकडच्या काही खांबांवर त्रिरत्न, कमळ, चक्र आदी बौद्ध शुभचिन्हे कोरली आहेत. गजपृष्ठाकृती छत असून २६ स्तंभ आहेत. पूर्वी बेडशाच्या छतालाही लाकडी तुळया होत्या. तुळया पुढे चोरल्या गेल्या असे वाचण्यात आले.  चैत्याची हर्मिका अजूनही चांगल्या स्थितीत आहे. विशेष म्हणजे हर्मिकेवरचे लाकडी छत्र सुमारे २२०० वर्षांपूवीर्चे असूनही चांगल्या स्थितीत आहे. कमलपुष्पांसारखी रचना असलेले. चैत्यगृहातील स्तंभावर काही बौद्ध प्रतिकंही कोरलेली आहेत. चक्र, कमळ व कोरीवकाम  हे सारे पाहून क्षणभरात डोळ्यांचे पारणे फिटते. अन्य लेण्यांप्रमाणे बौद्धमूर्ती या ठिकाणी नाही.
या चैत्यगृहात १८६१ पर्यंत हा प्राचीन सुंदर चित्रकाम केलेले टिकून होते. त्यावर्षी कुणी मोठा इंग्रज अधिकारी ही लेणी पाहण्यास येणार होता. त्याच्यासाठी साफसफाईचे करण्यात आली. सरकारी लोकांनी ही लेणी साफ केली. त्यामध्ये तग धरून असलेली चित्रेही पुसून गेली.
कार्ला व भाजे, लेण्याद्री येथील लेण्यात चैत्यगृहात आढळणारी लोकांची गर्दी मी गेलो तेव्हा नव्हती. एकांत होता. माझ्याच हालचालींचा आवाज चैत्यगृहात घुमत होता. सारेच काही विस्मयकारी व अदभूत असे होते. जरा वेळ आतमध्ये बसलो काही फोटो काढले व परत बाहेर येण्यास निघालो.

पाण्याचा ऐक थेंब ही नाही

आर्श्चय कारण्यासारखी गोष्ट बेडसेतील चैत्यगृहात व विहारात पहावयास मिळाली ती म्हणजे एवढा जोराचा पाऊस गेले दीड महिना पडतोय परंतु आतमध्ये पाण्याची ओल, कुठे तरी टिपटिप पाणी पाजरणे असा प्रकार येथे दिसला नाही. यावरून त्याकाळच्या स्थापत्यकारांचे कौतुकच करावयाचे वाटते.

स्तंभांवर फुले, धर्मचक्र, कमळ इ. बौद्ध चिन्हे कोरली आहेत.हर्मिका व तिच्यावरील लाकडी कमलपुष्पाकृती छत्रछोटासा स्तूप.

पुरातत्त्व विभाग :

बेडसे लेणी ही पुरातत्त्व विभागाच्या अंर्तगत येतो. अन्य ठिकाणांपेक्षा (कार्ला लेणी) या ठिकाणीची ही लेणी खूपच स्वच्छ व टापटीप ठेवलेली आहे. वरपर्यंत पायºया, कुठेही मानवी कचरा नाही. प्लॅस्टिक च्या पिशव्या नाही  बाटल्या नाही.

चैत्यगृहाच्या उजवीकडील मोठा विहार


विहार

विहार

बेडसेच्या चैत्यगृहाप्रमाणे विहारही आगळा-वेगळा आहे. चैत्यगृहाप्रमाणे त्याची चापाकार रचना आणि बाजूने भिक्षुकांसाठी राहण्यासाठी खोल्या. वेदिकापट्टी आणि चैत्याकार कमानींनी या सर्व खोल्या एकमेकांना जोडलेल्या. प्रत्येक विहारात झोपण्यासाठी दगडी ओटा. येथे ९ विहार आहेत. या विहाराचे बाहेरील काही भाग काळाच्या ओघात पडल्याचे स्पष्ट दिसून येते.
लेणीच्या बाहेर ओळीने थंडगार पाण्याची कुंडे आहेत. पुरातत्व विभागाने सध्या तरी या ठिकाणी लोखंडी जाळी टाकून बंद केलेले आहेत. चांगले आहे. कुंडा शेजारी बसण्यासाठी ओटे खोदलेले आहेत. 

कसे जाल :   

 • बेडसे येथे जाण्यासाठी जुन्या पुणे-मुंबई हायवेवरुन कामशेत येथे डावीकडे वळावे (पुण्याकडून मुंबईकडे जाताना) तेथून दहा किलोमीटरवर बेडसा लेणी आहे.  पवना धरणाच्या रस्त्याने गेल्यास पवना धरणच्या आधी दहा किलोमीटरवर बेडसे लेण्यांकडे जाता येते.  
 • पुण्यापासून बेडसे लेणी ६० ते ६५ किलोमीटरवर अंतरावर. पुणेकरांना पौडमार्गे हडशी, पवना धरण पाहून बेडसे लेणीकडे जाता येईल.
 • एस.टी. किंवा खाजगी वाहनाने यायचे झाल्यास पवनानगर (काळे कॉलनी) येथे जााºया रस्त्याने राऊतवाडी येथे उतरावे. करुंजगावच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातच ही बेडसे लेणी आहे. 

 • कधी जावे :

  पावसाळ्यात हिवाळ्यात आवश्य जावे. साधारणपणे पाऊस कमी झाल्यावर नाहीतर धो-धो पाऊस. शक्यतो उन्हाळ्यात टाळावे.  हिवाळ्यात डोंगरावर नाना प्रकारची फुल झाडे उगवतात. पळस, पांगारा, चाफ्याची पांढरी फुलांनी हा परिसर फुलून जातो. पावसाळ्यात व हिवाळ्यात बेडसेचा हा परिसर  निसर्गरम्य दिसतो.
  नेहमी पेक्षा काहीतरी वेगळ पाहायचे असेल तर नक्कीच बेडसेला या. अत्यंत शांत, निवांत अस हे ठिकाण आहे.  पर्यटकांची अगदी क्वचितच हजेरी यामुळे या लेणीत सदैव निरव शांतता नांदत असावी. शांतीचा संदेश जगभर पोचविणाºया बुद्धाप्रमाणेच शांततेचा संदेश जणू काही ही बेडसे लेणी आपल्यापर्यंत पोहोचवित आहे.  आतापर्यंत तीन चार वेळा बेडसे लेणीला भेट दिली. प्रत्येक वेळी बौद्ध लेण्यांविषयी नवीन ज्ञान लेणी माझ्यापुढे उलगडते आहे की काय असे वाटते.
  पाऊस अजूनही येतच होता. या लेणीच्या बाजूलाच मोठा धबधबा वाहत होता. पायºया चढत असताना मध्येच तो आपले दर्शन देत होता. त्यामुळे काही काळ तेथे थांबून परतीची वाट धरली १५ मिनिटांतच खाली आलो. गाडीला किक मारून घर गाठले.

अजून काय पाहाल :

कार्ला लेणी, भाजे लेणी, लोहगड, विसापूर, पवनानगर येथील पवना धरण, प्रति पंढरपूर, नारायणी धाम
टीप : 
 • लेणीचे काही फोटो मुद्दामहून प्राचीन काळाची आठवण यावी यासाठी कृष्णधवल करून टाकले आहे.
 • काही फोटो मोठे करावयाचे वाटले त्यासाठी या लिंकवर क्लिक करा.

वरील बेडसा लेणीवरील लेख आपणास कसा वाटला काही चुका / त्रुटी आढळल्यास येथे जरूर लिहा.

आपल्या प्रतिक्रियेच्या प्रतिक्षेत...

‘नासिकान अनदस सेठीस पुतस पुसणकस दान’

बेडसे लेणे परिसरातील काही अन्य चित्रे.


कॉपी करू नका