Monday, July 28, 2014

मावळसृष्टी

मावळसृष्टी



लेख मोठे करून पाहण्यासाठी खालील लिंक पहा.








Thursday, July 10, 2014

श्रीक्षेत्र नारायणपूर

नेहमीच्याच ठिकाणी जाऊन कंटाळा आला होता. घरापासून अंदाजे ६५ किलोमीटरवर असलेल्या श्रीक्षेत्र नारायणपूरला जायचे ठरले. राशीचा स्वामी गुरु म्हणून दहावीत असल्यापासून श्रीक्षेत्र नारायणपूरला दत्तमहाराजांचे दर्शन घेण्यास जायचा उपक्रम सुरू झाला. त्या नादाने मंदिरामागील पुरंदर किल्यावरही ट्रेकिंगच्या निमित्ताने अनेकवेळा वारी झाली होती.  जमेल तेव्हा गुरुवारी जातच होतो. यंदा पावसाने चांगलीच ओढ दिली. शेतकºयांच्या डोळ्यात पाणी आणले. पंढरपूरला पालखी पोहचून सुद्धा पाऊस आलेला नव्हता. पावसाची सर्वच लोक चातकाप्रमाणे वाट बघत आहेत. गुरुवार असल्यामुळे श्रीक्षेत्र नारायणपूरला दत्तमहाराजांचे दर्शन घेण्यासाठी निघालो. वाटेत लागणारी प्रेक्षणीय स्थळे यापूर्वी पाहिलेली होती. त्यामुळे तिकडे न जाता मंदिरात दत्त महाराजांचे दर्शन घेतले. पुरंदर तालुक्यातील सासवडला अनेक प्राचीन मंदिरे, प्रेक्षणीय स्थळे आहेत. यातील काही स्थळे यापूर्वी पाहिली होती. पण त्याचे फोटो पूर्वी काढले नसल्याने त्या विषयी नंतर कधीतरी. सध्या नारायणपूर व नारायणेश्वर मंदिरा विषयी....


दिवे घाट :

    नारायणपूरला जाणारे दोन तीन मार्ग आहेत. त्यापैकी हडपसरमार्गे सासवडवरून गाडीने जाण्यास निघालो. हडपसरमधील प्रचंड वाहतुककोंडी सुधारते आहे असे वाटले. घरातून निघून ऐव्हना पाऊणतास झाला होता. वाटेत कुठेच पाऊसाचे चिन्ह दिसेना. ढग मात्र, भरून आलेले होते. मायबाप सरकारच्या कृपेने हडपसर ते दिवेघाटापर्यंतचा रस्ता चांगलाच खाचखळग्यांनी तयार केलेला दिसला.


      सासवडकडे जाताना वाटेत दिवे घाट लागतो. याच घाटाच्या पायथ्याशी एका कोपºयात पेशव्यांनी बांधलेला मस्तानी तलाव आहे. दोन वर्षांपूर्वी या तलावाची साफसफाई करण्यात आली होती. बरेच ट्रक माती व गाळ काढण्यात आला होता. यंदा मात्र, तलावात थोडेच पाणी शिल्लक राहिलेले दिसून आले. पेशवाईत या तलावातून पुण्याला पाणी आणण्यात यायचे. पंढरपूरच्या वारीत याच मार्गाने तुकाराममहाराजांची पालखीही जाते. घाट सुरू होण्याआधी भेळेची काही दुकाने आहेत. त्या ठिकाणी आवर्जुन थांबून मटकी भेळ खा व घाट चढा मजा येते. पुण्याची वाढती ‘सुज’ या घाटातून अनुभवयाला मिळते. लांबवर दिसणाºया उंच उंच इमारती, त्यात दिसणारी छोटी शेतजमीन, मस्तानी तलाव, समोर दिसणारा कानिफनाथाचा डोंगर पाहून पुढे निघालो.

सासवड

            सासवड हे पुरंदर तालुक्याचे मुख्य ठिकाण. सासवडला पूर्वी सहा वाड्या होत्या. कालांतराने त्या वाड्यांचे गावात रुपांतर झाले म्हणून ‘सासवड’ हे नाव पडले. प्राचीन काळी या ठिकाणी सात विशाल वड होते या सात वडांवरुन हे गाव ‘सातवड’ असे नावे पडले कालांतराने सातवडाचा उच्चार ‘सासवड’ बनला असावा अशी कहाणी सांगितली जाते. येथील अनेक ठिकाणे पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत. धार्मिक, ऐतिहासिक महत्त्व सासवडला आहे. सासवड हे मंदिरे आणि प्राचीन वाडयांचे गाव आहे.





ज्ञानेश्वर माऊलींचे धाकटे बंधू संत सोपान यांनी कºहा नदीच्या काठी संजीवन समाधी घेतली होती. अश्या या सासवडला वटेश्वर, संगमेश्वर, सिध्देश्वर ही तीन पांडवकालीन शिवमंदिरे आहेत. मंदिरे खरच पाहण्यासारखी आहेत. संतश्रेष्ठ सोपानदेव, संत चांगदेव, श्रीदत्त महाराज, बाळाजी विश्वनाथ पेशवे, होळकर, पुरंदरे, पानसरे यांच्या कर्तृृत्वाने पावन झालेले हे सासवड हे गाव आहे. साहित्यसम्राट आचार्य अत्रे यांचे हे जन्मगाव. याच ठिकाणी प्रा. अत्रे यांनी ‘कºहेचे पाणी’ हे पुस्तक लिहिले आहे. बाळाजी विश्वनाथ पेशवे यांची या ठिकाणी समाधी देखील आहे. कोटेश्वर, सिद्धेश्वर, वटेश्वर, संगमेश्वर, कमलेश्वर, लवथळेश्वर, पांडेश्वर ही कºहेकाठची शिवमंदिरे  तर मल्हारगड, पुरंदर असे किल्ले आहेत. कानिफथनाथ, प्रति बालाजी मंदिर, काही अंतरावरील जेजुरी, अष्टविनायकातील मोरगाव अशी विविध पर्यटनस्थळे येथे असल्याने एक दिवसात यातील काही स्थळांना भेट देणे शक्य होते.


संगमेश्वर

            सासवड एसटीस्थानकापासून अंदाजे १ ते दीड कि.मी अंतरावर हे पांडवकालीन स्वयंभू महादेवाचे मंदिर आहे. कºहा आणि चांबळी (भोगवती) या नदयांच्या संगमावर संगमेश्वर आहे.


सध्या नदीला पाणी नसल्याने फक्त दगडधोंडेच पात्रात पहुडलेले दिसतात.  नुकतीच आचार्य अत्रे साहित्य संमेलनाच्या निमित्ताने सासवड हे सांस्कृतिक केंद्र बनले होते. रस्त्यावरूनच संगमेश्वर मंदिराचे दर्शन घेऊन पुढे नारायणपूरला जायला निघालो. या मंदिराविषयी परत कधीतरी. वाटेत सासवडमधून जाताना पुरंदरेंचा मोठा वाडा आपले लक्ष वेधून घेतो.

श्री क्षेत्र नारायणपूर 

दिगंबरा... दिगंबरा... श्रीपाद वल्लभ दिगंबरा...

 

        नारायणपूरला पोहचल्यावर गाडीतळावर गाडी लावून दर्शन घेण्यासाठी गेलो. ऐव्हाना दुपारचे दीड वाजले होते. प्रवचन सुरू होते. प्रवचनानंतर आरती सुरू झाली. काही भक्तांच्या अंगात येणे हा प्रकार या ठिकाणी पाहावयास मिळतो. सुमारे अर्धा तास तरी हा प्रकार सुरू असतो. कोणी श्रद्धा म्हणा अथवा अंधश्रद्धा पण हा प्रकार अवघडच आहे. असो. श्री दत्ताचे जागृत देवस्थान म्हणून नारायणपूरला ओळखले जाते.  श्री क्षेत्र नारायणपूरला मार्गशीर्ष शुद्ध चतुर्दशीला सायंकाळी मोठ्या उत्साहात दत्त जयंती उत्सव साजरा केला जातो. सोहळ्यासाठी  नरसोबाची वाडी, औदुंबर तसेच महाराष्ट्रातील दत्तस्थानांवरून दत्तज्योत आणली जाते. प्रवचन, दर्शन कार्यक्रम व महाप्रसाद आदी कार्यक्रम येथे दरवर्षी होतात. गुरुपौर्णिमेच्या दिवशी येथे मोठा उत्स्व साजरा केला जातो. संपूर्ण महाराष्ट्रातून तसेच देशभरातून भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. येथील विशिष्ट म्हणजे सामुदायिक विवाह सोहळा. महाराष्ट्रभर  आजवर शेकडो विवाह येथे पार पाडले आहेत.  संत चांगदेवाचे गाव म्हणूनही नारायणपूरला ओळखले जाते. मंदिरा शेजारी नारायणेश्वराचे पांडवकालीन जुने मंदिर आहे.  हेमाडपंती बांधकाम असलेले हे मंदिर आहे.


नारायणेश्वर मंदिर

            पुण्यापासून अवघ्या ४० किमी अंतरावर असलेल्या पुरंदर किल्याच्या  पायथ्याला असलेले संत चांगदेवांचे गाव म्हणजे नारायणपूर. येथेच प्रसिद्ध असा एकमुखी दत्त मंदिर व ऐतिहासिक नारायणेश्वर शंकराचे मंदिर आहे. दत्त मंदिरा शेजारी असलेल्या या पुरातन शिवमंदिराचे नाव नारायणेश्वर मंदिर आहे. मंदिर यादवकालीन आहे.





  मंदिराचे दगडी बांधकाम  अजूनही सुस्थितीत आहेत. यादवकालीन असलेल्या या मंदिरावरील शिल्पकाम सुंदर आहे. मंदिरा भोवती अंदाजे ५ ते ६  फूट उंच तटबंदी आहे. या तटबंदीत असलेल्या दरवाजातून मंदिराच्या परीसरात आपला प्रवेश होतो. 

 नारायणपूरचे मूळ नाव पूर.  यादव कालखंडात निर्माण झालेल्या अनेक मंदिरांपैकी हे एक कोरीव शिल्प असलेले मंदिर आहे. सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह असलेले हे शंकराचे मंदिर आहे. प्रवेशद्वार, स्तंभ, छत, भिंती अशा सर्वच ठिकाणी शिल्पकाम आहे. यक्ष, अप्सरा, द्वारपाल, वैदिक देवतांची शिल्पे आहेत. मंदिरा बाहेर नंदीची मूर्ती असून मूर्तीची इतर मंदिराप्रमाणेच थोडी तोडफोड झाल्याचे दिसून येते. आतमध्ये स्वयंभू शिवलिंग आहे. मंदिराची बांधणी ही हेमाडपंती आहे.
  हे सुंदर मंदिर त्याच्या मूळ स्वरुपात असते तर अधिकच छान दिसले असते. मात्र, रंगरंगोटी करून त्याची लया घालावली आहे.  मंदिराचा असला जिर्णोद्धार काय कामाचा. असो,  सभामंडपाच्या उत्तरेकडील प्रवेशद्वाराने बाहेर पडल्यानंतर दरवाजाच्या द्वारपट्टीवर सुंदर नक्षी आहे.








या दरवाजासमोर धनकेश्वराच देऊळ आहे. मंदिराच्या मागिल बाजूस असलेल्या तटबंदीत प्रवेशव्दार आहे. या प्रवेशव्दारातून बाहेर पडल्यावर समोरच एक बांधीव तलाव आहे, त्याला चंद्रभागा म्हणतात.  मात्र, या तलावाची योग्य निगा राखली गेली नसल्याचे दिसून येते. शंकर भगवानचे दर्शन घेऊन श्रीक्षेत्र दत्त संस्थातर्फे देण्यात येणारा मोफत प्रसाद खाण्यास गेलो.

पोटभर प्रसाद

            श्रीक्षेत्र नारायणपूरला जाण्याचे आणखी एक कारण म्हणजे येथे मिळणारा प्रसाद (भात व आमटी) पत्रावळीवर देण्यात येणारे हे पोटभर जेवण गरमा गरम व ताजे असते. पुन्हा पुन्हा हा प्रसाद खाण्याचे मन करते. मी व माझे मित्र पूर्वी पुरंदरावरून दुपारी ३ पर्यंत खाली उतरून आल्यावर दत्त महाराजांचे दर्शन घेऊन पोटभर प्रसाद खात असे. पूर्वी उघड्यावर हे प्रसाद वाटपाचे काम होत असे. आता मोठ्या हॉलमध्ये ही सुविधा देण्यात येते. महिलांसाठी व पुरुषांसाठी वेगवेगळ्या रांगा असून, भारतीय बैठक असते. स्वत:ची पत्रावळ जेवण झाल्यावर ठेवलेल्या कचराभांड्यात नेऊन टाकण्याचे काम प्रत्येकाचे असते. काही लोक खास करून प्रसादासाठी वेगळी भांडी आणून नंतर पुढील प्रवासासाठी हा प्रसाद घेऊन जातात.
एक दिवस वेळ काढून नक्कीच नारायणपूर व परिसरातील पर्यटन स्थळांना भेट देता येईल असा हा सर्व परिसर आहे.

पुरंदर किल्ला

नारायणपूरला मंदिरामागे पुरंदर किल्ला आहे.  या पुरंदरावर शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याच्या अनेक ऐतिहासिक घटना घडल्या आहेत. प्रसिद्ध पुरंदरचा तह, मुरारबाजींचा पराक्रम, छत्रपती संभाजी महाराज, सवाई माधवराव यांचे हे जन्मस्थान. पुरेसा वेळ असल्यास नक्कीच या किल्लयावर जाऊ या. पुरंदर गडावरून सर्वच परिसर मोठा सुरेख दिसतो. येथे जाण्यासाठी मुख्य मंदिराकडे येतानाच रस्ता आहे. या विषयी पुन्हा कधीतरी.

कसे जाल :

नारायणपूरला पुण्याहून जाण्यासाठी तीन मार्ग आहेत. एक तर कापूरओव्हळ मार्गे बालाजी दर्शन घेऊन नारायणपूरला येता येते. दुसरे हडपसर मार्गे दिवेघाटातून नारायणपूरला येता येते. तसेच बापदेव घाटातूनही येता येते.
  • स्वारगेट > कापूरओव्हळ (२५ किमी पुणे - सातारा रस्त्यावर) > नारायणपूर मंदिर (१५ किमी)
  • सासवड  >   नारायणपूर अंतर १२ किमी आहे.
  • स्वारगेट > नारायणपूर अशी एसटी सेवा उपलब्ध आहे.
  • स्वारगेट >  हडपसर मार्गे सासवड ३० किमी अंतर > नारायणपूर मंदिर (१० किमी)

अजून काय पहाल :

प्रति बालाजी मंदिर (कोपूरओव्हळ)
पांडेश्वर मंदिर
भुलेश्वर मंदिर
पुरंदर, व्रजगड किल्ला
कानिफनाथ मंदिर

पुरंदर- वज्रगड किल्ला   
संगमेश्वर मंदिर
नारायणेश्वर मंदिर
वटेश्वर मंदिर
बालाजी विश्वनाथ यांची समाधी
मल्हारगड
जेजुरी

Wednesday, March 19, 2014

मावळसृष्टी

पर्यटकांच्या भटकण्याच्या यादीत कोकण, महाबळेश्वर, लवासा, ताम्हीणी घाट, माळशेज घाट ही स्थळे भाव घावून जातात. या नेहमीच्या या ठिकाणांऐवजी एखाद्या नव्या व निवांत ठिकाणी हिंडायला प्रत्येकालाच आवडते. नेहमीच्या पर्यटनस्थळांवर वाढणारी गर्दी व त्यापेक्षाही त्यांचा नकोसा असलेला उच्छाद, हुल्लडपणा नको असतो. पुणे-मुंबईपासून तासाच्या अंतरावर असलेल्या लोणावळा-खंडाळा परिसरातील मावळातील पर्यटनस्थळांकडे पर्यटक आकर्षित होऊ लागला आहे. येथील ऐतिहासिक किल्ले, पवना, भुशी डॅम, धबधबे, नवीन उभारण्यात आलेली मंदिरे पाहण्यासाठी पर्यटक येथे येऊ लागला आहे. निर्सगाने मुक्तहस्ताने सौंदर्याची उधळण या परिसरावर केली आहे. मावळातील काही परिसर सोडला तर पर्यटनदृष्टया हा परिसर उपेक्षित राहिला आहे त्या विषयी.... 


सध्या विकएंड साजरा करण्याचा प्रघात आपल्याकडेही सुरू झाला आहे. दोन-चार दिवस सलग सुटी आल्यास घरातील मंडळी कुठे तरी बाहेर जाण्याचा बेत आखतात. मग चर्चा सुरू होते ती नवीन ठिकाणे पाहण्याची पण तिच तिच ठिकाणे पाहून कंटाळलेल्या पर्यटकांना नवे पर्यटनस्थळ पाहिजे असते. अशीच काही पर्यटन स्थळे त्यांचे स्वागत करण्यासाठी मावळात आहेत.  त्यातच पुण्याला पर्यटननगरीचा दर्जा मिळाल्यानंतर देशी- विदेशी पर्यटकांची पावले आपोआप वळू लागली. लोणावळा, खंडाळा, महाबळेश्वर या ठिकाणांना आणखीन एक नवा पर्याय म्हणून ‘लवासा’, सहारा सिटीसारखे मानवनिर्मित शहरे स्वागतासाठी तयार होऊ लागली आहेत.
छत्रपती शिवाजीमहाराजांच्या सैन्यातील सैनिकांना मावळे म्हणत. हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या कार्यात महत्त्वपूर्ण सहभाग असलेल्या या मावळ्यांना ‘मावळे’ हे नाव पडले ते ‘मावळ’ सह्याद्रीच्या दोन डोंगररांगांच्या मधल्या खोºयात पसरलेले आहे. सह्याद्रीला खेटून आणि देशावरचा भाग डोंगरावरून उतरणाºया नदीचे खोरे  म्हणजे  मावळ.  पुणे जिल्ह्यात एकूण बारा मावळ आहेत. यात आंदर मावळ, कानद मावळ, कोरबारसे खोरे, गुंजन मावळ, नाणे मावळ, पवन मावळ, पौड मावळ, मुठा खोरे, मुसे खोरे, रोहिड खोरे, वळवंड खोरे, हिरडस मावळ यांचा समावेश होतो.  यातील तीन मावळ लोणावळा-खंडाळा परिसरात येतात ते म्हणजे आंदर, पवन आणि नाणे मावळ. पवन मावळात पवना नदी उगम पावते आणि वाहते म्हणून याला पवन मावळ म्हणतात. मराठेशाहीच्या पराक्रमाची साक्ष देणारे लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना, राजमाची किल्ले या परिसरात आहेत. तर कार्ला, भाजे, बेडसे या बौद्धकालीन लेण्या देखील आहे. एकविरा देवी, भंडारा डोंगर, भामचंद्रा डोंगर, तुकाराममहाराजांच्या वास्तव्याने पावन झालेली देहूनगरीही या परिसरात आहे. पवनामाई व इंद्रायणी नदी या परिसरातून वाहते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पुणे जिल्ह्यातील १७ नवीन पर्यटन स्थळांना ‘क’ दर्जाचे पर्यटन स्थळ म्हणून मान्यता देण्यात आली आहे.  या यादीत मावळ तालुक्यातील लोणावळा, खंडाळा, कार्ला,  तुंग आणि तिकोना किल्ल्यांचा समावेश करण्यात आला आहे. या किल्यांच्या विकासासाठी पर्यटन आणि सांस्कृतिक खात्याच्या वतीने वीस कोटींचा निधीही मंजूर करण्यात आला आहे. पुरातन लेणी म्हणून ओळखल्या जाणाºया कार्ला लेणीला ‘क’ दर्जा प्राप्त झाला आहे. महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) वतीने कार्ला येथे सुमारे ३ कोटी ६६ लाख रुपये खर्च करून जलक्रीडा केंद्राची उभारणी करण्यात आली आहे.  पर्यटनातून या भागातील लोकांना रोजगार मिळावा तसेच पर्यटकांची संख्या वाढावी यासाठी महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत.


मावळात वर्षाविहाराचा आनंद

पर्यटकांना आकर्षित करणारे मोठे जलाशय तर मावळचे वैशिष्ट्यच म्हणावे लागेल. पवना, वळवण, आंद्रा, भुशी, तुंगार्ली, शिरोता, ठोकळवाडी, वडीवळे धरणे मावळच्या समृद्धतेची साक्ष देतात.   पावसाळ्यात मावळातील निसर्गसौंदर्य बहरू लागते. डोंगरातून धबधबे खळाळून वाहू लागतात व आपसूकच पर्यटकांचे पाय धरण क्षेत्राकडे वळतात. वर्षाविहाराचा आनंद लुटण्यासाठी सुटीच्या दिवशी या परिसरात पर्यटक गर्दी करतात. पावसाळ्यात दहा लाखांहून अधिक पर्यटक लोणावळ्याला येतात. लोणावळ्यातील प्रसिद्ध चिक्की, जेली खरेदीसाठी येथील दुकानांतून ग्राहकांची गर्दी असते. धरणाच्या जलाशयात बोटिंग व्यवसाय, गाइड, फोटोग्राफी यांसारखे व्यवसाय सुरू झाले आहेत. या देखण्या परिसरामध्ये नौकाविहाराचीही व्यवस्था सुरू करण्यात झाली आहे. एक दोन दिवस निवांत पाहण्यासारखी ठिकाणे या परिसरात असताना लोणावळा व खंडाळ्यातील मोठ्या हॉटेलचे दर मात्र सर्वसामान्यांच्या खिशाला न परवडणारसारखे आहे. हे दर आवाक्यात आल्यास या भागात येणाºया पर्यटकांची संख्या वाढू शकेल. यामुळे पर्यटक लोणावळा खंडाळ्यापुरताच मर्यादित न राहता उर्वरित  मावळातील पर्यटनाला चालना मिळू शकेल. संततधार पाऊसाने मावळातील आतील गावातील रस्ते खराब होतात. काही गावांचा संपर्कही तुटतो.  पर्यटकांचे जथ्थेच्या जथ्थे गाड्या भरून  आल्याने लोणावळा, खंडाळा परिसरात वाहतूक, पार्किंग आणि शुल्कवसुलीचे नियोजन ढासळते. पावसाळ्यात तर पोलिसांना गर्दी आवरता येत नाही. गाडी पुढे सरकत नाही. ४-४ तास ट्रॅफिक जॅमचा अनुभव येथे आलेल्या पर्यटकांना घ्यावा लागतो. यातून होणाºया दुर्घटना, पाण्यात वाहून जाणे, किरकोळ वादावादी आदी दुर्घटनांना पर्यटकांना सामोरे जावे लागते.
 आंदर मावळ व नाणे मावळाच्या परिसरातील नव्या नैसर्गिक स्थळांचा शोध घेत पर्यटक येथे पोहचू लागला आहे. उंच डोंगर, शांत वातावरण, हिरवाईमुळे बॉलीवूडमधील चित्रपट निर्मातेही या भागाकडे आपला मोर्चा वळवितात. अनेक हिंदी चित्रपटांचे चित्रीकरणही या भागात करण्यात आले आहे.  नाणे व आंदर मावळामध्ये खास पावसाळ्यातील निर्सगाची देखणी सजावट पाहण्यासाठी या भागात येतात.

ट्रेकर्स लोकांची पंढरी

थंड हवेचे ठिकाण म्हणून ‘लोणावळा-खंडाळा’ प्रसिद्ध आहेच. पण तरुणांच्या आवडत्या ट्रेकिंगसाठीही हे क्षेत्र प्रसिद्ध आहे. मावळातून कोकणात उतरणाºया पायवाटा व मोठे घाटरस्ते आहेत. पावसाळा सुरू झाला की तरुणांच्या चर्चेत येतो तो लोणावळा खंडाळाचा परिसर. हिरवागार डोंगर, हिरवी-पोपटी भातखाचरे, कडेकपारीतून कोसळणारे धबधबे व सोबतीला सह्याद्रीच्या अंगाखांद्यावरील शिवाजीमहाराजांचे गडकोट. त्यांना येथील निर्सग वेड लावतो. मग वेडे होण्यासाठी भटक्यांची पावलेही या मावळाकडे वळतात. लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना, राजमाची किल्ला, ढाकचा बहिरी म्हणजे ट्रेकर्स लोकांची पंढरीच. कुणी इथल्या लेण्या-दुर्गावर निघतात, काही इथल्या धरणांवर विसावतात, काहींना फक्त इथल्या वाटांवर फिरण्यात मजा वाटते. विविध जातीची फुले, पक्षी पाहण्यात वेळ निघून जातो. हाडशी जवळील सत्यसाई मंदिर, लोहगडाजवळील प्रति पंढरपूर परिसर, देहूरोडजवळील कुंडमळ्यात निसर्गाची किमया पाहता येते. इंद्रायणी नदीच्या पाण्याने येथील कातळात रांजणखळगे तयार झाले आहेत. मावळातली दिवसभराची ही भटकंती चिंब भिजवून टाकते.
 येथील सगळाच भाग निसर्गत:च सुंदर आहे. येथे पोहचण्यासाठी घाटरस्ते, मोठे टुमदार बंगले, भव्य हॉटेल्स, हेलीपॅड, उद्याने, धरणे पर्यटकांना आकर्षित करतात. हा सारा परिसर अमूल्य अशा झाडा-झुडुपांचा आहे. मावळातील या परिसरात अनेक औषधी वनस्पती सापडतात. शनिवार, रविवार या ठिकाणी असंख्य ट्रेकर्स पाठीवर बॅग घेऊन येथील डोंगरवाटा तुडवताना दिसतात. मात्र, दळणवळणा अभावी खासगी वाहन घेऊनच ही  भटकंती करावी लागते.
भरपूर पाऊस, सुपीक जमीन अशा जमेची बाजू असताना या भागात़ील शेतकºयांना मात्र योग्य मार्गदर्शनाअभावी या गोष्टींचा पुरेसा फायदा होताना दिसत नाही. धरणे आणि पाण्याचा मुबलक साठा असताना शेतकरी मात्र तहानलेले आहेत. पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गाचा बरचसा भाग हा मावळातून गेल्याने हा परिसर ओळखला जाऊ लागला. गहुंजे येथील क्रिकेटप्रेमींचे सुब्रोतो स्टेडियमुळे तर मावळ आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखले जाऊ लागले.
पुणे-मुंबईपासून तासाच्या अंतरावर येथील ठिकाण असल्याने साहजिकच या परिसरात गृहप्रकल्पांना वाढती मागणी होऊ लागले. ‘निसर्गाच्या कुशीत ‘स्वत:चे हक्काचे घर’ अशा जाहिरातींना प्रचंड प्रतिसाद येऊ लागला आहे. यासाठी शेतकºयांच्या जमिनी कवडीमोलाने खरेदी करून बांधकाम होऊ लागले आहे. बांधकामासाठी वृक्षतोड, डोंगराच्या जवळील जागा खरेदी करून डोंगराची लचकेतोड थांबवली पाहिजे. धरणाच्या परिसरात बांधकामे होऊ लागली आहे. येथील झपाट्याने होणाºया विकासावर कोणाचातरी अंकुश असणे गरजेचे आहे. अन्यथा हे पर्यटनक्षेत्र धनाढ्य लोकांच्याच हाती राहून सर्वसामान्य पर्यटकांना मात्र, यापासून वंचित राहावे लागेल. लोणावळा, खंडाळात हळूहळू मानवी प्रदूषणाचा फटका बसत आहे. ऐतिहासिक किल्ले व नैसर्गिक वरदान असलेला हा परिसर आहे. हा ठेवा जपण्यासाठी सरकारकडून योग्य उपाययोजनांची गरज आहे. पर्यटकांसाठी नवा पर्याय ठरू लागलेल्या या क्षेत्रात दळणवळणाचा अजूनही अभाव दिसून येतो. या सर्व गोष्टींचा विचार पर्यटनाच्या दृष्टीने होणे गरजेचे आहे अन्यथा निर्सगाची हानी होऊन झालेले पर्यटन कायम कामाचे राहणार हाच प्रश्न आपणापुढे उभा राहतो.

 

मावळातील प्रेक्षणीय पयर्टन स्थळे  

पवना धरण
लोहगड
विसापूर
तुंग
तिकोना
ढाकचा बहिरी
नागफणी
प्रति पंढरपूर
ड्युक्सनोज (नागफणी)
बिर्ला गणेश मंदिर
शिरगावचे साईबाबा मंदिर
देहूगाव
घोरावडेश्वर मंदिर
आय्यप्पा स्वामींचे मंदिर
बेडसा, भाजे, कार्ला ही लेणी
श्री क्षेत्र सत्यसाई पांडुरंग मंदिर, हाडशी, पुणे

Friday, March 14, 2014

चित्रबलाकावर ‘अवकळा’

दोन आठवड्यांपूर्वी इंदापूरजवळ असलेल्या सासुरवाडीला जाण्यासाठी निघालो. पुणे - सोलापूर महामार्गाने प्रथम सिद्धटेकच्या गणपतीचे दर्शन घेऊन पुढे राशिनमार्गे भिगवणला गेलो. वाटेत चिंचेच्या झाडावर घरटी केलेल्या या चित्रबलाक पक्षांनी आमचे स्वागत केले.  मागील आठवड्यात या उजनी धरणाच्या परिसरात प्रचंड गारपिट झाली. रोहित पक्षी (फ्लेमिंगो), चित्रबलाक (पेंटेड स्टॉर्क) यांचे सारंगागार म्हणून प्रसिद्ध असलेल्या इंदापूर, भिगवण व उजनी परिसरातील या क्षेत्राला अवकाळी गारांच्या पावसाचा तडाखा बसला.  वर्तमानपत्रात आलेल्या बातम्यां वाचून मन्न खिन्न झाले. ऐन विणीच्या हंगामात गारांचा पाऊस झाल्याने पक्षांचा हंगाम वाया गेला आहे. सुमारे ५०० अंडी व ६०० च्या जवळपास पक्षी मृत्युमुखी पडले वाचून मन दु:खी झाले. इंदापूराहून या पक्षांना पाहून येऊन मला जेमतेम काहीच दिवस झाले होते. त्या विषयी....

        


  गजानानचे दर्शन घेऊन राशिन मार्गे भिगवणला जाण्यासाठी निघालो. रस्ता चांगला असल्याने पाऊण तासात डिकसळला पोहचलो. वाटेत चिंचेच्या झाडावर चित्रबलाक पक्षांची घरटी पाहिली. साधारणपणे २ ते अडीच फुट उंच असलेला हा पक्षी मुलाने प्रथम एवढ्या जवळून पाहिल्याने आनंदाने उड्याच मारल्या.  दुसºया दिवशी सकाळी इंदापूरातील तहसील कार्यालयाच्या जागेत असलेल्या चिंचेच्या झाडांवरील चित्रबलाकाची घरटी पाहण्यासाठीही गेलो. शेजारी लोकवस्ती असून देखील चित्रबलाक पक्षी दर वर्षी आपले घरटी करतात. झाडाखाली पिल्लांसाठी आणलेल्या माशांचा सडा पडलेला दिसला. एवढ्या लांबून कोणत्याही नकाशाशिवाय हे पक्षी दरवर्षी कसे येतात? याचे आश्चर्य वाटल्यावाचून राहिले नाही.  रोहित पक्षी मात्र धरणक्षेत्राच्या आतील बाजूस असल्याने मला पाहता आले नाही.

चित्रबलाक पक्ष्याविषयी :
पिवळ्या रंगाची मोठी आणि लांब चोच, चेहरा पिवळ्या रंगाचा त्यामुळे हा पक्षी मोठा मजेशीर व चेहºयाने गरीब दिसतो.   उर्वरित अंगावर पांढरी पिसे आणि त्यावर हिरवट काळ्या खुणा, पंख गुलाबी असून छातीवर आडवा काळा पट्टा नर व मादी दिसायला सारखेच असतात. पिल्लांसाठी आणलेला खाऊ देत असताना त्यांचा होणारा आवाज मजेशीर होता.







दोष निसर्गाचा का मानवाचा?
अवकाळी पावसाने महाराष्ट्रभर झालेला निसर्गाचा कोप व गारपीट यामुळे शेतकऱ्यांचे ओतोनात नुकसान झाले. हे नुकसान कदाचित भरूनही निघेल. मायबाप सरकार किरकोळ रकमा व दिलासा देऊन शेतकऱ्यांना तारेल देखील. विणीचा हंगामासाठी आलेल्या या पक्ष्यांची अंडी व नवजात पिले अवकाळी गारांच्या माºयाने मृत्यूमुखी पडली. उजनी जलाशयाला लागून असलेल्या भादलवाडी तलावावर या परिसरात चित्रबलाकांसह,  ग्रे हेरॉन, करकोचा, फ्लेमिंगो (रोहित पक्षी) या शिवाय अन्य पक्षांची ये-जा सुरू असते.  उजनी धरण पाणलोट क्षेत्रातील मासे, बेडूक, साप, इतर कीटकांवर हे पक्षी गुजराण करतात.  दर वर्षी नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवडयात चित्रबलाक इंदापूरला येतात. उजनी धरणाच्या परिसरात त्यांची अनेक घरटी दिसून येतात. गवत, काड्या वगैरे वापरून ते मोठे घरटी बनवितात. चिंचेच्या झाडावर साधारणपणे पंचवीस ते तीस घरटी पाहून जणू ही त्यांची मोठी कॉलनीच आहे आहे असे वाटले. सोबतीला वटवाघूळ देखील स्वत:ला उलटे टांगून या पक्षांचा दिनक्रम पाहत बसलेली दिसली. कच्छच्या रणातून दर वर्षी विणीच्या हंगामासाठी येणाऱ्या या सैबेरियन चित्रबलाक पक्षांना मानवनिर्मित प्रदूषणाचा चांगला फटका बसला आहे. जागतिक तापमानवाढ, निसर्गातील हवामानाचे होणारे बदल, धरणातील जलप्रदूषणामुळे आवडते खाद्य नष्ट होऊ लागले आहे. सिमेंटची वाढत असलेली जंगले व मानवाची निर्सगामधील लुडबुडू या पक्ष्यांच्या अस्तित्वावर उठली आहेत.       



वर्तमानपत्रात आलेल्या अवकाळी पावसाच्या बातम्या व त्या विषयी विश्लेषण पाहून हे सर्व मानवनिर्मित उद्योग असल्याचे कळाले.  इंदापूरला गेल्या ५० वर्षांपासून राहणाºया माझ्या सासºयांनी देखील अशा प्रकारचा पाऊस व तो देखील गारपीटाचा पहिल्यांदाच पाहिला. मी जे चिंचेचे झाड पाहून आलो होतो त्या झाडांवरील बहुतांश पक्षी मेल्याचे त्यांनी दुसऱ्या दिवशी सांगितले. पुढील वर्षी हे पाहुणे दुसऱ्या ठिकाणी आपले नवे ठिकाण शोधायला नक्कीच जातील त्यामुळे हे पाहुणे परत पुढील वर्षी इंदापूरला येतील का नाही? याची शंकाच वाटते. 


Tuesday, February 25, 2014

श्री सिद्धिविनायक अर्थात श्रीक्षेत्र सिद्धटेक

अष्टविनायकातील दुसरा गणपती म्हणजे सिद्धटेकचा सिद्धिविनायक गेल्या शनिवारी श्रींचे दर्शन घेऊन पुढे गावी गेलो. अशा या अष्टविनायक गणपतीची माहिती थोडक्यात.

 

 










               अष्टविनायकांपैकी दुसरा गणपती म्हणजे श्री सिद्धिविनायक. श्री विष्णूला सिद्धी प्राप्त करून देणारा, कार्य सिद्धीस नेणारा हा सिद्धिविनायक अष्टविनायकांपैकी उजव्या सोंडेचा एकमेव गणपती. श्रीक्षेत्र सिद्धटेक अहमदनगर जिह्यात कर्जत तालुक्यात भीमा नदीच्या काठावर  आहे.  श्रीगोंदे तालुक्यात भीमा नदीकाठी दौंडच्या उत्तरेस सुमारे १९ किलोमीटरवर आहे.  अहल्याबाई होळकर यांनी जीर्णोद्धार करून मंदिर बांधले आहे. मंदिर उत्तराभिमुख असून  मंदिरापर्यंत पेशव्यांचे सरदार हरिपंत फडके यांनी मार्ग बांधला आहे. बाहेरच्या बाजूस सभामंडप असून महाद्वार व त्यावर नगारखाना आहे.
            सिद्घिविनायकाची स्वयंभू पाषाणमूर्ती असून सोंड उजवीकडे आहे. मूर्ती तीन फुट रुंद आहे. मंदिरात पितळी मखर असून त्याभोवती चंद्र-सूर्य-गरूड यांच्या प्रतिमा आहेत.  उजव्या-डाव्या बाजूंस जय-विजयांच्या मूर्ती आहेत. उजव्या सोंडेचा गणपती असल्यामुळे हे कडक दैवत मानले जाते. श्री मोरया गोसावी यांनी येथेच साधना केली होती व नंतर ते मोरगावी गेले. मंदिराला प्रदक्षिणा मारण्याची प्रथा आहे.  प्रदक्षिणेचा मार्ग खूप मोठा आहे. या मंदिराच्या जवळून भीमा नदी वाहते. सध्या या नदीवर पूल बांधल्यामुळे थेट नदी ओलांडून मंदिरापर्यंत येता येते. पूर्वी होडीतून नदीपार करावी लागत असे.  मंदिरा बाहेर अर्थातच धार्मिक साहित्य, फुले विक्रीची दुकाने थाटलेली याही ठिकाणी दिसून येतात. भाद्रपद आणि माघ महिन्यात येथे उत्सव होतात

 

कसे जाल :

  • यात्रेकरूंना सोयीचे रेल्वेस्टेशन म्हणजे दौंड. दौंड ते सिद्धटेक हे अंतर अंदाजे १९ कि.मी. आहे.
  • पुण्याच्या शिवाजीनगर एस.टी. स्थानकापासून दुपारी तीन वाजता थेट सिद्धटेकची बस आहे.
  • पुण्याहून हडपसर-लोणी-यवत-चौफुला-पाटस-दौंडमार्गे सिद्धटेक अंदाजे १०० कि.मी. वर आहे. गजाननाच्या कृपेने रस्ता चांगला आहे. पुण्याहून निघून थेऊर, सिद्धटेक व रांजणगाव अशी गणपती यात्रा एक दिवसात होऊ शकते.



 अष्टविनायकातील अन्य गणपतींच्या स्थळांच्या माहितीसाठी क्लिक करा...

 हा फेरफटका आपणास कसा वाटला ते येथे जरूर लिहा...

मोरया गोसावी समाधी मंदिर

    
महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून पुणे नावारुपाला आलेले आहे. याच पुण्याच्या जवळ सुमारे २० किलोमीटरवर भक्तीशक्तीची परंपरा जपणारे चिंचवड हे छोटेसे पूर्वीचे गाव. चिंच व वडाची झाडे पूर्वी या परिसरात मोठ्या प्रमाणात होती. त्यावरून चिंचवड हे नाव पडले. सध्या मात्र इमारतींच्या जंगलामुळे प्रचंड प्रमाणात वृक्षतोड झाली. नवे पूल, नवे रस्ते, उंच इमारतींमुळे ही झाडे काळाच्या पडद्याआड गेलेली आहेत. मोरया गोसावी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. याचबरोबर क्रांतिकारक चापेकरांचीही भूमी आहे. या मंदिरापासून काहीच अंतरावर चापेकरांचा वाडा आहे. 
       


चिंचवड गावाचा उल्लेख शिवाजीमहाराज व पेशव्यांच्या ऐतिहासिक दस्तऐवजात सापडतो. चिंचवडला महान साधू मोरया गोसावी यांची समाधी आहे. मंगलमूर्ती वाडा व मोरया गोसावी समाधी मंदिर आहेत. गणेश भक्तीसाठी गावकºयांनी मोरया गोसावी यांना ही जागा उपलब्ध करून दिली. याच कालखंडात निजामशाही, आदीलशाही यांच्याकडून मोरया गोसावी यांना वतनरूपी सदना मिळाल्या. पूर्वी गावाला तटबंदी होती. गावात अन्नछत्र सुरू झाले. हजारो गोरगरीब, रंजले गांजलेले, श्रीमंत लोक सुद्धा मोरया गोसावींच्या दर्शनासाठी येऊ लागले. पुढे छत्रपती शिवाजीमहाराज, पेशवे, होळकर यांनीही महाराजांना गावे, जमिनी इनामी दिल्या. चिंचवड देवस्थानाला रुपया मोहरा पाडण्यास टंकसाळ दिली. पेशव्यांचे कुलदैवत गजानन असल्यामुळे अष्टविनायक गणपतीच्या मंदिराचा विकास झाला. साताºयाचे शाहूमहाराज, तुकाराममहाराज, छत्रपती शिवाजीमहाराज या ठिकाणी दर्शनासाठी येत असते.

           हे मंदिर सुमारे ३० बाय २० फूट आकाराचे आहे.  शेजारून पवना नदी वाहते. पावसाळ्यात पूर आल्यास अथवा पावसाळ्यात पवना धरणातून पाणी सोडल्यास या नदीला पूर येतो. अर्थातच हे मंदिर अर्धे पाण्याखाली जाते.  दगडी आणि साध्या बांधणीचे हे मंदिर आहे . सभामंडपाच्या मागे गणेशभक्त श्री  मोरया गोसावी यांनी १६५५ ला जिवंत समाधी घेतली.  त्या समाधीवरच १६५९ ला चिंतामणी गोसावीमहाराजांनी मंदिर बांधले.  पवनेकाठी असलेल्या या मंदिरात मोरया गोसावींची पुण्यतिथी डिसेंबर महिन्यात मार्गशीर्ष वद्य तृतीयेपासून षष्ठीपर्यंत मुख्य महोत्सव म्हणून साजरी केली जाते. सध्या देवस्थान विश्वस्तांच्या देखरेखीखाली मंदिराचा कारभार चालतो. याचबरोबर मोरगाव, थेऊर व सिद्धटेक या अष्टविनायकांच्या मंदिराचे व्यवस्थापन श्री मोरया गोसावी मंदिराकडे आहे.  मंदिराच्या बाहेरील बाजूस पूजासाहित्य विक्रीची दुकाने थाटलेली आहेत. या मंदिरापासून काहीच अंतरावर देऊळवाडा आहे.  अरुंद रस्त्यांमुळे या ठिकाणी यात्रेच्या काळात भाविकांची गैरसोय होते. वाढते औद्योगिकीकरणामुळे भोसरी एमआयडीसी, चाकण एमआयडीसीमुळे या ठिकाणी लोकवस्ती वाढली आहे. नवीन येणाºया नागरिकांना व खुद्द चिंचवड येथील स्थानिकांनाही देखील इतिहास व धार्मिकता यांचे महत्व नसते. माझ्या या फेरफटकाचा उपयोग अशा लोकांसाठी नवीन माहिती म्हणून उपयुक्त ठरेल.

कसे जाल :

  • जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर चिंचवड स्टेशन येथून चिंचवडगावाकडे जाणारा रस्ता आहे.
  • तसेच देहूरोड-कात्रज बायपासवरून डांगेचौकात येऊन येथे येता येते.

काय पहाल :

कॉपी करू नका