Saturday, July 9, 2016

भाजेची कातळकला

पुणे-मुंबई रेल्वेमार्गावर मळवली रेल्वे स्थानकाच्या डाव्या आणि उजव्या हाताला दोन प्रसिद्ध कातळशिल्प आहेत. डाव्या बाजूची भाजे गावातील भाजे लेणी, तर उजव्या बाजूची प्रसिद्ध कार्ला लेणी. यापैकी भाजे लेणीचा मागील आठवड्यात फेरफटका केला. त्याबद्दल... ¸
                 नुकतीच पाऊसला सुरूवात झाली होती. भटक्यांची पंढरी म्हणून ओळखले जाणाऱ्या मावळातील अनेक ठिकाणे पर्यटकांचे आकर्षण ठरतात. नेहमीच्या लोणावळ्यातील भुशी डॅम परिसरात गर्दीमध्ये जाऊन मनस्ताप सहन करत बसण्यापेक्षा या वेळी लोणावळ्याच्या अलिकडे असणाऱ्या मळवली येथील प्रसिद्ध भाजे लेणी पाहून वर्षाविहारासाठी जाण्याचे ठरले. मळवली येथील भाजे गाव तसे शेकडो वर्षांपूर्वी वसलेले. याच गावातील डोंगरावर ही लेणी कोरून ठेवलेली आहेत. लेणीच्या मागील बाजूला असलेल्या विसापूर किल्याच्या कुशीत भाजे लेणीचा दोन हजार वर्षांपूर्वीचा इतिहास दडलेला आहे. येथूनच विसापूर व लोहगड किल्यावरही जाता येते. लेणीच्या पायथ्यापर्यंत चांगला गाडीमार्ग असल्याने मळवली स्थानकापासून चालत अथवा स्वत:च्या गाडीने येथपर्यंत दहा मिनिटातच पोहचता येते. भाजेगाव मळवली रेल्वे स्थानकापासून साधारणपणे एक किलोमीटरवर आहे. पायथ्यापासून लेणीचे दर्शन होत नाही. पुरातत्व विभागाने लक्ष दिल्याकारणाने लेणी पाहयला जाण्याच्या मार्गावर चांगल्या पायºया तयार केल्या आहेत.  या पाय-यांवरून सुमारे २५० ते ३०० फुटांवर असलेल्या लेण्यांपर्यंत जायला वीस मिनिटं लागतात. भारत सरकारने या लेण्यांना दिनांक २६ मे १९०९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. सुमारे १२० पायºया चढून तिकीट घराकडे आपण पोहचतो.  दगडी बांधकाम केलेले एक तिकिट विक्री केंद्र डाव्या बाजूला लेणीच्या थोडे खाली उघडण्यात आले आहे.  तेथून काहीच अंतरावर भाजे लेणीला गेट उभारले आहे. वाटेत आपण चढून आलेला मार्ग व गावातील छोटी-छोटी होत गेलेली घरे, मंदिर व आजुबाजूचा परिसर खूपच सुंदर दिसतो. पावसाने तुंडूब भरलेली खाचरे, शेतात सुरू असलेली शेतकामाची लगबग न्याहाळत आपण पोहचतो. ते मुख्य लेणीपर्यंत. मावळातील या लेणींना मी अनेकवेळ विविध मित्रांबरोबर तर कधी एकटाच भेटी दिल्या आहेत. विसापूर, लोहगड, तुंग, तिकोना या किल्यांवर जाण्यासाठी हाच मार्ग सोयीस्कर ठरतो. पावसाळा असल्याने अनेक हौशी पर्यटक पावसात भिजण्याचा आनंद घेण्यासाठी आले होते. अनेकजणांना वर काय आहे? याची माहितीही नव्हती. केवळ धबधब्याखाली भिजण्यासाठी आलेली यातील काही मंडळी होती. लेणीच्या आवारात प्रवेश केला. समोर उभा होता. २००० वर्षांपूर्वीचा आपला इतिहास.


अप्रतिम चैत्यगृह

                प्रवेश केल्यानंतर प्रथम लक्ष जाते ते भव्य चैत्यागृहाकडे. भाजे येथील चैत्यकमान फार अप्रतिम आहे. १२ क्रमांकाची ही गुफा म्हणजे एक चैत्यगृह आहे. चैत्यगृह २७ फूट रूंद आहे आणि साधारण ६० फूट लांब आहे. एकूण २९ लेणी आहेत. चैत्यगृह आणि चैत्यागृहाच्या आजूबाजूला असलेले एकवीस विहार. चैत्यगृहाला व्हरांडा न खोदता चैत्यगृहाची कमान मुख्य कातळातच कोरली गेली आहे. अर्थातच पावसाचे पाणी झिरपून दर्शनी भागाचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. नंतरच्या काळात खोदलेल्या लेणींमध्ये ही चूक सुधारल्याचे दिसून येते. कार्ले गुंफा भाजे गुंफांनंतर सुमारे ३०० ते ४०० वर्षांनी खोदल्या गेल्या असव्यात असे सहज लक्षात येते.  पिंपळपानाच्या आकाराचे भव्य प्रवेशद्वार असून, अशीच रचना कर्जत येथील कोंडाणे  लेणीची सुद्धा असल्याचे आपल्या लक्षात येते. गुंफेच्या पुढच्या भागात खाली जमिनीवर व दोन्ही बाजूंच्या भिंतींवर लाकडी खुंट्या मारण्यासाठी खोदलेली चौरस आकाराची काही छिद्रे आहेत. पूर्वी चैत्यगृहाच्या बाहेर जमिनीपासून ते वरच्या कमानीपर्यंत एक मोठे लाकडी दरवाजा असला पाहिजे.  हे चैत्यगृह अतिशय साधे आहे व याच्या आतील भागात खांबावर असलेल्या काही बौद्ध चिन्हांचा अपवाद वगळता कोणत्याही प्रकारच्या शिल्पांचा किंवा कोरीव कामाचा अभाव आहे.
                  चैत्यागृहाच्या बाहेरील बाजूस कातळात कोरलेल्या कोरीव सज्जे, वेदिकापट्टीची नक्षी, चैत्य गवाक्षांच्या माळा, कातळात खोदलेल्या सुंदर कड्या, भिक्षुंसाठी निवासस्थाची केलेली सोय, सुंदर कोरीवकामातून सूर्यप्रकाश येण्यासाठी तयार करण्यात आलेली जाळी आणि पडदे दिसून येतात. काही गवाक्षात युगुले कोरलेली आहेत. चैत्यागृहाच्या डाव्या हाताला एक यक्षिणी कोरलेली असून तिच्या हातात तिने धरलेले झाड दिसते. तेथील कमानीवर एकूण १७२ छिद्रे पाडलेली आहेत. या चैत्यागृहात ओळीने २७ अष्टकोनी खांब आहेत.  या खांबांवर कमळ, चक्र अशी काही शुभचिन्हे कोरलेली आहेत. अशीच शुभचिन्हे बेडसे येथील लेणीमध्येही पाहण्यास मिळतात. एका खांबावर तर एक खुंटी कोरलेली असून त्या खुंटीवर हारही कोरलेला आहे. चैत्यगृहात शेवटच्या भिंतीसमोर वाटोळा गुळगुळीत केलेला स्तूप आहे. प्राचीन काळी लेण्यांना चैत्यगृहात आतील बाजुने माती-गवताचा गिलावा देऊन त्यावर रंगकाम केलेले असे. बेडसे लेणी जेव्हा इंग्रजांच्या कालावधीत सापडली. तेव्हा तेथे साहेब येणार म्हणून तेथील कर्मचाºयांनी चैत्यगृहातील ही अनमोल रंगकाम पुसून, खरडून काढले. काळाच्या ओघात जरी आज हे रंग उडाले असले तरी भाजे येथील चैत्यागृहात गिलाव्याचे अजूनही काही अवशेष दिसतात. बॅटरीच्या प्रकाशात मुख्य स्तूपाच्या पाठीमागच्या काही खांबांवर ध्यानस्थ बुद्धाच्या चित्रप्रतिमांचे पुसटसे अंश दिसतात. स्तुपावर असलेला हर्मिकेचा चौथरा स्वतंत्र दगडात कोरून बसवलेले आहे. या चैत्यागृहात असलेला तुळयांचे छत म्हणजे लेणीकलेतील आश्चर्य म्हणावे लागेल. बावीस अर्धवतुर्ळाकार आणि पाठीमागे निमुळत्या होत गेलेल्या भागात अकरा लाकडी तुळयानी हे छताला आधार दिलेला आहे. १९६० च्या दशकात या लेण्याची साफसफाई करताना यातील दोन तुळयांवर ब्राम्ही लिपीत लिहिलेले दोन लेख आढळले. वेगवेगळ्या गुफेत एकूण १२ शिलालेख आहेत. या लेखांमुळे या तुळयांबरोबर या लेण्यांनाही इसवी सन पूर्व दुसºया शतकाचा इतिहास असल्याचे सिद्ध झाले.  सुरुवातीला असलेल्या पाच-सहा तुळया सोडल्या तर बाकीच्या बावीसशे वर्षे जुन्या असल्याचे सांगितले जाते. चैत्यगृहाचे छत गजपृष्ठाकृती असून या छताला आतल्या बाजूने लाकडी तुळ्यांनी आधार दिलेला आहे. या लाकडी तुळया प्राचीन असण्याचा उल्लेख मात्र मनाला पटेनासा वाटतो. कारण जेथे किल्यातील दगड परिसरातील लोक घेऊन जातात. तेथे या लाकडाचे काय. चैत्यगृहाचे स्तंभ आणि आतील भिंती देखील थोड्या कलत्या ठेऊन तासून काढलेल्या आहेत. कलत्या स्वरूपामुळे छताचा दाब ते तोलून धरू शकतील हा बहुदा कारागिरींचा उद्देश असावा. अर्थात नंतरच्या काळात खोदलेल्या लेणींमध्ये मात्र, अशा स्वरुपाची कलत्या स्तंभांची गरज नसल्याचे लक्षात आल्याने तशी रचना दिसत नाही.

                चैत्यगृह पाहून बाहेर मुख्य प्रांगणात आल्यानंतर शेजारी, दुमजली विहारांकडे जाता येते. काही विहार साधे तर काही कोरीव कामाने नटलेले दिसून येतात. भिक्षुंच्या योग्यतेप्रमाणे बहुधा हे कोरीवकाम केलेले असावे.  येथील विहारांना दरवाजे, खिडक्या आहेत आणि झोपण्यासाठी दगडी कट्टा सुद्धा आहेत. काही कट्टांच्या खालती सामान ठेवण्यासाठी कप्पेही केलेले दिसून येतात. साधारणपणे इसवी सन पूर्व दुसºया शतकात भाजे लेणी कोरण्यास सुरवात झाली व पुढे तब्बल सातशे ते आठशे वर्षे ही लेणी कोरण्यासाठी छिन्नी व हाथोडे काम करत होते. ही लेणी अनेक वर्षे वापरात राहिली.
                महाराष्ट्रात असलेल्या लेणी बांधण्यासाठी खर्च येणारच.  बेडसे लेणीत, भाजे लेणीत अशा कामांसाठी देण्यात आलेले दानाचा उल्लेख आढळतो. सुरुवातीच्या एका विहारातील एक लेख ब्राह्मी लिपीतील असून, या लेखांचे वाचन व आकलन इतिहासतज्ज्ञांना झाल्याने अनेक गोष्टींवर प्रकाश पडलेला आहे. या संपूर्ण लेणीची निर्मिती इसवी सन पूर्व दुसºया शतकात कोरण्यास सुरुवात झाली असे मानले जाते. त्यानंतर आठशे वर्षे म्हणजेच इसवी सन सहाव्या शतकापर्यंत लेणी निमिर्तीची प्रक्रिया सुरु होती. येथील विहार दानातून उभे राहिलेले आहेत व त्यांच्या दानाचे लेख तेथे दिसून येतात.

‘बाध या हालिकजयांना दान’ याचा अर्थ असा, की ‘बाध या शेतकºयाच्या बायकोचे दान!
लेणी तयार करताना मुख्य प्रश्न पडतो. तो पिण्याच्या पाण्याचा भाज लेणीमध्ये ४ ते ५ पाण्याची टाकी आहेत. चैत्यागृहाच्या दक्षिण दिशेला पाण्याचे एक जुळे टाके आहे. ‘महारठी कोसिकीपुत विन्हुदत’ असा दानधर्माचा ब्राम्ही लिपीतील लेख या टाक्याच्या मागील भिंतीत कोरला आहे. या टाक्यावरून आणखी पुढे गेलो की वाटेत ओळीने कोरलेला १४ स्तूपांचा समूह दिसतो. या लेण्यात राहून गेलेल्या बौद्ध भिक्षूंची ही स्मारके आहेत. यातील काही स्तुपांवर त्यांचे नावही कोरलेले आहे. यालाच डागोबा असेही म्हणतात. डागोबा किंवा डागाबा हा सिंहली शब्द सामान्यपणे स्तूप या बौद्ध धर्मीय वास्तूचा निर्देश करण्याकरिता श्रीलंकेमध्ये रूढ आहे. हा शब्द ‘धातुगर्भ’ या संस्कृत शब्दाचा अपभ्रंश आहे, असे समजतात. धातू याचा अर्थ अवशेष. असा अवशेष ज्याच्या गर्भात तो धातुगर्भ स्तूप = डागोबा. स्तूपाच्या अंडाकृती भागास हा विशेषकरून वापरतात, कारण त्यात अवशेषांचा लहान करंड असतो.


‘सूर्यलेणे’


 

                १४ स्तूपांच्या समुहावर सध्या शेड टाकल्याने थोडे संरक्षण मिळाले आहे. तसे संपूर्ण लेणीभोवती संरक्षण जाळी टाकल्याने परिसरातील जनावरांना अटकाव मिळतो. येथून थोडे पुढे  गेल्यावर डाव्या बाजूला कातळात दिसते ते ‘सूर्यलेणे’. १८७९ साली भाजे लेण्यांजवळ ब्रिटीश संशोधकांनी साफसफाई केली तेव्हा शिल्पसौंदर्याने नटलेले हे लेणे सापडले. ‘सूर्यलेणे’ असे त्याचे नाव. व्हरांडा, आत एक दालन आणि त्याला आत पुन्हा खोल्या अशी या लेण्याची रचना आहे. सध्या पर्यटकांसाठी आतील ठिकाण कुलूप लावून बंद करण्यात आलेल्याने थोडेतरी संरक्षित झाले आहे. हे लेणे म्हणजे विहार (बौद्ध भिक्षुंसाठी आरामाची जागा) आहे.सूर्य आणि इंद्राचा देखावा

                शस्त्रधारी द्वारपाल, हिंदु पौराणिक प्रसंग आणि चैत्य-स्तुपांचे नक्षीकाम येथे कोरून ठेवले आहे. या विहाराच्या उजव्या भिंतीवर देखावा आहे. सूर्य आणि इंद्राचा देखावा तर अप्रतिम आहे. यातील पहिल्या शिल्पात चार घोड्यांच्या रथावर सूर्य स्वर होऊन चालला आहे. रथात मागे-पुढे दोन स्त्रिया असून, एकीने छात्र धरलेले असून दुसरीने चामर धरलेले आहे. सूर्याच्या रथाखाली काही असुर तुडवले जात असल्याचे दाखवण्यात आले आहे. रथाचे चाक, हातातील चाबुक, पुरुष व स्त्रिया या नीट न्याहाळल्यास आपल्या त्यातील अर्थ कळू लागतो.  दुसºया बाजुला असलेल्या शिल्पात इंद्र हत्तीवर बसलेला दिसून येतो. एका हातात अंकुश आणि गळ्यात फुलांची माळ घातलेली आहे. इंद्राच्या पाठीमागे त्याचा दास असून त्याने हातात पताका धरलेली आहे. इंद्र शिल्पाखाली नृत्यकलाकार, वादक, देवदेवता, प्राणी, राजे, नोकर दाखवले  आहेत. तबला वाजवताना एक इसम ही दाखवला आहे. ओट्यावरच्या शिल्पांमध्ये घोडे, बैल आदी प्राण्यांना पंख असल्याचंही दाखवलं आहे. येथील स्त्री-पुरूषांच्या शिल्पांमधून त्या काळचा पेहराव पाहायला मिळतो. स्त्रियांनी डोक्यावर पदर घेतला आहे, त्यांच्या कमरेला शेला आहे तर पुरूषांनी धोतर व पागोटे परिधान केले आहे. बांगड्या, तोडे, मेखला, गळ्यातील हार, कर्णफुले, बिंदी अशी आभूषणेही महिलांच्या अंगावर त्यावेळच्या शिल्पकारांनी कोरून ठेवलेली आहेत.
                सूर्यलेणीच्या थोड्याश्या अंतरावर दोन विहार आहेत. विहारासमोरच वरील डोंगरातून येणारा धबधबा आपले मन मोहून टाकतो. पुरातत्व विभागाने जाळी लावून लेणीला संरक्षण दिले आहे. मात्र, काही पर्यटकांनी येथील जाळी तोडून डोंगरावरून येणाºया या धबधब्याखाली जाण्यासाठी वाट केली आहे. मात्र, हे किती धोकादायक आहे हे येथे येऊनच कळते. घसरडे असल्या कारणाने आम्ही काही खाली उतरलो नाही.
                सुमारे अर्धा ते पाऊणतासात लेणीचे दर्शन घेऊन आम्ही लेणी उतरलो. वाटेत असलेल्या धबधब्यातून येणाºया पाण्यामध्ये बसून, चिंब ओले होऊन वर्षाविहाराचा आनंद लुटला.
एकदा तरी वेळेत वेळ काढून पाहून येण्यासारखी हे जागा आहे.

                इसवी सन पूर्व दुसºया शतकापासून ते इसवी सनाच्या दहाव्या शतकाच्या कालखंडात भारतात अनेक ठिकाणी लेणी खोदल्या गेल्या.  लेणींचे हे प्रसिद्ध लेणं महाराष्टÑात सर्वदूरपर्यंत पोहचले. पुण्याच्या जवळ असलेली  कोंडाणे, कार्ले, भाजे, बेडसे, तसेच भंडारा डोंगरावरील लेणी, घोरावडेश्वरावरील लेणी तसेच जुन्नर, नाशिक पांडवलेणी, धाराशिव, खरोसा, कोकणच्या घाटवाटांवरची ठाणाळे, खडसांबळे, गांधारपाले, कºहाड मार्गावरची शिरवळ, आगाशिवची लेणी आणि पैठणजवळची पितळखोरे, पाटण, वेरूळ, औरंगाबाद-अजिंठ्याची प्रसिद्ध लेणी. प्रसिद्ध आहेत. शतकानुशतके बंंदरावरील माल देशावर आणण्याचा हा मार्ग होता. बौद्ध भिक्षुंसाठी हा नेहमीचा वापरात येणारा व्यापारी मार्ग होता.  थेट कोकण ते घाटमार्ग जोडणारा हा मार्ग आपल्याला जुन्नर, नाणेघाटात जायचा.  अर्थातच विश्रांतीसाठी तसेच ध्यानधारणा करण्यासाठी अशा अनेक लेणी खोदण्यात आल्या. डोंगरातील कपारींमध्ये गुफा खोदून त्यात बौद्ध मठ स्थापन करण्याचे कौशल्य भाजे मठाच्या कामात बौद्ध भिख्खूंनी प्राप्त करून घेतले असले पाहिजे व नंतरच्या काळात या कुशलतेचा वापर करून अन्य ठिकाणी असे बौद्ध मठ खोदले गेले असावेत. भाजे लेण्यामधील सर्वात जुन्या गुंफा इ.स. पूर्व २०० च्या आधी परंतु सम्राट अशोकाच्या (इ.स.पूर्व २७२) कालाच्या नंतर या कालखंडात खोदलेल्या असल्या पाहिजेत.  लेणींमध्ये स्तूप उभारले गेले. स्तूप म्हणजे बुद्धाच्या किंवा मोठ्या बौद्ध भिक्षूंच्या शरीराच्या अस्थी किंवा इतर अवशेषांना करंडकात ठेवून त्यावर दगडाचे बांधकाम करण्यात येई.  आदर दर्शविण्यासाठी एक छोटी छत्री उभारली जाई.  चैत्यगृहाच्या आत असलेला दगडी स्तूप बांधलेला आहे. हे स्तूप जेव्हा दगडात कोरलेल्या गुहांमध्ये असत तेव्हा त्याची शैलगृह अशी संज्ञा आहे.  हे लेणे शैलगृह या संज्ञेने ओळखले जाते. कोरीव कामाचा उत्कृष्ट नमुना असणारी ही लेणी महाराष्ट्राची शान आहेत.

पुरातत्व विभागाच्या  फलकावरील माहिती  : 

 

लेणीच्या मुख्य दरासमोर भारतीय पुरातत्त्व विभागाने माहिती देणारी कोनशिला बसविली आहे. मराठी, हिंदी व इंग्रजीतील ही माहिती पर्यटकांना माहिती देण्यास चांगलीच मदत करते.
'भाजे येथील हीनयान (थेरवाद) परंपरेतील गुंफा इ.स.पूर्व दुसरे शतक ते इ.सनाचे पहिले शतक या काळात कोरल्या गेलेल्या २९ गुंफांचा समूह आहे. हे दख्खनमधील सर्वात प्राचीन बौद्ध केंद्रांपैकी एक असल्यामुळे गुंफा स्थापत्याच्या विकासाच्या अभ्यासासाठी त्यांचे महत्त्व अपरंपार आहे. चैत्यगृहांच्या (प्रार्थनागृह) रचनेत भाजे येथील चैत्यगृह सर्वात महत्त्वाचे शैलगृह आहे. चैत्यगृहाच्या रचनेत प्राचीन स्थापत्याचे दगडामध्ये तंतोतंत अनुकरण केल्यामुळे छताला लाकडी तुळया, दगडातले साधे सरळ पण किंचित कललेले अष्टकोनी स्तंभ तसेच पूर्वी केलेल्या लाकडांचा वापर दर्शवणारे अनेक पुरावे गुंफांच्या आत व बाहेर पाहावयास मिळतात. पूर्वी या प्रार्थनागृहांची दर्शनी बाजू काष्ठशिल्पांनी अलंकृत केली होती. आज जरी ते शिल्लक नसले तरी आतमध्ये संपूर्ण छताला लाकडी कमानी जोडल्या आहेत. या गुंफेतील स्तुपाचा खालचा भाग हा गोलाकार असून त्याखालचा भाग अंडाकृती आहे. तसेच वरती 'हर्मिका' नावाचा चौकोनी भाग आहे. येथे निरनिराळ्या गुंफांमध्ये एकूण १२ शिलालेख आहेत. त्याचप्रमाणे येथे असलेला स्तुपांचा समूह सुद्धा वैशिष्ट्यपूर्ण आहे. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्यातर्फे या गुंफा गॅझेट नोटिफिकेशन क्र. २७०४-ए दि. २६-५-१९०९ नुसार राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित तथा संरक्षित केल्या आहेत.'

काही इतर गोष्टी :

चैत्यगृहाच्या स्तूपावर तीन प्रयत्नात नाणं फेकून आपली मनोकामना पूर्ण करण्याची नवीन पद्धत  सुरू झाली आहे. हे फेकलेले नाणे स्तुपावर राहील्यास अथवा  घरंगळ्यास त्याची मनोकामना पूर्ण होते. अशा काही अंधश्रद्धेच्या गोष्टी सर्वच लेणींमध्ये होत असतात. अर्थातच अशा अंधश्रद्धेला काय अर्थ आहे.

अशा पर्यटन स्थळी येताना तरी कपडे घालून येण्याचे साधे भान सध्याच्या तरुणीईला नसल्याचे पाहून वाईट वाटते. पुरुषांना सुद्धा लाजवेल अशा हाफ पॅन्ट घालून, अंगात तोकडे कपडे घालून  विक्षिप्तपणे वागत, लेणी परिसरात हिंडत होते. बाहेरील स्तूपांबरोबर सेल्फी काढणारे पाहून वाईट वाटले. केवळ पावसात भिजण्याचा आंनद घेणाºयांना लेणीविषयी जरा सुद्धा माहिती घेण्याची इच्छा होत नाही. महाराष्ट्रातील या लेणी आपला सांस्कृतिक वारसा आहे. त्याची मंदिराप्रमाणे पूजा जरी होत नसली तरी मंदिरासारखे पावित्र्य नक्कीच जपायला हवे. पेपरात पावसाळा सुरू झाला की धबधब्यात वाहून जाणारे तरुणांच्या मृत्यूच्या बातम्या यायला लागतात. पावसाळा नक्कीच आनंदाने साजरा करा. मात्र थोडेतरी भान ठेवायला हवे. आम्ही धबधब्यातून येणाºया पाण्याखाली उभे होतो तर काही महाभाग जेथे धबधबा कोसळतो त्या ठिकाणी सेल्फी काढण्यात मग्न होते. पावसाळ्यात अशा ठिकाणी घसरडे होते. पाय सटकतो. याचे जराही भान न ठेवता पावसाळा एन्जाय केला जातो.

भाजे गावाविषयी :

भाजे हे एक लहानसे गाव. पुणे जिल्ह्यातील वडगाव पासून काहीच अंतरावर असलेल्या मळवली येते. पुण्याहून जुन्या हायवेने मुंबईला जातांना कार्ला फाटा लागतो. येथून डाव्या बाजुने मळवली रेल्वेस्टेशनाचा ओव्हर ब्रीज ओलांडून भाजे गावात जाता येते. या गावातून डाव्या बाजूने लोहगडकडे जाणा-या रस्त्याला लागूनच डाव्या बाजूच्या विसापुर किल्याच्या डोंगराला लागून असलेल्या डोंगरात भाजे लेण्यांचा समूह आहे. भाजे येथे २३ जुलै १९८९ रोजी अतिवृष्टीमुळे डोंगरपायथ्याला असलेल्या चार घरांवर दरड कोसळून ४७ जणांना आपले प्राण गमवावे लागले होते.

कसे जाल :

  • पुण्यापासुन सुमारे ६० ते ८० किमी अंतरावर भाजे लेणी आहे.
  • पुण्याहुन लोकलने लोणावळ्याकडे जात असाल तर मळवली स्टेशन वर उतरुन चालत १० मिनिटांच्या अंतरावर ही लेणी आहेत.
  • मुंबईहून एक्सप्रेस वे मार्ग येत असल्यास लोणावळ्याला बाहेर पडून मळवलीपर्यंत येता येईल.  तेथून मळवली गावाकडे जाताना रेल्वे लाईनवरचे एक रेल्वे क्रॉसिंग ओलांडून पुलावरून भाजे गावात येत येईल.
  • जुन्या पुणे-मुंबई रस्त्याने गेल्यास कार्ला (एकवीरा माता) कडे जाण्यासाठी एक चौक लागतो. येथून डावीकडे वळून कार्ल्याच्या विरुद्ध दिशेने साधारण ३-४ किमी वर मळवली स्टेशन येत. तेथून काहीच अंतरावर भाजे लेणी आहेत.


अजून काय पाहाल

मळवली रेल्वे स्थानकावर उतरल्यावर येथून जवळच असलेले लोहगड व विसापूर किल्ले आपले स्वागत करतात. वाहन असल्यास सुमारे अर्धा तासात लोहगडवाडीपर्यंत गाडीरस्ता आहे. मात्र, काहीसा वळणावळण असल्याने गाडी जपून चालवलेली चांगलीच. येथून पुढे उजव्या बाजूने लोहगडाला वळसा घालून गेल्यास उर्से येथील खिंडीतून पवना धरण, तुंग, तिकोना, पौड रस्त्याला जाता येते. मात्र, पावसाळ्यात शक्यतो हा मार्ग नवख्यांनी वापरू नये कारण या खिंडीत अनेकवेळा दरड कोसळत असते.

तिकीट दर : 

भारतीयांसाठी प्रत्येकी १५ रुपये नाममात्र, तर परदेशी पर्यटकांसाठी २०० रुपये.

पार्किंग : 

भाजे गावात पोहचल्यावर मोठ्या पटांगणात मोफत पार्किंगची सुविधा आहे.

हॉटेल्स : 

पर्यटन स्थळ विकसीत झाल्यामुळे गावात चौकशी केल्यास जेवणाची सोय होऊ शकते.

...हा ब्लॉग कसा वाटला या विषयी जरूर प्रतिक्रिया लिहा...

कॉपी करू नका