Sunday, October 20, 2013

कोटेश्वरवाडी
काही कामानिमित्त तळेगावात गेलो येतो. तुकाराममहाराजांना जेथे सिद्धी प्राप्त झाली त्या भामचंद्र डोंगर पाहण्यासाठी गेलो. वाटेत कोटेश्वरवाडी म्हणून एक छोटेसे गाव लागते. कुंडमळा व इंदोरीचा भुईकोट किल्ला यांच्या मध्यावर इंद्रायणीकाठी असलेल्या कोटेश्वरवाडी येथे पुरातन हेमाडपंती कोटेश्वराचे मंदिर असल्याचे येथील ग्रामस्थ सांगतात.  तळेगाव-चाकण महामार्गावर कोटेश्वरवाडी हे सुमारे पाच हजार लोकवस्ती असलेले हे गाव. महाराष्ट्रातील बहुतेक शंकराची प्राचीन मंदिरे ही नदीकाठी तयार गेलेली आहेत. या नदीच्या घाटावर दशक्रिया विधीचा कार्यक्रम या ठिकाणी करता यावा हा उद्देश. मंदिराजवळून बाराही महिने  दुथडी भरून इंद्रायणी नदी वाहत असते. इंदोरीच्या हद्दीत दक्षिणेकडे असलेल्या कुंडमळ्यात खालच्या खडकांवर कोसळणाºया पाण्यामुळे तयार झालेल्या खोल दºया व रांजणखळगे मोठ्या प्रमाणात तयार झालेले आहेत. जणू काही निसर्गाची कृपाच. हा परिसरही खूपच निसर्गरम्य आहे.
            मंदिरावर कळस नसून मंदिर अगदी नदीच्या काठावर बांधलेले आहे. मंदिराबाहेर नंदी असून, मंदिराला दोन खांब आहे. खांबावर थोड्याप्रमाणात कलाकुसरही केलेली आहे. ग्रामस्थांनी शंकराच्या पिंडीवर तांब्याचे आवरण घातलेले आहे. हे मंदिर जरी खूप प्रशस्त नसले तरी येथील शांत वातावरण व नदीचा परिसर पाहण्यासारखा आहे. नदीकाठावरून भंडारा डोंगर दिसतो.
 कोटेश्वरवाडी
भामगिरी पाठारी वस्ति जाण केली - भामचंद्र डोंगरजगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराममहाराजांच्या वास्तव्याने पावन झालेले देहूगाव व जेथे महाराजांना पंधरा दिवस समाधी लागली असा भामचंद्र डोंगर पाहण्यास गेलो. त्या विषयी...

           परमेश्वराच्या भेटीसाठी तब्बल पंधरा दिवस तहानभूक विसरून तुकाराममहाराजांनी जिथं समाधी लागाली. ते ठिकाण म्हणजे भामचंद्राचा डोंगर किंवा भामगिरी.  तुकाराममहाराजांची घोरवाडेश्वर, भंडारा डोंगराप्रमाणेच भामचंद्र डोंगर ही अभंग लिहिण्याची प्रेरणास्थळे होती.  येथील शांत व सुंदर वातावरणामुळे विठ्ठलाची आस लागलेल्या महाराजांना  निर्गुण, निराकार विठ्ठलाची भेट झाली. देहूगावातील मुख्य मंदिरातून समोरच एक मोठा डोंगर दिसतो तो भंडारा डोंगर याच भंडारा डोंगराच्या समोर कातळकड्याची जणूकाही उलटी टोपी घालून निसर्गाच्या सान्निध्यात एकांतात समाधी लावून बसलेला भामचंद्र डोंगर आहे.

धन्य देहूगाव पुण्यभूमी ठाव । तेथे नांदे देव पांडुरंग ॥१॥

तुकोबांची जन्मभूमी, कर्मभूमी असलेले देहू गाव पुण्यभूमी आहे. देहू गावाला धन्यत्व-पुण्यत्व आले ते तेथे नांदत असलेल्या पांडुरंगामुळे. देहूगावातील संत तुकाराममहाराज व  आळंदीतील संत ज्ञानेश्वरमहाराज असे दर्शन करणारे अनेक भक्त या भंडारा व भामचंद्र डोंगरावर गेल्यावाचून राहत नाही. देहूतून सुमारे १२ ते १३ किलोमीटरवर असलेल्या भामचंद्र डोंगराच्या पायथ्यापासून वरपर्यंत जाण्यासाठी पायवाट आहे.

पाऊणतासात ८ किलोमीटर :

भंडारा डोंगरावर अनेकवेळा गेलो. मात्र तेथून काही अंतरावर असलेल्या भामचंद्रावर जाण्याचा योग काही केला येत नव्हता. रविवारी तळेगावात एका कामासाठी गेलो होतो. काम संपवून भामचंद्र पाहण्यासाठी निघालो. तळेगाव-चाकण महामार्गावर भंडारा डोंगराच्या पुढे गेल्यावर देहूगावातून येताना एक फाटा लागतो. या फाट्याकडे न जाता संत जगनाडे महाराजांच्या सुदुंबरे या गावापर्यंत येऊन तेथून सात ते आठ किलोमीटरवर भामचंद्र डोंगर आहे. हे अंतर कापण्यासाठी तब्बल पाऊणतास गेला. कारण रस्ता. रस्ता कसा तयार करतात याची येथे प्रचिती येते. मोठे मोठे दगड टाकून कच्चा रस्ता तयार केलेला आहे. काही ठिकाणी जेमतेम बरा रस्ता म्हणता येईल असा रस्ता आहे. तुकाराम महाराजांच्या वास्तव्याने देहू गावाला आज तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला आहे. पर्यटकांचा ओढा या तीर्थक्षेत्राकडे वाढला आहे. मात्र, प्रशासन रस्त्यांची अवस्था सुधारेल अशी आशा करण्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नाही. कंबरतोड  रस्ता पार करून डोंगराच्या पायथ्याशी पोहोचलो.  रामभरोसे दुचाकी लावून वर जाणाºया रस्त्यावर बसलेल्या गुरख्याला रस्ता हाच ना. अशी खात्री करून घेऊन पुढे जाण्यासाठी निघालो. पाच मिनटे चाललो असेल तेवढ्यात चरण्यासाठी आलेली गुरे ढोरे दिसली. त्यातील एक तर वाटेवरच वाट अडवून उभा होता. कसेबसे मीच थोडी वाट वाकडी करून पुढे निघालो. जाताना त्याचे दोन फोटोही काढले. घाबरून अंगावर येण्याची मलाही भीती. थोडे पुढे गेल्यावर वासुली गावातील एक भाविक त्यांच्या दोन लहान नातवंडांना डोंगरावर दर्शनासाठी जात असल्याचे पाहिले. मी एकटाच असल्याने त्यांच्या सोबत चालू लागलो. डोंगराविषयी त्यांना काय माहिती आहे याबद्दल मी जाणून घेतले. त्यांनी चांगली माहितीही सांगितली. आमचाही एक फोटो काढाल का? असे त्यांच्या नातवंडांने विचारले. ठिक आहे काढतो. पण पाठवू कसा? तर  ‘मेल’वर पाठवा असे तो म्हणाला.  २० मिनिटातच  डोंगरावर पोहोचलो. उभी चढाई असल्याने चांगली दमणूक होते. पण थंडगार व स्वच्छ हवेमुळे दमणूक कळत नाही.
            

सुदुंबरे रस्त्यावरून दिसणारा भामचंद्र डोंगर.


   भामचंद्र डोंगर तसा आडवाटेवरचा. एखाद्या तपस्वी मुनीप्रमाणे समाधी घेऊन एकांतात तपश्चर्या करीत बसलेला. सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून तुटल्याने एकटा पडलेला, दाट झाडी असलेला. भामचंद्र डोंगररांग पूर्वकडून पश्चिमेकडे पसरली आहे. डोंगर रांगेच्या पश्चिमेला असलेल्या गावातील नवलाख उंबरे नावाच्या गावामुळे नवलाख्या डोंगर असे ही काहीजण म्हणतात. हा डोंगर म्हणजे अर्ध्या डोंगरापर्यंत गर्द हिरवी झाडी व वरती सुमारे ८०० ते ९०० फूट कातळकडा आणि तोही उलटी टोपीच्या आकाराचा. याच काताळात गुहा आहेत.  डोंगरावरील एकंदरीत झाडीवरून तुकोबामहाराजांच्या काळात या ठिकाणी यापेक्षाही दाट झाडी असणार.  डोंगर परिसर व आजुबाजूच्या परिसरात त्याकाळी चांगले जंगलच असणार याची खात्री होते.
    

सुदुंबरे रस्त्यावरून दिसणारे भामचंद्रावरील मंदिर.


भामचंद्र डोंगर


डोंगरावर जात असताना दाट झाडी


डोंगरावर जात असताना दाट झाडी

      झाडीतला रस्ता संपवून छोटेसं पठार लागत. या पठावरावर दगडांनी बांधलेला चौथरा आहे. वासकरमहाराज या ठिकाणी कीर्तन करीत. तेथून पुढे निघालो या ठिकाणी सातवाहनकाळातील लेण्या आहेत. पहिल्या गुहेत  शंकराचे मंदिर आहे. बाहेर सभामंडप व आत छोटे शिवलिंग आहे. गुहेबाहेर पाण्याचं टाकंही आहे. मंदिराच्या शेजारील गुहेत लोखंडी जाळ्या ठोकून बंद केलेली आहे. तिचा उपयोग वारकरी धर्मशाळेसारखा करतात. थोडे पुढे जाऊन जेमतेम एक माणूस वर किंवा खाली येऊ शकेल अशा दगडात पायºया खोदून ठेवलेल्या आहेत. एका बाजूला रेलिंगची सोय केल्यामुळे सुरक्षा वाढली आहे. अंदाजे पन्नास ते साठ पायºया चढून वर गेलो. तेथेही एक छोटी गुहा आहे. आतमध्ये विठ्ठल रखुमाईच्या मूर्ती आहेत. शेजारीच भिंतीवर तुकाराममहाराजांचे शिल्प कोरलेले आहे. महाराजांचे दर्शन घेऊन पुन्हा खाली आलो. मुख्य गुहेतून खाली आलो. तर आणखीन एक गुहा येथे दिसली. काही विद्यार्थी इथ राहून संतपंरपरेचा अभ्यास करतात.
     

भामचंद्रावरून दिसणारा भंडारा डोंगर व परिसर. उजवीकडे जाधववाडी धरण परिसर    तब्बल चारशे साडेचारशे वर्षांपूर्वी या ठिकाणची परिस्थिती कशी असेल याचा विचार करू लागलो. गर्द हिरवाईने, झाडीझुडपांनी हा प्रदेश सजलेला असले. या डोंगरावरील ही गुहा महाराजांनी का निवडली असेल याचेही उत्तर मिळाले. ते येथील निरव शांततेत. केवळ पक्ष्यांच्या आवाजा व्यतिरिक्त कुठलाही आवाज या ठिकाणी नव्हता. शांतता. अशा शांततेत मन एकाग्र करून तुकाराममहाराजांची समाधी लागत असेल यात शंकाच नाही.
     


शंकराच मंदिर


मंदिरासमोरील मोठी परातडोंगरावरील पाण्याचं टाकं


मुख्य मंदिराकडे जाण्याची वाट


मुख्य मंदिराकडे जाण्याची वाट


भामचंद्र डोंगर परिसर विकास समितीने इथं चांगली सुधारणा केलेली आहे. सौर दिवेही लावले आहेत. पिण्याच्या पाण्याची सोय आहे. डोंगरमाथ्यावरून भंडारा डोंगर दिसतो. लांब देहू गावातील गाथा मंदिरही दिसले.  भंडारा डोंगराप्रमाणेच भामचंद्रावरही पायवाटेवर दोन्ही बाजूला वनखात्याने वृक्ष लागवडी केल्याने अजून हिरवळ व दाट झाडी निर्माण झाली आहे. एकंदरीतच येथील शांत वातावरणात नक्कीच समाधी लागेल असेच हे ठिकाण आहे. डोंगराच्या जवळच जाधववाडी नावाचे छोटे धरण दिसते. तेथून जवळच सुधा नदीचे उगमस्थान आहे, ही नदी जांबवडे,  सुदवडी, सुदुम्बरे, येलवाडी मार्गे देहूतील इंद्रायणी नदीला जाऊन मिळते.  एकदा तरी तुकाराममहाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या  भामचंद्र डोंगर व शेजारील श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर येऊन त्यांच्या चरणावर मस्तक ठेऊन आशीर्वाद घ्यावा आणि निसर्गाचा आनंद घ्यावा.

पावसाळ्यात येथून धबधबा वाहतो.


रेलिंगचा आधार घेऊन येणारे पर्यटक मागे चाकण परिसर

     ईश्वरप्राप्तीसाठी महाराजांनी भंडारा, भामचंद्र व घोरावडेश्वर सारख्या एकांतवास असलेल्या ठिकाणी समाधी लावून विठ्ठलाचे चिंतन केले. एकदा तुकाराममहाराज घरी परत न आल्याने त्यांचे बंधू कान्होबा आजुबाजूच्या परिसरात त्यांना शोधू लागले. शोधत-शोधत ते भामचंद्रावर आले. तेथे त्यांना तुकाराममहाराज दिसले.  निवार्णीचा संकल्प करून तब्बल पंधरा दिवस महाराज ध्यान करत होते. तुकोबांच्या अंगावर मुंग्या, विंचू, सर्प चढले, ते अंगाला झोंबले व पीडा देऊ लागले. वाघाने झेप घातली. मात्र तुकोबांचा निश्चय ढळला नाही. पंधराव्या दिवशी सत्याचा साक्षात्कार झाला. साक्षात ईश्वर प्रकट होऊन त्यांचे रक्षण केले. ज्या स्थळी देव तुकोबांना भेटले, त्या पवित्र स्थळाचे पावित्र्य आणि स्मृती अखंड राहण्याकरिता त्या ठिकाणी कान्होबांनी काही दगड रचले. त्यानंतर कान्होबांनी येथे तुकोबांची प्रतिमा कोरून घेतली. मूर्तीच्या मागे विंचू व पाठीमागे साप व वाघ कोरलेले आहेत.

साक्षात्काराविषयी तुकाराममहाराज म्हणतात,

पंधरा दिवसांमाजी साक्षात्कार झाला।
विठोबा भेटला निराकार ॥1॥
भामगिरी पाठारी वस्ति जाण केली।
वृत्ती स्थिरावली परब्रम्ही ॥2॥
निर्वाण जाणोनि आसन घातले
ध्यान आरंभिले देवाजीचे ॥3॥
सर्प विंचू व्याघ्र अंगाशी झोंबले।
पीडू जे लागले सकळीक ॥4॥
दिपकी कर्पूर जैसा तो विराला
तैसा देह झाला तुका म्हणे॥5॥


अशा या निसर्गाने रम्य ठिकाणी महाराजांना अभंग लिहिले.

वृक्ष वल्ली आम्हां सायरीं वनचरें ।
पक्षी ही सुस्वरें आळविती ॥1॥
येणों सुखें रुचे एकांताचा वास ।
नाही गुण दोष अंगा येत ॥2॥
आकाश मंडप पृथुवी आसन ।
रमे तेंथे मन क्रीडा करी ॥ध्रु॥

या अभंगाचा येथे प्रत्याय येतो.

वासुली गावाचा परिसर व औद्योगिकीकरण.

वाढते औद्योगिकरण :

गेल्या काही वर्षात भामचंद्र डोंगर समितीचे नाव पेपरात येत आहे. त्याला कारण ही तसेच आहे. चाकण एमआडीसी, नवीन होणारे विमानतळ, तळेगाव एमआडीसी असा हा सर्व परिसर झपाट्याने वाढत आहे. मोठे रस्ते , अनेक विदेशी कंपन्या येथे कंपन्या सुरू करत आहेत. श्रीक्षेत्र भामचंद्र डोंगराचा तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात तूर्तास तरी समावेश करण्यास राज्य सरकारने नकार दिला आहे. श्रीक्षेत्र देहू-आळंदी, भंडारा व पंढरपूरचा तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात समावेश करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहे. मात्र, अन्य तीर्थक्षेत्रांप्रमाणेच भामचंद्र डोंगराचाही या आराखड्यात समावेश करावा, अशी मागणी जगद्गुरू संत तुकाराम महाराज साक्षात्कार भूमी सेवान्यासाचे संस्थापक मधुसूदन पाटील महाराज यांनी राज्य सरकारकडे केली होती.  काही जमिनींवर खाणमालकांनी जागा खरेदी करून डोंगरचा काही भाग खोदण्यास सुरूवात केली आहे. मधुसुदन महाराजांनी आंदोलन छेडल्यानंतर  हे काम थांबविण्यात आले. शिंदे वासुली गावाजवळ उभ्या होत असलेल्या 'डाऊ' कंपनीच्या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी वारकरी संप्रदाय रस्त्यावर उतरले आहेत. वाढते औद्योगिकीकरणामुळे पर्यावरणाचा होणारा ºहास ही पुढची भीती नक्कीच पुढे राहणार आहे.

सुदुंबरे गावातून येणारा रस्ता.
वाट अडवून उभा असलेली गाय.कसे जावे :
  • पुणे-मुंबईकडून रेल्वेने येत असाल तर रेल्वेमार्गावर तळेगावला उतरून एसटी, अथवा खासगी वाहनाने तळेगाव चाकण रस्त्यावरील संत जगनाडे महाराजांच्या सुदुंबरे या गावापर्यंत येऊन तेथून सात ते आठ किलोमीटरवर भामचंद्र डोंगर आहे. मात्र हा रस्ता  दगडी असल्याने शक्यतो या फाट्याच्या पुढे चाकणहून भामचंद्र डोंगराकडे जाण्याचा रस्ता चांगला आहे.
  • तळेगाव पासून ११ किमी अंतरावर खालुंब्रे गाव आहे. या गावातून डाव्या बाजूचा रस्ता चाकण एम. आय. डी. सी. फेज - २ ला जातो. या रस्त्याने हुंडाईचा प्लांट - सावरदरी गाव यामार्गे ५ किमीवरील वसुली नाक्यावर जाता येते.  येथून जवळच डोंगरावर जाता येते.
  • स्वत:चे वाहन असल्यास एक दिवसात देहूगाव, गाथा मंदिर भंडारा व नंतर भामचंद्र, इंदुरीचा किल्ला अशी एक दिवसाची छोटी ट्रिप होईल. भामचंद्र डोंगराच्या पाथय्यापर्यंच वाहन जाते. तेथून पुढे १५ ते २० मिनटे पायपीट करून डोंगरावर जाता येते. शक्यतो अंधार पडायच्या आत डोंगरावरून खाली यावे. वाटेत कुठेही खाण्याचे पदार्थ मिळत नाही.
  • चाकणमार्गे भामचंद्र पाथया अंदाजे पंधरा किलोमीटर अंतरावर आहे.


दिसणारा परिसर :

डोंगरावरून देहूतील गाथा मंदिर, भंडारा डोंगर, जाधववाडी धरण परिसर, चाकण परिसर दिसतो.


 फेरफटका आपल्याला कसा वाटला याविषयी जरूर प्रतिक्रिया द्या. अथवा मेल करा.

Thursday, October 17, 2013

श्रीमंत बाजीराव पेशवे - पालखेडचा संग्राम

बाजीरावांचा पराक्रम अजूनही आपल्या महाराष्ट्रात फारसा माहिती नाही. बाजीरावांनी दिल्लीपर्यंत भगवा फडकावून मराठ्यांचा दरारा निर्माण केलेला होता. श्रीमंत बाजीराव पेशवे - एक अजेय योद्धा या लेखानंतर अनेकांनी माहिती दिल्याबद्दल आभार मानले. पालखेडच्या युद्धासंदर्भात श्री. पित्रे यांची लोकमतमधील मंथन पुरवणीमधील मालिका अधिक माहितीसाठी देत आहे. बाजीरावांचा पराक्रम सगळ्यांना अधिक माहिती व्हावा हाच हेतू आहे. खालील दोन्ही लेख लोकमत पुणे आवृत्तीच्या मंथन या पुरवणीत अनुक्रमे दि. ३० जून २०१३ व ७ जुलै २०१३  रोजी प्रसिद्ध झाले आहेत. लेखक श्री. शशिकांत पित्रे भारतीय लष्करातील मेजर जनरल पद भूषवलेले नामवंत अधिकारी व युद्धशास्त्राचे अभ्यासक आहेत़ पूर्व परवानगीशिवाय हे लेख येथे जोडत आहे. त्याबद्दल क्षमस्व. लोकमत व श्री. शशिकांत पित्रे यांचे लेखाबद्दल धन्यवाद. 

 https://docs.google.com/file/d/0ByNGX3NhYDvFUGdHUnhfdXNPdVU/edit?usp=sharing

https://docs.google.com/file/d/0ByNGX3NhYDvFY0ZxZ2lILWE1TEE/edit?usp=sharing कॉपी करू नका