Tuesday, November 15, 2016

तिरुपती - सुवर्ण मंदिर

तिरुपतीला जाण्याचे यंदा दुसरे वर्ष. मागील वर्षीचा अनुभव असल्याने यंदा लवकर रेल्वे बुकिंग करून ठेवले.  पंजाबमधील अमृतसरप्रमाणे वेल्लूर (तमिळनाडू)मध्ये देखील लक्ष्मीचे सुवर्ण मंदिर पाहायचे असल्याने ४ दिवसांची रजा घेऊन तिरुपती, सुवर्ण मंदिर व श्री व्यंकेटेश्वरा झुओलॉजिकल पार्क पाहून आलो. त्या विषयी...

 

 


पहिला दिवस (१/११/२०१६)

सोमवार, दि. ३१ आॅक्टोंबरला पुणे स्टेशनला जाण्यास निघालो. अर्ध्या तासातच पुणे स्टेशनात पोहचलो. 17411 महालक्ष्मी एक्सप्रेसने कोल्हापूरला आमच्या पाहुण्यांकडे उतरलो. सकाळी आवरून मिरजकडे जाण्यासाठी एसटीने निघालो. १२.३० पर्यंत मिरजला पोहचलो. तेथून दुपारी १.२५ च्या 17416 हरिप्रिया गाडीने आमचा प्रवास सुरू झाला. दुपारी २.३० ला घरून आणलेले जेवण झाले. रात्री ९ वाजता  लोंढा जॅक्शनवर बाहेरील जेवण केले. सकाळी ९ वाजता गाडी तिरुपतीला पोहचली. चार महिने अधिच बुकिंग केले होते. त्यामुळे दिवाळीची गर्दी असून देखील गर्दी जाणवत नव्हती. तिरुपतीमधील राहण्याची सोय आॅनलाईन करून ठेवली होती. तिरुपतीमधील विष्णु निवासममध्ये जाऊन रुम ताब्यात घेतली. अतिशय सुंदर, स्वच्छ असलेली रुम पाहून सर्व थकवा क्षणात निघून गेला. संपूर्ण इमारतीमध्ये लिफ्टची सोय होती. आमची रुम चौथ्या मजल्यावर होती. इमारतीवरून तिरुमला देवस्थानचा डोंगर, पर्यटकांसाठी टीटीडीच्या बसेस, रेल्वे स्टेशन परिसर दिसत होता.

दिवस दुसरा (२/११/२०१६)

आवाराअवर करून सकाळी ११ वाजता खालील बाजूस असलेल्या हॉटेलमध्ये नाष्टा करण्यास गेलो. उत्तपे, डोसा, इडली असा नाष्टा करून आम्ही तिरुमलावरील तिरुपती दर्शनासाठी निघालो. हॉटेलच्या बाहेरच असलेल्या टीटीडी तिरुमला बससेवेचे कर्मचारी बसलेले होते. खासगी गाडी न करता तिकीट काढून बसमध्ये बसलो. दहाच मिनिटात गाडी तिरुमला डोंगराच्या मुख्य चेकपोस्टपाशी येऊन थांबली. तेथे प्रवाशांच्या बॅगांचे स्कॅनिंग, तसेच वैयक्तिक झाडाझडती देऊनच प्रवेश दिला जात होता. एवढी गर्दी असताना देखील पाच मिनिटात तपासणी प्रक्रिया लवकर झाली. वळणदार रस्त्यांवरून गाडी धावत होती. तिरुपतीमधील छोटे घरे, उंच इमारती, रस्ते, झाडे हळूहळू लहान होताना दिसत होती. एकेरी रस्ता असल्याने समोरून येणाºया वाहनांची चिंता ड्रायव्हरला नसल्याने गाडी सुसाट वेगाने धावत होती. पाऊण तासातच आम्ही तिरुमला डोंगरावरील बसस्टॅण्डमध्ये येऊन पोचलो. मुख्य मंदिराबाहेरील हॉटेलमध्ये चहा, नाष्टा करून कल्याण कट्टा येथे जाऊन केस दान करून झाले. कुठल्याही प्रकारचा जादा दर न देता केवळ मोफत दर्शन घेण्याचे ठरवले होते. थोड्यावेळ मार्केटमध्ये हिंडून देवदर्शनासाठी हुंडीमध्ये जाण्यास निघालो. दुपारी ३ वाजता हुंडीमध्ये जाऊन बसलो. हुंडीमध्ये गेल्यावर ७० रुपयांमध्ये ४ लाडूचे कुपन  दिले जात होते. पूर्वी दर्शन घेतल्यावर प्रत्येकी दोन लाडू दिले जात होते. परंतु काही कारणामुळे आता ही प्रक्रिया बंद करून हुंडीतच पैसे व कुपून देण्यात येत होते. मीही रांगेत उभे राहून कुपून घेतले. संध्याकाळी ६ ला भाविकांसाठी दूध आले. पाहिजे तेवढे दूध प्या विनामूल्य. रात्री ९ वाजता भाविकांसाठी पोटभरून भाताची खिचडी आली. पुन्हा रांगेत उभे राहून पोटभर प्रसाद खाल्ला. हुंडीमध्येच खालील बाजुस प्रसाधनगृहाची सोय असल्याने गैरसोय झाली नाही. रात्री १०.३० ला हुंडीचे दरवाजे उघडण्यात आले.
‘गोविंदा गोविंदा’च्या नमघोषात सर्व भाविक मुख्य मंदिराकडे जाण्यास निघाले. गर्दी असून, देखील योग्य व्यवस्थापनामुळे तिरुपती व्यंकेटशाचे चांगले दर्शन झाले. रात्री १२.३० मंदिराशेजारील असणाºया  लाडू विक्री केंद्रावर जाऊन कुपन देऊन लाडूचा प्रसाद घेतला. सर्व वातावरणात साजूक तुप, वेलचीच्या वास पसरलेला होता. रात्रभर केलेल्या प्रतिक्षेचा क्षीण केव्हाच निघून गेला होता.
दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही परत बसस्टॅण्डकडे येण्यास निघालो. पहाटे तीननंतर बस सुरू होणार असल्याने आम्ही बाजारपेठेत खरेदी करण्यास निघालो. विविध प्रकारचे बालाजीचे फोटो, धार्मिक साहित्य, टोप्या, लहान मुलांची खेळणी, विविध दगडी सामान, महिलांसाठी गृहपयोगी वस्तू, शोभिवंत वस्तूंनी ही बाजारपेठ भरलेली असते. पहाटे ३.३० ला पुन्हा तिरुपतीला जाण्यासाठी असणाºया बसमध्ये जाऊन बसलो. पाऊण तासातच आम्ही राहत असलेल्या विष्णू निवासमपासून काही अंतरावर बसने आम्हाला सोडले. रुममध्ये येऊन सकाळी ९ पर्यंत विश्रांती घेतली. सकाळी निवासस्थानाचे कर्मचारी तुमची १ दिवसाची मुदत संपल्याचे सांगण्यासाठी आला. आॅनलाईन बुकिंग १ दिवसांपुरतेच मर्यादित असते. पुढे एक्सटेंशन देण्यासाठी पुन्हा नवीन रुम व प्रोर्सिजर करावी लागते.  थोडीफार मिन्नतवारी केल्यानंतर आम्हाला १ दिवसाचे एक्सटेंशन देण्यात आले.

दिवस तिसरा (३/११/२०१६)

सकाळी नाष्टा करण्यासाठी आम्ही पुन्हा निवासस्थानम्च्या हॉटेलमध्ये आलो. कंबो पॅक म्हणून इडली, डोसा, उत्तपा, मेदूवडा असा भरपूर नाष्टा (जेवण) करून आम्ही हॉटेल बाहेर पडलो. आज आम्हाला वेल्लूर(तमिळनाडू) येथील श्रीपुरम येथील धार्मिक केंद्र असलेले प्रसिद्ध महालक्ष्मी सुवर्ण मंदिराचे दर्शन घेण्यासाठी जायचे होते. त्यासाठी आम्ही गाडीची चौकशी करण्यासाठी निघालो. बाहेर पडल्याबरोबरच टुरिस्ट गाड्यांचे चालक चौकशीसाठी आले. चक्क हिंदीमधून संवाद साधून ते आमच्या बरोबर ‘हमारे साथ चलिऐ’ असे सांगत होते. तवेरा, सुमो, ट्रॅक्स अशा विविध गाड्या यासाठी येथे सज्ज असतात. बरीच घासाघीस करून झाल्यावर ३००० रुपयांत ओल्ड बालाजी, गोल्डन टेंपल व गणपती मंदिर दाखवण्याचे ठरवून आम्ही अखेर सुमोमधून प्रवासाला निघालो. गोल्डन टेंपल मंदिर तिरुपतीपासून (रेल्वेस्टेशनपासून) सुमारे १२० ते १३० किलोमीटर अंतरावर आहे. सकाळी ११ वाजता आमचा प्रवास सुरू झाला. प्रथम ओल्ड बालाजीचे मंदिर दाखवण्यात आले. हे मंदिर म्हणजे तिरुमला मंदिराच्या डोंगराच्या पायथ्याला असलेल्या एका छोट्याश्या गावातील मुख्य रस्त्यावरील मंदिर. मंदिर तसे छोटे परंतु नक्षीकाम, सुंदर सुबक मूर्तीने नटलेले, मोठाले गोपुर, सर्वत्र स्वच्छता असलेले हे मंदिर आहे. मंदिरातील बालाजीची मूर्ती देखील आकर्षक आहे. बहुतांश पर्यटकांना याबाबत माहिती नव्हती. या मंदिराच्या काही अंतरावर तिरुमलावर जाण्यासाठी पायी मार्ग होता. मंदिरातील खिचडीचा प्रसाद घेऊन आम्ही वेल्लूरकडे जाण्यास निघालो. वाटते चंद्रगिरीचा किल्ला दिसतो. आपल्याकडे असणाºया सह्याद्रीच्या उंचंच उंच रांगा येथे दिसत नाही. छोट्या डोंगरावरती प्रचंड मोठे असे दगड तेही एकावर एक जणू कोणी तरी आणून ठेवले असावेत अशा प्रकारे येथील डोंगर दिसतात. हिवाळा असून देखील हवेत गारठा नव्हता. वाटेत विक्रेत्यांकडून सोनकेळी घेऊन आम्ही पुढे निघालो. वेगळ्याच प्रकारची ही केळी होती. चवीला एकदम गोड. आपल्याकडे असणाºया सोनकेळीला थोडी वेगळीच चव असते.
ड्रायव्हरशी गप्पा मारताना त्याने पोलिसांकडून चाललेल्या हप्त्यांविषयी सांगितले. प्रवाशी पाच भरा अथवा सहा भरा. हप्ता हा ठरलेलाच असतो. किमान २०० रुपये हातावर टेकवल्याशिवाय गाडी पुढे जाऊन देत नाही. कारण तमिळनाडू हद्दीत हे मंदिर येते. तमिळनाडूमध्ये चंदनचोरी मोठ्याप्रमाणात होत असल्याने अनेक ठिकाणी पोलिसांनी टोलनाके, चौक्या बसविल्या होत्या. नशिबाने आम्हाला कोणतीही अडचण आली नाही. वेल्लूरजवळील असलेल्या वेल्लूर किल्ला बाहेरूनच पाहिला. नॅशनल हायवे असल्याने रस्ता चांगला होता. दुपारी ३ वाजता आम्ही सुवर्णमंदिराच्या बाहेर पोहचलो. एव्हाना पुन्हा भूक लागल्याने आम्ही जेवण करण्यासाठी मंदिराच्या बाहेरून बाजूस असलेल्या हॉटेलमध्ये जाऊन महाराष्ट्रीयन जेवण जेवलो. दोन दिवसांपासून पोळीचे दर्शन न झाल्याने जेवण न जेवल्यासारखे वाटत होते. मनसोक्त पोळ्या पोटात ढकलून भूक भागवली.

स्वर्ण मंदिर : 

 

हे मंदिर वेल्लूर शहराच्या दक्षिण भागात आहेत. थिरूमलाई कोडी या गावात या महालक्ष्मी मंदिराच्या बांधकामामध्ये जवळपास १५०० किलोग्रॅम सोन्याचा वापर करण्यात आल्याचे सांगण्यात येते. २४ आॅगस्ट २००७ रोजी हे मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले.  श्री लक्ष्मी नारायणी मंदिर श्रीपुरम नावाने ही मंदिर ओळखले जाते. या मंदिराच्या बांधकामासाठी ३०० कोटींपेक्षा जास्त खर्च आला आहे. जगातील कोणत्याही मंदिरात सोन्याचा एवढा वापर करण्यात आलेला नाही. मंदिराच्या आतील आणि बाहेरील सजावटीमध्ये सोन्याचा वापर करण्यात आला आहे. रात्री मंदिरातील लाईट लावल्यानंतर सोन्याची चमक पाहण्यासारखी होती.  वर्षभर येथे भाविकांची दर्शनासाठी गर्दी राहते. १०० एकरपेक्षा जास्त भागामध्ये पसरलेल्या या मंदिर परिसरात चारीबाजुला हिरवळ दिसून येते. मंदिराची रचना चांदणीच्या आकारात आहे. या आकारातून तयार केलेल्या मार्गातूनच आपल्याला जावे लागते. संपूर्ण मंदिराची प्रदक्षिणा घालूनच आपण मुख्य मंदिरात येतो. संपूर्ण सोन्याच्या पत्र्याने मढवलेले हे मंदिर आहे. वाटेत भाविकांसाठी धार्मिक तसेच मंदिर ट्रस्टतर्फे  बनविण्यात आलेल्या कलाकुसर गोष्टी विक्रीस ठेवण्यात आलेल्या आहेत.  मंदिर परिसरात देशातील सर्व प्रमुख नद्यांचे पाणी आणून ‘सर्व तीर्थम’ नावाचा तलाव निर्माण करण्यात आला आहे. पाण्यासारखा पैसा कसा वाहतो ते या ठिकाणी दिसून येते. या पाण्यात भाविकांनी नोटा, चिल्लर भरमसाठ टाकून दिलेली दिसते. विशेषत: १००, ५०० च्या नोटांचा येथे खच पडलेला आहे. मंदिर पहाटे ४ वाजल्यापासून रात्री ८ वाजेपर्यंत भाविकांसाठी उघडे असते. नारायणी अम्मा नावाच्या संन्यासीने हे मंदिर बनविले आहे. मंदिर परिसर अत्यंत स्वच्छ ठेवण्यात आलेला आहे. भाविकांसाठी बसण्याची, स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची सोय जागोजागी करण्यात आलेली आहे. संध्याकाळी ६.३० ला मंदिर पाहून आम्ही परतीच्या मार्गाला लागलो. येताना वाटेतील गणपतीचे मंदिर पाहून रात्री १० ला आमच्या मुक्कामी परत आलो.


कसे जाल :

देशातील कोणत्याही भागातून तामिळनाडूतील वेल्लूर शहरापर्यंत बस, रेल्वे, विमानसेवा उपलब्ध आहेत. दक्षिण भारतातील रेल्वे स्टेशन काटपाडी असून येथून महालक्ष्मी मंदिर सात किलोमीटर अंतरावर आहे.
तिरुपतीवरून १२० ते १३० किलोमीटर अंतरावर मंदिर आहे. येथून खासगी बस, ट्र्ॅक्स, रेल्वेने येता येते. वेल्लूर येथे उतरून पुन्हा बसने, रिक्षाने येथपर्यंत पोहचता येते.

 
दिवस चौथा (४/११/२०१६)

सकाळी ९.२० ला विष्णू निवासम्मधून रुम सोडली. आवश्यक त्या बाबी पूर्ण करण्यासाठी निवासमच्या काउंटरवर जाऊन अनामत रक्कम परत मिळाली. रेल्वे स्टेशनवर जाऊन आमच्याकडील बॅग्ज या लगेज रुममधे जमा केल्या. २४ तासाला २० रुपये असे किरकोळ रक्कम भाडे असल्याने आमची चांगली सोय झाली. तेथून रिक्षा करून एसव्ही नॅशनल पार्क पाहण्यासाठी निघालो.

श्री व्यंकेटेश्वरा झुओलॉजिकल पार्क 
तिरुमला डोंगराच्या डाव्या बाजूला असणाºया डोंगराच्या पायथ्याशी हे एस. व्ही झू पार्क आहे. सुमारे २९० हेक्टर परिसरात हे पसरलेले आहे.
श्री व्यंकेटेश्वरा झुओलॉजिकल पार्क हे त्याचे पूर्ण नाव. अतिशय योग्य व्यवस्थापनामुळे व सर्व प्रकारचे प्राणी पहायला ठेवले असल्याने प्रसिद्ध झाले आहे. या ठिकाणी मार्जर वर्गातील म्हणजेच वाघ, सिंह, ब्लॅक पँथर, चित्ता, बंगल टायगर असे विविध हिंस्त्र पशु मोकळ्या वातावरणात आपल्याला पाहण्यास मिळतात. याप्रमाणेच जिराफ, गवे, लांडगा, हत्ती, बंगाल टायगर, चित्ता, वाघ, सिंह, सिंहीण, बिबळ्या, हाईना, तरस, निलगाय, रानडुकरे, हरिण, काळवीट तसेच पक्ष्यांमध्ये मोर, काकाकुवा, पोपट, मैना, पांढरा मोर, कासव तसेच  विविध जातीचे छोटे पक्षीही पिंजºयात आपणास पहायवास मिळतात.या ठिकाणी  २५ रुपयांत प्रति व्यक्तीला वाघ व सिंह गाडीत बसून मोकळ्यावरील सिंह व वाघ पाहता येतात. आपण पिंजºया असलेल्या गाडीतून सुमारे २ किलोमीटरचा प्रवास करतो. या प्रवासात रस्त्यावर बसलेले वाघ व सिंह पाहून आपली चांगलीच तारांबळ उडते. मात्र, आपण गाडीत असल्याने व रोजची सवय वाघ सिंहांना असल्याने मनातील थोडी भिती कमी होते. जवळून हे प्राणी पाहिल्याने एकदम वेगळ्याच विश्वात आपण जाऊन येतो.  प्रवेशद्वाराजवळच संपूर्ण पार्क मधील महत्त्वाची ठिकाणे पाहण्यासाठी २५ रुपयांत इलेक्ट्रीकवर चालणाºया गाडीची सोय केली आहे. ४५ मिनिटांत संपूर्ण पार्कची सफारी आपल्याला करता येते. मात्र, आम्ही सुमारे ३ ते ४ किलोमीटर अंतरामध्ये पसरलेले प्राणी संग्रहालय पायीच हिंडलो. मनसोक्त विविध प्राणी पाहून एकदम नॅशनल जिओग्राफी चॅनलवरील प्राणी पाहत असल्याचा भास झाला.उद्यान पाहून दुपारी ३ ला आम्ही परत तिरुपतीला आलो. तेथून जवळच असलेला निद्रा मुद्रेत असलेला बालाजीचे मंदिर पाहण्यास निघालो. तिरुपतीमधील कुठल्याही मंदिरात जा. भाताची खिचडी प्रसाद म्हणून भाविकांना खायला मिळते. तेव्हा बाहेरच्या हॉटेलमधील नाहक खर्च आपल्याला वाचवता येतो. येथेही मी खिचडी खाऊन तृप्त झालो. मी प्रसादाच्या रांगेत उभा होतो. प्रसाद द्रोणामध्ये देण्याची येथली पद्धत आहे. मी हात पुढे केल्यावर अचानक वाढप्याने माझ्या दोन्ही हातात भसकन खिचडी टाकली. बहुधा द्रोण संपले होते.  गरम गरम खिचडी तशीच हातात घेऊन पटकन संपूनही टाकली.
दुपारी ४ ला पद्मावतीचे मंदिर पाहण्यास रिक्षेने निघालो. तिरुमलावरीत तिरुपतीचे दर्शन घेतल्यानंतर पद्मावतीचे दर्शन घेण्याची किंवा कोल्हापूरमधील महालक्ष्मीचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. त्याशिवाय हे दर्शन पूर्ण होत असे म्हणतात.
येथे पोहचल्यावर २५ रुपये देऊन विशेष पासाने दर्शन रांगत उभे राहिलो. पाऊण तासाने एकदाचे दर्शन झाले. या ठिकाणी देवीचा प्रसाद म्हणून दहीभात दिला जातो.  थोडावेळ बाजारपेठ फिरून संध्याकाळी ७ ला तिरुपतीला रेल्वेस्टेशनमध्ये येऊन आमच्या परतीच्या प्रवासाला सुरूवात झाली.विशेष नोंदी :

 तिरुमला बसस्टँण्डवरून तिरुपतीला जाण्यासाठी पहाटे ३ वाजता बसेस सुरू होतात. रात्री १२ वाजता बंद होतात. (तिरुमला म्हणजे डोंगरावर व तिरुपती म्हणजे डोंगराखाली)
तिरुमला व तिरुपतीचे रुमचे आॅनलाईन बुकिंग १ दिवसांपुरतेच मर्यादित असते. दुसºया दिवशी रुम खाली करण्याची वेळ येते. तेव्हा वेळेअधीच काउंटरला जाऊन रुम एक्सेटेंशनसाठी चौकशी करावी लागते. बहुधा गर्दीच्या वेळी एक्सेटेंशन दिले जात नाही.

भ्रष्टाचार : 

प्रत्येक ठिकाणी मंदिरामध्ये त्यांच्याकडील बाहेर बाजूस असलेल्या काउंटरवर आपल्याकडील मोबाईल, कॅमेरा, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, बॅगा ठेवाव्या लागतात. या बॅगा काही ठिकाणी मोफत ठेवण्यात येतात. परंतु या ठेवाताना तेथील कर्मचारी प्रवाशांकडून पैशांची मागणी करतात. ‘खुशी से देना’ असे ही वर करून सांगतात. १० रुपये दिले तर परत देतात. किमान ५० रुपये तरी   मागतात. बर ही (अ)सुविधा फक्त महाराष्ट्रातील लोकांसाठीच. त्यांच्याकडील लोकांना मोफत सुविधा पुरवली जाते.

भाषेचा अभिमान :

तिरुपतीमध्ये दुकानदार, विक्रेते सोडल्यास आपल्याला भाषेचा प्रचंड अडथळा येतो. एकतर ते काय बोलताहेत ते आपल्याला कळत नाही. तेलगु, मल्याळी, कन्नडी अशा विविध भाषेत येथे संवाद साधतात. हिंदी ही राष्ट्रभाषा असली तरी. ‘हिंदी नही आती’ असे स्पष्ट येथील लोक सांगतात. तेव्हा मार्ग चुकल्यास, गाडीसाठी चौकशी केल्यास खूप अडथळा येतो. फक्त हॉटेल मालक, कर्मचारी, विक्रेते केवळ धंदयासाठी आपल्याशी हिंदीतून बोलतात.तिरुमला तिरुपती देवस्थान (टीटीडी) - भाग १ 

तिरुमला तिरुपती देवस्थान (टीटीडी) - भाग २


वरील लेख कसा वाटला या विषयी जरूर प्रतिक्रिया कळवा.

 

कॉपी करू नका