अष्टविनायक दर्शन


        सगळ्यांचे आवडते दैवत म्हणजे गजानन. कोणत्याही शुभकार्याची सुरूवात श्रींच्या दर्शनाने व पूजेने करतात. महाराष्ट्रात या गजाननाची अष्टविनायक यात्रा म्हणून प्रसिद्ध आहे. आपल्या आवडत्या गजाननाचे दर्शन घेत भाविक आठ गणपतींचे मनोभावे दर्शन घेतो.  केवळ दोन दिवसांत अष्टविनायक यात्रा पूर्ण होऊ शकते.  अष्टविनायकातील कोणतीही मूर्ती सुबक व कोरीव नाहीत. कारण त्या मुद्दामाहून घडविण्यात आलेल्या नाहीत. सर्व मूर्ती स्वयंभू असून, त्या ज्या अवस्थेत प्रकट झाल्या त्याच अवस्थेत त्याची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. सर्व मूर्तींना शेंदूराचे लेपण आहे. अष्टविनायकाच्या सात मूर्ती डाव्या सोंडेच्या असून, फक्त सिद्धटेक येथील गणेशमूर्ती मात्र उजव्या सोंडेची आहे. अष्टविनायकातील महड येथील मंदिर २४ तास दर्शनासाठी उघडे असते. बाकी मंदिरे रात्री १० पर्यंत उघडी असतात. मोरगाव, थेऊर व सिद्धटेक येथील मंदिराचे व्यवस्थापन चिंचवडच्या श्री मोरया गोसावी मंदिराकडे आहे.
            पेशव्यांचे कुलदैवत गणपती असल्यामुळे त्यांच्या कारकिर्दीत अष्टविनायकांच्या मंदिराचा विकास झालेला दिसून येतो. या अष्टविनायकातील पाच गणपती पुणे जिल्ह्यात (मोरगाव, थेऊर, रांजणगाव, ओझर, लेण्याद्री), दोन रायगड जिल्ह्यात (पाली व महड)  व एक स्थान अहमदनगर जिल्ह््यात (सिद्धटेक) आहे. येथील बहुतेक ठिकाणी निवासाची सोय उपलब्ध आहे. लेण्याद्री, ओझर, रांजणगाव, महड, पाली व थेऊन येथे देवस्थापनामार्फत भक्तनिवास बांधण्यात आले आहेत. फक्त सिद्धटेक येथे निवासस्थान नाही. अशा या अष्टविनायकाचे दर्शनासाठी संकष्टी चतुर्थीस फार मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात.
           पुराणात सांगितल्यामुळे सर्वप्रथम मोरगावच्या मोरेश्वराचे दर्शन  घेऊन त्यानंतर सिद्धटेक, पाली, महड, थेऊर, लेण्याद्री, ओझर व रांजणगावच्या महागणपतीचे दर्शन घेतल्यावर पुन्हा मोरेश्वराच्या दर्शनाला मोरगावला यायचं आणि यात्रेची समाप्ती करायची. शास्त्रोक्त अष्टविनायक यात्रा  करणे हे जरा खर्चिक व वेळकाढू काम आहे. एकतर ही मंदिरे जवळ नाहीत व एकमार्गी मंदिरे नसल्यामुळे यात्रा जरा अवघड जाते. अष्टविनायकाचे दर्शन घेणे महत्त्वाचे.
काही कारणामुळे मला मात्र  ही यात्रा एकाच वेळी करणे जमले नाही. इतरांना याची माहिती व्हावी हा उद्देश. मी केलेल्या अष्टविनायकाची माहिती खालील दिलेल्या लिंकवर मिळू शकेल. No comments:

कॉपी करू नका