Sunday, October 21, 2012

मोरगाव- नारायणपूर-बालाजी मंदिर

मोरगाव- नारायणपूर-बालाजी मंदिर

तारीख : 21/10/2012

मोरगाव

 

सकाळी ७.४५ ला घर सोडले. खडकीतून येरवडा मार्गे पुणेस्टेशन तेथून  हडपसरमार्गे निघालो. रविवार असल्यामुळे गर्दी नव्हती. वाटेत दिवेघाटाखाली  थांबलो. येथे मटकी भेळ प्रसिद्ध आहे. दिवे घाट ओलांडून सासवडला पेट्रोल भरले. पेट्रोल येथे पिंपरी-चिंचवडच्या तुलनेने स्वस्त आहे. 

मोरगावचा मयुरेश्वर : -

           अनेकवेळा एसटीने मार्गावरून गेलो. पण गणपतीचे दर्शन करण्याचे राहून गेले. तेव्हा मुद्दाम गाडीने जाऊन दर्शन घेतले.
           अष्टविनायकांपैकी प्रथम गणपती म्हणजेच मोरगावचा हा मोरेश्वर. अष्टविनायक यात्र या गणपतीचे दर्शन घेऊन सुरू केली जाते. सर्व आठही गणपतींचे दर्शन घेऊन शेवटी पुन्हा याच गणपतीचे दर्शन घेतली की यात्र पूर्ण होते असे म्हटले जाते. मोरेश्वर हा गणपती नवसाला पावणारा अर्थातच त्यामुळे भक्तांचा तारणहार समजला जातो. वेळेअभावी अष्टविनायकांची यात्र एकदम करता येणो शक्य नव्हते. तेव्हा जमेल तेव्हा अष्टविनायकांचे दर्शन घेण्याचे ठरवले.
           मोरगाव पुणे जिल्हय़ातील पुरंदर तालुक्यात असून क:हा नदीकाठी असलेले छोटेसे गाव. अष्टविनायकांमध्ये या गणपतीला विशेष स्थान आहे.  पुणे-सातारा मार्गावर पुण्यापासून केवळ 64 कि. मी. वर असणारे हे मोरगाव पुण्यातून हडपसरकडून सासवडमार्गे जेजुरीच्या थोडे पुढे गेल्यावर डाव्या हाताला मोरगावकडे जाण्याचा रस्ता आहे.
           मंदिरात जाण्यासाठी गाडी पार्किग तळापासून थोडे पुढे गेलो. श्रींच्या आरतीचे सामान, फुले, माळा, हार, कॅसेटी यांनी बाजारपेठ सजलेली दिसली. पुराणात कथेनुसार सिंधू राक्षसाला ठार मारणारा हा मयुरेश्वर होय. मोरावर बसून गणेशाने राक्षसाला मारले म्हणून मोरेश्वर (मयुरेश्वर) हे नाव प्राप्त झालं.
           सुमारे अर्धा तास रांगेत उभे राहिल्यावर दर्शनाची वेळ झाली. तेही फक्त काही सेकंदच मंदिरातील सेवकांनी भराभरा दर्शन घेण्याच्या सूचना केल्या होत्या. गणेशाची बैठी, डाव्या सोंडेची, पूर्वाभिमुख आहे. श्रींच्या डोळय़ात व बेंबीत हिरे बसविलेले आहेत. डोक्यावर नागाची फणी आहे. मंदिर उत्तराभिमुख आहे. मंदिराला एकूण 11 दगडी पाय:या आहेत. मंदिराच्या चारही बाजूला 50 फूट उंचीची तटबंदी आहे.  मंदिर हे काळय़ा दगडातून साकारलेले आहे. बहमनी राजवटीत मंदिर बांधले असल्याचे अनेक पुस्तकात वाचण्यास मिळते.
           देवळात प्रवेश केल्यावर चौकातच दोन दीपमाळा दिसल्या  अशा प्रकारच्या दीपमाळा अष्टविनायकातील बहुतांश मंदिरात पाहण्यास मिळतात. भक्कम तटबंदी व कळसावरील शिल्पकाम तर छानच आहे. सभामंडपाला दोन मोठी प्रवेशद्वारे आहेत . देवळाजवळ नगारखान्याची इमारत आहे .  इथलं एक वैशिष्टय़ म्हणजे अष्टविनायकांतलं  हे एकच मंदिर असं आहे, जिथे दगडी नंदी आहे.

भाद्रपद व माघ या दोन महिन्यात पुण्याच्या जवळच्या चिंचवडहून श्रींची (मोरया गोसावी) पालखी मोरगावी येते. मोरगाव हे साधू मोरया गोसावींचं जन्मस्थान. चिंचवडगावातील मोरया गोसावी यांनी या ठिकाणीही तपश्चर्या केली होती व या मंदिराच्या परीसरातील क:हा नदीत त्यांना गणोशमूर्ती प्राप्त झाली होती. पुढे ही मूर्ती चिंचवडला आणून त्यांनी तिची प्रतिष्ठापना केली. चिंचवडला मोरया गोसावींचे मोठे मंदिर आहे.  मोरगाव मंदिराचे  व्यवस्थापन चिंचवड देव स्थानाकडे आहे.

(चिंचवडच्या मोरया मंदिराबाबत लवकरच ब्लॉग्ज लिहतो..)


कसे जावे :


  • मार्ग : मोरगांव - पुणे- सासवड - जेजुरी मार्गे मोरगावला जाता येते. 
  • जेजुरीतूनच मोरगावाकडे जाणारा फाटा फुटतो. जेजुरी - मोरगांव अंतर 17 कि.मी.,
  • पुणे - मोरगांव 64 कि.मी
  • पुणे - सोलापूर रस्त्यावरील चौफुल्यापासूनही मोरगांवला येण्यासाठी रस्ता आहे.
  • स्वारगेट स्थानकावरून एस.टी.ची. सोय आहे.
नारायणपूर 
तेथून पाहुणचार घेऊन दुपारी ३ ला निघालो. मोरगावमार्गे पुन्हा हडपसरमार्गे जाण्याचा विचार होता. मात्र वाटेत दत्ताचे प्रसिद्ध नारायणपूर होते. सासवड मार्गे फक्त ८ किलोमीटरवर म्हणून गाडी तिकडे फिरवली. दत्ताच्या मंदिराशेजारी शंकराचे एक मंदिर असून, पुरातन काळात बांधलेले आहे. नारायणूपरला जाणारा रस्ता थोडा खराब आहे. 

प्रति तिरुपती बालाजी : 

आजकाल मंदिर बनविण्यामध्ये ही प्रतिरुप म्हणजे ‘च्या’ सारखे, क्लोन, कॉपी, नक्कल, पायरसी सारखे प्रकार वाढू लागले आहेत. जाऊ द्यात आपल्याला काय त्याचे. पण यामुळे अनेकांना लांब असणारी धार्मिक स्थळे आपल्या घरापासून काही अंतरावर बघण्याची संधी मिळते. त्यामुळे अशी प्रति रुपे अजून निर्माण झाली तर आमच्यासारख्या भटकंती करणा:यांची चंगळच होईल. प्रति शिर्डी (शिरगाव), प्रति पंढरपूर (पवनानगर, दुधिवरे खिंडीजवळ) अशा यादीत आता प्रति बालाजी (केतकावळे) हे नवीन नाव समाविष्ट झाले आहे.

              पुणे परिसरातून जेजुरी, सासवड, बनेश्वर, केतकावळे, किल्ले राजगड, तोरणा आदी ठिकाणांकडे जाणा:या  संख्या मोठी आहे. त्यामुळे खेड शिवापूर येथील टोलनाक्यावर वाहनांची नेहमीच गर्दी व कोंडी होते. नशिबाने मी गेलो तेव्हा गर्दी कमी होती. नारायणपूरच्या दत्ताचे दर्शन घेऊन कापुरहोळला बालाजी दर्शन घेण्यास निघालो. व्यंकटेश्वरा हॅचरीज या उद्योग समूहाचे संस्थापक डॉ. बी. व्ही. राव यांचे तिरुपती हे कुलदैवत. सर्वसामान्य भाविकांना तिरु पतीला जाणं शक्य होत नाही म्हणून पुण्यात बालाजीचं मंदिर उभारावं, अशी त्यांची इच्छा होती. ही इच्छा ते असताना पूर्ण होऊ शकली नाही. पुढे त्यांची मुले व्यंकटेश राव, बालाजी राव व अनुराधा देसाई यांनी ती पूर्ण केली.  पुणे - बेंगलोर महामार्गावर पुण्यापासून 40 कि.मी. अंतरावर पुरंदर किल्ल्याच्या परिसरात केतकावळे हे छोटंसं गाव. मंदिर डोंगराच्या पुरंदर किल्ल्याच्या मागील बाजूस एका छोटय़ाश्या डोंगराखाली आहे.  बालाजीचे मूळ मंदिर आंध्र प्रदेशातील तिरुमला-तिरुपती येथे आहे.  येथील मंदिर सुमारे 2 ते 3 एकरांवर बांधलेलं आहे.  कापुरहोळला पोहचल्यावर वाहनतळावर गाडी लावली केली. ‘व्यंकट रमणा गोविंदा’ अशी तेलुगू भाषेतील गोड भजनं ऐकू येऊ लागली.

स्वच्छता व टापटिपपणा :

गाडीतळापासून मुख्य मंदिर थोडसे लांब आहे. प्रशस्त जागा, मोकळे वातावरण, ‘व्यंकट रमणा गोविंदा’चे भजन, असे मंगलमय वातावरण येथे अनुभवाला मिळाले. डाव्या बाजुला प्रसाधनगृहे होती. तर बॅग ठेवण्याची स्वतंत्र व्यवस्था होती. मंदिरात प्रवेश करतानाच समोर चप्पल स्टँड आहे. मंदिरात मोबाईल व कॅमेरा घेऊन जाण्यास परवानगी नाही. दर्शन रांगेच्या आधीच टोकन देऊन आपले मोबाईल जमा करावे लागतात. संपूर्ण मंदिराला बाहेरून मोठा प्रदशिणा मार्ग आहे. पुरुष व महिलांसाठी अशा दोन रांगा आहेत. मंदिरात प्रवेश करतानाच पायरीवर पाणी सोडलेले आहे. आपोआप पाय स्वच्छ होऊनच भाविक पुढे जातो. मस्त कल्पना आहे ना. अशी मंदिर व्यवस्था आपल्याकडील मंदिरात सुद्धा व्हायला हवी. दान धर्मासाठी येथे मोठय़ा आकारातील हुंडय़ा ठेवलेल्या आहेत. मंदिराचा लाडूचा प्रसाद तर फारच छान असतो. एका द्रोणामध्ये भरून हा प्रसाद वाटप केला जातो. विशेष म्हणजे प्रसाद खाली सांडल्यास तो उचलण्यासाठी सेवा देणारे अनेक लोक येथे आहेत. अतिशय स्वच्छता येथे पहावयास मिळते. भाविकांची गर्दी येथे नेहमीच असते. मात्र गडबड, गोंधळ इथे दिसला नाही. मंदिरातर्फे  येथे मोठय़ा प्रमाणावर कर्मचारी आहेत.  आपल्याकडील मंदिरात होणारी भाविकांची ढकलाढकली येथे नव्हती.
               श्री बालाजी हा विष्णूचा अवतार. बालाजीची मूर्ती ही काळय़ा दगडात घडवली असून कमळावर उभी आहे. मूर्तीचे चार हातात शंख, चक्र , गदा असून एक हात भक्तांना आशीर्वाद देणारा आहे. कानांत सोन्याची कर्णफुलं  आहेत. उभट आकाराचा मुकुट आहे. सोन्याच्या विविध अलंकारांनी मूर्तीला सजविण्यात येतं. दिवसभरात मंदिरात तीन वेळा पूजा केली जाते. मंदिराच्या समोर ध्वजस्तंभ व गरु ड मंदिर आहे.  त्यात विविध देवदेवता आहेत. मंदिराच्या चारही बाजूंना छोटी मंदिरं आहेत. त्यात वेणुगोपालस्वामी, नृसिंह, पद्मावती, सुदर्शनस्वामी, गोदामाता अशा देवता आहेत. मंदिराच्या डावीकडे कुबेर व वराहस्वामी यांची मंदिरं आहेत.  मंदिरावर उंच व भव्य गोपूर आहे. येथे वर्षातून दोन मोठे उत्सव साजरे केले जातात. एक वार्षिक उत्सव व दुसरा ब्रमोत्सव.  बालाजीला भाविकांनी केस वाहण्याची प्रथा आहे. तसा कल्याण कट्टा येथेही आहे.
या गावांमध्ये व परिसरात रिक्षा, जीप, सुमो, ट्रॅक्स वगैरे वाहनांची संख्या वाढली आहे.  बालाजी मंदिरात बालाजीचे दर्शन घेऊन रात्री ८ला शिरवळमार्गे कात्रज बायपासला यायला निघालो. वाटते ७० रुपयांचा चांगलाच टोल भरला. तेथून पुढे अर्धा तास ट्रॅफिक जॅमचा अनुभव घेतला. 

जावे कसे : 
  • पुणे - बेंगलोर मार्गावर शिरवळमार्ग
  • हडपसर - सासवड - नारायणपूर - कापूरहोळमार्ग थोडा घाट आहे. फक्त ८ किलोमीटर अंतरावर
    बालाजी.
  • जवळची पाहण्याची ठिकाण : नारायणपूर, कानिफनाथ, जेजुरी, सासवड, भुलेश्वर. 

  

 कॅमे:याअभावी फोटो काढता आला नाही. परत गेल्यावर फोटो जोडतो. 

  या स्थळांचे  लेखनाचे काम अपूर्ण आहे.. तसदीबद्दल क्षमस्व ! 

कॉपी करू नका