Sunday, January 5, 2014

आगाखान पॅलेस


पुण्यातील प्रेक्षणिय स्थळांपैकी एक असलेला ‘आगाखान पॅलेस’ गेल्या रविवारी पाहण्यास गेलो.  सुरूवातीला ‘येरवडा पॅलेस’ म्हणून हे ओळखले  गेले. बंडगार्डन येरवड्यापासून २ किलोमीटरवर हे ठिकाण आहे. भारतीय स्वातंत्र्य चळवळीशी या वास्तूचा जवळचा संबंध आहे. महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी, महादेवभाई देसाई, डॉ. सरोजिनी नायडू यांना १९४२ मध्ये करावासासाठी येथे ठेवण्यात आले होते. स्वातंत्र्यपूर्व काळात बांधकाम केलेले या ऐतिहासिक वास्तूमध्ये आता महात्मा गांधीजींचे राष्ट्रीय स्मारक आहे. या वास्तूचा  केलेला हा  फेरफटका....


आगाखानांविषयी :  

आगाखान पॅलेस इमाम शाह सुलतान मोहम्मद शाह (आगाखान तिसरे) यांनी बांधला. त्यांच्या पूर्वजांना पर्शियाच्या राजाने १८३० मध्ये  'आगाखान' हा किताब बहाल केला होता. पहिले आगाखान १८४३ मध्ये पर्शियाहून भारतात आले. आगाखान दुसरे यांचा जन्म मुंबईचा. १८८५ मध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मुलगा म्हणजे सर सुलतान महंमद शाह  यांचा जन्म कराचीत  २ नोव्हेंबर १८७७ झाला. वयाच्या ८ वर्षी 'आगाखान' झाले.  १९३० मध्ये लंडन येथे  झालेल्या गोलमेज परिषदेस प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. दोन्ही महायुद्धांत त्यांनी ब्रिटिशांना सहाय्य केले. ते सुमारे ७२ वर्षे इमामपदावर होते. १८९० च्या सुमारास पुणे-नगर रस्त्यावरील ही जागा खरेदी केली.  ११जुलै १९५७ ला स्विझरलँडमध्ये  आगाखान निधन पावले.पॅलेसविषयी :

पुणे-नगररोडवर येरवडाजवळ हे ठिकाण आहे. इटलियन वास्तू आणि वास्तू समोरील सुंदर गार्डन हे त्याचे वैशिष्ट्य. सुमारे १९ एकराचा हा परिसर मोठा सुंदर आहे. शिाया इस्माइली संप्रदायाचे ४८ वे इमाम, सुलतान मोहम्मद शाह आगाखान (तिसरे) यांनी १८९२ साली बांधला. पुणे जिल्ह्यात दुष्काळ पडलेला असताना लोकांना रोजगार मिळावा व त्यातून गोरगरीबांना चार पैसे मिळावेत या उद्दात हेतूने त्यांनी ही वास्तू उभारली. १८९२ मध्ये या राजवाड्याचे बांधकाम सुरू झाले व १८९७ मध्ये ते पूर्ण झाले. संपूर्ण वास्तू बांधण्यासाठी त्या काळात १२ लाख रुपये खर्च आला. त्यातून एक हजार लोकांना रोजगार मिळाला. पुढे ‘आगाखान पॅलेस’ म्हणून या वास्तूला ओळखले जाऊ लागले.  मोठे प्रवेशद्वार व डोळ्यात मावणार नाहीत असे मोठे व्हरांडे. गच्ची व कौलारू छपरामुळे या वास्तूला देखणेपण आले आहे. मुस्लिम, इटालियन, ब्रिटिश, रोमन, फ्रेंच अशा विविध स्थापत्यकारांच्या बांधकाम  शैलींचा अनोखा संगम या ठिकाणी दिसून येतो. कमानीदार स्तंभ, नक्षीकाम, इटालियन पद्धतीचे कारंजे, जाळीदार कमानी, वेलबुट्टी, उंची गालिचे, महात्मा गांधी, कस्तुरबा, आगाखान यांची भव्य तैलचित्रे, काचेची मोठी झुंबरे लक्ष वेधून घेतात. वाड्यात इमाम सुलतान महंमद शाह त्यांचे सुपूत्र अलिखान, मौलाना हजल इमाम शाह करीम अली हुसैन यांचे वास्तव्य येथे काही काळ होते.
                दुसºया महायुद्धात ब्रिटिश सरकारने ‘भारत सुरक्षा कायद्या’ अंतर्गत ही वास्तू ताब्यात घेतली.  १९४२ मध्ये ‘चलेजाव चळवळ’ सुरू झाल्यावर ब्रिटिशांनी महात्मा गांधीजी, त्यांची पत्नी कस्तुरबा, गांधीजींचे स्वीय सचिव महादेवभाई देसाई तसेच काही काळानं गांधीजींच्या शिष्या मीराबेन आणि वैद्यकीय सल्लागार डॉ. एम. डी. डी. गिल्डर यांनाही येथे बंदीवासात (नजरकैदेत) ठेवले होते. जयप्रकाश नारायण यांच्या पत्नी प्रभावती, सरोजिनी नायडू यांनाही काही काळ येथे ठेवण्यात आले होते. दि. ९ आॅगस्ट १९४२ ला म. गांधीजींची कैद सुरू झाली. याच दरम्यान गांधीजींचे स्वीय सहायक महादेवभाई देसाई १५ आॅगस्ट १९४२ रोजी हृदयविकाराने मृत्यू पावले. २२ फेब्रुवारी १९४४ रोजी गांधीजींच्या पत्नी कस्तुरबांजींचे निधन झाले. या दोघांच्या समाध्या येथे जवळच आहेत.  समाधींच्या जवळच गांधीजींच्या अस्थींचा काही भाग असलेला कलश तुळशी वृंदावनाखाली ठेवलेला आहे.  १९६९ मध्ये राजपुत्र शाह करीम अल हुसेनिम आगाखान (चौथे) यांनी ही वास्तू राष्ट्राला अर्पण करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार २२ फेब्रुवारी १९६९ रोजी पॅलेस ' महात्मा गांधी स्मारक निधी ' कडे सुपूर्द केला गेला. कस्तुरबांच्या २५व्या पुण्यतिथीनिमित्त हा पॅलेस देशास सुपूर्द करण्यात आला. सध्या या पॅलेसची देखभाल भारतीय पुरातत्त्व खात्याअंतर्गत सुरू आहे. २००३ रोजी हे राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित आणि संरक्षित करण्यात आले आहे.

आगाखान पॅलेसमध्ये काय पहाल :

या वास्तूत महात्मा गांधी, कस्तुरबा यांच्या वापरातील  ठेवण्यात आल्या आहेत. आभाबेन गांधी यांनी भेट  स्वरुपात १९८८ ला काही वस्तू दिल्या आहेत. महात्मा गांधीजींच्या वास्तव्य असलेल्या या वास्तूत गांधीजींच्या चपला, पलंग, दैनंदिन वापरातील भांडी, चरखा, सूतकताईचे साहित्य, भारतीय बैठक, लिहिण्याचे व जेवणाचे टेबल, कस्तुरबांजींची साडी काचेच्या पेटीत ठेवण्यात आली आहे. या शिवाय गांधीजींचे शिल्प, स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेल्या सेनानींचे अर्धपुतळ्यांमध्ये नामदार गोपाळ कृष्ण गोखले, दादाभाई नौरोजी, लोकमान्य टिळक, महादेवभाई देसाई, कस्तुरबा गांधी यांचे पुतळे आहेत.
याच बरोबर स्वातंत्र्यपूर्वकाळातील कृष्णधवल गांधीजींची छायाचित्रे आहे. सध्या येथे महात्मा गांधी सोसायटीचे कार्यालय आहे. महिलांसाठी येथे कार्य चालते.


                

पुणे पूर्वीसारखी शांतता हरवू लागले आहे. गोंगाट, गर्दी, प्रचंड वाहतूक व त्यातून होणारी कोंडी शहरात  सर्वत्र दिसून येते. मात्र, या ठिकाणी असलेल्या शांत व सुंदर परिसरामुळे या सर्वांचा विसर पडल्याशिवाय राहत नाही. शाळेत जाणाºया विद्यार्थ्यांना व मोठ्यांनाही गांधीजींचा थोडा इतिहास येथे नक्कीच शिकायला मिळेल.
  • कसे जाल : येरवड्यापासून २ किलोमीटर अंतरावर, पुण्यातील प्रेक्षणीय स्थळांच्या यादीत असल्यामुळे सर्वांच्या परिचयाचे आहे. रिक्षा, बसेस जातात. पुणे स्टेशनवरून जवळ.
  • प्रवेश फी : प्रत्येकी ५ रुपये, लहान मुलांना मोफत.
  • परदेशी पाहुण्यांसाठी १०० रुपये.
  • वेळ : वर्षभर खुले.


हा फेरफटका कसा वाटला या विषयी जरूर येथे लिहा.


कॉपी करू नका