Monday, July 16, 2018

तिरुमला तिरुपती देवस्थान (टीटीडी) - भाग 3 - कोल्हापूरची अंबाबाई महालक्ष्मी

तिरुपती दर्शन - कोल्हापूरची अंबाबाई महालक्ष्मी 

तिरुपती बालाजी दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपºयातून भाविक जातात मात्र, दर्शन व राहण्याची सोय न केल्यास ही कुठलीही सहल त्रासदायक ठरते. एकतर तेथील भाषा वेगळी त्यात आपल्याला तेथील लोक सहकार्य करत नाहीत ही एक गोष्ट. मग लोकांना विचारत अथवा ट्रव्हल एजन्सीचे भरमसाठ पॅकेज घेत आपण ट्रिप करतो.यावेळी बालाजी दर्शनासाठी दर्शन, राहण्याची व जाण्या येण्याची सोय आधीच केल्याने दर्शन छान झाले. इतरांना तिरुपती बालाजी सहल सुलभ व्हावी यासाठी हा छोटा लेख....पुण्यातून रात्री १२.१० च्या चेन्नई एक्सप्रेसने रेणुगुंठा या ठिकाणी सायंकाळी ५ ला उतरलो. तिरुपतीला जाण्यासाठी पुण्यातून पाच ते सहा रेल्वेगाड्या आहेत. आपल्या सोईनुसार रेल्वेचे ४ महिने आधी बुकिंग केल्यास सोयीचे ठरते. शक्यतो रात्रीचा प्रवास असल्यास वेळ पटकन निघून जातो. नाहीतर १८ ते १९ तास रेल्वेत बसून कंटाळा येतो. रेणुगुंठा येथे उतरून तिरुपती येथील बालाजी संस्थानच्या लॉजवर जाण्यासाठी निघालो. या ठिकाणी तिरुपती संस्थानतर्फे  भाविकांसाठी अल्पदरात राहण्याची सोय उपलब्ध असते. रिक्षावाल्याला सांगून देखील त्याने स्टेशनजवळच्या विष्णू निवासमवर न नेता दुसºयाच निवासावर आम्हाला नेऊन सोडले. तेथे चौकशी केल्यावर हे ते नव्हे असे कळले. रेल्वे स्टेशनजवळच्या निवासस्थानाकडे जाण्यासाठी पुन्हा बाहेर येऊन आम्ही रिक्षा केली. विष्णू निवासम्ची ही इमारत तिरुपती रेल्वेस्टेशनसमोरच असून, सुमारे दोन हजार रुम्स भाविकांसाठी उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. आधिच बुकिंग केल्यास येथे राहण्याची अल्पदरात सोय उपलब्ध होते. आम्हाला मिळालेली रुम अतिशय स्वच्छ होती. दोन बेड, चादर, उश्या, संडास बाथरूम, आंघोळीसाठी गरम पाणी, फॅन अशा सर्व सोयींनीयुक्त असलेली ही रुम्स आधी दोन महिने बुक करावी लागते. सुमारे ३०० रुपयात आपल्याला ही उपलब्ध होते. याच इमारतीत असलेल्या हॉटेलमध्ये सायंकाळचे जेवण करून आम्ही पद्मावती मंदिर व इॅस्कॉनचे मंदिर पाहण्यास निघालो.


भक्तनिवासातून ८ ला खाली आलो. बाहेरील उभ्या असलेल्या रिक्षा स्टँडवरून रिक्षा केली. ४०० रुपयांत इस्कॉन व पद्मावती मंदिर दाखवून परत सोडण्याचे ठरवले. पद्मावतीचे मंदिर रात्री ९ नंतर बंद करण्यात येते. खरेतर बालाजीचे दर्शन घेऊन झाल्यावर पद्मावती देवीचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. मात्र, दुसºया दिवशी वेळ नसल्यामुळे आम्ही दर्शन आदल्या दिवशीच घ्यायचे ठरले. दर्शन घेतल्यानंतर थोडा वेळ तेथील दुकानांमध्ये खरेदी केली. रिक्षा ड्रायव्हरने वेळेत आम्हाला या ठिकाणी नेऊन सोडले होते. कारण दर्शन रांगेत उभे राहणाºयांमध्ये आम्ही शेवटचेच होतो. ९ नंतर दर्शनरांगा बंद करण्यात आल्या.  पद्मावती देवीचे दर्शन घेऊन आम्ही परत आमच्या निवासस्थानी आलो.दुसºया दिवशी सकाळी ८ ला आवरून तिरुमला डोंगरावर जाणाºया बसमध्ये बसलो. या बसचे तिकीट भक्तनिवास स्थानाच्या बाहेरच्या पॅसेजमध्ये दिले जाते.
विष्णू निवासम्च्या गेट बाहेर तिरुमलावर जाण्यासाठी शासकीय बस उपलब्ध असतात. ५३ रुपये प्रौढांसाठी तर लहान मुलासांठी २९ रुपये असे गाडी भाडे आहे. रिटर्नचे तिकीट काढल्यास माणशी १० रुपये कमी पण होतात. या शिवाय खासगी बस, जीप उपलब्ध असतात. मात्र, त्यांचे भाडे मनमानी असते. मनात येईल तो आकडा सांगून ते मोकळे होतात. थोडी तडजोड करता येते. खासगी जीपचा एक फायदा असा होतो की आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी थांबून वाटेतील स्थळे पाहता येतात. पण तसे ड्रायव्हरशी बोलावे लागते. तिरुमलावर जाण्यासाठी असलेल्या मुख्य डोंगरच्या खाली प्रवाशांची व बॅगांची यंत्राद्वारे तपासणी केली जाते. यासाठी शक्यतो कमी बॅग घेऊन जाणे आवश्यक असते. आम्ही रुमवरच बॅगा ठेवल्याने त्रास झाला नाही. तिरुमलावर जाण्यासाठी प्रशस्त रस्ता असून, २५ किलोमीटर वर तिरुपतीचे मंदिर आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला घनदाट झाडी असल्याने वातावरण उन्हाळ्यातही थंड होते. सुमारे दीड तासातच आम्ही वर पोहचलो.  वर व खाली उतरण्यासाठी वेगवेगळे  रस्ते आहेत. घाट मार्गाने आम्ही  साडे नऊला वर पोहचलो. वरती डोसा, इडली खाऊन कल्याण कट्टावर गेलो.कल्याण कट्टा :
बालाजीसाठी डोक्यावरचे केस काढणे ही प्रथा आहे. या केसांचाही पुढे मोठा आर्थिकदृष्ट्या वापर केला जातो. यातून बरेच पैैसे कमवले जातात. असो. तर कल्याण कट्टा येथे मोठी इमारत असून, यात महिला व पुरुष, लहान मुले असे भक्त आपले केस कापून देवाला अर्पण करतात. यासाठी छोट्याश्या रांगेत उभे राहून आपल्याला एक कुपन  व ब्लेड देण्यात येते.  कुपनवर न्हावी व खोली क्रमांक दिलेला असतो. त्या-त्या नंबरच्या खोलीत प्रवेश करून केस काढणाºया नाव्हासमोर जाऊन उभे राहायचे. मग तो आपल्याला केस भिजवून येण्यास सांगतो. थोड्याच वेळात मान खाली घालून खराखरा करून डोक्यावर वस्ताºयाने केस उतरवले जातात. या न्हाव्याकडून केस काढताना पैसे मागितले जातात. त्याला आपण होकार दिला तर ठिक नाही तर डोक्यावर एखाद दोन वार करून  डोके काहीप्रमाणात रक्तबंबाळ केले जाते. संस्थानकडून न्हाव्याला पैसे न देण्याबाबत सूचना केलेल्या आहेत. मात्र, येथे गुपचूप पैसे  घेतले जातात. पैसे मागण्याची ही प्रथा ‘खुशी’ या नावाने ओळखली जाते. अगदी मोबाईल, चप्पल जमा करण्याच्या ठिकाणी सुद्धा येथील कर्मचारी १०, २० रुपयांची ‘खुशी’ मागतात. मी मात्र, त्यांना ‘खुश’ न करताच माझे काम काम करून घेतले. केसं उतरविल्यानंतर खालील बाजूस असलेल्या बाथरूममध्ये आंघोळ करून कपडे बदलून आम्ही बालाजी दर्शनासाठी पुढे गेलो.आम्ही दोन महिने आधि आॅनलाईन दर्शनासाठी पास काढला होता. ३०० रुपये प्रती माणशी असे हा पास असतो. यात प्रसादासाठी २ लाडू देण्यात येतात.   दर्शनाची वेळ  सकाळी ११ वाजता होती. पास चेक करण्याअगोदर  स्त्री व पुरुषांनी ठराविक ड्रेस परिधान करणे गरजेचे असते. तश्या सूचना अगोदरच दिलेल्या असतात. मात्र, गडबडीत जीन्स पॅन्ट व ओढणी न घेता गेल्यास दरवाजातच अडवून बाहेर बाजूस असलेल्या विक्रेत्याकडून ओढणी व पंचा विकत घ्यावा लागतो. दर्शन रांगेत ११ वाजता उभे राहून आम्ही पुढे गेलो. वाटेत आपल्याकडील बॅगा व मोबाईल तेथील काउंटरवर जमा कराव्या लागतात. त्यांच्याकडून तशी पावती आपल्याला मिळते. ही सुविधा मोफत आहे. तरी पण येथे ‘खुशी’ मागणारे कमी नाहीत. पैसे देण्याची गरज नाही. या पास शिवाय मोफत दर्शन घेणारे व अजून १००० रुपये देऊन विशेष पास घेणारे असे सगळेच जण वेगवेगळ्या मार्गाने या रांगेत पुढे आपल्याला येऊन मिळतात. बºयाचश्या फरकाने येथील भक्तांना पैैश्याच्या जोरावर दर्शन घेणे सोपे जाते. जितके पैैसे पाससाठी जास्त तितके लवकर दर्शन. नाहीतर मोफत पास घेणाºयांना २४ ते ३६ तास हुंडीत बसणे भाग पडते. मागे दोन वेळा हा अनुभव घेतला होता. गदीनुसार साधारणपणे ४ ते ५ तर कधी २४ तासांनी सुद्धा दर्शनाचा लाभ घेणारे भाविक येथे पहायला मिळतात. या आधिच्या ट्रिपमध्ये दर्शनासाठी आम्ही ८ तास घालवले होते. सुमारे १ तास रांगेत चालल्यानंतर आम्ही मुख्य मंदिरात येऊन पोहचलो. अगदी ५ ते १० सेकंदातच समोर बालाजीची आकर्षक मूर्ती डोळ्यांसमोर येते. डोळे मिटून उघडेस्तोवर आपण पुढे सरकलेले असतो. झाले एकदाचे दर्शन. मंदिराच्या परिसरातील भिंतीवर जुन्या तमिळ भाषेतील कोरीव लेख दिसतात. कोरीव काम आपल्याकडील मंदिरा इतके पहावयास मिळत नाही. जमिनीवर एक प्रकारचा तेलकट प्रकार पायला लागतो. काय आहे ते पाहिल्यास वातावरणातून उडत आलेले तूप असते. भाविकांना देण्यात येणाºया साजूक तुपातील लाडू बनविण्याचे केंद्र मंदिरा बाहेर असल्याने येथे जमिनीला व वातावरणात एक प्रकारचा सुगंध दरवळत असतो. मंदिराच्या आवारात आपल्याला द्रोणात गरम भात प्रसाद म्हणून दिला जातो. एकंदरीतच येथील भक्तीमय वातावरण, बालाजीला पाहण्यासाठी अबालवृद्धांची सुरू असलेली चढाओढ, गर्दी, लोकांच्या भावना यातून आपण कुठेतरी सावरून मुख्य दरवाज्यातून बाहेर येतो.  येथून पुढे कोणतीही सूचनाफलक नसलेल्या मार्गाने विचारात, गर्दीच्या मागे जात आपण लाडू मिळण्याच्या ठिकाणी येऊन पोहचतो.


अापल्याकडील पासवर असलेल्या लाडूच्या संख्ये इतके लाडू आपल्याला रांगेत उभे राहून मिळतात. विशेष म्हणजे हे लाडू घेण्यासाठी जरी गर्दी होत असली तरी या ठिकाणी प्रसादासाठी अनेक काउंटरर्स उपलब्ध असल्याने ५ ते १० मिनिटातच आपले काम पूर्ण होते. लाडू मात्र, साजूक तुपातला, काजू, बदाम, बेदाणे युक्त असा असतो. अशा प्रकारे प्रसाद मिळल्यानंतर आम्ही मंदिर परिसरातून बाहेर पडलो. आता वेळ होती आमचे मोबाईल व बॅगा घेण्याची. तर बॅगा व मोबाईल जेथे जमा केले तेथे मिळत नाहीत. तर मंदिरापासून काही अंतरावर असलेल्या रस्त्याच्याकडेला असलेल्या एका इमारतीत आपले सर्व सामान आणले जाते. पावती दाखवून आपल्याला मोबाईल सुस्थितीत मिळतात. बॅगा व चपला देखील मिळतात. एवढे फरफेक्ट नियोजन या ठिकाणी असते. याचे आश्चर्य वाटते.

यानंतर वेळ होती ती जेवणाची. दुपाराचा १.३० वाजला होता. परिसरात असणाºया खाद्यविक्रेत्यांच्या स्टॉलवर जाऊन पोळी-भाजी, डोसा, दही भात, उडीदवडे, चायनीज, कोल्डड्रिंक्स असे खाद्यपदार्थ आपल्याला खायला मिळतात. मात्र, उच्चभ्रू सुखसोईनी युक्त असे हॉटेल या परिसरात नाही. त्यामुळे काहीजणांना हे आपण कुठे येऊन असे रस्त्यावर येऊन खातोय असा प्रश्न मनात येतो. पण असा अनुभव कधीतरी घेणे नक्कीच वेगळे ठरते. जेवण करून आम्ही येथील मार्केटमध्ये जाऊन खरेदी केली. बालाजीच्या आकर्षक मूर्ती, महिलावर्गासाठी अभुषणे, दागिने, लहान मुलांसाठी खेळणी असे या मार्केटचे स्वरुप असते. विशेष म्हणजे येथील विक्रेते चक्क आपल्याशी हिंदी संभाषण करतात. कारण धंदा आहे. तेव्हा त्यापुरती त्यांची मातृभाषा थोडी बाजूला ठेवतात.
सायंकाळी ५ वाजता आम्ही बसस्टँडवर येऊन पोहचलो. येथून तिरुपती, वेल्लूर जाण्यासाठी बसेस सुटतात.  गर्दीच्या वेळी या बसेस फॅमिलीसोबत पकडणे मोठे कठीण काम असते. कारण बस येताच बसच्या दोन्ही बाजूकडून माणसे खिडक्यातून आत उड्या मारतात. टॉवेल ठेऊन जागा अडवतात. दरवाज्यामधून जाणे तर फारच कठीण. प्रचंड धक्का बुक्की करत अनेक गाड्या सोडल्यानंतर आम्ही कंडक्टरला विनंती करून उभ्याने प्रवास करण्यास राजी केले. त्यानेही आम्हाला उभे राहण्यास मंजुरी दिली. बस पकडण्यासाठी फारच मोठे दिव्य करावे लागते. पण मजा आली. एक तर त्यांची भाषा वेगळी आपण मराठी भांडणार ते तमिळीमध्ये म्हणजे कोणालाच काही कळणार नाही. नुसताच राडा. सुमारे तासभराच्या प्रवासानंतर  सायंकाळी ६.३० ला तिरुपती निवासस्थावर पोहचलो.

आमचा राहण्याचा कालावधी २४ तासांचा असल्याने निवासस्थानकाच्या कर्मचाºयाने कुलूपावर छोटे कुलूप लावले. विनंती केल्यानंतर अर्धा तास वाढीव मिळाला. आवरून ७ ला खाली आलो. आमची कोल्हापूरला जाण्यासाठीची हरिप्रिया ट्रेन रात्री ९ ची होती. स्थानकाच्या बाहेरील बाजूस असलेल्या हॉटेलमध्ये जेवण करून स्थानकात येऊन बसलो. एक मात्र, जाणवले की येथील स्थानक आपल्या पुण्यातील स्थानकापेक्षा खूप पटीने स्वच्छ असते. प्रचंड गर्दी असूनही रेल्वेस्थानक खूपच स्वच्छ होते. रात्री ९ ला आमचा कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या दर्शनासाठीचा प्रवास सुरू झाला. दुसºया दिवशी दुपारी ४.३५ ला ही गाडी कोल्हापूरला पोहचते. सुमारे १९ तास ३५ मिनिटे व ९०४ किलोमीटरचे अंतर कापून गाडीने आम्हाला कोल्हापूरात सोडले. रेल्वेस्थानकातून रिक्षा करून महालक्ष्मी मंदिर परिसरात असणाºया घरगुती लॉज शोधण्यास रिक्षा ड्रायव्हरला सांगितले. त्यानेही आम्हाला वांगेआळीत नावाच्या परिसरात आणून सोडले. घरगुती लॉज चालविणारे या परिसरात खूपजण आहेत. आम्ही फक्त फ्रेश व दर्शन घेऊन निघणार असल्याचे सांगितल्यावर ५०० रुपयांत मालक तयार झाला. सायंकाळी ८ ला आवरून मंदिराकडे निघालो. मात्र, मंदिरात बाहेरच्या दरवाज्याच्या बाहेर गेलेल्या रांगा पाहून आम्ही लांबूनच महालक्ष्मीचे दर्शन घेतले. तेथून कोल्हापूरचा बाजार पाहत पाहत रांकाळ्याला आलो. सुंदर ठिकाण आहे. आमची पुण्याकडे जाण्यासाठी असणारी गाडी सह्याद्री एक्सप्रेस रात्री १०.५० होती. दोन रात्र तीन दिवस असलेली आमची तिरुपती बालाजी व महालक्ष्मी दर्शनची ही ट्रिप आमच्याबरोबर असलेल्या मित्रांमुळे आणखीच मजा आली.

भाषेचा अभिमान : 

येथील लोकांना त्यांच्या भाषेचा प्रचंड अभिमान पहायला मिळाला. रिक्षा ड्रायव्हर, दुकानदार, किरकोळ विक्रेते सोडले तर हिंदीतून कोणीही बोलत नाही. रस्त्यावर जाणाºया-येणाºया माणसाकडे मदत मागितल्यास ‘नो हिंदी’ असे बजावून सांगतात. हिंदी राष्ट्रभाषा असून ही परिस्थिती?. त्यामुळे आपण मराठी भाषेचा अभिमान बाळगलाच पाहिजे.


काही टिप्स :
  • आॅनलाईन रेल्वे बुकिंगसाठी वेवसाईट :  https://www.irctc.co.in
  • आॅनलाईन तिरुपती निवासस्थान व भक्तनिवास वेबसाईट : https://ttdsevaonline.com/#/login

आम्ही केलेल्या रेल्वेगाड्या :
  • पुणे ते रेणीगुंठा : मुंबई - पुणे - चैैन्नई एक्सप्रेस रात्री ००.१० मिनिटे. (पुणे) पोहचते दुसºया दिवशी : दुपारी ४.४० (१९ तास प्रवास) (१२१६३ ट्रेन क्रमांक)
  • रेणीगुंठा ते कोल्हापूर : हरिप्रिया एक्सप्रेस : रात्री ९ वाजता रेणीगुंठा येथून - कोल्हापूरला पोहचते ४.३५ ला (१६.३५ मिनिटे प्रवास (१७४१५ ट्रेन क्रमांक)

कॉपी करू नका