Sunday, March 17, 2013

श्री पार्श्‍वप्रज्ञालय तळेगाव





       दर रविवारी नवीन जवळच कुठेतरी फिरायला जायचे मनात नक्की असते. पण कुठे हा प्रश्न पडतो. मागे एकदा तळेगावजवळील जैन मंदिरात गेल्याचे आठवले व मग तळेगावचा रस्ता गाठला.
     श्री पार्श्वप्रज्ञालय मंदिर जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर तळेगावच्या पुढे डाव्या बाजूला हे मंदिर आहे. तळेगाव सोडल्यावर अर्धा ते एक किलोमीटरवर अंतरावर अभिनव तीर्थ, श्री पार्श्‍वप्रज्ञालय, तळेगाव असा एक फलक आपले लक्ष वेधून घेतो. तेथून सुमारे एक ते दीड किलोमीटर अंतरावर एका छोटय़ाश्या डोंगरावर हे मंदिर उभारलेले आहे. मंदिरार्पयत रस्ता बनविलेला आहे. त्यामुळे गाडी अगदी वर्पयत जाते. डोंगर असा जाणवतच नाही. पार्किगला गाडी लावून आपण थेट पोचतो ते मंदिरासमोरच. 



           मुंबईकडे जाताना रस्त्याच्या डाव्या बाजूला डोंगर उतारावर, निसर्गरम्य वातावरणात हे मंदिर आहे. रस्त्यावरून प्रथमदर्शनी हे मंदिर दिसून येत नाही. येथे जैन धर्मियांचे तेविसावे तीर्थंकर श्री पार्श्वनाथ भगवान यांची सुंदर मूर्ती आहे. मंदिराचा परिसर स्वच्छ होताच पण वेगवेगळी झाडे लावून अधिक आकर्षक बनविलेला दिसला. मंदिराच्या पाय:या सुरू होण्यापूर्वीच उजव्या हाताला भोजनालय होते. येथे भाविकांसाठी प्रसादाचे वाटप केले जाते. सुमारे 75 पाय:या चढून आपण मंदिरात प्रवेश करतो. समोरच पांढ:या शुभ्र दगडात कोरलेली श्री पार्श्वनाथ भगवानाची आकर्षक मूर्ती दिसते. मंदिर परिसरात टेकडीच्या उतारावर 52 शिखरांची 52 मंदिरे बनवली असून त्यावर सुंदर व अप्रतिम अशी शिल्पकला साकारलेली आहे.

पार्श्वनाथ  : 

जैनांचे तेविसावे तीर्थंकर म्हणून ओळखले जातात. राणी वामादेवी व राजा अश्वसेन हे त्यांचे मातापिता. पाश्र्वनाथांचा जन्म वाराणासीतील काशीनगरीत झाला. महावीरांपूर्वी सु. 250 वर्षे म्हणजे इ.स.पू. 850 च्या सुमारास पार्श्वनाथ होऊन गेले. पार्श्वनाथ तीर्थंकरांचे चिन्ह सप्तफाणाधारी नाग असून त्यांच्या मूर्तीच्या डोक्यावर तो कोरलेला असतो. प्रत्येक तीर्थकराच्या मूर्तीवर चंद्र, नाग, हत्ती, सिंह  इत्यादी चिन्ह असतात. त्यावरु न कोणत्या तीर्थकराची ती मूर्ती आहे  याचा बोध होतो.






मुख्य मंदिरात छतावरती सुंदर नक्षीकाम केलेले आहे. मंदिरात व प्रवेशद्वारातून येताना आकर्षक खांब आपले लक्ष वेधून घेतात. येथील प्रत्येक मंदिरातील मूर्ती सुद्धा आकर्षक असून त्यात आदीनाथ स्वामी भगवान, श्री शंखेश्वर पाश्र्वनाथ भगवान, श्री श्रेयांसनाथ  स्वामी भगवान आदींच्या मूर्ती आहेत.
जैन धर्मात एकूण 24 र्तीथकार होऊन गेले. तीर्थंकर म्हणजे धर्म प्रकट करणारे.

जैन धर्मातील चोवीस तीर्थंकरांची नावे :

1) ऋषभदेव, 2) अजितनाथ, 3) संभवनाथ, 4) अभिनंदन, 5) सुमितनाथ, 6) पद्मप्रभ, 7) सुपाश्र्च,  8) चंद्रप्रभ,  9) पुष्पदंत,  10) शीतलनाथ,  11) श्रेयासनाथ, 12) वासुपूज्य,  13) विमलनाथ,  14) अनंतनाथ, 15) धर्मनाथ,  16) शांतीनाथ, 17) कुंन्युनाथ,  18) अरहनाथ,  19) मिल्लनाथ,  20)  मुनिसुव्रत,  21) निमनाथ,  22) नेमिनाथ,  23) पार्श्वनाथ , 24) महावीर

जैन धर्म : 

पहिले तीर्थंकर भगवान ऋषभदेव यांनी जैन धर्माचा पाया रचला. तर चोविसावे तीर्थंकर भगवान वर्धमान महावीर यांनी त्यावर कळस चढविला, असे म्हटले जाते. ‘जीन’ म्हणजे सर्व सुख-दु:खांना जिंकलेला किंवा विजय मिळविला तो जीव आणि त्यांनी स्थापन केलेला धर्म म्हणजे ‘जैन’ होय. त्यामुळे या धर्माला ‘जैन धर्म’ असे संबोधले जाऊ लागले.















जैन बांधव अनेक धार्मिक उत्सव वर्षभर साजरे करतात. बरेचसे उत्सव किंवा पर्व ही तीर्थंकरांच्या जन्म आणि निर्वाणाच्या तिथींना धरून आलेले आहेत. पर्युषण, श्रुतपंचमी, दिवाळी, अक्षय्यतृतीया आणि भगवान महावीर जयंती हे जैनांचे प्रमुख सण उत्सव. याशिवाय पाडवा, गणोश चतुर्थी, रक्षाबंधन, मकरसंक्रांत, नवरात्र, दसरा, गौरीपूजा आदि सण-उत्सव जैन बांधव पाळतात. जैन समाजात उपवासाला मोठे महत्त्व आहे; परंतु उपवास करण्याचा काळ व स्वरूपात वैविध्य दिसते. ज्यांना वर्षभर उपवास करणे शक्य नसते, ते लोक चतुर्मासातील प्रत्येक अष्टमी व चतुर्दशीला उपवास करतात. उपवासाच्या दिवशी केवळ अन्नपदार्थच नव्हे तर पाणीही वज्र्य करतात.
        श्री पार्श्वप्रज्ञालय मंदिरात  ज्ञान संस्कार मंदिर शाळा असून येथे जैन धर्मातील मुलांना शिक्षण दिले जाते. सध्या 150 मुले येथे शिकतात. 5 ते 10  शिक्षण येथे उपलब्ध आहे. मंदिराची प्रतिष्ठापना 2006 साली झाली.असल्याचे श्री. प्रवीण भाई यांनी सांगितले.
            मंदिरात पार्श्वनाथ भगवानाजींचे दर्शन घेऊन बाहेर आलो. समोर तळेगावचा परिसर व एक मोठे तळे दिसत होते. मंदिर परिसरातून देहूगावचे गाथा मंदिरही दिसते. एकूण हा परिसर पावसाळय़ात छान दिसणारा आहे. तेव्हा पावसाळय़ात या ठिकाणी नक्की जायचे असे ठरवून घरी परतण्याचा मार्ग धरला. प्रत्येकाने हे मंदिर आवर्जून पाहावे.

अजून काय बघाल :

पिंपरी-चिंचवड परिसरात देखील आजुबाजूच्या बहुतेक लोकांना हे ठिकाण माहिती नाही. देहूरोडच्या पुढे बेगडेवाडी रेल्वे स्थानकाच्या जवळ, शंकरवाडी थांब्याजवळच्या डोंगरावर घोरावडेश्वराचे मंदिर आहे. जुन्या पुणे -मुंबई रस्त्यावर घोरावडेश्वर मंदिर खूप प्राचीन आहे. महाशिवरात्रीला व श्रावणी सोमवारी पिंपरी-चिंचवड व तळेगाव परिसरातील हजारो लोक येथे येतात. पायथ्याजवळ आहे अमरजाई मंदिर, गणपती मंदिर तसेच नवीन झालेले शिरगावचे श्रीसाईबाबा मंदिर येथून जवळच आहे.

No comments:

कॉपी करू नका