Sunday, September 29, 2013

‘कास’ची ‘आस’


29/9/2013
            रविवार साप्ताहिक सुट्टीचा वार अर्थातच घरी बसणे शक्य नव्हते. नवीन कुठेतरी हिंडायला जाणे ओघाने आलेच. बरेच वर्षांपासून ‘कास’ पठारचे नाव ऐकून होतो. तेव्हा कुटुंबकबिला घेऊन कास पठारावर जाण्यासाठी निघालो. लवकर निघाता निघाता सकाळचे ९.३० वाजले. सातारा मार्गे जाताना कात्रजचा १२० रुपये टोल व आणे येथील ८० रुपये जाऊन येऊन असा २०० रुपये टोल भरून आम्ही पुढे निघालो. एवढा टोल घेऊन सुद्धा रस्त्याची अवस्था काही सुधारत नाही. वाटेत थोडी पेटपूजा करून साताºयात पोहचलो. नेहमीप्रमाणे वाट चुकून थोडे सातारा हिंडलो. थोडी विचारपूस केल्यानंतर कास कडे जाण्याचा मार्ग सापडला. कात्रज सोडल्यापासून आधे मधे पावसाची रिमझिम सुरू होतीच. येवतेश्वराचा डोंगर चढून कास पठाराकडे  जाण्यासाठीचा मार्ग तसा छानच होता. छोटी छोटी वळणे घेत. उजव्या बाजूला सातारा शहराचे वाढते विस्तारीकरण पाहत. मागे अजिंक्यतारा किल्ला एकंदरीत छानच वातावरण होते.
            पुण्याहून सातारा साधारणपणे १२५ किलोमीटर. तेथून २२ किलोमीटरवर कास पठार. तेव्हा ११.३० पर्यंत आम्ही कास पठारावर येवतेश्वरमार्गे पोचलो. येवतेश्वराच्या डोंगरावर सर्वत्र फुललेली पिवळी पाहून यापुढे कास पठार अजून सुंदर असल्याचे लक्षात आले. एव्हाना पाऊस थोडा भुरभुरच होता. पठाराकडे जाणाºया रस्त्याच्या दुतर्फा पर्यटक उत्साहाने या काहीच दिवस फुलणाºया फुलांचे स्वागत करण्यासाठी मैदानावर पसरलेली होती. अर्थात हातात कॅमेरे घेऊनच. कोणी मोबाईल कॅमेरा, कोणी महागडे डीएसएलआर कॅमेरे तर कुणी साधे कॅमेºयातून हे सौंदर्य बंदीस्त करण्याचा प्रयत्न करत होते. आम्हीही थोडो फोटो सेशन करून कासकडे जाण्यासाठी निघालो. पाऊसाची रिमझिम  पुन्हा सुरू झाली.

रांगच - रांग

            येवतेश्वरापासून दोन ते अडीच किलोमीटर अंतर पुढे गेलो असू नसू तर पुढे ४० ते ५० फोर व्हिलरच्या रांगा दुतर्फा लागलेल्या दिसल्या. गाड्या हळूहळू पुढे सरकत होत्या. एका ठिकाणी हॉटेलच्या बाहेर फोर व्हिलर लावलेल्या दिसल्या. गर्दी चांगलीच असल्याचे आता जाणवायला लागले. हळूहळू तेथूनही आम्ही पुढे गेलो. कासकडे जाणारा रस्ता दुतर्फा हिरवळ व पावसाने चिखलमय झाला होता. साधारणपणे दोन फोरव्हिलर गाड्या शेजारून जेमतेम जाईल एवढच रस्ता असल्याने वाहने सावकाश हाकावी लागत होती. येवतेश्वरावर पोहोचोस्तोवर आम्हाला १२.३० झाले होते. तेथून गाडी हळूहळू पुढे सरकत होती. वाटेत पायी चालत येणाºया पर्यटकांचे जथ्थेच्या जथ्थे दिसायला लागते. पठाराकडून येणाºया प्रत्येकाच्या चेहºयावर विचित्रच भाव होते. जो तो ‘परत मागे फिरा’, पुढे तीन ते चार किलोमीटर रांग आहे. पुढे हजार एक  गाड्या असल्यामुळे ट्रॅफिक जॅम झाली आहे. शहाणे असला तर परत गाडी फिरवा असे प्रत्येकजण सांगत होता.
            तरीही ‘कास’ची ‘आस’ काही कमी होत नव्हती. गोगलयगायीच्या गतीने आम्ही मार्ग पुढे ढकलत होतो. एव्हाना दुपारचे २.३० वाजले होते. गाडीत बसून, आता वैताग व चिडचिड व्हायला लागली होती. पण कासला काहीही करून जायचे असे ठरवून हळूहळू गाडी पुढे रेटत होतो. वाटेत एका ठिकाणी रस्त्यावर खाली चिखलात रुतलेली क्वॉलीस पाहिली. तिची दुरवस्था पाहून भीतीही वाटली.
            गाडीत बसूनबसून माझ्या लहान मुलाने चुळबूळ करायला सुरूवात केली. कधी पोहचणार फुलं बघायला. चला ना घरी. अशी बडबड सुरू केली. समोरून येणाºया  माणसाला  अजून पुढे किती गर्दी आहे हो? असे विचारले तर शहाणे असलात तर मागे फिरा. ‘च्यायला’ फुल ट्र्ॅफिक जॅम आहे?’ असे म्हणून गावरान शिवी हासडत हे महाशय पुढे गेले. अस्सल सातारकरांच्या भाषेत रांगडे उत्तर मिळाल्याने आजूबाजुचे प्रवासीही हसू लागले.  येणाºया-जाणाºया प्रतिक्रिया पाहून मुलानेही ‘‘बाबा चला ना मागे जाऊ या. एवढी लोक सांगाताहेत ना? मग मागे का घेत नाही?, एक नंबरचे हट्टी आहात (बहुधा बायकोचे शब्द मुलाच्या तोंडात) अशी ट्याँव ट्याँव सुरू केली. पावसाचा जोर एव्हाना चांगलाच वाढला. रिमझिम पडणाºया पावसाने आता धो-धो बरसायला सुरूवात केली होती.

कसली फुलं पाहायची मला मेलेलीला? :

            एवढ्या लांब येऊन फक्त काही किलोमीटरवर असणारे कास पठार न पाहण्याचे मन काही धजवेना. घरून आणलेले फराळाचे सामान, बिस्किटे आता संपली होती. तेवढ्यात एका बार्इंंनी आमच्या गाडीच्या काचेवर हात मारून दार उघडण्यावी विनंती केली. ‘या आजींना जरा बसू देता का? आमची गाडी मागे ट्रॅफिकमध्ये अडकली आहे. आम्ही चालत पुढे आलो आहोत. पण आम्ही पुढे जाणार असल्याचे सांगितल्यावर त्या चालेल म्हटल्या.  मी ही मदत करण्याच्या भावनेने ठिक आहे असे म्हणून बसण्यास जागा देऊन पाणीही दिले. विचारपूस करता आजीबार्इंनी सांगितले की प्राधिकरणातील (निगडी) महिला बचत गटाच्या ५० महिलांबरोबर ७०० रुपये देऊन एका टुरिस्टवाल्याबरोबर येथे आले. मात्र, वय झाल्याने आता पुढे चालवत नाही. दमही लागला आहे. मी गाडीतच बसते असे पहिल्यांदा म्हटले होते. मात्र, या बार्इंनी ऐकलेच नाही. मला ही घेऊन त्या निघाल्या. कसली फुलं पाहायची या वयात माझ्या सारख्या मेलीला.’ आम्ही विषयांतर केले. आजी बाई कुठे राहतात असे विचारून घरी कोण असते? मग त्यांनीही तुम्ही कोण? कुठून आला? असे प्रश्न विचारून जरा आमचाही वेळ गेला. दहाच मिनिटात थोडे ट्रॅफिक पुढे सरकारली. समोरून मघाशी आजीबार्इंना सोडून गेलेल्या बाई परत आल्या व आम्ही माघारी जात आहोत. असे सांगून या आजीबार्इंना घेऊन गेल्या. गाडी एव्हाना दोन किलोमीटर अंतरावर पुढे गेली होती. दुपारचे तीन वाजले होते.  पावसाची रिमझिम सुरूच होती.
      





कास पाहण्याची खुमखुमी :

कासपठार अजूनही पुढे २ ते ३ किलोमीटरवर होते. अजुन अंगात चांगलीच खुमखुमी होती.  गाडी थोडी साईडला लावून पुढे चालत जाण्याचा निर्णय मी घरच्यांना सांगितला. त्यांनीही जरा बिचकतच होकार दिला. छत्री घेऊन गाडीतून बाहेर आलो. कासकडे पायी जाणाºया पर्यटकांबरोबर आम्हीही निघालो. एवढी जत्रा कशासाठी चाललेली आहे याचा विचारही मनात आला. आता पर्याय नव्हता. कासवर जाणे व तेथील फुले पाहणे हे मनात निश्चित केले होते. समोरून येणारे पर्यटक हातात पिवळी फुले दाखवून ‘पुढे अशीच फुले आहेत कश्याला तंगडतोड करताय असा सल्ला देऊन पुढे जात होती. रिमझिम सुरू असलेला पाऊसाने आता मात्र, जोरात बरसायला सुरूवात केली. वाºयापुढे आमची नाजुक छत्री थोडीच टिकणार. एकदा उलटी सुलटी होऊन छत्रीने आपला पराक्रम दाखविलाच. तसे थोडे अंतर पुढे चालत गेलो. पाठीमागून संपूर्ण पाठ व पॅन्ट भिजली होती. कॅमेरा सांभाळत पुढे जात असतानाच चिखलात पाय सटकून पडणारे पर्यटक ही पाहिले. क्षणभर हसू आवरेना. इतर पर्यटकही याचा पुरेपूर आनंद घेत होते. आपलीही अवस्था अशीच काहीशी होऊ नये म्हणून बिचकतच पुढे चालत होतो. एका हातात छत्री दुसºया हातात मुलाचा हात असा तोल सांभाळत चिखलातून पाय तुडवूत आम्ही जात होतो. पुढे एका ठिकाणी स्वयंघोषित काही कार्यकर्ते रिटर्न जाणाºया फोर व्हिलरला जागा करून देत होते. कोणाची गाडी चिखलात अडकलेली दिसली की काही तरुण टू व्हिलरवरून उतरून धक्का देऊन रस्त्यावर आणत होते. चिखलामुळे गाडीची चाके जागेवरूच फिरत होती. त्यात भर म्हणून टुरिस्ट घेऊन आलेल्या मोठमोठ्या गाड्या अंदाजे २० ते २५ गाड्या पाहून हे एवढे मोठे धुड कसे काय येथपर्यंत घेऊन आले याचे आश्चर्य वाटले. तेही गाड्या रिटर्न घेत होते. त्यामुळे अजूनच कल्ला होत होता.

धीर खचला :

            सोसाट्याचा वारा, वरून पाऊस, हातात छत्री आणि लोकांनी घाबरवून सोडल्यामुळे आता मात्र, बायकोचा धीर खचला व परत जाण्याचे आदेश देऊन आम्ही आमची पायपीट थांबवून परत माघारी येण्यासाठी सुरूवात केली. या आधीही पावसात ट्रेक केले. परंतु लक्षाजवळ जाऊन माघार घेणे कधीच नाही. मात्र परिवार असल्यामुळे माघार घेणे गरजेचे होते. कासला लांबूनच रामराम घेऊन आम्ही परत  फिरलो खरं परंतु परतीच्या मार्गावर सुद्धा चांगलीच ट्रॅफिक जॅम होती. मात्र, खाली साताºयाकडे जाण्यासाठी जास्त परिश्रम घ्यावे लागले नाही. ५ वाजेपर्यंत सातारा गाठला. गरमागरम चहा, भजी खाल्ली थोडे ताजेतवाने होऊन परतीचा मार्ग धरला.  मनात ‘कास’ची ‘आस’ तशीच होती. आज नाही परंतु पुन्हा कधीतरी नक्की कासला जाऊ असा निश्चिय करून परत फिरलो.

‘कास’ आहे तरी काय?

            निसर्गाचा चमत्कार म्हणजे ‘कास’चे पठार. या पठारावर वर्षातील काहीच महिने म्हणजे जून ते सप्टेंबरपर्यंत पृथ्वीतलावावर कुठेच न  उगविणारी फुले उगवतात. कास पठार व परिसरात ८५० प्रजातींपेक्षा जास्त फुले असणाºया वनस्पती आढळतात. यामध्ये दुर्मिळ व अतिदुर्मिळ वनस्पती आहेत. रेड डाटा बुकमधे समाविष्ट असणाºया सुमारे ४० विविध जातीतील फुलांचा समावेश आहे. येथील प्रत्येक फुले जास्तीत जास्त १५ ते २० दिवसांचे मेहमान असते. त्यानंतर त्याच्या जागी दुसºया जातीची फुले फुलतात. तांबड्या लाल मातीत फुलणारी हे फुले म्हणजे खरोखरोच  निर्सगाचा चमत्कारच. महाबळेश्वर मधील पाचगणीचे पठारही विविध फुलांनी फुलते. तसे राजगड, रायगडावरही व अन्य किल्ल्यांवरही हा चमत्कार पाहायला मिळतो. मात्र, कासची तुलना इतरांशी होऊ शकत नाही. 



मनातील


 सातारा सोडून घरी परत येत असताना मनात खरंच कास पाहण्याचे गरजेचे होते काय? आपणाला तेथे जाऊन काय फायदा होणार होता? असे विचार सुरू झाले. माझेच प्रश्न माझीच उत्तरे असा संवाद होऊ लागला. त्यातून काही गोष्टी मला सुचल्या त्या  येथे सांगावयासे वाटतात.
  •  कासचे पठार हा निर्सगाचा चमत्कार वर्षातून काही दिवसच फुलणारी ही फुले पाहण्याचा मोह कुणालाही आवारणार नाही हे नक्की. फेसबुक, विविध टिव्ही चॅनल्सवरती   कासचे दर्शन लोकांना घडू लागले. नेहमीची लोणावळा, खंडाळा, महाबळेश्वर, माथेरान आदी ठिकाणांना आता पर्यटक कंटाळू लागले आहेत. तेव्हा काही तरी नवीन ठिकाणी एनजॉयमेंट करण्यासाठी कासकडे लोकांनी मोर्चा नेलेला आहे. मी त्यातलाच एक.
  • हा एक पर्यटनाचा भाग होऊ शकतो. असे प्रत्येकाला वाटणे स्वाभाविक आहे. मात्र, खरोखरच येथे जाणे प्रत्येकाला गरजेचे आहे काय? अभ्यासकांनीच येथील पुष्पांचा अभ्यास करून संशोधन करणे गरजेचे आहे. शक्यतो अभ्यासकांनीच येथे जाणे गजरेचे आहे.
  • ‘वर्ल्ड हेरिटेज'च्या यादीत ‘पठारा'चा समावेश झाल्याने हंगामात पर्यटकांचा आकडा लाखांपर्यंत पोचतो आहे.  पठाराला प्रसिद्धी मिळाल्याने साहजिकच पर्यटकांचा ओढा इकडे जास्त वाढत असल्याच्या बातम्या ही पेपरात वाचायला मिळतात.
  • वनविभागाने पर्यावरण संरक्षणासाठी येथे संरक्षित जाळ्या बसविल्या आहेत. पर्यटनकर  लावण्यात आला आहे. मोठी बस १५०, कार ४० रुपये, प्रति माणसी १०, ट्यू व्हिलर १० रुपये, फोटो ग्राफीसाठी व्यावसायिक छायाचित्रकारांना १०० रुपये, पर्यटक कॅमेरे ५० रुपये असा कर बसविला आहे.
  • येथील अरुंद रस्त्यांमुळे वाहतूक कोंडीही अनेक ठिकाणी होते.  पर्यटकांचे जथ्थेच्या जथ्थे गाड्या भरून  आल्याने वाहतूक, पार्किंग आणि शुल्कवसुलीचे नियोजनही यामुळे नक्कीच ढासळते. पोलिसांना गर्दी आवरत येत नाही. गाडी पुढे सरकत नाही. ४-४ तास ट्रॅफिक जॅमचा  अनुभव ज्यांना घ्यायचा आहे. एवढे करून देखील फुले पाहण्यासाठी अनुकूल वातावरण असले तर ठिक नाहीतर धो-धो पावसात फुले काय दिसणार. हा अनुभव ज्यांना घ्यायचा असले त्यांनी आवर्जुन कासाला जावे अन्यथा ‘दूरून डोंगर साजरे’ या प्रमाणे लांबूनच दर्शन बरे.

उपाययोजना :

  1. कास पठाराच्या सुरूवातीलाच पर्यटकांकडून वसुली करावी. यासाठी ठिकठिकाणी वसुली बुथ उभे करून वेळ वाचवता येईल.
  2. अवजड मोठ्या वाहनांना येथे जाण्यास बंदी करावी. यासाठी वनविभागाकडून स्वतंत्र्य वाहतूक योजना राबविल्यास ट्रॅफिक जॅमसारखे प्रश्न सुटून सर्वांनाच आनंद घेता येईल. 
  3. फुले तोडणाºयांवर दंड आकारावा.
  4.  येथे जाण्यासाठी आॅनलाईन सुविधेद्वारे नावनोंदणी करावी. त्यानंतरच परवानगी देण्यात यावी. हंगामात शनिवार व रविवारी २००० गाड्यांपेक्षा जास्त वाहनांना  परवानगी देऊ नये. 
  5. येथे जाणे खरोखरच गरजेचे आहे  काय? याचा विचार प्रत्येकाने करावा.

Thursday, September 26, 2013

पुण्याचे वैभव : शनिवारवाडा (भाग १)




गणपती दर्शनासाठी पुण्यात गेलो होतो. पुण्यातील शनिवारवाड्याजवळून जात असताना माझ्या लहान मुलाने घोड्यावरील स्वार झालेल्या पुतळ्याकडे लक्ष वेधून विचारले, ‘‘बाबा हा शिवाजी का? मी नाही म्हणताच मग कोण? बाजीराव पेशवे म्हटल्यावर ते बाजीराव ‘सिंघम’ का? असा उलट प्रश्न त्याने केला. तो लहान असल्याने मी जास्त लक्ष दिले नाही. सध्याच्या पिढीला बाजीराव सिंघम माहिती आहे मात्र, बाजीराव पेशवे माहिती नाही. मुलाला इतके दिवस आपण शनिवारवाडा कसा दाखविला नाही याचे मलाच आश्चर्य वाटले. गणपती पाहायला वेळ होता. तेव्हा तासाभरात शनिवारवाडा दाखवू असे ठरवून मुलाला शनिवारवाडा दाखवून आणला. त्यानिमित्ताने का होईना मीही बºयाच वर्षांनी शनिवारवाडा पाहणार होतो. लहानपणी शनिवार पेठेतील आजी व मावशीकडे गेलो की मी व माझे मावसभाऊ व त्यांचे मित्र असे शनिवारवाड्यात लपाछपी खेळायला जायचो. मजा यायची.
              मराठ्यांच्या भरभराटीचा व अस्ताचा साक्षीदार ठरलेला ‘शनिवारवाडा’. पुण्यात शनिवारवाड्यासमोर घोड्यावर बसलेला, हातात भाला घेऊन शत्रूच्या उरात धडकी भरणारा आवेशपूर्ण असा पुतळा दिसतो.  पुण्याच्या वाढत्या इमारतींच्या साम्राज्यात आपले अस्तित्व टिकून राहिलेला हा शनिवारवाडा केवळ पुण्याचे नव्हे तर महाराष्ट्राचे भूषण आहे.  शनिवारवाड्यात पेशवे राहत असत. थोरले बाजीराव पेशवे यांनी हा वाडा बांधला. भगवी झेंडा ते युनियन जॅक फडकताना या वाड्याने अनुभवला आहे. आपल्या अनेक कटू व काही सुखद आठवणी घेऊन हा वाडा आजही उभा आहे. अनेक घटना, दुर्घटना पाहिल्या. पानिपतचे महायुद्ध असो, त्यानंतरचा तोतया भाऊसाहेब, राघोबादादांची अटेकपार स्वारी,  नारायणरावाचा खून असो , राजकारणं, लग्नसमारंभ व मंगल प्रसंग पाहिले. आपल्या कारकिर्दीत प्रत्येक पेशव्याने येथे बांधकाम करून वाड्याच्या सौंदर्यात भर टाकली.  तर १७ नोव्हेंबर १८१७ ला वाड्यावर ब्रिटिशांचे निशाण लागले. मात्र, दुर्देवाने १८२७ मध्ये लागलेल्या आगीत वाडा आतून जळून नष्ट झाला. यानंतर इंग्रजांनी या ठिकाणी जेल, हॉस्पिटल, शासकीय कार्यालये आदी सुरू केले होते. यानंतर १९१९ मध्ये वाडा संरक्षित स्मारक म्हणून जाहीर झाला. पुण्याचे सध्याचे विस्तारीकरण या शनिवारवाड्याच्या आजुबाजूला झालेले आहेत.


               सध्या शनिवारवाड्यात पाहण्यासारखी काहीच अवशेष उरलेले आहेत.  इ.स. १८२८ साली लागलेल्या आगीत हा सात मजली वाडा पूर्णपणे जळून गेला. त्यामुळे खºया स्वरूपातील वाडा आपण आज शकत नाही. पुरातत्व विभागाने बसवलेल्या फलकावरून आपणाला त्याची माहिती व अंदाज करता येतो. दिवाणखाना, गणेश महाल, रंगमहाल, हस्तिदंतीमहाल, हजारी कारंजे यांचे केवळ अवशेष पाहण्यास मिळतात. एक तर येथील तटबंदी आणि बुरुज, दिल्ली दरवाजा व अन्य दरवाजे,  नगारखाना.

तटबंदी आणि बुरुज

शनिवारवाड्याचा आकार चौकोनी असून जवळपास ६.२५ एकर जमीन वाड्याने व्यापली आहे. तटबंदीची उंची अंदाजे ३३ ते ३४ फुट असून खालील १० ते १८ फूट उंचीचा तट हा दगडी चिरेबंदी आहे तर वरचे बांधकाम विटांचे आहे. संपूर्ण वाड्याभोवती असलेल्या तटबंदीमध्ये बंदुकीतून गोळ्या झाडण्यासाठी जंग्या अर्थात भोके ठेवण्यात आली आहेत. तटास एकूण ९ बुरुज आहेत. या सर्वांवर तोफा बसवण्याची व्यवस्था असे. उत्तर पेशवाई मध्ये वायव्य बुरुजास तोफेचा बुरुज तर पश्चिम बुरुजास पागेचा बुरुज म्हणत.  तट रुंद असल्याकारणाने आत शिपार्इंच्या खोल्या होत्या. तटावर जाण्यासाठी एकूण नऊ जिने  १ दिल्ली दरवाज्याजवळ, १ मस्तानी दरवाज्याजवळ, १ नारायण दरवाज्याजवळ, २ पागेच्या बुरुजाजवळ आणि २ तोफेच्या बुरुजाजवळ, २ खिडकी दरवाज्याजवळ आहेत. बाजीराव पेशव्यांचे चिरंजीव बाळाजी बाजीराव यांनी १७५० ला वाड्यात बरेच बदल केले. अनेक नवीन इमारती बांधल्या. १७८० च्या सुमारास सवाई माधवराव पेशव्यांच्या काळात नाना फडणवीस यांनी नवीन खोल्या, दिवाणखाने, कारंजी बांधली. पेशवे कुटुंबातील परिवाराला रहाण्यासाठी, अनेक दालने व सदनिका शनिवारवाड्यात होत्या. जवाहिरखाना, तिजोरीची खोली, भांडार, वाचनालय, जिन्नसखाना, औषधालय, शस्त्रास्त्रांची खोली, दस्तऐवज ठेवण्याची खोली आणि चित्रशाला अशी स्वतंत्र दालने होती. महालांच्या बाहेर असलेल्या  चौकांच्यात कारंजी बांधण्यात आलेली होती. हजारी कारंजे या नावाने ओळखले जाणारे एक विशेष कारंजे होते. ८० फुटाचा परिघ असलेले एक १६ पाकळ्यांचे कमळ या कारंजात बनविण्यात आले होते. यातल्या प्रत्येक पाकळीवर पाणी उडण्यासाठी १६ नळ होते.

वाड्यास एकूण ५ दरवाजे  सध्या या दरवाज्याच्या शेजारून रस्ता गेला आहे. सतत गाड्यांची वाहतूक होत असते.



अष्टकोनी बुरुज

बांधकामाची माहिती :

संभाजीमहाराजांचे पूत्र शाहूमहाराज मोगलांच्या कैदेतून सुटले. त्यानंतर त्यांनी सातारा येथून राज्यकारभार करण्यास सुरूवात केली. पुण्याचे सरसुभेदार बाळाजी विश्वनाथ होते. त्यांना १७१३ मध्ये शाहूंनी ‘पेशवे’ हे पद दिले. बाळाजी विश्वनाथांनी आपला कारभार सासवड व सुप्यावरून सुरू केला. १७२० ला बाळाजी विश्वनाथ मृत्यू पावले.  त्यानंतर त्यांचा थोरला मुलगा बाजीरावला १७ एप्रिल १७२० ला शाहूमहाराजांनी पेशवाईची वस्त्रे बहाल केली.  सुरूवातीची काही वर्षे त्यांनी सासवड व सुप्यावरून पेशवाईचा कारभार सुरू केला. पाण्याची कमतरतता व राजकीयदृष्ट्या सोयीचे म्हणून पुणे येथे कारभार करण्याचे ठरले. कारण जवळच असलेले राजगड, तोरणा, पुरंदर, सिंहगड सारखे बळकट किल्ले होते. पुण्यात पेशव्यांचे स्वत:चे घर नव्हते.  पुणे पूर्वी फार लहान गाव होते. छोट्या छोट्या वस्त्या होत्या. यातच कसबा पेठ होती. पेठेजवळ शनिवार पेठ होती. लाल महालाच्या शेजारीच बाजीरावांनी स्वत:चा वाडा बांधण्याचे ठरविले. वाड्याची पायाभरणी शनिवार, १० जानेवारी १७३० ला केली गेली.  बांधकाम २२ जानेवारी १७३२ रोजी पूर्ण झाले. १६,०१० रुपये खर्चून हा वाडा उभारला गेला. वाडा शनिवारपेठेत होता. म्हणूनच की काय या वाड्याचे शनिवारवाडा असे नाव ठेवले असावे. वाड्याच्या कोटाचे काम सुरू झाले. पेशव्यांनी वाड्याला कोट घालावा व सगळ्या पुण्याभोवती वस्तीला कोट करावा हे छत्रपती शाहूमहाराजांनी हे पसंत पडले नाही. त्यांचे म्हणणे होते की, ‘अशा प्रकारच्या वाडा बांधल्यास तो जर चुकून मोगलांच्या ताब्यात गेला तर परत जिंकणे अवघड होऊन बसेल.  व त्याच्या आसºयाने आणखीही काही ठिकाणे मोगल जिंकू शकतील. परिणामी शाहूमहाराजांच्या आज्ञेनुसार कोटाचे काम थांबविण्यात आले.
बाजीरावांच्या काळात वाड्याचे बांधकाम लहान स्वरूपाचे होते. १७४९ ला छत्रपती शाहूमहाराजांचे निधन झाले. मराठ्यांच्या राजकारणाची सूत्रे नानासाहेब पेशवे ऊर्फ बाळाजी बाजीराव यांनी पुण्यास आणली. त्यामुळे महाराष्टÑाच्याच नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानच्या राजकारणाचे केंद्र पुणे बनले. त्यानंतर शनिवारवाड्याच्या इतर बांधकामास सुरूवात झाली. अर्धवट काम पूर्ण करून त्या जागी दिल्ली दरवाजा, बुरुजयक्त तटबंदी बांधण्यात  आली. वाड्याच्या सर्व तटांवर २७५ शिपाई, रात्रंदिवस ५०० स्वार व अंतर्गत बंदोबस्तासाठी १०००हून अधिक नोकर होते.

दिल्ली दरवाजा

१. दिल्ली दरवाजा :

शनिवारवाडा पाहण्यासाठी आलेला प्रत्येक पर्यटक याच दरवाज्यातून प्रवेश करून वाड्यात प्रवेश करतो. आपल्या वैशिष्टपूर्ण दिल्ली दरवाजाने शनिवारवाडा ओळखला जातो. हत्तींच्या धडकांपासून दरवाजा सुरक्षित ठेवण्यासाठी अणकुचीदार खिळे आणि जाडजूड पट्ट्या येथे बसविलेल्या आहेत. दरवाज्याची रुंदी १४ फूट तर उंची २१ फूट आहे.  दिल्ली ही उत्तरेला असल्यााने या उत्तरकडे असणाºया दरवाज्याला दिल्ली दरवाजा म्हणतात. वाड्यातील इतर दरवाज्यांच्या तुलनेने हा दरवाजा सर्वात मोठा आहे. आत प्रवेश करण्यासाठी छोटा दिंडी दरवाज्यातून आपला प्रवेश होतो. पुरातत्व विभागाने या ठिकाणी पर्यटकांसाठी तिकीट घर उघडले असून, तिकीट घेऊन आपण आत प्रवेश करतो.
शेषशायी विष्णू व गणेशाची चित्रे





नगारखाना

दिल्ली दरवाज्यातून आत गेले कि नगारखान्याची दोन मजली इमारत दिसते. तळमजला हा पूर्णपणे चिरेबंदी असून तो २७ फूट उंच आहे. तळमजल्यामध्ये दिल्ली दरवाज्याच्या दुमजली देवड्या, पहारेकºयांच्या कोठड्या व वरच्या मजल्यावर जाण्याचा जिना आहे. देवडीच्या भिंतीवर शेषशायी विष्णू, गणेश इ.ची पुसट चित्रे दिसतात. वरती नगारखान्यात गेल्यावर पुणे परिसरचा काही भाग पाहता येतो. झपाट्याने विस्तारलेले पुणे व आजुबाजूचा भाग दिसतो. जवळच असलेली पर्वती ही दिसते.
भग्नावषेशातून नगारखाना

जुने कारंजे



माहिती व छायाचित्रे जास्त असल्याने कृपया येथे (भाग २) वर क्लिक करा.

Monday, September 16, 2013

पुण्याचे वैभव : शनिवारवाडा (भाग २)


२. अलीबहादूर दरवाजा / मस्तानी दरवाजा :

 मस्तानी, समशेरबहादूर व मस्तानीचा नातू (आणि बांदा संस्थानाचा मूळपुरुष) अलीबहादूर हे ईशान्य कोपºयात राहत असत. ते वाड्याच्या ईशान्य बाजूच्या दरवाज्यातून ये-जा करत असत म्हणून त्या दरवाज्यास अलीबहादूर / मस्तानी दरवाजा असे नाव दिले गेले. दरवाजा सर्वात लहान आहे.

३. खिडकी दरवाजा : 

पूर्व बाजूस असणाºया या दरवाज्याच्या जागी पूर्वी एक लहानसा दरवाजा होता. त्यास खिडकी किंवा दिंडी असे म्हणत असत.

 ४.गणेश दरवाजा : 

पूर्व दिशेला असलेला हा दरवाजा आहे. दरवाज्याच्या बाहेर गणेश मंदिर असल्याने यास गणेश दरवाजा असे नाव पडले.

 ५. दक्षिण / नारायण / जांभळीचा / नाटकाशाळांचा दरवाजा :  

वाड्यात सगळ्यात जास्त नावे असलेला हा दरवाजा आपल्या वेगवेगळ्या कालावधीत वेगवेगळ्या नावाने ओखळला जात असे. दरवाजा दक्षिण दिशेला आहे म्हणून यास दक्षिण दरवाजा असे म्हणत. पुढे नारायणरावांच्या खुनानंतर त्यांचे प्रेत याच दरवाज्याने वाड्याबाहेर नेले म्हणून त्यास नारायण दरवाजा नाव पडले. या दरवाज्याने नाटकशाळांचा येत-जात असत म्हणून त्यास नाटकशाळांचा दरवाजा असेही म्हणत. या दरवाज्याच्या बाहेर एक जांभळीचे झाड होते म्हणून त्यास जांभळीचा दरवाजा असेही म्हणत.




वाड्यातील तटबंदी व जंग्या


हजारी कारंजे



वाड्यात एकत्र करण्यात आलेला कचरा.

खंत :

शनिवारवाड्याचे गतवैभव परत मिळविण्यासाठी सरकारने अधिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करून सुद्धा या वास्तूकडे केवळ ऐतिहासिक दृष्ट्या महत्व देऊन सरकारने आपले हात झटकणे चांगले नाही. केवळ पर्यटनस्थळ घोषित करून किरकोळ डगडुजी करून शनिवारवाडा आपल्या शेवटच्या घटका मोजत असेल की काय असे वाटते.  एवढे नक्की की पुरातन वस्तू असल्याने नवीन डागडुजी करता येत नाही परंतु त्या ठिकाणी त्या जागे विषयी आवश्यक ती माहिती चांगल्या स्वरूपात ठेवण्याची तसदी तरी सरकारने घ्यावी. ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्वाची असलेला शनिवारवाड्याची सध्याची अवस्था बिकट आहे. आवश्यक तेवढे कर्मचारी नेमून परिसराची स्वच्छता करणे गरजेचे आहे. वाड्यात गेल्यानंतर अनेक ठिकाणी पर्यटकांनी फेकून दिलेल्या पिशव्या, बाटल्या दिसल्या विशेष म्हणजे हा सर्व कचरा एका बाजूला नेऊन पेटवून देत असल्याच्या खूणाही दिसल्या. खरे तर अशी पर्यटनस्थळे केवळ पर्यटनस्थळेच नसून, तो आपला एैतिहासिक वारसा आहे. पर्यटकांनीसुद्धा अशा ठिकाणी ठेवलेल्या कचरापेटीतच कचरा टाकणाचे कष्ट करायला हवे. मी एकाट्याने घाण केल्याने काय होणार? असा विचार बदलला पाहिजे. वाड्याची पार्श्वभूमी मागे  ठेऊन स्वत: ‘बाजीराव’ असल्याचा आव आणून काही महाभाग स्टाईलमध्ये फोटो सेशन करताना दिसतात. तटबंदीवरील एखाद्या बुरुजाचा आसरा घेऊन बसलेले जोडपे, शाळा, कॉलेजला दांडी मारून वेळ घालवण्यासाठी फक्त ५ रुपयांत येथे विश्रांतीसाठी आलेल्या  बहाद्दरांना अटकाव करणे गरजेचे आहे. दिल्ली दरवाज्याच्या बाहेरील बाजूस पेपर वाचत बसलेले. हातपाय पसरून निवांत झोपलेले महाभागांना अटकाव केला पाहिजे. बाजीराव पुतळ्याच्या चौकटीच्या खालील बाजूस तर प्रचंड घाण साचलेली दिसते. तेथे स्वच्छता करणे गरजेचे आहे. बाजीरावांच्या पुतळ्यावर कधी काळी अर्पण केलेला हार वाळून खाली पडण्याची वाट पाहणे कितपत योग्य आहे. हे सर्व पाहिल्यावर वाईट वाटते. ब्लॉगवर लिहण्याशिवाय काहीच करू शकत नसल्याची खंत ही वाटते.



वाड्याची तटबंदी

तटबंदीवरून खाली वाड्यात जाणाºया पायºया

वाड्यातील तटबंदी व जंग्या.


शनिवारवाड्या शेजारून वाहणारा वाहतुकीचा रस्ता

शनिवारवाड्यातील मस्तानीच्या वाड्यावरील हिरवळ

नगारखान्यातून बाजीराव पेशव्यांचा पुतळा


नगारखान्यातून शनिवारवाड्यातील दृश्य


शनिवारवाड्यासमोरील मोकळ्या पटांगणात विविध सभांसाठी मांडव टाकलेला असतो.

नगारखान्यातील खांबावरील कलाकुसर

दिल्ली दरवाज्यावरील कलाकुसर
शनिवारवाडा पाहण्याची वेळ :
  • सकाळी ८.३० ते सायं. ६.००
  • तिकीट विक्री :
  • ५.४५ ला बंद करण्यात येते. त्यानंतर अर्धा तास पाहण्यासाठी मिळतो.
  • १५ वर्षांखालील मुलास मोफत प्रवेश व त्यावरी प्रत्येक व्यक्तीस ५ रुपये प्रवेश फी आकारली जाते.
  • वर्षभर शनिवारवाडा पाहण्यासाठी उपलब्ध असतो.

कसे जावे :
  • स्वारगेट वरून शनिवारवाड्याकडे अथवा शिवाजीनगरकडे जाणाºया बसने अथवा पायी चालत १५ ते २० मिनिटांत शनिवारवाडा येथे येता येते. वाटेत येताना पुण्यातील मंडई जवळील प्रसिद्ध तुळशीबाग तेथून शनिवारवाड्याकडे येता येईल.
  • रिक्षा सुद्धा शिवाजीनगर, पुणेस्टेशन व स्वारगेट वरून आहेत. 
भाग १ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
या लेख आपणास कसा वाटला यासाठी ब्लॉगवर जरूर प्रतिक्रिया लिहा. मेल करा. धन्यवाद. 


शनिवारवाडा पाहून दगडूशेठ गणपती व अन्य गणपतींचे देखावे पाहण्यास निघालो. घरी आलो तरी डोक्यातून शनिवारवाडा व बाजीराव पेशवे काही जात नव्हते. पुढील संबंध आठवडा बाजीरावांवरील विविध पुस्तके वाचण्यात गेली. बाजीरावांवर या ठिकाणी वाचण्यास क्लिक करा.

कॉपी करू नका