Sunday, November 17, 2013

‘मातेचे रान’ अर्थात माथेरान

निर्सग सौंदर्याने नेटलेले व प्रदूषण मुक्त असे पुणे-मुंबईजवळील  सर्वात जवळचे थंड हवेचे ठिकाण म्हणजे ‘माथेरान’ प्रशासनाच्या कृपेने सध्या तरी येथे केवळ मिनी ट्रेनच जाऊ शकते. बाकी प्रवास घोडा व पायी यांच्याद्वारेच करावा लागतो. अशा माथेरानला दिवाळीच्या सुट्टीच्या शेवटच्या रविवारी गेलो. त्या विषयी...

रायगड जिल्ह्यातील माथेरान हे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून जराशी वेगळी झालेली ही डोंगर रांग आहे. समुद्रसपाटीपासून साधारण ८०३ मी. म्हणजेच २६०० फूट उंचीच्या पठारावर माथेरान आहे. केवळ पायीच या ठिकाणी हिंडता येत असल्याने अनेक पर्यटकांचा ओढा थोडा कमी आहे. मात्र, घोडा व माणसांनी ओढण्याची दोन चाकी रिक्षा यामुळे येथे पर्यटक वळू लागले आहेत. तशी ही सुविधा अनेक वर्षे सुरू आहे. पिंपरी-चिंचवडपासून १०० किलोमीटरवर तर मुंबईपासून ११० किलोमीटरवर अशा सारख्याच अंतरावर असलेल्या माथेरानकडे पर्यटक न वळतील तर नवलच. शनिवार, रविवार व इतर सुट्टींच्या दिवशी माथेरान पर्यटकांनी फुललेले असते. महाबळेश्वरनंतर थंड हवेचे ठिकाण म्हणून माथेरान प्रसिद्ध आहे. माथेरानमध्ये तीस वेगवेगळी प्रेक्षणीय स्थळे आहेत. आरोग्यदायक व उत्साहवर्धक हवामान, अतुलनीय निसर्ग सौंदर्य व  जोडीला थंड हवा यामुळे माथेरानला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.  पर्यटकांसाठी हॉटेल, एमटीडीसीची निवासगृहे, काही छोटी हॉटेल्स आहेत. या शिवाय मुख्य बाजारपेठेत किंवा नाक्यावर चौकशी केल्यास काही ठिकाणी घरगुती राहण्याची सोय होऊ शकते. बाजार, उद्याने आदीं सोयी आहेत. गावात दवाखाना, शाळा यांसारख्या सुविधाही आहेत. एवढ्या लांबवर सुद्धा मोठी हॉटेल्स व लोकवस्ती पाहून आश्चर्य होते.

‘मातेचे रान’

 ब्रिटिशांनी माथेरान ही मुंबईजवळची जागा थंड हवेचे ठिकाण म्हणून मुद्दाम विकसित केली. इ. स. १८५० मध्ये मुंबईचा गव्हर्नर लॉर्ड एलफिन्स्टन व ठाण्याचा कलेक्टर ह्यूज मॅलेट यांनी माथेरान शोधले. १८५४ मध्ये मुंबई गव्हर्नरने माथेरानवर बंगला बांधला. माथेरान शोधले म्हणजे येथे आधी वस्ती होतीच.
माथ्यावरील दाट वनश्रीमुळे याला ‘माथेरान’ हे नाव पडले. असेही म्हणतात की, धनगरांचे मातापिता याच जंगलात मरण पावल्याने या जंगलात ‘मातेचे रान’ (माथेरान) आहे. येथील निसर्ग पाहून सर आदमजी पीरमॉय यांनी प्रथम नेरळ ते माथेरान अशी पाऊलवाट तयार केली. नेरळ-माथेरान लोहमार्ग बांधण्यासाठी त्यांचा दुसरा मुलगा अब्दुल हुसेन यांनी प्रयत्न केले. एवढ्याश्या छोट्या माथेरानवर  १९०५ साली नगरपालिकेची स्थापना झाली.

पार्इंट (स्थळे) :

 इंग्रजांनी माथेरान वसवले त्यामुळे बहुतेक पार्इंटसला त्यांनी इंग्रजीच नावे दिली व ती आजही तशीच आहे. पॅनोरमा, गार्बट, अलेक्झांडर, हार्ट, लिटल चौक, ग्रेट चौक, वन ट्री हिल, डेंजर, एको, लँडस्केप, लुईसा, पॉक्युर्पाइन, मंकी, आर्टिस्ट, स्फिंक्स, बार्टल आदी पार्इंटस पाहण्यासारखे आहेत.



वाहनांना बंदी :

माथेरानला घनदाट जंगलाचा विळखा आहे. सुदैवाने या ठिकाणी  वाहनांना जाण्यास बंदी आहे. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी हे पाऊल उचलणे गरजेचेच होते. नाहीतर हे ठिकाणही कास पठार, महाबळेश्वर आदी पर्यटन स्थळासारखेच प्रदूषणाकडे वळले असते. सध्या तरी गाड्यांना बंदी असल्यामुळे हे ठिकाण प्रदुषण विरहीत आहे. माथेरानचे खास वैशिष्टय असणारी छोटी रेल्वेच येथे जाऊ शकते. पूर्वी वाफेच्या इंजिनावर चालणारी रेल्वे आता डिझेलवर चालविली जाते. इंजिनावर चालणारी ही छोटी गाडी निर्सगाचे दर्शन घडवित आपला नेरळ ते माथेरान असा सुमारे २१ किलोमीटरचा प्रवास दोन तासात घडविते. आम्ही गाडी घेऊन गेल्याने दस्तुरी नाक्यावर गाडीतळावर गाडी लावून पुढे छोट्या ट्रेनने पुढे निघालो. ज्यांना नरेळवरून येणे जमत नाही अशासाठी दस्तुरी नाक्यावरून माथेरान ते मुख्य बाजारपेठ अशा २.५ किलोमीटरसाठी या गाडीतून जाता येते. दस्तुरी नाक्यावरून चालत ३०-३५ मिनिटे लागतात. ही रेल्वे आपल्याला सरळ बाजारपेठेत घेऊन येते. बहुतेक हॉटेल्सही या बाजारपेठेच्या अवतीभवती आहेत. या गाडीचे तिकीट प्रवेशद्वार ओलांडल्यावर काही अंतरावर मिळते. ही रेल्वे जागतिक वारसा म्हणून घोषित करण्यात आली आहे. याशिवाय पर्यटकांच्या सोयीसाठी मुख्य प्रवेशद्वारापासून संपूर्ण माथेरानवर हिंडण्यासाठी घोडे व माणसांनी ओढण्याची दोन चाकी रिक्षा उपलब्ध आहे. ज्यांना पायी फिरणे शक्य नाही अशासाठी माथेरानवर घोडयावरून फिरावे लागते. पण याचे भाडे पाहता आपल्या दोन पायांची डुगडुगीनेच प्रवास करणे उत्तम ठरते. पण तरीही अबालवृद्धांना ही सोय पुरेशी ठरते. संपूर्ण माथा विविध तसेच घनदाट झाडी आणि लाल मातीने संपूर्ण परिसर सजलेला आहे. झाडांवरसुद्धा येथील मातीचा घोड्यांच्या जाण्यायेण्याने फुफाटा उडलेले दिसतो. येथील लोकांचा उदरनिर्वाह पर्यटकांवर अवलंबून आहे. बहुतांशी लोक हे मराठीच आहेत. काही कातकरी, ठाकर, आदीवासी लोकही येथे दिसून येतात.
        बाजारपेठेमध्ये विविध हस्तकौशल्यावरील आधारित वस्तू, चप्पल, बूट, पिशव्या, गृहपयोगी वस्तू, शोभेच्या वस्तू विकण्यास ठेवलेल्या आहेत.



लहान मुलांचे अर्थात मोठ्यांचेही आकर्षण असलेली माथेरानची राणी ‘मिनी ट्रेन’










वनश्री :

संपूर्ण माथेरानचा परिसर हा विपुल वृक्षांनी सजलेले आहे. गर्द हिरवीगार झाडी हे त्याचे वैशिष्ट्यच म्हणावे लागेच. बेहडा,  हिरडा, खैर,  जांभूळ, आंबा अशी अनेक औषधी वनस्पती येथे आहेत. या हिरवाईमुळे उन्हाळ्यातही उन्हाचा त्रास येथे होत नाही.







शार्लोट लेक

मुख्य बाजारपेठेपासून १ ते १.५ कि. मी. अंतरावर हे नैसर्गिक तळे आहे. माथेरानवरील पिण्याच्या पाण्याचा मुख्य साठा हाच आहे. पावसाळ्यात हा जलाशय संपूर्ण भरतो. या ठिकाणीही काही हॉटेल्स असून, दमून भागून आल्यावर याही ठिकाणी आपली पोट पूजा होऊ शकते. पाण्यात पाय अथवा आंघोळ करू नये अशी सूचना देऊनही अनेक पर्यटक सूचनेला न जुमानता यथेच्छ पाय धुण्यासारखे प्रकार करताना आपल्या दिसून येतात.  या पाण्यावर पुढे प्रक्रिया करून संपूर्ण माथेरानच्या हॉटेल्स व रहिवाशांना पुरविलेले आहे.

शार्लोट लेक












बाजारपेठेतील चप्पल विक्रेत्याचे दुकान.


प्रदूषणापासून  मुक्ती अनुभवण्यासाठी व निर्सगाच्या सान्निध्यात यायचे असल्यास एक दिवस का होईना पण माथेरानला येणे गरजेचे आहे. 

 

माकडेच माकडे :

माथेरानमध्ये पायथ्याशी आपण गाडी लावतो. या ठिकाणपासून ते संपूर्ण माथेरानावर माकडे दिसून येतात. पर्यटकांशी ओळख झाली असल्याने ही माकडे टोळीने पर्यटकांच्या मागे जाऊन हातातल्या खाद्यपदार्थांवर ताव मारताना दिसून येतात.

‘छोटे कुटुंब सखी कुटुंब’

कसे जाल :

  • माथेरान हे पुण्यापासून १२५ तर मुंबईपासून ११०  किलोमीटरवर आहे.
  • पुण्याहून येताना जुन्या पुणे-मुंबई महार्गावर खोपोली सोडल्यावर चौक म्हणून उजवीकडे रस्ता जातो. या रस्तावर कर्जतच्या अलिकडे नेरळ माथेरानकडे जाणारा रस्ता आहे.
  • (रस्त्याचे डांबरीकरण चालू असल्याने चौक ते नेरळ हा रस्ता खराब आहे.)
  • पायी माथेरानला येण्यासाठी अनेक मार्ग आहेत. पण गाडीने येण्यासाठी   नेरळवरून डांबरी रस्त्यावर ८ किलोमीटरची घाटातून वेडीवाकडी वळणे घेत वाट आहे. याशिवाय लिट्ल चौक पॉईंटच्या खालून येणारी वाट, कर्जतहून गार्बेट पॉईंटवर येणारी १३ कि.मी.ची पायवाट आहे.

कधी जाल :

येथे जाण्यासाठी सप्टेंबर ते मार्च हा कालावधी चांगला आहे. भटक्यांसाठी पावसाळा ही योग्यच ठरतो. जून ते आॅगस्ट या काळात येथे जोरदार पाऊस पडतो. रायगडप्रमाणेच या ठिकाणी वरपर्यंत धुक्याचे साम्राज्य असते. उन्हाळ्यात येथे जाणे चांगले. कारण दोन्ही बाजूंनी गर्द हिरवी गार झाड असल्याने उन्ह्याच्या झळा लागत नाही.

काही टिप्स :

  • शक्यतो वेळ काढून सकाळी ९ वाजेपर्यंत माथेरानाला पोचून काही पार्इंटस पाहून संध्याकाळी ६ पर्यंत परतीचा मार्ग धरावा. एका दिवसात सर्व पार्इंटस पाहणे शक्य होत नाही. घोड्यावरून जाणार असलात तरी हे पार्इंटस पाहणे शक्य होत नाही. त्यासाठी किमान ३ दिवस तरी पाहिजेत.
  • सर्व पार्इंटस एकमेकांपेक्षा लांब अंतरावर असल्याने सोबत नकाशा असणे गरजेचे आहे. तसे वाटेत लोक ये - जा करत असतात.
  • स्वत:चे जेवण घेऊन जाणे उत्तम. येथील हॉटेल्स सर्वसामान्यांच्या अवाक्याच्या बाहेरील आहेत. म्हणजे काही मार्केट मधील हॉटेल्स तशी स्वस्त आहेत. पण ती शोधावी लागतात.
  • पाण्याची सोय करून जाणे चांगले. कारण काही पार्इंट सोडले तर वाटेत पिण्याच्या पाण्याची सोय नाही.

(मी पाहिलेल्या पार्इंटबाबत माहिती काही दिवसातच)

माथेरानचा हा लेख आपणास कसा वाटला या विषयी जरूर येथे लिहा.

Sunday, November 10, 2013

शिल्पकलेचा चमत्कार : अंबरनाथचे शिवमंदिर


 

बºयाच वेळा मुंबईला जाणे झाले. रेल्वेने जाताना अंबरनाथ नावाचे स्टेशन लागते. या ठिकाणी शंकराचे प्राचीन मंदिर आहे. काहीनिमित्त कल्याणला नातेवाईकाकडे गेलो होतो. येताना जवळच असलेले अंबरनाथचे सुप्रसिद्ध मंदिर त्या विषयी.....



मध्य रेल्वेच्या मुंबई ते कर्जत या उपनगरीय मार्गावरील अंबरनाथ हे रेल्वेस्टेशन म्हणून ओळखलं जातं. या व्यतिरिक्त ‘‘.......... येथे काडेपेट्यांचा कारखाना आणि लष्करी दारूगोळा उत्पादन करण्याचे कारखाने आहेत.’’ असे रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा या प्रश्नाचे उत्तर लहानपणी ....अंबरनाथ.... असे प्रत्येकालाच आठवत असेल.  औद्योगिकीकरणात झपाट्याने बदलत्या या शहराला प्राचीन ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व आहे ते येथील प्रख्यात अंबरनाथ शिवमंदिरामुळे.


              संपूर्ण जगाचा सांस्कृतिक वारसा म्हणून युनेस्कोने  जाहीर केलेल्या २१८ कलासंपन्न असलेल्या वास्तूंपैकी अंबरनाथ हे एक प्राचीन मंदिर. युनेस्कोने १९९९ साली या मंदिराला दर्जा दिला. हे प्राचिन शिवमंदिर शिलाहार छित्तराज (इ.स. १०२०-१०३५) याने बांधण्यास प्रारंभ केला व त्यानंतर त्यांचा मुलगा मुण्मणिराजाच्या कारकीर्दीत १० जुलै १०६० रोजी बांधकाम पूर्ण झाले. मंदिर बांधण्यासाठी ४० वर्षे लागली.  शिलाहार राजे हे शिवभक्त होते. त्यांनी अनेक मंदिरे उभारली. काही काळाच्या पडद्याआड गेली. अंबरनाथचे हे भूमिज शैलीतील मंदिर केवळ पाहण्यासारखे आहे. मंदिरातील शिवलिंगाला अंबरेश्वर म्हणतात. याच नावावरून गावाचे नावे अंबरनाथ  पडले असावे.







भूमिज पद्धतीचे बांधकाम :

महाराष्ट्रात शंकराची अनेक प्रसिद्ध मंदिरे आहेत. यातील अनेक मंदिरे गड किल्ल्यांवर उभारली गेली आहेत. तर काही जमिनीवरही बांधली गेली. औरंगाबादजवळील घृष्णेश्वर मंदिर, भीमाशंकर येथील मंदिर, पुण्याजवळील भुलेश्वर ही त्यापैकीच एक. अंबरनाथ मंदिराची निर्मिती ही एका विशिष्ट शैलीत केली गेली आहे. भूमिज पद्धतीत बांधलेले हे शिवमंदिर जुने मंदिर आहे. शिल्पशास्त्राप्रमाणे हे शिवमंदिर सप्तांग भूमीज पद्धतीत तयार केले आहे. मंदिराच्या पायाच्या कोनांची संख्या सात आहे. पूर्वी एकावर एक असे सात भूमी (शिल्परांगा) रचण्यात आल्या होत्या. मात्र गाभाºयावरील कळस नष्ट झाल्याने तीनच भूमी (शिल्परांगा) शिल्लक आहेत. सध्या मंदिराचा कळस अस्तित्वात नाही.

मंदिराचे प्रमुख प्रवेशद्वार पश्चिम दिशेला असून त्याशिवाय आणखीन दोन प्रवेशद्वारे मंदिराला आहेत. महाराष्ट्रातील अनेक प्राचीन मंदिरांमध्ये असे बांधकाम पाहण्यास मिळते. संगमेश्वर येथील कर्णेश्वर मंदिराची आठवण या ठिकाणी नक्कीच येते. हे मंदिर उभारताना गणिताचा विशेषत: भूमितीचा वास्तुशास्त्रात विचार केला गेल्याचे सहज लक्षात येते. केवळ दर्शनासाठी न जाता येथील स्थापत्यशास्त्राचा थोडा अभ्यास केल्यास हे सहज लक्षात येते.




देवदेवतांच्या शिल्पांचे मंदिर :

 मंदिराबाहेरील शिल्पे अनेक हिंदु देवदेवतांच्या दगडी शिल्पाचे कोरीवकाम आहे. या शिल्पांमध्ये गरुडासन विष्णू, शिव, विवाहापूवीर्ची पार्वती, शिव-पार्वती विवाह सोहळा, त्रिपुरा वध मूर्ती, पार्वती चामुंडा, नृत्यांगना, द्वारपाल, विष्णू, नटराज, कालीमाता, गणेश नृत्यमूर्ती, नृसिंह अवताराची मूर्ती, महिषासुर र्मदिनी या मूर्ती अत्यंत कुशलतेने दगडातून साकारलेल्या आहे. विशेष म्हणजे दगडी कामातून त्या काळची वस्त्रे, आभूषणे आणि वेशभूषाही साकारलेल्या आहेत. या मूर्तींमध्ये एक अतिशय सुरेख अशी कामदेवाची मूर्ती आहे. ह्या मूर्तीला आठ हात आहेत. तिला त्रिमुखी मूर्ती म्हणतात. हे बहुधा शंकर पार्वतीचेच शिल्प असावे. कारण मूर्तीच्या मांडीवर एक स्त्री प्रतिमा कोरली आहे. मंदिर प्रदक्षिणा करताना मंदिराच्या भव्यपण लक्षात येते. मंदिराच्या उत्तर दिशेला एक छोटे बांधकाम केलेले आहे. त्यात शिवलिंगासह पार्वतीची मूर्ती आहे. या मंदिरात ब्रह्मा, शिव, सूर्य, विष्णू या देवता एकाच मूर्तीत शिल्पकाराने साकारलेले आहेत. मंदिराच्या भिंतीवर शिल्पकारांनी साकारलेल्या अनेक भव्य मूर्ती पाहून क्षणभर त्या आपल्याकडे पाहत असल्याचा भासही होतो. गेली ९०० वर्षे या मूर्ती आपले मौन सांभाळून आहेत. पौराणिक कथा, नृत्यात मग्न असलेली शिल्पे, हातात आयुधे घेतलेली शिल्पे असी शिल्पकृती येथे आपणास पहावयास मिळते. मंदिराच्या बाहेर व आतमध्ये देवतांच्या मूर्ती कोरण्यात आल्यामुळे मंदिर सुंदर वाटते.





महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हेमांडपंती शैलीची मंदिरे बघायला मिळतात. त्यालाच 'भूमीज' स्थापत्य शैली असेही म्हणतात. सर्वच पुरातन मंदिरांना 'हेमांडपंती' शैलीची मंदिरे म्हणण्याच्या सवयच लोकांना लागून राहिलेली आहे. जुने मंदिर दिसले की हेमांडपंती मंदिर असल्याचे छातीठोकपणे लोकं सांगतात. देवगिरीच्या यादवांच्या काळातील वास्तुविशारद हेमाद्री पंडित अथवा हेमांडपंत यांनी मंदिर बांधण्याची एक विशिष्ट पद्धत निर्माण केली होती. त्या पद्धतीला हेमांडपंती शैली म्हणतात. चुन्याचा दर्जा न भरता घडीव दगडांवर दगड रचून तयार केलेली वास्तू हे हेमाडपंती मंदिरांचे वैशिष्ट्य मानले जाते. अंबरनाथचे हे मंदिर हेमांडपंती पद्धतीने बांधलेले असून कोकणात आढणाºया काळ्या दगडाला आकार देऊन ते कोरलेले आह़े

मंदिरासमोर प्रवेशद्वारापाशी दोन नंदी आहेत. मंदिरातील सभामंडपात चार खांब दिसून येतात. सभामंडपातील खांब म्हणजे कोरीवकामाचा उत्कृष्ट नमुनाच म्हणावा लागेल. मध्यभागावरील दगडी झुंबर त्याच्या भोवतालची वतुर्ळे, घुमटाकृती नक्षीकाम फारच सुंदर आहे. सभामंडपापासून दहा बारा पायºया खाली उतरल्यावर गाभारा दिसतो. गाभाºयात स्वयंभू शिवलिंग आह़े   गाभारा एखाद्या खोल विहिरीसारखा असून खाली उतरायला पायºया आहेत.
काळाच्या ओघात म्हणा किंवा परकीय आक्रमणांमुळे म्हणा मंदिराच्या अनेक मूर्ती आज भग्नावस्थेत आहेत. ऊन, वारा आणि पावसाने या मूर्ती झिजल्या आहेत. पण तरी सुद्धा ज्या मूर्ती वाचल्या आहेत ते शिल्पकलेचे अद्भूत दृश्य पाहून मन सुखावते. या मंदिरावर कोरलेली अनेक शिल्पे आजही या मंदिराच्या वैभवाची साक्ष देत आहेत.  मंदिरात श्रावणात मोठी गर्दी असते. राज्यातील विविध भागांतून दर्शन घेण्यासाठी भक्तांच्या रांगा येथे लागतात. येथील जत्रा तीन दिवस सुरू असते.
अजंठा वेरूळला जाणारे अनेक पर्यटक आहेत. मात्र, या प्राचीन मंदिराला भेट देऊन खरोखरच शिल्पकला प्राचीन काळी किती मोठी होती हे समजते.



प्रशासनाचे दुर्लक्ष :

सध्या हे मंदिर पुरातत्त्व विभागाच्या खात्यातंर्गत आहे. उल्हासनगर  पालिकेच्या जवळच असलेल्या या मंदिराचा आजुबाजूचा परिसर अजूनही विकसित झालेला नाही.  वालधुनी  ऊर्फ वढवाण नदीच्या ओढ्याच्या काठावर हे मंदिर आहे. सध्या या ओढ्याची सांडपाणी वाहून नेणारा मोठा ओढा म्हणून ओळख सांगितली जाते.
वाढलेल्या प्रदूषणाचा फटका या मंदिराला बसू नये म्हणजे झालं. त्यामुळे हा सांस्कृतिक ठेवा जपण्यासाठी सरकारकडून योग्य उपाययोजनांची गरज आहे. सध्या मंदिराला चारही बाजूने संरक्षक जाळी उभारली गेल्याने बाहेरील भटकी जनावरे आदींपासून संरक्षण नक्कीच मिळाले आहे. मात्र, शेजारून वाहणारी मोठ्या आकारातील गटारे पाहून मन दु:खी होते. या गटारात मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिक कचरा, व अन्य कचरा तसाच पडलेला दिसून आला. कल्याणपासून अंबरनाथपर्यंतचा रस्ता अतिशय छोटा असल्याने वाहतूककोंडी रस्त्यावर जाणवली. वाटेत मंदिरापर्यंत पोहचण्यासाठी कोणतेही मार्गदर्शक फलक दिसून आले नाही. तेव्हा वाटेत थांबून अनेकांना विचारून रस्ता शोधावा लागला.


कसे जावे :

  • मध्य रेल्वेच्या कल्याण स्थानकावरून पुण्याकडे जाताना अंबरनाथ हे तिसरे स्थानक आहे. येथे हे मंदिर आहे. रेल्वे स्थानकापासून अंदाजे दोन किलोमीटरवर हे मंदिर आहे.
  • मुंबई दादर स्टेशनपासून अंदाजे ५२ किमी. वर आहे. रेल्वेने गेल्यास १ तासाचे अंतर आहे.
  • पिंपरी-चिंचवडमधून अंदाजे १३५ किलोमीटरवर अंबरनाथ आहे. कळंबोली व शिळफाट्यामार्गे जाता येते. येथील कळंबोली फाट्यावरून जाताना असंख्य गतिरोधक असल्याने प्रचंड त्रास सहन करावा लागतो.

कॉपी करू नका