Thursday, August 15, 2013

अनोखे - श्री. कर्णेश्वर मंदिर

श्री. कर्णेश्वर मंदिर



सकाळी ९.३० ला चिपळूणच्या करंजेश्वरीचे दर्शन घेऊन पुढे संगमेश्वरला श्री कर्णेश्वराचे मंदिर पाहण्यासाठी निघालो. ‘आधि पोटोबा मग विठोबा’ म्हणून चिपळूणच्या काणे बंधूंच्या हॉटेलमधील मिसळ खाऊन संगमेश्वर पाहण्यास निघालो.
           चिपळूणपासून संगमेश्वर अंदाजे ४५ किलोमीटर अंतरावर म्हणजे साधारणपणे गाडी असल्यास १ तास लागतो. मुंबई-गोवा महामार्ग असल्याने रस्ता एकदमच छान  होता. वाटेत काही भाग सोडला तर रस्ता एकदम छान होता. वळणदार रस्ते, पाऊस पडून गेल्यामुळे सर्वत्र दिसणारी हिरवाई यामुळे हवेत एक छानसे आल्हाददायक वातावरण तयार झाले होते. ११ वाजता कसबा गावात आम्ही रस्ता विचारत विचारत पोहोचलो.
       कोकणची भूमी ही प्राचीन आख्यायिका आणि ऐतिहासिक घटनांची साक्षीदार आहे.  त्यात कोकणातील अनेक प्राचीन मंदिरे म्हणजे वास्तुकलेचे उत्तम नमुने. संगमेश्वर तालुक्यातून मुंबई-गोवा महामार्ग जातो. येथे  कसबा  नावाचे गाव आहे. या भागाला ऐतिहासिक महत्त्व आहे. औरंगजेबाच्या सरदारने छत्रपती संभाजीराजांना १६८२ मध्ये याच कसबा गावात अटक करून पुढे पुण्यातील तुळापूर येथे नेऊन त्यांची क्रूर हत्या केली.  कसबा गावाची आणखीन एक ओळख म्हणजे येथील पांडवकालीन श्री कर्णेश्वराचे हेमाडपंथी मंदिर. कसबा संगमेश्वर या गावांना फार पूर्वी ‘रामक्षेत्र’ असंही ओळखलं जात असे. मुंबई- गोवा महामार्गावर शास्त्री पुल ओलांडल्यावर डावीकडे कसबा नावाच्या या गावात हे कर्णेश्वराचे मंदिर आहे.  संगमेश्वरपासून दोन किलोमीटर अंतरावर अत्यंत रम्य परिसरात असलेले हे मंदिर स्थापत्यकलेचा अद्भूत अविष्कार आहे. भल्या मोठ्या दगडांना आकार देत अप्रतीम शिल्पकला साकारून हे मंदिर उभारण्यात आले आहे.
        संभाजीमहाराजांचा अर्धपुतळा कसबा गावात शिरल्या शिरल्या दिसतो. याच पुतळ्याच्या मागे जाणारा रस्ता आपल्याला कर्णेश्वर मंदिरापर्यंत घेऊन जातो. आम्ही चालत चालत निघालो. कारण जेमतेम एक गाडीच जाऊ शकेल एवढा बारीक रस्ता आहे. त्या रस्त्यावर बांधकामासाठी साहित्य घेऊन आलेला एक ट्रक उभा असल्याने गाडी पुतळ्याशेजारी लावून मंदिर पाहण्यास निघालो. पाच मिनिटातच मंदिरात पोहचलो. समोर मोठ्या आकारातील कर्णेश्वराचे मंदिर पाहून एकदम जुन्या काळात गेल्याचा भास झाला. अत्यंत सुंदर असे हे मंदिर प्रथम दर्शनीच मनमोहून टाकते. मंदिरात पोहचल्यावर डाव्या बाजूला छोटसे सूर्यमंदिर दिसले. मुख्य मंदिर पुढे असल्याने परत येताना दर्शन घेऊ असे ठरले. मंदिरात पोहचल्यावर ‘ओम नमो:शिवाय’ म्हणत एक पुजारी दिसले. त्यांना मंदिराबाबत विचारले असता त्यांनी मंदिरात कोरण्यात आलेल्या मूर्तींची विस्तारपूर्वक माहिती दिली.

मंदिर एक आख्यायिका अनेक

कर्णेश्वर मंदिराबाबत अनेक आख्यायिका सांगितल्या जातात. कोणी हे मंदिर पांडवांनी एक रात्रीत बांधले असते सांगतात. तर कोणी पांडवांनी आपला मोठा भाऊ कर्णाची आठवण राहावी म्हणून हे मंदिर बांधले असे सांगतात. भगवान परशुराम यांनी हे मंदिर बांधल्याची सुद्धा आख्यायिका आहे. वनवासात असताना पांडव परशूरामांकडे धर्नुविद्या शिकले. परशरामांनी सहावा मोठा भाऊ कर्णाबद्दल सांगितले. तेव्हा पांडवांनी कर्णेश्वर मंदिर बांधले असेही सांगितले जाते. या मंदिरांच्या वास्तुरचनेवरून सातव्या शतकातील चालुक्य घराण्यातील कर्ण नावाच्या राजाने हे मंदिर उभारले असे इतिहासतज्ज्ञ सांगतात. बाकी आख्यायिका काहीही असो. मंदिरावरील कलाकुसर पाहून मंदिर कोणी बांधले या पेक्षा ते कसे बांधले असेल याचा विचार करतानाच आश्चर्य वाटू लागते. कसबा गावात पूर्वी ३०० ते ४०० मंदिरे असल्याच्या नोंदी आहेत. सध्या यातील काही मोजकीच मंदिरे तग धरून आहेत.


श्री कर्णेश्वर मंदिराचा कळस.





कर्णेश्वर मंदिरातील ही गणेशाची छोटी मूर्ती.

विठ्ठल रुखुमाई व श्री गजानन


कोरीवकाम

कोरीवकाम

पालथे ताट :

          कर्णेश्वराचे मंदिर एका दगडातून कोरलेले भव्य देऊळ म्हणून प्रसिद्ध आहे. कर्णेश्वर म्हणजे महादेव. प्रत्येक प्राचीन मंदिराला काहीना काही आख्यायिका असते. अशीच एक आख्यायिका या मंदिराबाबत सांगितली जाते. पांडव वनवासात असताना त्यांनी कर्ण नावाच्या राजाच्या पणानुसार एका रात्रीत एका दगडातून हे देवालय कोरले. दमल्यावर ते जेवायला बसले असता पहाटे कोंबडा आरवला. पहाट झाल्याने जेवायचे कसे म्हणून ताटे पालथी टाकून उठले. या मंदिरात ५ दगडी पालथी ताटे  (पराती) कोरलेल्या आहेत. या ताटाखाली गुप्त धन परले असल्याचे सांगितले जाते. पांडवांनी त्या काळातील लिपीत दोन ओळी लिहून ठेवल्या आहेत. या ओळींचा अर्थ समजू शकल्यास ही पालथी पाने सुलटी होतील आणि त्या मनुष्याला ताटाखाली लपवलेले धन मिळेल. अंदाजे चार फूट लांबीची ही दगडात कोरलेली पाच ताटे आहेत. मंदिराला तीन दरवाजे असून, प्रत्येक दारात पालथे ताट आहे. एक ताट मंदिराच्या मध्यभागी असून, पांडवाच्या पाच ताटासोबत सहावे ताट कर्णाचे म्हणून ओळखले जाते आणि त्यावर शंकराची पिंडी आहे. त्यावर मोठे शिवलिंग आहे. गाभाºयात न बसता देखील गाभाºयाबाहेर बसून पिंड संपूर्ण दिसते. त्यामुळे ध्यानधारणा करण्यासाठी बाहेर देखील बसता येते.
        मंदिराला प्रमुख तीन दरवाजे आहेत. पूर्व दिशेला असलेल्या  मंदिराच्या प्रवेशद्वारावर 'शिवपंचायत' आहे. त्याच्या डाव्या बाजूस नरकासूर आणि उजव्या बाजूस कीतीसुर्राच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. या दोन राक्षसांचे शंकराबरोबर युद्ध झाले होते. त्या युद्धा पराजय झाल्यावर आपल्या पायाशी स्थान मिळावे असे या दोन राक्षसांनी शंकराकडे वर मागितला. तेव्हा शंकराने प्रसन्न होऊन त्यांना मंदिराच्या बाहेरील दरवाज्याच्या चौकटीत स्थान दिले. यांना पाय लावून हात येण्याची प्रथा आहे. प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूस सुंदर असे दशावताराचे शिल्प कोरण्यात आले आहे.  श्री विष्णूच्या दहा अवतारांपैकी मत्स्य, कूर्म, वराह, नृसिंह, वामन, राम, कृष्ण, परशुराम, बुद्ध, कलिंकी आदींची शिल्पे कोरलेली आहेत. संपूर्ण मंदिर मगरीच्या पाठीवर उभे असल्याचे मगरीच्या शिल्पावरून वाटते. शक्यतो महादेवाच्या मंदिरात गोमुखातून तीर्थ बाहेर येताना दिसते मात्र याठिकाणी मगरच्या शिल्पातून ही सोय केलेली आहे. कर्णेश्वर मंदिरा बाहेर गणेशाची छोटी मूर्ती आहे. ही मूर्ती पाहिल्यावर मला वाईतील महागणपतीची मूर्तीची आठवण आली. 


पालथे ताट

दरवाज्याजवळ पांडवांचे ताट म्हणून ओळखले जाणारे पालाथे ताट आहे. त्यावर बकुळीचे फुल कोरलेले आहे. ताटाच्या बाजूस पांडवांची आसने दिसतात. साधारणपणे चार फूट उंच असलेली आसने आहेत. मंदिराच्या मुख्य दरवाजाजवळ नंदीमंडप आणि दोन अष्टभैरव द्वारपाल आहेत. तेथून पुढे मंडप, मंदिराच्या छतावरची कोरीव शिल्प, सिंह, मुख्य छतातून झुंबराप्रमाणे दिसणारे कमलाकृती दगडी झुंबर, सभामंडपातील शिलालेख, शेषशाही विष्णूचे शिल्प कोरून ठेवलेली आहेत. मंडपात प्रवेश करताच नंदी आणि त्यानंतर शंकराची मूर्ती दिसते. मंडपाला एकूण चार खांब आहेत. विशेष म्हणजे हे चारही खांब एकसमान आहेत. दक्षिण दरवाज्याच्या मागे खांबावर शिलालेख आहे. मुख्य मंडपाच्या डाव्या हाताला श्री महालक्ष्मीची मूर्ती आणि उजव्या बाजूला शेषशायी विष्णूची मूर्ती आहे. येथील भगवान विष्णूचे शेषशायी शिल्प व दगडी झुंबर हे पाहण्यासारखे आहे.
मंदिरातील देव, दानव, नृत्यांगना, किन्नर, यक्ष-यक्षिणी, आदी मूर्तींचे कोरीव काम केलेले आहे. मंदिराच्या प्रत्येक प्रवेशद्वारावरील अलंकृत खांब, सुंदर नक्षीदार कोरलेले आहेत.  कर्णेश्वर मंदिराचा कोपरानकोपरा दगडी शिल्पकलाकुसरीने कोरलेला आहे. मंदिराच्या बाहेरील बाजूसही उत्तम कोरीवकाम केले असून शिल्पकलेचा अप्रतिम दर्शन मंदिर न्याहाळताना होते. मंदिराच्या मागील बाजूने एका ठिकाणाहून पाहिल्यास मंदिराच्या कळसाची रचना गोलाकार आकारात केलेली आहे. मंदिराच्या बाहेरील बाजूस ॐ कार आकारातील गणेश व पार्वतीची नृत्य करतानाची मुद्रेतील छान मूर्ती आहे. मंदिर आवारात उत्तर दिशेला सूर्यमूर्ती आणि समोरच्या बाजूस गणेशाचे मंदिर आहे. मंदिरापासून काही अंतरावरच अलखनंदा, वरुणा आणि शास्त्री नद्यांचा संगम पाहायला मिळतो. या नद्यांच्या संगमामुळेच 'संगमेश्वर' नाव प्रचलित झाले.  मंदिराबाहेर गणपती, पार्वती, महिषासुरमर्दिनी, नृसिंह, बलराम, हनुमान या देवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. तसेच मंदिरातील प्रत्येक खांबाला एकाच साच्यामधून काढल्याप्रमाणे नक्षीकाम आहे. मंदिराचे वैशिष्टय म्हणजे बांधकामामध्ये कोणत्याही धातूचा वापर केलेला नाही.
        कोकणातील अनेक मंदिरे म्हणजे वास्तुकलेचे उत्तम नमुने. काळाच्या ओघात मोठमोठ्या संस्कृती नष्ट झाल्या. नुकतेच श्री केदारनाथला महाप्रलय झाला. सुदैवाने मंदिर वाचले. पण प्राणहानी प्रचंड झाली.  आज जी काही प्राचीन मंदिरे महाराष्ट्रात आहे. ती अप्रतिम कलाकृतींनी साकारलेली आहे. प्राचीन कलाकृतींकडे पुरातत्त्व खात्याने लक्ष देणे गरजेचे आहे.  कोकणात अनेक ऐतिहासिक ठेवे आहेत. खरे तर हे बहुमूल्य ठेवे जपून ठेवायला हवे.  त्यामुळे हा प्राचीन वास्तुकलेचा खजिना टिकून राहील. कोकण सहलीत कर्णेश्वराचं मंदिर आवर्जून पाहायला हवे. मंदिराभोवती असलेली हिरवीगार  दाट झाडी, डोंगर, नद्या, शेती यांनी हा परिसर  बहरेला आहे.  महाशिवरात्रीला कर्णेश्वर मंदिरात मोठा उत्सव होतो.

छतावरची कोरीव शिल्प

नरकासूर आणि उजव्या बाजूस कीतीसुर्राच्या मूर्ती

शेषशायी विष्णूची मूर्ती.

श्री कर्णेश्वर

शंख आकारातील बकुळीची फुले

दरवाज्याच्या मागे खांबावर शिलालेख

ऐतिहासिक वारसा असलेले कसबा गाव

कसबा गावातच सरदेसाइंच्या वाड्यात संभाजीमहाराज आलेले असताना शत्रूला खबर मिळाली. याच ठिकाणी संभाजीमहाराजांना कैद करण्यात आले. महाराष्ट्राचा इतिहास ज्या जागेवर एक क्षणात बदलला त्या कसबात्यातील सरदेसाइंचा वाडा आज जमिनदोस्त झालेला आहे. येथील गावकºयांना विचारले असता वाड्याच्या काहीच खाणाखुणा शिल्लक असल्याचे त्यांनी सांगितले. काय दुर्देवी योगायोग म्हणावे लागेल की अलखनंदा, वरुणा आणि शास्त्री या नद्यांच्या संगमावर असलेले कसबा हे गाव. त्यावरून या भागाला संगमेश्वर म्हणू लागले. छत्रपती संभाजीमहाराजांना येथे पकडले गेले. तेथून पुढे पुण्याजवळील तुळापूरजवळील भीमा, भामा, इंद्रायणी या त्रिवेणी नद्यांच्या संगमाजवळ  त्यांचा क्रूर वध करण्यात आला. दोन्ही ठिकाणी तीन नंद्यांचा संगम झाला.


सुंदर असे दशावताराचे शिल्प

यक्ष-यक्षिणी मूर्तींचे कोरीव काम

श्री कर्णेश्वर मंदिराची माहिती सांगताना पुजारी.
मंदिराच्या कळसाची रचना गोलाकार आकारात केलेली आहे.

मंदिराच्या बाहेरील बाजूस ॐ कार आकारातील गणेश व पार्वतीची नृत्य करतानाची मुद्रेतील छान मूर्ती आहे.
श्री कर्णेश्वर 
मंदिराच्या बाहेरील बाजूस ॐ कार आकारातील गणेश व पार्वतीची नृत्य करतानाची मुद्रेतील छान मूर्ती आहे.



मगरीचे शिल्प.



बाहेरील बाजूसही उत्तम कोरीवकाम .



सूर्यमंदिर


श्री. कर्णेश्वर मंदिराचा परिसर

बाहेरील बाजूसही उत्तम कोरीवकाम.

बाहेरील बाजूसही उत्तम कोरीवकाम.

अलखनंदा, वरुणा आणि शास्त्री नद्यांचा संगम


आणखीन काय पहाल :

  • मुंबई-गोवा महामार्गालागूनच असलेल्या आरवली, राजावाडी आणि गोळवली येथील गरम पाण्याची कुंडे.
  • प्रसिद्ध मार्लेश्वराचे देऊळ येथून सुमारे ३५ कि. मी. अंतरावर आहे.
  • संभाजीमहाराजांची सासूरवाडी व मुख्य ठाणे असलेले श्रृंगारपूर हे देखील संगमेश्वरच्या जवळ आहे.

कर्णेश्वर देवस्थानाकडे जाण्याचा रस्ता :

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग (एन. एच. १७) वर चिपळूणहून संगमेश्वरकडे येताना संगमेश्वर  एस. टी. स्थानकाच्या २ कि.मी. अलीकडे शास्त्री पूल लागतो. पूल ओलांडल्यावर लगेचच डावीकडे वळून साधारणपणे दीड किलोमीटर अंतरावर कसबा गाव लागते. तिथे छत्रपती संभाजीमहाराजांचा अर्ध पुतळा आहे. त्या पुतळ्यामागे  काही अंतरावर हे मंदिर आहे. मंदिरापर्यंत चांगला गाडी रस्ता आहे. कर्णेश्वराच्या मंदिराचे दर्शन घेऊन परतीच्या मार्गास निघालो. परतीचा मार्ग चिपळूण, कुंभार्ली घाट मार्गे उंब्रज व तेथून सातारा व पुणे असा होता.


कुंभार्ली घाट

कुंभार्ली घाट चिपळूण-कराड-सातारा पुणे-बंगलोर शहरांना जोडतो. जागतिक वारसा स्थळांमध्ये नोंद झालेल्या पश्चिम घाटातील एक प्रमुख घाट म्हणजे कुंभार्ली घाट.  कोकण व घाटांना जोडणारा या  कुंभार्ली घाटात थंडगार पण आल्हाददायक वारे, धो-धो कोसळणारे धबधबे व  निसर्गरम्य असे ठिकाण आहे. जवळच असणाºया कोयना अभयारण्यामुळे या ठिकाणी प्रचंड झाडी आहे. कोयनानगर पोपळी जलविद्युत प्रकल्पामुळे हा परिसर नवारुपाला आलेला आहे.  महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात वीज उपलब्ध करून देण्याचे काम येथे केले जाते.  गर्द झाडीने हा भाग वेढलेला आहे.
        प्राचीन काळी मौर्य व मुघलांच्या पूर्वीपासून प्रमुख व्यापारी मार्ग म्हणून प्रसिध्द असलेल्या या कुंभार्ली घाटातून देशावरती येण्यासाठी रस्त्याचा वापर केला जाई. थंड हवेची ठिकाणे इंग्रजांना आवडायची यासाठी त्यांनी माथेरान, महाबळेश्वर, आंबोली अशा घाटातून जाण्यासाठी मार्ग शोधून काढले. हा घाट रस्ता सोनू नावाच्या धनगराच्या मदतीने इंग्रजांनी शोधून काढला. त्यानंतर त्याला मारण्यात आले. त्याची समाधी या ठिकाणी आपणास दिसते. एका वळणावर  हे स्थान आहे. प्रत्येक चालक येथे नमस्कार करून पुढे जातात. तसे प्रत्येक घाटामध्ये मंदिरे आहेत.
       कुंभार्ली घाटातून पुण्याकडे येण्यासाठी उंब्रजमार्गे रस्ता आहे. कराडकडे एक फाटा गेलेला आहे. हा संपूर्ण रस्ता मी आलो तेव्हा व यापूर्वीही अनेकवेळा खराबच होता. सकाळी १० ला चिपळूण सोडले होते. तेथून संगमेश्वरमधील कसाब्यातील कर्णेश्वर मंदिरात दुपारी १२ वाजता पोहोचलो. तासभर थांबून तेथून निघालो. परत चिपळूणमार्गे- कुंभार्ली घाट (दुपारी २.००) उंब्रजमार्गे - सातारा - पुणे (६.३०) असा २७० किलोमीटरचा प्रवास करून घरी परतलो.

या कर्णेश्वर मंदिराच्या लेखात काही त्रुटी आढळल्यास अथवा आपल्याला  

फेरफटका आवडल्यास येथे जरूर कळवा.

karneshwar

Wednesday, August 14, 2013

भगवान श्री परशुराम मंदिर


कोकणात जायचे म्हटले की प्रथम आपल्या डोळ्यांसमोर दिसतो तो अथांग असा समुद्र व त्याचा किनारा. परशुरामांनी  समुद्राला ४०० योजने मागे हटवून कोकण वसविले अशी आख्यायिका सांगतात.  कोकणातली अनेक पुरातन व प्राचीन मंदिरही प्रसिद्ध आहेत. त्यापैकीच चिपळुणजवळील एक  परशुराम मंदिर. महाराष्ट्रात परशुराम मंदिर आहेतच त्याशिवाय केरळ, आसाम, गुजरात व पंजाबमध्येही परशुराम मंदिर असल्याचे वाचण्यात आले. 


मुंबई - गोवा महामार्गावर असलेले श्रीक्षेत्र परशुराम हे कोकणातील एक प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. सप्तचिरंजीवांपैकी भगवान विष्णूंचा सहावा अवतार भगवान परशुराम म्हणून ओळखले जातात. मनुष्यदेहातील चिरंजीव अवतार म्हणून परशुराम ओळखले जातात. चिपळूणपासून सुमारे ७ कि.मी. अंतरावर महेंद्रगिरी डोंगराच्या कुशीत असलेले हे परशुरामांचे मंदिर. या क्षेत्राला दक्षिण काशी असेही म्हणतात. परशुराम हे जगदग्नी ऋषी व रेणुका माता यांचे चिरंजीव. परशुरामांचे मूळ नाव राम. त्यांनी हातात परशू धरला म्हणून ते परशुराम. तसेच भृगू कुळामध्ये जन्माला आले म्हणून त्यांना भार्गवराम नावाने हे ओळखले जाते.
या मंदिराचे वैशिष्ट्य असे सांगितले जाते की हे मंदिर प्रथम विजापूरच्या अदिलशहाने बांधले. त्यानंतर ३०० वर्षांनी श्री.ब्रह्मेंद्र स्वामींच्या सांगण्यावरून जंजिराच्या सिध्दिने मंदिराचा जीर्णोद्धार केला. काही कारागिर ख्रिस्ती होते. त्यामुळे मंदिरावर हिंदु, मुस्लिम व ख्रिस्ती स्थापत्यकलेचा अंमल दिसतो. मंदिराचे घुमट सरळ उतार असलेले अष्टकोनाकृती आहे.
परशुरामांच्या जन्मोत्सानिमित्त कीर्तन, भजनाचे कार्यक्रम येथे ठेवले जातात. अक्षयतृतीयेस येथे मोठा उत्सव असतो.

गोगलगाय अन् पोटात पाय


परशुराम मंदिराकडे जाणारी वाट


परशुरामांचे मंदिर
मंदिराकडे जाण्याच्या पायºयांचे बांधकाम जांभा दगडातून करण्यात आलं आहे. चिपळूणला पायी जाता यावे म्हणून यासाठी चार किलोमीटर लांबीचा एक रस्ता आहे. जावळीचे सरदार चंद्रराव मोरे यांनी हा रस्ता बांधला त्याला 'पाखड्या' म्हणतात. मंदिर परिसरात एक छोटी कमान व एक उंच दगडी जांभा दगडातून तयार केलेली दीपमाळ दिसते. मंदिर परिसरात एक तलाव देखील आहे. त्याच नाव आहे बाणगंगा. परशुरामांनी पाच बाण मारून भूमीच्या पोटातले पाणी वर आणले ते बाणगंगा हे तीर्थकुंड प्रवेशद्वाराशेजारीच आहे.   परशुरामाची आई रेणुकामातेचं मंदिरही इथे आहे.

रेणुका मातेचे मंदिर : 

श्री परशुराम मंदिराच्या मागे रेणुकामातेचे हेमाडपंती पद्धतीचे मंदिर आहे.  रेणुकादेवीच्या हातात गदा, डमरू, पानपात्र आणि शिर अशी शस्त्रे आहेत. हे शिर सहस्रार्जुन दैत्याचे आहे, असे मानतात. मंदिर १२८५ च्या सुमारास यादवसम्राट रामचंद्र यांच्या संगमेश्वर-खेड विजयानंतर बांधण्यात आल्याचे येथील जाणकार सांगतात. मंदिरावर अनेक वेळा मुस्लिम आक्रमणे झाली. त्यामुळे  इ.स. १६९८ मध्ये ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला.  प्राचीन काळी दक्षिण भारतामधून हजला जाणारे मुसलमान मक्केला जाण्यासाठी दाभोळ या बंदराचा उपयोग करीत. प्रवासाला निघण्यापूर्वी परशुरामाला ते नवस करीत असत.
परशुराम मंदिराचा परिसर मोठा रम्य व शांत आहे. येथून चिपळूणचा परिसर मोठा सुरेखा दिसतो. आम्ही दर्शन घेऊन इथलं निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी बºयाच वेळ थांबलो. हे निसर्गरम्य ठिकाण पाहण्यासाठी खास वेळ काढून यायला हवे. इथलं शांत वातावरण आणि अप्रतिम निसर्गसौंदर्य मन मोहवून टाकतं. उंचावरुन वशिष्ठ नदीचे मोठे पात्र दिसते. जवळच चिपळूणकडे जाताना दोन किलोमीटरवर सवतसडा नावाचा मोठा धबधबाही आहे.



जांभ्याच्या दगडातील दीपस्तंभ






मंदिरातून चिपळूणकडे जाण्यासाठी निघालो. वाटेत विसावा पॉर्इंटला काही काळ थांबलो.

विसावा पॉइंट

विसावा पाइंट वरून दिसणारे वशिष्ठी नदीचा परिसर

मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्ग क्र. १७  वर चिपळूण शहरापासून अंदाजे ८ किमीवर निसर्गरम्य असा हा विसावा पॉईंट आहे.  परशुराम घाटातील एक अवघड, व अपघाती वळणावर हा पाँईट आहे. त्यामुळे आपोआपच निसर्गाचे दर्शन घेण्यासाठी प्रत्येकजण येथे आपले वाहन हळू करून काही काळ येथील निसर्गाचे दर्शन घेतो. जवळच परशुरामाचे प्राचीन मंदिर आहे. या पॉईंटवरून चिपळूण शहराचे  दर्शन घडते. जवळच असलेला गोवळकोट  किल्ला व वाशिष्ठी नदीचे विस्तीर्ण पात्राचे मनोहारी दृश्य आहे. वाशिष्ठी दर्शन पॉईटला विसावा पॉईट असेही म्हणतात. वशिष्ठ नदीची लांबी ३० किलोमीटर असली तरी तिचे पात्र मोठे आहे. या पाँईटपासून जवळच प्रसिद्ध असा सवतसडा नावाचा धबधबा आहे. वेळ कमी असल्यामुळे मला त्याचे दर्शन फक्त रस्त्यावर थांबून घ्यावे लागले.

चिपळूण - 

वाशिष्ठी नदीच्या काठावर असलेले चिपळूण हे गाव. पावसाळ्यात वशिष्ठ नदी आपले पात्र सोडून चिपळणू शहरात घुसते. याच्या बातम्या टिव्हीवर पाहण्यास मिळतात. चिपळूणला सवतसडा, गोवळकोट किल्ला, विंध्यवासिनीचे मंदिर, करंजेश्वरी देवीचे मंदिर आदी ठिकाणे पाहण्यासारखी आहे. सुमारे ३० ते ३५ किलोमीटरवरील डेरवण येथील शिवसृष्टीचा खजिना मूर्तीस्वरूपात आपल्याला पाहायला मिळतो.
विसावा पॉर्इंटवरून १५ मिनिटातच चिपळणूच्या करंजेश्वर देवी मंदिराकडे जाण्यासाठी निघालो.




करंजेश्वरी देवी



चिपळूण हे मुंबई-गोवा हायवेवरील एक प्रसिद्ध ठिकाण आहे. चिपळुणला परशुरामाचे प्राचीन मंदिर आहे. निसर्गरम्य कोकणात भगवान परशुरामांच्या भूमीत वाशिष्ठी नदीच्या तिरी गोविंदगडाच्या पायथ्याशी गोवळकोट येथे श्री देव सोमेश्वर व देवी करंजेश्वरीचे भव्य मंदिर आहे. अनेक कोकणस्थ लोकांची कुलस्वामिनी म्हणून करंजेश्वरी देवी प्रसिद्ध आहे. चिपळूणपासून जवळ सुमारे ४ किलोमीटरवर असलेल्या गोवळकोट किल्ल्याच्या पायथ्याशी हिचे मुख्य स्थान असून मंदिर अतिशय सुंदर व निसर्ग रम्य परिसरात आहे . पटवर्धन, दीक्षित आडनावाच्या लोकांची ही कुलदेवता आहे. तर गुहागर येथील व्याडेश्वर कुलदैवत आहे.
आज शनिवार असूनही देखील कमी भाविक आले होते. त्यामुळे सहजच भक्तनिवासातील जागा राहण्यास मिळाली. बरोबरचे आणलेले सामान खोलीमध्ये ठेवले. देवीचे दर्शन घेण्यासाठी गेलो.

कथा

करंजेश्वरीचा शिमगोत्सव प्रसिद्ध आहे. नवरात्रोत्सवात येथे मोठी गर्दी असते.   जागृत व पवित्र देवस्थान म्हणजे श्री देवी करंजेश्वरी. शहरातील पेठमाप गोवळकोट भागातील ग्रामस्थांचे हे ग्रामदैवत आहे. पूर्वीच्या काळी एका करंजीच्या झुडपात ही देवी प्रकट झाली. म्हणून तिला करंजेश्वरी असे नाव पडले. ती ज्या झुडपात प्रकाट झाली, तेथील जागेला शिंगासन असे म्हटले जाते. प्रकट झाल्यानंतर देवीने एका कुमारिकेला हळद-कुंकू आणण्यास सांगितले. कुमारिका हळदी-कुंकू आणण्यास गेल्यानंतर देवी अदृश्य झाली. ती पुन्हा गोवळकोट येथे प्रकट झाली. नंतर एका भक्ताच्या स्वप्नात येऊन तिने सांगितले की, करंजीच्या झुडपात नाकातील मोती अडकला आहे. तो घेऊन या. त्यानुसार तेथे मोती सापडला. ही घटना ३०० ते ३५० वर्षांपूर्वीची आहे, असे सांगितले जाते. त्यामुळे या देवीचे कुलभक्त आजही करंजीचे तेल वापरत नाहीत.
 मराठ्यांचे आरमारप्रमुख तुळाजी आंग्रे यांनी गोविंदगड असे किल्ल्याचे नाव ठेवले. किल्ल्यात सध्या वस्ती नाही. सागराकडून येणारा व्यापारी मार्ग या खाडीतून येत असल्याने चिपळूणला बंदर म्हणूनही महत्त्व प्राप्त झालेले होते. या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी खाडीच्या मुखावर अंजनवेलचा गोपाळगड तर खाडीच्या आतील भागात चिपळूणचा गोवळकोट हा किल्ला उभारला गेला. पूर्वी एकदा या किल्यावर गेलो होतो. त्यावेळी  कॅमेरा उपलब्ध नसल्यामुळे सध्या तरी एवढीच माहिती. गोवळकोट खाली बहुतांश मुस्लिम समाज आहे. उत्सवात सोमेश्वर व करंजेश्वरीच्या पालख्या मशिदीजवळ जातात. तेथे मुस्लिम समाजातील मानकºयांच्या हस्ते देवीची पूजा केली जाते. त्यानंतर होळी लावली जाते. नवसाला पावणारी देवी असा करंजेश्वरीचा लौकिक आहे. येथे राहण्याची सोय आहे. फक्त नवरात्रात जागा उपलब्ध आहे की नाही याची चौकशी करूनच मुक्कामाला जायला हवे. शक्यतो नवरात्रात जागा मिळणे कठीण असते.

रात्री मुक्काम करून सकाळी श्री कर्णेश्वर मंदिर पाहण्यास निघालो. त्या विषयी....  लवकरच


कसे पोहोचाल :

मुंबई गोवा महामार्गावर चिपळूण हे मोठे स्थान आहे. एसटीने येथे जाता येते. येथून मंदिराचा रस्ता चिपळूण बाजारपेठेतून जातो. चिपळूणपासून सुमारे ४ किलोमीटरवर करंजेश्वरी देवीचे मंदिर आहे.

काही अंतरे :

पिंपरी ते रायगड : १३७ किलोमीटर  (ताम्हिणी घाटातून)
रायगड त चिपळणू : ११३ किलोमीटर (महाडमार्गे)
पिंपरी ते चिपळूण : २५३ किलोमीटर (कुंभार्ली घाटातून)
चिपळूण ते गुहागर : ४५
चिपळूण ते परशुराम मंदिर : १३
चिपळूण ते संगमेश्वर : ४६
गुहागर ते हेदवी : २१
गुहागर ते वेळणेश्वर : १८
संगमेश्वर ते मार्लेश्वर : ४० किलोमीटर

  कसे जाल : 


  • मुंबई-गोवा महामार्गावर श्री परशूराम मंदिराची स्वागत कमान आहे. 
  • चिपळूणच्या अलिकडे मुंबईच्या दिशेला सुमारे ७ किलोमीटरवर हे स्थान आहे. 
  • या मंदिरापर्यंत वाहनं जाऊ शकतात. एक रस्ता पायºयांनी उतरण्यासाठी तर शेजारचा रस्ता गाडीने मंदिरापर्यंत जातो. 

Tuesday, August 13, 2013

ताम्हिणी घाट


१०/८/२०१३
बरेच दिवसांपासून कुठे तरी लांब हिंडण्याचा मनोदय होता. पाऊस  उघडला होता. त्यामुळे लांब कुठेतरी हिंडून येण्याचे पक्के केले. चिपळुणला आमचे  कुलदैवत श्री. करंजेश्वरी आहे. तिचे दरवर्षी दर्शन  घेण्यासाठी आम्ही नवरात्रात जातो. मागील वर्षी काही कारणामुळे राहून गेले होते. यावर्षी लवकरच दर्शन घेण्यासाठी निघालो. ताम्हिणी घाटातून रायगड, चिपळूण, श्री. परशुराम मंदिर, विसावा पाइंट व नंतर संगमेश्वर येथील श्री. कर्णेश्वर मंदिर व परत येताना कुंभार्ली घाटातून परत घरी असा दोन दिवसांचा प्रवास केला. त्या विषयी....
(४ ते ५ ठिकाणे असल्यामुळे एकदम सर्व प्रवास वर्णन करणे शक्य नव्हते. फोटो सुद्धा बरेच काढले असल्यामुळे दोन वेगळे भाग करून प्रवास वर्णन करत आहे.  सध्या फक्त ताम्हिणी घाट व रायगड रोपेवे मधून रायगड हे वर्णन देत आहे. लवकरच श्री. करंजेश्वरी देवी, परशुराम मंदिर व श्री कर्णेश्वर याचा भाग लिहितो.)

कोकणात जाण्यासाठी पुण्याहून ताम्हिणी घाट, कुंभार्ली घाट, महाबळेश्वर मार्गे पोलादपूर, वरंधा घाट हे गाडी रस्ते आहेत. तसे पानशेतधरणाच्या पाठीमागून, तसेच सह्याद्रीच्या अनेक खिंडीतून पायी कोकणात उतरणारे रस्ते आहे. चिपळणूमधील करंजेश्वरी आमची कुलस्वामिनी दरवर्षी नवरात्रात देवीचे दर्शन घेण्यासाठी आम्ही नेमाने जातो. जाताना रायगड किल्ला पाहण्याचा विचार नक्की केला. 


ताम्हिणी घाटातून जाणारा रस्ता.



सकाळी घरातून तयारी करून ७ वाजता निघालो. काळेवाडी, हिंजवडीमार्गे घोटावडे व तेथून पौड मार्गे ताम्हिणी घाटात पोहोचलो. येथपर्यंतचा रस्ता चांगलाच खराब आहे. त्यामुळे सकाळचे ९.०० वाजले. शनिवार-रविवार असून  देखील हौशी पर्यटकांची गर्दी नव्हती. त्यामुळे ट्रॅफिक जॅमचे प्रकाराचा अनुभव आला नाही. पाऊसाची हलकिशी रिमझिम सुरू होती. ताम्हिणी घाटच्या एका बाजूला दरी व दुसºया बाजुला डोंगर आहेत.  वाटेत गरुडमाची म्हणून पाहणेसारखे निसर्गरम्य ठिकाण आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधून कोसळणारे धबधबे, खळखळून वाहणारे ओढे, डोंगरांवरती आच्छादून टाकणारे ढग, ताम्हिणीचा घाट, समोरच्या डोंगरातून जाणारी एसटी, रस्त्यावरील पांढरे शुभ्र दाट धुके, हिरवाईने वेढलेले डोंगर हे  मनोहरी दृश्य मनात साठवून ताम्हिणीचा घाट सोडला. घाट माथ्यावर पोहोचलो व वातावरण स्वच्छ झाले होते. पाऊस सुद्धा थांबला होता.

ताम्हिणी घाटातून जाणारी एसटीची बस. 

पुण्याहून ताम्हिणी घाट लांब नाही. हा प्रवास करणे चांगला असला तरी तितकाच धोकायदायकही आहे. वळणवळणाचा रस्ता असल्याने नवशिक्या चालकांनी गाडी न चालविलेलीच बरी. घाटातील वळणावळणाचा रस्ता असल्यामुळे वेळ जास्त लागतो.  दुर्मिळ औषधी वनस्पती व जीवसृष्टी इथं खूप प्रमाणात  आहे. त्यामुळे ताम्हिणी घाटाला महाराष्ट्र शासनाने अभयारण्याचा दर्जा दिला आहे. बिबट्या,  शेकरू, सांबर, गिधाड या वन्यजीवांचं अस्तित्व इथं आढळतं.
ताम्हिणी घाटातून रायगड पाहण्यासाठी निघालो.
(रायगड पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा.)
ताम्हिणी घाटातील धो-धो कोसळणारे धबधबे.






घाटात कसे जायचं  : 


  •  पुण्याहून जायचे झाल्यास पिरंगुट, पौड, मुळशी मार्गे ताम्हिणी घाट. (काही रस्ता खराब +आहे.) 
  • पिंपरी-चिंचवडमधून जायचे झाल्यास हिंजवडी, माण, घोटावडेमार्गे पौड, मुळशीधरणा मार्गे ताम्हिणी घाटात जाता येते. (काही रस्ता खराब आहे.) 
  • मुंबईतून ताम्हिणीला जायचं असेल तर दोन मार्ग आहेत
  • पहिला मार्ग मुंबई-पुणे महामार्गावरून लोणावळा गाठावे. तेथून अ‍ॅम्बी व्हॅलीवरून मुळशी धरण व पुढे ताम्हिणी घाट. (काही रस्ता खराब आहे)
  • दुसरा रस्ता म्हणजे मुंबई-गोवा महामार्गावरून कोलाड तिथून ताम्हिणी घाट. कोलाडपासून ताम्हिणी घाट अंदाजे ६० किलोमीटर अंतरावर आहे. 
  • ताम्हिणी घाटात जाण्यासाठी एसटीचीही सोय आहे. पुण्याहून ताम्हिणी घाट मार्गे कोकणात जाणाºया कोणतीही एसटी या मार्गावरून जाते. 


अजून काही पाहण्यासारखे 


  • प्लस व्हॅली.
  • मुळशी धरणाच्या बाजूने कैलासगड, घनगड, तैलबैला हे किल्ले दिसतात.
  • मुळशी धरण, पिंपरी व्हॅली व पिंपरी तलाव ही पाहण्यासारखे आहे. 
  • हल्ली कोलाडच्या जवळून वाहणाºया कुंडलिका नदी वर रिव्हर राफ्टिंग चा अनुभवू घेता येऊ शकतो. 
  • ताम्हिणी घाटातून घनगड, तेलबैला किल्ल्यांना भेट देता येते. 

कॉपी करू नका