Monday, December 7, 2015

श्रीमंत बाजीराव पेशवे - एक अजेय योद्धा

             गणपती दर्शनासाठी पुण्यात गेलो होतो. पुण्यातील शनिवारवाड्याजवळून जात असताना माझ्या लहान मुलाने बाजीरावांच्या घोड्यावरील स्वार झालेल्या पुतळ्याकडे लक्ष वेधून विचारले, ‘‘बाबा हा शिवाजी का?  मी नाही म्हणताच मग कोण?  बाजीराव पेशवे म्हटल्यावर ते बाजीराव ‘सिंघम’ का? असा उलट प्रश्न त्याने केला. तो लहान असल्याने मी जास्त लक्ष दिले नाही. सध्याच्या पिढीला बाजीराव  सिंघम माहिती आहे मात्र, बाजीराव पेशवे माहिती नाही. मुलाला इतके दिवस आपण शनिवारवाडा कसा दाखविला नाही याचे मलाच आश्चर्य वाटले. गणपती पाहायला वेळ होता. तेव्हा तासाभरात शनिवारवाडा दाखवू असे ठरवून मुलाला शनिवारवाडा दाखवून आणला.  त्यानिमित्ताने का होईना मीही बºयाच वर्षांनी शनिवारवाडा पाहणार होतो. लहान असताना शनिवार पेठेतील आजी व मावशीकडे गेलो की मी, माझे मावसभाऊ असे सारेजण शनिवारवाड्यात लपाछपी खेळायला जायचो. मजा यायची.
      
मराठ्यांच्या भरभराटीचा व अस्ताचा साक्षीदार ठरलेला ‘शनिवारवाडा’. पुण्यात शनिवारवाड्यासमोर घोड्यावर बसलेला, हातात भाला घेऊन शत्रूच्या उरात धडकी भरणारा आवेशपूर्ण असा पुतळा दिसतो. बºयाच लोकांना (पुण्याच्या नव्हे) हा पुतळा कोणाचा समजत नाही. पुण्याच्या वाढत्या इमारतींच्या साम्राज्यात आपले जुने अस्तित्व टिकून राहिलेला हा शनिवारवाडा म्हटले की आठवण होते  बाजीरावांची. शत्रूच्या उरात धडकी भरणारा हा यौद्धा आपल्या अतुल पराक्रमामुळे अजय ठरला. बाजीरावांविषयी अनेक कथा, कादंबºया, ऐतिहासिक पुस्तके लिहिली गेली. त्यातील मी वाचलेली काही ऐतिहासिक पुस्तकांतील संदर्भ घेऊन बाजीरावांविषयी काही मुद्दे मांडण्यासाठी हा लेख प्रपंच. ‘ध’ चा ‘मा’ झाल्यास जरूर कळवा.


             ‘अ मॅन हू नेव्हर लॉस्ट अ बॅटल’ असं ज्याचं वर्णन केलं जातं. ज्यानं कधी पराभव पाहिला नाही, ज्यानं आपल्या मनगटाच्या जोरावर अनेक युद्ध जिंकली, दिल्ली काबीज केली. ज्याच्या पराक्रमामुळे इराणपर्यंतच्या पातशाह्या हादरल्या त्या जगातल्या एकमेव, अजेय, अपराजित यौद्धाचे नाव म्हणजे ‘बाजीराव’. उत्तम संघटनकौशल्य असलेला हा पराक्रमी यौद्धा. मराठेशाहीला नर्मदेच्या पलिकडे मराठी घोडदळ नेणारा हा पहिलाच सेनापती.  बाजीरावांनी दिल्लीपर्यंत धडका मारून मराठ्यांचा दरारा निर्माण केलेला होता.

बाळाजी विश्वनाथ भट : (पेशवे)

              बाळाजी विश्वनाथ भट हे  मुळचे कोकणातील श्रीवर्धनचे. त्यांचा घराण्याकडे दंडाराजपुरी व श्रीवर्धन परगण्यांची देशमुखी साधारण १४०० सालापासून होती. दंडाराजपुरी तेथून जवळच जंजिरा त्यामुळे साहाजिकच सिध्दीच्या त्रासाला कंटाळून बाळाजी देशावर आले. ताराबाई राजारामाची कर्तबगार पत्नी. राजारामाच्या मृत्यूनंतर आपला मुलगा शिवाजीस गादीवर बसून पराक्रमाने ७ वर्ष औरंगजेबाबरोबर झुंज दिली. ताराबाई महाराणींचे  सेनापती धनाजी जाधव यांचेकडे बाळाजींनी चाकरी केली. ताराबार्इंना शह देण्यासाठी औरंगजेबाच्या मृत्युपश्चात मोगलांनी शाहू महाराजांना १७०७ ला  कैदेतून सुटका केली. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली. शाहू महाराज व ताराबाई यांच्यामध्ये स्वराज्याच्या राजगादीसाठी संघर्ष सुरु झाला. छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र म्हणून शाहू महाराजांना अनेक मातब्बर सरदारांचा पाठिंबा होता. ताराराणींचा पक्षाही मजबूत होता. शाहूमहाराज दिल्लीवरून साताºयास येण्यास निघाले. वाटेत खानदेशात ते आले. तेथे धनाजी जाधव, खंडेराव दाभाडे, शंकराजी नारायण सचिव यांना शाहूमहाराजांनी पत्रव्यवहार करून बोलावून घेतले. त्यासाठी बाळाजी भटांना बरोबर घेऊन जाधवराव शाहूमहाराजांनी भेटले. पुढे शाहूमहाराज साताºयास आले. बहिरोपंत पिंगळे हे त्यांचे पेशवे होते. त्यांच्याकडे लोहगड व राजमाची किल्ला होता.  मराठ्यांच्या आरमाराचे प्रमुख कान्होजी आंग्रे हे ताराबार्इंच्या पक्षातील. आंग्रेनी शाहू महाराजांच्या बहिरोपंत पेशव्यास तसेच निळो बल्लाळ या चिटणीसास राजमाची किल्यात कैद करून पुण्याजवळील असलेले लोहगड, राजमाची किल्ले ताब्यात घेतले होते.  त्यावेळी बाळाजी विश्वनाथ फौज घेऊन लोहगडाजवळ आले. आंग्रे ओळवण (सध्याचे वळवण) येथे त्यांना भेटले. कोकणातील असल्यामुळे बाळाजी विश्वनाथ आणि कान्होजी आंग्रांचे जवळचे संबंध होते. अांग्रे यांनी समंजसपणा दाखवून वाद मिटविला. पिंगळे यांच्यावर शाहूमहाराज नाराज झाले होते.  त्यांना दूर करून पेशवाई दुसºयाला देण्याचा त्यांचा विचार झाला. खानदेशातून महाराज साताºयास येत असताना बाळाजी विश्वनाथ त्यांच्याबरोबर होते. त्यांच्यातील कर्तेपणा पारखून महाराजांनी २७ नोव्हेंबर १७१३ रोजी पेशवे पद बाळाजींना बहाल केले. आपल्या मनमिळावू स्वभावामुळे महाराष्ट्रातील सर्व पराक्रमी सरदांना शाहूमहाराजांच्या बाजूने वळवून घेतले.  पुढे बाळाजींनी दिल्लीपर्यंत स्वारी केली व सासवड येथून आठ वर्षापर्यंत कारभार सांभाळला. बाळाजी पेशवे १२ एप्रिल १७२० ला सासवड मुक्कामी अल्पशा आजाराने मरण पावले.
श्रीशाहूनरपति हर्षनिधान ॥ बाळाजी विश्वनाथ मुख्यप्रधान ॥
अशी बाळाजींची मुद्रा होती.

‘पेशवे’पद

             पेशवे हे शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील एक महत्वाचे पद - ‘पेशवे’ पेशवे म्हणजे पंतप्रधान. शिवाजीमहाराजांच्या राज्याभिषेकावेळी मोरोपंत पिंगळे पंतप्रधान होते. बाळाजी पेशव्यांच्या मृत्यूनंतर शाहू महाराजांच्या दरबारात पेशवे पदावरून वाद वाढू लागले.  दरबारातील श्रीपतराव व अष्टप्रधानांनी हे पद (पेशवे) कोकणस्थांमध्ये न देण्याचा आग्रह धरला. पण शाहूमहाराजांनी स्वराज्याचा पेशवा म्हणून बाळाजी विश्वनाथ भट यांचा पुत्र विसाजी अर्थात बाजीराव यास पेशवे पद देण्याचे नक्की केले. बाजीरावांना पेशवे पद हे वंश परंपरेतून मिळाले नव्हते तर बाजीराव हा तरुण, युद्धनिपुण होता. तसेच बाळाजी विश्वनाथांबरोबर सतत राहिल्याने बाजीरावांना युद्धाचा तसेच राजकाराणाचा अनुभव प्राप्त झाला होता. म्हणून शाहू महाराजांना तोच पेशवे पदासाठी योग्य वाटला. १७ एप्रिल १७२० ला शाहूमहाराजांनी पेशवाईची वस्त्रे बाजीरांवाना बहाल केली. बाजीराव त्यावेळी केवळ २० वर्षांचे होते.




  जन्म   :  इ.स. १८ ऑगस्ट १७००     मृत्यू    :  इ.स. २८ एप्रिल १७४०

श्रीमंत बाजीराव पेशवे :

         बाळाजी विश्वनाथ भट यांचा बाजीराव हा मोठा मुलगा. तर चिमाजी आप्पा धाकटा. आईचे नाव राधाबाई. बाजीरावांचे मूळ नाव विसाजी. मात्र, बाजीराव बल्लाळ व थोरला बाजीराव या नावानेही प्रसिद्ध होते. वयाच्या तेराव्या काशीबाई नावाच्या मुलीशी त्यांचा विवाह झाला (१७१३). बाजीरावांना चार मुलगे झाले. त्यांपैकी नानासाहेब व रघुनाथराव हे पुढे प्रसिद्धीस आले. दुसरी पत्नी मस्तानीस समशेर बहाद्दूर नावाचा मुलगा झाला. समशेर बहाद्दूर पुढे पानिपतच्या लढाईत (१७६१) ठार झाला. आपल्या अवघ्या २० वर्षांच्या कारकीर्दीत बाजीरावांनी ४० महत्त्वाच्या लढाया केल्या.  त्यात माळवा (डिसेंबर १७२३), धर (१७२४), औरंगाबाद (१७२४), पालखेड (फेब्रुवारी १७२८), अहमदाबाद (१७३१) उदयपुर (१७३६), फिरोजाबाद (१७३७), दिल्ली (१७३७), भोपाळ (१७३८), वसईची लढाई (मे १७३९) या  मोठ्या लढायांचा समावेश आहे आणि विशेष म्हणजे सर्व लढायांमध्ये ते अजिंक्य ठरले.
             बाजीरावांना हरवणं त्याच्या काळातल्या शत्रूंनाही जमलं नाही.  मराठेशाहीला नर्मदेच्या पलिकडे मराठी घोडदळ नेणारा हा पहिलाच सेनापती. चारशे वर्षांच्या यवनी अंमलानंतर दक्षिणेतून जाऊन दिल्ली काबीज करणारा बाजीराव हा पहिलाच.  दिल्लीपर्यंत धडका मारून मराठ्यांचा दरारा निर्माण केलेला होता. भीमथडीची तट्टे नर्मदेपार नेल्यामुळे उत्तरेकडचे काबुली घोडे दक्षिणेत येण्याचे बंद झाले.  बाजीरांवानी उत्तरेत घुसून गुजरात, माळवा, बुंदेलखंड जिंकून नर्मदा आणि विंध्य पर्वत यातील सर्व महत्त्वाचे व्यापारी मार्ग आपल्या ताब्यात घेतले. भविष्यात महाराष्ट्रावर परकीय संकट कोसळू नये म्हणून महाराष्ट्राच्या बाहेर आपली सत्ता असायला हवी हे जाणून बाजीरावाने उत्तरेत शिंदे, होळकर, बांडे, पवार हे मराठा सरदार उभे केले. त्यामुळे ग्वाल्हेर, इंदौर, देवास आदी संस्थानं पुढे आली.
             बाजीरावांची देशभर मोठी दहशत होती. १७३९ मध्ये इराणचा बादशाह नादिरशाह याने दिल्लीवर आक्रमण केलं तेव्हा बाजीराव दिल्लीकडे निघाला. ‘बाजीराव निघालाय’ या एवढ्या बातमीनेच नादिरशाह याने दिल्ली सोडली आणि तो परतला.  पराक्रमासाठी आणि विजयासाठी ‘बाजी’ हा शब्दप्रयोग तेव्हापासून रुढ झाला असावा.   बाजीरावाने शनिवारवाडा बांधला आणि साताºयाच्या राजगादी इतकेच महत्त्व पुण्याला मिळवून दिले.
॥ श्रीशाहूनरपति हर्षनिधान बाजीराव बल्लाळ मुख्यप्रधान॥
अशी बाजीरावांची मुद्रा होती.

कुशल सेनापती

            बाजीरावाच्या युद्धकौशल्याची जाणीव आपल्याकडे नाही. पण अमेरिकन लष्कर आजही ती जाणीव ठेवून आहे. लष्करी डावपेच आणि रणनीतीच्या अभ्यासक्रमात आजही बाजीरावाने निजाम-उल-मुल्क याच्याविरुद्धची  १७२८ मध्ये पालखेड इथे केलेली लढाई अमेरिकन सैनिकांना शिकवली जाते. त्यासाठी पालखेडचं कायमस्वरूपी मॉडेलच तयार केलं गेलेलं आहे. बाजीरावाने निजामाला पूर्ण पराभव करण्यासाठी त्याला पालखेडच्या कात्रीत कसं पकडलं याचा ‘स्ट्रॅटेजिक वॉरफेअर’च्या अभ्यासाचा भाग म्हणून आजही सांगितलं जातं. बाजीराव शत्रूला स्वत:च्या स्थळी आणून मात देत असे. मैदानात अनुकूल परिस्थिती नसेल तर वाट पाहून कसलेल्या शिकाºयाप्रमाणे हमला करायचा. कदाचित पुढील काळात या युद्धतंत्राचा विसर पडल्यामुळे ‘पानिपता’सारखा प्रसंग ओढावला.  बाजीराव हे मोठे युद्धनीतीज्ञ होते.  म्हणूनच ते अजेय राहिले. त्यांच्या कारकीर्दीतली एकही लढाई ते हरले नाही. म्हणून त्यांची तुलना नेपोलियनसारख्या युद्धनिपुण सेनापतीशी केली जाते. युद्धनीतीतील बारकावे, गनिमी कावे, शत्रूला आपल्या सोयीच्या व मोक्याच्या ठिकाणी आणून हरविणे, त्यासाठी दबा धरून बसणे, सक्षम गुप्तचर यंत्रणा वापरणे आदी तंत्र छत्रपती शिवाजीमहाराजांसारखेच वापरले असल्याचे दिसून येते. बाजीराव पराक्रमात शिवाजी महाराजांच्या बरोबरीचा होता की नाही याबाबत नक्कीच वाद नाही. शिवाजीमहाराजांच्या युद्धतंत्राचा ठसा बाजीरावांवर नक्कीच पडलेला होता.
             घोडदळ ही बाजीरावांची सर्वात मोठी ताकद होती. बाजीरावाने पायदळ आणि तोफखाना बाळगणेच सोडले होते. त्या काळाच्या लढाईचा मुख्य केंद्रबिंदू म्हणजे सशक्त घोडदळ. बाजीराव घोड्यावर लहानाचा मोठा झाला असे म्हटले तरी ते वावगे ठरणार नाही.  सहा फुट उंची असलेले बाजीराव हे उत्तम सेनापती होते.  बुद्धी आणि शक्तीचा अद्वितीय संगम म्हणजे बाजीराव. घोड्यावरच्या बांधलेल्या  पिशवीत भाजलेले चणे घेऊन ते खात खात दौड करीत, सैनिकांसह प्रवास करी. त्यांच्यासोबतच राही. त्यांच्याबरोबर जेवण करत असे. त्याच्या फौजा ७५ किलोमीटर प्रतीदिन या वेगाने जायच्या. घोड्यावर मोजकीच शिधा व शस्त्र असल्याने मराठा सैन्याची गतिमानता जास्त होती. सैन्याचा अंतर कापण्यासाठीचा हा वेग त्या काळातला सर्वोत्तम वेग होता.  त्या काळात मुघल सैन्य दिवसाला ५ ते ६ मैल या वेगाने प्रवास करत असत. शत्रूला सुगावा लागायच्या आतच हल्ला झालेला असायचा. बाजीरावांची गुप्तचर यंत्रणा ही त्याची दुसरी मोठी बाजू. शत्रुच्या हालचालींबाबतची क्षणाक्षणांची माहिती त्यांना मिळायची. मार्गात येणाºया नद्या, नद्यांचे चढ, उतार, पर्वत, घाट या सगळ्यांची अचूक माहिती असायची.

मस्तानी :

            बाजीरावाच्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे मस्तानी.  पेशवे दप्तरातील पत्रांवरून तिचे नावे मस्तान कलावंत होते व बाजीरावांच्या (नानासाहेब) लग्नसमारंभात तिला नाचगाण्यासाठी आणण्यात आले होते. तर निजामाच्या नाटकशाळेतून बाजीरावाने तिला आणली अशीही एक आख्यायिका आहे. महंमदशहा बंगशपासून मुक्तता केल्याने छत्रसालेनेच तिला बाजीरावाला अर्पण केली असेही म्हणतात. खरे काय ते देवे जाणे. परंतु बाजीरावाने सहकारिणीचा दर्जा देऊ केल्यानंतरही अनेक प्रसंगाना तोंड द्यावे लागले. मस्तानीसारख्या यवन स्त्रीवर प्रेम करून तिला शनिवारवाड्यात आणणारा म्हणून ब्राह्मणांनी या पेशव्याला उपेक्षितच ठेवलं. काही ब्राह्मणांनी तसेच घरातील नातेवाईकांनी मस्तानी प्रकरणावरून  त्यांना आयुष्यभर छळले. हिंदुस्थानभर आपल्या नावाचा धाक बसविणारा बाजीराव घरच्या कुरघोड्यांना तोंड देऊ शकले नाही. पुण्यातल्या तत्कालीन ब्राह्मणांना तसेच खुद्द बाजीरावांच्या आईला व बंधू चिमाजी अप्पांना ते काही पटले नाही. मस्तानीपासून  समशेरबहाद्दर नावाचा मुलगाही झाला.  अतुलनीय पराक्रम गाजवूनही बाजीराव उपेक्षित राहिल्यासारखाच वाटतो. मस्तानी त्यांचे प्रेम हे कदाचित त्याचे कारण असावे. बाजीराव-मस्तानीच्या प्रेमकथेवर अनेक लहान मोठ्या तर काही अतिरंजक कादंबºया लिहिल्या गेला. नुकतीच टिव्हीवर 'श्रीमंत पेशवा... बाजीराव मस्तानी' मालिका पाहण्यात आली.  अनेक कथा, कादंबºयामधून रंगेल व शौकीन म्हणून बाजीरावांचे वर्णनही आले. लोकांना खरा इतिहास कधीच आवडत नाही. काहीतरी रंजक, मनोरंजनात्मक कहाणी तयार करून चुकीचा इतिहास गळी उतरविला की बरे वाटते. एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या गुणांचा आदर्श घेण्यापेक्षा त्यातील वाईट? गुण कसे उचलायचे ते आपण पाहता असतो. शेवटी चांगले काय आणि वाईट काय हे ज्याचे त्याने ठरवायचे असते. असल्या रंजक कहाण्यांमधून  बाजीरावाच्या पराक्रमी प्रतिमेचं प्रचंड नुकसान होते. योद्धा बाजूला राहून एक प्रेमीवेडा पेशवा तेवढाच पुढे आपल्यापुढे मांडला जातो. मस्तानी हे बाजीरावांच्या आयुष्यातलं शृंगारिक पर्व जरी असलं तरी त्यावरून बाजीरावाला छंदीफंदी चौकटीत बसवणं अन्यायकारकच ठरेल. शेवटी प्रत्येक व्यक्तीला स्वतचे असे खासगी आयुष्य असतेच म्हणून काही बाजीरावांनी केलेल्या पराक्रमाची माती होत नाही.  खरे तर मस्तानी-बाजीराव हे प्रेमाचे प्रतिकच. एका परजातीतील स्त्रीवर त्याकाळात प्रेम करून सहचारीणीचा मान देण्याचे धाडस ‘बाजीराव’च करू शकेल.

रावेरखेडी :

            २८ एप्रिल १७४० ला (वैशाख शुद्ध त्रयोदशी १६६२) मध्य प्रदेशातील नर्मदेकिनारी असलेल्या रावेरखेडी येथे ज्वर आल्याने बाजीरावांचे निधन झाले.  बाजीरावांना केवळ ४० वर्षांचे आयुष्य मिळाल. तिथे पुढे नर्मदातटावर नानासाहेबांनी ग्वाल्हेर संस्थानच्या देखरेखीखाली बाजीरावांची समाधी बांधली. उत्तरेत जाण्यासाठी नर्मदा नदी ओलांडावी लागे.  हे मोठे सैनिकी ठिकाण होते. नर्मदेच्या तटाजवळ असलेली ही समाधी महेश्वर धरण प्रकल्पामुळे पाण्याखाली जाणार असल्याचे मध्यंतरी वाचण्यात आले. रावेरखेडी हे बुडित क्षेत्रात येत असून समाधीसह इतर अनेक भाग पाण्याखाली जाणार आहे.  महाराष्ट्रापासून एवढ्या लांब ठिकाणी त्याकाळात घोडेस्वारी करत बाजीराव कसे गेले असतील याचं आश्चर्य वाटते. घोडेस्वारीचं त्याचं कौशल्य अफाट असावं.
आपल्या घरातील व जातीपंथातील लोकांशी मानसिक युद्ध खेळून हरलेला? तरीही जिंकलेला हा ‘राऊ’ रावेरखेडीस चिरविश्रांती घेत खरा यौद्धाच ठरला. बाजीराव पेशव्यांचा हा इतिहास दैदिप्यमान आणि गौरवशाली आहे. हा इतिहास आपण दुर्लक्षित केला नाही तर चिरंतन टिकणारा आहे.


अनेक लोकांचा बाजीराव पेशवे व त्यांच्या परिवारातील विविध व्यक्तींविषयी नावावरून संभ्रम होतो. कोणाचा मुलगा कोण? काका कोण? हेच कळत नाही. पहिला बाजीराव, दुसरा बाजीराव, बाळाजी ऊर्फ नानासाहेब पेशवे अंताजी ऊर्फ चिमाजी अप्पा, रघुनाथ ऊर्फ राघोबादादा. भाऊसाहेब अशा विविध नावांमुळे पेशवे इतिहास सर्वसामान्य माणासाला समाजायला अवघड जातो.  पूर्वी आजोबांचे नाव मुलाला देण्याची पद्धत असल्याने हा नावातील संभ्राम तयार झाला. यासाठी मी सर्वसामान्य वाचकाला समजेल अशी पेशव्यांची वंशावळी  तयार केली आहे ती पाहण्यासाठी येथे क्लिक करा. (पेशवे वंशावळी)  पेशव्यांच्या वंशावळेत दत्तक व औरस व अनौरस मुले, तसेच बहीणी यामुळे ही यादी अजून वाढेल त्यामुळे नाहक महत्त्वाच्या व्यक्ती संबंधी माहिती अपूर्ण राहील. यासाठी महत्त्वाच्या व्यक्तींचाच यादीत समावेश केलेला आहे.  वेळ मिळाल्यास सदर व्यक्तींचे फोटोसहित देण्याचा मी प्रयत्न करेन.


काही ठळक घटना :

  • २० फेब्रुवारी १७०७ रोजी अहमदनगर येथे औरंगजेबाचा मृत्यू
  • १८ आगस्ट  १७०० - बाजीरावांचा जन्म.
  • १७०७ - कैदेतून शाहूमहाराजांची सुटका.
  • बाळाजी विश्वनाथ - १७१३ ते १७२० पेशवाई प्रारंभ.
  • बाळाजी विश्वनाथ - १२ एप्रिल १७२० ला सासवड मुक्कामी अल्पशा आजाराने मरण पावले.
  • १७ एप्रिल १७२० ला शाहूमहाराजांनी पेशवाईची वस्त्रे बहाल केली
  • १७२८ निजामाविरुद्ध पालखेडची लढाई
  • २८ एप्रिल १७४० ला रावेरखेड येथे मृत्यू
  • १७ डिसेंबर १७४० चिमाजी आप्पा एदलाबाद येथे मरण पावला.

मराठा साम्राज्याचे पेशवे (पंतप्रधान)

  • सोनोपंत डबीर     १६४०-१६५२
  • श्यामपंत कुलकर्णी रांझेकर     १६५२-१६५७
  • मोरोपंत पिंगळे     १६५७-१६७४
  • राज्याभिषेकोत्तर (१७१२-१८१८)
  • मोरोपंत पिंगळे     १६७४-१६८३
  • मोरेश्वर पिंगळे     १६८३-१६८९
  • रामचंद्रपंत अमात्य     १६८९-१७०८
  • बहिरोजी पिंगळे     १७०८-१७११
  • परशुराम त्रिंबक कुलकर्णी
  • (पंतप्रतिनिधी)     १७११-१७१३
  • साम्राज्याचे शासक १७१२-१८१८
  • बाळाजी विश्वनाथ भट    १७१२-१७१९
  • बाजीराव पेशवे     १७२०-१७४०
  • बाळाजी बाजीराव  ऊर्फ नानासाहेब १७४०-१७६१
  • माधवराव पेशवे     १७६१-१७७२
  • नारायणराव     १७७२-१७७३
  • रघुनाथराव पेशवे     १७७३-१७७४
  • सवाई माधवराव पेशवे     १७७४-१७९५
  • दुसरा बाजीराव     १७९५-१८५१
  • नानासाहेब     १८५१-१८५७
  • पेशवाईचा अस्त.

शिवाजीमहाराजांचे अष्टप्रधान मंडळ

१) प्रधान  २) आमात्य  ३) सचिव   ४) मंत्री
५) सुमंत    ६) न्यायाधिश ७) दिव्यशास्त्री  ८) सेनापती













संदर्भ :
१) ऐतिहासिक गोष्टी व उपयुक्त माहिती (भाग १) - लोकहितवादी
२) दक्षिणेतील सरदारांच्या कैफियती, यादी वगैरे - पुरुषोत्तम विश्राम मौजे, डी. बी. पारसनीस
३) पेशव्यांची बखर : भीमराव कुलकर्णी
४) भारताचा इतिहास : डॉ. श. गो. कोलारकर


मराठेशाहीचा अंत कधी झाला याबाबत अनेक इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत. याची कारणे अनेक आहेत.
  1. मराठी लष्कराचे आधारस्तंभ असलेले महादजी शिंदे यांचे १२ फेब्रुवारी १७९४ ला मृत्यू झाला. त्यामुळे जुने जाणते महादजी गेल्याने अनेक इतिहासकार मराठेशाहीचा अंत झाला असे मानू लागले.
  2. पेशवाईतील साडेतीन शहाण्यांपैकी एक नाना फडणवीस १३ मार्च १८०० ला मृत्यू पावले.  नानांचा मृत्यू म्हणजे मराठेशाहीला पडलेले मोठे भगदाड होते. इंग्रजांनी तर पेशवाईचे शहाणपण गेल्याचे लिहून ठेवलेले आहे.
  3. १७ नोव्हेंबर १८१७ रोजी शनिवारवाड्यावर इंग्रजांनी युनियन जॅक पडकाविला. या घटनेनेसुद्धा मराठेशाही लोप पावली असल्याचे अनेकांनी नमूद केले आहे.
  4. ३ जून १८१८ रोजी दुसरा बाजीराव अशीरगडाजवळ जनरल माल्कमच्या स्वाधीन झाला. व बाजीरावांनी राज्यावर पाणी सोडले. ही मुख्य घटना अनेक इतिहासकार मराठेशाहीचा अंत झाल्याचे सांगतात.
  5. काही इतिहासकार १६ मे १८४९ ला सातारा गादी संपल्याचे नमूद करतात.
खºया अर्थाने १८१८ ला पेशवाई संपल्याने हे वर्ष मराठेशाहीचा अंत झाल्याचे अनेकांनी नमूद करून ठेवले आहे. 



बाजीरावांचा पराक्रम अजूनही आपल्या महाराष्ट्रात फारसा माहिती नाही. बाजीरावांनी दिल्लीपर्यंत भगवा फडकावून मराठ्यांचा दरारा निर्माण केलेला होता. श्रीमंत बाजीराव पेशवे - एक अजेय योद्धा या लेखानंतर अनेकांनी माहिती दिल्याबद्दल आभार मानले. पालखेडच्या युद्धासंदर्भात श्री. पित्रे यांची लोकमतमधील मंथन पुरवणीमधील मालिका अधिक माहितीसाठी देत आहे.
बाजीरावांचा पराक्रम सगळ्यांना अधिक माहिती व्हावा हाच हेतू आहे. खालील दोन्ही लेख लोकमत पुणे आवृत्तीच्या मंथन या पुरवणीत अनुक्रमे दि. ३० जून २०१३ व ७ जुलै २०१३ रोजी प्रसिद्ध झाले आहेत. लेखक श्री. शशिकांत पित्रे भारतीय लष्करातील मेजर जनरल पद भूषवलेले नामवंत अधिकारी व युद्धशास्त्राचे अभ्यासक आहेत़ पूर्व परवानगीशिवाय हे लेख येथे जोडत आहे. त्याबद्दल क्षमस्व. लोकमत व श्री. शशिकांत पित्रे यांचे लेखाबद्दल धन्यवाद.

http://ferfatka.blogspot.com/2013/10/blog-post_17.html
खालील लिंकवर क्लिक अथवा ब्राऊजरमध्ये कॉपी पेस्ट करून फाईल डाऊनलोड करून वाचता येतील.
https://docs.google.com/file/d/0ByNGX3NhYDvFUGdHUnhfdXNPdVU/edit?usp=sha...
https://docs.google.com/file/d/0ByNGX3NhYDvFY0ZxZ2lILWE1TEE/edit?usp=sha...

Oct 10, 2013

Thursday, November 26, 2015

पुण्यनगरीचा मानबिंदू - सिंहगड छायाचित्रे





आपल्या प्रतिक्रिया येथे लिहा.


गडावर उभारण्यात आलेला मार्गदर्शक नकाशा



सिंहगडावरील पागेची जागा?


गडावर मिळणाºया खाद्यपदार्थांचे वन संरक्षण समितीतर्फे  नेमून देण्यात आले दर.





कल्याण दरवाजा


कल्याण दरवाजा



कल्याण दरवाजा



डोणागिरीच्याकड्यावरून खाली दिसणारे छोटे गाव







पुणे दरवाजा


सिंहगडावर वर चढण्यासाठी येणारी पायवाट




सिंहगडावर जागोजागी दिसणारे विक्रेते


 गडावर विक्रीस ठेवण्यात आलेला रानमेवा


 गडावर विक्रीस ठेवण्यात आलेला रानमेवा



गडावरील काही दुर्लक्षित पाण्याची टाकं


गडावरील एकमेव पिण्याच्या पाण्याचे टाक. देवटाके


गडावरील एकमेव पिण्याच्या पाण्याचे टाक. देवटाके



गडावरील काही दुर्लक्षित पाण्याची टाकं


गडावरील काही दुर्लक्षित पाण्याची टाकं


गडावरील काही दुर्लक्षित पाण्याची टाकं


Sunday, November 22, 2015

पुण्यनगरीचा मानबिंदू - सिंहगड

22/11/2015

दिवाळीची सुट्टी संपत आली होती. मुलाला पायी किल्ला चढण्याचा अनुभव देण्यासाठी सिंहगडावर जाण्याचे ठरले. यावर्षी  त्याच्या इतिहासाच्या पुस्तकात तानाजी मालुसरेंवर असलेला धडा असल्याने अनायासे ती जागा प्रत्यक्ष पाहून ही होईल व त्याचे पदभ्रमणही होईल यासाठी सिंहगडावर जाण्यास निघालो त्याविषयी....



पुण्यनगरीचे दोन मानबिंदू एक म्हणजे शनवारवाडा व दुसरा किल्ले सिंहगड. पुण्यातून नैऋत्य दिशेला उंच आकाशात दिसणारा व आकाशवाणी केंद्राचे दोन टॉवर असलेला किल्ला म्हणजे सिंहगड. सिंहगडाबाबत काहीजणांना लहानपणी शाळेतील शिकलेला ‘गड आला पण सिंह गेला’ या धड्यातील यशवंती घोरपड व ‘आधी लगीन कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचं’ असे म्हणणारा तानाजी मालुसरे आठवतो. पण या शिवाय जास्त काही सिंहगडाविषयी सांगता येत नाही. मात्र, एन्जॉय म्हणून मित्रमैत्रिणींसोबत, पिकनिक स्पॉट, एक दिवसाचा चेंज, थ्रील अनुभवण्यासाठी दुचाकी अथवा चारचाकीवरून उगाच आपण काही तरी जगावेगळे पाहत आहोत. याचा प्रत्याय आणून देतात. हल्ली सुट्टीच्या दिवशी घराबाहेर तेही निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन येण्याचे वेड वाढू लागले आहे. खरेतर सिंहगडावर वर्षभर पर्यटक येत असतात, पण पाऊस सुरू झाला, की तो जास्तच वाढतो. पुण्यापासून जवळ असलेल्या सिंहगडावर ऐरवी सुट्टीच्या दिवसा खेरीज सुद्धा हजारोजण किल्यावर ये-जा करत असतात.  त्यात पुणे परिसरातील विशेषत: बाहेरून येणाºया कॉलेज तरुण-तरुणींचा भरणा अधिक असतो हे सांगावयास नकोच. पानशेत धरण, खडकवासला, सिंहगडचा परिसर या कॉलेजकुमारांनी व्यापून गेलेला असतो. अनेकजणांना  केवळ एन्जॉयमेंट करण्यासाठी या स्थळाचा वापर करताना पाहून चिडही येते. मोठमोठ्यांदा मोबाईलवरील गाणी वाजवत, टिंगलटवाळ्या करत ही मंडळी किल्यावर भटकताना दिसतात. वेगवेगळ्या दरवाज्यांजवळ सेल्फी काढून ही मंडळी जणूकाही आपणामुळे या स्थळाचे महत्व वाढते आहे हे इतरांना मेसेज पाठवून करतात. असो...

पुण्याहून अवघ्या २४ किलोमीटरवर हा सिंहगड किल्ला आहे. सह्याद्रीच्या पूर्व रांगेवर पसरलेल्या भुलेश्वराच्या रांगेवर हा किल्ला आहे.  गडाच्या पायथ्याजवळील आतकरवाडीतून वर चढणारी पायवाट आहे. पण ज्यांना गड चढायचा त्रास  नको अशांसाठी गोळेवाडीतून एक सोपी घाटवाट चांगल्या डांबरी रस्त्याने आपणाला थेट गडावरही पोहचवते. याशिवाय सह्याद्रीतील अस्सल ट्रेकर्स कात्रज-सिंहगड, कोंढणपूर-कल्याण-सिंहगड, खानापूर-सिंहगड, सिंहगड-राजगड-तोरणा अशा गडांवरून ही यात्रा पूर्ण करतात.
आम्ही सकाळी ९ ला पायथ्यापाशी आतकरवाडीला पोहचून सिंहगडाची वाट चढण्यास सुरूवात केली. जसजसे वर चढू लागतो तस तशी घरे, शेती, रस्ते छोटे होऊ लागले. आजुबाजुचे  हिरवे रान, डोंगर, त्यावरील ऊन-सावलीचा खेळ, सुसाट वारा व धुके याचा अनुभव घेत सिंहगडाचे हे राजबिंडे रुप मनात साठवत आम्ही पुढे जात होतो. वाटेत दूर दिसणारी वाहने व रस्ता पाहून मुलाने मला विचारले,‘‘बाबा यापेक्षा आपण गाडीने वर आलो असतो तर लवकरच पोहचलो असतो ना’’? या प्रश्नाचे उत्तर मी केवळ ‘हो ना’ असे म्हणत टाळून नेले. मुलाला गड, किल्यांची आवड निर्माण व्हावी हाच उद्देश. मुलाने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत तासाभरात आम्ही गडमाथ्यावर दाखल झालो. काल अचानक रात्री थोडा पाऊस पडून गेल्याने अनेक ठिकाणी माती ओली होती. त्यात ढगाळ वातावरणाने थकवा जाणवला नाही. पुणे दरवाज्याच्या परिसरात पर्यटकांचा जथ्था पाहून आज रविवार व सुट्टीचा दिवस असल्याने गर्दी झाल्याचे लक्षात आले. आम्हीही याच गर्दीचा एक भाग होऊन संपूर्ण किल्ला पाहण्यासाठी निघालो. संपूर्ण किल्ला मुलाला दाखवून पिठलं भाकरीचा आस्वाद घेत दुपारी ४ला किल्ला सोडला. ऐव्हाना गडगडाट होऊन पाऊस येण्यास सुरूवात झाली.

सिंहगडाविषयी : 

 

सिंहगडावर प्रवेश करण्यासाठी प्रथम पुणे मार्गाने गेल्यास तीन दरवाजे लागतात.  दोन दरवाजे मराठेशाहीतील तर तिसरा यादवकाळातील. या तिसऱ्या दरवाज्यावरील नक्षीकाम कमळांची रचना हे त्याचे पुरावे. विशेष म्हणजे पुणे दरवाज्याचे चित्र टपाल तिकीटावरही आले आहे. पुढे थोड्या अंतरावर लिहलेला घोड्यांची पागा हा फलक दिसला. खरे तर हे कातळात खोदकाम करून केलेली सातवाहन कालीन लेण. मधोमध खांब सोडलेल्या खोल्या, आतमध्ये बसण्यासाठी ओटे, समोर मोकळे प्रांगण ही सारी विहाराची रचना. पण कुणाच्यातरी डोक्यात घोड्याची पागा अशी कल्पना आली आणि ती रुढही झाली. खरे तर घोड्याची उंची पाहता या ठिकाणी घोडा कसा बांधता येईल याचेच आश्चर्य वाटते. अशाच पद्धतीची दोन खोदकामे वाटेत गणेश टाके आणि देव टाक्याच्या पाठीमागे एका भूमीलगत टाक्यातही दिसतात. हा गड किमान दोन हजार वर्षांपासून असावा असा अभ्यासकांचा अंदाज आहे.  तर अशा या गडाचे प्राचीनकाळी नाव होते कौंडिण्यदुर्ग. कौंडिण्यऋषींच्या वास्तव्यावरून हे पडले असावे. पुढे यादवकाळात या जागी मंदिर बांधले गेले. अपभ्रंश होत या कौंडिण्यदुर्गचा झाला ‘कोंढाणा’ यातूनच गडाखालच्या गावालाही नाव मिळाले कोंढणपूर.  येथून पुढे समोरच दारुकोठार आहे तिथून पुढे काही अंतरावरच गणेश टाके आहे. आणखी पुढे गेल्यावर डाव्या हाताला किल्लेदाराच्या वाड्याचे अवशेष आहेत. येथून अमृतेश्वर मंदिराकडे जाताना उजव्या हाताने टिळकांच्या बंगल्यापाशी जाता येते. स्वातंत्र्यप्राप्ती आधी सिंहगडावर लोकमान्य टिळकांचा सहवासही लाभला आहे.  बंगल्याच्या मागच्या बाजूलाच  राजाराममहाराज यांची समाधी आहे. ३ मार्च १७०० ला त्यांचा इथे मृत्यू झाला होता. किल्यावरील अमृतेश्वर भैरवाचे मंदिर सगळ्यात जुने मानले जाते. काहीच अंतरावर आहे देवटाके. संपूर्ण किल्यावरील हा एकमेव पिण्याजोग पाणी. या देवटाक्यापासून उजव्या हाताने नरवीर तानाजी मालुसरे च्या समाधीपाशी पोहोचतो. देवटाक्याकडून सरळ खाली गेले की कल्याण दरवाजा लागतो.   येथून कल्याणपूर या गावात उतरता येते. कल्याण दरवाज्यावरून तसेच पुढे गेले की आपण झुंजार बुरुजाकडे जातो. या  भागातील तटबंदी अजून चांगल्या स्थितीत आहे. तेथून पुढे डोणागिरीचा कडा पाहून गडाला प्रदक्षिणा पूर्ण होते.

इतिहास व ठळक घटना

सिंहगडाचे आधीचे नाव कोंढाणा. पूर्वी हा किल्ला आदिलशाहीत होता. मराठे, मुघल व आदिलशाही या तीन सत्तांमधे हा सिंहगड अनेक वेळा फिरला. सन १६४८-४९ मधे शहाजीमहाराजांच्या सुटकेसाठी हा गड आदिलशाहला द्यावा लागला. इ.स. १६४९ मध्ये शहाजी राजांच्या यांच्या सुटकेसाठी शिवाजी राजांनी हा किल्ला परत आदिलशहाला दिला. पुरंदरच्या तहात जे किल्ले मोगलांना दिले त्यामध्ये कोंडाणा पण होता. मोगलांतर्फे उदेभान राठोड हा कोंडाण्यावरचा अधिकारी होता.  शिवाजी महाराज जेव्हा आग्राहून सुटून परत आले तेव्हा त्यांनी दिलेले गड परत घ्यायला सुरुवात केली. शिवाजीमहाराजांचे विश्वासू सरदार आणि बालमित्र तानाजी मालुसरे आणि त्यांच्या ५०० मावळ्यांनी हा किल्ला एका चढाई दरम्यान जिंकला. माघ वद्य नवमी दि. ४ फेब्रुवारी १६७२ च्या रात्री हे युद्ध झाले. या लढाईत तानाजींना वीरमरण आले आणि प्राणाचे बलिदान देऊन हा किल्ला जिंकल्यामुळे शिवाजी महाराजांनी ‘गड आला पण सिंह गेला’  असे गौरवोद्गार काढले. शिवरायांच्या निधनानंतर हा गड कधी मोगलांकडे तर कधी मराठ्यांकडे राहिला. यामध्येच एक जुलै १६९३ मध्ये नावजी बलकवडे आणि विठोजी कारके या मराठावीरांनी तानाजींच्या पराक्रमाची पुनरावृत्ती करत गड जिंकला. छत्रपती राजाराममहाराजांच्या मृत्यूनंतर दोनच वर्षांनी औरंगजेबाने सिंहगड पुन्हा जिंकला आणि त्याचे नाव ठेवले ‘बक्षी-दा-बक्ष’! याचा अर्थ दैवी देणगी. पण औरंगजेबाची ही देणगी त्याच्याकडे दोनच वर्षे राहिली. मराठ्यांनी पुन्हा हा गड जिंकला आणि तो १८१८च्या पेशवाईच्या अखेर मराठे-इंग्रज लढाईपर्यंत त्यांच्याकडेच राहिला. शेवटच्या लढाईनंतर इंग्रजांनी हा गड घेतला. त्या वेळी इंग्रजांना गडावर ६७ तोफा, त्यांना पुरेल एवढा दारूगोळा, जडजवाहीर, दागिने, मौल्यवान वस्तू आणि रोख रक्कम असा मोठा खजिना मिळाला.  पुढे अनेक दिवस हे इंग्रज गडावरील ही लूट टोप्यांमध्ये भरभरून आणून पुण्याच्या बाजारात विकत होते.

सिंहगडावरील माहिती फलकानुसार

सध्या फलकाची दुरवस्था झाली आहे. 

‘‘सिंहगडाचे मूळचे नाव कोंढाणा, इसामी नावाच्या कवीने फुतुहस्सलातीन किंवा शाहनामा-इ-हिंद या फार्शी काव्यात (इ. १३५०) महमद तुघलकाने इ.१६२८ मध्ये कुंधीयाना किल्ला घेतल्याची माहिती येते. त्यावेळेस हा किल्ला नागनायक नावाच्या कोळ्याच्या ताब्यात होता. अहमदनगरच्या निजामशाही कारकिदीर्तील कोंढाण्याचे उल्लेख इ. १४८२, १५५३, १५५४ व १५६९ च्या सुमारसचे आहेत. इ.१६३५ च्या सुमारास कोंढाण्यावर सिदि अवर किल्लेदार असताना मोगल व आदिलशाह यांनी मिळून कोंढाणा घेतला. यावेळेस (इ.१६३६) आदिलशाहचा खजिना डोणज्याच्या खिंडीत निजामाचा सरदार मुधाजी मायदे याने लुटला.
शहाजी राज्यांच्या काळात सुभेदार दादोजी कोंडदेव मालवणकर यांच्या ताब्यात कोंढाणा असल्याचा उल्लेख आदिलशाही फर्मानात आहे.
दादोजी कोंडदेव आदिलशाहीचे नोकर असले तरी ते शहाजी राजांशी एकनिष्ठ असल्याने शिवाजी राजांनी त्यांच्या मृत्यूपर्यंत (इ.१६४७) कोंढाणा घेण्याचा प्रयत्न केला नाही. त्यानंतर लगेचच हा गड राजांनी ताब्यात घेतला.
इतिहासकार श्री.ग.ह. खरे यांच्या मते तानाजी प्रसंग घडण्यापूर्वीच कोंढाण्याचे नाव 'सिंहगड' झाल्याचे कागदोपत्री पुरावे आहेत. कै.ह.ना. आपटे यांच्या कादंबरीतील मात्र तानाजी प्रसंगानंतर या किल्याचे नाव सिंहगड झाले असा उल्लेख आहे. शिवाजी राजांच्या काळात व त्यानंतर हा किल्ला कधी मराठ्यांकडे तर कधी मोगलांकडे ताब्यात होता.

या युद्धाबाबत सभासद बखरीत पुढीलप्रमाणे उल्लेख आढळतो : 

‘‘तानाजी मालुसरेंनी ‘कोंडाणा आपण घेतो. असे कबूल करून वस्त्रे, विडे घेऊन गडाचे यत्नास  ५०० माणूस घेऊन गडाखाली गेला आणि दोघे मावळे मदार्ने निवडून रात्री गडाच्या कड्यावरून चढवले. गडावर उदेभान रजपूत होता त्यांस कळले की, गनिमाचे लोक आले. ही खबर कळून कुल रजपूत कंबरबस्ता होऊन, हाती तोफा-बार घेऊन, हिलाल (मशाल), चंद्रज्योती लावून बाराशे माणूस तोफाची व तिरंदाज, बरचीवाले चालून आले. तेव्हा मावळे लोकांनी फौजेवर रजपुतांचे चालून घेतले. मोठे युद्ध एक प्रहर झाले. पाचशे रजपूत ठार झाले. उदेभान किल्लेदार खाशा त्यांशी व तानाजी मालुसरे सुभेदार यांशी गाठ पडली. दोघे मोठे महाशूर, एक एकावर पडले. तानाजीचे डावे हातची ढाल तुटली. दुसरी ढाल समयास आली नाही. मग तानाजीने आपले डावे हाताची ढाल करून त्याजवरि वोढ घेऊन, दोघे महारागास पेटले. दोघे ठार झाले. मग सूयार्जी मालूसरे (तानाजीचा भाऊ) याने हिंमत धरून, कुललोक सावरून उरले राजपुत मारले. माघ वद्य नवमी दि. ४ फेब्रुवारी १६७२ च्या रात्री हे युद्ध झाले. ’’

पहाण्यासारखी ठिकाणे :

दारूचे कोठार : 

तिसऱ्या दरवाजातून आत शिरताच डाव्या हातास दारू गोळ्याचे कोठार लागते. गडावर आज टिकून असलेली ही एक इमारत. या कोठारावरच ११ सप्टेंबर १७५१ रोजी वीज पडून गडावर मोठा स्फोट झाला होता. त्यावेळच्या फडणीसांचे घर उध्वस्त होऊन सर्व माणसे मरण पावली होती.  याच्या दुरुस्तीसाठी ८७०० रुपये खर्च पडल्याचीही नोंद आहे. पुढे याच इमारतीत ब्रिटिशांनी काही काळ चर्चही थाटले होते.

लोकमान्य टिळक बंगला : 

 रामलाल नंदराम नाईक यांच्याकडून खरेदी केलेल्या जागेवरच्या ह्या बंगल्यात बाळ गंगाधर टिळक येत असत. टिळक १८८९ मध्ये गडावर राहण्यास आले. इथल्या निसर्गरम्य एकांतात त्यांनी ‘आर्क्टिक होम इन वेदाज’ हा ग्रंथ आणि ‘गीतारहस्य’ची मुद्रणप्रत तयार केली.   टिळक आणि महात्मा गांधीजींची भेटही येथेच झाली.  याशिवाय नेताजी सुभाषचंद्र बोसही १९३१ साली सिंहगड भेटीवर आले होते. ते येथे मुक्कामाला होते. 

श्री अमृतेश्वर भैरव मंदिर : 

कोंढाणेश्वराच्या मंदिरावरून थोडे पुढे गेले की डावीकडे हे अमृतश्वराचे प्राचीन मंदिर लागते. भैरव हे कोळ्यांचे दैवत आहे. यादवांच्या आधी गडावर कोळ्यांची वस्ती होती. मंदिरात भैरव व भैरवी अशा दोन मूर्ती आहेत.

देवटाके :  

या टाक्याचा उपयोग पिण्याचे पाणी म्हणून होतो. औषधी पाणी म्हणून देवटाक्याचे महत्व आहे. खरे तर जमिनीतून फिल्टर होऊन येणारे पाणी औषधीच. संपूर्ण गडावर हॉटेल विक्रेत्यांसाठी हे एकमेव पाण्याचा स्त्रोत. केवळ हॉटेल विक्रेते याचा वापर करू शकतात. कारण पाणी उपासण्यासाठी दोरी त्यांच्या प्रत्येकाकडेच असते. एका अर्थी हे बरे झाले निष्कारण येणारे पर्यटक पाण्याचा हातपाय, तोंड धुण्यासाठी या अमूल्य पाण्याचा वापर करताना मी पूर्वी पाहिले आहे.

कल्याण दरवाजा : 

 

गडाच्या पश्चिमेस हा दरवाजा आहे. कोंढणपूरवरून पायथ्याच्या कल्याण गावातून सिंहगडावर येता येते.  एकामागोमाग असे दोन भक्कम दरवाजे आहेत. यापैकी वरच्या दरवाज्याच्या दोन्हीकडील बुरुजांच्या भिंतीत श्रीशालीवाहन शके १६७२ कारकीर्द श्रीमंत बाळाजी बाजीराव पंडित प्रधान असा शिलालेख आढळतो. हत्ती व माहूत अशी दगडी शिल्पे होती.  कल्याण दरवाजाचा बुरूज काही वर्षांपूर्वी ढासळल्याच्या बातम्या पेपरातून आल्या. मात्र, यंदा गडावरील तुटक्या दरवाज्यांचे, बुरूजांचे, तटबंदीची पुर्नउभारणी करण्यात आल्याने समाधान वाटत आहे. जागोजागी सुचना फलक, कचरा टाकण्यासाठी सोय, मार्गदर्शक फलक, तानाजी मालुसरे यांच्या समाधीशेजारील परिसराचे होणारे सुशोभीकरण यामुळे सिंहगड लवकरच सजणार आहे.

उदेभानाचे स्मारक : 

कल्याण दरवाजाच्या मागच्या बाजूस वर असलेल्या टेकडीवर  सध्या  चौकोनी दगड दिसतो. ते उदेभान राठोडचे स्मारक म्हणून ओळखले जाते. मोगलांतर्फे उदेभान हा सिंहगडचा किल्लेदार होता.

झुंजार बुरूज :

 झुंजारबुरूज हे सिंहगडचे दक्षिण टोक होय. उदयभानूच्या स्मारकापुढे समोरची टेकडी उतरून या बुरुजावर येता येते. येथून समोरच टोपीसारखा राजगड, त्याच्याच उजवीकडे तोरणा हे गड दिसतात तर खाली पानशेतचे खोरे दिसते. पूर्वेकडे लांबवर पुरंदर दिसतो. पण हे वातावरण स्पष्ट असेल तरच ओळखता येतात.

डोणगिरीचा उर्फ तानाजी कडा : 

झुंजारबुरूजावरून मागे येऊन तटाच्या भिंतीच्या बाजूने पाय वाटेने तानाजीकड्याकडे जाता येते. हा कडा गडाच्या पश्चिमेस आहे. या ठिकाणाहूनच ५०० मावळ्यांसह तानाजी मालुसरे वर चढले होते.
  

राजाराम स्मारक : 

राजस्थानी पद्धतीची देवळासारखे ही वास्तू आहे. चौकोनी बांधकाम, चारही दिशांना निमुळते होत गेलेले छत अशी ही वास्तू आहे. छत्रपती राजाराम महाराज यांची ही समाधी. मोगली फौजेला सतत ११ वर्षे टक्कर देणाºया राजाराम महाराजांचे वयाच्या अवघ्या ३० व्या वर्षी शनिवार दि. २ मार्च इ.स. १७०० या दिवशी सिंहगडावर निधन झाले. पेशव्यांतर्फे या स्मारकाची उत्तम व्यवस्था ठेवली जायची.  ऐन कड्यालगत ही वास्तू आहे.
  

तानाजी मालुसरेंचे स्मारक : 

 

अमृतेश्वर मंदिराच्या पाठीमागे तानाजी मालुसरेंचे स्मारक आहे. शिवकाळातच बांधलेल्या या चौथऱ्यावर सुरुवातीला २० फेब्रुवारी १९४१ रोजी तानाजींचा अर्धपुतळा बसवला गेला. पुढे २४ मार्च १९७६ रोजी पहिला पुतळा काढून त्याजागी आजचा धातूचा पुतळा बसविण्यात आला.  तानाजी स्मारक समितीच्या वतीने हे बांधण्यात आले आहे. माघ वद्य नवमी दि. ४ फेब्रुवारी १६७२ या दिवशी झालेल्या लढाईत तानाजी मालुसरे मारले गेले. पण तानाजींच्या प्रयत्नांने गड जिंकला. दरवर्षी माघ वद्य नवमीस येथे मंडळातर्फे तानाजीचा स्मृतिदिन साजरा केला जातो.

यंदा दीपावलीचे औचित्य साधून कोंढवे-धावडे येथील भुलेश्वर तरुण मंडळाने सिंहगडावरील पुणे दरवाजा व पादचारी मार्गावर विद्युत रोषणाई केल्याने गडावरील पादचारी मार्ग व पुणेद्वार उजळले निघाल्याच्या बातम्या पेपरात वाचण्यात आल्या.  दरवर्षी सेवाभावी संस्था व दुर्गप्रेमी संस्थांचे कार्यकर्ते दिपोत्सव साजरा करीत असतात.

खंत : 


 

पूर्वी गडावर झुणका-भाकरी, दही-ताकापुरता असलेला स्थानिक लोकांचा रोजगार ठीक होता. गडावर वाढलेले सध्याचे बाजारू पर्यटनही सिंहगडाच्या पर्यावरणाला त्रासदायक ठरू लागले आहे. पण आता गडाच्या पायथ्यापासून ते गडावर सर्वत्र पसरलेली छोटीखानी हॉटेल्स पाहून आश्चर्य वाटते. पर्यटकांसाठी उभारण्यात आलेल्या या हॉटेल्समध्ये पिठलं भाकरी, भजी, दही, ताक तयार करून विकले जाते. चुलीवरील भाकरी ही ठरते जाहिरात. सध्याच्या तरुणांना सिंहगडाचे महत्त्व विचारले असता गरमा-गरम पिठलं भाकरी, दही ताकासाठी प्रसिद्ध असल्याचे त्यांच्याकडून सांगतले जाते. या बरोबरच काकडी, पेरू, चिंचा, बोर, चन्यामन्या बोर, आवळे, वाफवलेल्या शेंगा या रानमेव्यांबरोबरच हल्लीचे मुलांचे आवडते कुरुकुरे, बर्फाचे गोळे, आईस्क्रिम विक्रीस ठेवण्यात आले आहे. पर्यटक  या गोष्टी खरेदी करून भलेही स्थानिकांना चार पैसे मिळत असतील. पण यातून वाढणारे प्रदूषण, गडावरील प्लॅस्टिकचा कचरा, अनावश्यक पाण्याचा होणारा वापर याचा ताळमेल कसा साधणार. गडावर केवळ मोजकीच स्थानिकांची हॉटेल्स ठेऊन पर्यटकांची सोय होऊ शकते. अन्य अनधिकृत विक्रेत्यांना थारा न दिल्यास काही प्रमाणात तरी हानी कमी पोहचेल. वन विभागाकडून पायथ्याखालून गाडीने गडावर येण्यास दुचाकीस २० रुपये व चारचाकीस ५० रुपये असे शुल्क घेऊन सोडले जाते. पर्यावरणास काही हानी पोहचल्यास दंड म्हणून १०० रुपये उपद्रव शुल्कही आकारला जातो. सध्या याची अंमलबजावणी जोरात सुरू आहे. गडावर मद्यपान, सिगरेट, कचरा करण्यास बंदी आहे. अशा आशयाच्या सूचनाही जागोजागी लिहून ठेवल्याने थोडातरी अटकाव होत आहे. गडावर साध्या वेशात फिरणारे वनखात्याचे तसेच पोलीस पाहून जरा हायसे वाटते. गळ्यात गळे घालून फिरणारी जोडपी, हुल्लडबाजी करणारे तरुण याचे प्रमाण यामुळे काहीसे तरी कमी होऊ लागल्याचे दिसून येत आहे. याबद्दल वनविभागाचे मनावेत  तेवढे आभार कमीच. पण केवळ येईल त्याला गडावर प्रवेश देण्यापेक्षा काही अजून निर्बंध टाकणे गरजेचे आहे. आॅक्टोबरमध्ये सिंहगडाच्या घाटात दरड कोसळून आठवडाभर येथील रस्ता बंद होता. हा पर्यावरणाचा ºहास टाळणे गरजेचे आहे. हिरव्यागर्द झाडी, शांत निवांत सकाळ वा संध्याकाळ आणि भन्नाट वारा याचा अनुभव घ्यायचा असेल तर सिंहगडला नक्कीच भेट द्यायला हवी. पण तीही इतिहास समजण्यासाठीच.  सिंहगडाला दररोज शेकडो पर्यटक भेट देतात, पण त्यातले अनेकजण गड कुठे दिसलाच नाही असे म्हणत नाक मुरडतात. आपल्या पूर्वजांचे रक्त येथील मातीत पडल्याची मनात कोठेतरी जाण ठेऊनच. स्वराज्य व आपल्या राजाबद्दल निष्ठा कशी असावी, याची ओळख  तानाजी मालुसरेंनी आपल्या पराक्रमातून व बलिदानाने दाखवून दिली. स्वत:च्या मुलाचे लग्न बाजूला ठेवत, स्वराज्यातून गेलेला हा गड जिंकण्यासाठी त्यांनी आपले बलिदान दिले होते. याचे कुठेतरी भान ठेवल्यास नक्कीच सिंहगडासारख्या पवित्र ठिकाणी भेट दिल्याचे सार्थक होईल.

कसे जाल :

  • सिंहगड पुण्यापासून सुमारे ३५ किलोमीटर अंतरावर आहे.
  • पुणे दरवाजा : स्वारगेट वरून सुटणाऱ्या पुणे-सिंहगड  बसने आतकरवाडीपर्यंत पोहचून तेथून पायी एक ते दीड तासात गडावर जाता येते. स्वारगेट - आनंदनगर - वडगांव - खडकवासला - सिंहगड पायथा. अशी या मार्गावरील गावे आहेत. ५० ते ५६ क्रमांकाच्या बस या मार्गावर धावतात.
  • पुणे-कोंढणपूर : स्वारगेट वरून सुटणाऱ्या पुणे-कोंढणपूर बसने कोंढणपूरला उतरून कल्याण गावातून गडावर पायी जाता येते.

सिंहगडावरून काय पहाल :

  • पुरंदर, राजगड, तोरणा, वातावरण स्पष्ट असेल तर लोहगड, विसापूर, तुंग हे किल्ले, एनडीए, खडकवासला धरण असा प्रचंड मुलूख गडावरुन दिसतो.

पुण्यनगरीचा मानबिंदू - सिंहगड छायाचित्रे

आपल्याला हा फेरफटका कसा वाटला या विषयी नक्की लिहा.

Thursday, November 12, 2015

मढे घाट - नरवीर तानाजी पराक्रम

२०/९/२०१५ (रविवार)

‘मढे घाट’

नरवीर तानाजी मालुसरे यांच्या आठवणींना उजाळा देणारा ‘मढे घाट’. कोकणात उतरणाºया अनेक वाटा आहेत. त्यापैकीच तोरणा किल्याच्या पाठीमागील या वाटेविषयी....


गजाननाचे आगमन होऊन तीन दिवस झाले होते. रविवारी गौरीपूजन. किल्ले सिंहगडच्या मागील बााजूस असलेल्या मोगरवाडीत जेवणाचे आमंत्रण होते. काहीच किलोमीटरवर असलेला मढे घाट ही पाहून येऊ असे वडिलांनी सुचविले.  पावसाळ्यात यंदा कुठेच न गेल्याने जायचे ठरवले. सकाळीच घर सोडले. खडकवासला धरणाच्या बाजूने रस्ता कापत डाव्या बाजूला सिंहगड व परिसरातील वाढलेली सिमेंट काँक्रिटची जंगले बघत आमची गाडी पुढे जात होती. पुण्यापासून खडकवासाला व तेथून खानापूरगावातून सिंहगडवर न जाता सिंहगड डाव्या बाजूला ठेऊन मोगरवाडी या गावी जायचे होते. दोनशे ते अडीचशे वस्ती असलेले हे सिंहगडच्या पाठीमागील छोटे गाव. गाव तसे शिवकालीन. कारण  शिवकाळात मोगली छावण्या या परिसरात पडत असत. किल्याच्या परिसरात या छावण्या असत. मोगलवाडी या शब्दाचा पुढे मोगरवाडी असा नामोल्लेख सुरू झाला. १० वाजता चहा, नाष्टा घेऊन मढे घाट पाहण्यासाठी निघालो. मोगरवाडीपासून वेल्हा सुमारे १९ किलोमीटरवर तेथून पुढे ३२ किलोमीटरवर मढे घाट होता. 

 
खरेतर अनेकजण पुणे-नसरापूर-वेल्हा मार्गे मढे घाटात जातात. परंतु सिंहगड किल्याच्या मागील बाजूस असलेला पाबे घाट नुकताच चांगला केल्याचे समजले. पूर्वी सिंहगडावर अनेक वेळा वेगवेगळ्या मार्गाने वाºया झाल्या होत्या. त्यामुळे हा परिसरात चांगलाच आठवणीत होता. तेथून पाबे घाट १० किलोमीटरवर होता. घाट छोट्या छोट्या डोंगरावरून वेडीवाकउी वळणे घेत गेलेला. सिंहगडाचा विस्तार कसा आहे, हे पाबे घाटातून चांगले दिसते. रस्ता चांगलाच होता. ग्रामीण भागातून गेला असला तरी कोठेही खड्डे नव्हते. का यंदा पाऊस पडला नाही म्हणून तर रस्ते टिकले नसतील ना अशी ही शंका मनात आली. एका ठिकाणी ओढ्यात मनसोक्त डुंबत असलेले दोन बैल व गुराखी दिसले. दोन दिवसांपूर्वी पडलेल्या पावसाने यंदा प्रथमच ओढा भरल्याचे त्यांनी सांगितले. एकंदरीत पुढील वर्षी दुष्काळ नक्कीच असल्याची कुणकुण काहीशी आली. पर्यावरणाचा जो काही आपल्याकडून ºहास होतोय तेचेच हे परिणाम. असो. 
 
 
 

पाबेघाटातून अर्धा तासातच तोरणा किल्याच्या पायथ्याशी असलेल्या वेल्हे गावात पोहोचलो. तेथून पुढे मढे घाट ३२ किलोमीटरवर होता.  साडेबारा वाजून गेले होते. उशीर होऊ नये म्हणून गावात न थांबता तसेच पुढे गेलो. धरणाच्या कडेकडेने छोट्या वाड्यावस्त्या बघत आमची गाडी पुढे जात होती. मधेच थांबून गावकºयांना मढे घाट कुठे आहे असे विचारत पुढे जात होतो. तोरणा किल्याला प्रचंडगड असे का म्हणतात? याचे उत्तर त्याचा आवाका पाहून होतो. किल्याच्या खालून त्याचे रौद्र रुप पाहतच राहावे असे वाटते. आभाळात घुसलेले बुुरुज, तटबंदी केवळ अंदाजे दिसत होती. वाटेत कानंदीचं खोरं, भट्टी, पासली ही गावं सोडून आम्ही केळदला येऊन पोहोचतो. वेल्हे-केळद व केळद गावापासून दीड किलोमीटरवर मढे घाट असल्याचे समजले. 
 
 
 




तोरण्याजवळ असलेला मढे घाट हे ठिकाण पुण्यापासून अवघ्या ७० किमी अंतरावर. पावसाळ्यात या ठिकाणी दाट धुके, धबधबे व एकूणच निसर्गाचा चमत्कार पहावयास मिळतो. भटकंतींचा आनंद लुटण्यासाठी व ट्रेकिंगची आवड असणारे अनेकजण या ठिकाणाला आवर्जून भेट देतात. त्यातच दोन दिवसांपासून वरणराजाची कृपा झालेली होती. धो-धो पावसाने सर्वत्र पाणी झाले होते. ऐन पावसाळ्यात थंड झालेले ओढे, नाले, धबधबे पुन्हा सुरू झाले होते. पाहावे तिकडे पसरलेली हिरवळ, काहीसे पसरलेले धुके व ढग पाहत मन प्रसन्न झाले. सह्याद्रीच्या या भागाचं हे रूप खरेच पाहण्यासारखे आहे.
केळद गावाबाहेर वेळवण नदीवरचा छोटा पूल ओलांडून मढेघाटाकडे  आमची गाडी पोहचली. गाडी मोकळ्या मैदानावर उभी करून पुढील अंतर पायी निघालो. मोकळ्या-ढाकळ्या रस्त्याचे हे दीड किलोमीटरचे अंतर. पाऊस काहीसा येत जात होता. वडिलांचे गुडघे दुखत असून देखील थोड्याच्या चढणीचे हे अंतर पार केले. फार पूर्वी या ठिकाणाबद्दल वाचले होते. आज प्रत्यक्षात येथे आलो. याचा आनंद त्यांच्या चेहºयावर दिसत होता. रविवार असल्यामुळे भटकंती करणारे अनेक वीर या ठिकाणाही आल्याचे दिसले. कोण टू व्हिलरवर मैत्रांसोबत तर कोण मैत्रिणींसोबत. पंधराच मिनिटात वाटेने चालत एकदाचे मढे घाटातील त्या प्रसिद्ध धबधब्यापर्यंत आम्ही पोहचलो. नेहमी धबधब्याखाली मनसोक्त डुंबणारे यावेळी धबधबा जेथून सुरू होतो तेथून पाहत असल्याने वेगळाच आनंद होत होता. कोकणातील वाड्यावस्त्यांचे सुंदर दृश्य दिसत होते. धो-धो पडणारा तो धबधबा पाहून मन प्रसन्न झाले. दोन अडीच तासांचा प्रवास सार्थकी लागल्याने आनंदही झाला.  ओढ्यातच मी व माझ्या मुलाने बैठक मारून डुंबण्याचा आनंद घेतला. अंग पुसून  होतच होते. तो पर्यंत ताडताड-ताडताड पाऊस कोसळू लागला. एकदम ढग, धुके व पावसाने सर्व परिसर भरून गेला.  डोक्यावर छत्री घेऊन सुके कपडे सांभाळत झाडाच्या आढोश्याला येऊन थांबून राहिलो. सुमारे पंधरा मिनिटांनंतर काहीसा पाऊस कमी झाला. परतीचा मार्ग धरला. वाटेत पायी चालत येताना असलेल्या हॉटेलमध्ये गरमा गरम आले घातलेल्या चहा पिऊन, गप्पा मारत आम्ही परतीला लागलो.

‘मढे’घाटाविषयी थोडे :

अंधाºया रात्री कोंढाण्यावर स्वारी केलेले वीर तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाने सिंहगड ओळखला जातो.  शिवाजी महाराजांच्या शूरवीराने गड सर केला, पण स्वराज्याचे अनमोल असे रत्न नरवीर तानाजी मालुसरे या लढाईत पडले. पुढे शिवाजीमहाराजांनी त्यांचा ‘गड आला पण सिंह गेला’ या शब्दात गौरव केला.  मालुसरे गडावर पडले. गड जिंकला. मावळ्यांनी त्यांचा मृतदेह मूळगावी नेण्याचे ठरविले. तळकोकणातील पोलादपूरच्याजवळील उमरठ हे ते गाव.  कोकणात नेताना केळद गावाजवळील या घाटरस्त्याचा वापर केला गेला. या टेकडीवरून खाली उतरणाºया मागार्ला मढे घाट म्हणतात. ग्रामीण भाषेत मृत व्यक्तीला ‘मढे’ असे संबोधतात. त्यावरून या पायवाटेतील घाटाला मढे घाट असे म्हणतात. भटकी मंडळी मढ्या, उपांड्या किंवा मढ्या शिवथरघळ, कावळ्या किल्ला अशा भटकंत्या करतात. केळदहून पुढे मढे घाट सुरू होतो. पायवाटेने कोकणातील कर्णवाडी साधारणपणे २ ते ३ किलोमीटर अंतरावर असणाºया या गावात उतरतो.   मढे घाट, पुण्यापासून अगदी एका दिवसात सहज जाऊन येण्यासारखी जागा आहे. फक्त स्वत:चे वाहन असावे एवढेच.  हा घाट पुणे आणि रायगड जिल्ह्यांच्या सीमेवर आहे. पूर्वी घाटावरील गावांना व तळकोकणातील महाड, बिरवाडी बंदरांना जोडणाºया महत्त्वाच्या घाटावाटांमध्ये या घाटाचा उल्लेख येतो.  सह्यादी पर्वताच्या अनेक डोंगररांगा आहेत. प्राचीन काळापासून ते आजच्या अत्याधुनिक युगातही हया वाटा अजूनही वापरत आहेत. डोंगर एका बाजूने चढून गेल्यास दुसºया बाजूने उतरण्यासाठी या घाट रस्त्याचा वापर करावा लागतो. काही वाट या फक्त आणि फक्त पायी जाणे शक्य असते, तर काही गाडी रस्ते किंवा रेल्वेने शक्य आहे. मढे घाट, सवाष्णी घाट, बोचे घळ, बोप्या घाट, बैलघाट, शिंगणापूरची नाळ अशी कितीतरी घाटवाटा सह्याद्रीच्या वेड्यांना खुणावत असतात.

काहीसे मनातील :

नरवीर तानाजींच्या सिंहगड पराक्रमानंतर त्यांच्या मृत्यूची दु:खद आठवण ज्या सह्याद्रीने अजूनही जुपून ठेवली आहे. तो हा रांगडा मढे घाट. पावसाळी पर्यटनाच्या नावावर सध्या अनेक पर्यटन व ऐतिहासिक स्थळांची सुरू असलेली विटंबना पाहून मन खिन्न होते. मोठमोठ्यांदा गाणी लावून, हातात बाटल्या घेऊन झिंगत चाललेली ‘मढी’ बघीतली की वाटते. यांच्यातील एखादा तरी या ठिकाणावरून पडला पाहिजे. म्हणजे बाकीच्यांची तरी मस्ती जिरेल. या तळीरामांचा स्वैराचार मनाला अस्वस्थ करून जातो. खरे तर अशा ठिकाणी पर्यटनकाळात पोलिसांनी चौकी उभारून चेकिंग करूनच पर्यटकांना सोडले पाहिजे. जेणेकरून ऐतिहासिक स्थळे, व निसर्गाचा मान, आदब राखला जाईल. खरे तर याचे भान प्रत्येकानचे ठेवायला पाहिजे. छत्रपती शिवाजीमहाराज की जय म्हणत घाणारडी व्यसने करत असलेली तरणाईला लगाम लावायलाच हवा. व्यसनासाठी न जाता मोकळ्या मनाने जाऊन निसर्गाचा खरा आनंद घ्यायचा असेल तरच या ठिकाणी जावे हीच अपेक्षा.

कसे जाल :

  • मढे घाट, उपांड्या घाट अशा वाटांना भेट द्यायची असेल, तर स्वत:चं वाहन सोबत असलेलं बरे.
  • पुण्यातून सकाळी लवकर निघून एका दिवसात पाहता येण्यासारखे हे ठिकाण आहे.
  • फक्त पावसाचा अंदाज बांधून हे स्थळ पहा. कारण धो-धो पावसात हे ठिकाण अवघड होऊ शकते.
  • पुण्यापासून अंदाजे ७० किलोमीटर अंतरावर
  • घाटमाथ्यावरच्या गाव केळद गावाजवळ हा घाट आहे.
  • मढेघाटात जाण्यासाठी पुण्याहून दोन मार्ग आहेत.
  • एक पुणे-सातारा रस्त्यावरील नसरापूर फाट्याहून राजगड किल्याशेजारून वेल्ह्याला जाणारा
  • दुसरा खडकवासला धरणामागच्या खानापूरहून डाव्या हाताला पाबे गावाकडून वेल्ह्याला येणारा.
  • वेल्ह्याच्या बाजारपेठेतून हा रस्ता आपल्याला केळद गावाकडे घेऊन जातो.  
  • वेल्ह्यावरून किंवा नसरापूरहूनही थेट केळदपर्यंत जीपही ठरवता येते.  पण हे थोडे खर्चिक व वेळकाढू काम आहे.
  • मढे घाटाच्या वाटेवर हॉटेल असून, जेवणाची सोय होऊ शकते.

कॉपी करू नका