Tuesday, January 31, 2017

घाटांचा रक्षक ‘तिकोना’


२६ जानेवारी २०१७

सुमारे २२ वर्षांपूर्वी मी गडाचे पहिले पदभ्रमण केले होते. यानंतर आधे-मधे कधी मित्रांबरोबर तर कधी एकटाच असे दहा पंधरा वेळा तरी वेगवेगळ्या मार्गे तिकोना सर केलेला होता. आज २६ जानेवारी. मॉल किंवा पिक्चरला न जाता ट्रेकर्स लोकांची पंढरी म्हणून समजल्या जाणाºया मावळातील तिकोना किल्यावर जाण्याचा मनोदय घरच्यांपुढे मांडला. त्यांनीही काही तक्रार न करता जाऊ या असा ग्रीन सिग्नल दिला. मग आमची स्वारी निघाली ती तिकोना किल्याकडे. या विषयी या लेखात....

 पवन मावळात वसलेला आणि आपल्या वैशिष्टपूर्ण अशा त्रिकोणी आकाराने पटकन ओळखता येण्यासारखा किल्ला म्हणजे ‘किल्ले तिकोना उर्फ  वितंडगड’  पवन मावळातील जुन्या काळचा घाटरक्षक दुर्ग म्हणून ओळखला जातो.
पवन मावळ. बारा मावळांपैकी एक. लोणावळयाच्या दक्षिणेकडे सहयाद्रीत उगम पावणाºया पवना नदीचे हे खोरे. पिंपरी-चिंचवड परिसराला याच धरणातून वर्षभर पाणीपुरवठा केला जातो. या नदीवर १९७५ मध्ये पवना धरणाचा विस्तीर्ण जलाशय साकारला आहे. दोन मोठ्या किल्यांच्या म्हणजेच लोहगड आणि विसापूरच्या काहीसा मागे लपलेला हा किल्ला आपल्या थेट नजरेस पडत नाही.  (मळवली बाजुने पाहिल्यास ) चौथ्या शतकापासून, राजा भोज, यादव काळापासून या गडाचे इतिहासातील उल्लेख मिळतात. कोकणातील बंदराना घाटमाथ्याशी जोडणाºया अनेक घाटवाटा या परिसरात आहेत. सध्याचा मुंबई-पुणेचा बोरघाट चढून आल्यावर कार्ले,  भाजे, (मळवली) बेडसे, भंडारा आणि शेलारवाडी (देहूरोड) येथे लेणी उभारली गेली. या लेण्यांच्या सुरक्षिततेसाठी उभारलेले किल्ले म्हणजे लोहगड, विसापूर, तुंग आणि तिकोना. प्राचीन काळी या मार्गावर व लेणीच्या संरक्षणासाठी या दुर्गांची निर्मिती केली गेली होती.  पुण्याच्या डेक्कन कॉलजेच्या संशोधनानुसार सातवाहनोत्तर असा काळ निश्चित केला गेला आहे.  समुद्रसपाटीपासून ३४८० फूट (९९३ मीटर) उंचीवरील हा किल्ला.



सोमाटणे फाटा मार्गे परंदवडी, बेबेडओहोळ व तेथून पवनानगर असा मार्ग क्रमात आम्ही तिकोना पेठेत येऊन पोहोचलो.  तिकोना पेठेतून गडावर दोन वाटा जातात. एक सरळ उभ्या चढणीची, तर दुसरी लांबची गडाच्या डावीकडील खिंडीतून वर जाणारी सोपीवाट. आम्ही दुसºया मार्गे गेलो. पावसाळा होऊन गेल्यानंतरही सध्या येथील रस्ता शाबुत आहे. थेट गडाच्या पायथ्याशी गाडी पार्किंग करून किल्यावर जाण्यास सुरूवात केली. हा मार्ग अतिशय सोपा. नवख्यांना काहीसा दमवणारा. तरीही सहज गडावर जाता येण्यासारखा असा.
तिकोना गड तसा फार छोटा. त्यातही गडाचा घेराही कमी. त्यामुळे पायथ्यापासून चालण्यास सुरूवात केल्यानंतर अवघ्या तासाभरातच आपण बालेकिल्यावर पोहोचतो. गडाचा घेरा फार मोठा नसल्यामुळे अर्धा तास किल्ला पाहण्यास पुरेसा होतो.

पहिल्या वाटेने वर आलो तर गडाच्या पहिल्या दरवाजातून माचीवर प्रवेश होतो. तर दुसºया वाटेने आपण खिंडीजवळून माचीत दाखल होतो. काशिगकडून येणारी वाटही इथेच येऊन मिळते. याशिवाय घेवंडमार्गे येणारी वाट वेताळ दरवाजातून माचीत दाखल होते.






महाराष्ट्रातील बहुतेक गडांच्या प्रवेशमार्गावर हनुमानाच्या मूर्ती हमखास दिसतात. गडाच्या या छोट्याश्या माचीवर दाखल होताच मारुतीची एक भलीमोठी मूर्ती आपल्याला दर्शन देते. सुमारे ४-५ फूट उंचीची शेंदूर फासलेली ही मारुतीरायांची मूर्ती. इतर मूर्तींप्रमाणे हातात द्रोणागिरी पर्वत उचललेली नसून पायाखाली दैत्य मारलेली विजयी मद्रेतील लढवैय्यी मूर्ती  आहे.   दुर्गप्रेमी संस्थांनी  येथे स्वच्छता व डागडुजी केल्याने परिसर स्वच्छ करून ठेवला आहे. विशेष म्हणजे गड आपल्याला कसा वाटला याची नोंदवहित प्रतिक्रिया देण्यासाठी गडावर मावळी वेशभूषेत  चक्क सहकारीही ठेवला आहे. येथून थोड्याच अंतरावर किल्याच्या बांधकामासाठी वापरला जाणारा चुन्याचा घाणा आहे. या ही ठिकाणी स्वच्छता केलेली आढळून येते.  काही जुन्या घरांचे जोते दिसतात. येथून थोडे पुढे उभ्या कातळात खोदलेले एक लेणे आहे. तळजाई मंदिर म्हणून येथील परिसरात हे लेणे परिचयाचे आहे. पाच खोल्यांमध्ये विभागलेल्या या लेण्याच्या एका दालनात तळजाईची स्थापना केलेली आहे. या लेण्यासमोर एक टाकेही खोदलेले आहे. या टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. सिंहगडावरील देवटाक्याप्रमाणेच हे पाणीही गोड व थंडगार असते.
गडाच्या दरवाज्यातून आत शिरल्यावर डावीकडे काहीसे अंतर चालून गेल्यावर एक पाण्याचे टाके आणि गुहा लागते. गुहेत १० ते १५ जणांची राहण्याची सोय होते. मात्र पावसाळ्यात मात्र, पाणी शिरते. गुहेच्या बाजुने वर जाणारी वाटेने थेट बालेकिल्याच्या प्रवेशद्वारापाशी पोहचतो.

बालेकिल्ला : 

राजगडप्रमाणे याही किल्याला बालेकिल्ला लाभला आहे. या बालेकिल्यावर जाण्यासाठी आधी दोन दरवाज्यातून आपणास जावे लागते. प्रवेशद्वाराच्या पायºया या दमछाक करणाºया आहेत. सध्या किल्याचे दुर्गप्रेमींकडून डागडुजीचे काम सुरू आहे. या पायºयांवर चढण्यासाठी तोल जाऊ नये म्हणून आधारासाठी दोरी लावलेली आहे. या दोरीच्या साहयाने सहजच बालेकिल्यापर्यंत जाता येते.  बालेकिल्ल्याची ही वाट उभ्या चढणीची व अरुंद अशी आहे. कातळात खोदलेल्या एक ते दीड फूट उंचीच्या सुमारे पन्नास पायºया चढल्यावर पहिला दरवाजा येतो. उजव्या हातास पाण्याचे एक खोदीव टाके आहे. पहिल्या दरवाजापासून ते दुसºया दरवाज्यापर्यंत उभा कातळ फोडून ही वाट तयार केली आहे. येथपर्यंत किल्ला चढून दमून आलेले काहीजण या अलिकडेच धारातीर्थ होतात. दमछाक करणारा हा छोटासा ट्रेक आहे. दहा ते पंधरा फूट उंचीच्या या नाळेतून ही दोन ते तीन फूट रुंदीची वाट वर चढते.  अरुंद वाट, उंच पायºया आणि अंगावर येणाºया उभ्या कातळभिंती आपल्याला एका वेगळ्याच गूढ विश्वात घेऊन जातात. गडाची निर्मिती, शिल्पकार कोण असावा? कोणास ठाऊक मात्र, बांधणी सुरेख केलेली आहे. शत्रू जरी येथपर्यंत आला तरी एका वेळी एकजणच वर येता येईल अशा येथील पायºयांची रचना आहे.
दुसरा दरवाजा हा पहिल्यापेक्षा थोडा मोठा. दरवाजा बंद केल्यानंतर या ठिकाणी असणारा लाकडाचा अडसरासाठी खोबणी दिसून येतात. अर्धवर्तुळाकार बुरूजाच्या मध्ये भागी असलेल्या दरवाजाचे काळाच्या ओघात आता त्याचे काही अवशेषच राहिलेले दिसून येतात. उजव्या हातास पाण्याच्या सलग चार खोदीव टाक्या आहेत. तर डावीकडे ढालकाठीचा बुरूज आहे. येथून आपण चढून आलेला काही परिसर दिसून येतो.  येथून पुढे गडाचा तिसरा दरवाजा येतो. याला ओलांडतच आपण बालेकिल्यात प्रवेश करतो. बालेकिल्यावर महादेवाचे मंदिर आहे. मंदिरामागे पाण्याचा मोठा खंदक आहे. याच्या मागील बाजूस ध्वजस्तंभ आहे.  धान्याची कोठारे असे थोडेफार अवशेष व दगडविटांचे ढिगारे इथे दिसतात. गडावरून संपूर्ण मावळप्रांत आपल्या नजरेत येतो. पावसाळ्यात येथील वातावरण एकदम बदलून जाते.
मुलाचा असला किल्ला सर करण्याचा पहिलाच अनुभव. त्यामुळे काहीसा माझ्यावरचा राग... थोडे अंतर पार झाल्यावर बसण्याची व पाणी पिण्यासाठी हट्ट... माझे त्यावर नाही म्हणणे. या सर्व गोष्टी करत करत एकदाचे आम्ही बालेकिल्यावर जाऊन पोहचलो. वरील सर्व वातावरण पाहून तो खूष झाला. आपणही एवढ्या उंचावर येऊ शकतो ही भावना त्याच्याकडून ऐकल्यावर किल्यावर आल्याचे सार्थक झाले. थोडा वेळ थांबून आम्ही परतीच्या वाटेला लागलो. अर्ध्या तासातच नॉन स्टॉप आम्ही खाली आलो.











लांबून गड किल्ले बघायला येणाºयांसाठी :
स्वत:चे वाहन असल्यास भाजे लेणी, लोहगड, विसापूर, पवना डॅम शेजारून तिकोना व तुंग व बेडसे लेणी असा दोन दिवसांचा जलद ट्रेक ही करता येऊ शकतो. यापैकी लोहगडावर राहण्याची सोय होऊ शकते. तुंग किल्यावर जाण्यासाठी पूर्वी लाँचची सेवा उपलब्ध होती. मात्र, सध्या ती सुरू नाही. त्यासाठी एसटी बसने अथवा खासगी वाहनाने तुंगवाडीपर्यंत जाता येते.














गडाचा इतिहास : 

इ.स. १५८५ च्या सुमारास निजामशाहीचा सरदार मलिक अहमद निजामशहा याने हा किल्ला जिंकला आणि किल्ला निजामशाहीत सामील झाला. छत्रपती शिवाजीमहाराजांनी १६५७ मध्ये जुन्या निजामाकडुन कोकणातील माहुली, लोहगड, विसापूर, सोनगड, तळा व कर्नाळा या किल्यांबरोबरच हा किल्ला देखील आपल्या स्वराज्यात सामील करुन घेतला. या भागाच्या सुरक्षिततेसाठी नेताजी पालकर यांची नियुक्ती करण्यात आली. इ.स. १६८२ च्या आॅगस्ट महिन्यात संभाजीमहाराज व अकबर (औरंगजेबाचा मुलगा) यांची भेट झाली. या भेटीनंतर अकबर तिकोना किल्यावर काही काळ राहिला. मात्र येथील हवा न मानवल्याने त्याला जैतापूर येथे धाडण्यात आले. पुढे मोगल सरदार अमानुल्लाखानने इ.स.१७०२ मध्ये हा गड जिंकला. विजयाची निशानी म्हणून औरंगजेबाकडे सोन्याच्या किल्या पाठविल्या. तिकोना हाती येताच औरंगजेबाने त्याचे नाव ठेवले ‘अमनगड’ असे ठेवले.  मात्र, काही वर्षांतच औरंगजेबाचा मृत्यू झाला व पुन्हा तिकोना पुन्हा मराठ्यांनी जिंकून घेतला. पुढे १८१८ च्या इंग्रज-मराठे शेवटच्या लढाईपर्यंत हा किल्ला मराठ्यांकडे होता. या लढाईत कर्नल प्रॉथरने हा गड जिंकला. पण तो पुढे पुन्हा भोर संस्थानकडे देण्यात आला.
सध्या पुण्यातील श्री शिवदुर्ग संवर्धन संस्थेतर्फे  किल्याच्या डागडुजीचे काम सुरू आहे. खरे तर छत्रपती शिवाजीमहाराजांच्या प्रत्येक किल्यावर अशा प्रकारचे काम जोरात सुरू करायला हवे. मुंबईतील अरबी समुद्रात महाराजांचा अश्वारुढ पुतळा बांधण्यासाठी लागणारे करोडो रुपये खर्च करून काय साधणार? त्यापेक्षा महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्रातील अशा शेकडो किल्यांवर हा पैसा चांगल्या मार्गाने व खºया अर्थाने खर्च केल्यास महाराजांना मुजरा केल्यासारखेच होईल.



किल्यावरून दिसणारा परिसर :
तिकोना किल्यावरून तुंग, लोहगड, विसापूर, कोरीगड, भातराशीचा डोंगर, जांभुळीचा डोंगर, पवन मावळ परिसर, फागणे धरण (पवना डॅम) हा सर्व परिसर नजरेत येतो.
सर्व गड फिरण्यास १ तास पुरतो.

कसे जाल :

मुंबईकडून येणाºया पर्यटकांसाठी :


लोणावळा रेल्वे स्टेशनला उतरल्यावर तेथून पुण्याकडे जाणाºया रेल्वेने दोन स्टेशन पुढे असलेल्या कामशेत या स्टेशनावर उतरावे. कामशेत ते काळे कॉलनी अशी बस सेवा, जीपसेवा उपलब्ध आहे.
मुंबईहून येणाºया पर्यटकांसाठी दुसरा मार्ग म्हणजे लोणावळ्याच्या पुढील रेल्वे स्टेशन मळवली. तेथे उतरून भाजे लेणी, विसापूर, लोहगडला रात्री मुक्काम व दुसºया दिवशी तिकोना व तुंगी किल्ला करून तेथूनच लोणावळ्याला जाणाºया एसटीने मुंबईला जाता येते.
कामशेतपासून सकाळी ८.३० ला सुटणारी पौड एसटी बस पकडून तिकोनापेठ या गावी उतरावे. तसेच कामशेत ते मोर्सेबस पकडूनही तिकोनापेठला उतरता येते. तिकोनापेठतून ४५ मिनिटात आपण किल्यावर पोहचता येते.

पुण्याकडून येणाºया पर्यटकांसाठी :

पहिला मार्ग :
पुण्याहून येताना सोमाटणे फाटा येथे शिरगावच्या पुढे म्हणजेच जुन्या पुणे-मुंबई महामार्गाच्या डावीकडे एक्सप्रेस हायवेला जाणाºया मार्गाकडे जाण्यास निघावे तेथून पूल ओलांडून आपण परंदवडी, बेबेडओहळ मार्गे पवनानगर व तेथून तिकोना किल्यावर जाता येईल. हा प्रवास विशेषत: पावसाळ्यात खूपच सुंदर असतो. छोटे रस्ते, सर्वत्र भाताची लावणी सुरू असते. हे सर्वत्र दृश्य मनमोहक असते.

दुसरा मार्ग :

पुणे-मुंबई महामार्गावरील कामशेतपासून डावीकडे वळून पंधरा किलोमीटरवर पवना धरण. या धरणालगतच्या पवनानगर, काळे कॉलनी भागापर्यंत तळेगाव, कामशेतहून एस.टी. बस येतात. इथून चार ते पाच किलोमीटरवर तिकोना गड आहे. दक्षिणेकडून पौड- कोळवण-काशिग मागेर्ही गडापर्यंत एक रस्ता येतो. यासाठी पुण्याच्या स्वारगेटहून सुटणारी जवण, काशिगची एसटी सुविधा आहे. याशिवाय कामशेत, तळेगावहूनही जवणच्या दिशेने देखील काही एसटी बस धावतात. यापैकी कुठलीही बस मिळाल्यास गडाच्या पायथ्याशी असलेल्या घेवंड गावी उतरून तिकोना किल्ला पाहता येतो. स्वत:चे वाहन असल्यास पुण्याहून दोन ते अडीच तासात किल्याच्या पायथ्याशी पोहाचता येते.




 

 

 

पार्किंगसाठी पैसे :

शनिवार, रविवार व सुटीच्या दिवशी येथे पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. स्थानिकांना रोजगार मिळाला. मात्र, काहीजण या रोजगाराकडे पैसे उकळण्याचे साधन समजू लागले आहेत. गडाच्या पायथ्याशी पोहचल्यावर गाडी लावण्यासाठी  टू व्हिलरला २० रुपये, फोर व्हिलरसाठी ४० रुपये अशा प्रकारचे पार्किंग दर आकारले जात आहे. वादविवाद केल्यास ही जागा अमुकअमुक यांची असून, त्यासाठी हा दर आकारला जात आहे असे सांगितले जाते. येथे येणारा पर्यटक गडाच्या पायथ्यापर्यंत आल्यानंतर हे दर पाहून आश्चर्यच व्यक्त करतो. काही पर्यटक पैसे न देण्याची भाषा करू लागतो. प्रसंगी भांडणे होतात. हवा सोडून देण्याची भाषा ही बोलली जाते. हे कुठेतरी टाळणे गरजेचे आहे. यासाठी नाममात्र दर आकारल्यास अधिक पर्यटन घडून स्थानिकांना रोजगार होऊ शकतो.




वरील लेख कसा वाटला या विषयी जरूर प्रतिक्रिया कळवा.

कॉपी करू नका