Thursday, September 26, 2013

पुण्याचे वैभव : शनिवारवाडा (भाग १)




गणपती दर्शनासाठी पुण्यात गेलो होतो. पुण्यातील शनिवारवाड्याजवळून जात असताना माझ्या लहान मुलाने घोड्यावरील स्वार झालेल्या पुतळ्याकडे लक्ष वेधून विचारले, ‘‘बाबा हा शिवाजी का? मी नाही म्हणताच मग कोण? बाजीराव पेशवे म्हटल्यावर ते बाजीराव ‘सिंघम’ का? असा उलट प्रश्न त्याने केला. तो लहान असल्याने मी जास्त लक्ष दिले नाही. सध्याच्या पिढीला बाजीराव सिंघम माहिती आहे मात्र, बाजीराव पेशवे माहिती नाही. मुलाला इतके दिवस आपण शनिवारवाडा कसा दाखविला नाही याचे मलाच आश्चर्य वाटले. गणपती पाहायला वेळ होता. तेव्हा तासाभरात शनिवारवाडा दाखवू असे ठरवून मुलाला शनिवारवाडा दाखवून आणला. त्यानिमित्ताने का होईना मीही बºयाच वर्षांनी शनिवारवाडा पाहणार होतो. लहानपणी शनिवार पेठेतील आजी व मावशीकडे गेलो की मी व माझे मावसभाऊ व त्यांचे मित्र असे शनिवारवाड्यात लपाछपी खेळायला जायचो. मजा यायची.
              मराठ्यांच्या भरभराटीचा व अस्ताचा साक्षीदार ठरलेला ‘शनिवारवाडा’. पुण्यात शनिवारवाड्यासमोर घोड्यावर बसलेला, हातात भाला घेऊन शत्रूच्या उरात धडकी भरणारा आवेशपूर्ण असा पुतळा दिसतो.  पुण्याच्या वाढत्या इमारतींच्या साम्राज्यात आपले अस्तित्व टिकून राहिलेला हा शनिवारवाडा केवळ पुण्याचे नव्हे तर महाराष्ट्राचे भूषण आहे.  शनिवारवाड्यात पेशवे राहत असत. थोरले बाजीराव पेशवे यांनी हा वाडा बांधला. भगवी झेंडा ते युनियन जॅक फडकताना या वाड्याने अनुभवला आहे. आपल्या अनेक कटू व काही सुखद आठवणी घेऊन हा वाडा आजही उभा आहे. अनेक घटना, दुर्घटना पाहिल्या. पानिपतचे महायुद्ध असो, त्यानंतरचा तोतया भाऊसाहेब, राघोबादादांची अटेकपार स्वारी,  नारायणरावाचा खून असो , राजकारणं, लग्नसमारंभ व मंगल प्रसंग पाहिले. आपल्या कारकिर्दीत प्रत्येक पेशव्याने येथे बांधकाम करून वाड्याच्या सौंदर्यात भर टाकली.  तर १७ नोव्हेंबर १८१७ ला वाड्यावर ब्रिटिशांचे निशाण लागले. मात्र, दुर्देवाने १८२७ मध्ये लागलेल्या आगीत वाडा आतून जळून नष्ट झाला. यानंतर इंग्रजांनी या ठिकाणी जेल, हॉस्पिटल, शासकीय कार्यालये आदी सुरू केले होते. यानंतर १९१९ मध्ये वाडा संरक्षित स्मारक म्हणून जाहीर झाला. पुण्याचे सध्याचे विस्तारीकरण या शनिवारवाड्याच्या आजुबाजूला झालेले आहेत.


               सध्या शनिवारवाड्यात पाहण्यासारखी काहीच अवशेष उरलेले आहेत.  इ.स. १८२८ साली लागलेल्या आगीत हा सात मजली वाडा पूर्णपणे जळून गेला. त्यामुळे खºया स्वरूपातील वाडा आपण आज शकत नाही. पुरातत्व विभागाने बसवलेल्या फलकावरून आपणाला त्याची माहिती व अंदाज करता येतो. दिवाणखाना, गणेश महाल, रंगमहाल, हस्तिदंतीमहाल, हजारी कारंजे यांचे केवळ अवशेष पाहण्यास मिळतात. एक तर येथील तटबंदी आणि बुरुज, दिल्ली दरवाजा व अन्य दरवाजे,  नगारखाना.

तटबंदी आणि बुरुज

शनिवारवाड्याचा आकार चौकोनी असून जवळपास ६.२५ एकर जमीन वाड्याने व्यापली आहे. तटबंदीची उंची अंदाजे ३३ ते ३४ फुट असून खालील १० ते १८ फूट उंचीचा तट हा दगडी चिरेबंदी आहे तर वरचे बांधकाम विटांचे आहे. संपूर्ण वाड्याभोवती असलेल्या तटबंदीमध्ये बंदुकीतून गोळ्या झाडण्यासाठी जंग्या अर्थात भोके ठेवण्यात आली आहेत. तटास एकूण ९ बुरुज आहेत. या सर्वांवर तोफा बसवण्याची व्यवस्था असे. उत्तर पेशवाई मध्ये वायव्य बुरुजास तोफेचा बुरुज तर पश्चिम बुरुजास पागेचा बुरुज म्हणत.  तट रुंद असल्याकारणाने आत शिपार्इंच्या खोल्या होत्या. तटावर जाण्यासाठी एकूण नऊ जिने  १ दिल्ली दरवाज्याजवळ, १ मस्तानी दरवाज्याजवळ, १ नारायण दरवाज्याजवळ, २ पागेच्या बुरुजाजवळ आणि २ तोफेच्या बुरुजाजवळ, २ खिडकी दरवाज्याजवळ आहेत. बाजीराव पेशव्यांचे चिरंजीव बाळाजी बाजीराव यांनी १७५० ला वाड्यात बरेच बदल केले. अनेक नवीन इमारती बांधल्या. १७८० च्या सुमारास सवाई माधवराव पेशव्यांच्या काळात नाना फडणवीस यांनी नवीन खोल्या, दिवाणखाने, कारंजी बांधली. पेशवे कुटुंबातील परिवाराला रहाण्यासाठी, अनेक दालने व सदनिका शनिवारवाड्यात होत्या. जवाहिरखाना, तिजोरीची खोली, भांडार, वाचनालय, जिन्नसखाना, औषधालय, शस्त्रास्त्रांची खोली, दस्तऐवज ठेवण्याची खोली आणि चित्रशाला अशी स्वतंत्र दालने होती. महालांच्या बाहेर असलेल्या  चौकांच्यात कारंजी बांधण्यात आलेली होती. हजारी कारंजे या नावाने ओळखले जाणारे एक विशेष कारंजे होते. ८० फुटाचा परिघ असलेले एक १६ पाकळ्यांचे कमळ या कारंजात बनविण्यात आले होते. यातल्या प्रत्येक पाकळीवर पाणी उडण्यासाठी १६ नळ होते.

वाड्यास एकूण ५ दरवाजे  सध्या या दरवाज्याच्या शेजारून रस्ता गेला आहे. सतत गाड्यांची वाहतूक होत असते.



अष्टकोनी बुरुज

बांधकामाची माहिती :

संभाजीमहाराजांचे पूत्र शाहूमहाराज मोगलांच्या कैदेतून सुटले. त्यानंतर त्यांनी सातारा येथून राज्यकारभार करण्यास सुरूवात केली. पुण्याचे सरसुभेदार बाळाजी विश्वनाथ होते. त्यांना १७१३ मध्ये शाहूंनी ‘पेशवे’ हे पद दिले. बाळाजी विश्वनाथांनी आपला कारभार सासवड व सुप्यावरून सुरू केला. १७२० ला बाळाजी विश्वनाथ मृत्यू पावले.  त्यानंतर त्यांचा थोरला मुलगा बाजीरावला १७ एप्रिल १७२० ला शाहूमहाराजांनी पेशवाईची वस्त्रे बहाल केली.  सुरूवातीची काही वर्षे त्यांनी सासवड व सुप्यावरून पेशवाईचा कारभार सुरू केला. पाण्याची कमतरतता व राजकीयदृष्ट्या सोयीचे म्हणून पुणे येथे कारभार करण्याचे ठरले. कारण जवळच असलेले राजगड, तोरणा, पुरंदर, सिंहगड सारखे बळकट किल्ले होते. पुण्यात पेशव्यांचे स्वत:चे घर नव्हते.  पुणे पूर्वी फार लहान गाव होते. छोट्या छोट्या वस्त्या होत्या. यातच कसबा पेठ होती. पेठेजवळ शनिवार पेठ होती. लाल महालाच्या शेजारीच बाजीरावांनी स्वत:चा वाडा बांधण्याचे ठरविले. वाड्याची पायाभरणी शनिवार, १० जानेवारी १७३० ला केली गेली.  बांधकाम २२ जानेवारी १७३२ रोजी पूर्ण झाले. १६,०१० रुपये खर्चून हा वाडा उभारला गेला. वाडा शनिवारपेठेत होता. म्हणूनच की काय या वाड्याचे शनिवारवाडा असे नाव ठेवले असावे. वाड्याच्या कोटाचे काम सुरू झाले. पेशव्यांनी वाड्याला कोट घालावा व सगळ्या पुण्याभोवती वस्तीला कोट करावा हे छत्रपती शाहूमहाराजांनी हे पसंत पडले नाही. त्यांचे म्हणणे होते की, ‘अशा प्रकारच्या वाडा बांधल्यास तो जर चुकून मोगलांच्या ताब्यात गेला तर परत जिंकणे अवघड होऊन बसेल.  व त्याच्या आसºयाने आणखीही काही ठिकाणे मोगल जिंकू शकतील. परिणामी शाहूमहाराजांच्या आज्ञेनुसार कोटाचे काम थांबविण्यात आले.
बाजीरावांच्या काळात वाड्याचे बांधकाम लहान स्वरूपाचे होते. १७४९ ला छत्रपती शाहूमहाराजांचे निधन झाले. मराठ्यांच्या राजकारणाची सूत्रे नानासाहेब पेशवे ऊर्फ बाळाजी बाजीराव यांनी पुण्यास आणली. त्यामुळे महाराष्टÑाच्याच नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानच्या राजकारणाचे केंद्र पुणे बनले. त्यानंतर शनिवारवाड्याच्या इतर बांधकामास सुरूवात झाली. अर्धवट काम पूर्ण करून त्या जागी दिल्ली दरवाजा, बुरुजयक्त तटबंदी बांधण्यात  आली. वाड्याच्या सर्व तटांवर २७५ शिपाई, रात्रंदिवस ५०० स्वार व अंतर्गत बंदोबस्तासाठी १०००हून अधिक नोकर होते.

दिल्ली दरवाजा

१. दिल्ली दरवाजा :

शनिवारवाडा पाहण्यासाठी आलेला प्रत्येक पर्यटक याच दरवाज्यातून प्रवेश करून वाड्यात प्रवेश करतो. आपल्या वैशिष्टपूर्ण दिल्ली दरवाजाने शनिवारवाडा ओळखला जातो. हत्तींच्या धडकांपासून दरवाजा सुरक्षित ठेवण्यासाठी अणकुचीदार खिळे आणि जाडजूड पट्ट्या येथे बसविलेल्या आहेत. दरवाज्याची रुंदी १४ फूट तर उंची २१ फूट आहे.  दिल्ली ही उत्तरेला असल्यााने या उत्तरकडे असणाºया दरवाज्याला दिल्ली दरवाजा म्हणतात. वाड्यातील इतर दरवाज्यांच्या तुलनेने हा दरवाजा सर्वात मोठा आहे. आत प्रवेश करण्यासाठी छोटा दिंडी दरवाज्यातून आपला प्रवेश होतो. पुरातत्व विभागाने या ठिकाणी पर्यटकांसाठी तिकीट घर उघडले असून, तिकीट घेऊन आपण आत प्रवेश करतो.
शेषशायी विष्णू व गणेशाची चित्रे





नगारखाना

दिल्ली दरवाज्यातून आत गेले कि नगारखान्याची दोन मजली इमारत दिसते. तळमजला हा पूर्णपणे चिरेबंदी असून तो २७ फूट उंच आहे. तळमजल्यामध्ये दिल्ली दरवाज्याच्या दुमजली देवड्या, पहारेकºयांच्या कोठड्या व वरच्या मजल्यावर जाण्याचा जिना आहे. देवडीच्या भिंतीवर शेषशायी विष्णू, गणेश इ.ची पुसट चित्रे दिसतात. वरती नगारखान्यात गेल्यावर पुणे परिसरचा काही भाग पाहता येतो. झपाट्याने विस्तारलेले पुणे व आजुबाजूचा भाग दिसतो. जवळच असलेली पर्वती ही दिसते.
भग्नावषेशातून नगारखाना

जुने कारंजे



माहिती व छायाचित्रे जास्त असल्याने कृपया येथे (भाग २) वर क्लिक करा.

No comments:

कॉपी करू नका