Sunday, June 23, 2013

इंदोरीचा किल्ला



दाभाडे सरकारांचा इंदोरीतील भुईकोट किल्ला


तळेगाव दाभाडेपासून पूर्वेस ५ कि.मी. अंतरावर चाकण-तळेगाव मार्गावर इंदोरी गाव आहे. येथे इंदोरीचा हा भुईकोट किल्ला आहे. महाराष्ट्रातील इतर भुईकोट किल्ल्यांप्रमाणे या भुईकोट किल्ल्याचे अस्तित्व नष्ट होऊ लागले आहे. सध्या किल्ल्यामध्ये कडजाई देवीचे मंदिर असून हे देवस्थान जागृत असल्याचे मानले जाते. पूर्वी संरक्षणाच्या दृष्टीने गाव सैन्यासह तटबंदीच्या आत किल्ल्यात वसलेले होते. कालांतराने गाव किल्ल्याबाहेर आले.




        इंदोरीच्या किल्ल्याला दहा बुरुज, घोड्यांचा तबेला आणि किल्ल्याची तटबंदी एवढेच अवशेष तग धरून अजूनही इतिहासाची साक्ष देत आहेत. उत्तर-दक्षिण वाहणाºया इंद्रायणी नदीच्या पूर्व तटावर नैसर्गिक उंच खडकावर हा भुईकोट किल्ला आहे. 
        छत्रपती शाहू महाराजांचे सेनापती खंडेराव दाभाडे यांना तळेगाव हे वतन म्हणून मिळाले. या तळेगावात पाण्याची तळी आहेत म्हणून तळेगाव नाव पडले. कालानंतराने यालाच तळेगाव दाभाडे या नावाने ओळखले जाऊ लागले. दाभाडे घराण्याचे मूळ पुरुष बजाजीराव दाभाडे. त्यांचे नातू  सरसेनापती खंडेराव दाभाडे यांनी १७२०-२१ मध्ये भुईकोट किल्ला बांधला.  दाभाडे यांचे निधन २७ सप्टेंबर १७२९ मध्ये तळेगावच्या जुन्या राजवाड्यात  झाले. त्यांची समाधी इंद्रायणी नदीच्या काठी असलेल्या पुरातन बनेश्वर मंदिराजवळ आहे. वेळेअभावी मला तेथे जाता आले नाही. 
        किल्ल्याच्या आतील अनेक ऐतिहासिक वास्तू केव्हाच काळाच्या पडद्याआड झाल्या असल्या, तरी तटबंदीसह भव्य प्रवेशद्वार अजून अभिमानाने उभे आहे.  जागोजागी तटबंदीची पडझड झालेली आहे. इंदोरीहून १५ किलोमीटरवर असलेल्या चाकणचा भुईकोट किल्ला आहे. त्यामुळे या किल्ल्याला संरक्षणदृष्ट्या फार महत्व प्राप्त झाले. तटबंदीच्या आतील क्षेत्र अंदाजे ६ एकर असे विस्तृत क्षेत्र आहे. सध्या किल्ल्यात थेट मंदिरापर्यंत वाहन जाते. आतमध्ये जागृत ग्रामदैवत कडजाई मातेचे मंदिर, बापुजीबुवांचे मंदिर व बंद पडलेल्या शासकीय दूध शीतकरण केंद्राच्या दुरवस्था झालेली इमारत आहे. वैशाख महिन्यात अक्षयतृतीयेनंतर येणाºया मंगळवारी कडजाई मातेचा वार्षिक उत्सव साजरा केला जातो. 

प्रवेशद्वार 
        पूर्व दिशेला असलेले किल्ल्याचे दुमजली भव्य प्रवेशद्वार आहे. कमानीवर दोनही बाजूस शरभ कोरलेले असून मधोमध गणपती कोरलेला आहे.  प्रवेशद्वाराच्या मध्यावर देवीची कोरीव मूर्ती आहे. प्रवेशद्वाराच्या दोन बुरुजांसह एकूण चौदा बुरूज आहेत. प्रवेशद्वाराचे दोन्ही बुरूज घडीव दगडात बांधलेले आहेत. दरवाज्याच्या कमानींमध्ये दोन्ही बाजूस दोन ओवºया असून, पहारेकºयांसाठी दोन दोन देवड्या आहेत. वरच्या मजल्यावर नगारखाना होता. तिथे हत्तीचे दगडी चित्र कोरलेले आहे. तटबंदी सुमारे ५ फूट रुंदीची आहे. शत्रूने हल्ला केल्यास जागोजागी तोफा व बंदुकांसाठी  मोठमोठी छिद्रे शत्रूचा ठाव घेण्यास सज्ज आहेत. किल्याच्या पश्चिमेकडील बुरुजावरून खालून वाहणाºया इंद्रायणीचे पात्र व दुरवरचा प्रदेश दिसतो. 
        इंदोरीचा हा भुईकोट किल्ला केवळ इंदोरीचे नाही, तर अवघ्या मावळाचे वैभव व स्वाभिमान आहे.  मावळातील कार्ला, भाजे व बेडसे येथील जगप्रसिद्ध लेण्या, तसेच लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना, राजमाची या गडांप्रमाणेच इंदोरी येथील सरसेनापती खंडेराव दाभाडे यांचा भुईकोट किल्ला याची साक्ष आहे.

नंतर तळेगावाला जाण्यास निघालो. तळेगावात श्रीमंत सरसेनापती दाभाडे घराण्याने जपलेले एक मंदिर पाहण्यास निघालो. मंदिराचे नाव पाच पांडव मंदिर. 







कसे जाल : 

  • तळेगाव दाभाडेमधून चाकणकडे जाणाºया रस्त्यावर सुमारे पाच किलोमीटरवर इंद्रायणीनदीवर दोन पुल उभारलेले आहे. यातून छोट्या पुलाने इंदोरीच्या या भुईकोट किल्ल पाहता येतो. 


अजून काय पाहाल :

पाच पांडव मंदिर

पौराणिक व ऐतिहासिक वारसा असलेल्या तळेगावात  पाच पांडवांचे मंदिर आहे. पौराणिक कथेमध्ये द्रौपदीने दिलेल्या एका शितावर भगवान श्रीकृष्णाचे पोट भरले व त्यामुळे दुर्वास ऋषींचेही काही न खाता पोट भरले असा उल्लेख आहे. ही घटना जेथे घडली ते हे पाच पांडव मंदिर असल्याची आख्यायिका आहे. मंदिराचे तोंड पूर्वेकडे आहे. मंदिर छोटे आहे. दरवाज्यातून पाच पांडवांच्या बैठ्या मूर्ती दिसून येतात. धर्मराज, भीम, अर्जुन, नकुल व सहदेव असे पांडव मूर्ती येथे आहे. आतमध्ये एक छोटा दरवाजा असून, द्रौपदीची निजलेल्या अवस्थेतील मूर्ती आहे.  वषार्तून दोन वेळा, सहा महिन्याने पूर्वेकडे व पश्चिमेकडे मुख करून विश्रांती घ्यायची अशी ही कथा आहे. हे स्थान पाहण्यासाठी लोक आवर्जून येत असतात. या मूर्तींना रंगरंगोटी करून हा ऐतिहासिक वारसा टिकावा म्हणून श्रीमंत सरसेनापती दाभाडे घराण्याने मंदिराची रंगरंगोटी व डागडुजी केली आहे. 

मंदिरातून निघालो व पुणे-मुंबई महामार्गाने सोमाटणे फाट्यावरील शिरगावला जाण्यास निघालो. 



कसे जाल : 

तळेगावात पाच पांडव मंदिर आहे. 

भंडारा डोंगर



अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठोबाच्या वारीला पुणे जिल्ह्यातून अनेक पालख्या निघतात. जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराममहाराजच्या वास्तव्याने पावन झालेले देहूगाव व जेथे महाराजांनी गाथा लिहिली तो भंडारा डोंगरावर आवर्जुन गेलो. त्या विषयी...


 मराठी चित्रपटात तुकाराममहाराजांची पत्नी जिजाबाई एका डोंगरावर भोजन घेऊन जात असल्याचे दाखविले आहे. तोच हा भंडारा डोंगर. भल्या पहाटे उठून तुकाराममहाराज आपली आध्यात्मिक साधना, भजन, लिखाण, चिंतन करण्यासाठी येथे जात असत. देहूगावातील मुख्य मंदिरातून समोरच एक मोठा डोंगर दिसतो तोच हा भंडारा डोंगर. देहूगावातील संत तुकाराममहाराज व  आळंदीतील संत ज्ञानेश्वरमहाराज असे दर्शन करणारे अनेक भक्त या भंडारा डोंगरावर गेल्यावाचून राहत नाही. देहूतून सुमारे सहा किलोमीटरवर असलेल्या भंडारा डोंगराच्या पायथ्यापासून वरपर्यंत मोटार रस्ता तयार केलेला आहे. 


 या डोंगरावर जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी साºया विश्वाला मार्गदर्शक असणाºया गाथेची निर्मिती केली होती. भंडारा डोंगरावर अनेक धार्मिक सोहळे होतात. राज्याच्या कानाकोपºयांतून भाविक लोक या ठिकाणी गाथा पारायण सोहळा करण्यासाठी येतात. येथे येणाºया सर्व भाविकांना तसेच वारकºयांना सप्ताहकाळात रात्रीपर्यंत महाप्रसाद दिला जातो. नित्यनेमाने दररोज दुपारी १२ ते २ या वेळेत भाविकांना महाप्रसाद देण्याची व्यवस्था केली आहे. 
          या डोंगराच्या नावाबाबत एक गोष्ट सांगितली जाते. एकदा छत्रपती शिवाजीमहाराज तुकाराममहाराजांचे दर्शन घेण्यासाठी येथे आले. छत्रपतींच्या समवेत शेकडो मावळे वीर होते. एवढ्या माणसांना प्रसाद म्हणून जिजाबाईने आणलेल्या शिदोरीचे दोन दोन घास दिले तरीही ती शिदोरी संपली नाही. तरीही शेकडो मावळे छत्रपतींसह पूर्ण जेऊन तृप्त झाले. या डोंगरावर अन्न केव्हाच कमी पडत नाही. जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराममहाराजांनी आपल्या ग्रंथातून जगापुढे आध्यात्मिक भांडार उघडून दिले. भंडारा डोंगरावरही भगवंताने जणू काही अन्नासाठी भांडारच उघडून दिले आहे. म्हणून या डोंगराला ‘भंडारा’ असे नाव दिले आहे. 


  भंडारा डोंगरावर जाणारा घाट रस्ता मस्तपैकी नागमोडी वळणे घ्यायला लावणारा आहे. घाट चढताना दिसणारा आजुबाजूचा परिसर सुरेख दिसतो.  एक मोठे वळण घेऊन आपण माथ्यावर पोहोचतो. तिथे गाडी पार्क करून मुख्य मंदिरात जाण्यास निघालो. येथे तुकाराममहाराजांचे एक मंदीर असुन, काही वारकरी मंडळी त्याची देखभाल करतात. मंदिरात संत तुकाराममहाराज, विठोबा-रखुमाई, गणपती, शिवलिंग अशा मुर्ती आहेत. डोंगरावरील एकांत, आजूबाजूचा सुंदर निसर्ग, वाºयाची झुळूक आपल्याला प्रसन्न करते. पावसाळा सुरू झाल्यामुळे आजूबाजुला हिरवाई दिसून येत होती. 





        तुकाराम महाराजांच्या वास्तव्याने देहू गावाला आज तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला आहे. भंडारा डोंगराचा समावेश तीर्थक्षेत्र विकास आराखडयात झाला असल्याने याही ठिकाणी विकासकामे सुरु आहे. महाराष्ट्र शासनाच्या तीर्थक्षेत्र विकास निधीतून या क्षेत्राला  निधी मिळतो. सध्या भंडारा डोंगरावर जाणारा रस्ता मोठा व प्रशस्त बांधलेला आहे. अंदाजे ४० फुट रुंद असा हा रस्ता आहे. सुमारे २  ते अडीच किलोमीटर रस्ता डोंगरपायथ्यापासून मंदिरापर्यंत तयार केला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वारकºयांना पदपथ निर्माण केला आहे. शासनाच्या माध्यमातून वृक्ष लागवडी केल्याचे दिसून आले.  भंडारा डोंगराच्या पश्चिम बाजूला जाधववाडी नावाचे छोटे धरण दिसते. तेथून जवळच सुधा नदीचे उगमस्थान आहे, ही नदी जांबवडे,  सुदवडी, सुदुम्बरे, येलवाडी मार्गे देहूतील इंद्रायणी नदीला जाऊन मिळते. 





           ट्रीप, पिकनिक, मौजमजा, हुल्लाडबाजी करण्यासाठी येणार असाल तर हे ठिकाण नक्कीच नाही. असे करताना आढळल्यास भाविक भक्तांकडून ‘प्रसाद’ नक्की मिळेल. 

          डोंगर उंचावर असल्याने छान गार हवा वाहते. एकदा तरी तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर येऊन त्यांच्या चरणावर मस्तक ठेऊन आशीर्वाद घ्यावा आणि निसगार्चा आनंद घ्यावा. 
         
भंडारा डोंगर उतरून तळेगावकडे जाताना इंदोरी हे छोटे गाव लागते. तेथे इंदोरीचा भुईकोट किल्ला पाहिला.

इंदोरीचा भुईकोट किल्ला


दिसणारा परिसर : 

भंडारा डोंगरावरून देहूतील गाथा मंदिर, भामचंद्र डोंगर, इंद्रायणी नदी, इंदोरीगाव, जाधववाडी धरण परिसर, तळेगाव परिसर, घोरावडेश्वर डोंगर व अय्यप्पा स्वामींचा डोंगर व त्यामागे पसरलेले पिंपरी-चिंचवड शहर दिसते.

कसे जावे : 

  • मुंबई-पुणे रेल्वेमार्गावर तळेगाव हे रेल्वे स्टेशन आहे. जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर तळेगाव आहे. तळेगाव - चाकण रस्त्यावर ५ किलोमीटर अंतरावर डाव्या बाजूस कमान उभारली आहे. तेथून भंडारा डोंगरावर जाण्यासाठी पक्का रस्ता आहे. खाजगी वाहनाने डोंगरावरील मंदिरापर्यंत जाता येते.
  • देहूगावातून येथे जाण्यासाठी व्यवस्था आहे. स्वत:चे वाहन असल्यास गाडी वर पर्यंत नेता येते. 
  • पायथ्यापासून पायी जायचे झाल्यास अर्धा ते पाऊणतास लागतो.

Sunday, June 16, 2013

मुरुगन हिल्स



रविवार होता. लोणावळ्यातील निसर्गाचे सौंदर्य पाहून ६.३० परतत होतो. धो-धो पाऊस पडत होता. मध्येच काही काळ पाऊस विश्रांतीसाठी थांबत होता. चहा पिण्यासाठी म्हणून देहूरोड बायपासवरील हॉटेलमध्ये थांबलो असता समोरील डोंगरावरील मंदिराकडे लक्ष गेले. चौकशी केली असता ‘मुरुगन हिल्स’ असे नाव कळले. त्या विषयी....

मुरुगन हिल्स

                देहूरोड हे पिंपरी-चिंचवड शहरालगतचे एक छोटेसे गाव. संतश्रेष्ठ तुकाराममहाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला इथला परिसर. शेलारवाडीच्या  (घोरावडेश्वर)च्या डोंगराच्या पश्चिम बाजुस एक छोट्याश्या टेकडीवर प्रभू सुब्रमण्यमस्वामी अर्थात भगवान कार्तिक स्वामींचे हे मंदिर आहे. ‘मुरुगन हिल्स’ नावाने हे मंदिर प्रसिद्ध आहे. या ठिकाणी संत तुकाराम महाराजांनी आपले काही अभंग गायले आहेत. सुब्रमण्यम स्वामी हे मंदिर देहूरोड आणि पंचक्रोशीतील भक्तांचे एक धार्मिक स्थळ आहे. देहूरोड बायपास संपल्यानंतर डाव्या बाजूला घोरावडेश्वराचा मोठा डोंगर  दिसतो. याच्या कुशीत हे मंदिर आहे. 

         





मंदिराची स्थापना : 

               समुद्रसपाटीपासून हे मंदिर ३५०० फूटावर निसर्गरम्य ठिकाणी आहे. परिसरातील अनेक भक्तांच्या प्रयत्नातून १९७४ पासून या मंदिराचा विकास झालेला आहे. मंदिराची कोनशिला १४ मार्च १९७५ मध्ये देहूरोड लष्करी भागातील सीआयएसबीचे नियंत्रक ब्रिगेडियर सी. सुंदरम् यांच्या हस्ते बसविण्यात आली आहे. शारदापीठाचे जगद्गुरू शंकराचार्यमहाराज यांच्या हस्ते मंदिराचे भूमिपूजन २८ मे १९९५ मध्ये झाले होते. मंदिरातील मूर्ती तामिळनाडूतील वेलूर  जिल्ह्यातील रत्नागिरी गाव स्थित बालमृगन मंदिराच्या कार्तिक स्वामींचे परमभक्त श्री बालमुरुगन स्वामीद्वारा दान मिळाल्या आहेत. दरवर्षी सुब्रमण्यम स्वामींच्या होणाºया सर्व उत्सवात हजारो भक्त सहभागी होतात. सुब्रमण्यमस्वामी मंदिर हे साऊथ इंडियन लोकांचे श्रद्धास्थान आहे. त्यांचे सांस्कृतिक व धार्मिक जीवन या मंदिरात दिसून येते.
           मुरगन हिल्सवर प्रभू सुब्रमण्यमस्वामी अर्थात भगवान कार्तिक स्वामींच्या मंदिराबरोबरच गणपती, हनुमान, बालाजी, पद्मावती, नवग्रह मंदिर, साईबाबा मंदिरे ही आहेत. धार्मिक विधी करण्यासाठी येथे मोठा हॉलही उभारलेला आहे. साईबाबांची काकड आरती दररोज होते.






डोंगरावर जाण्यासाठी पायºयांचा रस्ता आहे. तसेच फोर व्हिलर वरपर्यंत जाते. मंदिराच्या परिसरातून देहूरोड परिसर मोठा छान दिसतो. मागे असलेला घोरावडेश्वराचा डोंगर पुढे देहूगावातील गाथा मंदिरही दिसते. एकदा तरी आवश्य जाण्यासारखे हे ठिकाण आहे.   

                                                                        
 मंदिराची वेळ :

सोमवार ते शुक्रवार (धार्मिक कार्यक्रम नसल्यास)

  • सकाळी ६.३० ते १०.३०
  • संध्याकाळी ५.३० ते ८.३०

शनिवारी (धार्मिक कार्यक्रम नसल्यास)

  • सकाळी ६.३० ते ११.३०
  • संध्याकाळी ५.३० ते ८.३०

धार्मिक कार्यक्रम असल्यास : 

  • सकाळी ६.३० ते संध्याकाळी ८.३०

कसे जाल : 

  • जुन्या पुणे-मुंबई रस्त्यावर देहूरोड ओलांडून तळेगावच्या दिशेने जाताना डाव्या बाजूला घोरावडेश्वर डोंगर दिसतो. याच्या पायथ्याशी छोट्याच्या टेकडीवर हे मंदिर आहे. त्यासाठी डाव्या बाजूला वळून डोंगरावर जाता येते.
  • कात्रज-देहूरोड बायपासवर तळेगावला जाण्यासाठी रस्ता लागतो. वरील प्रमाणे जाता येते.
  • मुंबईकडून येताना घोरावडेश्वर डोंगर ओलांडल्यानंतर देहूरोड बायपासच्या अलिकडे डाव्याबाजूला हे मंदिर दिसते. 

अजून काही जवळील प्रेक्षणिय स्थळे :

Friday, June 14, 2013

गतवैभवाची साक्ष देणारा बोरगेवाडा


 शाळेला सुट्टी लागली की लहानपणी आमचा मोर्चा पवना नदीवर असायचा. चिंचवडगावातील फत्तेचंद शाळेच्या पाठीमागील नदीवर, रावेत बंधाºयावर आम्ही पोहायला जायचो. मस्त मजा यायची. रावेत बंधाºयावरून पलिकडील काठावर एक जुनी गढी दिसायची. फिरता फिरता या ठिकाणी गेल्याचे आठवते आहे. आज सकाळी पाऊस कमी होता. वातावरण स्वच्छ असल्याने पुनावळेचा बोरगेवाडा पाहण्याचे मनात आले.  त्या विषयी...

              पिंपरी-चिंचवड शहर फोफाट्याने चारही बाजुला पसरत आहे. पूर्वीची लहान-लहान गावे आता चक्क मोठ्या इमारती, अलिशान बंगले व मोठे पुलांनी सजत आहे.  अशाच रावेत गावात पंधरा वर्षांपूर्वी जेव्हा आम्ही जायचे तेव्हा संध्याकाळनंतर येथे थांबण्यास भीति वाटायची. दुर्गादेवी टेकडीची हिरवीगार झाडी, रावेत येथील झाडी व यामुळे संध्याकाळनंतर या ठिकाणी भयाण शांतता असायची. कालांतराने येथील पुनावळे, रावेत ही गावे रुप पालटू लागली. गावाचे महानगरात रुपांतर होऊ लागले.  डीवायपाटील सारखी महाविद्यालये, आकुर्डी रेल्वेस्टेशन, अलिशान इमारती यामुळे वाल्हेकरवाडी, पुनावळे, रावेत या गावांचा कायापालट काहीच वर्षात झाला.

              अशाच पुनावळे या गावी एक छोटा गढीवजा वाडा आहे. त्याचे नाव बोरगेवाडा.  नव्याने समाविष्ट झालेल्या पुनावळे गावात ही शिवकालीन गढी आहे. इतर ऐतिहासिक इमारतींप्रमाणे या ही वाड्याची दुरवस्था झाल्याचे येथे गेल्यावर दिसले. ऐतिहासिक ठेवा असणारी ही गढी इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे. अंदाजे १ एकरावर असलेला वाडा मोठा प्रशस्त आहे.
सातारा जिल्ह्यातील खटाव या भागातील बोरगेंना शिवकाळात पुनावळे गाव वतन म्हणून मिळाले होते. तळेगावातील दाभाडे सरदार आणि पुनावळेत बोरगे सरदार या वतनदारांचा खूप नावलौकिक होता. हे दोन्ही वतनदार छत्रपतींच्या पदरी काम करीत असत. दाभाडे सरकार पुण्यात शनिवारवाड्यावर जेव्हा जात, तेव्हा त्यांना पुनावळेतून जावे लागे. म्हणजेच छत्रपतींच्या कालखंडात, अर्थात साडेतीनशे वर्षांपूर्वी या गढीची निर्मिती बोरगे सरकारांनी केली.
               १७७१ म्हणजेच म्हणजे उत्तर पेशवाईतील हा वाडा असल्याचे येथील नागरिक सांगतात. गढीचा इतिहास फारसा माहित नसल्याने नक्की कोणत्या वर्षी या गढीची निर्मिती झाली, याची माहिती देणे अशक्य आहे. गढीस मोठे चार बुरुज असून, दोन मोठे दरवाजे आहेत. गढीमध्ये एक तुळशी वृंदावन आणि एक छोटीशी विहीर सुद्धा आहे. तुळशी वृंदावनावर सुंदर नक्षीकाम केले आहे. तसेच राहण्यासाठी एक छपरवजा घर आहे. त्या समोर एक चावडी आहे. सध्या गढीच्या चारही भिंतींची पडझड झाली आहे. मुख्य दरवाजाची चौकट ही त्यामुळे काष्ठशिल्पाचा उत्कृष्ट आहे. काही ठिकाणी ही चौकट खराब होण्याच्या मार्गावर आहे. गढीची पडझड मोठ्या प्रमाणावर झाल्याने आतमध्ये कोणीही राहत नाही. गेल्या काही वर्षांत या गढीची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली आहे.
              बोरगे सरदारांचे घराण्याचे वैशिष्ट्य म्हणजे मोगलांच्या सैन्याबरोबर पुनावळे येथे मोठी लढाई झाली होती. या लढाईत बोरगे घराण्यातील सैन्य मोठ्या प्रमाणावर धारातीर्थी पडले होते.
इतिहासाची आवड असणाºयांनी या वाड्याला भेट देण्यास हरकत नाही.  अन्य  हौशी पर्यटकांना मात्र, येथे काहीही विशेष वाटणार नाही. उगाच काहीतरी. या ब्लॉगवर वाचून तेथे गेलो व आपली सुट्टी वाया घालावली अशी टीका मात्र हौशी पर्यटक करतील. जवळच रावेतचा नवीन आकर्षक पूल बांधलेला आहे. ऐतिहासिक ठेवा असणाºया या वास्तूचे जतन व्हावे यासाठी पुरातत्त्व विभागाने पुढाकार घेणे गरजेचे आहे. येथून जवळच असलेल्या रावेतच्या बंधाºयावर गेलो.   नुकताच पावसाळा सुरू झाल्याने पवना नदीत वाहून आलेली मोठ्याप्रमाणावरील जलपर्णी सर्वत्र पसरलेली दिसली.
              वाड्याशेजारी सिमेंट क्राँकिटच्या बिल्डिंग उभा राहिलेल्या आहेत. त्यामुळे अंग चोरून बसल्यासारखा हा वाडा सध्या दिसत आहे. चिखलीतील जाधववाडी, इंदोरीची गढी, बोरगेवाडा, चाकणचा भुईकोट किल्ला, खेड वाफगावजवळील होळकर यांचा वाडा असे अनेक वाडे पुणे जिल्ह्यात आहेत. जुनं ते सोनं म्हणतात. पण आपल्याकडे ऐतिहासिक वस्तूंची जपणूक केली जात नाही. जिल्ह्यात अनेक असे छोटे वाडे, गढी आजही आपले अस्तित्व टिकवून आहेत. जीर्ण झालेले हे पडके वाडा आपल्या गतवैभवाची साक्ष देत उभे आहेत. लवकरच संवर्धन न केल्यास या वास्तू केवळ मातीचे ढिगारे होऊन राहतील.











कसे जावे 

  •  चिंचवड गावातून वाल्हेकरवाडीमार्गे रावेत पुलावरून पुनावळे गावाकडे जाताना येते.
  • पुण्याकडून येताना डांगे चौकातून चिंचवडगावाकडे न वळता सरळ येऊन पुनावळे गावाकडे जाता येते.
  • देहूरोड-कात्रज बायपास या गावाच्या शेजारूनच जातो. तेथूनही येता येईल.

Sunday, June 2, 2013

अजिंक्यतारा - साताºयाचा मानाचा तुरा



मे महिना असल्यामुळे लग्नसराई जोरात सुरू होती. मेहुणीचे लग्न साताºयाला होते. आपोआपच साताºयातील प्रसिद्ध किल्ला पाहण्याचा योग आहे. त्याविषयी...


      अजिंक्यतारा हा साताºयातील एक किल्ला. अजिंक्यतारा या नावाने ओळखला जाणारा हा किल्ला वेगवेगळ्या राजवटीत वेगवेगळ्या नावाने ओळखला गेला आहे. सातारचा किल्ला,  आझमतारा, हुकेबहन, सप्तर्षीचा किल्ला, मंगळाईचा किल्ला, इस्मतआरा, शाहूगड, सतारे तसेच अजिमतारा अशा विविध नावाने ओळखला गेला. 
         प्रतापगडापासून निर्माण झालेल्या बामणोली रांगेवर हा किल्ला उभारलेला आहे. हा किल्ला म्हणजे मराठी साम्राज्याची चौथी राजधानी. पहिली राजगड मग रायगड, जिंजी आणि चौथी अजिंक्यतारा. किल्ला शिलाहार वंशातल्या दुसºया भोजराजाने इ.स. ११९० मध्ये बांधला. पुढे बहामनी सत्तेनंतर मग विजापूरच्या आदिलशहाकडे गेला. इ.स.१५८० मध्ये पहिल्या आदिलशहाची पत्नी चांदबिबी येथे कैदेत होती. 
         गाडी मार्गाने वर जात असताना रस्ता छान आहे. मी पावसाळ्याआधी गेल्याने कदाचित असेल. काही टर्न फारच शार्प असल्याने गाडी चालविण्याचे कौशल्य पणाला लागते. पायथ्यापासून केवळ दहा मिनिटातच गडाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर पोहचलो. भगवान भरोसे गाडी लावून गड पाहण्यास निघालो. गाडीतळापासून गडावर प्रवेश करताना दोन दरवाजे आहेत. आजही या दोन दरवाजांपैकी पहिला दरवाजा चांगल्या स्थितीत आहे. दरवाजाचे दोन्ही बुरूज आज अस्तित्वात आहेत. उजवीकडे हनुमानाचे मंदिर आहे. ट्रेकिंग करणाºयांसाठी हे मंदिर राहण्यास उत्तम आहे. 
         समोर प्रसारभारती केंद्राचे कार्यालय व मागे प्रसारभारती केंद्राचे दोन टॉवर आहेत. हे टॉवर सातारा शहरातूनही चांगलेच मोठे दिसतात. याबाबतीत अजिंक्यतारा हा सिंहगडाची आठवण करून देतो. पुढे गेल्यावर एक डावीकडे जाणारी वाट दिसते व मंगळादेवी मंदिराकडे असे तिथे लिहिलेले आहे. वाटेत ताराबाई यांचा निवास असलेला ढासळलेला राजवाडा आणि कोठार आहे. वाटेच्या शेवटी मंगळादेवीचे मंदिर लागते. किल्यावर प्रवेशकरताना दरवाज्याच्या थोडे पुढे महाराष्ट्र शासनाने किल्याची छान माहिती लिहून ठेवली आहे. असा उपक्रम प्रत्येक पर्यटन स्थळावर करावयास हवा. 











माहिती अशी : 

         अजिंक्यतारा किल्ल्याचे मूळचे नाव सातारचा किल्ला. समुद्रसपाटीपासून या किल्याची उंची ३२२० फूट आहे. शहरापासून हा किल्ला ९०० फूट उंचीवर आहे. या किल्याची पूर्व-पश्चिम लांबी ३३०० फूट व दक्षिण-उत्तर रुंदी १८०० फूट आहे. हा किल्ला त्रिकोणी असून, याचा पाया दक्षिण-उत्तर पूर्वेस आहे.
         कोल्हापूरच्या शिलहार वंशीय दुसºया भोजराजाने इ. स. ११९० मध्ये हा किल्ला बांधला. शिलहाराकडून देवगिरीच्या यादववंशीय सिंधन राजाने हा किल्ला जिंकून घेतला. त्यांच्या ताब्यात इ. स. १२०० ते १३०० पर्यंत हा किल्ला होता. त्यानंतर दिल्लीच्या खिलजी सुलतानाने हा किल्ला जिंकला. त्याच्याकडून तुघलक घराण्याने हा किल्ला जिंकून घेतला. त्यानंतर इ.स. १३४७ पासून १४९८ पर्यंत हा किल्ला बहामनी राजाकडे होता. विजापूरच्या अदिलशहाने हा किल्ला जिंकून घेतला. या किल्यावर इ. स. १५७९ मध्ये चांदबेबीला तीन वर्षे या ठिकाणी कैद करून ठेवले होते. विजापूरकराने फलटणचे मुधोजी नाईक-निंबाळकर यांना १६४० पर्यंत याच किल्यावर सात वर्षे कैद करून ठेवले होते. १६५९ मध्ये छत्रपती शिवाजीमहाराजांनी हा किल्ला जिंकला. त्यानंतर मोगली अक्रमणांमुळे छत्रपती शिवाजीमहाराजांनी तह करून हा किल्ला मोगलांना दिला. १६६६ नंतर हा किल्ला विजापूरांकडे गेला. छत्रपती शिवाजीमहाराजांनी हा किल्ला जिंकून ताब्यात घेतला. शहाजीमहाराजांची विजाूपरांच्या कैदेतून सुटका झाल्यावर जेजुरी येथे व त्यानंतर या किल्लयावर शहाजी व शिवाजी या दोघांची भेट घडली. पुन्हा किल्ला विजयपूरांकडे गेला. त्यांच्याकडून हा किल्ला इ. स. ११ नोव्हेंबर १६७५ रोजी जिंकून छत्रपती शिवाजीमहाराज १ डिसेंबर १६७६ पासून २५ जानेवारी १६७७ पर्यंत वास्तव्य करून होते. छत्रपती राजाराम महाराजांनी २३ मे १६९८ रोजी सातारा ही राजधानी घोषित केली. २ मार्च १७०० रोजी त्यांचे निधन झाले. त्यानंतर अजिमशहाने या किल्ल्यावर हल्ला चढविला. फंदफितुरीमुळे हा किल्ला पुन्हा मोगलांच्या ताब्यात गेला. या लढाईत किल्लेदार प्रयागजी अनंत फणसे याने पराक्रम धर्माची शर्थ केली. २००० सैनिकांना वीरमरण प्राप्त झाले. मुघल बादशहाने या विजयाचे स्मारक म्हणून गोलाकार विजय स्तंभ करंजे, ता. सातारा येथे उभारला.
         ३ नोव्हेंबर १६८९ रोजी मोगलांनी रायगड ताब्यात घेऊन मातोश्री येसुबाई व बाळराजे शाहू यांना कैद केले. २० फेब्रुवारी १७०७ रोजी औरंगजेब पैंगबरवासी झाल्यावर त्याचा मुलगा अजिमशहा याने शाहू राजाची कैदेतून सुटका केली. त्यानंतर १२ जानेवारी १७०८ रोजी त्यांचा याच किल्यावर राज्याभिषेक झाला. त्यांच्या कालखंडांनंतर छ. रामराजे, छ. आबासाहेब ऊर्फ दुसरे शाहूमहाराज आणि छ. प्रतापसिंहराजे यांचे राज्याभिषेक याच किल्यावर झाले. 
         अजिंक्यतारा हा किल्ला पन्हाळ्याचे भोजराज द्वितीय यांनी सन ११७८ ते ११९३ या काळात बांधला व मराठेशाहिची राजधानी सातारा ही सन १६९८ साली जाहीर केली गेली. सन १५८० ते १५९२ या काळात प्रसिद्ध चांदबिबी या किल्यावर कैदेत होती. या किल्याचा उपयोग पूर्वी तुरुंगासारखाच केला जाई. सन १६७३ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी हा किल्ला विजापूरकरांचेकडून ताब्यात घेतल्याचा दाखला असून सन १७०० ते १७०६ तो औरंगजेबाचे ताब्यात गेला होता. सन १८४४ साली तो छत्रपती प्रतापसिंह महाराजांचे ताब्यात आला. या गडावर पुरातनकालचे मंगळाई देवीचे व हनुमान मंदिर आहे. अजिंक्यताºयातील जो पडीक राजवाडा आहे तो कै. छत्रपती शाहू महाराज यांनी बांधलेला आहे. दिल्ली सुटकेनंतर त्यांनीच सातारला महत्व प्राप्त करून दिले. 
या किल्लयावर दुधबावी, सागरी सुलतान पीर, मंगळाई, शिवसागर सप्तऋषी, कोठी व भवानी ही सात तळी होती. तसेच मंगळाई, नृसिंह, हनुमंत, महालक्ष्मी, रामेश्वर, सप्तश्री व विठोबा ही सात देवालये होती. शेख सल्ला व साकडा सुलतान हे दोन पीर येथे होते. याच किल्लयावर महाराणी येसूबाई, महाराणी ताराबाई व महाराणी आनंदीबाई ऊर्फ माईसाहेब यांचे वास्तव्य घडले. १० फेब्रुवारी १८१८ रोजी इंग्रजांनी मराठ्यांचा जरीफटका उतरवून येथे युनियन जॅक फडकाविले. 
साताराचा किल्ला हुकेबहन, सप्तर्षीचा किल्ला, मंगळाईचा किल्ला, इस्मतआरा, शाहूगड, सतारे तसेच अजिमतारा या नावाचा हा किल्ला अजिंक्यतारा झाला.
           भोजराजाची राजधानी पन्हाळगड येथे होती. या गडाचे ईशान्येस पूर्वीचे सातर हे गाव होते. सातर म्हणजे भरपूर  देणारे. या सातरचे सातारा झाले. सातारच्या किल्ल्यावर सप्तर्षीचे देऊळ होते. सप्तर्षीपासून सप्तर्षीपूर हे सातारचे जुने नाव रुढ झाले. जुन्या संस्कृत ग्रंथात सप्तर्षीपूर असा या गावाचा उल्लेख आढळतो. ऐतिहासिक व राजकीय पत्रव्यवहारात सातारे असा उल्लेख आढळतो. सातारच्या किल्ल्याला तट, बुरुज आणि वेशी यांची संख्या सतरा आहे. सतरावरून सातारा, सातदरेपासून सातारा, सप्ततारापासून सातारा अशा साताराच्या इतिहासाशी छत्रपती शिवाजीमहाराजांचा ऋणानुबंध आहे. शिवरायांचा सातारा, समर्थांचा सातारा, कर्मयोग्यांचा आणि कर्मवीरांचा सातारा, अजिंक्यताºयाचा सातारा, स्वातंत्र्यसंग्रामाचा अग्रदूत सातारा, अजिंक्यताºयाच्या गौरवशाली इतिहासाचा साक्षीदार असलेला सातारा शहराला पंडित जवाहरलाल नेहरूंनी ‘जय सातारा’ म्हणून गौरवले आहे. 














दिसणारा परिसर

सातारा शहर किल्यावरून छान दिसते. तसेच समोरचे यवतेश्वराचे पठार, चंदनवंदन किल्यांची जोडगोळी, कल्याणगड, जरंडा आणि सज्जनगड हा परिसर दिसतो.

 कसे जाल ?




  • पुणे-बेंगलोर महामार्गावर सातारा हे मोठे शहर लागते. येथून जवळच अजिंक्यतारा आहे. अंदाजे ५ ते ६ किलोमीटर रस्ता आहे.  स्वत:चे वाहन असल्यास किल्ल्यावर थेट जाता येते. रस्ता चांगला आहे. 
  • एसटीने साताºयाला उतरल्यावर अदालत वाड्यामार्गे जाणारी कोणतीही गाडीतून अदालत वाड्याजवळ उतरावे. अदालत वाड्याच्या शेजारील वाटेने आपण गडावर जाणाºया गाडी रस्त्याला लागतो व त्या रस्त्याने चालत गेल्यावर आपण गडाच्या दरवाज्यापाशी पोहचतो. 
  • गडावर थेट गाडी रस्ता असल्याने पायी जाण्याऐवजी गाडीने गेलेले बरे. 
  • संपूर्ण गड बघण्यासाठी साधारणत: दीड तास लागतो. 

कॉपी करू नका