Wednesday, March 19, 2014

मावळसृष्टी

पर्यटकांच्या भटकण्याच्या यादीत कोकण, महाबळेश्वर, लवासा, ताम्हीणी घाट, माळशेज घाट ही स्थळे भाव घावून जातात. या नेहमीच्या या ठिकाणांऐवजी एखाद्या नव्या व निवांत ठिकाणी हिंडायला प्रत्येकालाच आवडते. नेहमीच्या पर्यटनस्थळांवर वाढणारी गर्दी व त्यापेक्षाही त्यांचा नकोसा असलेला उच्छाद, हुल्लडपणा नको असतो. पुणे-मुंबईपासून तासाच्या अंतरावर असलेल्या लोणावळा-खंडाळा परिसरातील मावळातील पर्यटनस्थळांकडे पर्यटक आकर्षित होऊ लागला आहे. येथील ऐतिहासिक किल्ले, पवना, भुशी डॅम, धबधबे, नवीन उभारण्यात आलेली मंदिरे पाहण्यासाठी पर्यटक येथे येऊ लागला आहे. निर्सगाने मुक्तहस्ताने सौंदर्याची उधळण या परिसरावर केली आहे. मावळातील काही परिसर सोडला तर पर्यटनदृष्टया हा परिसर उपेक्षित राहिला आहे त्या विषयी.... 


सध्या विकएंड साजरा करण्याचा प्रघात आपल्याकडेही सुरू झाला आहे. दोन-चार दिवस सलग सुटी आल्यास घरातील मंडळी कुठे तरी बाहेर जाण्याचा बेत आखतात. मग चर्चा सुरू होते ती नवीन ठिकाणे पाहण्याची पण तिच तिच ठिकाणे पाहून कंटाळलेल्या पर्यटकांना नवे पर्यटनस्थळ पाहिजे असते. अशीच काही पर्यटन स्थळे त्यांचे स्वागत करण्यासाठी मावळात आहेत.  त्यातच पुण्याला पर्यटननगरीचा दर्जा मिळाल्यानंतर देशी- विदेशी पर्यटकांची पावले आपोआप वळू लागली. लोणावळा, खंडाळा, महाबळेश्वर या ठिकाणांना आणखीन एक नवा पर्याय म्हणून ‘लवासा’, सहारा सिटीसारखे मानवनिर्मित शहरे स्वागतासाठी तयार होऊ लागली आहेत.
छत्रपती शिवाजीमहाराजांच्या सैन्यातील सैनिकांना मावळे म्हणत. हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या कार्यात महत्त्वपूर्ण सहभाग असलेल्या या मावळ्यांना ‘मावळे’ हे नाव पडले ते ‘मावळ’ सह्याद्रीच्या दोन डोंगररांगांच्या मधल्या खोºयात पसरलेले आहे. सह्याद्रीला खेटून आणि देशावरचा भाग डोंगरावरून उतरणाºया नदीचे खोरे  म्हणजे  मावळ.  पुणे जिल्ह्यात एकूण बारा मावळ आहेत. यात आंदर मावळ, कानद मावळ, कोरबारसे खोरे, गुंजन मावळ, नाणे मावळ, पवन मावळ, पौड मावळ, मुठा खोरे, मुसे खोरे, रोहिड खोरे, वळवंड खोरे, हिरडस मावळ यांचा समावेश होतो.  यातील तीन मावळ लोणावळा-खंडाळा परिसरात येतात ते म्हणजे आंदर, पवन आणि नाणे मावळ. पवन मावळात पवना नदी उगम पावते आणि वाहते म्हणून याला पवन मावळ म्हणतात. मराठेशाहीच्या पराक्रमाची साक्ष देणारे लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना, राजमाची किल्ले या परिसरात आहेत. तर कार्ला, भाजे, बेडसे या बौद्धकालीन लेण्या देखील आहे. एकविरा देवी, भंडारा डोंगर, भामचंद्रा डोंगर, तुकाराममहाराजांच्या वास्तव्याने पावन झालेली देहूनगरीही या परिसरात आहे. पवनामाई व इंद्रायणी नदी या परिसरातून वाहते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पुणे जिल्ह्यातील १७ नवीन पर्यटन स्थळांना ‘क’ दर्जाचे पर्यटन स्थळ म्हणून मान्यता देण्यात आली आहे.  या यादीत मावळ तालुक्यातील लोणावळा, खंडाळा, कार्ला,  तुंग आणि तिकोना किल्ल्यांचा समावेश करण्यात आला आहे. या किल्यांच्या विकासासाठी पर्यटन आणि सांस्कृतिक खात्याच्या वतीने वीस कोटींचा निधीही मंजूर करण्यात आला आहे. पुरातन लेणी म्हणून ओळखल्या जाणाºया कार्ला लेणीला ‘क’ दर्जा प्राप्त झाला आहे. महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) वतीने कार्ला येथे सुमारे ३ कोटी ६६ लाख रुपये खर्च करून जलक्रीडा केंद्राची उभारणी करण्यात आली आहे.  पर्यटनातून या भागातील लोकांना रोजगार मिळावा तसेच पर्यटकांची संख्या वाढावी यासाठी महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत.


मावळात वर्षाविहाराचा आनंद

पर्यटकांना आकर्षित करणारे मोठे जलाशय तर मावळचे वैशिष्ट्यच म्हणावे लागेल. पवना, वळवण, आंद्रा, भुशी, तुंगार्ली, शिरोता, ठोकळवाडी, वडीवळे धरणे मावळच्या समृद्धतेची साक्ष देतात.   पावसाळ्यात मावळातील निसर्गसौंदर्य बहरू लागते. डोंगरातून धबधबे खळाळून वाहू लागतात व आपसूकच पर्यटकांचे पाय धरण क्षेत्राकडे वळतात. वर्षाविहाराचा आनंद लुटण्यासाठी सुटीच्या दिवशी या परिसरात पर्यटक गर्दी करतात. पावसाळ्यात दहा लाखांहून अधिक पर्यटक लोणावळ्याला येतात. लोणावळ्यातील प्रसिद्ध चिक्की, जेली खरेदीसाठी येथील दुकानांतून ग्राहकांची गर्दी असते. धरणाच्या जलाशयात बोटिंग व्यवसाय, गाइड, फोटोग्राफी यांसारखे व्यवसाय सुरू झाले आहेत. या देखण्या परिसरामध्ये नौकाविहाराचीही व्यवस्था सुरू करण्यात झाली आहे. एक दोन दिवस निवांत पाहण्यासारखी ठिकाणे या परिसरात असताना लोणावळा व खंडाळ्यातील मोठ्या हॉटेलचे दर मात्र सर्वसामान्यांच्या खिशाला न परवडणारसारखे आहे. हे दर आवाक्यात आल्यास या भागात येणाºया पर्यटकांची संख्या वाढू शकेल. यामुळे पर्यटक लोणावळा खंडाळ्यापुरताच मर्यादित न राहता उर्वरित  मावळातील पर्यटनाला चालना मिळू शकेल. संततधार पाऊसाने मावळातील आतील गावातील रस्ते खराब होतात. काही गावांचा संपर्कही तुटतो.  पर्यटकांचे जथ्थेच्या जथ्थे गाड्या भरून  आल्याने लोणावळा, खंडाळा परिसरात वाहतूक, पार्किंग आणि शुल्कवसुलीचे नियोजन ढासळते. पावसाळ्यात तर पोलिसांना गर्दी आवरता येत नाही. गाडी पुढे सरकत नाही. ४-४ तास ट्रॅफिक जॅमचा अनुभव येथे आलेल्या पर्यटकांना घ्यावा लागतो. यातून होणाºया दुर्घटना, पाण्यात वाहून जाणे, किरकोळ वादावादी आदी दुर्घटनांना पर्यटकांना सामोरे जावे लागते.
 आंदर मावळ व नाणे मावळाच्या परिसरातील नव्या नैसर्गिक स्थळांचा शोध घेत पर्यटक येथे पोहचू लागला आहे. उंच डोंगर, शांत वातावरण, हिरवाईमुळे बॉलीवूडमधील चित्रपट निर्मातेही या भागाकडे आपला मोर्चा वळवितात. अनेक हिंदी चित्रपटांचे चित्रीकरणही या भागात करण्यात आले आहे.  नाणे व आंदर मावळामध्ये खास पावसाळ्यातील निर्सगाची देखणी सजावट पाहण्यासाठी या भागात येतात.

ट्रेकर्स लोकांची पंढरी

थंड हवेचे ठिकाण म्हणून ‘लोणावळा-खंडाळा’ प्रसिद्ध आहेच. पण तरुणांच्या आवडत्या ट्रेकिंगसाठीही हे क्षेत्र प्रसिद्ध आहे. मावळातून कोकणात उतरणाºया पायवाटा व मोठे घाटरस्ते आहेत. पावसाळा सुरू झाला की तरुणांच्या चर्चेत येतो तो लोणावळा खंडाळाचा परिसर. हिरवागार डोंगर, हिरवी-पोपटी भातखाचरे, कडेकपारीतून कोसळणारे धबधबे व सोबतीला सह्याद्रीच्या अंगाखांद्यावरील शिवाजीमहाराजांचे गडकोट. त्यांना येथील निर्सग वेड लावतो. मग वेडे होण्यासाठी भटक्यांची पावलेही या मावळाकडे वळतात. लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना, राजमाची किल्ला, ढाकचा बहिरी म्हणजे ट्रेकर्स लोकांची पंढरीच. कुणी इथल्या लेण्या-दुर्गावर निघतात, काही इथल्या धरणांवर विसावतात, काहींना फक्त इथल्या वाटांवर फिरण्यात मजा वाटते. विविध जातीची फुले, पक्षी पाहण्यात वेळ निघून जातो. हाडशी जवळील सत्यसाई मंदिर, लोहगडाजवळील प्रति पंढरपूर परिसर, देहूरोडजवळील कुंडमळ्यात निसर्गाची किमया पाहता येते. इंद्रायणी नदीच्या पाण्याने येथील कातळात रांजणखळगे तयार झाले आहेत. मावळातली दिवसभराची ही भटकंती चिंब भिजवून टाकते.
 येथील सगळाच भाग निसर्गत:च सुंदर आहे. येथे पोहचण्यासाठी घाटरस्ते, मोठे टुमदार बंगले, भव्य हॉटेल्स, हेलीपॅड, उद्याने, धरणे पर्यटकांना आकर्षित करतात. हा सारा परिसर अमूल्य अशा झाडा-झुडुपांचा आहे. मावळातील या परिसरात अनेक औषधी वनस्पती सापडतात. शनिवार, रविवार या ठिकाणी असंख्य ट्रेकर्स पाठीवर बॅग घेऊन येथील डोंगरवाटा तुडवताना दिसतात. मात्र, दळणवळणा अभावी खासगी वाहन घेऊनच ही  भटकंती करावी लागते.
भरपूर पाऊस, सुपीक जमीन अशा जमेची बाजू असताना या भागात़ील शेतकºयांना मात्र योग्य मार्गदर्शनाअभावी या गोष्टींचा पुरेसा फायदा होताना दिसत नाही. धरणे आणि पाण्याचा मुबलक साठा असताना शेतकरी मात्र तहानलेले आहेत. पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गाचा बरचसा भाग हा मावळातून गेल्याने हा परिसर ओळखला जाऊ लागला. गहुंजे येथील क्रिकेटप्रेमींचे सुब्रोतो स्टेडियमुळे तर मावळ आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखले जाऊ लागले.
पुणे-मुंबईपासून तासाच्या अंतरावर येथील ठिकाण असल्याने साहजिकच या परिसरात गृहप्रकल्पांना वाढती मागणी होऊ लागले. ‘निसर्गाच्या कुशीत ‘स्वत:चे हक्काचे घर’ अशा जाहिरातींना प्रचंड प्रतिसाद येऊ लागला आहे. यासाठी शेतकºयांच्या जमिनी कवडीमोलाने खरेदी करून बांधकाम होऊ लागले आहे. बांधकामासाठी वृक्षतोड, डोंगराच्या जवळील जागा खरेदी करून डोंगराची लचकेतोड थांबवली पाहिजे. धरणाच्या परिसरात बांधकामे होऊ लागली आहे. येथील झपाट्याने होणाºया विकासावर कोणाचातरी अंकुश असणे गरजेचे आहे. अन्यथा हे पर्यटनक्षेत्र धनाढ्य लोकांच्याच हाती राहून सर्वसामान्य पर्यटकांना मात्र, यापासून वंचित राहावे लागेल. लोणावळा, खंडाळात हळूहळू मानवी प्रदूषणाचा फटका बसत आहे. ऐतिहासिक किल्ले व नैसर्गिक वरदान असलेला हा परिसर आहे. हा ठेवा जपण्यासाठी सरकारकडून योग्य उपाययोजनांची गरज आहे. पर्यटकांसाठी नवा पर्याय ठरू लागलेल्या या क्षेत्रात दळणवळणाचा अजूनही अभाव दिसून येतो. या सर्व गोष्टींचा विचार पर्यटनाच्या दृष्टीने होणे गरजेचे आहे अन्यथा निर्सगाची हानी होऊन झालेले पर्यटन कायम कामाचे राहणार हाच प्रश्न आपणापुढे उभा राहतो.

 

मावळातील प्रेक्षणीय पयर्टन स्थळे  

पवना धरण
लोहगड
विसापूर
तुंग
तिकोना
ढाकचा बहिरी
नागफणी
प्रति पंढरपूर
ड्युक्सनोज (नागफणी)
बिर्ला गणेश मंदिर
शिरगावचे साईबाबा मंदिर
देहूगाव
घोरावडेश्वर मंदिर
आय्यप्पा स्वामींचे मंदिर
बेडसा, भाजे, कार्ला ही लेणी
श्री क्षेत्र सत्यसाई पांडुरंग मंदिर, हाडशी, पुणे

Friday, March 14, 2014

चित्रबलाकावर ‘अवकळा’

दोन आठवड्यांपूर्वी इंदापूरजवळ असलेल्या सासुरवाडीला जाण्यासाठी निघालो. पुणे - सोलापूर महामार्गाने प्रथम सिद्धटेकच्या गणपतीचे दर्शन घेऊन पुढे राशिनमार्गे भिगवणला गेलो. वाटेत चिंचेच्या झाडावर घरटी केलेल्या या चित्रबलाक पक्षांनी आमचे स्वागत केले.  मागील आठवड्यात या उजनी धरणाच्या परिसरात प्रचंड गारपिट झाली. रोहित पक्षी (फ्लेमिंगो), चित्रबलाक (पेंटेड स्टॉर्क) यांचे सारंगागार म्हणून प्रसिद्ध असलेल्या इंदापूर, भिगवण व उजनी परिसरातील या क्षेत्राला अवकाळी गारांच्या पावसाचा तडाखा बसला.  वर्तमानपत्रात आलेल्या बातम्यां वाचून मन्न खिन्न झाले. ऐन विणीच्या हंगामात गारांचा पाऊस झाल्याने पक्षांचा हंगाम वाया गेला आहे. सुमारे ५०० अंडी व ६०० च्या जवळपास पक्षी मृत्युमुखी पडले वाचून मन दु:खी झाले. इंदापूराहून या पक्षांना पाहून येऊन मला जेमतेम काहीच दिवस झाले होते. त्या विषयी....

        


  गजानानचे दर्शन घेऊन राशिन मार्गे भिगवणला जाण्यासाठी निघालो. रस्ता चांगला असल्याने पाऊण तासात डिकसळला पोहचलो. वाटेत चिंचेच्या झाडावर चित्रबलाक पक्षांची घरटी पाहिली. साधारणपणे २ ते अडीच फुट उंच असलेला हा पक्षी मुलाने प्रथम एवढ्या जवळून पाहिल्याने आनंदाने उड्याच मारल्या.  दुसºया दिवशी सकाळी इंदापूरातील तहसील कार्यालयाच्या जागेत असलेल्या चिंचेच्या झाडांवरील चित्रबलाकाची घरटी पाहण्यासाठीही गेलो. शेजारी लोकवस्ती असून देखील चित्रबलाक पक्षी दर वर्षी आपले घरटी करतात. झाडाखाली पिल्लांसाठी आणलेल्या माशांचा सडा पडलेला दिसला. एवढ्या लांबून कोणत्याही नकाशाशिवाय हे पक्षी दरवर्षी कसे येतात? याचे आश्चर्य वाटल्यावाचून राहिले नाही.  रोहित पक्षी मात्र धरणक्षेत्राच्या आतील बाजूस असल्याने मला पाहता आले नाही.

चित्रबलाक पक्ष्याविषयी :
पिवळ्या रंगाची मोठी आणि लांब चोच, चेहरा पिवळ्या रंगाचा त्यामुळे हा पक्षी मोठा मजेशीर व चेहºयाने गरीब दिसतो.   उर्वरित अंगावर पांढरी पिसे आणि त्यावर हिरवट काळ्या खुणा, पंख गुलाबी असून छातीवर आडवा काळा पट्टा नर व मादी दिसायला सारखेच असतात. पिल्लांसाठी आणलेला खाऊ देत असताना त्यांचा होणारा आवाज मजेशीर होता.







दोष निसर्गाचा का मानवाचा?
अवकाळी पावसाने महाराष्ट्रभर झालेला निसर्गाचा कोप व गारपीट यामुळे शेतकऱ्यांचे ओतोनात नुकसान झाले. हे नुकसान कदाचित भरूनही निघेल. मायबाप सरकार किरकोळ रकमा व दिलासा देऊन शेतकऱ्यांना तारेल देखील. विणीचा हंगामासाठी आलेल्या या पक्ष्यांची अंडी व नवजात पिले अवकाळी गारांच्या माºयाने मृत्यूमुखी पडली. उजनी जलाशयाला लागून असलेल्या भादलवाडी तलावावर या परिसरात चित्रबलाकांसह,  ग्रे हेरॉन, करकोचा, फ्लेमिंगो (रोहित पक्षी) या शिवाय अन्य पक्षांची ये-जा सुरू असते.  उजनी धरण पाणलोट क्षेत्रातील मासे, बेडूक, साप, इतर कीटकांवर हे पक्षी गुजराण करतात.  दर वर्षी नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवडयात चित्रबलाक इंदापूरला येतात. उजनी धरणाच्या परिसरात त्यांची अनेक घरटी दिसून येतात. गवत, काड्या वगैरे वापरून ते मोठे घरटी बनवितात. चिंचेच्या झाडावर साधारणपणे पंचवीस ते तीस घरटी पाहून जणू ही त्यांची मोठी कॉलनीच आहे आहे असे वाटले. सोबतीला वटवाघूळ देखील स्वत:ला उलटे टांगून या पक्षांचा दिनक्रम पाहत बसलेली दिसली. कच्छच्या रणातून दर वर्षी विणीच्या हंगामासाठी येणाऱ्या या सैबेरियन चित्रबलाक पक्षांना मानवनिर्मित प्रदूषणाचा चांगला फटका बसला आहे. जागतिक तापमानवाढ, निसर्गातील हवामानाचे होणारे बदल, धरणातील जलप्रदूषणामुळे आवडते खाद्य नष्ट होऊ लागले आहे. सिमेंटची वाढत असलेली जंगले व मानवाची निर्सगामधील लुडबुडू या पक्ष्यांच्या अस्तित्वावर उठली आहेत.       



वर्तमानपत्रात आलेल्या अवकाळी पावसाच्या बातम्या व त्या विषयी विश्लेषण पाहून हे सर्व मानवनिर्मित उद्योग असल्याचे कळाले.  इंदापूरला गेल्या ५० वर्षांपासून राहणाºया माझ्या सासºयांनी देखील अशा प्रकारचा पाऊस व तो देखील गारपीटाचा पहिल्यांदाच पाहिला. मी जे चिंचेचे झाड पाहून आलो होतो त्या झाडांवरील बहुतांश पक्षी मेल्याचे त्यांनी दुसऱ्या दिवशी सांगितले. पुढील वर्षी हे पाहुणे दुसऱ्या ठिकाणी आपले नवे ठिकाण शोधायला नक्कीच जातील त्यामुळे हे पाहुणे परत पुढील वर्षी इंदापूरला येतील का नाही? याची शंकाच वाटते. 


कॉपी करू नका