Monday, March 4, 2013

त्रिशुंड गणपती

03 MARCH 2013

 त्रिशुंड गणपती




  ‘पुणे तिथं काय उणं’ असे पुण्याबाबत म्हटले जाते. पुणे कुठल्याही बाबतीत कमी नाही. शैक्षणिक, सांस्कृतिक, एैतिहासिक अशा अनेक क्षेत्रात पुणे सरस आहे. अशा या पुण्यात मंदिरे काही कमी नाहीत. पण त्यातही पुरातनकाळचे मंदिर म्हणावे अशी काही मंदिरे आहेत. पाताळेश्वर (जंगलीमहाराज), नागेश्वर, त्रिशुंड गणपती, तुळशीबाग, बेलबाग, पर्वती किंवा ओंकारेश्वर ही पुण्यातली प्रसिध्द मंदिरे  त्यापैकीच एक त्रिशुंड गणपती, नागेश्वर मंदिर व लाल महाल तसेच नवीन उभारलेली पु.ल. देशपांडे बाग या ठिकाणी मागील रविवारी येथे जाण्याचा योग आला. त्या विषयी...



पिंपरी-चिंचवडपासून केवळ २० किलोमीटर अंतरावर असलेले पुणे शहर. संध्याकाळी कुठेतरी हिंडायला जायचे असे ठरले. मग पुणे गाठले. खूप पूर्वी गेलेलो त्रिशुंड गणपतीचे मंदिर आठवले मग गाडी तिकडे वळविली. 

त्रिशुंड गणपती मंदिर 

पुण्यातील गणेश मंदिरांपैकी संस्कृत व फारशी भाषेतील शीलालेख असणारे पेशवेकालिन मंदिर म्हणजे सोमवार पेठेतील त्रिशुंड गणपती. तीन सोंड असलेला हा गणपती. दोनशे वर्षांहून अधिक जुने असलेले हे मंदिर पुण्याच्या पूर्व भागात आहे. आजुबाजूला मोठमोठ्या आधुनिक इमारतीने वाढलेल्या त्या छोट्याश्या मंदिराच्या समोर गाडी लावली. मंदिरासमोरील आवारात बसण्यासाठी बाक ठेवलेले होते. आजुबाजूच्या परिसरातील वयोवृद्ध महिला तेथे बसलेल्या  होत्या. मागे मंदिरा विषयी पाटी लावून मंदिराची माहिती दिलेली दिसली. माहिती वाचून श्रींचे दर्शन घेण्यास निघालो.

माहिती फलकावरील माहिती :

          पुणे शहरात अनेक प्राचिन मंदिरे आहेत. परंतु अप्रसिद्ध असलेल्या त्रिशुंड गणेश मंदिराची वास्तूशैली पुण्यातील या मंदिरापेक्षा वेगळी आहे. वेरूळच्या कोरीव लेण्यासदृश्य असणारे हे मंदिर उपेक्षित राहण्यामागे १८ व्या शतकात पुण्यातील तत्कालिन सामाजिक परिस्थिती कारणीभूत असावी. पुण्याच्या पूर्वभागात नागझरीच्या काठावर असणाºया सोमवार पेठेत व मंगळवार पेठेच्या काही भाग त्या काळात मोठे स्मशान होते. शहाजीराजांनी इ. स. १६०० मध्ये शहापूरा ही पेठ वसली. १७३५ मध्ये थोरल्या बाजीराव पेशव्यांनी या पेठेत व्यापाराला उत्तेजन देऊन या पेठेचे सोमवार पेठ हे नामकरण केले. या पेठेत गोसावी समाजाची मोठी वस्ती असणाºया भागास गोसावीपुरा असे म्हणत. हा समाज सधन होता. सावकारी, सुवर्ण व रत्ने यांचा व्यापार त्यांच्या हातात होता. येथील स्मशानात अनेक गोसावी सत्पुरुषांच्या समाध्या होत्या. या समाध्यांशेजारी शिवमंदिरे उभारण्याची पद्धत त्या काळात होती. कित्येक समाध्यांचे  अवशेष अद्यापही दृष्टीत पडतात. स्मशानामुळे येथील मंदिरामध्ये भाविकांची वर्दळ नव्हती. त्रिशुंड गणेशाचे मंदिर उत्कृष्ट पाषाणशिल्प असूनही समाधी मंदिराची वस्तू असल्यामुळे दुर्लक्षित राहिली.
          कसबा पेठेतून मंगळवार पेठ दवाखान्याच्या दिशेने जकातेपुलानंतर उजव्या बाजूस दगडी कोरीव शिल्पांनी नटलेले त्रिशुंड गणपतीचे मंदिर आहे. त्रिशुंड गणेशाची मूर्ती महाराष्ट्रात क्वचितच आढळते. या मंदिराच्या निर्मितीमागे शिवमंदिराची कल्पना असल्यामुळे या मंदिराची शैली शिवमंदिराप्रमाणे आहे. कालमानानुसार येथे देवातांच्या व मंदिराच्या स्वरूपामध्ये थोडाफार बदल झालेला आढळतो. या मंदिरा संदर्भातील ऐतिहासिक नोंदीनुसार  इंदूरजवळ असलेल्या धामपूर येथील संपन्न गोसावी भीमगिरजी यांनी २६ आॅगस्ट १७५४ मध्ये या मंदिराचे बांधकाम केले. १७५४ ते १७७० या दरम्यान या मंदिराचे बांधकाम चालू होते. या मंदिरातील गर्भगृहाच्या चौकटीवर दोन संस्कृत व एक फारशी भाषेत शिलालेख आहेत. पहिल्या संस्कृत शिलालेखात मंदिराच्या बांधकामाचा काल व रामेश्वराची (श्री शंकर) प्रतिष्ठापना केल्याचा उल्लेख असून, दुसºया शिलालेखात गीतेतील आरंभीचा नमनाचा श्लोक कोरलेला आहे. तर फारशी शिलालेखात हे स्थान गुरुदेवदत्तांचे असल्याचे नमूद केले आहे. या शिलालेखांमध्ये मंदिराच्या बांधकामाची तारीख २६ आॅगस्ट १७५४ ही दिलेली आहे. हे शिलालेख सुस्पष्ट व सुवाच्च आहेत. संपूर्ण दगडी बांधकामाचे हे मंदिर पुुरुषभर उंचीच्या दगडी ज्योत्यावर पूर्वाभिमूख उभे आहे. राजस्थानी, माळवा व दाक्षिणात्य वास्तूशैलीचा संमिश्र वापर येथे करण्यात आलेला आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस द्वारपाल आहेत. प्रवेशद्वाराच्या कोरीव चौकटीच्या वर धारदार कमान असून, अगदी वरच्या बाजूस शेषशायी विष्णूची प्रतिमा आहे. यक्ष, किन्नर, लक्ष्मीमंत्र, मोर, पोपट, भैरव, मंगलकलश, दशावतार, गजान्तलक्ष्मी अशी अनेक मांगल्य दर्शविणारी चिन्हे प्रवेशद्वारच्या भिंतीवर कोरलेली आहेत. 
          येथील एक शिल्प मात्र राजकीयदृष्ट्या वैशिष्टपूर्ण आहे. हिंदुस्थानातील तत्कालिन राजकीय परिस्थितीचे चित्रण या शिल्पातून साकार होते. इंग्रजांनी प्लासीच्या युद्धानंतर १७५७ मध्ये बंगाल व आसामवर सत्ता प्रस्थापित केली. याची दखल मोठ्या खुबीने शिल्पकाराने घेतलेली दिसते. एक इंग्रज शिपाई बंगाल व आसामचे प्रतिक असलेल्या गेंड्याला साखळदंडाने बांधताना दिसत आहे. लवकरच इंग्रज हिंदुस्थानात आपले पाय रोवणार याची अप्रत्यक्ष भविष्यवाणी व इशारा या शिल्पातून स्पष्ट होतो. राजकीय परिस्थितीचे चित्रण करणारे हे शिल्प भारतातील मंदिरामध्ये क्वचितच आढळत असावे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर उजव्या सोंडेची गणेशमूर्ती असून, त्याखाली गणेशचक्र आहे. प्रदशिक्षणेच्या वाटेवर दक्षिणेकडील भिंतीत नटराजाची मूर्ती असून उत्तरेकडील भिंतीत विष्णू व काळभैरवाच्या कलात्मक रेखीव मूर्ती आहेत.   दक्षिणेकडील भिंतीत मंदिराच्या मागील बाजूस आगळ्या पद्धतीचे कुठेही सहासा न आढळणारे शिवलिंग आहे. ही लिंगोद्भव शिवप्रतिमा आहे.  यात फक्त शाळुंका असून, त्यावर वरच्या दिशेने उडणारा हंस, खाली मुसंडी मारणारा वराह व शिवलिंगावर छत्र धरणारा नाग अशा ठळक प्रतिमा कोरलेल्या आहेत.  पुराणातील एका कथेवर हे शिल्प आधारित आहे. एकादा ब्रह्मा, आणि विष्णू यांच्यात श्रेष्ठत्वासंदर्भात प्रश्न निर्माण झाला. या प्रसंगी एक देदिप्यमान अग्निस्तंभ प्रगट होऊन या स्तंभाचा आदी व अंत जो शोधून काढेल तो श्रेष्ठ असे ठरले. विष्णूने हंसाचे रूप घेऊन स्तंभाच्या अंताचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तर ब्रह्माने वराह रुपाने पाताळात मुसंडी मारली. परंतु या स्तंभाचा आदी व अंत दोघांनाही सापडला नाही. शेवटी दोघे श्री. शंकर देवाला शरण गेले. आपापल्या परिने दोघेही श्रेष्ठ आहात, असे सांगून श्री शंकराने लिंगोद्भव स्वरूपात आपले रुप प्रगट केले. या कथेला शिल्पातून साकार करण्याची हातोडी शिल्पकाराने उत्तमरित्या साधलेली आहे.
          गर्भगृहातील गणेश मूर्ती वेगळ्या स्वरूपातील आहे. एक मुख, तीन सोंडा व सहा हात असलेली काळ्या पाषाणातील मूर्ती मोरावर आरूढ आहे. उजवी सोंड मोदक पात्रास स्पर्श करीत असून, मधली सोंड उंदरावर आहे. तर डावी सोंड मांडीवर बसलेल्या शक्ती देवतेच्या हनुवटीला स्पर्श करीत आहे. हा गणेश सत्व, तम व रज या गुणांनी युक्त आहे. बाजूस रिद्धी - सिद्धी आहे. या मूर्तीस पाषाणाची मेघडंबरी आहे. गणेशाच्या वरच्या, उजव्या व डाव्या हातात अंकुश व परशू आहे. मोराच्या प्रतिमा असून, भिंतीवर श्री गणेशयंत्र कोरलेले आहे. शिवमंदिराच्या स्वरूपात स्थापन झालेल्या या मंदिरात कालांतराने शाक्तपंथीयांनी श्री गणेशाची स्थापना केलेली असावी. मात्र, या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेचा निश्चित काल व ऐतिहासिक संदर्भ सापडत नाही. १९३२ ते १९५२ पर्यंत हे ऐतिहासिक कलात्मक शिल्प दुर्लक्षित होते. मंदिराला शिखर नसल्यामुळे या मंदिराचे अस्तित्व लक्षात येत नव्हते.
           तळघरात जिवंत झरा असल्यामुळे येथे पाणी भरते. दरवर्षी गुरुपौर्णिमेस तळघर स्वच्छ करून भाविकांसाठी खुले करण्यात येते. विश्वस्त मंडळाने येथील शिल्पांचे नुकसान होऊ नये म्हणून अनेक उपाय योजलेले आहे. या अप्रतिम मंदिराची बहुसंख्य भाविकांना कल्पना नसल्यामुळे येथे भाविकांची वर्दळ नाही. त्रिशुंड गणपती मंदिराच्या विश्वस्त मंडळाने मंदिराची व्यवस्था उत्तम ठेवलेली आहे. शिल्पदृष्ट्या महत्वाचे असणारे त्रिशुंड गणेशाचे मंदिर खरोखरच अप्रतिम आहे.

            वरील माहिती फलकामध्ये मंदिराची सर्वच माहिती सविस्तर आल्याने मला मंदिराविषयी जास्त माहिती गोळा करावी लागली नाही. अन्य समजलेली माहिती पुढे देत आहे. 
          या मंदिराचे संस्थापक श्रीदत्तगुरू गोसावी महाराज. त्यांच्या समाधीशेजारी श्री भीमगीरजी यांनी या मंदिराची 1754 च्या सुमारास स्थापना केली. मंदिराच्या तळघरात संस्थापकांची समाधी आहे. श्री गजाननाच्या स्नानाचे तीर्थ समाधीवर पडावे, अशा प्रकारची रचना येथे करण्यात आलेली आहे. त्यांच्या समाधीचे दर्शन केवळ गुरु पौर्णिमेच्या दिवशी घडते. अन्य दिवशी दरवाजे बंद असतात. गणेशाचे दर्शन मात्र केव्हाही घेता येते. त्रिशुंड मयुरेश्वर गणपती मंदिर ट्रस्टच्यावतीने या मंदिराची व्यवस्था पाहिली जाते. या मंदिराचे बांधकाम काळया घोटीव दगडांवर करण्यात आलेले आहे. सभामंडपावर गोल घुमट असून मागे मंगलमूर्तीचा गाभारा आहे. मंदिराला कळस नाही. 
          मंदिराच्या प्रवेशद्वारावर डाव्या व उजव्या बाजूला जय विजय यांच्या मूर्ती आहेत. वर दोन हत्ती आहेत, त्यांच्या तोंडून एक तोरण निघते ज्याचे दुसरे टोक एका देवीवर आहे. ही देवी म्हणूनच गजांत लक्ष्मी म्हणूनही ओळखली जाते.  बाजूला विविध प्राणी आहेत ज्यांना  ‘व्याध’  म्हणतात. शिल्पावर मोर, पोपट असे अनेक प्राणी दिसून येतात.  पुढे आलेले चार खांब आहेत त्यावर कीचक उलटे लटकताना दिसतात, त्यांच्या हातात साखळ्या असून त्यावर मंदिराचे छत आहे. मूर्तीकाराने त्यांनी हे छत जणू काही उचलून धरले आहे असे शिल्प साकारले आहे. 
          पुणे शहराचा विकास व विस्तार झाला व ही जुन्या काळातील मंदिरे काळा आड जाऊ लागली. या प्राचीन पुणे शहराचा वारसा जपणारी काही मंदिरे अजूनही आपल्यात आहे. ही सुदैवाची बाब आहे. मंदिराचे प्राचीन महत्त्व असल्याने पुरातत्त्व खात्याने ही वास्तू राज्य संरिक्षत वास्तू म्हणून घोषित केलेली आहे. त्यामुळे मंदिराच्या डागडुजीचे काम महानगरपालिकेने केलेले आहे.  
महाराष्ट्र शासनाने ही पुरातन वास्तू व स्मारकाच्या जतनाच्या संवर्धनास सुरवात केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व विभागाने आतापर्यंत 240 वास्तू व स्मारके घोषित केलेली आहेत. महात्मा फुले वाडा, नागेश्वर मंदिर, त्रिशुंड गणपती मंदिर, विश्रामबागवाडा, शनवारवाडा, पर्वती ही राज्य संरक्षित स्मारके म्हणून घोषित करण्यात आलेली आहेत.










 






जायचे कसे : 
  • स्वारगेट पासून रिक्षा, बस करून शनवारवाडा येथे उतरून त्रिशुंड गणपती मंदिर पाहता येईल. 
  • मंगळवार पेठेतील कमला नेहरू हॉस्पिटलजवळ सोमवार पेठेत नागेश्वर मंदिराच्या अलिकडे हे गणेश मंदिर आहे.


त्रिशुंड गणपतीचे मंदिर पाहून जवळच असलेल्या नागेश्वर मंदिराकडे जाण्यासाठी निघालो. 


No comments:

कॉपी करू नका