Tuesday, September 8, 2026

सावळ्या घाटातील पूर्वजांच्या पाऊलखुणा


पावसात ओलचिंब होण्यासाठी.... निसर्गाचा चमत्कार पाहण्यासाठी.... एक दिवस निवांत हिंडण्यासाठी ताम्हीणी घाट परिसरातील सावळ्या घाटात जायचे ठरले. गाडीरस्ते आले आणि जुन्या पायवाटा वापराअभावी दुर्लक्षित होत गेल्या. सह्याद्रीत भटकणाऱ्या सह्याद्रीवेड्यांनी मात्र त्या जागत्या ठेवल्या. आज गाड्या धावणाऱ्या रस्त्यांनी गावागावांना जोडले आहे; पण प्राचीन काळी याच सह्याद्रीच्या कातळातून वाट काढत माणसं देशावरून कोकणात उतरत होती. त्या जुन्या वाटेवरच्या कातळकोरीव पायऱ्या, पाण्याच्या टाक्या आणि डोंगराच्या कुशीतून कोसळणारे रौद्र धबधबे पाहताना एक प्रश्न वारंवार मनात येत होता आपल्या पूर्वजांच्या पाऊलखुणा आजही या वाटेवर शोधता येतील का? या फेरफटक्याविषयी....




पुणे ते परातेवाडी प्रवास

सकाळी ७ ला पुणे सोडले वाटेत पिरंगुटजवळ नाष्टा केला. मुळशी खोऱ्याकडे कूच केलं. मुळशी जलाशयाच्या काठाने वेडीवाकडी वळणं घेत धरणाच्या फुगवट्याजवळून जाणारा हा रस्ता मनाला नवीन चेतना देतो.   ताम्हिणीघाट जिथून कोकणात उतरायला सुरूवात होतो त्याच्या अलिकडे 'निवे' गावापाशी पोहचलो.  
निवे फाट्यावरून वळल्यावर एक-दोन किमी अंतरावर डावीकडे परातेवाडीकडे वळालो. येथूनच पुढे कुंडलिका, अंधारबन, कैलासगड, घनगड, तैलबैला, लोणावळा जाण्यासाठी गाडी रस्त्याने अनेकवेळा हा परिसर पाहिला आहे. मात्र, मन काही भरत नाही. 
प्रति माणशी ५० रुपये देऊन गाडी पार्किंग केली. तेथून महावितरणचा टॉवर उभा असलेला दुरूनच दिसतो. त्या ठिकाणी पोहचलो. सध्या सावळ्याघाट हा परिसर चर्चेत असल्यामुळे गर्दी दिसून येते. सुमारे १० मिनिटांतच आम्ही सावळ्या घाटाच्या माथ्यावर येऊन पोहचलो. विस्तीर्ण पठारावरून कुंडलिका नदीचे खोरे व त्यात वरून पडणारे असंख्य धबधबे लक्ष वेधून घेत होते. मनसोक्त फोटोग्राफी करून झाल्यावर पुढील प्रवासाला लागलो. वाटेत जागोजागी दिशादर्शक फलक लावल्याने मार्ग शोधण्याचा प्रसंग उद्भवला नाही. रुंद असलेला पायवाट अचानक अरुंद झाल्याचे कळतही नाही. 


वाटेत दोन चार ठिकाणी जमिनीत खोदकाम केलेले दिसले. खाणीतून दगड काढतात तसे येथे हा कार्यक्रम सुरू होता. भलेमोठे कातळ यातून वर टाकण्यात आले होते. काय काम आहे व कोणाचे हे काही कळले नाही. 




तर अरुंद वाटेतून हळूहळू खाली उतरू लागलो. अचानक कानावर पाण्याचा मोठा आवाज कानी येऊ लागला व समोरील डोंगरात दिसला तो प्रचंड वेगाने व उंचावरून कोसळणारा रिंग वॉटरफॉल. त्याचे ते रौद्ररुप मनात साठवत काही काळ तेथेच थांबलो. सुमारे २०० फूट खाली उतरायचे दिसले. ते टप्प्याटप्यात उतरत आम्ही पोहोचलो ते जुन्या सातवाहनकालिन पाण्याच्या दोन छोट्या टाक्यांपर्यंत. पावसामुळे येथील पाणी गढूळ झाले होते. लोकांच्या अतिउत्साहामुळे टाक्यांत पोहणे, त्यात दगड टाकणे व अन्य उपक्रमांना आळा बसावा म्हणून या ठिकाणी चारही बाजूने लोखंडी रेलिंग लावले होते. हा पायी घाट असल्याने येथे एकदम डोंगरावरून आपण खूप खाली येतो. सुरक्षित पोहचता यावे म्हणून मोठा दोरखंड लावलेला आहे. सुरक्षितता म्हणून व ज्यांनी प्रथमच अशा ठिकाणांना भेट दिली आहे त्यांच्यासाठी हे सोईचे ठरते. येथून पुढे काहीच अंतरावर खरा घाट सुरू झाला. संपूर्ण डोंगराची ही सोंड खाली उतरावी लागत होती. वाटेत पुन्हा एक मोठे टाके दिसले येथे मात्र, पाणी स्वच्छ होते. ओंजळीत मस्त घेऊन ते थंडगार पाणी पिलो एकदम ताजेतवाना झाल्यासारखे वाटले. पुढे काहीच अंतरावर दिसल्या त्या प्राचीन पायरीमार्ग येथूनच कोकणातून घाटमाथ्यावर वाटसरू व व्यापार होत असे. या पायऱ्या पावसाळ्यात घसरड्या बनतात व येथे येणारी गर्दी लक्षात घेता या ठिकाणी थेट लोखंडी मोठा पायऱ्यांचा जिना तयार केलेला आहे. सुमारे १०० फूट खाली उतरणाऱ्या त्या जिन्याच्या साहय्याने आम्ही मुख्य घाटात डोंगराच्या मध्यभागात येऊन पोहचलो. ऐव्हना रिंग वॉटरफॉल, गरुडमाचीचा परिसर लक्ष वेधून घेत होता. १० ते १५ मिनिटांतच धबधबा किती हळूहळू खोल खाली पडतो हे आपण खाली उतरत असताना दिसून येते. वरून पाहताना काहीच अंतर आपल्याला दिसते. मात्र, प्रत्यक्षात हे अंतर खूपच खाली अजून खाली पाण्याचा प्रवाह पडत असल्याचे दिसून येते. 





स्वर्ग स्वर्ग म्हणतात तो हाच काय?
दोन्ही बाजुंनी दाट झाडी, खाली पावसाच्या पाण्याने तयार केलेला रस्ता, छोटे मोठे दगडांवरून आम्ही येऊन पोहचलो ते डोंगराच्या शेवटच्या टप्यावर येथून अचानक दोन डोंगराच्या आत लपलेला दुसरा व प्रसिद्ध असा देवकुंड धबधबा दिसतो. त्याला पाहताच मोठ्याने ओरडून त्याचा आनंद घेतला. स्वर्ग स्वर्ग म्हणतात तो हाच काय? हो हाच खरा स्वर्ग.... पावसाचा जोर जरी कमी झाला असला तरी ढग अचानक येऊन मध्येच जोरात पावसाची सर येत होती. कोणीतरी धूर करून हे सर्व करत असल्याचा भासही होत होता. उंच आकाशात पांढरे धुराचे ते ढग व समोर दिसणारे ते महाकाय धबधबे पाहत तास दीड तास तेथे रमलो. मनसोक्त फोटो काढले. काही तरुण मंडळी ड्रोनच्या सहाय्याने येथील निसर्ग टिपत होते. येथून भीरा धरण स्पष्ट दिसून येते. मध्येच पावसाची एक मोठी सर येते पुन्हा आभाळ निरभ्र होते. परत पावसाची सर, धुके हा खेळ सतत सुरू होता. ढगांच्या आढ लपणारे ते महाकाय धबधबे मनात साठवून परत पुढच्या पावसाळ्यात यायचे नक्की केले.  हे सर्व मनात साठवून आम्ही परतीच्या परातेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याला लागलो. वाटेत कांदा भजी, चहा व मॅगी करणारे अनेकजण या ठिकाणी आपला रोजगार चालवतात.
          





















AI IMAGE



AI IMAGE





सावळ्या घाट 
सावळ्या म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या नावावरून किंवा सावळ्या रंगाच्या डोंगरामुळे हे नाव पडले असावे.  इतिहासाच्या दृष्टीने मात्र एवढे स्पष्ट आहे की हा देश व कोकणाला बंदराला जोडणारा व्यापारीमार्ग होता. इतिहासात मागे वळून पाहिल्यास थेट सातवाहनकालीन मार्गाशी या सावळ्या घाट जोडला जातो. तर ताम्हिणी परिसरातील जुन्या घाटवाटांच्या संदर्भात सावळ / सावळ्या घाटाचा उल्लेख आढळतो. स्थानिक परंपरेनुसार  डोंगराचा काळसर, सावळा रंग किंवा किंवा दाट जंगलामुळे त्याला ''सावळ घाट'' म्हणत असावेत. या घाटाविषयी अधिक माहिती व्हावी म्हणून या ठिकाणी श्री शिवदुर्ग संवर्धन संस्था, पुणे यांच्या वतीने एक माहिती देणारा बोर्ड देखील लावलेला आहे. 










अजून काही माहिती 
पूर्वी म्हणजे फार पूर्वी म्हणजे सातवाहनकाळात इ. स. पूर्व २३० ते इ.स. २२० या काळात कोकणातील बंदरातून देशावर व्यापारी मार्गासाठी याचा वापर केला जाई. कोकणात पायी उतरण्यासाठी स्थानिक या मार्गाचा वापर करीत असे. उभा कातळ तासून खोदलेल्या कातळकोरीव पायऱ्या तयार केलेल्या आहेत. कातळाच्या पोटात खोदत नेलेलं टाकं हे १२ मीटर लांब  ३ मीटर रुंदी असून कातळाच्या आत खोदाई करून हे टाकं तयार केलेले दिसते.  टाक्याच्या कातळातून उतरण्यासाठी उभ्या पायऱ्या खोदलेल्या दिसतात. सावळघाटातल्या या जुन्या पाऊलखुणा पाहून खूपच आनंद होतो. पूर्वीच्या 'लेंड घाटा'च्या पाऊलवाटेवर टाटा पॉवरने सिमेंट पायऱ्या बांधल्या आहेत.  
ताम्हिणीघाटाच्या गाडीरस्त्याची सोय झाल्याने या घाटाचा पायी उतरण्यासाठी फारसा वापर होत नाही.  घाटमाथ्यावर धो-धो पडणारे पावसाचे पाणी कोकणाकडे वाहून नेणाऱ्या कुंडलिका नदीच्या विलक्षण देखण्या दऱ्यांच्यामध्ये डोंगरसोंडेच्या माथ्यावर हा सावळ्या घाट पसरला आहे.  समोर दूर घाटाच्या खाली भिरा धरणाचं पाणी चमकत होतं. येथील प्रसिद्ध देवकुंड धबधबा, रिंग वॉटरफॉल, लेंड सुळका, कुंडलिका नदीचे खोरे, सिनेर खिंड, जांभळ्या डोंगर आणि हिर्डीचं पठार, अंधारबन ट्रेक सारे एकाच दिवशी करायचे असे वाटत होते. कुंडलिकेच्या या दोन दऱ्यांतून आणि मुळशीच्या तलावातून पाईपने उतरवलेले पाणी भिरा धरणात जमा होतं, विद्युतनिर्मितीसाठी वापरलं जातं आणि याच पाण्याच्या विसर्गामुळे कुंडलिकेच्या पात्रात साहसी वॉटरराफ्टींग करता येतं. १५-२० वर्षांपूर्वी गावकऱ्यांना घाटमाथ्यावर घेऊन जाणारी हॉईस्ट प्रकारची लिफ्ट आता बंद झाली. 






एका बाजूला उंचच उंच डोंगरकडे व दुसऱ्या बाजूने असलेल्या खोल दऱ्या. पावसाळ्यात धो-धो पडणारा पाऊस, हिवाळ्यामध्ये दाट धुके, हिरवेगार डोंगर, मुळशी धरणाचा परिसर, पावसाळ्यात पळसे येथील धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांच्या गाड्यांची चाके येथे वळतात.  पर्यटकांची राहण्याची व खाण्याची हौस भागविण्यासाठी अनेक हॉटेल सुरू झाली आहेत.  मुळशीचे निसर्गसौंदर्य, पर्यावरण व तेथील जैवविविधता राखण्यासाठी शासनाने ताम्हिणीचा हजारो हेक्टरचा परिसर आता ग्रीन झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. घाटाचे सौंदर्य पाहण्यासाठी रोज हजारो पर्यटक येथे येतात. येताना मोठमोठ्या गाड्या, हॉर्न व सायलेंन्सरचा आवाज करत रस्त्यांतून हिंडताना दिसतात. शांत निसर्ग शांततेत पाहायचा सोडून येताना पोर्टेबेअल स्पीकर घेऊन त्यावर मोठमोठ्याने गाणी वाजवणारा एक महाभाग तरी असतोच. अशा लोकांना येथील स्थानिकांनीच बंदी घालायला हवी. घाटातील शेवटच्या ठिकाणी मानवनिर्मित कचरा पाहून प्रचंड राग आला. एवढ्या सुंदर जागेवर पाण्याच्या बाटल्या, प्लॅस्टिकच्या पिशव्या कचराकुंडीत टाकण्याऐवजी त्याच्या खाली पसरलेला होता. 

.....तेव्हा आणि आता सावळ्या घाटात झालेला बदल
कोकण-देश जोडणारा दुवा म्हणून ताम्हीणी घाट प्रसिद्ध आहे. घाटमाथ्यावरील मुळशी पठार आणि कोकणातील रायगड जिल्ह्यातील मैदानी भाग म्हणजे भिरा, पटणूस परिसर. यांना जोडण्यासाठी हा मार्ग वापरला जात असे.  ताम्हिणी घाट हा सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधील एक अत्यंत निसर्गरम्य आणि भव्य डोंगराळ मार्ग आहे.  मुळशी धरणाच्या जलाशयाजवळून जाणारे नागमोडी आकाराचे रस्ते आपल्याला घेऊन जातात या घाटातील निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी. घाट रस्ता पावसाळ्यात पर्यटकांसाठी स्वर्ग बनतो.  
मी आमचे काही मित्र फार पूर्वी २००७ साली सावळ्या घाटातून खाली भिरे धरणाकडे या वाटेने खाली उतरलो होतो. तेव्हाचा तो पायी रस्ता व आताचा सुधारित रस्ता खूपच वेगळा आहे. आजही येथून काही ट्रेकर्स खाली उतरतात मात्र, गुगलवर विश्वास ठेऊन एकट्या दुकट्याने येथून न उतरलेले चांगले. जुन्या वाटेचा काही भाग झाडीने/ गवताने झाकलेला असू शकतो. स्थानिक वाटाड्या किंवा अनुभवी ट्रेकर्सनेच येथून खाली उतरणे चांगले. विशेष म्हणजे, या वाटेवरील कातळात कोरलेल्या पाण्याच्या टाक्या आणि दगडी पायऱ्या पाहता हा केवळ आजचा ट्रेकिंग रूट नसून जुना मानवी वाहतुकीचा मार्ग असल्याचे पुरावे मिळतात. कोरीव पायऱ्या, पाण्याच्या ३  टाकं अशा प्राचीन खुणा पहायला मिळतात. घाटावरील लोक आणि कोकणातील घाटाच्या तळाशी असलेले लोक आजही या घाट वाटांनी ये-जा करतात.


कसे जावे :
मुळशी धरणाला लागुन कोकणाकडे जाताना, निवे गावाच्या पुढे लोणावळ्यासाठी उजवीकडे फाटा फुटतो. त्या रस्त्याने साधारणपणे एक ते दीड किलोमीटर गेल्यास, डावीकडे परातेवाडीकडे जाणारा सिमेंटचा रस्ता लागतो. 
परातेवाडीमध्ये टू व्हिलर गाडी (पार्किंग ५०) पार्क करुन सावळ्या घाट पहायला जाऊ शकता.  


पुण्यापासून परातेवाडी अंतर : ७० ते ७५ किमी. पुण्यापासून साधारणपणे ७0 किमी आणि मुंबईपासून १५० किमी अंतरावर.
परातेवाडी ते सावळ्या घाट : ३ किलोमीटर जाण्यासाठी.
पार्किंग : ५० रुपये (प्रति व्यक्ती)
किती वेळ : परातेवाडीपासून सावळ्याघाटाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत जाण्यासाठी न थांबता गेलो तर साधारणपणे ४५ तास लागतो. 
हॉटेल : वाटेत छोटे हॉटेल्स मिळतात. तसेच घरगुती जेवणाची सोय होऊ शकते. 


सावळ्या घाटाचा हा लेख आपल्याला कसा वाटला या विषयी जरूर कळवा.

कॉपी करू नका