Thursday, June 25, 2026

चिपळुणचे परशुराम मंदिर



पुराणांतील उल्लेखानुसार, जमदग्नी ऋषी आणि माता रेणुका यांचे पुत्र असलेल्या परशुरामांनी समुद्र ४०० योजने दूर करून निसर्गरम्य कोकण भूप्रदेशाची निर्मिती केली. अशा या भगवान परशुरामांचे मंदिर पाहण्याचा पुन्हा योग आला त्याबद्दल.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर चिपळूण शहराच्या जवळ भगवान परशुरामांचे एक प्राचीन मंदिर आहे.  कोकणातील चिपळूण तालुक्यातील लोटे येथे परशुराम मंदिर आहे. विष्णूच्या दहा अवतारांपैकी चिरंजीव असलेला सहावा अवतार म्हणजे भगवान परशुराम. काम, परशुराम व काळ यांचे एकत्रित असलेले हे प्राचीन मंदिर आहे. परशुरामांचे येथे कायम वास्तव्य असते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. परशुरामांनी कोकण भूमीची निर्मिती केल्यामुळे, त्यांना कोकण प्रदेशाचे अधिष्ठाता दैवत मानले जाते. असे मानले जाते की, भगवान परशुरामांनी पृथ्वी नि:क्षत्रिय केल्यानंतर सर्व दान करून टाकली. स्वत:ला राहण्यासाठी जागा नसल्यामुळे त्यांनी सह्याद्रीच्या महेंद्रगिरी पर्वतावरून (जिथे हे मंदिर आहे) समुद्रात बाण मारला. त्यांच्या बाणामुळे समुद्र मागे सरकला आणि जी भूमी तयार झाली, तिला आपण 'परशुराम क्षेत्र' किंवा 'कोकण' म्हणतो.
चिपळूणजवळील परशुराम घाटातील डोंगरावर हे मंदिर आहे.   सुमारे १५ ते २० वर्षांपूर्वी रत्नागिरी, चिपळूण, गोव्याला जाण्यासाठी हा परशुराम घाट म्हणून प्रसिद्ध होता तो त्याच्या दाट हिरवीगार झाडी, वळणदार रस्त्यांसाठी. हा घाट सध्या संपूर्णपणे नवीन तयार करण्यात आला आहे. त्यामुळे याचे मूळ सौंदर्य नष्ट झाल्याचे दिसते. विसावा पॉंईट वरून दिसणारे चिपळणूचे दर्शन, गोवळकोट दुर्ग व वशिष्ठी नदीचा प्रवाह हे सौंदर्य आता येथे मोठा रस्ता झाल्याने वाहने थांबविणे शक्य नाही. 



मंदिराच्या आवारात वेगवेगळ्या झाडांची ग्रहबाग आहे. ज्यामध्ये सोम - पळस, मंगळ - खैर, बुध - आघाडा, तुळस, सूर्य - मंदार पांढरी रई, केतू - दर्भ, गुरू - पिंपळ, शुक्र - उंबर आदी झाडे लावली आहेत. ही वृक्षसंपदा खरच पाहण्यासारखी आहे. एकाच ठिकाणी ही सर्व झाडे पाहण्यास मिळतात. 


सोळाव्या शतकात येथे आलेले बाजीराव पेशव्यांचे गुरू ब्रह्मेंद्र स्वामींना याची प्रचिती आली. त्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. जंजिऱ्याच्या नवाबाने ते पाडल्यानंतर इ.स. १७१० मध्ये त्यांनी पेशव्यांच्या मदतीने या मंदिराबरोबरच परिसरातील इतर मंदिरांचीही उभारणी केली. १९९३ मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. मंदिरात विविध काळातील स्थापत्यशैलीचा संगम पहायला मिळतो. 
मंदिराच्या आवाराला मोठी तटभिंत असून प्रवेशद्वारावर नगारखाना आहे. आवारात चिऱ्यांची फरसबंदी आहे. आत प्रवेश करताच पुरातन दगडी दीपमाळ, तसेच सिद्धिविनायकाचे मंदिर दिसते. येथे सिंहासनावर बसलेल्या उजव्या सोंडेच्या गणपतीची संगमरवरी मूर्ती आहे.  परिसरात विरगळ देखील आहे. सध्या मंदिरात नुतनीकरण करण्यात आले आहे. यात परशुरामांची आकर्षक गोल आकारातील मूर्ती तयार केली आहे. समोर असलेले आकर्षक वृंदावन पाहण्यासारखे आहे. 












दोन सभामंडप आणि गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. दोन्ही सभामंडप, तसेच गर्भगृहावर उंच शिखरे आहेत.  मुख्य मंदिरात एका चौथऱ्यावर डाव्या दिशेने अनुक्रमे काळ, परशुराम आणि काम यांच्या काळ्या पाषाणात घडवलेल्या मूर्ती आहेत. चार हात असलेल्या परशुरामांच्या तीन हातांमध्ये परशू, धनुष्य व बाण अशी आयुधे आहेत. मंदिराच्या मागील बाजूला रेणुका माता आणि गंगादेवीचे मंदिर आहे. रेणुका मातेच्या मंदिराच्या दर्शनी भागात आकर्षक रचना असलेले दगडी खांब आहेत. रेणुका मंदिराजवळ बाणगंगा कुंड आहे. परशुरामांनी गंगेची प्रार्थना करून आता कुंड असलेल्या ठिकाणी बाण मारून झरा निर्माण केला होता. त्यामुळे या कुंडाला बाणगंगा कुंड असे संबोधले जाते. 
मंदिराच्या खालच्या बाजूस गो-सेवा केंद्र व प्रसादालय आहे. येथे दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भाविकांना सकाळी ११ ते दुपारी २ पर्यंत प्रसाद म्हणून डाळ, तांदळाची खिचडी व शिरा दिला जातो. प्रसादालयाच्या समोर भक्त निवास आहे. येथे भाविकांसाठी अल्पदरात निवास व्यवस्था करण्यात येते. 


 
कसे जाल :
  • पुण्यापासून : ताम्हीणी... माणगाव व पुढे खेड.... महाड मार्गे परशुराम घाटातून परशुराम मंदिर पाहाता येते. अंदाजे अंतर २३० किलोमीटर.
  • चिपळूणपासून ११ किमी,  खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात. परिसरात निवास व न्याहरीसाठी पर्याय आहेत. 
  • हा घाट संपला की पावसाळ्यात धो-धो वाहणारा सवतसड्याचा प्रसिद्ध असा धबधबा देखील पाहता येतो.

गोवळकोट उर्फ गोविंदगड


रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहराजवळ वाशिष्ठी नदीच्या काठावर असलेला हा एक ऐतिहासिक दुर्ग  म्हणजे गोवळकोट उर्फ गोविंदगड.  १६९० मध्ये सिद्धीने बांधलेला हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकून त्याला 'गोविंदगड' नाव दिले होते. सध्या हा दुर्ग पडीक अवस्थेत आहे. प्रशासनाचे फारसे लक्ष याकडे नाही. तसेच फारसे पर्यटक येथे येत नाही. परंतु स्थानिक लोक आवर्जुन गडावर येत असतात. पर्यटकांनी पाहण्यासारखा हा दुर्ग आहे. लांबवर पसरलेली वशिष्ठ नदीचे पात्र गडावरून पाहण्यासारखे आहे. सापासारखी लांबलचक पसरलेली व वेडीवाकडी वळणे घेत चिपळूण शहराजवळून वाहणारी वशिष्ट नदीचे पात्र छान दिसते.

हा दुर्ग सुमारे २ एकरात पसरलेला आहे. गडाच्या पायथ्याशी करंजेश्वरी देवीचे मंदिर आहे. येथून देखील पायऱ्यांवाटे गडावर येता येते. किल्ल्यावर तोफा आजही पाहण्यास मिळतात. रेडजाई देवीच्या मंदिरा जवळ एक सिमेंटचा चौथरा बांधून त्यावर तोफा ठेवण्यात आल्या आहेत. पूर्वी यातील काही तोफा वशिष्ठी नदीच्या तीरावर होत्या ज्या आज गडावर नेण्यात आल्या आहेत. गडावरून वाशिष्ठी नदी आणि आजूबाजूच्या परिसराचे सुंदर दृश्य दिसते.
इतिहासाची साक्ष देणाऱ्या या गडावर दोनच वर्षांपूर्वी तोफगोळ्यांचा साठा सापडला. या ठिकाणी तोफगोळे मिळाल्याने कुतूहल निर्माण झालं आहे. गडावर फिरण्यासाठी गेलेल्या काही तरुणांना हे तोफगोळे निदर्शनास आले. खोदाई केल्यानंतर तब्बल ८० तोफगोळे सापडले हे सर्व दगडी तोफगोळे असून त्याचे जतन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राजे सामाजिक प्रतिष्ठानने केला आहे.





इतिहास
इ.स १६६० च्या सुमारास शिवाजी महाराजांनी अंजनवेलचा किल्ला व गोवळकोट हे किल्ले जिंकले व त्यांची नावे गोपाळगड व गोविंदगड अशी ठेवली. संभाजी महाराजांच्या काळात गोवळकोट सिद्दीच्या ताब्यात गेला. २० मार्च १७३६ रोजी पिलाजी जाधव, चिमाजी अप्पा यांच्या नेत्वृत्वाखालील मराठी सैन्याची व सिद्दी सात याची लढाइ झाली. यात सिद्दी (सात) मारला गेला. त्याचे १३००, तर मराठ्यांचे ८०० लोक पडले. यावेळी सिद्दी बरोबर झालेल्या तहात गोवळकोट सिद्दीने आपल्याच ताब्यात ठेवला. १७४५ नंतर तुळाजी आंग्रे यांनी या गडाचा ताबा घेतला.

जानेवारी १७४४ मध्ये गोवाळकोटवर सिद्दी याकूत याचा महल होता. आर्ग्याच्या सैन्याने किल्ल्यावर हल्ला केला सिद्दीच्या लोकांनी तोफा व बंदुकांचा मारा सुरू केला. हा गड जानेवारी १७४५ मध्ये मराठ्यांच्या ताब्यात आला. या नंतरच्या १७४८ च्या ऐतिहासिक कागदपत्रात 'गोविंदगड' नावाचा उल्लेख आहे. १७५५ मध्ये हा किल्ला पेशव्यांच्या ताब्यात आला. १८१६ ते १८१९ या काळात मराठ्यांचे सर्व किल्ले इंग्रजांनी जिंकून घेतले. मे १८१८ मध्ये इंग्रजांतर्फे कर्नल केनेडी याने गोवळकोट किल्ला ताब्यात घेतला. सन १८६२ साली किल्ल्यावर २२ तोफा असल्याची नोंद इंग्रजांच्या कागदपत्रात आहे.




गडावरील पहाण्याची ठिकाणे
गडाच्या पायथ्याशी करंजेश्वर देवीचे मंदिर आहे. या मंदिराच्या मागे गडावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत.   सुमारे ३५० छोट्या पायऱ्या चढून आपण १५ ते २० मिनिटांत गडावर पोहचता येते. प्रवेशद्वाराच्या दोनही बाजूचे बुरुज शाबूत आहेत. मात्र गडावरील दरवाजा तुटला आहे. 
 उजव्या बाजूस वाशिष्ठी नदी, त्यामागील शेती, कोकण रेल्वे व मागचा परशुराम डोंगर यांचे विहंगम दृश्य दिसते. तटावरुन पुढे गेल्यावर एक पाण्याचा प्रशस्त बांधिव तलाव दिसतो. मात्र यात पाणी नाही आहे. तलावाच्या मागे राजगडावर असणारा एका छोटा डुबा आहे. त्यावरुन संपूर्ण किल्ला पाहाता येतो.  गडाला असलेली दोनही प्रवेशद्वार नष्ट झालेली आहेत. 
प्रवेशद्वारातून बाहेर पडून गाडी मार्ग लागतो. जाते चिपळूण जलशुध्दीकरण केंद्राकडे चालत जातांना डाव्या हाताला तटबंदीचे काही अवशेष दिसतात. गडाच्या उध्वस्त पश्चिमेकडील प्रवेशद्वारातून खाली उतरुन गोवळकोट जेटीवर जाता येते. 



रेडजाई देवीच मंदिर 
मंदिरातील देवी तांदळा स्वरुपात आहे. पूर्वी देवळी स्वरुपात असलेल्या या मंदिराचा जीर्णोध्दार 'करंजेश्वरी' देवस्थानामार्फत करण्यात आला. रेडजाई ही ग्रामदेवता म्हणून ओळखली जाते. दरवर्षी होळीच्या दिवशी करंजेश्वरी देवीची पालखी वाजत गाजत या मंदिरात आणली जाते. दरवर्षी त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त शहरानजीकच्या गोवळकोट येथील ऐतिहासिक गोविंदगडावर उत्सव साजरा केला जातो.





गडावर पोहोचण्याच्या वाटा
  • चिपळूणपासून सुमारे १० किमी अंतरावर, वाशिष्ठी नदीच्या तीरावर हा गड आहे. चिपळूणहून गोवळकोटपर्यंत रस्त्याने गडाच्या माथ्यापर्यंत जाता येते. रस्ता काही अंतर कच्चा आहे. पण गाडी गडाच्या वरपर्यंत जाते. नवशिक्यांनी येथे जपून गाडी चालवावी. 
  • चिपळूण शहरापासून २ कि.मी वर असलेल्या या किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत म्हणजे करंजेश्वरी देवीच्या मंदिरापर्यंत रिक्षा मिळतात. मंदिरामागील ३५० पायरी मार्गाने १५ ते २० मिनिटात गडावर जाता येते.
हा ब्लॉग आपणास कसा वाटला या विषयी जरूर लिहा व इतरांनाही शेअर करा.

कॉपी करू नका