पुराणांतील उल्लेखानुसार, जमदग्नी ऋषी आणि माता रेणुका यांचे पुत्र असलेल्या परशुरामांनी समुद्र ४०० योजने दूर करून निसर्गरम्य कोकण भूप्रदेशाची निर्मिती केली. अशा या भगवान परशुरामांचे मंदिर पाहण्याचा पुन्हा योग आला त्याबद्दल.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर चिपळूण शहराच्या जवळ भगवान परशुरामांचे एक प्राचीन मंदिर आहे. कोकणातील चिपळूण तालुक्यातील लोटे येथे परशुराम मंदिर आहे. विष्णूच्या दहा अवतारांपैकी चिरंजीव असलेला सहावा अवतार म्हणजे भगवान परशुराम. काम, परशुराम व काळ यांचे एकत्रित असलेले हे प्राचीन मंदिर आहे. परशुरामांचे येथे कायम वास्तव्य असते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. परशुरामांनी कोकण भूमीची निर्मिती केल्यामुळे, त्यांना कोकण प्रदेशाचे अधिष्ठाता दैवत मानले जाते. असे मानले जाते की, भगवान परशुरामांनी पृथ्वी नि:क्षत्रिय केल्यानंतर सर्व दान करून टाकली. स्वत:ला राहण्यासाठी जागा नसल्यामुळे त्यांनी सह्याद्रीच्या महेंद्रगिरी पर्वतावरून (जिथे हे मंदिर आहे) समुद्रात बाण मारला. त्यांच्या बाणामुळे समुद्र मागे सरकला आणि जी भूमी तयार झाली, तिला आपण 'परशुराम क्षेत्र' किंवा 'कोकण' म्हणतो.
चिपळूणजवळील परशुराम घाटातील डोंगरावर हे मंदिर आहे. सुमारे १५ ते २० वर्षांपूर्वी रत्नागिरी, चिपळूण, गोव्याला जाण्यासाठी हा परशुराम घाट म्हणून प्रसिद्ध होता तो त्याच्या दाट हिरवीगार झाडी, वळणदार रस्त्यांसाठी. हा घाट सध्या संपूर्णपणे नवीन तयार करण्यात आला आहे. त्यामुळे याचे मूळ सौंदर्य नष्ट झाल्याचे दिसते. विसावा पॉंईट वरून दिसणारे चिपळणूचे दर्शन, गोवळकोट दुर्ग व वशिष्ठी नदीचा प्रवाह हे सौंदर्य आता येथे मोठा रस्ता झाल्याने वाहने थांबविणे शक्य नाही.
मंदिराच्या आवारात वेगवेगळ्या झाडांची ग्रहबाग आहे. ज्यामध्ये सोम - पळस, मंगळ - खैर, बुध - आघाडा, तुळस, सूर्य - मंदार पांढरी रई, केतू - दर्भ, गुरू - पिंपळ, शुक्र - उंबर आदी झाडे लावली आहेत. ही वृक्षसंपदा खरच पाहण्यासारखी आहे. एकाच ठिकाणी ही सर्व झाडे पाहण्यास मिळतात.
सोळाव्या शतकात येथे आलेले बाजीराव पेशव्यांचे गुरू ब्रह्मेंद्र स्वामींना याची प्रचिती आली. त्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. जंजिऱ्याच्या नवाबाने ते पाडल्यानंतर इ.स. १७१० मध्ये त्यांनी पेशव्यांच्या मदतीने या मंदिराबरोबरच परिसरातील इतर मंदिरांचीही उभारणी केली. १९९३ मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. मंदिरात विविध काळातील स्थापत्यशैलीचा संगम पहायला मिळतो.
मंदिराच्या आवाराला मोठी तटभिंत असून प्रवेशद्वारावर नगारखाना आहे. आवारात चिऱ्यांची फरसबंदी आहे. आत प्रवेश करताच पुरातन दगडी दीपमाळ, तसेच सिद्धिविनायकाचे मंदिर दिसते. येथे सिंहासनावर बसलेल्या उजव्या सोंडेच्या गणपतीची संगमरवरी मूर्ती आहे. परिसरात विरगळ देखील आहे. सध्या मंदिरात नुतनीकरण करण्यात आले आहे. यात परशुरामांची आकर्षक गोल आकारातील मूर्ती तयार केली आहे. समोर असलेले आकर्षक वृंदावन पाहण्यासारखे आहे.
दोन सभामंडप आणि गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. दोन्ही सभामंडप, तसेच गर्भगृहावर उंच शिखरे आहेत. मुख्य मंदिरात एका चौथऱ्यावर डाव्या दिशेने अनुक्रमे काळ, परशुराम आणि काम यांच्या काळ्या पाषाणात घडवलेल्या मूर्ती आहेत. चार हात असलेल्या परशुरामांच्या तीन हातांमध्ये परशू, धनुष्य व बाण अशी आयुधे आहेत. मंदिराच्या मागील बाजूला रेणुका माता आणि गंगादेवीचे मंदिर आहे. रेणुका मातेच्या मंदिराच्या दर्शनी भागात आकर्षक रचना असलेले दगडी खांब आहेत. रेणुका मंदिराजवळ बाणगंगा कुंड आहे. परशुरामांनी गंगेची प्रार्थना करून आता कुंड असलेल्या ठिकाणी बाण मारून झरा निर्माण केला होता. त्यामुळे या कुंडाला बाणगंगा कुंड असे संबोधले जाते.
मंदिराच्या खालच्या बाजूस गो-सेवा केंद्र व प्रसादालय आहे. येथे दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भाविकांना सकाळी ११ ते दुपारी २ पर्यंत प्रसाद म्हणून डाळ, तांदळाची खिचडी व शिरा दिला जातो. प्रसादालयाच्या समोर भक्त निवास आहे. येथे भाविकांसाठी अल्पदरात निवास व्यवस्था करण्यात येते.
कसे जाल :
- पुण्यापासून : ताम्हीणी... माणगाव व पुढे खेड.... महाड मार्गे परशुराम घाटातून परशुराम मंदिर पाहाता येते. अंदाजे अंतर २३० किलोमीटर.
- चिपळूणपासून ११ किमी, खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात. परिसरात निवास व न्याहरीसाठी पर्याय आहेत.
- हा घाट संपला की पावसाळ्यात धो-धो वाहणारा सवतसड्याचा प्रसिद्ध असा धबधबा देखील पाहता येतो.













No comments:
Post a Comment