Friday, February 20, 2026

“राजांचा गड आणि गडांचा राजा” ...... राजगड


बऱ्याच वर्षांनी राजगडावर जाण्याचा योग आला. “राजांचा गड आणि गडांचा राजा” म्हणून ओळखला जाणारा राजगड वर्षअखेरीस पुन्हा अनुभवता आला, हीच आनंदाची बाब. पुण्याहून पहाटे निघून गुंजवणे पायथ्याशी पोहोचलो. पोटपूजा करून सकाळी १० वाजता चढाई सुरू केली आणि सुमारे दोन तासांत गडमाथा गाठला.



रविवार असल्याने गडावर मोठी गर्दी होती. दुर्गप्रेमी, नवखे पर्यटक आणि सोशल मीडियासाठी रील्स बनवणारे तरुण. गडावर वाढती वर्दळ दिसते; मात्र त्यासोबत स्वच्छतेची जबाबदारीही तितकीच महत्त्वाची आहे.  एरवी किल्ल्यांकडे दुर्लक्ष करणारेही आता मोठ्या संख्येने गडांवर येताना दिसतात; हे एका अर्थाने स्वागतार्हच आहे.

चोर दरवाज्याच्या मार्गाने पद्मावती माची गाठायचे ठरवले. उभी चढण आणि दमछाक करणारा हा रस्ता; पण वाटेत झाडांची सावली दिलासा देत होती. ठिकठिकाणी स्थानिक ग्रामस्थ लिंबू सरबत आणि पाण्याच्या बाटल्या विकताना दिसले.




पद्मावती माची – राजगडाचे हृदय


राजगडावरील सर्वांत प्रशस्त आणि महत्त्वाची माची म्हणजे पद्मावती माची. येथेच पद्मावती देवीचे मंदिर, तलाव, तसेच अनेक वास्तूंचे अवशेष आढळतात. शिवकालीन काळात ही माची प्रशासकीय व निवासासाठी उपयोगात होती, असे उल्लेख आढळतात.  पद्मावती तलाव आजही पाण्याने भरलेला दिसतो. मंदिर परिसरात मुक्कामासाठी मोकळी जागा उपलब्ध आहे. बहुतांश पर्यटक चोर दरवाज्याने किंवा गुंजवणे मार्गे येऊन प्रथम याच माचीवर पोहोचतात. दुपारी १२.३० वाजता आम्ही येथे पोहोचलो. घरून आणलेले जेवण करून पुढे गडफेरीस सुरुवात केली.




पद्मावती देवी







सुवेळा माची – निसर्ग आणि संरक्षणरचना


सुवेळा माची ही राजगडाची सर्वांत देखणी आणि लांब पसरलेली माची मानली जाते. येथून सभोवतालचा परिसर अत्यंत भव्य दिसतो. ‘नेढे’ (भोकासारखी नैसर्गिक खडक रचना) हे सुवेळा माचीचे प्रमुख आकर्षण आहे. तटबंदी, बुरूज आणि डोंगररांगांचे विहंगम दृश्य येथे अनुभवता येते. सूर्योदय आणि सूर्यास्तासाठी हा भाग विशेष प्रसिद्ध आहे. वेळ मर्यादित असल्याने आम्ही फक्त पद्मावती आणि सुवेळा माची एवढाच भाग पाहिला; परंतु प्रत्येक वेळी राजगड नवे रूप दाखवतो, हे खरे.






AI Image










एक अनोखा भास

घरी आल्यावर दुसऱ्या दिवशी फोटो पाहत असताना एका छायाचित्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचा चेहरा असल्याचा भास झाला. तो केवळ योगायोग असावा; पण राजगडावर गेल्यावर प्रत्येकाला राजांची आठवण होतेच. त्या भावनेतूनच कदाचित असा भास मनात उमटला असावा.






पाण्याची व्यवस्था – योग्य की अयोग्य?


आजकाल अनेकजण केवळ मजा आणि सोशल मीडियासाठी गडावर येताना दिसतात. काही जण धोकादायक ठिकाणी फोटो काढतात. विशेष म्हणजे, पाण्याची बाटली किंवा साधी बॅगही सोबत नसते. हलके वाटावे म्हणून ते तसे करत असतील; पण यामुळे गडावर पाणी विक्रीचा व्यवसाय तेजीत आहे.

पायथ्याशी २० रुपयांना मिळणारी बाटली गडावर ४० रुपयांना विकली जाते. स्थानिकांना रोजगार मिळतो, ही सकारात्मक बाब आहे. परंतु पाणी संपल्यानंतर अनेक जण बाटल्या वाटेल तिथे फेकून देतात. गडावर प्लास्टिकच्या बाटल्यांचे ढीग पाहून मन विषण्ण होते. आपण ज्या निसर्गाचा आनंद घ्यायला येतो, त्याच ठिकाणी घाण करणे कितपत योग्य?

दुर्गसंवर्धन करणारे कार्यकर्ते प्लास्टिक गोळा करून खाली आणतात; पण प्रत्येकाने स्वतःची बाटली परत नेली, तर हा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटू शकतो. फक्त बाटल्याच नव्हे, तर प्लास्टिक पिशव्या आणि उरलेले अन्नही काहीजण तिथेच टाकून जातात—हे अत्यंत खेदजनक आहे.

राजगडावर अनेक पाण्याची टाकी आहेत. त्यांची योग्य स्वच्छता आणि देखभाल केली, तर पिण्याच्या पाण्याची चांगली व्यवस्था होऊ शकते. अन्यथा “पाण्याची व्यवस्था करणे योग्य की अयोग्य?” हा प्रश्न कायमच राहील.

गडावर पाणी विक्रीची सोय असली तरी स्वतःची पाण्याची बाटली आणणे आणि ती परत घेऊन जाणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. प्लास्टिक कचऱ्यामुळे गडाचे सौंदर्य बाधित होते. राजगडावर अनेक पाण्याची टाकी आहेत; त्यांची स्वच्छता राखली तर मोठ्या प्रमाणात प्लास्टिक टाळता येईल.



वाढती गर्दी आणि बदलते चित्र


स्थानिक विक्रेत्यांशी बोलताना कळले की शनिवार-रविवार आणि सुट्टीच्या दिवशी गडावर प्रचंड गर्दी होते. दुपारी ३ वाजता वाटेत थांबून मॅगी बनवली. जेवण आटोपून ४.३० वाजता परतीचा प्रवास सुरू केला. आल्याच मार्गाने उतरत तासाभरात पायथा गाठला आणि त्यानंतर पुण्याकडे प्रयाण केले.

चढाईदरम्यान झारखंडचा एक तरुण भेटला. सध्या बंगलोरमध्ये नोकरी करत असून, दोन दिवसांपूर्वी गुप्त भीमाशंकर पाहून तो थेट राजगडावर आला होता. कोणीतरी त्याला राजगडाविषयी सांगितले आणि तो आवर्जून पाहायला आला. खरेच, अशी लोकं प्रेरणादायी असतात. महाराष्ट्रात राहूनही अनेकजण किल्ल्यांकडे फिरकत नाहीत, हे मात्र खेदजनक आहे. राजगड हा केवळ ट्रेक नसून इतिहासाशी संवाद आहे. येथे प्रत्येक दगडात शिवकालीन स्मृती दडलेल्या आहेत. गडावर फिरताना नकळत छत्रपती शिवाजी महाराज यांची आठवण होतेच. वाढती गर्दी स्वागतार्ह असली तरी स्वच्छता आणि जबाबदारीची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे. गड जपू या—तोच खरा दुर्गभ्रमंतीचा संस्कार.

राजगडावर या, निसर्गाचा आनंद घ्या...

पण गड स्वच्छ आणि सुरक्षित ठेवण्याची जबाबदारीही पार पाडा.




पुण्याहून राजगडाकडे कसे जावे?

रस्ता मार्ग (गुंजवणे पायथा)

पुणे → कात्रज बोगदा → नसरापूर फाटा → भोर मार्ग → गुंजवणे गाव

पुण्यापासून अंतर : सुमारे ६० किमी

वेळ : १.५ ते २ तास 

गुंजवणे येथे पार्किंगची सोय उपलब्ध आहे. 30 Rs.



राजगड चढण्याचे प्रमुख मार्ग : 


राजगडावर वेगवेगळ्या बाजूंनी चढाई करता येते:

गुंजवणे मार्ग (चोर दरवाजा)

सर्वाधिक वापरला जाणारा मार्ग, वेळ : २ ते २.५ तास


पाली दरवाजा मार्ग (पाली गावाकडून) तुलनेने सोपा,  वेळ : २.५ ते ३ तास

कमी वापरला जाणारा अळू दरवाजा मार्ग

अनुभवी ट्रेकर्ससाठी भूतोंडे/नेढे बाजूने मार्ग, स्थानिक मार्गदर्शकासोबत जाणे योग्य



चढाईस लागणारा वेळ


नवख्या ट्रेकर्सना : २.५ ते ३ तास

सराव असलेल्यांना : १.५ ते २ तास

पूर्ण गडफेरीस : किमान ४ ते ५ तास 


हा ब्लॉग आपल्या उपयोगी पडेल अशी आशा आहे.



No comments:

कॉपी करू नका