Sunday, June 16, 2013

मुरुगन हिल्स



रविवार होता. लोणावळ्यातील निसर्गाचे सौंदर्य पाहून ६.३० परतत होतो. धो-धो पाऊस पडत होता. मध्येच काही काळ पाऊस विश्रांतीसाठी थांबत होता. चहा पिण्यासाठी म्हणून देहूरोड बायपासवरील हॉटेलमध्ये थांबलो असता समोरील डोंगरावरील मंदिराकडे लक्ष गेले. चौकशी केली असता ‘मुरुगन हिल्स’ असे नाव कळले. त्या विषयी....

मुरुगन हिल्स

                देहूरोड हे पिंपरी-चिंचवड शहरालगतचे एक छोटेसे गाव. संतश्रेष्ठ तुकाराममहाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला इथला परिसर. शेलारवाडीच्या  (घोरावडेश्वर)च्या डोंगराच्या पश्चिम बाजुस एक छोट्याश्या टेकडीवर प्रभू सुब्रमण्यमस्वामी अर्थात भगवान कार्तिक स्वामींचे हे मंदिर आहे. ‘मुरुगन हिल्स’ नावाने हे मंदिर प्रसिद्ध आहे. या ठिकाणी संत तुकाराम महाराजांनी आपले काही अभंग गायले आहेत. सुब्रमण्यम स्वामी हे मंदिर देहूरोड आणि पंचक्रोशीतील भक्तांचे एक धार्मिक स्थळ आहे. देहूरोड बायपास संपल्यानंतर डाव्या बाजूला घोरावडेश्वराचा मोठा डोंगर  दिसतो. याच्या कुशीत हे मंदिर आहे. 

         





मंदिराची स्थापना : 

               समुद्रसपाटीपासून हे मंदिर ३५०० फूटावर निसर्गरम्य ठिकाणी आहे. परिसरातील अनेक भक्तांच्या प्रयत्नातून १९७४ पासून या मंदिराचा विकास झालेला आहे. मंदिराची कोनशिला १४ मार्च १९७५ मध्ये देहूरोड लष्करी भागातील सीआयएसबीचे नियंत्रक ब्रिगेडियर सी. सुंदरम् यांच्या हस्ते बसविण्यात आली आहे. शारदापीठाचे जगद्गुरू शंकराचार्यमहाराज यांच्या हस्ते मंदिराचे भूमिपूजन २८ मे १९९५ मध्ये झाले होते. मंदिरातील मूर्ती तामिळनाडूतील वेलूर  जिल्ह्यातील रत्नागिरी गाव स्थित बालमृगन मंदिराच्या कार्तिक स्वामींचे परमभक्त श्री बालमुरुगन स्वामीद्वारा दान मिळाल्या आहेत. दरवर्षी सुब्रमण्यम स्वामींच्या होणाºया सर्व उत्सवात हजारो भक्त सहभागी होतात. सुब्रमण्यमस्वामी मंदिर हे साऊथ इंडियन लोकांचे श्रद्धास्थान आहे. त्यांचे सांस्कृतिक व धार्मिक जीवन या मंदिरात दिसून येते.
           मुरगन हिल्सवर प्रभू सुब्रमण्यमस्वामी अर्थात भगवान कार्तिक स्वामींच्या मंदिराबरोबरच गणपती, हनुमान, बालाजी, पद्मावती, नवग्रह मंदिर, साईबाबा मंदिरे ही आहेत. धार्मिक विधी करण्यासाठी येथे मोठा हॉलही उभारलेला आहे. साईबाबांची काकड आरती दररोज होते.






डोंगरावर जाण्यासाठी पायºयांचा रस्ता आहे. तसेच फोर व्हिलर वरपर्यंत जाते. मंदिराच्या परिसरातून देहूरोड परिसर मोठा छान दिसतो. मागे असलेला घोरावडेश्वराचा डोंगर पुढे देहूगावातील गाथा मंदिरही दिसते. एकदा तरी आवश्य जाण्यासारखे हे ठिकाण आहे.   

                                                                        
 मंदिराची वेळ :

सोमवार ते शुक्रवार (धार्मिक कार्यक्रम नसल्यास)

  • सकाळी ६.३० ते १०.३०
  • संध्याकाळी ५.३० ते ८.३०

शनिवारी (धार्मिक कार्यक्रम नसल्यास)

  • सकाळी ६.३० ते ११.३०
  • संध्याकाळी ५.३० ते ८.३०

धार्मिक कार्यक्रम असल्यास : 

  • सकाळी ६.३० ते संध्याकाळी ८.३०

कसे जाल : 

  • जुन्या पुणे-मुंबई रस्त्यावर देहूरोड ओलांडून तळेगावच्या दिशेने जाताना डाव्या बाजूला घोरावडेश्वर डोंगर दिसतो. याच्या पायथ्याशी छोट्याच्या टेकडीवर हे मंदिर आहे. त्यासाठी डाव्या बाजूला वळून डोंगरावर जाता येते.
  • कात्रज-देहूरोड बायपासवर तळेगावला जाण्यासाठी रस्ता लागतो. वरील प्रमाणे जाता येते.
  • मुंबईकडून येताना घोरावडेश्वर डोंगर ओलांडल्यानंतर देहूरोड बायपासच्या अलिकडे डाव्याबाजूला हे मंदिर दिसते. 

अजून काही जवळील प्रेक्षणिय स्थळे :

No comments:

कॉपी करू नका