Sunday, June 2, 2013

अजिंक्यतारा - साताºयाचा मानाचा तुरा



मे महिना असल्यामुळे लग्नसराई जोरात सुरू होती. मेहुणीचे लग्न साताºयाला होते. आपोआपच साताºयातील प्रसिद्ध किल्ला पाहण्याचा योग आहे. त्याविषयी...


      अजिंक्यतारा हा साताºयातील एक किल्ला. अजिंक्यतारा या नावाने ओळखला जाणारा हा किल्ला वेगवेगळ्या राजवटीत वेगवेगळ्या नावाने ओळखला गेला आहे. सातारचा किल्ला,  आझमतारा, हुकेबहन, सप्तर्षीचा किल्ला, मंगळाईचा किल्ला, इस्मतआरा, शाहूगड, सतारे तसेच अजिमतारा अशा विविध नावाने ओळखला गेला. 
         प्रतापगडापासून निर्माण झालेल्या बामणोली रांगेवर हा किल्ला उभारलेला आहे. हा किल्ला म्हणजे मराठी साम्राज्याची चौथी राजधानी. पहिली राजगड मग रायगड, जिंजी आणि चौथी अजिंक्यतारा. किल्ला शिलाहार वंशातल्या दुसºया भोजराजाने इ.स. ११९० मध्ये बांधला. पुढे बहामनी सत्तेनंतर मग विजापूरच्या आदिलशहाकडे गेला. इ.स.१५८० मध्ये पहिल्या आदिलशहाची पत्नी चांदबिबी येथे कैदेत होती. 
         गाडी मार्गाने वर जात असताना रस्ता छान आहे. मी पावसाळ्याआधी गेल्याने कदाचित असेल. काही टर्न फारच शार्प असल्याने गाडी चालविण्याचे कौशल्य पणाला लागते. पायथ्यापासून केवळ दहा मिनिटातच गडाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर पोहचलो. भगवान भरोसे गाडी लावून गड पाहण्यास निघालो. गाडीतळापासून गडावर प्रवेश करताना दोन दरवाजे आहेत. आजही या दोन दरवाजांपैकी पहिला दरवाजा चांगल्या स्थितीत आहे. दरवाजाचे दोन्ही बुरूज आज अस्तित्वात आहेत. उजवीकडे हनुमानाचे मंदिर आहे. ट्रेकिंग करणाºयांसाठी हे मंदिर राहण्यास उत्तम आहे. 
         समोर प्रसारभारती केंद्राचे कार्यालय व मागे प्रसारभारती केंद्राचे दोन टॉवर आहेत. हे टॉवर सातारा शहरातूनही चांगलेच मोठे दिसतात. याबाबतीत अजिंक्यतारा हा सिंहगडाची आठवण करून देतो. पुढे गेल्यावर एक डावीकडे जाणारी वाट दिसते व मंगळादेवी मंदिराकडे असे तिथे लिहिलेले आहे. वाटेत ताराबाई यांचा निवास असलेला ढासळलेला राजवाडा आणि कोठार आहे. वाटेच्या शेवटी मंगळादेवीचे मंदिर लागते. किल्यावर प्रवेशकरताना दरवाज्याच्या थोडे पुढे महाराष्ट्र शासनाने किल्याची छान माहिती लिहून ठेवली आहे. असा उपक्रम प्रत्येक पर्यटन स्थळावर करावयास हवा. 











माहिती अशी : 

         अजिंक्यतारा किल्ल्याचे मूळचे नाव सातारचा किल्ला. समुद्रसपाटीपासून या किल्याची उंची ३२२० फूट आहे. शहरापासून हा किल्ला ९०० फूट उंचीवर आहे. या किल्याची पूर्व-पश्चिम लांबी ३३०० फूट व दक्षिण-उत्तर रुंदी १८०० फूट आहे. हा किल्ला त्रिकोणी असून, याचा पाया दक्षिण-उत्तर पूर्वेस आहे.
         कोल्हापूरच्या शिलहार वंशीय दुसºया भोजराजाने इ. स. ११९० मध्ये हा किल्ला बांधला. शिलहाराकडून देवगिरीच्या यादववंशीय सिंधन राजाने हा किल्ला जिंकून घेतला. त्यांच्या ताब्यात इ. स. १२०० ते १३०० पर्यंत हा किल्ला होता. त्यानंतर दिल्लीच्या खिलजी सुलतानाने हा किल्ला जिंकला. त्याच्याकडून तुघलक घराण्याने हा किल्ला जिंकून घेतला. त्यानंतर इ.स. १३४७ पासून १४९८ पर्यंत हा किल्ला बहामनी राजाकडे होता. विजापूरच्या अदिलशहाने हा किल्ला जिंकून घेतला. या किल्यावर इ. स. १५७९ मध्ये चांदबेबीला तीन वर्षे या ठिकाणी कैद करून ठेवले होते. विजापूरकराने फलटणचे मुधोजी नाईक-निंबाळकर यांना १६४० पर्यंत याच किल्यावर सात वर्षे कैद करून ठेवले होते. १६५९ मध्ये छत्रपती शिवाजीमहाराजांनी हा किल्ला जिंकला. त्यानंतर मोगली अक्रमणांमुळे छत्रपती शिवाजीमहाराजांनी तह करून हा किल्ला मोगलांना दिला. १६६६ नंतर हा किल्ला विजापूरांकडे गेला. छत्रपती शिवाजीमहाराजांनी हा किल्ला जिंकून ताब्यात घेतला. शहाजीमहाराजांची विजाूपरांच्या कैदेतून सुटका झाल्यावर जेजुरी येथे व त्यानंतर या किल्लयावर शहाजी व शिवाजी या दोघांची भेट घडली. पुन्हा किल्ला विजयपूरांकडे गेला. त्यांच्याकडून हा किल्ला इ. स. ११ नोव्हेंबर १६७५ रोजी जिंकून छत्रपती शिवाजीमहाराज १ डिसेंबर १६७६ पासून २५ जानेवारी १६७७ पर्यंत वास्तव्य करून होते. छत्रपती राजाराम महाराजांनी २३ मे १६९८ रोजी सातारा ही राजधानी घोषित केली. २ मार्च १७०० रोजी त्यांचे निधन झाले. त्यानंतर अजिमशहाने या किल्ल्यावर हल्ला चढविला. फंदफितुरीमुळे हा किल्ला पुन्हा मोगलांच्या ताब्यात गेला. या लढाईत किल्लेदार प्रयागजी अनंत फणसे याने पराक्रम धर्माची शर्थ केली. २००० सैनिकांना वीरमरण प्राप्त झाले. मुघल बादशहाने या विजयाचे स्मारक म्हणून गोलाकार विजय स्तंभ करंजे, ता. सातारा येथे उभारला.
         ३ नोव्हेंबर १६८९ रोजी मोगलांनी रायगड ताब्यात घेऊन मातोश्री येसुबाई व बाळराजे शाहू यांना कैद केले. २० फेब्रुवारी १७०७ रोजी औरंगजेब पैंगबरवासी झाल्यावर त्याचा मुलगा अजिमशहा याने शाहू राजाची कैदेतून सुटका केली. त्यानंतर १२ जानेवारी १७०८ रोजी त्यांचा याच किल्यावर राज्याभिषेक झाला. त्यांच्या कालखंडांनंतर छ. रामराजे, छ. आबासाहेब ऊर्फ दुसरे शाहूमहाराज आणि छ. प्रतापसिंहराजे यांचे राज्याभिषेक याच किल्यावर झाले. 
         अजिंक्यतारा हा किल्ला पन्हाळ्याचे भोजराज द्वितीय यांनी सन ११७८ ते ११९३ या काळात बांधला व मराठेशाहिची राजधानी सातारा ही सन १६९८ साली जाहीर केली गेली. सन १५८० ते १५९२ या काळात प्रसिद्ध चांदबिबी या किल्यावर कैदेत होती. या किल्याचा उपयोग पूर्वी तुरुंगासारखाच केला जाई. सन १६७३ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी हा किल्ला विजापूरकरांचेकडून ताब्यात घेतल्याचा दाखला असून सन १७०० ते १७०६ तो औरंगजेबाचे ताब्यात गेला होता. सन १८४४ साली तो छत्रपती प्रतापसिंह महाराजांचे ताब्यात आला. या गडावर पुरातनकालचे मंगळाई देवीचे व हनुमान मंदिर आहे. अजिंक्यताºयातील जो पडीक राजवाडा आहे तो कै. छत्रपती शाहू महाराज यांनी बांधलेला आहे. दिल्ली सुटकेनंतर त्यांनीच सातारला महत्व प्राप्त करून दिले. 
या किल्लयावर दुधबावी, सागरी सुलतान पीर, मंगळाई, शिवसागर सप्तऋषी, कोठी व भवानी ही सात तळी होती. तसेच मंगळाई, नृसिंह, हनुमंत, महालक्ष्मी, रामेश्वर, सप्तश्री व विठोबा ही सात देवालये होती. शेख सल्ला व साकडा सुलतान हे दोन पीर येथे होते. याच किल्लयावर महाराणी येसूबाई, महाराणी ताराबाई व महाराणी आनंदीबाई ऊर्फ माईसाहेब यांचे वास्तव्य घडले. १० फेब्रुवारी १८१८ रोजी इंग्रजांनी मराठ्यांचा जरीफटका उतरवून येथे युनियन जॅक फडकाविले. 
साताराचा किल्ला हुकेबहन, सप्तर्षीचा किल्ला, मंगळाईचा किल्ला, इस्मतआरा, शाहूगड, सतारे तसेच अजिमतारा या नावाचा हा किल्ला अजिंक्यतारा झाला.
           भोजराजाची राजधानी पन्हाळगड येथे होती. या गडाचे ईशान्येस पूर्वीचे सातर हे गाव होते. सातर म्हणजे भरपूर  देणारे. या सातरचे सातारा झाले. सातारच्या किल्ल्यावर सप्तर्षीचे देऊळ होते. सप्तर्षीपासून सप्तर्षीपूर हे सातारचे जुने नाव रुढ झाले. जुन्या संस्कृत ग्रंथात सप्तर्षीपूर असा या गावाचा उल्लेख आढळतो. ऐतिहासिक व राजकीय पत्रव्यवहारात सातारे असा उल्लेख आढळतो. सातारच्या किल्ल्याला तट, बुरुज आणि वेशी यांची संख्या सतरा आहे. सतरावरून सातारा, सातदरेपासून सातारा, सप्ततारापासून सातारा अशा साताराच्या इतिहासाशी छत्रपती शिवाजीमहाराजांचा ऋणानुबंध आहे. शिवरायांचा सातारा, समर्थांचा सातारा, कर्मयोग्यांचा आणि कर्मवीरांचा सातारा, अजिंक्यताºयाचा सातारा, स्वातंत्र्यसंग्रामाचा अग्रदूत सातारा, अजिंक्यताºयाच्या गौरवशाली इतिहासाचा साक्षीदार असलेला सातारा शहराला पंडित जवाहरलाल नेहरूंनी ‘जय सातारा’ म्हणून गौरवले आहे. 














दिसणारा परिसर

सातारा शहर किल्यावरून छान दिसते. तसेच समोरचे यवतेश्वराचे पठार, चंदनवंदन किल्यांची जोडगोळी, कल्याणगड, जरंडा आणि सज्जनगड हा परिसर दिसतो.

 कसे जाल ?




  • पुणे-बेंगलोर महामार्गावर सातारा हे मोठे शहर लागते. येथून जवळच अजिंक्यतारा आहे. अंदाजे ५ ते ६ किलोमीटर रस्ता आहे.  स्वत:चे वाहन असल्यास किल्ल्यावर थेट जाता येते. रस्ता चांगला आहे. 
  • एसटीने साताºयाला उतरल्यावर अदालत वाड्यामार्गे जाणारी कोणतीही गाडीतून अदालत वाड्याजवळ उतरावे. अदालत वाड्याच्या शेजारील वाटेने आपण गडावर जाणाºया गाडी रस्त्याला लागतो व त्या रस्त्याने चालत गेल्यावर आपण गडाच्या दरवाज्यापाशी पोहचतो. 
  • गडावर थेट गाडी रस्ता असल्याने पायी जाण्याऐवजी गाडीने गेलेले बरे. 
  • संपूर्ण गड बघण्यासाठी साधारणत: दीड तास लागतो. 

1 comment:

Anand Chavan said...

खूप चांगली विस्तृत समजेल अशी माहिती सुंदर पद्धतीने मांडली आहे. अजिंक्यतारा या किल्ल्याचा इतिहास वाचण्यासाठी हे पेज खूप सुंदर माहितीपूर्ण आहे.

कॉपी करू नका