Friday, June 14, 2013

गतवैभवाची साक्ष देणारा बोरगेवाडा


 शाळेला सुट्टी लागली की लहानपणी आमचा मोर्चा पवना नदीवर असायचा. चिंचवडगावातील फत्तेचंद शाळेच्या पाठीमागील नदीवर, रावेत बंधाºयावर आम्ही पोहायला जायचो. मस्त मजा यायची. रावेत बंधाºयावरून पलिकडील काठावर एक जुनी गढी दिसायची. फिरता फिरता या ठिकाणी गेल्याचे आठवते आहे. आज सकाळी पाऊस कमी होता. वातावरण स्वच्छ असल्याने पुनावळेचा बोरगेवाडा पाहण्याचे मनात आले.  त्या विषयी...

              पिंपरी-चिंचवड शहर फोफाट्याने चारही बाजुला पसरत आहे. पूर्वीची लहान-लहान गावे आता चक्क मोठ्या इमारती, अलिशान बंगले व मोठे पुलांनी सजत आहे.  अशाच रावेत गावात पंधरा वर्षांपूर्वी जेव्हा आम्ही जायचे तेव्हा संध्याकाळनंतर येथे थांबण्यास भीति वाटायची. दुर्गादेवी टेकडीची हिरवीगार झाडी, रावेत येथील झाडी व यामुळे संध्याकाळनंतर या ठिकाणी भयाण शांतता असायची. कालांतराने येथील पुनावळे, रावेत ही गावे रुप पालटू लागली. गावाचे महानगरात रुपांतर होऊ लागले.  डीवायपाटील सारखी महाविद्यालये, आकुर्डी रेल्वेस्टेशन, अलिशान इमारती यामुळे वाल्हेकरवाडी, पुनावळे, रावेत या गावांचा कायापालट काहीच वर्षात झाला.

              अशाच पुनावळे या गावी एक छोटा गढीवजा वाडा आहे. त्याचे नाव बोरगेवाडा.  नव्याने समाविष्ट झालेल्या पुनावळे गावात ही शिवकालीन गढी आहे. इतर ऐतिहासिक इमारतींप्रमाणे या ही वाड्याची दुरवस्था झाल्याचे येथे गेल्यावर दिसले. ऐतिहासिक ठेवा असणारी ही गढी इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे. अंदाजे १ एकरावर असलेला वाडा मोठा प्रशस्त आहे.
सातारा जिल्ह्यातील खटाव या भागातील बोरगेंना शिवकाळात पुनावळे गाव वतन म्हणून मिळाले होते. तळेगावातील दाभाडे सरदार आणि पुनावळेत बोरगे सरदार या वतनदारांचा खूप नावलौकिक होता. हे दोन्ही वतनदार छत्रपतींच्या पदरी काम करीत असत. दाभाडे सरकार पुण्यात शनिवारवाड्यावर जेव्हा जात, तेव्हा त्यांना पुनावळेतून जावे लागे. म्हणजेच छत्रपतींच्या कालखंडात, अर्थात साडेतीनशे वर्षांपूर्वी या गढीची निर्मिती बोरगे सरकारांनी केली.
               १७७१ म्हणजेच म्हणजे उत्तर पेशवाईतील हा वाडा असल्याचे येथील नागरिक सांगतात. गढीचा इतिहास फारसा माहित नसल्याने नक्की कोणत्या वर्षी या गढीची निर्मिती झाली, याची माहिती देणे अशक्य आहे. गढीस मोठे चार बुरुज असून, दोन मोठे दरवाजे आहेत. गढीमध्ये एक तुळशी वृंदावन आणि एक छोटीशी विहीर सुद्धा आहे. तुळशी वृंदावनावर सुंदर नक्षीकाम केले आहे. तसेच राहण्यासाठी एक छपरवजा घर आहे. त्या समोर एक चावडी आहे. सध्या गढीच्या चारही भिंतींची पडझड झाली आहे. मुख्य दरवाजाची चौकट ही त्यामुळे काष्ठशिल्पाचा उत्कृष्ट आहे. काही ठिकाणी ही चौकट खराब होण्याच्या मार्गावर आहे. गढीची पडझड मोठ्या प्रमाणावर झाल्याने आतमध्ये कोणीही राहत नाही. गेल्या काही वर्षांत या गढीची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली आहे.
              बोरगे सरदारांचे घराण्याचे वैशिष्ट्य म्हणजे मोगलांच्या सैन्याबरोबर पुनावळे येथे मोठी लढाई झाली होती. या लढाईत बोरगे घराण्यातील सैन्य मोठ्या प्रमाणावर धारातीर्थी पडले होते.
इतिहासाची आवड असणाºयांनी या वाड्याला भेट देण्यास हरकत नाही.  अन्य  हौशी पर्यटकांना मात्र, येथे काहीही विशेष वाटणार नाही. उगाच काहीतरी. या ब्लॉगवर वाचून तेथे गेलो व आपली सुट्टी वाया घालावली अशी टीका मात्र हौशी पर्यटक करतील. जवळच रावेतचा नवीन आकर्षक पूल बांधलेला आहे. ऐतिहासिक ठेवा असणाºया या वास्तूचे जतन व्हावे यासाठी पुरातत्त्व विभागाने पुढाकार घेणे गरजेचे आहे. येथून जवळच असलेल्या रावेतच्या बंधाºयावर गेलो.   नुकताच पावसाळा सुरू झाल्याने पवना नदीत वाहून आलेली मोठ्याप्रमाणावरील जलपर्णी सर्वत्र पसरलेली दिसली.
              वाड्याशेजारी सिमेंट क्राँकिटच्या बिल्डिंग उभा राहिलेल्या आहेत. त्यामुळे अंग चोरून बसल्यासारखा हा वाडा सध्या दिसत आहे. चिखलीतील जाधववाडी, इंदोरीची गढी, बोरगेवाडा, चाकणचा भुईकोट किल्ला, खेड वाफगावजवळील होळकर यांचा वाडा असे अनेक वाडे पुणे जिल्ह्यात आहेत. जुनं ते सोनं म्हणतात. पण आपल्याकडे ऐतिहासिक वस्तूंची जपणूक केली जात नाही. जिल्ह्यात अनेक असे छोटे वाडे, गढी आजही आपले अस्तित्व टिकवून आहेत. जीर्ण झालेले हे पडके वाडा आपल्या गतवैभवाची साक्ष देत उभे आहेत. लवकरच संवर्धन न केल्यास या वास्तू केवळ मातीचे ढिगारे होऊन राहतील.कसे जावे 

  •  चिंचवड गावातून वाल्हेकरवाडीमार्गे रावेत पुलावरून पुनावळे गावाकडे जाताना येते.
  • पुण्याकडून येताना डांगे चौकातून चिंचवडगावाकडे न वळता सरळ येऊन पुनावळे गावाकडे जाता येते.
  • देहूरोड-कात्रज बायपास या गावाच्या शेजारूनच जातो. तेथूनही येता येईल.

2 comments:

Unknown said...

borge sardar aple abhari ahe --- UMESH BORGE

Prashant Kulkarni said...

मी गेल्या रविवारी पुनावळे भागात गेलो होतो. तुम्ही म्हटल्या प्रमाणे तो भाग तुफान वाढत आहे. एकाने त्या भागात घर घेतले आहे, त्याला भेटायला गेलो होतो. जाताना, पुनावळे गावठाणातुन गेलो, तेव्ह्या ह्या बोरगे वाड्याचे काही भाग, बुरुज दिसले. मला नक्कीच उत्सुकता वाटली होती, पण वेळ नव्हता. परत केव्हा तरी जावे असा विचार केला. आज सहज त्या बद्दल माहिती शोधात असता, तुमचा ब्लॉग सापडला. अतिशय छान माहिती दिली आहे. धन्यवाद. मी देखील ट्रेकिंग, आणि असे इतिहासाशी निगडीत उद्योग करत असतो, त्याबद्दल लिहीत देखील असतो. माझा ब्लॉग जरूर पहा: https://ppkya.wordpress.com

धन्यवाद,
प्रशांत कुलकर्णी

कॉपी करू नका