Tuesday, August 13, 2013

ताम्हिणी घाट


१०/८/२०१३
बरेच दिवसांपासून कुठे तरी लांब हिंडण्याचा मनोदय होता. पाऊस  उघडला होता. त्यामुळे लांब कुठेतरी हिंडून येण्याचे पक्के केले. चिपळुणला आमचे  कुलदैवत श्री. करंजेश्वरी आहे. तिचे दरवर्षी दर्शन  घेण्यासाठी आम्ही नवरात्रात जातो. मागील वर्षी काही कारणामुळे राहून गेले होते. यावर्षी लवकरच दर्शन घेण्यासाठी निघालो. ताम्हिणी घाटातून रायगड, चिपळूण, श्री. परशुराम मंदिर, विसावा पाइंट व नंतर संगमेश्वर येथील श्री. कर्णेश्वर मंदिर व परत येताना कुंभार्ली घाटातून परत घरी असा दोन दिवसांचा प्रवास केला. त्या विषयी....
(४ ते ५ ठिकाणे असल्यामुळे एकदम सर्व प्रवास वर्णन करणे शक्य नव्हते. फोटो सुद्धा बरेच काढले असल्यामुळे दोन वेगळे भाग करून प्रवास वर्णन करत आहे.  सध्या फक्त ताम्हिणी घाट व रायगड रोपेवे मधून रायगड हे वर्णन देत आहे. लवकरच श्री. करंजेश्वरी देवी, परशुराम मंदिर व श्री कर्णेश्वर याचा भाग लिहितो.)

कोकणात जाण्यासाठी पुण्याहून ताम्हिणी घाट, कुंभार्ली घाट, महाबळेश्वर मार्गे पोलादपूर, वरंधा घाट हे गाडी रस्ते आहेत. तसे पानशेतधरणाच्या पाठीमागून, तसेच सह्याद्रीच्या अनेक खिंडीतून पायी कोकणात उतरणारे रस्ते आहे. चिपळणूमधील करंजेश्वरी आमची कुलस्वामिनी दरवर्षी नवरात्रात देवीचे दर्शन घेण्यासाठी आम्ही नेमाने जातो. जाताना रायगड किल्ला पाहण्याचा विचार नक्की केला. 


ताम्हिणी घाटातून जाणारा रस्ता.



सकाळी घरातून तयारी करून ७ वाजता निघालो. काळेवाडी, हिंजवडीमार्गे घोटावडे व तेथून पौड मार्गे ताम्हिणी घाटात पोहोचलो. येथपर्यंतचा रस्ता चांगलाच खराब आहे. त्यामुळे सकाळचे ९.०० वाजले. शनिवार-रविवार असून  देखील हौशी पर्यटकांची गर्दी नव्हती. त्यामुळे ट्रॅफिक जॅमचे प्रकाराचा अनुभव आला नाही. पाऊसाची हलकिशी रिमझिम सुरू होती. ताम्हिणी घाटच्या एका बाजूला दरी व दुसºया बाजुला डोंगर आहेत.  वाटेत गरुडमाची म्हणून पाहणेसारखे निसर्गरम्य ठिकाण आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधून कोसळणारे धबधबे, खळखळून वाहणारे ओढे, डोंगरांवरती आच्छादून टाकणारे ढग, ताम्हिणीचा घाट, समोरच्या डोंगरातून जाणारी एसटी, रस्त्यावरील पांढरे शुभ्र दाट धुके, हिरवाईने वेढलेले डोंगर हे  मनोहरी दृश्य मनात साठवून ताम्हिणीचा घाट सोडला. घाट माथ्यावर पोहोचलो व वातावरण स्वच्छ झाले होते. पाऊस सुद्धा थांबला होता.

ताम्हिणी घाटातून जाणारी एसटीची बस. 

पुण्याहून ताम्हिणी घाट लांब नाही. हा प्रवास करणे चांगला असला तरी तितकाच धोकायदायकही आहे. वळणवळणाचा रस्ता असल्याने नवशिक्या चालकांनी गाडी न चालविलेलीच बरी. घाटातील वळणावळणाचा रस्ता असल्यामुळे वेळ जास्त लागतो.  दुर्मिळ औषधी वनस्पती व जीवसृष्टी इथं खूप प्रमाणात  आहे. त्यामुळे ताम्हिणी घाटाला महाराष्ट्र शासनाने अभयारण्याचा दर्जा दिला आहे. बिबट्या,  शेकरू, सांबर, गिधाड या वन्यजीवांचं अस्तित्व इथं आढळतं.
ताम्हिणी घाटातून रायगड पाहण्यासाठी निघालो.
(रायगड पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा.)
ताम्हिणी घाटातील धो-धो कोसळणारे धबधबे.






घाटात कसे जायचं  : 


  •  पुण्याहून जायचे झाल्यास पिरंगुट, पौड, मुळशी मार्गे ताम्हिणी घाट. (काही रस्ता खराब +आहे.) 
  • पिंपरी-चिंचवडमधून जायचे झाल्यास हिंजवडी, माण, घोटावडेमार्गे पौड, मुळशीधरणा मार्गे ताम्हिणी घाटात जाता येते. (काही रस्ता खराब आहे.) 
  • मुंबईतून ताम्हिणीला जायचं असेल तर दोन मार्ग आहेत
  • पहिला मार्ग मुंबई-पुणे महामार्गावरून लोणावळा गाठावे. तेथून अ‍ॅम्बी व्हॅलीवरून मुळशी धरण व पुढे ताम्हिणी घाट. (काही रस्ता खराब आहे)
  • दुसरा रस्ता म्हणजे मुंबई-गोवा महामार्गावरून कोलाड तिथून ताम्हिणी घाट. कोलाडपासून ताम्हिणी घाट अंदाजे ६० किलोमीटर अंतरावर आहे. 
  • ताम्हिणी घाटात जाण्यासाठी एसटीचीही सोय आहे. पुण्याहून ताम्हिणी घाट मार्गे कोकणात जाणाºया कोणतीही एसटी या मार्गावरून जाते. 


अजून काही पाहण्यासारखे 


  • प्लस व्हॅली.
  • मुळशी धरणाच्या बाजूने कैलासगड, घनगड, तैलबैला हे किल्ले दिसतात.
  • मुळशी धरण, पिंपरी व्हॅली व पिंपरी तलाव ही पाहण्यासारखे आहे. 
  • हल्ली कोलाडच्या जवळून वाहणाºया कुंडलिका नदी वर रिव्हर राफ्टिंग चा अनुभवू घेता येऊ शकतो. 
  • ताम्हिणी घाटातून घनगड, तेलबैला किल्ल्यांना भेट देता येते. 

No comments:

कॉपी करू नका