Sunday, January 5, 2014

आगाखान पॅलेस


पुण्यातील प्रेक्षणिय स्थळांपैकी एक असलेला ‘आगाखान पॅलेस’ गेल्या रविवारी पाहण्यास गेलो.  सुरूवातीला ‘येरवडा पॅलेस’ म्हणून हे ओळखले  गेले. बंडगार्डन येरवड्यापासून २ किलोमीटरवर हे ठिकाण आहे. भारतीय स्वातंत्र्य चळवळीशी या वास्तूचा जवळचा संबंध आहे. महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी, महादेवभाई देसाई, डॉ. सरोजिनी नायडू यांना १९४२ मध्ये करावासासाठी येथे ठेवण्यात आले होते. स्वातंत्र्यपूर्व काळात बांधकाम केलेले या ऐतिहासिक वास्तूमध्ये आता महात्मा गांधीजींचे राष्ट्रीय स्मारक आहे. या वास्तूचा  केलेला हा  फेरफटका....


आगाखानांविषयी :  

आगाखान पॅलेस इमाम शाह सुलतान मोहम्मद शाह (आगाखान तिसरे) यांनी बांधला. त्यांच्या पूर्वजांना पर्शियाच्या राजाने १८३० मध्ये  'आगाखान' हा किताब बहाल केला होता. पहिले आगाखान १८४३ मध्ये पर्शियाहून भारतात आले. आगाखान दुसरे यांचा जन्म मुंबईचा. १८८५ मध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मुलगा म्हणजे सर सुलतान महंमद शाह  यांचा जन्म कराचीत  २ नोव्हेंबर १८७७ झाला. वयाच्या ८ वर्षी 'आगाखान' झाले.  १९३० मध्ये लंडन येथे  झालेल्या गोलमेज परिषदेस प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. दोन्ही महायुद्धांत त्यांनी ब्रिटिशांना सहाय्य केले. ते सुमारे ७२ वर्षे इमामपदावर होते. १८९० च्या सुमारास पुणे-नगर रस्त्यावरील ही जागा खरेदी केली.  ११जुलै १९५७ ला स्विझरलँडमध्ये  आगाखान निधन पावले.



पॅलेसविषयी :

पुणे-नगररोडवर येरवडाजवळ हे ठिकाण आहे. इटलियन वास्तू आणि वास्तू समोरील सुंदर गार्डन हे त्याचे वैशिष्ट्य. सुमारे १९ एकराचा हा परिसर मोठा सुंदर आहे. शिाया इस्माइली संप्रदायाचे ४८ वे इमाम, सुलतान मोहम्मद शाह आगाखान (तिसरे) यांनी १८९२ साली बांधला. पुणे जिल्ह्यात दुष्काळ पडलेला असताना लोकांना रोजगार मिळावा व त्यातून गोरगरीबांना चार पैसे मिळावेत या उद्दात हेतूने त्यांनी ही वास्तू उभारली. १८९२ मध्ये या राजवाड्याचे बांधकाम सुरू झाले व १८९७ मध्ये ते पूर्ण झाले. संपूर्ण वास्तू बांधण्यासाठी त्या काळात १२ लाख रुपये खर्च आला. त्यातून एक हजार लोकांना रोजगार मिळाला. पुढे ‘आगाखान पॅलेस’ म्हणून या वास्तूला ओळखले जाऊ लागले.  मोठे प्रवेशद्वार व डोळ्यात मावणार नाहीत असे मोठे व्हरांडे. गच्ची व कौलारू छपरामुळे या वास्तूला देखणेपण आले आहे. मुस्लिम, इटालियन, ब्रिटिश, रोमन, फ्रेंच अशा विविध स्थापत्यकारांच्या बांधकाम  शैलींचा अनोखा संगम या ठिकाणी दिसून येतो. कमानीदार स्तंभ, नक्षीकाम, इटालियन पद्धतीचे कारंजे, जाळीदार कमानी, वेलबुट्टी, उंची गालिचे, महात्मा गांधी, कस्तुरबा, आगाखान यांची भव्य तैलचित्रे, काचेची मोठी झुंबरे लक्ष वेधून घेतात. वाड्यात इमाम सुलतान महंमद शाह त्यांचे सुपूत्र अलिखान, मौलाना हजल इमाम शाह करीम अली हुसैन यांचे वास्तव्य येथे काही काळ होते.
                दुसºया महायुद्धात ब्रिटिश सरकारने ‘भारत सुरक्षा कायद्या’ अंतर्गत ही वास्तू ताब्यात घेतली.  १९४२ मध्ये ‘चलेजाव चळवळ’ सुरू झाल्यावर ब्रिटिशांनी महात्मा गांधीजी, त्यांची पत्नी कस्तुरबा, गांधीजींचे स्वीय सचिव महादेवभाई देसाई तसेच काही काळानं गांधीजींच्या शिष्या मीराबेन आणि वैद्यकीय सल्लागार डॉ. एम. डी. डी. गिल्डर यांनाही येथे बंदीवासात (नजरकैदेत) ठेवले होते. जयप्रकाश नारायण यांच्या पत्नी प्रभावती, सरोजिनी नायडू यांनाही काही काळ येथे ठेवण्यात आले होते. दि. ९ आॅगस्ट १९४२ ला म. गांधीजींची कैद सुरू झाली. याच दरम्यान गांधीजींचे स्वीय सहायक महादेवभाई देसाई १५ आॅगस्ट १९४२ रोजी हृदयविकाराने मृत्यू पावले. २२ फेब्रुवारी १९४४ रोजी गांधीजींच्या पत्नी कस्तुरबांजींचे निधन झाले. या दोघांच्या समाध्या येथे जवळच आहेत.  समाधींच्या जवळच गांधीजींच्या अस्थींचा काही भाग असलेला कलश तुळशी वृंदावनाखाली ठेवलेला आहे.  १९६९ मध्ये राजपुत्र शाह करीम अल हुसेनिम आगाखान (चौथे) यांनी ही वास्तू राष्ट्राला अर्पण करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार २२ फेब्रुवारी १९६९ रोजी पॅलेस ' महात्मा गांधी स्मारक निधी ' कडे सुपूर्द केला गेला. कस्तुरबांच्या २५व्या पुण्यतिथीनिमित्त हा पॅलेस देशास सुपूर्द करण्यात आला. सध्या या पॅलेसची देखभाल भारतीय पुरातत्त्व खात्याअंतर्गत सुरू आहे. २००३ रोजी हे राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित आणि संरक्षित करण्यात आले आहे.













आगाखान पॅलेसमध्ये काय पहाल :

या वास्तूत महात्मा गांधी, कस्तुरबा यांच्या वापरातील  ठेवण्यात आल्या आहेत. आभाबेन गांधी यांनी भेट  स्वरुपात १९८८ ला काही वस्तू दिल्या आहेत. महात्मा गांधीजींच्या वास्तव्य असलेल्या या वास्तूत गांधीजींच्या चपला, पलंग, दैनंदिन वापरातील भांडी, चरखा, सूतकताईचे साहित्य, भारतीय बैठक, लिहिण्याचे व जेवणाचे टेबल, कस्तुरबांजींची साडी काचेच्या पेटीत ठेवण्यात आली आहे. या शिवाय गांधीजींचे शिल्प, स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेल्या सेनानींचे अर्धपुतळ्यांमध्ये नामदार गोपाळ कृष्ण गोखले, दादाभाई नौरोजी, लोकमान्य टिळक, महादेवभाई देसाई, कस्तुरबा गांधी यांचे पुतळे आहेत.
याच बरोबर स्वातंत्र्यपूर्वकाळातील कृष्णधवल गांधीजींची छायाचित्रे आहे. सध्या येथे महात्मा गांधी सोसायटीचे कार्यालय आहे. महिलांसाठी येथे कार्य चालते.










                

पुणे पूर्वीसारखी शांतता हरवू लागले आहे. गोंगाट, गर्दी, प्रचंड वाहतूक व त्यातून होणारी कोंडी शहरात  सर्वत्र दिसून येते. मात्र, या ठिकाणी असलेल्या शांत व सुंदर परिसरामुळे या सर्वांचा विसर पडल्याशिवाय राहत नाही. शाळेत जाणाºया विद्यार्थ्यांना व मोठ्यांनाही गांधीजींचा थोडा इतिहास येथे नक्कीच शिकायला मिळेल.
  • कसे जाल : येरवड्यापासून २ किलोमीटर अंतरावर, पुण्यातील प्रेक्षणीय स्थळांच्या यादीत असल्यामुळे सर्वांच्या परिचयाचे आहे. रिक्षा, बसेस जातात. पुणे स्टेशनवरून जवळ.
  • प्रवेश फी : प्रत्येकी ५ रुपये, लहान मुलांना मोफत.
  • परदेशी पाहुण्यांसाठी १०० रुपये.
  • वेळ : वर्षभर खुले.


हा फेरफटका कसा वाटला या विषयी जरूर येथे लिहा.


Sunday, December 22, 2013

डोंगराच्या कोंदणात लपलेले भीमाशंकर




भारतातील बारा ज्योर्तिलिंगापैकी सहावे ज्योर्तिलिंग म्हणजे ‘भीमाशंकर’. निर्सगाने मुक्त हस्ताने उधळून करून या परिसराला सजवले आहे. सह्याद्रीच्या पश्चिकडील पसरलेल्या एका रांगेवरील उंच डोंगरावर भीमाशंकर आहे. प्रचंड गर्द झाडी, जंगल व उंच डोंगराच्या कुशीत भीमाशंकराचे मंदिर वसलेले आहे. निसर्गातील डोंगराच्या कोंदणात लपलेले हे मंदिर पाहण्याचा नुकताच योग आला त्या विषयी.....



सरत्या वर्षाच्या चौथ्या रविवारी सकाळी संपूर्ण परिवारासह भीमाशंकरला जाण्याचा बºयाच वर्षांनी योग आला. मंचरमार्गे भीमाशंकरला अवघ्या अडीच तासात पोहचलो. येथील निसर्गरम्य परिसर, शांत वातावरणामुळे मन प्रसन्न झाले. भीमाशंकरचे मंदिर हे डोंगराच्या कुशीत वसलेले आहे. इतर मंदिरांप्रमाणे या मंदिर डोंगरावर नसून डोंगराच्या कोंदणात असल्याने सुमारे ३०० ते ३५० पायºया उतरून मंदिरात जाता येते. गाडीतळावर गाडी पार्क करून मी खाली उतरायला सुरवात केली. दहाच मिनिटात मंदिरासमोर पोहोचला देखील. आईला जास्त चालता येत नसल्याने प्रथम आम्ही डोली करणार होतो. मात्र, डोलीवाल्याने ६०० रुपये सांगितल्यावर जमेल तेवढे चालून मग डोली करण्याचा विचार आईने केला. मंदिराच्या बाहेर ट्रॅक्स आलेली पाहून मला आश्चर्य वाटले. आजुबाजूला चौकशी केल्यावर गाडीतळाशेजारून एक कच्चा रस्ता मंदिरापर्यंत पोहोचतो असल्याचे समजले. मात्र गर्दीच्या वेळी हा रस्ता बंद असतो. कारण जायला व यायला अगदीच जेमतेम फोरव्हिलर बसेल एवढीच जागा मिळते. शिवाय कच्चा रस्ता, दगडधोंड्याचा असल्याने गाडीची वाट लागण्याचीही शक्यता आहे. आम्ही गेलो तेव्हा विशेष म्हणजे गर्दी नसल्यामुळे गाडीने आईला खाली घेऊन येण्यासाठी मी पुन्हा माघारी फिरलो. दहाच मिनिटात गाडीने मंदिरापाशी पोहाचलो.



गावाचे नाव ‘भीमाशंकर’

इतर स्थळांप्रमाणे या ठिकाणी पौराणिक गोष्टी व त्यावरून पडलेले या ठिकाणाचे नाव याही ठिकाणी आपल्याला ऐकावयास मिळते. पुराणात त्रिपुरासुराचा वध करून भगवान शंकर विश्रांतीसाठी येथे आले असता तेथे अयोध्येचा ‘भीमक’ नावाचा राजा तप करीत होता. शंकराने प्रसन्न होऊन भीमकास वर मागण्यास सांगितले. त्यावेळी त्याने 'शंकराला आलेल्या घामाच्या धारांची नदी होऊ दे', असा वर मागितला व त्याप्रमाणे भीमेचा उगम झाला व भीमक राजाच्या नावावरून या नदीस भीमा हे नाव पडले, अशी आख्यायिका आहे. दुसरी एक कथा अजून सांगितली जाते त्रिपुरासूर नावाच्या दैत्याने या भागात फारच धुमाकूळ घातला होता. त्याचा नाश करण्यासाठी शंकरांनी प्रचंड असे भीमरूप धारण केले. अनेक रात्र चाललेल्या या युद्धात त्रिपुरासूराचा वध केला. शंकर घामाघूम होऊन येथील शिखरावर बसले. अंगातून निघणाºया घामाच्या धारेतून ‘भीमा’ नदी उत्पन्न झाली.


मंदिराविषयी :

हेमाडपंती पद्धतीचे हे मंदिर सुमारे १२०० ते १४०० वर्षांपूवीचे आहे. मंदिराच्या छतावर, खांबावर सुंदर नक्षीकाम आढळते. मंदिरावर दशावताराच्या कोरलेल्या मूर्ती रेखीव व सुंदर आहेत. सभामंडपाबाहेर सुमारे पाच मण वजनाची असलेली लोखंडी घंटा आहे. चिमाजी अप्पांनी ही घंटा भेट दिल्याचे सांगण्यात येते. या घंटेवर १७२९ असे इंग्रजीत नोंद आहे. हेमाडपंती पद्धतीचे बांधकाम असलेल्या या मंदिराचा जीर्णोद्धार व नवे बांधकाम केल्यामुळे मूळ मंदिर बघण्यास मिळत नाही.  मंदिराचा भव्य सभामंडप, उंच कळस, डोंगर उतरल्याशिवाय दिसत नाही.  शिवाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज येथे भीमाशंकराच्या दर्शनास येत असत, पेशवे बाळाजी विश्वनाथ हे देखील येथे दर्शनासाठी आल्याच्या नोंदी आहेत. नाना फडणवीसांनी शिखरासह या मंदिराचा जिर्णोध्दार केला होता. सभामंडपाशेजारी दर्शनासाठी लोखंडी रांगा तयार केलेल्या आहेत. आधुनिक कॅमेरे लावून परिसरावर लक्ष ठेवण्यात येते. तसेच मोठा टिव्हीवर थेट गाभाºयातील शिवशंकराचे दर्शन घडते. गर्दी नसल्याने मनसोक्त शंकराचे दर्शन घडले.












भीमाशंकरचा परिसर :

रायगड जिल्ह्यातील खांडस गावातून पायी चालत पुढे गणपतीघाट किंवा शिडीघाट रस्त्याने भीमाशंकरला येता येते, पण हा रस्ता फक्त अनुभवी व ट्रेकिंग करणाºयांसाठी आहे. येथून जवळच असलेला भंडारधरा, हरिश्चंद्रगड, शिवनेरी, चावंड, हडसर, आदी किल्यांमुळे तसेच अष्टविनायकातील ओझर, लेण्याद्री या तीर्थस्थानांमुळे पर्यटकांची गर्दी नेहमीच दिसून येते. मी १७ वर्षांपूर्वी ढाकचा बहिरी ते भीमाशंकर असा पावसाळा संपल्यानंतर पायी ट्रेक केला होता. जाम मजा आली होती. त्यानंतर आज पुन्हा हे मंदिर पाहण्याचा योग आला. त्यावेळचे डोळ्यासमोरील मंदिर व आजचे मंदिर यात खूपच फरक पडलेला दिसून आला.

वातावरण :

भीमाशंकर शिखराची समुद्रसपाटीपासूनची उंची ३४५४ फूट म्हणजे सुमारे पाऊण मैल आहे. सह्याद्रीच्या या भागात उन्हाळ्यात कडक उन्हाळा, पावसाळ्यात नको होईल एवढा धो-धो पाऊस व हिवाळ्यात हाडे गोठविणारी थंड बोचरी हवा या ठिकाणी असते. भीमाशंकरला पाऊस खूप पडतो. पावसाळ्यात डोळ्यांना तृप्त करणारा असा येथील निसर्ग असतो. आल्दादायक स्वच्छ वातावरणामुळे एकदा तरी आवश्यक भेट देण्याचे हे ठिकाण आहे हे निश्चित.

पशुपक्षी :

भीमाशंकरचे अभयारण्य अनेक जातींचे पक्षी तसेच अनेक प्रकारच्या वन्यजीवांचे घर आहे.  वनसंपदा संरक्षित करण्यासाठी १९८५ पासून हा संपूर्ण परिसर अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आला आहे.  निर्सगाने या ठिकाणी मुक्त हस्ताने उधळण केलेली दिसून येते. नानाप्रकारचे पशुपक्षी, वेली, झाडे, औषधी वनस्पती खूप प्रमाणात दिसतात. रिठा, शिसम, आंबा, उंबर, हिरडा, बेहडा, रानजाई, रानतुळस, आपटा, आवळा, अडसुळा, डोंगरची काळी मैना असलेली करवंदे, जांभूळ या ठिकाणी आढळून येतात. मंदिराच्या परिसरात अनेक ठिकाणी ही औषधी वनस्पती घेऊन विक्री करणारे दुकानदार पहावयास मिळतात. बहुधा हे लोक कातकरी, ठाकर, आदीवासी असतात. किरकोळ किंमतीला ते विविध रोगांवर ही औषधी वनस्पती विकतात. याच जोडीला पशुपक्षी देखील पहावयास मिळतात. भीमाशंकरचं प्रतीक म्हणून वैशिष्टयÞपूर्ण असलेला दुर्मिळ प्राणी म्हणजे ‘शेकरू’. महाराष्ट्राचे मानचिन्ह म्हणून शेकरू ला महत्व आहे. छोट्या खारीची ही मोठी बहीणच. त्याचबरोबर बिबळ्या, भेकर, सांबर, चितळ, रानडुक्कर, ससे, कोल्हे, काळविट, मुंगुस, भेकर, सर्प  या प्राण्यांबरोबरच सुतारपक्षी, दयाळ, पोपट, कोतवाल, जंगली कबुतरे, कोकीळ, तांबट, घुबड, मोर, खाटीक, चंडोल, रानकोंबडया, धनेश हे पक्षीही येथे पाहायला मिळतात.

‘वाहतूक कोंडीची समस्या’

भीमाशंकर आधीच धार्मिक स्थळ. त्यात सर्वसामान्य पर्यटकांप्रमाणे ट्रेकर्स आणि निसर्गप्रेमींमुळे हे ठिकाण बाराही महिने गजबजलेले असते. मुख्य भीमाशंकरच्या एसटी स्टॅण्ड पार्किंगच्या ठिकाणी जागा कमी असल्यामुळे व संपूर्ण रस्ता एकपदरी (वन वे) असल्यामुळे या ठिकाणी नेहमीच वाहतुककोंडी होत असते. बारा ज्योर्तिलिंगची सफर घडविणारे टुरिस्ट मोठ मोठ्या गाड्या या ठिकाणी घेऊन येतात. शाळांच्या सहली, ट्रेकिंग व आमच्यासारखे हौशी पर्यटक या ठिकाणी येऊन आणखीनच गर्दी वाढवतात. तेव्हा श्रावणातील सोमवार, महाशिवरात्र, त्रिपुरी पौर्णिमा व अन्य धार्मिक समारंभ सोडून या ठिकाणी आल्यास कदाचित गर्दी कमी सापडेल. अन्यथा ट्रॅफिक जॅमचा चांगलाच दणका पडल्याशिवाय राहणार नाही. या विषयीच्या बातम्या पेपरात अनेक वेळा झळकताना दिसतात.

भीमाशंकर भीमा नदीचे उगमस्थान :

महाराष्ट्रातील एक मुख्य नदी व पवित्र नदी म्हणून ओळखल्या जाणाºया भीमेचा उगम याचा भीमाशंकरच्या डोंगरातील ‘डाकिणीचे वन’ या भागात होतो. उगमस्थानापासून कृष्णा नदीला मिळेतेस्तोवर नदीची लांबी सुमारे ८६७ किमी एवढी भरते. 'भीमरथा', 'भीमरथी' ही या नावानेही तिला ओळखले जाते. सोलापूर जिल्ह्यातून पंढरपूरला आल्यावर तिचे पात्र चंद्रकोरीच्या आकारासारखे  दिसते. त्यामुळे तेथे ती ‘चंद्रभागा’ म्हणून ओळखली जाते. भामा, इंद्रायणी, वेळ, मुळा-मुठा, घोड, नीरा, माण, सीना आदी भीमेच्या उपनद्या आहेत. भीमेवर सोलापूर जिल्ह्यात माढा तालुक्यात उजनी धरण बांधले आहे. नदी पुणे, अहमदनगर, सोलापूर जिल्ह्यांतून पुढे विजापूर, गुलबर्गा या कर्नाटक राज्यातून वाहत जाऊन कृष्णा नदीस मिळते.
 

भीमेवरील धरणे :

भीमा नदीवर एकुण बावीस धरणे बांधली आहेत. त्यात डिंबे, कुकडी, चासकमान, उजनी सारखी मोठमोठी धरणे आहेत. भीमेच्या कठावर अनेक मोठी तीर्थक्षेत्रे देखील आहेत.

कसे जावे :

पुण्याच्या शिवाजीनगर बस स्थानकातून तसेच  नारायणगाव किंवा मंचरहून एसटी बसेस भीमाशंकरला जातात. पुण्यापासून जवळ असलेले हे ठिकाण अंदाजे १२५ किलोमीटर भरते. सकाळी लवकर निघून संध्याकाळपर्यंत एका दिवसात पुण्यात येता येण्यासारखे हे स्थळ आहे. कर्जतहून या ठिकाणी येता येते.  पोखरा घाटातून येताना लाल माती, अवघड वळण, काही ठिकाणी अरुंद रस्ते यामुळे गाडीत बसून डोके चांगले हालते. हेलकावे घेत, एकमेकांच्या अंगावर जात आपण भीमाशंकरला येऊन पोहचतो.  गाडी पार्किंगची जागा अजून थोडी सुधारल्यास होणारा मनस्ताप कमी होऊ शकतो. भगवान शंकराचे दर्शन घेऊन आम्ही परतीच्या वाटेला लागलो.

प्रशासनाचे कौतुक :

या ठिकाणी नेहमीच पर्यटकांची गर्दी दिसून येते. अनेकवेळा पेपरात या संदर्भातील बातम्या वाचण्यास मिळतात. मी गेलो तेव्हा मंचर पासून ते भीमाशंकरपर्यंतचा संपूर्ण रस्ता डांबरीकरण केल्याने सुसह्य वाटला. वाटेत काहीच ठिकाणी थोडा रस्ता उखडला आहे पण तेवढे पाहिजेच नाही का? प्रशासनाने या ठिकाणी ‘प्लॅस्टिक’, कचरा न करण्याचे आवाहन केलेले जागोजागी लिहून ठेवलेले आहे. त्यासाठी रस्त्यात थांबून जेवणाचा आस्वाद घेणाºया पर्यटकांसाठी रस्त्याच्याकडेला कचरा टाकण्यासाठ आवश्यक त्या सोयी केलेल्या आहेत. एकूणच हे धार्मिक स्थळ इतर धार्मिक स्थळांपेक्षा जास्त स्वच्छ व निर्मळ वाटले हे नक्की.

कसे जावे :

  • पुणे - नाशिक महामार्गावरून मंचर येथून भीमाशंकरकडे जाता येते.
  • मुंबईहून येताना माळशेज घाट, आळेफाटा व तेथून नारायणपूर-मंचर-भीमाशंकर असा रस्ता आहे.
  • पुणे ते भीमाशंकर : १२५ कि.मी.
  • मंचर ते भीमाशंकर : ६५ कि.मी.

अजून काय पहाल :

  • ट्रेकिंग करणाºयांसाठी हे क्षेत्र म्हणजे पंढरपूरच आहे.
  • हडसर, चावंड, शिवनेरी, लेण्याद्री, ओझर हे अष्टविनायक गणपती.

आपल्याला हा ‘भीमाशंकराचा’ फेरफटका कसा वाटला या विषयी जरूर या ब्लॉगवर लिहा. अथवा मेल करा. आपल्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत...





Sunday, November 17, 2013

‘मातेचे रान’ अर्थात माथेरान

निर्सग सौंदर्याने नेटलेले व प्रदूषण मुक्त असे पुणे-मुंबईजवळील  सर्वात जवळचे थंड हवेचे ठिकाण म्हणजे ‘माथेरान’ प्रशासनाच्या कृपेने सध्या तरी येथे केवळ मिनी ट्रेनच जाऊ शकते. बाकी प्रवास घोडा व पायी यांच्याद्वारेच करावा लागतो. अशा माथेरानला दिवाळीच्या सुट्टीच्या शेवटच्या रविवारी गेलो. त्या विषयी...

रायगड जिल्ह्यातील माथेरान हे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून जराशी वेगळी झालेली ही डोंगर रांग आहे. समुद्रसपाटीपासून साधारण ८०३ मी. म्हणजेच २६०० फूट उंचीच्या पठारावर माथेरान आहे. केवळ पायीच या ठिकाणी हिंडता येत असल्याने अनेक पर्यटकांचा ओढा थोडा कमी आहे. मात्र, घोडा व माणसांनी ओढण्याची दोन चाकी रिक्षा यामुळे येथे पर्यटक वळू लागले आहेत. तशी ही सुविधा अनेक वर्षे सुरू आहे. पिंपरी-चिंचवडपासून १०० किलोमीटरवर तर मुंबईपासून ११० किलोमीटरवर अशा सारख्याच अंतरावर असलेल्या माथेरानकडे पर्यटक न वळतील तर नवलच. शनिवार, रविवार व इतर सुट्टींच्या दिवशी माथेरान पर्यटकांनी फुललेले असते. महाबळेश्वरनंतर थंड हवेचे ठिकाण म्हणून माथेरान प्रसिद्ध आहे. माथेरानमध्ये तीस वेगवेगळी प्रेक्षणीय स्थळे आहेत. आरोग्यदायक व उत्साहवर्धक हवामान, अतुलनीय निसर्ग सौंदर्य व  जोडीला थंड हवा यामुळे माथेरानला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.  पर्यटकांसाठी हॉटेल, एमटीडीसीची निवासगृहे, काही छोटी हॉटेल्स आहेत. या शिवाय मुख्य बाजारपेठेत किंवा नाक्यावर चौकशी केल्यास काही ठिकाणी घरगुती राहण्याची सोय होऊ शकते. बाजार, उद्याने आदीं सोयी आहेत. गावात दवाखाना, शाळा यांसारख्या सुविधाही आहेत. एवढ्या लांबवर सुद्धा मोठी हॉटेल्स व लोकवस्ती पाहून आश्चर्य होते.

‘मातेचे रान’

 ब्रिटिशांनी माथेरान ही मुंबईजवळची जागा थंड हवेचे ठिकाण म्हणून मुद्दाम विकसित केली. इ. स. १८५० मध्ये मुंबईचा गव्हर्नर लॉर्ड एलफिन्स्टन व ठाण्याचा कलेक्टर ह्यूज मॅलेट यांनी माथेरान शोधले. १८५४ मध्ये मुंबई गव्हर्नरने माथेरानवर बंगला बांधला. माथेरान शोधले म्हणजे येथे आधी वस्ती होतीच.
माथ्यावरील दाट वनश्रीमुळे याला ‘माथेरान’ हे नाव पडले. असेही म्हणतात की, धनगरांचे मातापिता याच जंगलात मरण पावल्याने या जंगलात ‘मातेचे रान’ (माथेरान) आहे. येथील निसर्ग पाहून सर आदमजी पीरमॉय यांनी प्रथम नेरळ ते माथेरान अशी पाऊलवाट तयार केली. नेरळ-माथेरान लोहमार्ग बांधण्यासाठी त्यांचा दुसरा मुलगा अब्दुल हुसेन यांनी प्रयत्न केले. एवढ्याश्या छोट्या माथेरानवर  १९०५ साली नगरपालिकेची स्थापना झाली.

पार्इंट (स्थळे) :

 इंग्रजांनी माथेरान वसवले त्यामुळे बहुतेक पार्इंटसला त्यांनी इंग्रजीच नावे दिली व ती आजही तशीच आहे. पॅनोरमा, गार्बट, अलेक्झांडर, हार्ट, लिटल चौक, ग्रेट चौक, वन ट्री हिल, डेंजर, एको, लँडस्केप, लुईसा, पॉक्युर्पाइन, मंकी, आर्टिस्ट, स्फिंक्स, बार्टल आदी पार्इंटस पाहण्यासारखे आहेत.



वाहनांना बंदी :

माथेरानला घनदाट जंगलाचा विळखा आहे. सुदैवाने या ठिकाणी  वाहनांना जाण्यास बंदी आहे. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी हे पाऊल उचलणे गरजेचेच होते. नाहीतर हे ठिकाणही कास पठार, महाबळेश्वर आदी पर्यटन स्थळासारखेच प्रदूषणाकडे वळले असते. सध्या तरी गाड्यांना बंदी असल्यामुळे हे ठिकाण प्रदुषण विरहीत आहे. माथेरानचे खास वैशिष्टय असणारी छोटी रेल्वेच येथे जाऊ शकते. पूर्वी वाफेच्या इंजिनावर चालणारी रेल्वे आता डिझेलवर चालविली जाते. इंजिनावर चालणारी ही छोटी गाडी निर्सगाचे दर्शन घडवित आपला नेरळ ते माथेरान असा सुमारे २१ किलोमीटरचा प्रवास दोन तासात घडविते. आम्ही गाडी घेऊन गेल्याने दस्तुरी नाक्यावर गाडीतळावर गाडी लावून पुढे छोट्या ट्रेनने पुढे निघालो. ज्यांना नरेळवरून येणे जमत नाही अशासाठी दस्तुरी नाक्यावरून माथेरान ते मुख्य बाजारपेठ अशा २.५ किलोमीटरसाठी या गाडीतून जाता येते. दस्तुरी नाक्यावरून चालत ३०-३५ मिनिटे लागतात. ही रेल्वे आपल्याला सरळ बाजारपेठेत घेऊन येते. बहुतेक हॉटेल्सही या बाजारपेठेच्या अवतीभवती आहेत. या गाडीचे तिकीट प्रवेशद्वार ओलांडल्यावर काही अंतरावर मिळते. ही रेल्वे जागतिक वारसा म्हणून घोषित करण्यात आली आहे. याशिवाय पर्यटकांच्या सोयीसाठी मुख्य प्रवेशद्वारापासून संपूर्ण माथेरानवर हिंडण्यासाठी घोडे व माणसांनी ओढण्याची दोन चाकी रिक्षा उपलब्ध आहे. ज्यांना पायी फिरणे शक्य नाही अशासाठी माथेरानवर घोडयावरून फिरावे लागते. पण याचे भाडे पाहता आपल्या दोन पायांची डुगडुगीनेच प्रवास करणे उत्तम ठरते. पण तरीही अबालवृद्धांना ही सोय पुरेशी ठरते. संपूर्ण माथा विविध तसेच घनदाट झाडी आणि लाल मातीने संपूर्ण परिसर सजलेला आहे. झाडांवरसुद्धा येथील मातीचा घोड्यांच्या जाण्यायेण्याने फुफाटा उडलेले दिसतो. येथील लोकांचा उदरनिर्वाह पर्यटकांवर अवलंबून आहे. बहुतांशी लोक हे मराठीच आहेत. काही कातकरी, ठाकर, आदीवासी लोकही येथे दिसून येतात.
        बाजारपेठेमध्ये विविध हस्तकौशल्यावरील आधारित वस्तू, चप्पल, बूट, पिशव्या, गृहपयोगी वस्तू, शोभेच्या वस्तू विकण्यास ठेवलेल्या आहेत.



लहान मुलांचे अर्थात मोठ्यांचेही आकर्षण असलेली माथेरानची राणी ‘मिनी ट्रेन’










वनश्री :

संपूर्ण माथेरानचा परिसर हा विपुल वृक्षांनी सजलेले आहे. गर्द हिरवीगार झाडी हे त्याचे वैशिष्ट्यच म्हणावे लागेच. बेहडा,  हिरडा, खैर,  जांभूळ, आंबा अशी अनेक औषधी वनस्पती येथे आहेत. या हिरवाईमुळे उन्हाळ्यातही उन्हाचा त्रास येथे होत नाही.







शार्लोट लेक

मुख्य बाजारपेठेपासून १ ते १.५ कि. मी. अंतरावर हे नैसर्गिक तळे आहे. माथेरानवरील पिण्याच्या पाण्याचा मुख्य साठा हाच आहे. पावसाळ्यात हा जलाशय संपूर्ण भरतो. या ठिकाणीही काही हॉटेल्स असून, दमून भागून आल्यावर याही ठिकाणी आपली पोट पूजा होऊ शकते. पाण्यात पाय अथवा आंघोळ करू नये अशी सूचना देऊनही अनेक पर्यटक सूचनेला न जुमानता यथेच्छ पाय धुण्यासारखे प्रकार करताना आपल्या दिसून येतात.  या पाण्यावर पुढे प्रक्रिया करून संपूर्ण माथेरानच्या हॉटेल्स व रहिवाशांना पुरविलेले आहे.

शार्लोट लेक












बाजारपेठेतील चप्पल विक्रेत्याचे दुकान.


प्रदूषणापासून  मुक्ती अनुभवण्यासाठी व निर्सगाच्या सान्निध्यात यायचे असल्यास एक दिवस का होईना पण माथेरानला येणे गरजेचे आहे. 

 

माकडेच माकडे :

माथेरानमध्ये पायथ्याशी आपण गाडी लावतो. या ठिकाणपासून ते संपूर्ण माथेरानावर माकडे दिसून येतात. पर्यटकांशी ओळख झाली असल्याने ही माकडे टोळीने पर्यटकांच्या मागे जाऊन हातातल्या खाद्यपदार्थांवर ताव मारताना दिसून येतात.

‘छोटे कुटुंब सखी कुटुंब’

कसे जाल :

  • माथेरान हे पुण्यापासून १२५ तर मुंबईपासून ११०  किलोमीटरवर आहे.
  • पुण्याहून येताना जुन्या पुणे-मुंबई महार्गावर खोपोली सोडल्यावर चौक म्हणून उजवीकडे रस्ता जातो. या रस्तावर कर्जतच्या अलिकडे नेरळ माथेरानकडे जाणारा रस्ता आहे.
  • (रस्त्याचे डांबरीकरण चालू असल्याने चौक ते नेरळ हा रस्ता खराब आहे.)
  • पायी माथेरानला येण्यासाठी अनेक मार्ग आहेत. पण गाडीने येण्यासाठी   नेरळवरून डांबरी रस्त्यावर ८ किलोमीटरची घाटातून वेडीवाकडी वळणे घेत वाट आहे. याशिवाय लिट्ल चौक पॉईंटच्या खालून येणारी वाट, कर्जतहून गार्बेट पॉईंटवर येणारी १३ कि.मी.ची पायवाट आहे.

कधी जाल :

येथे जाण्यासाठी सप्टेंबर ते मार्च हा कालावधी चांगला आहे. भटक्यांसाठी पावसाळा ही योग्यच ठरतो. जून ते आॅगस्ट या काळात येथे जोरदार पाऊस पडतो. रायगडप्रमाणेच या ठिकाणी वरपर्यंत धुक्याचे साम्राज्य असते. उन्हाळ्यात येथे जाणे चांगले. कारण दोन्ही बाजूंनी गर्द हिरवी गार झाड असल्याने उन्ह्याच्या झळा लागत नाही.

काही टिप्स :

  • शक्यतो वेळ काढून सकाळी ९ वाजेपर्यंत माथेरानाला पोचून काही पार्इंटस पाहून संध्याकाळी ६ पर्यंत परतीचा मार्ग धरावा. एका दिवसात सर्व पार्इंटस पाहणे शक्य होत नाही. घोड्यावरून जाणार असलात तरी हे पार्इंटस पाहणे शक्य होत नाही. त्यासाठी किमान ३ दिवस तरी पाहिजेत.
  • सर्व पार्इंटस एकमेकांपेक्षा लांब अंतरावर असल्याने सोबत नकाशा असणे गरजेचे आहे. तसे वाटेत लोक ये - जा करत असतात.
  • स्वत:चे जेवण घेऊन जाणे उत्तम. येथील हॉटेल्स सर्वसामान्यांच्या अवाक्याच्या बाहेरील आहेत. म्हणजे काही मार्केट मधील हॉटेल्स तशी स्वस्त आहेत. पण ती शोधावी लागतात.
  • पाण्याची सोय करून जाणे चांगले. कारण काही पार्इंट सोडले तर वाटेत पिण्याच्या पाण्याची सोय नाही.

(मी पाहिलेल्या पार्इंटबाबत माहिती काही दिवसातच)

माथेरानचा हा लेख आपणास कसा वाटला या विषयी जरूर येथे लिहा.

कॉपी करू नका