Sunday, December 30, 2012

ओझर - लेण्याद्री - शिवनेरी - खोडद

वर्षातील शेवटचा रविवार. तो ही सुटटीचा त्यामुळे घरात रिकामे बसणे शक्य नव्हते. कोठे जायचे असा विचार करत असतानाच जुन्नरला अष्टविनायकांपैकी दोन गणपती व शिवाजी महाराजांचे जन्मस्थान पाहण्याचा विचार मनात आला. तसे ही स्थाने यापूर्वी 15 वर्षापूर्वी मित्रंबरोबर व सहलीला गेलो असताना एकदा पाहिली होती. पण आता फारशी आठवत नव्हती. आज रविवार व इच्छा असल्यामुळे आम्ही ओझर, लेण्याद्री व शिवनेरीचा प्रवास करण्याचे ठरविले. त्यानुसार सकाळी 10 ला घर सोडले.  मोशी, चाकण, राजगुरुनगर, नारायणगाव मार्गे ओझर तेथून लेण्याद्री व शिवनेरी व खोडद असा मार्ग होता. त्या विषयी...

थोडा परिचय

जुन्नर शहर प्रसिद्ध आहे ते ऐतिहासिक म्हणून. जवळच असलेला शिवनेरी किल्ला, नारायणगड, हडसर, जीवधन, हरिश्चंद्रगड तसेच अष्टविनायकांपैकी लेण्याद्री, ओझर, तसेच प्राचीन व्यापारी राजमार्ग नाणोघाट हा इथून जवळच आहे. ‘जीर्णनगर’, ‘जुन्नेर’ म्हणजेच जुन्नर हे शहर इसवी सनापूर्व काळापासून प्रसिद्ध आहे. जुन्नर ही शकराजा नहपानाची राजधानी होती. सातवाहन राजा गौतमीपूत्र सातकर्णी याने शकांचा नाश केला आणि जुन्नर व येथील सर्व परिसरावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. नाणोघाट हा पुरातन व्यापारी मार्ग. यावर नजर ठेवण्यासाठी या मार्गावरील दुर्गाची निर्मीती करण्यात आली. सातवाहनांची सत्ता स्थापन झाल्यावर येथे अनेक ठिकाणी त्यांनी लेणी खोदलेली दिसतात. सातवाहनांनंतर शिवनेरीवर चालुक्य, राष्ट्रकूट या राजवटींच्या सत्तेखाली होता. शिल्पकलेचा सुंदर नमुना म्हणजे येथील लेणी! महाराष्ट्राचे विविध भाग अशा सुंदर लेण्यांमुळे समृध्द आहेत. येथील काही लेणी शिवनेरी व लेण्याद्री डोंगरावर कोरलेली आहेत. लेण्यांमध्ये पर्यटकांची गर्दी होते. अनेक स्थळांची माहिती फक्त येथील स्थानिक किंवा ऐतिहासिक पुस्तकांत पाहावयास मिळते.  जुन्नर मध्ये शिरतानांच शिवनेरीचे दर्शन होते. एस.टी स्टॅण्डच्या मागे शिवनेरी किल्ला दिसतो. येथून हा किल्ला चार किलोमीटर आहेत. महाराष्ट्राचे दैवत श्री शिवछत्रपती महाराज यांचे हे जन्मस्थान.


ओझर



 

अष्टविनायकांपैकी ओझरच्या विघ्नेश्वर हा पाचवा गणपती आहे. कुकडी नदीच्या तिरावर हे मंदिर आहे. चिमाजी अप्पा यांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केल्याचा उल्लेख इतिहासात आहे. येथील श्रींची मूर्ती लांब व रूंद असून अष्टविनायकापैकी सर्वात श्रीमंत गणपती म्हणून ओळखले जाते. श्रींच्या डोळय़ात माणिकरत्न असून, कपाळावर हिरा आहे. संकट / विघ्नांचे हरण करतो, म्हणून या गणपतीला विघ्नेश्वर म्हणतात. श्रीविघ्नेश्वराची मूर्ती स्वयंभू आणि पूर्वाभिमुख असून, डाव्या सोंडेची आहे. मंदिराच्या चारही बाजूंना दगडी तटबंदी असून, मध्यभागी हे गणोशाचे मंदिर आहे.  आतमध्ये दोन दीपमाळा आहे. भाविकांना दर्शन घेण्यासाठी या दगडी तटबंदीच्या बाजुने रांगेत उभे राहून दर्शन घेण्यासाठी जावे लागते. सकाळी 5 ते रात्री 11 वाजेर्पयत श्रींचे दर्शन घेण्यासाठी मंदिर खुले असते. गणपतीचा फोटो काढण्यास येथेही बंदी आहे.

गाडी पार्किग येथून ओझर मंदिर.



मंदिराचे प्रवेशद्वार


मंदिरा बाहेरील दीपमाळ.

राहण्याची व्यवस्था : 

मंदिराच्या परिसरात भाविकांना राहण्यासाठी अल्पदरात धर्मशाळेची व्यवस्था आहे. येथे 4 भक्तभवन बांधलेले आहेत. पस्तीस रुपयांला प्रति व्यक्ती, अडीचशे रुपयात पाच व्यक्तींसाठी स्वतंत्र खोली, चारशे रुपयांत डिलक्स खोली उपलब्ध आहे.

ओझर मंदिरा शेजारील भक्तनिवास. परिसरातील दुकाने :

नेहमीप्रमाणो मिळणारे हार, तुरे, नारळ, ओटी भरण्यासाठी लागणारे पुजेचे साहित्य या ठिकाणी मिळते. येथे न वाळणा:या फुलांचे हार मी प्रथमच पाहिले. दहा ते पन्नास रुपयांना हे हार विकतात. हे हार वर्षभर टिकतात. द्राक्षे या भागात जास्त पिकत असल्यामुळे काळे मनुका, मनुका, सुकामेवा या ठिकाणी विकण्यास होता. 

बाजारपेठेत मिळणारा न वाळणारा फुलांचा हार.


बाजारपेठेत मिळणा:या काळय़ा मनुका. (50 रुपये पाव)


मंदिराशेजारील बाजारपेठ.


कसे जावे : 

नारायणगाव तेथून जुन्नरला जाताना उजव्या बाजूला ओझरकडे फाटा फुटतो. तेथून ओझर 7 मैल आहे.  देवाळाच्या अलीकडे  कुकडी नदीवर पूल आहे. ओझर ते नारायणगाव हे अंतर 12 किलोमीटर तर पुणो ते ओझर हे अंतर 85 किलोमीटर एवढे आहे.

लेण्याद्री 

लेण्याद्रीचा डोंगर (मध्यभागी बारीक गुहा दिसत आहेत.)


या ठिकाणी विविध अंतरे दिली आह.

 

अष्टविनायकापैकी सहावा गणपती लेण्याद्रीचा श्री गिरजिात्मक म्हणून ओळखला जातो.  कुकडी नदीच्या परिसरात डोंगरावर हे स्थान आहे.  हा भाग गोळेगाव या गावाच्या हद्दीमध्ये आहे. अष्टविनायकातला हा एकमेव असा गणपती आहे जो डोंगरात एका गुहेत आहे.  लेण्याद्रीजवळच्या या डोंगरात 28 गुहा आहेत. त्यातील 7 व्या गुहेत गिरजिात्मकाचे देऊळ आहे. या गुहेला गणोश लेणी असेही म्हणतात.  लेणाद्रीच्या या लेण्या स्वच्छ आहेत. याचे श्रेय पुरातत्व खात्यास जाते.  प्रत्येकी 5 रुपये असे पुरातत्व विभागाचे तिकीट आहे. देवळात जाण्यासाटी 283 पाय:या चढाव्या लागतात. (दमल्याने एखाद-दोन पाय:यांचा फरक येऊ शकतो)

गिरिजात्मक मंदिर :

लेण्याद्री गणोश लेणी म्हणून ओळखली जाते.  हे देवस्थान लेण्यांमध्ये आहे म्हणून याला लेण्याद्री असे नाव पडले. या मंदिरात कोणत्याही प्रकारचा दिवा लावलेला नाही. फक्त गणपतीच्या समोर लावण्यात आलेल्या समईच्या प्रकाशातच गणपतीचे दर्शन घ्यावे लागते. गणपती असलेल्या मंदिरात फोटो काढण्यास मनाई आहे. मात्र कॅमे:यात चांगली झूम लेन्स असेल तर बाहेरून गर्दी नसल्यास फोटो काढता येतो. हा पूर्ण उंच डोंगर चढून आल्यावर जो थकवा आलेला असतो, तो या मंदिरात आल्यावर व गणपतीचे दर्शन घेतल्यावर पूर्ण निघून जातो. मंदिरात प्रवेश केल्यावर थंडगार वातावरण अनुभवायला मिळते. 283 पाय:या चढून गेल्यावर प्रथम चैत्यगृहाचे लेणो लागते व त्यानंतरच्या मोठय़ा गुहेमध्ये गणपती आहे. मंदिर म्हटले की, खांब, कमानी, मंडप असते, परंतु येथे तसे नाही. साधारणपणो 58 फूट लांब व 58 फूट रुंद या गुहेत हे मंदिर आहे. विशेष म्हणजे मंदिराला इतर अष्टविनायक गणपती मंदिराप्रमाणो कळस नाही. मूर्तीच्या उजव्या व डाव्या बाजूला हनुमान व शिवशंकर हे देव आहेत. पेशवे काळात या मंदिराचा जिर्णोद्धार झाला होता. येथे पाण्याच्या चार टाक्या आहेत. त्या वापरात नाहीत.  या देवालयाच्या सभामंडपाची उंची कमी आहे. मंदिराच्या गाभा:यापुढील सभामंडप मोठा आहे. त्यात कोरलेले पाषाणाचे सहा खांब असलेले दिसतात. बहुतेक सर्व लेण्यांसमोर बसण्यासाठी ओसरी आहे.

चैत्यगृह :



चैत्यगृहातील कोरलेले हत्ती व वाघाची खांबातील शिल्पे.


चैत्यगृहातील कोरलेले हत्ती व वाघाची खांबातील शिल्पे.


मंदिराबाहेरील कोरीव खांब


पोहचण्यासाठी सोय :

अबालवृद्धांसाठी तसेच ज्यांना पाय:या चढता येत नसेल अशांसाठी 500 रुपयांत डोलीतून वरर्पयत नेण्याची सोय आहे. 4 माणसे न थांबता खालपासून वरर्पयत एका दमात तब्बल 283 चढतात. लेण्याद्रीच्या डोंगरावरून समोर शिवनेरी किल्ला दिसतो.

मदिरातून दिसणारा लेण्याद्रीकडे येणारा रस्ता.


मंदिराकडे जाणारा रस्ता. या तब्बल 283 पाय:या आहेत.







चैत्यगृहात पाच खांबांच्या दोन्ही बाजूला  रांगा आहेत.  हे खांब इ. स. पूर्व 90 ते इ. स. पूर्व 300 या या सातकारणी कालखंडातील असल्याची नोंद आहे. या खांबावर नक्षीकाम आहे. त्यात वाघ, सिंह, हत्ती यांच्या शिल्पकृती आहेत. गुहेच्या मध्यावरती प्रार्थनास्थळ कोरण्यात आलेले आहे. ते घुमटाकार आहे. साडेचार फुट उंच जोत्यावर एकसंध कोरलेले आहे.  काही पर्यटक विनाकारण येथे पैसे टाकून काय करतात कुणास ठाऊक.  येथे अष्टकोनी खांबाच्या आहेत. तळाशी व वरच्या टोकाशी जलकुंभाची प्रतिकृति आहे. जलकुंभाच्या वरच्या भागात चक्र ावर वाघ, सिंह, हत्ती यांच्या शिल्पाकृती कोरलेल्या आहेत. छताला अर्ध गोलाकार लाकूडसारख्या कमानी कोरल्या आहेत. चैत्यगृहाच्या मध्यवर्ती घुमटाकार सहा फूट प्रार्थनास्थळ आहे.  अशीच रचना मळवली, कामशेत येथील भाजे व कार्ला लेण्यांमध्येही दिसते.



जायचे कसे :

लेण्याद्री  हा जुन्नरपासून 8 कि.मी. अंतरावर आहे. तर पुण्यापासून सुमारे  97  कि. मी. अंतरावर हे ठिकाण आहे.
शास्त्रनुसार मोरगाव, सिद्धटेक, पाली, महड, थेऊर, लेण्याद्री, ओझर, रांजणगाव आणि शेवटी पुन्हा मोरगावच्या गणपतीचे दर्शन घातल्यावर अष्टविनायकाची यात्र संपते असा क्रम आहे. पण आजकाल यात्र कंपनीवाले वेळेनुसार या क्रमात थोडा बदल करतात.



शिवनेरी

 

शिवनेरी किल्ला समुद्रसपाटीपासून 3500 मीटर उंच असून दक्षिण - उत्तर दीड किलोमीटर पसरलेला आहे. किल्ल्याचा दक्षिणोकडील भाग अर्धगोलाकृती आहे, तर उत्तरेकडे तो निमुळता होत गेला आहे. गडाचा आकार बाणाच्या टोकासारखा निमुळता आहे व त्याचे अगट्रोक उत्तरेकडे रोखलेले आहे.

गडावर जाण्याच्या वाटा :

गडावर जाण्याचे दोन प्रमुख मार्ग जुन्नर गावातूनच जातात. पुणो अथवा मुंबईहून एका दिवसात शिवनेरी , लेण्याद्री व ओझरचा गणपती पाहून घरी परतता येते.

महाराष्ट्र शासनाने गडावर जाण्यासाठी चांगल्या पाय:या बांधून दिल्या आहेत.




सात दरवाज्यातून :

जुन्नर एस.टी स्टॅण्डच्या मागे शिवनेरी किल्ला दिसतो. येथून खासगी वाहन करून किल्यावर येता येते. अंदाजे अंतर 4 किलोमीटर आहे. सिंहगडाप्रमाणो या ठिकाणी वर्पयत चार चाकी गाडी जाते. मात्र या ठिकाणी पार्किगची योग्य सोय नसल्याने रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभे करून गड पाहण्यास जावे लागते. पार्किग मोफत आहे. येथून मुख्य गड दीड ते दोन किलोमीटर पायी चालावे लागते.

साखळीची वाट :

दुसरी वाट साखळीची वाट आहे. या वाटेने गडावर यायचे झाल्यास जुन्नर शहरात शिरल्यानंतर नव्या बसस्टँड समोरील रस्त्याने शिवपुतळय़ाशी यावे लागते. येथे चार रस्ते एकत्र मिळतात. डाव्या बाजूस जाणा:या रस्त्याने साधारणत: एक किलोमीटर गेल्यावर रस्त्याच्या उजव्याकडेला एक मंदिर लागते. मंदिरासमोरून जाणारी पायवाट  शिवनेरी किल्ल्याच्या एका दगडी भिंतीपाशी घेऊन जाते. भिंतीला लावलेल्या साखळीच्या साहयाने आणि कातळात खोदलेल्या पाय:यांच्या मदतीने वर पोहचता येते. ही वाट थोडी अवघड असून गडावर पोहचण्यास पाऊण तास लागतो. बहुतेक लोक पहिल्या वाटेचाच (दरवाज्यातून) उपयोग करतात.


सात दरवाज्यांची वाट :

गडावर येतांना सात दरवाजे लागतात. पहिला महादरवाजा, दुसरा पीर दरवाजा, तिसरा परवानगीचा दरवाजा, चौथा हत्तीदरवाजा, पाचवा शिवाई दरवाजा, सहावा फाटक दरवाजा आण सातवा कुलाबकर दरवाजा या मार्गे किल्ल्यावर पोहचण्यासाठी 1 तास लागतो. हत्ती दरवाजा सोडल्यास इतर दरवाज्यांना दरवाजे नाहीत केवळ कमानी आहेत.

महादरवाजा



पीर दरवाजा


हत्ती दरवाजा


हत्ती दरवाजा


शिवाई दरवाजा


कुलूप दरवाजा


 मेणा दरवाजा

शिवाई मंदिर :

गडात प्रवेश केल्यानंतर साधारणपणो 15 ते 2क् मिनिटे चालल्यानंतर हे मंदिर दिसते. मंदिरासमोर येणोर - कुसुरचे धरण व आजूबाजूचा परिसर दिसतो. मंदिराच्या मागे कातळात 6 ते 7 गुहा आहेत. या गुहा ट्रेकर्ससाठी मुक्कामासाठी योग्य नाहीत. मंदिरात शिवाई देवीची मूर्ती आहे. गडावरील शिवाई देवीच्या नावावरूनच जिजाऊंनी छत्रपतींचे नाव ‘शिवाजी’ ठेवले असे म्हटले जाते.





अंबरखाना

शेवटच्या दरवाज्यातून गडावर प्रवेश केल्यावर समोरच अंबरखाना आहे. अंबरखान्याची मोठा प्रमाणात पडझड झाली आहे.  1485 मध्ये मलिक अहमद या निजामशाहीच्या संस्थापकाने हा गड ताब्यात घेऊन आपली राजधानी उभारली त्याच कालखंडात ही इमारत बांधली आहे. मराठेशाहीत ती इमारत अंबारखाना किंवा हत्ती व घोडय़ांच्या पागेसाठी उपयोगत आणत असत. पूर्वी या अंबरखान्याचा उपयोग धान्य साठविण्यासाठी केला जात असे. अंबरखान्यापासून दोन वाटा निघतात. एक वाट समोरच असणा:या टेकाडावर जाते. या टेकाडावर एक कोळी चौथरा आणि एक इदगा आहे. दुसरी वाट शिवकुंजापाशी (शिवाजी महाराज जन्मस्थान) घेऊन जाते. वाटेत गंगा, जमुना व याशिवाय पाण्याची अनेक टाकी लागतात. गडावर अनेक टाकं आहेत. परंतु काळजी न घेतल्यामुळे इतर किल्यांबरोबरच या किल्ल्यावरील टाक्यांची दुरवस्थाच आहे.

कमानी मशिद :

शिवकुंजासमोरच कमानी मशिद आहे आणि समोरच खाली पाण्याचे एक टाके आहे. येथून समोर चालत गेल्यास हमामखाना लागतो. येथूनच पुढे शिवजन्मस्थानाची इमारत आहे.

शिवजन्मस्थान इमारत :

ही इमारत दुमजली असून खालच्या खोलीत जिथे शिवरायांचा जन्म झाला तेथे पुतळा बसविण्यात आला आहे.  वरती पोहचण्यासाठी 2क् पाय:या चढून वर जावे लागते. ही इमारत सात दरवाजे ओलांडून आल्यानंतर डाव्या हाताला लांबूनच दिसते. तसेच जुन्नर एसटी स्टॅडमधून देखील ही छोटी इमारत पटकन ओळखता येते.  येथे सुंदर महिरप चौकट असून, या चौकटी बसून खालील बाजूने अनेक पर्यटक फोटो काढताना दिसतात. येथून जुन्नर शहर व परिसर दिसतो.









बदामी टाके :

नावाप्रमाणो बदामाच्या आकाराचे हे टाकं आहे.  शिवजन्म इमारतीच्या समोरच हे बदामी पाण्याचे टाकं आहे. येथून पुढे जाणारा रस्ता कडेलोट टोकावर घेऊन जातो. सुमारे दीड हजार फुट उंचीचा या सरळसोट कडाचा उपयोग हा गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी होत असे.  गड फिरण्यास 2 तास लागतात.

शिवकुंज  :

महाराष्ट्र शासनाने किल्ल्यावर एक मंडप बांधला आहे. ‘शिवकुंज’ असे त्याचे नाव आहे. जिजाबाई व तलवार घेऊन बसलेला बाल शिवाजी यांची पंचधातूची मूर्ती आहे. शिवजयंतीला शिवनेरीवर मोठा उत्सव असतो.



शिवनेरी वरून दिसणारा परिसर :

किल्ल्याच्या आसपास बौद्ध लेणी असलेल्या तीन डोंगराच्या रांगा आहेत.  किल्ल्यावरून चावंड, नाणोघाट आणि जीवधन तसेच समोर असणारा वडूज धरणाचा जलाशय दिसतो.

कसे जाल :

  • शिवनेरी-लेण्याद्री-ओझरचा गणपती - खोडदच्या दुर्बिणी ही ठिकाणे पाहावयाची असल्यास मंचर-नारायणगाव-जुन्नर-शिवनेरी नंतर - लेण्याद्री व तेथून ओझर व खोडदच्या दुर्बिणी व परतीचा मार्ग अशा क्रमाने अथवा उलटय़ा क्रमानेही जात येईल.

खोडद

शिवनेरीवरून 5 वा चालायला सुरूवात केली. पाऊण तासात खाली आलो. तेथून नारायणगावला यायला अर्धा तास गेला. संध्याकाळचे 6.30 वाजले होते. खोडदला दुर्बिणी पाहण्याचे मनात होते. वाटेत उसाचे मळे होते. उस कारखान्याला उसाच्या मोळय़ा पोचवून दमलेले बैल व त्यांचे चालक रस्त्याच्याकडेला बसलेले दिसले. संध्याकाळी 7 ला जीएमआरटीला पोचलो मात्र अंधारामुळे तेथून वॉचमनने काहीही पाहता येणार नसल्याचे सांगितले. निराश न होता पुढच्या वेळी प्रथम खोडदला जायचे मनात निश्चित केले. याआधी मित्रबरोबर खोडदला गेलो होतो. त्यावेळी तेथे प्रदर्शन भरले होते.

पुण्यातून येताना नारायणगावला आल्यावर एस.टी स्टँडसमोरून डाव्या हाताला खोडदला जाणारा रस्ता आहे.
जगातील दुस:या क्रमांकाची सर्वात मोठी दुर्बीण असलेले गाव म्हणून खोडद ओळखले जाते. नारायणगावापासून 9 कि.मी अंतरावर आंबेगाव व जुन्नर तालुक्याच्या हद्दीवर मीना नदीच्या काठावर आहे. खोडदच्या अलिकडे डाव्या हाताला जीएमआयआरटी अर्थात Giant Metrewave Radio Telescope 3 किलोमीटरवर आहे.   नारायणगावाहून खोडदला बसने जाता येते. स्वत:चे वाहन असल्यास पुण्यातून येताना प्रथम हे ठिकाण पहावे.
हा प्रकल्प  दुस:या व चौथ्या शनिवारी सगळय़ांना भेटीसाठी खुला असतो. इतर वेळी ग्रुप असल्यास विनंती करून पाहता येते. मे महिन्यात या ठिकाणी सर्वासाठी तीन दिवसांसाठी ग्रह, तारे व अवकाशावर प्रदर्शन असते. तसेच त्यासाठी त्यांच्या बसेस सुद्धा उपलब्ध असतात. या बाबत पेपरमध्ये बातम्या येतात. त्या जरूर पाहव्यात. मीना नदीच्या कडेचा परिसरात उसाचे मळे आणि फुलशेतीने हिरवागार झाला आहे. गावाबाहेर जगदंबा मातेचे भव्य मंदिर आहे. चैत्र महिन्यातील रामनवमीला येथे जगदंबा मातेचा उत्सव भरतो.

Thursday, December 20, 2012

अप्पूघर - दुर्गादेवी मंदिर -भक्ती-शक्ती शिल्पसमूह

अप्पूघर - दुर्गादेवी मंदिर -भक्ती-शक्ती शिल्पसमूह

रविवार होता. दुपारी जेवण झाल्यावर झोपण्यापेक्षा हिंडणे बरे म्हणून गाडीवरून निघालो. ते अप्पूरघरला. पुण्याकडून मुंबईला जाताना पिंपरी-चिंचवड शहर लागते. शहराची दिवसेंदिवस प्रगती होत आहे. जुने रस्ते जाऊन नवीन सहा पदरी रस्ते, मोठे पूल बनू लागले.

अप्पूघर :

या ठिकाणी अप्पूघर व दुर्गादेवी टेकडी या नावाने प्रसिद्ध अशी बघण्यासारखी दोन ठिकाणो आहेत. संजय गांधी उद्यान असे नाव आहे. पुण्याकडून बसने यायचे झाल्यास पिंपरी, आकुर्डीनंतर निगडी जकात नाका येतो. येथून डावीकडून सुमारे 2 किलोमीटरवर अप्पूघरकडे जाता येते. अप्पूघरला मनोरंजनाचे व लहान मुलांसाठी खेळ उभारलेले आहेत. यात माय फेअर लेडी, मेरी गो राउंड, धडक गाडी, हसरा विदुषक असे खेळ आहे. मात्र, हे खेळ पाहण्यासाठी सुद्धा प्रवेश तिकीट आहे. पार्किग तिकीट, प्रवेश तिकीट मग खेळण्याचे तिकीट असे तिकीट गोळा करून आपण आत पोहचतो. मात्र, थोडीशी निराशाच पदरी पडते कारण आतमध्ये आहे. मोडकी व काहीशी तुटलेली खेळणी. नवीन असताना येथे ब:यापैकी खेळणी शाबूत होती. मात्र, आता त्याची ब:यापैकी वाट लागलेली दिसते. असू देत. येथून दुर्गादेवी टेकडीवर जाण्यासाठी मार्ग आहे. या टेकडीवर आजुबाजूच्या परिसरातील लोक सकाळी व संध्याकाळी पाय मोकळे करायला येतात. तसेच नवे जोडपे काही तरुण-तरुणीही आडोश्याला बसलेले पाहायला मिळतात. टेकडीवरून जुना पुणो-मुंबई रस्ता, निगडी, प्राधिकरण, रावेतचा परिसर दिसतो व शहर व गावांचे पुन्हा शहर कसे घडते ते पाहायला मिळते. लहानपणी येथे खेळायला जायचो तेव्हा टेकडीवरून संध्याकाळी 5.30 वाजता बाहेर पडण्याचे आदेश मिळायचे. टेकडीचा काही भाग देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाकडे आरक्षित असल्यामुळे काही ठिकाणी ‘नो एंट्री’चा बोर्ड ही पहावयास मिळतो. लोकांच्या सोईसाठी या ठिकाणी मोठी झाडी निर्माण केली आहे. टेकडीवर वर्पयत रस्ते व आजुबाजूला बागकाम केल्याने येथे उन्हाळय़ात हिंडायला मजा येते.

दुर्गादेवी मंदिर :

दुर्गादेवीच्या मंदिरावरून या टेकडीला दुर्गादेवीटेकडी नाव पडले. हे मंदिर सुद्धा छान आहे. आशिया खंडातील सर्वात श्रीमंत म्हणून ओळखली जाणारी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने या टेकडीवरून अनेकवेळा वृक्षारोपण केल्याने टेकडी हिरवीगार झाली आहे.

भक्ती-शक्ती शिल्पसमूह :





महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजीमहाराज व संत तुकाराममहाराज यांचे मोठय़ा आकारातील शिल्प या ठिकाणी आपणाला पाहायला मिळते. पूर्वी या ठिकाणी निगडी जकात नाक्यावर आलेल्या गाडय़ा थांबत असत. सध्या येथे एका टेकडीवजा उंचवटय़ावर हिरवळ लावली असून, त्याच्या मध्ये भक्ती-शक्ती शिल्पसमूहाची मूर्ती लावली आहे. दिवाळी पाडव्याला या ठिकाणी असंख्य पणत्या लावून दीपोत्सव साजरा केला जातो. येथून  समोर दिसणारे श्रीकृष्णाचे मंदिर असून, ते पाहण्यासारखे आहे.  सध्या भक्ती-शक्तीसमूहाच्या येथे चौपाटी निर्माण झाली. भेळ, वडापाव, चायनीज गाडय़ांचे स्टॉल, लहान मुलांसाठी खेळणी त्यामुळे येथे रात्री 9 वाजेर्पयत गर्दी असते.

देहूगाव :

निगडी जकात नाका, भक्तीशक्ती शिल्पसमूह सोडल्यावर अंदाजे 2 किलोमीटरवर देहूफाटा आहे. पुण्याकडून मुंबईकडे जाताना उजव्या हाताला देहूगावाकडे जाणारा  रस्ता आहे. पुणो-मुंबई रस्त्यावर आकर्षक कमान आहे. कमानीच्या दोन्ही बाजूस वीणा असून, ‘जगद्गुरू श्री संत तुकाराममहाराज प्रवेशद्वार’ असे लिहिले आहे. येथून देहूरोड कॅन्टोन्मेंटच्या हद्दीतून रस्ता जातो. देहू तीर्थस्थान असल्यामुळे रस्ता ब:यापैकी चांगला केलेला आहे.


संतश्रेष्ठ श्री तुकाराम महारांजाचे हे जन्मस्थान इंद्रायणी नदीच्या काठी असून याच गावात श्री तुकाराम सदेह वैकुंठाला गेलेचे सांगितले जाते. देहू गावात वृंदावन, विठ्ठल मंदिर, चोखामेळयाचे मंदिर अशी स्थाने पाहण्यासारखी आहेत. तुकारामबीजेला देहूत उत्सव असतो.  या ठिकाणी  सुमारे 1 एकरावर उभारलेले गाथा मंदिर सुंदर असून, संपूर्ण मंदिर पांढ:या रंगाने रंगवलेले आहे. मंदिर इंद्रायणी तिरावर असून, मंदिर परिसर सुशोभीत केलेला आहे. मुख्य मंदिरात तुकाराममहाराजांची मोठी मूर्ती असून, येथे तुकाराम गाथेच्या ओव्या भिंतीवर कोरल्या आहेत. एकूण तीन मजले असून आतमध्ये पौराणिक देखावे मूर्तीच्या स्वरूपात कोरले आहेत. यात भक्तप्रल्हाद, संत ज्ञानेश्वरमहाराज, विठ्ठलाची मोठी मूर्ती आहे. ज्या इंद्रायणी डोहात तुकारामाचे अभंग बुडवले तो डोहही इंद्रायणीकाठीच आहे.

गाथा मंदिर









जायचे कसे :

पुण्याहून स्वारगेट, मनपा भवन, पुणे स्टेशन येथून थेट निगडीर्पयत बस उपलब्ध आहेत. 1 ते 1.30 तासात तेथून येता येते. नंतर पायी चालत अथवा रिक्षा करून 10 ते 15 मिनिटांत प्रथम अप्पूघर व नंतर भक्ती-शक्तीला भेट देता येते. तसेच येथून आकुर्डी रेल्वे स्टेशनजवळ आहे. तेथूनही गाडय़ा उपलब्ध आहेत. निगडी जकात नाक्याला थांबून देहूगावकडे जाणारी बस पकडता येते.

Wednesday, November 28, 2012

लवासा

‘लवासा’ची गरज? मौजमजेसाठी



          सध्या विकएंड साजरा करण्याचा प्रघात आपल्याकडेही सुरू झाला आहे. त्यातच पुण्याला पर्यटननगरीचा दर्जा मिळाल्यानंतर तर येथे देशी - विदेशी पर्यटकांची पावले आपोआप वळू लागली. या पर्यटनगरीला अजून आकर्षण निर्माण करण्याचे काम सध्या सुरू आहे. पर्यटकांसाठी लोणावळा, खंडाळा, महाबळेश्वर या ठिकाणांना आणखीन एक नवा पर्याय म्हणून ‘लवासा’, सहारा सिटीसारखे मानवनिर्मित शहरे पर्यटनासाठी खुली करून देण्याचा  जोरदार प्रयत्न सुरू आहे. पूर्वी खडकवासल्याच्या व मुंबईच्या चौपाटीवर जाऊन भेळ खाल्याची चैन आठवते. आता ही चैन आधुनिक जगात अजून वाढली आहे. श्रीमंतांसाठी या गावातल्या दरीत ‘स्कूबा डायव्हिंग’ ‘रिव्हर राफ्टिंग’ करणं आदी गोष्टी म्हणजे चैन मानलं जावू लागले आहे.
          ‘लवासा’ हे प्रकरण रोजच प्रसारमाध्यमांतून गाजतयं. रोज त्यावर उलटसुलट बातम्या प्रसिद्ध होत आहेत. लवासा प्रकल्पाला सुरूवात झाल्यापासून त्याची प्रसिद्धी केली जात आहे.  पुण्याजवळच्या मुळशी तालुक्यात मुळा-मुठा नदीच्या क्षेत्रात हा प्रकल्प उभा रहात आहे. वरसगावच्या धरणाच्या बाजूची १८ गावे  वेल्हा, मावळ,  मुळशी या तीन तालुक्यांतर्गत येतात. त्यांचा पर्यटनासाठी विकास सध्या सुरू आहे. पुण्यातून चांदणी चौकातून पिरंगुटच्या पुढे गेले की लवासाकडे जाण्यारे मोठे फलक आपले लक्ष वेधून घेतात.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा अवाढव्य प्रकल्प उभारत असताना स्थानिक रहिवाशांना कितपत विश्वासात घेतले आहे. हा प्रश्न  पडतो. येथील वातावरण पर्यटन स्थळाला पोषक आहे. पर्यटन स्थळाच्या नावाखाली निसर्गाला धक्का लावून, कायद्याला धाब्यावर बसवून हा प्रकल्प सुरू असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यांतून येऊ लागल्या आहेत.
          लवासा हे शहर सरकारच्या विशेष निर्माण अधिकार वापरून म्हणजेच ‘स्पेशल प्लानिंग आॅथॉरीटी’ अतंर्गत तयार होत आहे.  जागतिक ख्यातीची डिझाइनिंग कन्सल्टंट असलेल्या ‘हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनी’ या कंपनीने या संपूर्ण प्रकल्पाची आखणी केली आहे. यात लवासामध्ये तीन मोठी महानगरेच वसवण्यात येत आहेत. यातल्या पहिल्या नगराचं नाव आहे दासवे. भोईनी, मुगाव,  कोळोशी, उगावली, धामण ओहोळ, गडले, साखरी, पडलघर, वदवली, आळमळ, पाथरशेत, बेंबटमाळ, मोसे ब्रदुक, साईव, भोडे, वरसगाव या गावांमध्ये संपूर्ण लवासा सिटी २०२१ पर्यंत उभी राहील, अशी अपेक्षा आहे. नावातच लवासा ‘सिटी’ आल्यामुळे पर्यटनाबरोबरच येथे अत्याधुनिक शहर उभे राहणार हे निश्चित आहे. अनेक आयटी कंपन्या इथे कार्यालये थाटणार असून त्यातील आयटी प्रोफेशनल्स याच भागात राहावेत, अशी ही कल्पना आहे. अर्थातच अनिवासी भारतीयांची मोठी गुंतवणूक येथे आहे. आज  राज्यात कुठे नसेल असा सुमारे ४० किमीचा रस्ता पुण्यातून थेट लवासाला तयार करण्यात आलेला आहे. याच रस्त्यावर टोल नाका झाला आहे.


भौगोलिक दृष्ट्या परिसर :
          या १८ गावांत शेती जमिनीबरोबर वन जमिनीचे क्षेत्रही मोठ्याप्रमाणावर आहे.  हा सगळा भाग दाट झाडाझुडुपांनी, डोंगराळ भागांनी वढलेला आहे. शतकानुशतके वाढलेले मोठे वृक्षसंपादा या ठिकाणी आहे. गावांमध्ये जुने रस्ते आहेत काही ठिकाणी पायवाटा आहेत. लवासा प्रकल्प ज्या ठिकाणी पूर्ण होतोय त्या ठिकाणी डोंगर उतारावर शेकडो वर्षांपासून ठाकर, कातकरी व धनगर, कुणबी शेतकरी कुटुंब करून राहतात.
दासवे, मुगाव आणि नासा, लवार्डे  या ठिकाणी अनेक ठिकाणी डोंगरावरील झाडे बांधकामासाठी तोडण्यात आली. काही ठिकाणी झाडे लावण्यातही आली आहेत.  पण ती किती प्रमाणात याचा प्रश्न पडतो आहे.
          पुणे जिल्ह्यातल्या मोसे खोºयात खडकवासला धरणाच्या मागे वरसगाव नावाचं एक धरण आहे. वरसगाव धरणाचं २५ किलोमीटर लांबीचं पाणलोट क्षेत्र  आहे. मुळातच दुर्गम असलेला हा भाग पूर्वी सहजरित्या पोहचण्यास अवघड होता. हे संपूर्ण पाणलोट क्षेत्र पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याचं ठरवल्यानंतर हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीने ही संपूर्ण जमीन विकत? घ्यायला सुरूवात केली. यातील १२५०० एकर विकसित करण्याची ही योजना आहे.
          कोणत्याही राज्यात धरणे बांधण्यासाठी प्रथम केंद्रशासन व पर्यावरण मंत्रालयाची परवानगी लागते. या परवानगीनंतरच देशाच्या मालकीचे होते. या धरणामध्ये काही सुधारणा करायची असेल तर पुन्हा केंद्र शासनाची परवानगी लागते. वरसगाव धरणामध्ये मागील बाजूस आणखीन एक धरण बांधण्याचे अधिकार लवासाला देण्यात आले आहेत. अशा प्रकारचे नवीन नियम कायद्यात करून धनाढ्य लोक कायद्यात तुरतुद असल्याचे सांगत आहे.   या धरणामुळे वरसगाव धरणातील ५ टीएमसी पाणी अडविले जाणार आहे. या पाण्याची मालकी लवासाकडेच आहे. धामणओहोळ आणि दासवे या खेडय़ांजवळ प्रत्येकी पाच बंधारे बांधून सुमारे २ अब्ज घनफूट पाणीसाठा व्यापारी वापराकरता करण्याची परवानगी लवासाने मिळवली आहे.  हे वाढीव धरण बांधण्यापूर्वी वरसगाव धरणातल्या पाण्यावरचा अधिकार जिल्ह्यातील शेतकरी आणि उद्योगक्षेत्र यांचा होता. तो आता नष्ट होणार असल्याच्या बातम्याही वाचण्यास मिळू लागल्या आहेत. लेकसिटीमधील हॉटेल्स, बंगले, बागा, उद्याने, क्रीडा अशासाठी हे पाणी वापरले जाणार आहे.

धरणे :
          पुणे  जिल्ह्य़ाच्या पश्चिम हद्दीच्या सीमेवर सह्याद्रीच्या प्रचंड पर्वतरांगा आहे.  या डोंगर फाटय़ांच्या बेचक्यामध्ये डोंगरात उगम पावलेले नदीनाले यांची खोरी आहेत. घाटमाथ्यावर वारेमाप पाऊस पडतो नव्हे कोसळतो. येथे नसिर्गाची मुक्त उधळण आपल्याला पाहायला दिसते. हे पाणी साठवण्याच्या दृष्टीने या खोºयात अनेक धरणे बांधलेली आहेत. या डोंगरातून अनेक झरे मिळून टेकपोळे व धामण ओहोळ नजीक अंबी नदी व मोशी नदी उगम पावते.
          ब्रिटिशकालात पुणे शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी खडकवासला धरण पुणे शहराच्या पश्चिमेला १६ किमी अंतरावर मुठा नदीवर धरण बांधण्यात आले.  मुठा उजव्या कालव्याने पुणे शहर व शेतीसाठी पाणी पोचवले जाई. शहराची व शेतीसाठी वाढणारी गरज लक्षात घेऊन १९५७  साली मुठा खोºयात म्हणजेच खडकवासल्याच्या वरील क्षेत्रात पानशेत  या ठिकाणी धरणाचे बांधकाम सुरू झाले. काम अर्धेकच्चे असतानाच १२ जुलै १९६१ रोजी धरण फुटले याच्या तडाख्याने खडकवासला धरणही फुटले. अर्थातच याचा फटका जनसामान्यांना बसलाच. १९७५ साली पानशेत धरण पुन्हा बांधण्यात आले.
          मुठेच्या दोन उपनद्या आहेत एक अंबी व दुसरी मोशी या अंबी नदीवर पुण्याच्या पश्चिमेस अंदाजे ४० कि. मी. वर पानशेतजवळ तानाजी सागर तर मोशी नदीवर वरसगावजवळ वीर बाजी पासलकर सागर आणि मुठा नदीवर टेमघर अशी धरणे बांधण्यात आली.  टेमघरच्या उत्तरेस मुळा नदीवर टाटांचे मुळशी धरण आहे.  वरसगाव, पानशेत व टेमघर धरणांमधील पाणी मुठा नदीच्या पात्रातून खडकवासला धरणात व तेथून कालव्याने व पाइपने पुण्यास आणले जाते.
          पुणे शहराला पानशेत, खडकवासला आणि वरसगाव धरणातून पाणी पिण्यासाठी मिळते. या तीनही धरणांची पाण्याची साठवण क्षमता ३१ टीएमसी आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे पुणे शहराला अंदाजे १४ टीएमसी पाण्याची गरज भासते. जिल्ह्यातील शेतीसाठी १८ टीएमसी पाणी वापरले जाते. औद्योगिक क्षेत्रासाठी ०.४० टीएमसी पाणी राखीव ठेवले जाते. अशा परिस्थितीत लवासाच्या बांधकामासाठी ३ टीएमसी पाणी राखून ठेवण्यात आले आहे.


निसर्गाची हानी :
          येथील सगळाच भाग निसर्गत:च सुंदर आहे. येथे पोहचण्यासाठी घाटरस्ते मोठे टुमदार बंगले, भव्य हॉटेल्स, हेलीपॅड, उद्याने, तलाव, क्रीडांगणे आादी बांधण्यासाठी डोंगरमाथ्यावर व डोंगर उतारावर मोठय़ा प्रमाणात डोंगर खोदाई सुरू आहे.  हा सारा परिसर अमूल्य अशा झाडा-झुडुपांचा आहे. जांभूळ, आंबा, फणस, हिरडा, शिकेकाई, बेहडा, खैर, ऐन, कडुलिंब, करंज, पळस, शिसम, आवळा, कोकम, बांबू, तसेच अनेक औषधी वनस्पतींचे इथे नैसर्गिक भांडार आहे.  तसेच विविध प्रकारचे प्राणी, पक्षी, सरपटणारे प्राणी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वास्तव्य करून आहेत. या समृद्ध निसर्गाचे या ‘पर्यटन’ स्थळामुळे काय हानी होईल ते काळाच ठरवेल.


नैसर्गिक संपत्तीची हानी
          या धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील नैसर्गिक संपत्तीची हानी तर होत नाही ना असा प्रश्न उभा राहातो. आणि ही हानी तरी कशासाठी पर्यटनासाठी. हे कुठेतरी थांबणे गरजेचे आहे. नाहीतर नैसर्गिक अन्नसाखळी तुटण्याची शक्यता आहे.  ही सारी मानवनिर्मित शहरे आज मुळशी, भाटगर, पानशेत, टेमघर, वरसगाव, पवना या धरणाच्या पाण्याची वाट लावणार आहेत. याचा थेट परिणाम पुणे व आजुबाजूच्या लोकवस्तीवर झाल्यावाचून राहणार नाही.
          लवासाचे हे मानवनिर्मित ‘हिल’ स्टेशन उभारताना अनेक ठिकाणी डोंगर ‘किल’ केलेले दिसतात. त्याशिवाय एवढा मोठा रस्ता, खिशाला न परवडणारे येथील अवाढव्य गृहप्रकल्प हे झालेच नसते. डोंगरांचे सपाटीकरण करून उभे केलेले हे हिल स्टेशन म्हणले तर वावगे ठरणार आहे. महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे भरपूर आहेत महाबळेश्वर, माथेरान, आंबोली येथे  हिल स्टेशन बांधली जातात. परंतु तेथील पर्यावरणाला धक्का न लावता? लवासातील डोंगर तीव्र उताराचे आहेत आणि त्यावर माथे विस्तीर्ण नाहीत अर्थातच हा प्रकल्प डोंगर सपाट करून काही ठिकाणी झाडांची कत्तल करून पूर्ण करावा लागणार आहे.
          सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरचे असलेले हे आधुनिक शहर राहणार आहे. सध्या वीज, पाणी, वाहतूक, शिक्षण या मूलभूत सुविधांपासून अनेक खेडोपाडी वंचित आहे. सध्या पडलेला २०१३ सालचा कोरडा भीषण दुष्काळ पाहता अशा प्रकल्पांना राज्य सरकार परवानगी तरी कशी देते याचे गौडबंगाल काय आहे हे तपासणे गरजेचे आहे. हिलस्टेशनची महागडी घरे, तेथील उच्चभ्रू स्कूल, वाहतुकीसाठी एअर कंडिशन बस या सेवा नाहीतर काय कामाच्या.  पर्यावरणाची मानवनिर्मित हानी पाहून मन खिन्न होते. आपण एक दिवसाची पिकनिक म्हणून या क्षेत्राकडे न पाहता येणाºया पिढीसाठी निसर्ग ठेवणार आहोत का नाही याचा विचार करायला हवा. ‘मला काय त्याचे’ हे धोरण आता थांबविले पाहिजे.
          पर्यावरणाच्या प्रश्नावरून लवासा वादात असतानाच आणखीन एका खासगी हिल स्टेशन उभे राहू लागले आहे. तेही मुळशी तालुक्यातच. मुळशी तालुक्यातल्या मौजे सालतर, माजगाव बार्फे, भांबुर्डे, एकोले, घुटके, आडगाव येथे हा प्रकल्प उभा राहणार आहे. या प्रकल्पाला लागणारं पाणी मुळशी धरणातून मिळणार आहे.  जमीन खरेदी करण्याचा काम सध्या जोरात सुरू आहे.
          वरील लेख लिहण्यासाठी पुन्हा एकदा मी व मित्र लवासाला गेलो तेथील एकूण भौगोलिक परिस्थिती सध्या तेथील लोकवस्ती यांचा अभ्यास करून व काही वर्तमानपत्रात आलेल्या लेखाच्या आधारे हा लेख लिहीला आहे. चूका आढळल्यास जरूर कळवा. धन्यवाद
          
          आज रविवार होता. बरेच दिवस लवासाबद्दल ऐकत होतो. त्याबद्दल वर्तमानपत्रातून लेखही वाचले होते. येथे जाण्याचा मोह अवरेना  दुपारी 2 ला घर सोडले. हिंजवडी, माण, घोटावडे मार्गे पिरंगुट चौकातून रस्ता आहे.  काही किलोमीटर रस्ता खराब आहे. मात्र, 10 किमीअंतर पुण्यातून चांदणी चौकातून जाण्याचे वाचते. पिरंगुट सोडल्यानंतर लवासा सिटीचा सरळ रस्ता आहे. वाटेत वरसगावचे धरण दिसते.
          मुळशी तालुक्यातल्या मौजे सालतर,  भांबर्डे, एकोले, घुटके, आडगाव गावाच्या परिसरात हा प्रकल्प उभा आहे. लवासा सिटीकडे जाणारा रस्ता छानच आहे. येथील डोंगर तीव्र उताराचे आहेत. रस्ता नागमोडी व घाटाचा आहे. काही टर्न खूपच मास्त आहे. वाटेत लवासातर्फे दिवे लावले आहेत. रस्त्याच्या आजुबाजूला जास्त लोकवस्ती नाही. पुण्यातून चांदणी चौक ओलांडून पिरंगुटच्या पुढे गेले की डाव्या हाताला लवासाकडे जाता येते. वाटेत भुगाव, लवार्डे,  दासवे  अशी गावे आहेत. याच रस्त्याने पुढे ताम्हीणी घाटात जाता येते.  दुपारी 4 ला लवासा सिटीत पोहचलो.
          येथील निसर्गदृश्य बघण्यासाठी पर्यटकांसाठी पर्वणीच ठरणारं आहे. वरून लवासा सिटीचा परिसर, पूल, आजुबाजूच्या इमारती, दिवाळीतल्या किल्लांवरील चित्रंसारख्याच दिसतात. लवासा सिटीत एक गार्डन असून, त्यात लहान मुलांसाठी खेळणी बसविलेली आहेत. गार्डन छान आहे. सायंकाळी 5.30 ला लवासा सिटीतून निघालो. चांदणी चौकात एक टोल आहे. 30 रुपयांचा. जाताना पिरंगुट मार्गे चांदणी चौकातून बाणेर मार्गे घरी पोहचलो.









कॉपी करू नका