दौलताबाद मूळचा देवगिरी किल्ला. सध्याच्या छत्रपती संभाजीनगरात असणाऱ्या दौलताबादजवळ हा यादवकालीन किल्ला आहे. ही यादवांची राजधानी होती (९ वे शतक - १४ वे शतक). या किल्ल्याने अनेक राज्ये, सत्तांतरे बाघितली. किल्ला एक हातातून दुसऱ्या हातात जात असताना किल्ल्याचा विस्तार होत गेला. ६ व्या शतकाच्या आसपास देवगिरी हे पश्चिम आणि दक्षिण भारताकडे जाणाऱ्या प्राचीन मार्गावर असल्यामुळे व्यापारी मार्गासाठी महत्त्वाचे ठिकाण होते. अजंठा-वेरुळ सारख्या लेणी असल्याने अनेक शतके या ठिकाणी संस्कृती जपली गेली.
इतिहासकारांच्या मते, दौलताबादच्या या गिरीदुर्ग व भुईकोट यांचा मिलाप असलेल्या या बुलंद किल्ल्याची निर्मिती राष्ट्रकूट राजा वल्लभ याने इ. स. ८ शतकात केली. यादव कुळातील राजा भिल्लम यादव याने या दुर्गाच्या साहाय्याने आपली स्वतंत्र सत्ता स्थापन केली. यादवांच्या सत्तेचा केंद्रबिंदू हा ‘देवगिरी’ किल्ला होता.
कित्येक वर्षे अजिंक्य राहिलेल्या या किल्ल्यावर इ. स. १२९४ मध्ये अल्लाउद्दीन खिलजीने स्वारी केली. त्या वेळी देवगिरीवर राजा रामदेवराव यांची सत्ता होती. अल्लाउद्दीन खिलजीने राजा रामदेवराय यांचा पराभव केला. प्रचंड लूट केली. या लढाईनंतर राजा रामदेवराय आणि अल्लाउद्दीन खिलजी यांच्यात तह झाला. त्यानंतर कुतुबुद्दीन मुबारक खिलजीने इ. स. १३१८ मध्ये देवगिरीवर पुन्हा हल्ला चढवला. या लढाईत हरपाळदेव याचा पराभव झाला. त्याला अमानुषपणे मारण्यात आले. इ. स. १३१८ मध्ये यादवांची सत्ता संपुष्टात आली आणि सुलतानांचे राज्य सुरू झाले.
इ. स. १३२७ मध्ये महंमद बिन तुघलक याने दिल्लीची राजधानी मध्यवर्ती ठिकाणी हलवण्याच्या उद्देशाने ती देवगिरीवर आणली. देवगिरीचे नाव बदलून ‘दौलताबाद’ असे ठेवले. पण ही राजधानी तुघलकाला फार काळ टिकवता आली नाही. तुघलकाने राजधानी पुन्हा दिल्लीला हलवली. या राजाच्या असल्या निर्णयाला 'तुघलकी निर्णय' घेणारा राजा म्हणून संबांधले जाते. म्हणजे त्याच्या मनात आले की तो विचार न करता तुघलकी निर्णय देऊन टाकायचा. इ. स. १३४७ पासून दिल्लीच्या सुलतानशाहीत सत्ता-संघर्ष सुरू झाला. हसन गंगू बहमनी याने आपले स्वतःचे राज्य स्थापन केले. हेच बहमनी राज्य होय. बहमनी राजांनी सुमारे १५० वर्षे राज्य केल्यानंतर या सत्तेचेही पुढे पाच तुकडे झाले. त्यातीलच एक म्हणजे अहमदनगरची निजामशाही. निजामशहाने आपले राज्य दौलताबाद येथे सुरू केले.
चांदमिनार :
किल्ल्याचे वैभव म्हणून चांदमिनारकडे पाहिले जाते. दिल्ली येथे असलेल्या कुतुबमिनारप्रमाणेच हा चांदमिनार शोभिवंत आणि आकर्षक आहे. महाकोट ओलांडताच चांदमिनार दृष्टिक्षेपात येतो. ६५ मीटर उंच असलेला हा चांदमिनार किल्ल्याच्या सर्व परिसरातून दिसतो. भारतमाता मंदिराच्या उजवीकडील दरवाजातून बाहेर पडताच चांदमिनार लागतो. मिनारचे नक्षीकाम व कोरीवकाम अप्रतिम आहे. मिनारच्या तिसऱ्या मजल्याच्या गच्चीवर जाण्यासाठी आतून पायऱ्या आहेत. मिनारवर जाण्यास सुरक्षिततेच्या कारणास्तव मनाई केली आहे. हा मिनार सुलतान अहमदशाह बहमनीने बांधला आहे, असे मानले जाते. इ. स. १४४७ मध्ये या मिनारचे बांधकाम पूर्ण झाले.
‘मेंढा तोफ’
गडावर अतिशय मजबूत आणि सुस्थितीत असलेली तोफ म्हणजे ‘मेंढा तोफ’ होय. तोफेच्या एका बाजूस मेंढ्याच्या आकाराचे तोंड आहे. म्हणूनच या तोफेला ‘मेंढा तोफ’ असे नाव पडले. चिनी महालाच्या डावीकडे एका बुरुजावर ही तोफ आहे. या तोफेवर ‘तोफ किला शिकन’ असे लिहिलेले आहे. तोफ किला शिकन म्हणजे किल्ला उद्ध्वस्त करणारी तोफ होय. या तोफेचे वैशिष्ट्य म्हणजे ही तोफ सर्व बाजूंना वळवता येते. तिची लांबी सात मीटर असून ती मिश्रधातूंची बनलेली आहे. तोफेला अद्याप गंज चढलेला नाही हे विशेष. या तोफेवर औरंगजेब बादशहाचे व कारागीर महंमद अरब याचे नाव आहे. त्यामुळे ही तोफ औरंगजेबाच्या काळातील मानली जाते. तोफेवर कुराणातील एक वचनही कोरलेले आहे.
अंधारी व भुलभुलैया मार्ग :
महाराष्ट्रातील कोणत्याही किल्ल्याच्या बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी इतका बिकट आणि भुलभुलैयाचा मार्ग नसेल. देवगिरीवर मात्र असा मार्ग आहे. या मार्गाला ‘अंधारी मार्ग’ असे म्हणतात. पाण्याच्या खंदकावरील लोखंडी पूल ओलांडताच डोंगर पोखरून केलेला हा अंधारी मार्ग सुरू होतो. हा मार्ग वळणावळणाचा आणि काही ठिकाणी चकवा देणारा असा आहे. मध्येच खाई लागते. शत्रूने प्रवेश केलाच तर तप्त निखारे अंगावर ओतण्याची सोय होती. हा मार्ग ओलांडण्यासाठी पूर्वी मशालीचा वापर केला जात असे.
किल्यावर बघण्यासारखी ठिकाणे खूप आहेत. ज्यामध्ये भारतमाता मंदिर, चिनी महाल, निजामशाही राजवाडा, बारादरी, श्री जनार्दन स्वामी यांची ध्यानगुंफा, शाही हमाम मात्र वेळेअभावी बरचशी ठिकाणे बघता आली नाही. देवगिरीचा किल्ला व्यवस्थित पाहायचा झाल्यास किमान तीन ते चार तास लागतात.
निजामशाहीचे राज्य सुमारे १३५ वर्षे टिकले.इ. स. १६३३ मध्ये दिल्लीचा मुघल बादशाह शाहजहान याने दौलताबादचा किल्ला आपल्या ताब्यात ठेवला. शाहजहानला त्याचा मुलगा औरंगजेब याने तुरुंगात ठेवून आपण स्वतः बादशहा बनला. त्यानंतर हा किल्ला औरंगजेबच्या ताब्यात आला. पुढे इ. स. १७२४ मध्ये दौलताबादचे वैभव हैदराबादच्या निजामाच्या ताब्यात गेले. इ. स. १७६० मध्ये सदाशिवराव भाऊ पेशवा आणि निजाम यांच्यात उद्गीर येथे लढाई झाली. या लढाईत सदाशिवरावभाऊंनी निजामाचा पराभव केला. निजाम आणि सदाशिवराव भाऊ यांच्या झालेल्या तहात निजामाने दौलताबादचा किल्ला मराठ्यांना दिला. सदाशिवराव भाऊ उत्तरेला निघून गेले. उत्तरेला जाताच निजामाने हा किल्ला पुन्हा १७६२ मध्ये ताब्यात घेतला. केवळ दोन वर्षेच दौलताबादचा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात राहिला.
इंग्रजांनी संपूर्ण भारतभर आपली सत्ता निर्माण केली होती. दौलताबादचा किल्लाही इंग्रजांच्या ताब्यात गेला असला तरी तो किल्ला हैदराबादच्या संस्थानाच्या नावावर १९४८ सालापर्यंत राहिला. भारत स्वतंत्र झाल्यावर सरदार वल्लभभाई पटेल यांनी संस्थानांचे भारतात विलिनीकरण केले. त्यात हैदराबादचे संस्थानही होते. ग्रंथकार हेमाद्री, गोपदेव, कवी नरेंद्र यांचे वास्तव्य या किल्ल्यावर होते. त्यातील हेमाद्रीने हेमाडपंथी मंदिरांचा पाया रचला. महाराष्ट्रात आजही कित्येक ठिकाणी हेमाडपंथी मंदिरे पाहायला मिळतात.
किल्याचा आकार त्रिकोणी आकारातला असून, निम्मा भाग सभोवताली तासला आहे. त्यामुळे किल्ल्यावर आक्रमण करणे खूपच अवघड होते. किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणाजे सभोवताली तीन तटबंदी आहेत. या तटबंदीला कोट असे म्हटले जाते. संपूर्ण गावाभोवती एक तट आहे. त्याला अंबरकोट म्हणतात. अंबरकोटातून आत प्रवेश केल्यावर आणखी दोन तटबंद्या पार कराव्या लागतात. किल्ल्यात प्रवेश करताच महाकोट तटबंदी लागते. या महाकोटात आठ दरवाजे आहेत. त्यातील एकही दरवाजा समोरासमोर नाही. पाण्याने भरलेला खंदकाने वेढलेला असे, प्राचीन काळी मगरींना शत्रूच्या हल्ल्यापासून संरक्षणासाठी खंदकात ठेवले जात असे. किल्ल्यावर जाण्याचे एकमेव साधन म्हणजे एक अरुंद पूल आहे. येथून पुढे अंधार असलेल्या गुहेतून किल्यात प्रवेश होतो. पूर्वी युद्धाच्या वेळी जाळीने झाकलेला असे आणि वरच्या बाजुला जळत ठेवलेल्या आगीची चूल तयार केली असे. शत्रूंना गोंधळात टाकण्यासाठी गुहेचे प्रवेशद्वार आहे. भुईकोट भाग संपल्यानंतर बालेकिल्ल्यास आरंभ होतो. बालेकिल्ल्यात जाण्यासाठी अंधारी मार्ग लागतो. या अंधारी मार्गातून शत्रूला सहजासहजी बालेकिल्ल्यावर जाणे अशक्य असायचे. अंधारी मार्गात अनेक अडथळे आहेत. अल्लाउद्दीन खिलजीने रामदेवरायचा पराभव केला तो केवळ फितुरीमुळेच! म्हणूनच हा किल्ला अजिंक्य आणि अभेद्य किल्ला असे मानले जाते. किल्ल्याच्या प्रत्येक बुरुजावर तोफा आहेत. इतक्या मोठ्या तोफा गाडावर नेल्या असतील की गडावरच बनवल्या असतील, याचा उलगडा होत नाही. आजही या तोफा मजबूत आणि सुस्थितीत आहेत. १४९९ मध्ये दौलताबाद अहमदनगर सत्तेचा भाग बनले, ज्यांनी त्यांचा दुय्यम राजधानी म्हणून वापर केला. १६१० मध्ये किल्ल्याजवळ, औरंगाबादचे नवीन शहर, ज्याचे नाव खडकी होते हे वसविण्यात आले. अहमदनगर सल्तनतची राजधानी म्हणून काम करण्यासाठी इथिओपियन लष्करी नेता मलिक अंबरने स्थापन केले होते. दौलताबाद किल्ल्यावरील सध्याच्या काळातील बहुतेक तटबंदी अहमदनगर सल्तनत अंतर्गत बांधण्यात आली होती.
भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ :
किल्ल्याला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ म्हणजे ऑक्टोबर ते फेब्रुवारी या थंडीच्या काळात. या काळात हवामान आल्हाददायक असते. उन्हाळ्यात येथील तापमान जास्त असते.
किल्ला पाहण्याची वेळ : सकाळी ६ ते संध्याकाळी ६
तिकीटाचे दर : प्रत्येकी २५ रुपये
कार पार्किंग दर : ५० रुपये
औरंगाबाद रेल्वे स्थानकापासून १६ किमी अंतरावर आहे.
टीप : तिकीट जूपन ठेवावे लागते. हरविल्यास १०० रुपये दंड भरावा लागतो.





























