Sunday, June 7, 2015

तिरुमला तिरुपती देवस्थान (टीटीडी) - भाग १



तमाम हिंदूचे श्रद्धास्थान म्हणजे तिरुपती बालाजी. अनेक वर्षापासून तिरुपती बालाजीचे दर्शन घेण्याची इच्छा होती. पुण्याजवळील कापूरहोळ येथील प्रतिबालाजीला अनेकवेळा गेलो. मात्र, तिरुपतीला प्रथमच जाण्याचा योग जुळून आला. या प्रवासाविषयी..


भारतातील तीर्थक्षेत्रंमध्ये प्रसिद्ध असे हे तिरुपती क्षेत्र आहे.  देशातील सर्वाधिक श्रीमंत देवस्थान म्हणूनही ओळखले जाते. आंध्रप्रदेश राज्याच्या दक्षिण टोकावरील चित्तूर जिल्हय़ात तिरुपती हे शहर. याच शहराच्या जवळ असलेल्या डोंगरावर बालाजीचे हे मंदिर आहे. याच डोंगराला ‘तिरुमला’ असे म्हणतात. तिरुमला डोंगर रांगेत एकूण 7 डोंगर आहेत.  त्याला सात फण्यांचा आदिशेष असे म्हणतात. हे देवस्थान अगदी शेवटच्या डोंगरावर वसले आहे. म्हणून या परिसराला सप्तगिरी असेही म्हणतात. संपूर्ण डोंगर हा लाल दगडाचा आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे 853 मीटर उंचीवर असलेल्या या ठिकाणी उन्हाळय़ातही थंडावा असतो. भगवान वेंकटेशाचे मंदिर असलेल्या पर्वताला ‘वेंकटाचल’ असेही म्हटले जाते. या डोंगरावर ‘कपिलितीर्थ’ नावाचे सरोवर आहे.
‘तिरु’ म्हणजे ‘लक्ष्मी’ लक्ष्मीचा पती म्हणजे ‘तिरु पती’ (विष्णू). तेलुगू व तमिळ भाषेत ‘मला/मलई’ म्हणजे ‘डोंगर/पर्वत’. बालाजी हा विष्णूचा अवतार मानला जातो. तिरुपती राजधानी हैदराबादपासून 740  किलोमीटरवर आहे. तर शहरापासून सुमारे 20 किलोमीटरवर असलेल्या डोंगरावर हे मंदिर आहे. बरेचसे भाविक हे अंतर अनवाणी पार करतात. वैकुंठ एकादशीला येथे लाखो भाविक दर्शनासाठी येतात. असे मानले जाते कि या दिवशी बालाजीचे दर्शन घेतल्यास सर्व पापातून मुक्ती होऊन त्याला मुक्ती मिळते. दररोज सुमारे 5क् हजारांहून भाविक या ठिकाणी दर्शनास येत असतात. ऑक्टोबर महिन्यात या ठिकाणी ब्राrाोत्सव साजरा केला जातो. सुमारे 9 दिवस हा उत्सव असतो. 


तिरुपती मंदिराविषयी :

           मंदिराची उभारणी ही दाक्षिणात्य गोपुर शैलीपद्धतीची आहे. बालाजीची मूर्ती सोने व इतर अनेक दागिन्यांनी मढलेली असते. मूर्तीची उंची 2  मीटर आहे. मंदिराच्या स्थापनेचा अचूक काळ अज्ञात आहे. मूर्ती स्वयंभू मानली जाते. लोककथेनुसार तिरुपती डोंगरावर मोठे वारुळ होते. एका शेतक:यास आकाशवाणीद्वारे वारु ळातील मुंग्यांना खायला घालण्याची आज्ञा झाली. तेथील राजाला ही आकाशवाणी समजल्यावर त्याने त्या वारु ळास दूध पुरवू लागला. त्याच्या भक्तीमुळे बालाजी अवतीर्ण झाले.
             बालाजीच्या मंदिराचा संपूर्ण कलश सोन्याचा आहे. ऐतिहासिक पुराव्यानुसार मंदिर किमान 2000 वर्षे जुने आहे.  चौल व पल्लव साम्राज्यांनी या मंदिराला भरभराटीस आणले. 1517 मध्ये कृष्णदेवराय राजाने गर्भगृहाच्या शिखराला सोन्याचा थर दिला. पुढे मराठा सेनापती रघुजी भोसले यांनी देखभालीची व्यवस्था केली. म्हैसूर व गदवल संस्थानाद्वारेही या मोठय़ा देणग्या मिळाल्या. ब्रिटिश काळात मंदिराचे प्रशासन  हाथिरामजी मठाला सोपवण्यात आले. ही व्यवस्था 1933 पर्यंत सुरु  होती.  1933 मध्ये मद्रास विधानसभेच्या विशेष कायद्याअन्वये ‘तिरुमला तिरु पती देवस्थानम’ समितीची स्थापना करण्यात आली. यालाच तिरुमला तिरुपती देवस्थान (टीटीडी) असे म्हणतात.  हे पुरातन मंदिर ज्या डोंगरावर आहे त्या डोंगराची माती ढासळत असल्याचा दावा मध्यंतरी पुरातत्व विभागाने केला. ही माती अशीच ढासळत गेली तर हे मंदिर एक दिवस खाली येईल असा इशारा देणारे निवेदन पुरातत्त्व खात्याने तिरु मला तिरु पती देवस्थान समितीला दिल्याचे वृत्तपत्रतून वाचण्यात आले होते. या मंदिराची तात्पुरती डागडुजी किंवा त्याच्या बाहय़रूपात काही बदल केले आहेत. मूळ शिल्पाला धक्का न लावता ही डागडुजी केली जाते. सध्या मुख्य मंदिरात डागडुजीचे काम सुरू आहे. 

कल्याण कट्टा / केसांचे दान :

         तिरुपती बालाजीच्या चरणी डोक्याचे केस दान केल्याने मनातील इच्छा पूर्ण होते, अशी भक्तांची धारणा असल्याने येथे  स्त्री, पुरुष, सर्वजण केसदान करतात. रोज हजारो किलो केसांचे दान या ठिकाणी होत असते. या केसांचा वापर विग तयार करण्यासाठी केला जातो. यासाठी देवस्थान त्याचा लिलाव करते. मागे वृत्तपत्रत देवस्थानला 74 कोटीं या केसव्रिकीतून मिळाल्याचे वाचण्यात आले होते. इंटरनेटद्वारे ऑनलाईन प्रक्रियेद्वारे ही विक्री झाली होती.  या लिलावात सुमारे 1 लाख 40 हजार 499 किलो केस विकले गेलेत. केसांच्या लांबीनुसार त्याचे विभाजन करु न ते विकले गेले.
          मंदिराच्या बाहेरील बाजूस एका मोठय़ा इमारतीत कल्याण कट्टा असून, या ठिकाणी भाविक लोक आपले केस दान करतात.  येणा:या भाविकांना एक कुपून व नवीन ब्लेड देण्यात येते. असे कुपून घेऊन संबंधित नंबरवर केस कापणा:या पुढे जाऊन उभे राहावे लागते. प्रथम पाण्याने डोके भिजवून केस मऊ करण्या संदर्भात सांगितले जाते. दोन ते चार मिनिटातच मुंडन केले जाते.
           येथील व्यवस्थाही पाहण्या जोगी आहे. केस काढणा:याला पैसे द्यायची गरज नाही. पैसे दिल्यास ते लोक पैसे स्वीकारत नाही. देवस्थान त्यांना प्रत्येक कुपूनामागे पैसे मोजत असतात. सर्वत्र केस कापून उभे असलेले पुरुष व स्त्री दिसतात. साफसफाई कर्मचारी सर्वत्र केस गोळा करत असल्याचे दिसून येते. याच ठिकाणी स्नान करण्याचीही सोय उपलब्ध करून दिली असते. याच बरोबर कौस्तुभ व सप्तगिरी रेस्ट भवनातही ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.

तिरुमला वर जायचा  रस्ता

हुंडी / दान :

            अलीकडे विविध धार्मिक संस्थानांच्या वाढत्या श्रीमंतीबद्दल जोरदार  चर्चा होत असते. मध्ये केरळमधील पद्मनाभ मंदिराच्या संपत्तीचे  आकडे डोळे विस्फरणारे ठरले. अजुनही या मंदिराचे काही दरवाजे उघडायचे बाकी आहेत. या ऐतिहासिक मंदिरात सापडलेला खजिना तर दहा लाख कोटींचा असल्याचा प्राथमिक निष्कर्ष सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीने दिला. या श्रीमंतीबाबत विचार करायचा तर बालाजी देवस्थानचा क्रमांक वरचा लागतो. या देवस्थानचे उत्पन्न काही अब्जात जाणारे आहे. मंदिराला एवढे दान मिळते की मंदिराच्या काही भिंती सोन्याच्या पत्र्याने मढवल्या गेल्या आहेत. तिरूपतीला रोख स्वरूपातील रकमेबरोबरच सोने, चांदी, हिरे यांचे दागिने अर्पण केले जातात. भक्तांनी केलेले पैशाचे हे दान मोजण्यासाठी चाळणीतून हे पैसे चाळून वेगळे केले जातात. आपापल्या ऐपतीनुसार प्रत्येक भाविक हे दान करत असतो. अंगठय़ा, सोन्याची चैन, सोने असे दान करण्याची येथे प्रथा आहे.
             खरा भक्त आणि  देवातलं अंतर हळूहळू दूर होत चालल्याचे दिसून येते. पैसे देऊन व्हीआयपी रांग आणि सोन्याचे दान करणारे नवस भाव खाऊन जातात.  कधी काळी शांततेची स्थाने असणारी मंदिरे आता मात्र, प्रचंड गजबजाट आणि कोलाहल बनू लागली आहे.  त्याला धार्मिक स्वरुप येऊ लागले आहे. हिंदू धर्मातील प्रत्येक पंथाचे देव वेगळे बनले आहेत. देशातल्या प्रत्येक मंदिरातील दानपेटीत दान वाढतच जाते. शिर्डीत एका भक्तानं साईच्यां चरणी 32 लाख रु पये किंमत असणारा सोन्याचा कलश अर्पण केलाय. मंदिरातील भाविकांना रांगेत थंडावा मिळावा यासाठी एसीची व्यवस्था केली. रोज दान देणा:यांच्या संख्येत वाढ होताना दिसते. हे दान गुप्त स्वरुपात होते. पद्मनाभस्वामी मंदिराचा सुमारे एक लाख कोटीचा खजिना आहे. तर तिरु पती बालाजी मंदिराचा 50 हजार कोटीचा खजिना आहे. वैष्णोदेवी  वार्षिक दान 500 कोटी तर शिर्डीचे साईबाबा संस्थान वार्षिक दान 200 कोटींच्या वर आहे. हे आकडे ऐकले तर आपला भारत गरीब म्हणावा का? हा प्रश्न उपस्थित होतो. आपण केलेला नवस पूर्ण झाल्यास हा नवस देणगी स्वरुपात, सोन्याच्या स्वरुपात  देण्याची प्रथा अलिकडे सुरू झाली आहे. खरेतर गोरगरीबांसाठी अन्नछत्रलय, शैक्षणिक संस्था, रस्ते, सोई सुविधा, हॉस्पिटल, पाणीप्रश्न या सारख्या प्रश्नांकरिता हे दिलेले गुप्त दान वापरण्याची खरी गरज आहे. काही देवस्थान संस्था हे उपक्रम राबवित असतील ही तरीही मोठय़ा प्रमाणावर हे दान वापरले गेले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदींजींनी काही महिन्यांपूर्वी या मंदिराकडील सोने बाजारात आणण्याची कल्पना मांडली. त्यावरून वाद घालण्या पलिकडे आपण काहीही करत नाही. पंतप्रधानांची ही योजना खरच स्वागताहर्य़ म्हणावी लागेल.

सुरक्षा व्यवस्था

               लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या या देवस्थानची सुरक्षाही तितकीच कडक आहे. डोंगर चढण्यापूर्वी वाहनातून  तसेच पायी चालत जाणा:या भाविकांची तपासणी केली जाते. यासाठी बॅग स्कॅन करण्याची यंत्रणा उपलब्ध आहे. जवळपास अमली पदार्थ बाळगणो हा गुन्हा आहे. सिगरेट, तंबाखू, गुटका, दारू यासारखे व्यसने तिरुपती देवस्थानावर करणो गुन्हा आहे व अर्थात हे पदार्थ वरती मिळत ही नाहीत. मुख्य मंदिर प्रवेशद्वारावरही सर्वत्र कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. मंदिरात प्रवेश करतानाच पुन्हा स्कॅनर मशीन लावण्यात आलेले आहे. जागो जागी कॅमेरा लावण्यात आले आहेत. एकूणच येथील सुरक्षा व्यवस्था कडक आहे. मात्र, भाविकांना याचा त्रस होताना दिसत नाही.






















आदर्श घ्यावा

           तिरुपतीप्रमाणो आपल्याकडे ही अशा देवस्थानचा विकास होण्याची गरज आहे. तिरु पती मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान हे केंद्रस्थानी मानून सभोवतालचा परिसर सुशोभीत केलेला आहे.   देशभरातून येणारा पर्यटक निदान चार दिवस तरी येथे मुक्कामी राहिला पाहिजे. अशी यंत्रणा केलेली आहे. परिसरातील अनेक ठिकाणो पर्यटन स्थळे म्हणून घोषित केलेली आहेत. यासाठी अशी प्रेक्षणीय स्थळे विकिसत केली. तिरु पतीचे महत्व, माहात्म्य सांगणारी माहिती केंद्रे देशभरात उभी केली. येणा:या लाखो पर्यटकांसाठी निवास व्यवस्था,  भक्तांसाठी सोयी-सुविधा, पाणीपुरवठा, वाहतूक व्यवस्था, शिक्षण, संशोधन केंद्र, धर्मादाय संस्था, हॉस्पिटल्स हे सर्व आपल्याकडेही होणो सहज शक्य आहे. संपूर्ण डोंगरावर जाताना व येताना एकेरी मार्ग, संपूर्ण रस्ता डांबरी (खड्डे नाहीत), संपूर्ण डोंगरावर हिरवळ, स्वच्छता हे पाहून नक्कीच आपल्याकडेही असे देवस्थान होण्याची गरज आहे.

पर्यटन वाहन व्यवस्था 

 

 

             तिरुपती बालाजीचे दर्शन घेतल्यावर वेळ मिळाल्यास डोंगरावरील पर्यटन स्थळे व काही मंदिरे पाहण्यास विसरू नका. सुमारे 5 ते 10 किलोमीटर अंतरावर असलेली ही ठिकाणो नयनरम्य परिसरामुळे देखणी व चिरस्मरणात राहणारी ठरतात. देवस्थानतर्फे  स्वत:ची पर्यटकांसाठी बस आहे. मात्र, तिची वेळ माहिती करून घेणो गरजेचे आहे. केवळ 45 रुपयांत ते काही मंदिरे दाखवितात. मात्र, प्रचंड गर्दीमुळे आम्ही ही बस नाकारली.मंदिर परिसरात सुमो, जीप गाडय़ा, तवेरा, क्वॉलिस यांसारख्या गाडय़ा भाडय़ाने उपलब्ध आहेत. डोंगरावरील पर्यटनस्थळे ते आपणास दाखवून आणतात. सुमारे 1000 रुपयांमध्ये 5 पर्यटनस्थळे दाखविली जातात. एका सुमोत 11 जण सहज बसतात. ही स्थळे पाहण्यास सुमारे तीन ते चार तास इतका वेळ लागतो. जादा पर्यटक मिळावेत यासाठी ड्रायव्हर आपल्यामागे घाई करताना दिसून येतो. आपण मात्र, मनसोक्त ही पर्यटनस्थळे पाहवीत. खाली तिरुपतीमध्ये सुद्धा अनेक पर्यटनस्थळे पाहण्यासारखी आहेत. तिरुपतीला जाऊन तेथून गाडी ठरविल्यास ते फायदेशीर ठरते. कारण वरून गाडी ठरविल्यास एकतर ते जादा दर सांगतात. आपली अडचणीची वेळ लक्षात घेऊन वाटेल तो दर सांगतात. खाली तिरुपतीला जाण्यासाठी सुमारे 1500 रुपये असा दर सांगतात. आम्ही तिरुपतीवरून तिरुमलावर 700 रुपयांत वर आलो. मात्र, खाली जाण्यासाठी 67 टर्न असल्याचे कारण व जादा माणसे घेऊन जाता येत नसल्याचे कारण सांगून हे ड्रायव्हर अडवणूक करतात.

स्वच्छतेबाबत

              एकूणच धार्मिक पर्यटन म्हटले की, घाण, सडलेली फुले, नारळ, करवंटय़ा, लोकांनी खाऊन टाकलेले उष्टान्न, टाकाऊ पदार्थ, राडा असे चित्र आपल्याकडे काही ठिकाणी सर्रास पाहायला मिळते. मात्र, तिरुपती स्टेशन असो वा तिरुमला डोंगरावरील मंदिरे असो, तेथील हॉटेल परिसरा भोवती सुद्धा कमालीची स्वच्छता पाळण्यात येते. जागोजागी प्लॅस्टिकच्या कचराकुंडय़ा ठेवल्यामुळे पर्यटक कचरा कचराकुंडीतच टाकतात. जागोजागी झाडू घेऊन स्वच्छता करणारे कर्मचारी दिसून येतात. यामुळे एवढी गर्दी होऊन सुद्धा स्वच्छता असल्याचे पाहून आश्चर्य वाटते. पुणो स्टेशनावर गाडीची वाट पाहत असताना नाकाला रुमाल बांधल्याखेरीज बसणो मुश्किल जाते. मात्र, तिरुपती स्टेशनवर गाडी गेल्यावर रेल्वे ट्रॅक पाण्याने स्वच्छ धुतला जातो. हे  पाणी तेथील गटारातून वाहून जाण्याची सुविधाही उत्तम केलेली दिसून येते. तिरुमला डोंगरावर अनेक ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृहे बांधण्यात आलेली आहे. 

काही टिप्स :

  •  तिरुपतीला दर्शनासाठी तसेच राहण्यासाठी ऑनलाईन बुकिंग करता येते.
  • विमान प्रवास केलास 2 दिवसांची ही ट्रिप होते.
  • शक्यतो रात्री दर्शन घेण्यास गेल्यास लवकर दर्शन होते.
  • कुठल्याही मंदिर परिसरात मोबाईल, कॅमेरा न्याण्याची परवानगी नाही त्यामुळे शक्यतो या गोष्टी टाळा. आणल्यास त्या मंदिराबाहेरील काउंटरजवळ जमा करण्यासाठी परत रांग लावावी लागते.
  • तिरुमला व तिरुपतीवरील प्रेक्षणीय स्थळे पाहायची असल्यास प्रायव्हेट गाडी ठरवा. स्वत:ची ठिकाणो पाहण्याचा आग्रह धरा. त्यासाठी आधी प्लॅनिंग करा.

जायचे कसे  :

  • तिरुपती हे ठिकाण लोहमार्ग (रेल्वे) व द्रुतगती (रस्ता) मार्गाने पुणो, चेन्नई व बंगळूर या शहरांशी जोडलेले आहे.
  • जवळचे रेल्वेस्टेशन: तिरुपती, रेणीगुंठा. येथे उतरून मोटारीने  डोंगरावर जाता येते.
  • पुण्याहून संध्याकाळी 7.15ला सुटणा:या छत्रपती शिवाजी टर्मिनस ते कन्याकुमारी जयंती एक्सप्रेस गाडीने सुमारे 18 तासांचा प्रवास करावा लागतो. या शिवाय दादर ते चेन्नई एक्सप्रेस, मुंबई सीएसटी ते चेन्नई मेल आहेत. 


तिरुमला तिरुपती देवस्थान (टीटीडी) - भाग २

वरील लेख कसा वाटला या विषयी जरूर प्रतिक्रिया कळवा.

11 comments:

Anonymous said...

very good

Suresh Narayankar said...

खूप छान माहिती... तिरुपती जवळील सर्व पर्यटन स्थळांची माहिती द्यायला हवी आहे..

Santosh Sutar said...

अतिशय उपयुक्त आणि नव्याने तिरूपती दर्शनासाठी जाणा-यांसाठी मार्गदर्शक माहिती आहे.

Unknown said...

अतिशय उपयुक्त माहिती मिळाली धन्यवाद

Unknown said...

खुप छान माहिती दिली आहे 🙏

Meena said...

खूप चांगली माहिती दिलीत आभारी आहोत

नितीन मोरे said...

आम्ही दोनच मित्र जाणार असल्याने तिथे फिरण्या साठी आम्हांला सुद्धा1000 रुपये खर्च येईल का?आणि तिरूपती ला जाण्यासाठी1500 हे द्यावे लागतील?कृपया मार्गदर्शन करावे

Unknown said...

खूप छान माहीती दिलीत .. धन्यवाद

Unknown said...

तिरुपती ला जातांना जेवढे मेंबर असतील तेवढ्या सर्वांचे आधारकार्ड झेरॉक्स घेऊन जावे.कुठलेही ओरीजनल कार्ड स्वतःच्या जवळ बाळगू नये.मदिरात जातांना चपला मौल्यवान वस्तू मोबाईल सर्व कार्ड्स रूमवरच कुलुपबंद बॅगेत ठेवून जावे कमीतकमी रक्कम जवळ बाळगणे तसेच रक्कम वेगवेगळ्या जागी ठेवावी.देवाच्या ठिकाणी चोरांचा भरपूर वावर आहे.

Unknown said...

तिरुपती ते तिरुमला जाण्यासाठी रेल्वे स्टेशनच्या बाहेर शासनाच्या बसेस उपलब्ध आहेत प्रती व्यक्ती 65 रुपये टिकिट आहे
तिरुमला ला फिरन्यासाठी देवस्थान च्या मोफत बसेस उपलब्ध आहेत.

Unknown said...

आता या कोरोना काळात केवळ एडव्हान्स बुकींग केलेल्या भक्तांना प्रवेश आहे... त्यामुळे तिरूपती बालाजी दर्शनासाठी जाण्याआधी दर्शन पास आणि रूम कन्फर्म करुनच जावं...

कॉपी करू नका