Wednesday, May 20, 2015

तिरुमला तिरुपती देवस्थान (टीटीडी) - भाग २

आमचा प्रवास :

           तिरुपतीला जाण्याची सर्व तयारी जय्यत झाली होती. ट्रेनमध्ये खाण्यासाठी बिस्कीटे, चिवडा, लाडू, फुटाणा,  वेफर्स, एकवेळचे जेवण,  घेऊन सॅक चांगली जड झाली होती.  पुणं स्टेशनात 6 ला पोहचलो. गाडी संध्याकाळी 7.15 ला होती. गाडी नक्की कुठल्या प्लॅटफॉर्मवर येणार याची चिंता लागून राहिली होती. अखेर प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर कन्याकुमारी जयंती एक्सप्रेस येणार असल्याची घोषणा होताच प्लॅटफॉर्मवर येऊन बसलो. तेथील अस्वच्छता पाहून नकळत हात नाकाला गेला. असो. त्यात आमचे तिकीट कन्फर्म झालेले नव्हते. जागा मिळेल का नाही? याची चिंता लागून राहिली होती. अखेर गाडी आली. डब्यात चढून प्रथम टिसीला शोधण्याची मोहीम सुरू झाली. अखेर पाच सहा डबे शोधल्यावर एकदाचा टिसी सापडला. पण आत्ताच काही सांगता येणार नाही. आहे तेथे जाऊन बसा असे सांगताच आम्ही परत डब्यात येऊन बसलो. दौंडला अखेर 3 बर्थ प्लेस देतो असे सांगताच आनंद झाला. तब्बल 18 तासांनंतर दुपारी 3 वाजता एकदाचे तिरुपती स्टेशनात पोहोचलो. स्टेशनाबाहेर येताच तिरुमलावर जाण्यासाठी प्रायव्हेट टुरिस्टवाले जमा झाले. शासकीय दरात घेऊन जातो. थेट हॉटेलवर सोडतो असे सांगून झाल्यावर आम्ही सर्व सुमोत बसलो. काही वेळातच तिरुमला डोंगरावर जाण्याच्या वाटेवर लागलो. घाटाखाली प्रथमत: सर्व बॅगांची तपासणी झाल्यावर पाऊण तासातच तिरुमलावरील कौस्तुभ हॉटेलमध्ये पोहचलो. मात्र, तेथे रुम शिल्लक नसल्याने रुम खाली होण्याची वाट पाहत बसावे लागले. अखेर संध्याकाळी 8 ला सप्तगिरी रेस्ट हाऊसमध्ये रुम मिळाली. फ्रेश होऊन कल्याण कट्टय़ावर जाऊन केसदान करून आलो. डोके हलके झाल्याने कसे तरी वाटत होते. रात्री 11 वाजता मुख्य मंदिरातील मोफत दर्शन रांगेत जायला निघालो. वाटेत एका ठिकाणी मोबाईल व चपला जमा करून पावती घेऊन दर्शन रांगेला लागलो. लांबच लांब चालायच्या प्रतीक्षा रांगा होत्या. अर्ध्या तासातच एका मोठय़ा हुंडीत येऊन बसलो. तेथे गरमागरम भाताची खिचडी तयार होती. तेथील पाय:यांवर मस्तपैकी पसरलो. पहाटे 3 वाजता एकदम गडबड झाली, सर्वच भाविक सावरून दर्शनासाठी तयार झाले होते. बालाजीच्या या हुंडीमध्ये एकवेळी किमान 500 भाविक सहज बसतात. अशा 50 हुंडय़ा आहेत. आम्ही गेलो तेव्हा नशिबाने गर्दी कमी होती. मुख्य मंदिरात पोहचण्यास पहाटेचे साडेचार वाजले. मात्र, दर्शनाची आस लागल्याने वेळ कसा गेला ते कळलेच नाही. वाटेत वीस रुपयांना दोन लाडूची कुपने घेतली. अखेर ज्यासाठी येथे र्पयत आलो ती वेळ आली. बालाजीचे मंदिर जुने असल्याने आतील सजावट, दगडी बांधकाम पाहत चांगला वेळ गेला. पहाटे 5 वाजता बालाजीचे दर्शन घेऊन मन एकदम प्रसन्न झाले. गाभा:यात तुपाचे दिवे जळत होते. कुठलाही कृत्रिम प्रकाश त्या ठिकाणी नव्हता. दर्शन घेऊन मंदिराबाहेर आलो. एकदाचे दर्शन घडले. एवढय़ा सकाळी दर्शन घेण्याची वेळ पाहिल्यांदाच. आता झोप डोळय़ावर चांगलीच येऊ लागली होती. मंदिराबाहेरील लाडू वाटप केंद्रात लाडू घेऊन पुन्हा सप्तगिरी हॉटेल आलो. मस्तपैकी 11 र्पयत ताणून दिली. पुन्हा फ्रेश होऊन तिरुमलावरील पाच ठिकाणो पाहिली. संध्याकाळी बाजारपेठ हिंडून बाजारातील वस्तूंचे दर्शन घेतले. दुस:या दिवशी तिरुपतीला गाडी ठरवून तिरुपतीतील ठिकाणो पाहून रात्री 9 च्या हरिप्रिया एक्सप्रेस गाडीत बसलो. जातानाचे तिकीट कन्फर्म असल्याने चिंता नव्हती. तिरुपतीतील प्रचंड गरमीमुळे हैराण झालो होतो. गाडी सुरू झाल्यावर पहाटे गारवा आल्यावर बाकीच्यांना झोप लागली. प्रवास म्हटला की मला झोप अशी कमीच लागते. वाटेतील ठिकाणो पाहत पहाटे 5 ला थोडी झोप घेऊन सकाळी 8 ला उठलो. अजून मिरज बरेच अंतरावर होते. तेव्हा रेल्वेत फेरफटका मारायला सुरूवात केली. रेल्वेत टाईमपास करायचा असेल तर सर्व रेल्वे डब्यात हिंडून यायला पाहिजे. नानाविध लोक त्यांचे पेहराव, वागण्याच्या त:हा  समजतात व आपला वेळही चांगला जातो. रेल्वेत विक्रेतेही किती प्रकारचे येतात. भेळ, चणो फुटाणा, कैरी, थंड पाण्याची बाटली, कटलेटवाले, कलाकंद विकणारे, वेगवेगळय़ा माळा, चहा, कॉफीवाले असे एक ना अनेक विक्रेतेही टाईमपास करतात. दुपारी 3 वाजता मिरजेला उतरलो. तेथून 4.45 ची महाराष्ट्र एक्सप्रेसने पुण्याचा प्रवास सुरू झाला. रात्री 10.45 ला पुण्यात दाखल झालो.

बाजारपेठ

 बाजारपेठ

              मंदिर परिसरात मोठी बाजारपेठ आहे. यासाठी संपूर्ण इमारत तसेच रस्त्याच्या कडेला ही बाजारपेठ आहे. तिरुपती बालाजीचे, लक्ष्मीचे विविध रुपातील फोटो, किचेन, लायटिंगचे फोटो, फुलमाळा येथे उपलब्ध होतात. 10 रुपयांपासून ते 3500 रुपयांपेक्षा जास्त हे बालाजीचे फोटो उपलब्ध आहेत.

याचबरोबर महिलांचे आकर्षण म्हणजे दागिने, बांगडय़ा, गळय़ातील, कानातील, श्रृंगाराचे साहित्यही येथे विक्रीस आहेत. लहान मुलांची खेळणी, गृहोपयोगी वस्तू, विविध प्रकारच्या पर्स, बॅगा, कपडे, चादरी, साडय़ा, धार्मिक साहित्य, कॅसेटी, विविध प्रकारच्या टोप्या अशा विविध वस्तू पाहताना वेळ सहजच निघून जातो. विशेष म्हणजे येथील दुकानदार आपल्याशी हिंदीतून बोलताना दिसतात. दुकानदारांशिवाय अन्य व्यक्तीशी आपण हिंदीतून अथवा इंग्रजीतून संभाषण केल्यास आपल्याला प्रतिसाद दिला जात नाही. संपूर्ण बाजारपेठेत विविध ठिकाणी एटीएमची सुविधा असल्या कारणाने जवळ पैसे बाळगायची गरज नाही. जवळच तिरुमला तिरुपती देवस्थानचे ग्रंथालय असून, तमिळ, हिंदी, इंग्रजी भाषेतील साहित्य उपलब्ध आहे.


मंदिराकडे जाण्याचा मार्ग

हॉटेल्स / उपाहारगृहे

          महाराष्ट्रातून एवढय़ा लांबवर आलेल्या भाविकांना येथे जेवणाची थोडी अबाळ होताना दिसते. मात्र, आपल्या जेवणातील काहीसा भाग हा साऊथ व नार्थ इंडियन झाल्यामुळे ही गैरसोय दूर होते. मसाला डोसा, उत्तप्पा, इडली, मेदू वडा, मिरचीची भजी, मसाले भात, रस्सम, दही भात, आपल्याला खायला मिळतो. काही हॉटेल्स महाराष्ट्रीयन पदार्थ देताना दिसतात. मात्र, त्याला आपल्याकडील चव नाही. या ठिकाणी चक्क चायनीज व्हेज ही मिळते. फक्त व्हेजच कारण तिरुमलावर नॉनव्हेज खाण्यास बंदी आहे.

मंदिर परिसरातील हॉटेल्स  पाहून आपण नक्की कुठे आलो आहोत? याचा विचार करण्यास भाग पडते. सप्तगिरी रेस्ट हाऊस अथवा कौस्तुभ रेस्ट हाऊस प्रमाणो अनेक रेस्ट हाऊस या ठिकाणी आहेत. मात्र, त्या हॉटेल्समधील जेवण महाग आहे. त्यापेक्षा मंदिर परिसरातील दुकानांमध्ये स्वस्त आहे.


सप्तगिरी रेस्ट हाऊस


भाविकांसाठी विश्रामगृह :

             दररोज हजारोंच्या संख्येने येणा:या भाविकांना राहण्याची सोय येथे माफक दरात उपलब्ध करून दिली जाते. आम्ही कोणतेही बुकींग न करता येथे गेलो होतो. त्यामुळे विश्रामगृह मिळण्यासाठी फार श्रम घ्यावे लागले. मात्र, ऑनलाईन विश्रामगृह बुकिंगची सोय उपलब्ध आहे. सप्तगिरी रेस्ट हाऊस अथवा कौस्तुभ रेस्ट हाऊस प्रमाणो अनेक मोठी विश्रामगृह या भागात आहेत. अनेक धार्मिक संस्थांचीही खासगी विश्रामगृह येथे उपलब्ध आहेत. अ‍ॅडव्हान्स 600 रुपये भरून दिवसाला 100 रुपये व 24 तासानंतर 100 रुपये नंतरच्या 48 तासाला 300  रुपये जादा या दराने ही विश्रामगृह उपलब्ध आहेत. एसी, नॉन एसी, संडास बाथरूम अॅटच असल्यामुळे गैरसोय होत नाहीत. अतिशय माफक दरात असलेल्या या विश्रामगृहांमध्ये दररोज हजारो भाविक राहतात.
प्रति महात्मा गांधीजी

             प्रत्येक पर्यटनस्थळी काही ना काही तरी आर्कषण असते. तिरुमलावर श्रीवारी पादुला व सिला तोरणम् या ठिकाणी महात्मा गांधीजींच्या वेशभूषेतील पुतळा  दिसतो. प्रथम दर्शनी हा पुतळा आहे अशी आपली समजूत होते. जेव्हा लोक त्याच्याबरोबर फोटो काढू लागतात तेव्हा हा पुतळा नसून, अंगावर कलर लावलेला खराखुरा माणूस असल्याचे कळते. विशेष म्हणजे पर्यटक नसतानाही केवळ पोटासाठी हा मनुष्य भर उन्हात अंगावर कपडे, पायात चप्पल नसतानाही पुतळ्यासारखा उभा असतो. लोक मात्र टिंगलटवाळी करत, कधी पुतळय़ाला चष्मा लावून, कधी टोपी लावून, चित्रविचित्र भाव दर्शवत फोटो काढत असतात. पण तरी सुद्धा चेह:यावरील भाव न बदलता, कशाचीही पर्वा न करता केवळ पोटासाठी हे काम करत असतात.

श्रीवारी पादूला :

हे ठिकाणी मुख्य मंदिरापासून अंदाजे 6 किलोमीटर अंतरावर आहे. तिरुमला डोंगरावरील अजून थोडय़ा उंचीवर हे ठिकाण असल्यामुळे उंचावरून मंदिर परिसर सुंदर दिसते. पुरणकथेमध्ये उल्लेख केल्याप्रमाणे भगवान वेंकटेश्वर स्वामींनी या ठिकाणी प्रथम पदस्पर्श केले. याला नारायणगिरी डोंगर असे म्हटले जाते. या ठिकाणी वेंकटेश्वराच्या पादुका ठेवण्यात आलेला आहे. सुमारे 300 पाय:या चढून गेल्यावर हे स्थळ आहे. वरून तिरुमला व बालाजीचे मंदिर दिसते. सुरूचीची झाडे या परिसरात मोठय़ाप्रमाणात दिसून येतात. वाटेत सिलातोरणम् हे पर्यटन स्थळ आहे.

सिलातोरणम् / रॉक गार्डन :

सिलातोरणम् या शब्दात दोन शब्द आले आहेत. सिला म्हणजे दगड व तोरणम् म्हणजे तोरण.  मंदिरापासून सुमारे 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या या ठिकाणी निसर्गाचा चमत्कार पहावयास मिळतो. दगडी तोरण असलेला दगडांचा पूल या ठिकाणी दिसतो. या ठिकाणापर्यंत वाहने जातात. ज्युरासिक कालातील म्हणजे सुमारे 1.5 बिलियन वर्षापूर्वीचे हे पाषाण असल्याचे सांगितले जाते. सुमारे 25 फूट लांब व 10 फूट उंच असा हे तोरण आहे.  त्याच बरोबर अंदाजे 26 फूट उंच दगड छोटय़ा दगडावर उभा असलेला दिसून येतो. तेथून खाली शंकराचे मंदिर आहे.

सिलातोरणम्

आकाशगंगा जलप्रपात

आकाशगंगा जलप्रपात बालाजी मंदिरापासून उत्तरेला  3 किमी. अंतरावर आहे. या पाण्याने तिरुपती बालाजीला स्नान घातले जाते. मे महिन्यात सुद्धा या ठिकाणी चांगले पाणी पहायला मिळते.  त्याचबरोबर मंदिर परिसरात  श्री राधा-कृष्ण, शिव, हनुमान, गणोश आदी देवतांची मंदिरे आहेत. त्याचबरोबर , वैकुंठ, पांडव, जांबली इत्यादी तिर्थे आहेत. या शिवाय श्री वराहस्वामी मंदिर, श्री बेदी अंजनेयस्वामी मंदिर, स्वामी पुष्करिणी, श्री करिया मणिक्यस्वामी मंदिर, श्री चेन्नाकेशवस्वामी मंदिर, श्री वेणुगोपालस्वामी मंदिर, श्री प्रसन्ना वैंकटेश्वरस्वामी मंदिर आदी पर्यटन स्थळे पाहण्यासारखी आहेत.

पाप विनाशम् :

मुख्य मंदिरापासून सुमारे 12 किलोमीटरवर हे स्थान आहे. या ठिकाणी छोटा डॅमही आहे. येथेच सिंहाच्या आकाराच्या मूर्तीतून बारामही पाणी पडत असते. या ठिक़ाणी स्नान केल्यास सर्व पापांचे विनाश होते असे सांगितले जाते.
इस्कॉन मंदिर

तिरुपती शहरापासून सुमारे 3 किलोमीटरवरील अंतरावर हे इस्कॉन मंदिर आहे. लाखो भाविक या मंदिराला भेट देत असतात. मुख्य मंदिर रस्त्यालगत आहे. मंदिर परिसर स्वच्छ व सुंदर असून, मंदिरही सुंदर आहे. श्रीकृष्ण व गोपीका यांच्या सुबक मूर्ती या ठिकाणी आहेत. मंदिरातील नक्षीकाम व काचेच्या फ्रेमवरील चित्रकाम सुंदर आहे.  दर्शन घेऊन झाल्यावर इस्कॉन मंदिरातील धंदेवाईकपणा आपणास कंटाळवाणा ठरतो. कारण परतीच्या मार्गावर धार्मिक ग्रंथ, श्रीकृष्णाचे चित्र असलेले लहान मुलांचे, मोठय़ा माणसांचे कपडे, विविध सुवासिक उदबत्त्या विक्रीस मांडण्यात आलेल्या आहेत. वस्तू पाहिल्यावर नको असल्यास त्या घेण्यासंबंधित प्रचंड आग्रह केला जातो. हा आग्रह नकोसा वाटतो. येथे जेवण्याची सोय होते. श्री पद्मावती मंदिराप्रमाणे याही ठिकाणी प्रसाद म्हणून डाळभात दिला जातो. एके ठिकाणी गाय व वासरू (गोशाला) तसेच अनाथ मुलांच्या संगोपनासाठी दान स्वीकारण्याची व्यवस्था केलेली आहे.


श्री कपिलेश्वरस्वामी मंदिर : 

तिरुपतीमधील हे एकमेव शिवमंदिर आहे. शहरापासून सुमारे 3 किलोमीटर असणा:या हे मंदिर तिरुमलाच्या डोंगराच्या पायथ्याशी आहे. कपिलातीर्थमला धबधबा आहे.  यालाच  अलवर तीर्थम असेही नाव आहे. या मंदिरात  महाशिवरात्रीला उत्साह साजरा केला जातो. आम्ही मे महिन्याच्या अखेरीस गेलो होतो. आश्चर्य म्हणजे मे मध्ये ही येथील धबधबा अटलेला नव्हता. शेजारीच पाण्याचे कुंड आहे. परिसर सुंदर असून, धबधब्यार्पयत जाण्यासाठी डोंगराच्या खालील बाजूस खोदून आकर्षक मार्ग  तयार केला आहे. भाविक लोक या ठिकाणी स्नान करून तिरुपतीच्या दर्शनासाठी जातात. प्रवेशद्वारापाशी मंदिर असून, त्यात त्यात विष्णूच्या मांडीवर बसलेली लक्ष्मीची मूर्ती सुरेख आहे.
श्री पद्मावती समोवर मंदिर

तिरु चनूर अर्थात अलमेलुमंगपुरम : तिरु पति शहरापासून सुमारे 5 किलोमीटर अंतरावर असणा:या या मंदिराला खूप महत्त्व आहे. भगवान व्यंकेटशाची पत्नी पद्मावती हिचे हे पद्मावती मंदिर आहे. बालाजी हे भगवान विष्णूचे रूप असे मानले जाते आणि पद्मावती हे लक्ष्मीचे रूप आहे. बालाजीचे दर्शन झाल्यावर पद्मावतीचे दर्शन घेतले जाते नाहीतर ही यात्र संपूर्ण होत नाही. मंदिरात नारळ घेऊन जाण्यास परवानगी नाही. मंदिरा बाहेर नारळ फोडण्याची व्यवस्था केली आहे. मंदिर मोठे व प्रशस्त आहे. दर्शनानंतर प्रसाद म्हणून वाटीत गरम दहीभात  दिला जातो. शेजारीच 10 रुपयांमध्ये प्रसाद म्हणून लाडू दिला जातो. तिरुमला बालाजी म¨दरातील लाडू व या लाडूचा प्रसाद  वेगळा आहे. शुद्ध तुपातील हा लाडू भाविकाचे नक्कीच पोट भरून जातो. मंदिरा बाहेरील परिसरात धार्मिक वस्तू विक्रीस ठेवण्यात आलेल्या आहेत.तिरुमला तिरुपती देवस्थान (टीटीडी) - भाग १ 


वरील लेख कसा वाटला या विषयी जरूर प्रतिक्रिया कळवा.


3 comments:

Santosh Sutar said...

ब-याचदा असे होते की, आपण एखादे पर्यटन स्थळ पहाण्याची जातो पण त्याच्या जवळच चांगली स्थळंही असतात पण माहिती अभावी आपण ती पहाण्यास मुकतो.... मी तिरुपती ला जाण्याचा प्लॅन करीत होतो म्हणून माहिती काढत होतो... अगदी हवी तशी माहिती आपल्यामुळे मिळाली.... धन्यवाद !

Unknown said...

अतिशय उपयुक्त माहिती मिळाली धन्यवाद

सागर पाटील said...

धन्यवाद

कॉपी करू नका