Thursday, May 16, 2013

‘द ग्रेट मराठा’ महादजी शिंदेंची वानवडीतील छत्री


‘द ग्रेट मराठा’ महादजी शिंदेंची वानवडीतील छत्री

पुण्यात ऐतिहासिक, धार्मिक स्थळे तशी खूप आहेत. अशा ऐतिहासिक स्थळापैकीच वानवडची महादजी शिंदेची छत्री आहे. ‘द ग्रेट मराठा’ म्हणून इंग्रज इतिहासकारांनीही ज्यांची स्तुती केली त्या महादजी शिंदेंची छत्री (समाधी) पाहण्यास  आवर्जुन                     गेलो त्या विषयी....


सकाळी ११ वाजता समाधी मंदिराजवळ पोचलो. गावातील काही मुले येथे क्रिकेट खेळताना दिसली.  प्रवेशद्वारावर ५ रुपये प्रति व्यक्ती तिकीट काढून समोर असलेले मंदिर पाहण्यास निघालो.


महादजींचा मृत्यू पुण्याजवळ    

महादजी शिंदे यांचा मृत्यू पुण्याजवळील वानवडी येथे शके १७१५ च्या माघ शुद्ध १३ रोजी (१२ फेब्रु. १७९४) वयाच्या ६७ व्या वर्षी झाला. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आज पुण्यातील वानवडीजवळ ‘महादजी शिंदे छत्री’ उभारण्यात आली आहे. सुमारे तेरा हजार चौ.मी. क्षेत्रावर समाधी, छत्री व मंदिरासाठी एकूण चारशे चौ.मी.चे बांधकाम केल्याचे दिसून येते. समाधीच्या आतील बाजूने पंधरा फूट उंचीची संरक्षक दगडी भिंत उभारण्यात आली आहे. 
मंदिर परिसर : 

        वानवडीतील या समाधीजवळ येताच प्रथम दर्शनी आपल्याला दिसते ते  मंदिराच्या समोरील छोटेसे मारुतीचे मंदिर. मंदिराचे प्रवेशद्वार पूर्व दिशेला आहे.  या स्मारकाची उभारणी भव्य दगडी चौथºयावर करण्यात आलेली आहे. आवारात घुमट असलेले समाधीचे बांधकाम आहे. ही एक वेगळी छोटीशी चौकोनी इमारत आहे. ही इमारत मात्र बंदच ठेवलेली दिसली. दरवाज्यामधनू आतील समाधीचे दर्शन होते. तेथे महादजींचा मुखवटा ठेवला असून एक घोड्याची मूर्ती आहे. 
        जागेच्या मध्यभागी शंकराचे मंदिर उभारलेले आहे. सुंदर कलाकुसर असलेली ही वास्तू सर्व बाजूंनी कोरीवकाम, नक्षीदार घुमटने सजवलेली आहे.  मुख्य मंदिर १७१५ मध्ये बांधण्यात आले नंतरची वास्तू १९१५ मध्ये वाढविण्यात आली. राजस्थानी शैलीने बांधकाम केलेली ही वास्तू, 'वास्तू-हर' शास्त्रानुसार उभारली आहे. मंदिरावर ऋषी-मुनींचे पुतळे पिवळ्या खडकातून कोरलेले आहेत. तीनही बाजूंनी भव्य नक्षीकाम केलेली बाल्कनी केलेली आहे. या बाल्कनीमध्ये जाण्यासाठी बाहेरच्या बाजूने नक्षीचा लोखंडी जिना केलेला आहे. सध्या येथे जाण्यास परवानगी नाही. मंदिराचा हॉल प्रशस्त असून त्यात महादजी शिंदे घराण्यातील पुरुषांचे पेंटिग्ज लावलेले आहेत. ग्वाल्हेरचे सिंदिया घराण्यातर्फे ट्रस्ट मार्फत या स्थळाची देखभाल केली जाते. मंदिराच्या छतावर चित्रकला करण्यात आली आहे. महादजी शिंदे यांचा बैठ्या स्थितीतला पुतळा, छोटा संगमरवरी नंदी आहे. 

महादजी शिंदे परिचय : 

        महादजी शिंदे यांचा जन्म राणोजींच्या पत्नी चिमाबाई यांची पोटी १२ एप्रिल १७३० मध्ये  झाला. महादजी शिंदे हे मराठेशाहीतील प्रसिद्ध सरदार होते. आपल्या तलावारीच्या बळावर महादजींनी हिंदुस्थानभर दरारा निर्माण केला होता. 
        महादजी शिंदे (सिंधिया) तसेच पाटिल बाबा म्हणून प्रसिद्ध होते. महादजींचे  नाव मराठ्यांच्या इतिहासात मुत्सद्दी सेनानी म्हणून घेतले जाते. शौर्य, मुत्सद्दीपणा, धडाडी, राजकर्ता असे अनेक गुण त्यांच्यात होते. इंग्रजांकडून मानाने यांना 'द ग्रेट मराठा' असे म्हटले जाते. साताºयाजवळील कन्हेरखेड हे त्यांचे मूळ गाव. ग्वाल्हेरचे संस्थान शिंदे यांचे वतनी संस्थान होते. पहिल्या बाजीराव पेशव्यांचे निष्ठावंत सेवक राणोजी शिंदे हे या संस्थानेचे संस्थापक पुरुष होते. महादजी राणोजींचे सर्वात छोटे चिरंजीव. राणोजी इ.स १७५० मध्ये मृत्यू पावले. महादजी शिंदे इ.स. १७६१ मध्ये सत्तेवर आले.भव्य पायदळ, पाचशे तोफा व एक लाख घोडदळ असे महादजी शिंदे यांचे लष्कर होते. पानिपतची लढाई, पुण्याजवळील लोणावळ्यातील वडगावची लढाई सालबादचा तह, बारभाई कारस्थान अशा अनेक घटनांमध्ये त्यांनी महत्त्वाची भुमिका बजावली. पानिपतच्या तिसºया लढाईनंतर मराठा साम्राज्याला उतरती कळा लागली. मराठी साम्राज्याला पूर्ववैभव मिळवून देण्याचे काम महादजींनी केले. इंग्रज, मुघल व स्वकीयांच्या विरुद्ध ते लढले. 
        पानिपतावर झालेला मराठ्यांचा पराभव व त्यानंतर झालेली मराठेशाहीची दुरवस्था याचा कलंक धुऊन काढण्यासाठी महादजींनी आपले जीवन खर्च केले. पुण्यातील लोणावळ्याजवळ असलेल्या वडगावच्या लढाईत महादजींनी ब्रिटिशांच्या  'इष्टुर फाकडा' या सेनानीचा पराभव  केला. भारतात ब्रिटीशांचा झालेला हा एकमेव पराभव आहे.  

महादजींची वर मालिका :

        महादजींच्या आयुष्यावर कथा, कादंबºयांप्रमाणेच टिव्ही मालिका ही तयार झाली. लहानपणी ही मालिका माझ्या आवडीची होती.   दिग्दर्शक संजय खानला यांनी महादजींवर ‘दी ग्रेट मराठा’ ही मालिका काढली. शाहबाज खान, मुकेश खन्ना, परीक्षित साहानी यांनी या मालिकेत काम केले होते. मालिकेच्या व्हिसीडी सुद्धा उपलब्ध आहेत. सुरेश देसाई यांनी लिहिलेले ‘महायोद्धा’ हे पुस्तक सुद्धा छान आहे. 
एकदा तरी या सुंदर ऐतिहासिक स्थळला भेट द्यायलाच हवी.


 

हा ब्लॉग आपणास कसा वाटला या विषयी ४ ओळी प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. 

कसे जाल : 

  • पुणे कँपच्या पलीकडे पुणे मिलिटरी कँपमध्ये एएफएमसी लागते. त्याच रस्त्याने पुढे जातांना डाव्या बाजूला वानवडीसाठी फाटा फुटतो.  तेथे महादजी शिंदे चौक आहे.
  • रेसकोर्सहून हडपसरकडे जातांना बिगबाजारपाशी उजव्या हाताला वळल्यावर तो रस्ता वानवडीमधूनच जातो.
  • पुणे दर्शन बस डेक्कन जिमखाना येथून सुटते. पाताळेश्वर, शनिवारवाडा, टिळक संग्रहालय, पुणे विद्यापीठ, चतु:श्रुंगी, डॉ. आंबेडकर संग्रहालय, केळकर संग्रहालय, सारसबाग, कात्रज सर्प उद्यान, महादजी शिंदे छत्री, महात्मा फुले स्मारक, आदिवासी संग्रहालय, आगाखान पॅलेस अशी दर्शन बस आहे.

  • प्रवेश फी : भारतीयांसाठी ५ रु.  
  • परदेशी पर्यटकांसाठी : २५
  • साप्ताहिक सुट्टी : पुणे दर्शनामध्ये समावेश असल्याने सुट्टी नाही. 

No comments:

कॉपी करू नका