Tuesday, March 12, 2013

श्वास... कोंडतोय माझा...

श्वास.. कोंडतोय माझा...




मानवी शरीरात रक्तवाहिन्या संपूर्ण शरीरात शुद्ध रक्त पुरविण्याचे काम करतात. या रक्तवाहिन्यांना जरा जरी अडथळा निर्माण झाला तर त्याचे भयंकर परिणाम भोगावे लागतात. नद्या या शहरातील रक्तवाहिन्यांसारखेच काम करतात. आपल्या शहरातून वाहणा:या नद्यांची सद्याची परिस्थिती पाहिली असता पुढील काळात कोणत्या भीषण समस्येला तोंड द्यावे लागणार याची कल्पनाच करवत नाही. ही परिस्थिती केवळ एका शहरा पुरतीच मर्यादित नसून, भारतातील सर्वच नद्या वेगवेगळय़ा प्रदूषणाच्या बळी ठरलेल्या आहेत.
             आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळखल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या परिसरातून पवना व इंद्रायणी नदी या दोन मोठय़ा नद्या वाहतात. ‘नदी वाहणो’ म्हणणो आता चुकीचे ठरेल कारण या नदीतील सध्याचे पाणी पाहता ही शहरातील मोठी गटारे आहेत की काय? असा प्रश्न शहरात आलेल्या नवीन माणसाला पडला नाही तर नवलच. आणि ही परिस्थिती भारतातील सर्वच राज्यात दिसते. आपण राहत असलेल्या परिसरातील नदीचे याहून वेगळे चित्र दिसणार नाही. पिंपरी-चिंचवडमधील पवना, इंद्रायणी नद्यांची गणना देशातील सर्वाधिक प्रदूषित नद्या म्हणून होऊ लागली आहे.  त्यामुळे ही नदी ‘नदी’ न राहता ‘गटार’ बनते की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.
            पिंपरी-चिंचवडमधून वाहणारी पवना नदी. जलपर्णी, कचरा, प्लॅस्टिकने, दूषित पाण्याने तिचा श्वास कोंडू लागल्याचे आपण डोळय़ांनी बघतोय. रोजचा कचरा, निर्माल्य, हॉटेलमधील उरलेले अन्न असे बरेच काही आपण यामध्ये टाकून हळूहळू तिचा गळाच घोटतोय नाही का.?  एकमेकांकडे बोट दाखवून आपण आपली जबाबदारी दुस:यांवर किती दिवस ढकलणार आहोत?
            केवळ पवना नदीचे नाव बदलून हा लेख जशाच्या तसा उतरविता येईल. आपले घर स्वच्छ राहावे यासाठी आपण नेहमी प्रयत्नशील असतो. त्याप्रमाणो आपल्या शहरातील नदीही स्वच्छ राहावी यासाठी आपण काय प्रयत्न करतो काय? याचा आढावा घेणारा हा लेख.

पवनेचे उगमस्थान : 

 

 

        पिंपरी-चिंचवडच्या नागरिकांना पवना नदीतून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. यासाठी पवनेवर 1971 मध्ये पवना धरण बांधण्यात आले. पवनेचे उगमस्थान मावळ तालुक्याच्या पश्मिेकडील व रायगड-पुणो जिल्हय़ाच्या हद्दीजवळ आहे. तुंग किल्ला व लोहगडाच्या किल्याच्या खो:यात गेव्हंडे, आतवण, आपटी या गावांच्या हद्दीतून वाहणारा छोटासा पाण्याचा झरा. हे पवनेचे उगमस्थान. पवनानगर म्हणून हा परिसर ओळखला जातो. कालांतराने आजुबाजूचा परिसर हा तर पर्यटकांसाठी ‘पर्यटकांची पंढरीच’ होऊ लागला. तुंग, तिकोना, लोहगड, विसापूर, हाडशी, मुळशीधरण असा सर्व परिसर पर्यटकांना साद देऊ लागला. पवना धरणावर जाऊन बोटींगचा मनसोक्त आनंद घेऊन फोटो सेशन करून मंडळी पुढील वर्षी परत येण्याचा निश्चिय करून घरी परतू लागली.  पावसाळय़ात तर या ठिकाणी पर्यटकांची पंढरीच होऊ लागली आहे. मात्र, या पवना धरणातून वाहणा:या पवना नदीचे पुढे काय होते. हे मात्र, कोणीही पाहत नाही किंवा पाहूनही त्याबद्दल मला काय त्याचे? असा त्रयस्तपणा अंगी बाळगला जातो.

           1990 नंतर पिंपरी-चिंचवडची वाढती लोकसंख्या, वाढते औद्योगिकीकरण यामुळे नदी अस्वच्छतेच्या विळख्यात सापडू लागली.  ही नदी धरणामधून सोडल्या जाणा:या पाण्याच्या प्रवाहानुसार वाहते. पवनेचे पात्र अंदाजे दोनशे फूट रुदीचे आहे. धरणाच्या पायथ्याशी असलेल्या काले कॉलनी, ब्राrाणोली, कोथुर्णे, येळसे, शिवली, कडधे, आर्डव, करंज, थुगाव, बऊर, सडवली, ओझर्डे, शिवणो, उर्से या गावांच्या हद्दीतून पवनेचा प्रवाह सुरू होतो. नैसर्गिक उतार असल्याने उन्हाळय़ातही पाणी वाहत असते.
           पुढे मजल दरमजल करीत पवना पिंपरी-चिंचवड हद्दीत प्रवेश करते. पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणारी पवना नदीची लांबी अंदाजे 25 किलोमीटर. शहरातील किवळे, रावेत, थेरगाव, वाल्हेकरवाडी, चिंचवड, रहाटणी, काळेवाडी, पिंपरी, पिंपळे सौदागर, कासारवाडी, पिंपळे गुरव, सांगवी या भागातून पवना नदी वाहत जाते.
           पवना नदीचा सर्वाधिक प्रदूषित भाग सांगवीत आहे. असल्याचा अहवाल खुद्द महपालिकेनेच दिला आहे. मैला, सांडपाणी, कारखान्यांमधून थेट नद्यांमध्ये घाण पाणी सोडल्यानं पाण्यात रसायनं आहेत. नदीचे पाणी पिण्यायोग्य नसल्याचं आढळून आलंय.

इंद्रायणी नदी

           इंद्रायणी नदी तर महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान. पवने पाठोपाठ इंद्रायणी नदीही प्रदूषित झाली आहे.  इंद्रायणीवर आंध्रा व वडिवळे प्रकल्प आहे. मंगरूळ गावाजवळ आंद्रा हे तीन टीएमसी क्षमतेचे धरण बांधण्यात आले आहे.
           विशेष म्हणजे दोन्ही नद्यांचं प्रदूषण पिंपरी महापालिकेच्या भागातच जास्त आहे.  पुणो जिल्ह्य़ातील लोणावळ्याजवळ नदीचे उगम स्थान पुढे नदी भीमा नदीस मिळते. पिंपरी-चिंचवड शहराच्या तळवडेपासून च:होलीर्पयत इंद्रायणीनदी वाहते.
           तीर्थक्षेत्र असलेल्या देहू व आळंदीतून वाहणा:या इंद्रायणीकडे  तर  पहावतच नाही.  लाखो वारकरी दरवर्षी आषाढी कार्तिकी एकादशीला, तुकाराम बीजेला देहू व आळंदीत जमतात. इंद्रायणीचे ‘तीर्थ’ प्रशान करून मस्तकाला लावतात. हे पाहवत नाही. इंद्रायणीचा सर्वाधिक प्रदूषित भाग देहू व आळंदी दिसून येतो.
इंद्रायणीच्या चिखली ते आळंदी या 18 किलोमीटपयर्ंतच्या पात्रमध्ये पसरलेल्या जलपणीर्मुळे नदी प्रदूषित झाली आहे. इंद्रायणी नदीपात्रमध्ये तळवडे, चिखली, मोशी, डुडळगाव, वडमुखवाडी, च:होली, आळंदी, मोई आदी परिसरातील मानवी मैला व दूषित सांडपाणी, उद्योगधंद्यातून निर्माण झालेले सांडपाणी प्रक्रिया न करता सोडले आहे.

गटाराचे पाणी थेट नदीत

 

           नदीच्या शेजारील लहान-मोठय़ा नाल्यांचे पाणी थेट पवनेत सोडले जाते. काही ठिकाणी सांडपाणी स्वच्छ करून पुन्हा नदीत सोडण्याचे तेवढे काम पालिका करते. वेळोवेळी नदी साफ करण्यासाठी टेंडर काढले जातात. अमाप पैसे ओतून सुद्धा नदी पुन्हा ‘जैसे थै’ परिस्थितीत राहते. पवना नदीची अक्षरश: गटारगंगा झाली असल्याचे दिसून येते. नदीतील गाळाची पातळी दिवसेंदिवस वाढत आहे. करोडो रुपये खर्च करून जलशुद्धीकरण केंद्र उभारूनही घाणपाणी, मैला, सांडपाणी नदीत सोडले जात असल्याने पाण्याला प्रचंड दुर्गंधी येते. वाढत्या प्रदूषणामुळे नदीतील जलचर प्राण्यांची मोठय़ा प्रमाणावर घट झाली. नदीपात्रत मासे मरून पडल्याच्या घटना अनेकवेळा घडल्या आहेत. जलपर्णीचे तर प्रमाण पवनेत प्रचंड प्रमाणात आहे.  जलपर्णीवर तर नवीन लेखच लिहायला हवा. जलपर्णीमुळे डासांचा प्रादूर्भाव वाढला. पवनेकाठच्या लोकांना या जलपर्णीचा डासांच्या स्वरूपात त्रस होऊ लागला आहे. अर्थातच आरोग्यास धोका निर्माण झाला.

 नदी पात्रत टाकण्यात येणारा कचरा


           नदीत मोठय़ा प्रमाणात कचरा टाकण्यात येतो. मात्र पालिकेचे त्याकडे दुर्लक्ष होते. पवनेला प्रदूषण मुक्त ठेवण्याची जबाबदारी महापालिकेची असताना त्याकडे अधिकारी कानाडोळा करतात. नदी प्रदूषित करण्यास जबाबदार असणा:यांवर कारवाई करण्याची मागणी नेहमीच जनमानसातून होते. आपण तरी किती वेळा प्रशासनाला धारेवर धरणार. मी तर घाण टाकत नाहीय ना. मग प्रशासन काय करते. मग आपण कधी नदी पात्रत  घाण टाकणा:या कोणाला तरी कधी आडवले आहे काय? अशा प्रकारे नदी घाण करू नकोस हे चार शब्दतरी त्यांना कोणी सुचविले आहे काय.

साथीचे आजार

           नदीपात्रलगत राहणा:या नागरिकांना अनेक वेळा साथीच्या आजारांना सामोरे जावे लागते. डेंगी, इडीस इजिप्ताय, अॅनबिलीस अशा प्रकारच्या डासांमुळे अनेक रोग निर्माण होतात. इडीस इजिप्तायमुळे डेंगी, चिकुणगुणिया या रोगांचा प्रादूर्भाव वाढतो. तर अॅनिबिलीस या डासामुळे हिवतापसारख्या रोगांचा प्रादूर्भाव होत असतो. डासांमुळे होणारे डेंगी, चिकनगुणिया सारखे महाभयंकर आजारांमुळे महापालिकेचे दवाखाने दरवर्षी भरतात. डासांमुळे रात्रीच्या वेळी तर नागरिकांना घरामध्ये बसणोही कठीण झाले आहे. थवेच्या थवे या डासांचे नदी शेजारील वस्त्यांत दाखल होऊ लागले. अस्वच्छ पाण्यामुळे काविळ, हगवण उद्भवणारे रोग तर अजून महाभयंकर आहेत. नदीपात्रच्या आजुबाजूच्या विहिरींमध्ये हेच मैलामिश्रित पाणी पाझरतं. या विहिरीतील पाणी शेती पिकविण्यासाठी वापर केला जातो. तो हिरवा भाजीपाला आपण खातो.
            मध्यंतरी कोल्हापूर जिल्हय़ातील पंचगंगा नदीकाठावरील सुमारे दीडशेहून अधिक गावांत काविळीची साथ आल्याने पंधरापेक्षा जास्त नागरिकांचा बळी यात गेला. प्रदूषित पाण्याने सुमारे तीन हजार नागरिकांना काविळीची लागण झाली.

पक्षी व इतर जलचर

           थेरगाव येथील केजुदेवीच्या बंधा:यावर पवना नदीत मी लहान असताना मासे पकडायला जायचो. सवय नसल्यामुळे म्हणा अथवा चुकीमुळे मासे पकडले जायचे नाहीत. मात्र, जाळे घेऊन पकडणा:यांना मात्र हामखास मासे मिळायचे. आता मात्र ही परिस्थिती बदलली आहे. एरवी नदी परिसरात नाना प्रकारचे पक्षी विहरत असतात. पवनेच्या उगमापासून काहीच अंतरावर तसं चित्र दिसतंही, पण पुढे मात्र चित्र बदलतं. शेलाटय़ा, पाणकोंबडी, सुतार पक्षी, घारी, कावळे  या जातीचे पक्षी  हे पक्षी नदीतील मासे, कीटक, शेवाळ, खेकडे यांच्यावर जगतात; पण प्रदूषित पवनेत आता यापैकी काहीच उरले नाही. त्यामुळे पक्षी ही कमी झालेले आहे. मध्यंतरी पवना व इंद्रायणी नदीत मासे खूप प्रमाणात मरण पावल्याच्या बातम्या पेपरात आल्या होत्या. मृत माशांचे नमुने प्रयोगशाळेत तपासायला पाठविले गेले. त्यांच्या निष्कर्षानुसार पाण्यातील ऑक्सिजनचं विघटन होण्याचं प्रमाण वाढून ऑक्सिजन कमी झाल्याने हे मासे मेले. नदीच्या प्रवाहामध्ये मासे, कासव, बेडूक व इतर जलचर प्राणी असतील तर नदीचा प्रवाह स्वच्छ आहे, असे म्हणता येते.

पर्यावरण प्रेमी :

           प्रदूषण टाळण्यासाठी पर्यावरण प्रेमींनी वेळोवेळी आवाज उठविला. जनजागृती केली. परंतु महापालिका प्रशासनाला जाग येत नाही. इंद्रायणी बचाव कृती समिती सारख्या पर्यावरण समितीलाही केवळ महापालिकेला विनंत्या करण्यात वेळ घालवावा लागत आहे. त्यांच्याकडून नदी स्वच्छतेबाबत करण्यात आलेल्या सूचनांना केराची टोपली तेवढी मिळती.

अनधिकृत बांधकामे  व पूर नियंत्रण रेषा :

           नदी पात्रच्या जवळ उभारण्यात येणा:या अनधिकृत बांधकामांमुळे तर कधी भराव टाकून नदीचा मूळ प्रवाह बदलण्याचे काम सध्या जोरात सुरू आहे. प्रशासनाला जाग आल्याने थोडे का होईल. सध्या अतिक्रमण काढण्याचा सपाटा महापालिकेने सुरू केला. अशा अतिक्रमणांमुळे नदीचा श्वास कोंडू लागला आहे.
           उन्हाळय़ात नदीपात्र कोरडे तर पावसाळय़ात दुथडी भरून वाहणारी पवना नदी आपले पात्र सोडून आजुबाजूच्या परिसरात मोकाट सुटते. अर्थात यात तिची काही चूक नाही. पिंपरी-चिंचवडची लोकवस्ती वाढू लागली तशी येथील काही लोकांनी संगनमताने नदीपात्रतच बांधकामे करण्यास सुरूवात केली. पाटबंधारे खात्याने वेळोवेळी लालरेषा व निळीरेषा करून नागरिकांना याबाबत सूचित करून दिले. नियंत्रण रेषा ठरवून सीमाभिंत न बांधल्यामुळे नागरिकांत संभ्रम निर्माण झाला. महापालिकेच्या कारभारामुळे अनधिकृत बांधकामे जलपर्णीच्या वाढीच्या वेगापेक्षा फोफावी लागली. नदीपात्रतच बांधकाम करून तर कधी नैसर्गिक नाल्यांवरती भराव टाकून तरी कधी तो बुजवून त्यावर बांधकामे वाढू लागली. त्यामुळे पावसाळय़ात नदी पात्र सोडून परिसरात वा:यासारखी धावू लागली. पावसाळय़ात महापालिका पूर नियंत्रण कक्षाकडून नदी परिसरातील पूर नियंत्रण कक्षेतील लोकांना धोक्याच्या सूचना देऊनही त्याकडे कानाडोळा करण्यात लोक धान्यता मानू लागले. दर पावसाळय़ात नदी शेजारील झोपडय़ांमध्ये पाणी घुसते. मग तेथील लोकांना दुसरीकडे हलविण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. कधी तर अशा वेळी एकादा दुस:या गरीबाला आपला जीवही गमवावा लागतो. पण प्रशासनाला त्याचे काय.

महापालिकेचे दुर्लक्ष

           नदी पात्रत वेगाने वाढणारी पाणवनस्पती ही तर मोठी डोकेदुखी ठरू लागली आहे. जलपर्णीमुळे होणारे डास व त्यापासून उद्भवणारे नाना प्रकारचे रोग यावर पालिकेचा अमाप पैसा खर्च होऊ लागला आहे. गेली तीन, चार वर्षे खासगी संस्थेला जलपर्णी काढण्याचा ठेका महापालिकेने दिला. या ठेकेदारांवर कोणाचा अंकुश दिसून आला नाही. अन्यथा नदी स्वच्छ होऊन वाहती राहिली असती. जमेल तशी जलपर्णी काढायची. काढलेली जलपर्णी नष्ट न करताच नदी शेजारीला काठांवर टाकून द्यायची पावसाळा आला की नदी आपल्याबरोबर शहराने केलेली सर्व घाण पुढे ढकल नेते.  मग काय झाले आपले काम. ‘नेमीच येतो पावसाळा’ या प्रमाणो जलपर्णी, डासांचे प्रमाण वाढले, नागरिकांच्या तक्रारी वाढल्या की महापालिका प्रशासनाला जाग येते. मग तातडीने निविदा उघडून या संबंधी स्वच्छतेचे काम दिले जाते. अनेक कोटय़वधी रुपये या कामाला लागते. पुढे थोडीफार स्वच्छता करून पावसाळा येतो. तोर्पयत दुसरा प्रश्न पूराचा उद्भवतो. मग ही कामे विसारली जातात. याकडे कोणाचेच लक्ष नाही.

जलपर्णी 

 

           पवना नदी, इंद्रायणी नदीच्या पात्रत मुख्य आढळणारी जलपर्णी कोठून आली याचा शोध घेतला.  जलपर्णीचा उगम दक्षिण अमेरिकेतील अम्झोन खो:यातील असा कळला.  पुढे या वनस्पतीचे बी जगभर पसरले गेले. पाण्यात तापमान व प्रकाश पूरक असतील व सोबत नायट्रोजन, फॉस्फरस भरपूर प्रमाणात असेल तेथे जलपर्णीची वाढ दुपटीने होऊ शकते. प्रखर प्रकाश व उच्च तापमानामध्ये ही वनस्पती वाढते. जलपर्णीची वाढ बी मधून होते. पाण्यातील चिखलाबरोबर बी खोलवर जाते. हे रूजलेले पाण्यातील बी वीस वर्षार्पयत तग धरून राहू शकते. यातूनच वारंवार जलपर्णी फोफावते. त्यामुळे पाण्यातील मासे व इतर जलवनस्पतीच्या वाढीवर परिणाम होतो.






जलपर्णीचे तोटे

  • जलपर्णीवर डासांची उत्पत्ती मोठय़ा प्रमाणावर होते.
  • प्रदूषित पाण्यावर ही जलपर्णी फोफावते.
  • जलपर्णीच्या जाड पानांमुळे पाण्याखाली सूर्यिकरणो व ऑक्सिजन पोचू शकत नाही. याचा परिणाम जलचरांवर होतो.
  • पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होतो.





           पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतून पवना तर काही थोडय़ा हद्दीतून मुळा नदी वाहते. खडकीच्या जवळ असणा:या बोपोडीत या दोन्ही नद्यांचा संगम होतो. तेथून पुणे महानगरपालिकेची हद्द सुरू होते.  हिवाळ्यात या दोन्ही नद्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात जलपर्णी निर्माण होते.  पिंपरी-चिंचवडच्या जवळील सांगवी भागात पवना आणि बोपोडीत मुळा नदीत ही जलपर्णी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून अडविण्यात येते. त्यामुळे डिसेंबर पासून मार्च महिन्यार्पयत मोठय़ा प्रमाणात जलपर्णी साठलेली असते. त्यातून डासांचे उत्त्पत्ती होते. परिणामी परिसरातील दापोडी, सांगवी, बोपोडी, पिंपळे सौदागर, कासारवाडी  भागात डासांचा मोठा त्रस सुरू होतो. पवना, इंद्रायणी नदीतील जलपर्णी वेळेत न काढल्याने डासांचा त्रास वाढला आहे
           यावर्षी तर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अधिका:यांनी साठलेली जलपर्णी काढण्याऐवजी पुणो महापालिकेच्या हद्दीतील नदीत तशीच वाहून जाऊन दिली. त्यामुळे मुळा नदीतून ही जलपर्णी पुढे वाहत जाऊन नगर रस्त्यावरील आजुबाजूचा रस्ता, हडपसर मधील काही भागात डासांचा त्रस होऊन डेंगी, मलेरियेचे रुग्ण वाढले. पिंपरी-चिंचवड परिसरातून काढलेल्या जलपर्णी तेथेच नष्ट करणो गरजेचे आहे.
मध्यंतरी महापालिका कर्मचारी पथकाने सांगवीत जलपर्णी काढण्याचे काम सुरू केले. 4 ते 5 दिवस काही काळ काम झालेही मात्र, काम सुरू असल्याचे भावून काम थांबले. ऐन पावसाळ्याच्या आधी महापालिका ठेकेदारांमार्फत काम सुरू करते. पाऊस पडली की ही जलपर्णी प्रवाही पात्रत पुढे निघून जाते. त्यामुळे हा खर्च अक्षरश: पाण्यात जातो.
 
 

‘हा’गावं नदीच्या काठी..’

           प्राचीन काळी नदीशेजारी लोकांनी वस्तीकरून गाव उभारली पुढे तिची शहरे झाली. पवना धरणातून निघालेली पवना नदी काले, ब्राrाणोली, कोथुर्णे, येळसे, शिवली, आर्डव, कडधे, थुगाव या गावांमध्ये आपला पुढील प्रवास करत निघते. ‘हा’गावं नदीच्या काठी..’ या उपमेप्रमाणो ही गावे वसली आहेत. त्यात त्यांची चूक काही नाही. नदीशेजारील गावातून नदीत सांडपाणी, कचरा, धोबी घाट, त्यावर धुतले जाणारे कपडे, पात्रत धुतली जाणारी गाई, म्हशी, जनावरे, गाडय़ा, कारखान्यांमधील कामगारांचे ड्रेस,  अन्य येणारा मैला यामुळे नदी पहिल्या सहा किलोमीटर परिसरातच प्रदूषित होते. स्थानिक ग्रामपंचायतींचे कच:या विषयी अपुरे व्यवस्थापन. नदीपात्नात टाकण्यात येणारा कचरा यामुळे नदीप्रदूषण होत आहे. पवना नदीचा आढावा घेण्यासाठी जेव्हा नदीच्या पात्रलगत निरीक्षण करू लागलो तेव्हा तर पावले जपून टाकावी लागत होती.  कारण ठिकठिकाणी मानवी विष्ठा पसरलेली होती. आपण नदीला पवित्र मानतो तिची पूजा करतो. मात्र, दुसरीकडे तिच्यातच घाण करतो. या घाणीतच काही बायका धुणी-भांडी करत असल्याचे दिसून आले.
           ग्रामपंचायत व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील काही कंपन्यांनी अनेक छोटे कारखाने मावळात उघडले. पोल्ट्रीफॉर्म, पिगरी फॉर्म यासारखे छोटे मोठे फॉॅर्म उभे राहू लागले. रसायनमिश्रीत पाणी प्रक्रिया न करताच नदीत सोडण्याचे प्रमाणही त्यामुळे वाढले. हे पाणी थेट नदीत सोडण्यात आले होते.


बंदीस्त जलवाहिनी

पवना नदीतून बंदीस्त जलवाहिनीतून पाणी पिंपरी-चिंचवड शहराला पुरविणा:या महापालिकेच्या महत्वकांक्षी प्रकल्पामुळे 2011 साली मोठे आंदोलन झाले. स्थानिकांना पाण्याची गरज असताना, तेथील भूमिपुत्रंना डावलून त्यांच्या जमिनी बळकावून त्यांना कवडीमोल दाम देऊन प्रशासनाने हे आंदोलन चिरडून टाकण्याचे प्रयत्न केले. या आंदोलनात मावळातील गरीब 3 जणांचा हाकनाक बळी गेला. अजूनही पवनमावळातील धरणा शेजा:या राहणा:या लोकांना डोक्यावर मोठे पाण्याचे हांडे नेऊन पाणी आणावे लागत आहे. ही परिस्थिती अजूनही धरणातील शेजारील गावात दिसून येते.


  

नदी प्रदूषण रोखण्यासाठी काय उपाय करता येतील :

  • नदी पात्रच्या गावांतील लोकांना प्रथम नदी प्रदूषणामुळे होणारे धोक समाजावून सांगितले पाहिजे.
  • शासनस्तरावर ग्रामपंचायत, जिल्हा परिषद यांच्या बैठका घेऊन महत्व पटवून दिले गेले पाहिजे.
  • नदी परिसरातील लोक यात सामील झाले पाहिजे.
  • प्रथम नदीतील जलपर्णी, गाळ स्वच्छ करायला हवा.
  • नदीत सांडपाणी सोडण्यापासून त्यांना ना थांबवायला हवे.
  • गावात तयार होणा:या सांडपाण्याच्या शुद्धीकरणासाठी योजना राबवयला हव्या.
  • जेमेल तेवढी झाडं नदी काठावर लावायला हवी.
  • परिसरातील होणारी अवैध मासेमारीस बंद करायला हवी.
  • नदीला प्रदूषणमुक्त करण्यासाठी खरे तर लोकांनी एकत्रित येऊन प्रशासनाला, जबाबदार व्यक्तींना जागं करायले हवे.
  • नदीपात्रतील वळू उपाश्यावर कडक र्निबध आणायला हवेत.
  • अवैध बांधकामे, झाडांची कत्तल यावर अंकुश ठेवायला हवा.


            ‘पाणी म्हणजे जीवन’ ही व्याख्या पवनेला लागू पडत नाही. आजचे प्रदूषण थांबविले गेले नाही तर येणारी आपली पुढची पिढी आपल्याला नक्कीच दोष देईल. कदाचित पवना, इंद्रायणी सारख्या नद्या केवळ कागदोपत्रीच उरतील. पवनेकाठी राहणा:या व महानगरपालिकेने नदीचं स्वास्थ्य टिकवण्याची जबाबदारी मनावर घेतल्याशिवाय पवना सुधारणो शक्य नाही.
           नदीला आपण माता म्हणतो. पवनामाई आपणा सर्वांची आई आहे. तिला वाचिवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. सर्वाची तहान भागविणा:या या माईला आपल्या मदतीची गरज आहे. तरच पवना स्वच्छ व निर्मळ राहील अर्थातच त्यामुळे आपले आरोग्यही.

1 comment:

Unknown said...

आपला ब्लॉग पाहिला खूप सुंदर माहिती दिली आहे. नदी प्रदूषणाबाबत लिहिलेला लेखही वाचला छान आहे. याबाबत प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली पाहिजे.

कॉपी करू नका