Sunday, December 30, 2012

ओझर - लेण्याद्री - शिवनेरी - खोडद

वर्षातील शेवटचा रविवार. तो ही सुटटीचा त्यामुळे घरात रिकामे बसणे शक्य नव्हते. कोठे जायचे असा विचार करत असतानाच जुन्नरला अष्टविनायकांपैकी दोन गणपती व शिवाजी महाराजांचे जन्मस्थान पाहण्याचा विचार मनात आला. तसे ही स्थाने यापूर्वी 15 वर्षापूर्वी मित्रंबरोबर व सहलीला गेलो असताना एकदा पाहिली होती. पण आता फारशी आठवत नव्हती. आज रविवार व इच्छा असल्यामुळे आम्ही ओझर, लेण्याद्री व शिवनेरीचा प्रवास करण्याचे ठरविले. त्यानुसार सकाळी 10 ला घर सोडले.  मोशी, चाकण, राजगुरुनगर, नारायणगाव मार्गे ओझर तेथून लेण्याद्री व शिवनेरी व खोडद असा मार्ग होता. त्या विषयी...

थोडा परिचय

जुन्नर शहर प्रसिद्ध आहे ते ऐतिहासिक म्हणून. जवळच असलेला शिवनेरी किल्ला, नारायणगड, हडसर, जीवधन, हरिश्चंद्रगड तसेच अष्टविनायकांपैकी लेण्याद्री, ओझर, तसेच प्राचीन व्यापारी राजमार्ग नाणोघाट हा इथून जवळच आहे. ‘जीर्णनगर’, ‘जुन्नेर’ म्हणजेच जुन्नर हे शहर इसवी सनापूर्व काळापासून प्रसिद्ध आहे. जुन्नर ही शकराजा नहपानाची राजधानी होती. सातवाहन राजा गौतमीपूत्र सातकर्णी याने शकांचा नाश केला आणि जुन्नर व येथील सर्व परिसरावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. नाणोघाट हा पुरातन व्यापारी मार्ग. यावर नजर ठेवण्यासाठी या मार्गावरील दुर्गाची निर्मीती करण्यात आली. सातवाहनांची सत्ता स्थापन झाल्यावर येथे अनेक ठिकाणी त्यांनी लेणी खोदलेली दिसतात. सातवाहनांनंतर शिवनेरीवर चालुक्य, राष्ट्रकूट या राजवटींच्या सत्तेखाली होता. शिल्पकलेचा सुंदर नमुना म्हणजे येथील लेणी! महाराष्ट्राचे विविध भाग अशा सुंदर लेण्यांमुळे समृध्द आहेत. येथील काही लेणी शिवनेरी व लेण्याद्री डोंगरावर कोरलेली आहेत. लेण्यांमध्ये पर्यटकांची गर्दी होते. अनेक स्थळांची माहिती फक्त येथील स्थानिक किंवा ऐतिहासिक पुस्तकांत पाहावयास मिळते.  जुन्नर मध्ये शिरतानांच शिवनेरीचे दर्शन होते. एस.टी स्टॅण्डच्या मागे शिवनेरी किल्ला दिसतो. येथून हा किल्ला चार किलोमीटर आहेत. महाराष्ट्राचे दैवत श्री शिवछत्रपती महाराज यांचे हे जन्मस्थान.


ओझर



 

अष्टविनायकांपैकी ओझरच्या विघ्नेश्वर हा पाचवा गणपती आहे. कुकडी नदीच्या तिरावर हे मंदिर आहे. चिमाजी अप्पा यांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केल्याचा उल्लेख इतिहासात आहे. येथील श्रींची मूर्ती लांब व रूंद असून अष्टविनायकापैकी सर्वात श्रीमंत गणपती म्हणून ओळखले जाते. श्रींच्या डोळय़ात माणिकरत्न असून, कपाळावर हिरा आहे. संकट / विघ्नांचे हरण करतो, म्हणून या गणपतीला विघ्नेश्वर म्हणतात. श्रीविघ्नेश्वराची मूर्ती स्वयंभू आणि पूर्वाभिमुख असून, डाव्या सोंडेची आहे. मंदिराच्या चारही बाजूंना दगडी तटबंदी असून, मध्यभागी हे गणोशाचे मंदिर आहे.  आतमध्ये दोन दीपमाळा आहे. भाविकांना दर्शन घेण्यासाठी या दगडी तटबंदीच्या बाजुने रांगेत उभे राहून दर्शन घेण्यासाठी जावे लागते. सकाळी 5 ते रात्री 11 वाजेर्पयत श्रींचे दर्शन घेण्यासाठी मंदिर खुले असते. गणपतीचा फोटो काढण्यास येथेही बंदी आहे.

गाडी पार्किग येथून ओझर मंदिर.



मंदिराचे प्रवेशद्वार


मंदिरा बाहेरील दीपमाळ.

राहण्याची व्यवस्था : 

मंदिराच्या परिसरात भाविकांना राहण्यासाठी अल्पदरात धर्मशाळेची व्यवस्था आहे. येथे 4 भक्तभवन बांधलेले आहेत. पस्तीस रुपयांला प्रति व्यक्ती, अडीचशे रुपयात पाच व्यक्तींसाठी स्वतंत्र खोली, चारशे रुपयांत डिलक्स खोली उपलब्ध आहे.

ओझर मंदिरा शेजारील भक्तनिवास. परिसरातील दुकाने :

नेहमीप्रमाणो मिळणारे हार, तुरे, नारळ, ओटी भरण्यासाठी लागणारे पुजेचे साहित्य या ठिकाणी मिळते. येथे न वाळणा:या फुलांचे हार मी प्रथमच पाहिले. दहा ते पन्नास रुपयांना हे हार विकतात. हे हार वर्षभर टिकतात. द्राक्षे या भागात जास्त पिकत असल्यामुळे काळे मनुका, मनुका, सुकामेवा या ठिकाणी विकण्यास होता. 

बाजारपेठेत मिळणारा न वाळणारा फुलांचा हार.


बाजारपेठेत मिळणा:या काळय़ा मनुका. (50 रुपये पाव)


मंदिराशेजारील बाजारपेठ.


कसे जावे : 

नारायणगाव तेथून जुन्नरला जाताना उजव्या बाजूला ओझरकडे फाटा फुटतो. तेथून ओझर 7 मैल आहे.  देवाळाच्या अलीकडे  कुकडी नदीवर पूल आहे. ओझर ते नारायणगाव हे अंतर 12 किलोमीटर तर पुणो ते ओझर हे अंतर 85 किलोमीटर एवढे आहे.

लेण्याद्री 

लेण्याद्रीचा डोंगर (मध्यभागी बारीक गुहा दिसत आहेत.)


या ठिकाणी विविध अंतरे दिली आह.

 

अष्टविनायकापैकी सहावा गणपती लेण्याद्रीचा श्री गिरजिात्मक म्हणून ओळखला जातो.  कुकडी नदीच्या परिसरात डोंगरावर हे स्थान आहे.  हा भाग गोळेगाव या गावाच्या हद्दीमध्ये आहे. अष्टविनायकातला हा एकमेव असा गणपती आहे जो डोंगरात एका गुहेत आहे.  लेण्याद्रीजवळच्या या डोंगरात 28 गुहा आहेत. त्यातील 7 व्या गुहेत गिरजिात्मकाचे देऊळ आहे. या गुहेला गणोश लेणी असेही म्हणतात.  लेणाद्रीच्या या लेण्या स्वच्छ आहेत. याचे श्रेय पुरातत्व खात्यास जाते.  प्रत्येकी 5 रुपये असे पुरातत्व विभागाचे तिकीट आहे. देवळात जाण्यासाटी 283 पाय:या चढाव्या लागतात. (दमल्याने एखाद-दोन पाय:यांचा फरक येऊ शकतो)

गिरिजात्मक मंदिर :

लेण्याद्री गणोश लेणी म्हणून ओळखली जाते.  हे देवस्थान लेण्यांमध्ये आहे म्हणून याला लेण्याद्री असे नाव पडले. या मंदिरात कोणत्याही प्रकारचा दिवा लावलेला नाही. फक्त गणपतीच्या समोर लावण्यात आलेल्या समईच्या प्रकाशातच गणपतीचे दर्शन घ्यावे लागते. गणपती असलेल्या मंदिरात फोटो काढण्यास मनाई आहे. मात्र कॅमे:यात चांगली झूम लेन्स असेल तर बाहेरून गर्दी नसल्यास फोटो काढता येतो. हा पूर्ण उंच डोंगर चढून आल्यावर जो थकवा आलेला असतो, तो या मंदिरात आल्यावर व गणपतीचे दर्शन घेतल्यावर पूर्ण निघून जातो. मंदिरात प्रवेश केल्यावर थंडगार वातावरण अनुभवायला मिळते. 283 पाय:या चढून गेल्यावर प्रथम चैत्यगृहाचे लेणो लागते व त्यानंतरच्या मोठय़ा गुहेमध्ये गणपती आहे. मंदिर म्हटले की, खांब, कमानी, मंडप असते, परंतु येथे तसे नाही. साधारणपणो 58 फूट लांब व 58 फूट रुंद या गुहेत हे मंदिर आहे. विशेष म्हणजे मंदिराला इतर अष्टविनायक गणपती मंदिराप्रमाणो कळस नाही. मूर्तीच्या उजव्या व डाव्या बाजूला हनुमान व शिवशंकर हे देव आहेत. पेशवे काळात या मंदिराचा जिर्णोद्धार झाला होता. येथे पाण्याच्या चार टाक्या आहेत. त्या वापरात नाहीत.  या देवालयाच्या सभामंडपाची उंची कमी आहे. मंदिराच्या गाभा:यापुढील सभामंडप मोठा आहे. त्यात कोरलेले पाषाणाचे सहा खांब असलेले दिसतात. बहुतेक सर्व लेण्यांसमोर बसण्यासाठी ओसरी आहे.

चैत्यगृह :



चैत्यगृहातील कोरलेले हत्ती व वाघाची खांबातील शिल्पे.


चैत्यगृहातील कोरलेले हत्ती व वाघाची खांबातील शिल्पे.


मंदिराबाहेरील कोरीव खांब


पोहचण्यासाठी सोय :

अबालवृद्धांसाठी तसेच ज्यांना पाय:या चढता येत नसेल अशांसाठी 500 रुपयांत डोलीतून वरर्पयत नेण्याची सोय आहे. 4 माणसे न थांबता खालपासून वरर्पयत एका दमात तब्बल 283 चढतात. लेण्याद्रीच्या डोंगरावरून समोर शिवनेरी किल्ला दिसतो.

मदिरातून दिसणारा लेण्याद्रीकडे येणारा रस्ता.


मंदिराकडे जाणारा रस्ता. या तब्बल 283 पाय:या आहेत.







चैत्यगृहात पाच खांबांच्या दोन्ही बाजूला  रांगा आहेत.  हे खांब इ. स. पूर्व 90 ते इ. स. पूर्व 300 या या सातकारणी कालखंडातील असल्याची नोंद आहे. या खांबावर नक्षीकाम आहे. त्यात वाघ, सिंह, हत्ती यांच्या शिल्पकृती आहेत. गुहेच्या मध्यावरती प्रार्थनास्थळ कोरण्यात आलेले आहे. ते घुमटाकार आहे. साडेचार फुट उंच जोत्यावर एकसंध कोरलेले आहे.  काही पर्यटक विनाकारण येथे पैसे टाकून काय करतात कुणास ठाऊक.  येथे अष्टकोनी खांबाच्या आहेत. तळाशी व वरच्या टोकाशी जलकुंभाची प्रतिकृति आहे. जलकुंभाच्या वरच्या भागात चक्र ावर वाघ, सिंह, हत्ती यांच्या शिल्पाकृती कोरलेल्या आहेत. छताला अर्ध गोलाकार लाकूडसारख्या कमानी कोरल्या आहेत. चैत्यगृहाच्या मध्यवर्ती घुमटाकार सहा फूट प्रार्थनास्थळ आहे.  अशीच रचना मळवली, कामशेत येथील भाजे व कार्ला लेण्यांमध्येही दिसते.



जायचे कसे :

लेण्याद्री  हा जुन्नरपासून 8 कि.मी. अंतरावर आहे. तर पुण्यापासून सुमारे  97  कि. मी. अंतरावर हे ठिकाण आहे.
शास्त्रनुसार मोरगाव, सिद्धटेक, पाली, महड, थेऊर, लेण्याद्री, ओझर, रांजणगाव आणि शेवटी पुन्हा मोरगावच्या गणपतीचे दर्शन घातल्यावर अष्टविनायकाची यात्र संपते असा क्रम आहे. पण आजकाल यात्र कंपनीवाले वेळेनुसार या क्रमात थोडा बदल करतात.



शिवनेरी

 

शिवनेरी किल्ला समुद्रसपाटीपासून 3500 मीटर उंच असून दक्षिण - उत्तर दीड किलोमीटर पसरलेला आहे. किल्ल्याचा दक्षिणोकडील भाग अर्धगोलाकृती आहे, तर उत्तरेकडे तो निमुळता होत गेला आहे. गडाचा आकार बाणाच्या टोकासारखा निमुळता आहे व त्याचे अगट्रोक उत्तरेकडे रोखलेले आहे.

गडावर जाण्याच्या वाटा :

गडावर जाण्याचे दोन प्रमुख मार्ग जुन्नर गावातूनच जातात. पुणो अथवा मुंबईहून एका दिवसात शिवनेरी , लेण्याद्री व ओझरचा गणपती पाहून घरी परतता येते.

महाराष्ट्र शासनाने गडावर जाण्यासाठी चांगल्या पाय:या बांधून दिल्या आहेत.




सात दरवाज्यातून :

जुन्नर एस.टी स्टॅण्डच्या मागे शिवनेरी किल्ला दिसतो. येथून खासगी वाहन करून किल्यावर येता येते. अंदाजे अंतर 4 किलोमीटर आहे. सिंहगडाप्रमाणो या ठिकाणी वर्पयत चार चाकी गाडी जाते. मात्र या ठिकाणी पार्किगची योग्य सोय नसल्याने रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभे करून गड पाहण्यास जावे लागते. पार्किग मोफत आहे. येथून मुख्य गड दीड ते दोन किलोमीटर पायी चालावे लागते.

साखळीची वाट :

दुसरी वाट साखळीची वाट आहे. या वाटेने गडावर यायचे झाल्यास जुन्नर शहरात शिरल्यानंतर नव्या बसस्टँड समोरील रस्त्याने शिवपुतळय़ाशी यावे लागते. येथे चार रस्ते एकत्र मिळतात. डाव्या बाजूस जाणा:या रस्त्याने साधारणत: एक किलोमीटर गेल्यावर रस्त्याच्या उजव्याकडेला एक मंदिर लागते. मंदिरासमोरून जाणारी पायवाट  शिवनेरी किल्ल्याच्या एका दगडी भिंतीपाशी घेऊन जाते. भिंतीला लावलेल्या साखळीच्या साहयाने आणि कातळात खोदलेल्या पाय:यांच्या मदतीने वर पोहचता येते. ही वाट थोडी अवघड असून गडावर पोहचण्यास पाऊण तास लागतो. बहुतेक लोक पहिल्या वाटेचाच (दरवाज्यातून) उपयोग करतात.


सात दरवाज्यांची वाट :

गडावर येतांना सात दरवाजे लागतात. पहिला महादरवाजा, दुसरा पीर दरवाजा, तिसरा परवानगीचा दरवाजा, चौथा हत्तीदरवाजा, पाचवा शिवाई दरवाजा, सहावा फाटक दरवाजा आण सातवा कुलाबकर दरवाजा या मार्गे किल्ल्यावर पोहचण्यासाठी 1 तास लागतो. हत्ती दरवाजा सोडल्यास इतर दरवाज्यांना दरवाजे नाहीत केवळ कमानी आहेत.

महादरवाजा



पीर दरवाजा


हत्ती दरवाजा


हत्ती दरवाजा


शिवाई दरवाजा


कुलूप दरवाजा


 मेणा दरवाजा

शिवाई मंदिर :

गडात प्रवेश केल्यानंतर साधारणपणो 15 ते 2क् मिनिटे चालल्यानंतर हे मंदिर दिसते. मंदिरासमोर येणोर - कुसुरचे धरण व आजूबाजूचा परिसर दिसतो. मंदिराच्या मागे कातळात 6 ते 7 गुहा आहेत. या गुहा ट्रेकर्ससाठी मुक्कामासाठी योग्य नाहीत. मंदिरात शिवाई देवीची मूर्ती आहे. गडावरील शिवाई देवीच्या नावावरूनच जिजाऊंनी छत्रपतींचे नाव ‘शिवाजी’ ठेवले असे म्हटले जाते.





अंबरखाना

शेवटच्या दरवाज्यातून गडावर प्रवेश केल्यावर समोरच अंबरखाना आहे. अंबरखान्याची मोठा प्रमाणात पडझड झाली आहे.  1485 मध्ये मलिक अहमद या निजामशाहीच्या संस्थापकाने हा गड ताब्यात घेऊन आपली राजधानी उभारली त्याच कालखंडात ही इमारत बांधली आहे. मराठेशाहीत ती इमारत अंबारखाना किंवा हत्ती व घोडय़ांच्या पागेसाठी उपयोगत आणत असत. पूर्वी या अंबरखान्याचा उपयोग धान्य साठविण्यासाठी केला जात असे. अंबरखान्यापासून दोन वाटा निघतात. एक वाट समोरच असणा:या टेकाडावर जाते. या टेकाडावर एक कोळी चौथरा आणि एक इदगा आहे. दुसरी वाट शिवकुंजापाशी (शिवाजी महाराज जन्मस्थान) घेऊन जाते. वाटेत गंगा, जमुना व याशिवाय पाण्याची अनेक टाकी लागतात. गडावर अनेक टाकं आहेत. परंतु काळजी न घेतल्यामुळे इतर किल्यांबरोबरच या किल्ल्यावरील टाक्यांची दुरवस्थाच आहे.

कमानी मशिद :

शिवकुंजासमोरच कमानी मशिद आहे आणि समोरच खाली पाण्याचे एक टाके आहे. येथून समोर चालत गेल्यास हमामखाना लागतो. येथूनच पुढे शिवजन्मस्थानाची इमारत आहे.

शिवजन्मस्थान इमारत :

ही इमारत दुमजली असून खालच्या खोलीत जिथे शिवरायांचा जन्म झाला तेथे पुतळा बसविण्यात आला आहे.  वरती पोहचण्यासाठी 2क् पाय:या चढून वर जावे लागते. ही इमारत सात दरवाजे ओलांडून आल्यानंतर डाव्या हाताला लांबूनच दिसते. तसेच जुन्नर एसटी स्टॅडमधून देखील ही छोटी इमारत पटकन ओळखता येते.  येथे सुंदर महिरप चौकट असून, या चौकटी बसून खालील बाजूने अनेक पर्यटक फोटो काढताना दिसतात. येथून जुन्नर शहर व परिसर दिसतो.









बदामी टाके :

नावाप्रमाणो बदामाच्या आकाराचे हे टाकं आहे.  शिवजन्म इमारतीच्या समोरच हे बदामी पाण्याचे टाकं आहे. येथून पुढे जाणारा रस्ता कडेलोट टोकावर घेऊन जातो. सुमारे दीड हजार फुट उंचीचा या सरळसोट कडाचा उपयोग हा गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी होत असे.  गड फिरण्यास 2 तास लागतात.

शिवकुंज  :

महाराष्ट्र शासनाने किल्ल्यावर एक मंडप बांधला आहे. ‘शिवकुंज’ असे त्याचे नाव आहे. जिजाबाई व तलवार घेऊन बसलेला बाल शिवाजी यांची पंचधातूची मूर्ती आहे. शिवजयंतीला शिवनेरीवर मोठा उत्सव असतो.



शिवनेरी वरून दिसणारा परिसर :

किल्ल्याच्या आसपास बौद्ध लेणी असलेल्या तीन डोंगराच्या रांगा आहेत.  किल्ल्यावरून चावंड, नाणोघाट आणि जीवधन तसेच समोर असणारा वडूज धरणाचा जलाशय दिसतो.

कसे जाल :

  • शिवनेरी-लेण्याद्री-ओझरचा गणपती - खोडदच्या दुर्बिणी ही ठिकाणे पाहावयाची असल्यास मंचर-नारायणगाव-जुन्नर-शिवनेरी नंतर - लेण्याद्री व तेथून ओझर व खोडदच्या दुर्बिणी व परतीचा मार्ग अशा क्रमाने अथवा उलटय़ा क्रमानेही जात येईल.

खोडद

शिवनेरीवरून 5 वा चालायला सुरूवात केली. पाऊण तासात खाली आलो. तेथून नारायणगावला यायला अर्धा तास गेला. संध्याकाळचे 6.30 वाजले होते. खोडदला दुर्बिणी पाहण्याचे मनात होते. वाटेत उसाचे मळे होते. उस कारखान्याला उसाच्या मोळय़ा पोचवून दमलेले बैल व त्यांचे चालक रस्त्याच्याकडेला बसलेले दिसले. संध्याकाळी 7 ला जीएमआरटीला पोचलो मात्र अंधारामुळे तेथून वॉचमनने काहीही पाहता येणार नसल्याचे सांगितले. निराश न होता पुढच्या वेळी प्रथम खोडदला जायचे मनात निश्चित केले. याआधी मित्रबरोबर खोडदला गेलो होतो. त्यावेळी तेथे प्रदर्शन भरले होते.

पुण्यातून येताना नारायणगावला आल्यावर एस.टी स्टँडसमोरून डाव्या हाताला खोडदला जाणारा रस्ता आहे.
जगातील दुस:या क्रमांकाची सर्वात मोठी दुर्बीण असलेले गाव म्हणून खोडद ओळखले जाते. नारायणगावापासून 9 कि.मी अंतरावर आंबेगाव व जुन्नर तालुक्याच्या हद्दीवर मीना नदीच्या काठावर आहे. खोडदच्या अलिकडे डाव्या हाताला जीएमआयआरटी अर्थात Giant Metrewave Radio Telescope 3 किलोमीटरवर आहे.   नारायणगावाहून खोडदला बसने जाता येते. स्वत:चे वाहन असल्यास पुण्यातून येताना प्रथम हे ठिकाण पहावे.
हा प्रकल्प  दुस:या व चौथ्या शनिवारी सगळय़ांना भेटीसाठी खुला असतो. इतर वेळी ग्रुप असल्यास विनंती करून पाहता येते. मे महिन्यात या ठिकाणी सर्वासाठी तीन दिवसांसाठी ग्रह, तारे व अवकाशावर प्रदर्शन असते. तसेच त्यासाठी त्यांच्या बसेस सुद्धा उपलब्ध असतात. या बाबत पेपरमध्ये बातम्या येतात. त्या जरूर पाहव्यात. मीना नदीच्या कडेचा परिसरात उसाचे मळे आणि फुलशेतीने हिरवागार झाला आहे. गावाबाहेर जगदंबा मातेचे भव्य मंदिर आहे. चैत्र महिन्यातील रामनवमीला येथे जगदंबा मातेचा उत्सव भरतो.

5 comments:

Unknown said...

सुंदर छायाचित्रण..!

Unknown said...

खुप मस्त

Unknown said...

महत्वपूर्ण माहिती, खूप खूप धन्यवाद

Siddheshwar Prabhakar Shinde said...

अप्रतिम वर्णन सोबत समर्पक फोटो आणि ऐतिहासिक संदर्भ
सुंदर ब्लॉग बद्दल अभिनंदन आणि धन्यवाद

Unknown said...

Lahaan astanaa aaisobat Narayangaon laa gelo hoto baghu punhaa kadhi yog yeto

कॉपी करू नका