छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) पुण्यापासून सुमारे २३०
किलोमीटर अंतरावरीलऐतिहासिक असे शहर जगाच्या पाठीवर कुठेच नसणारी अशी मानवनिर्मित
शिल्पकृतींचा खजीना असलेल्या या शहराच्या सभोवताली बिबी का मकबरा, पानचक्की, देवगिरी
किल्ला (दौलताबाद), वेरुळ - अजंठा लेणी, घृष्णेश्वराचे मंदिर आहे. वेळेअभावी ही वेरुळ
व अजंठा, देवगिरीतील सर्व ठिकाणे संपूर्ण पाहता आली नाही. हे पाहण्यासाठी किमान ४ ते
५ दिवसांची सोय करूनच हे पाहता येणे शक्य आहे. आम्ही दोन दिवसात या ठिकाणांना भेटी
दिल्या त्या विषयी….
एकसंध खडकातून कोरण्यात आलेलं हे लेणं इ. स. 757 मध्ये राष्ट्रकूट राजवंश नरेश कृष्ण (प्रथम) यांच्या राजवटीत कोरण्यात आलं. एका मोठ्या शिळेला तीन भागांमध्ये वरून खालपर्यंत खोदण्यात आलं. या खोदकामात जवळपास २० हजार टन दगड फोडून वेगळा करण्यात आला. लेणीच्या मध्यभागी जे मुख्य मंदिर आहे त्यामध्ये वरच्या बाजूला एक मोठे शिवलिंग आहे. या शिवलिंगाच्या समोर मोठा महामंडप आहे. या महामंडपात अनेक मोठमोठे, सुंदर कोरीवकाम असलेले स्तंभ आहेत. तर मंदिराच्या छताच्या आतल्या बाजूस भगवान शिवाचं तांडव नृत्य करणारं शिल्प कोरण्यात आलं आहे. मंदिराच्या शिखरावर पाच सिंह कोरण्यात आले आहेत. कैलास मंदिरात प्राणी पूर्णाकृती रूपात पाहायला मिळतात. या संपूर्ण मंदिराची बांधणी एखाद्या रथाप्रमाणे असून हे मंदिर व्याळ आणि हत्ती यांसाख्या प्राण्यांनी डोक्यावर उचललेलं आहे.
राष्ट्रकूट घराण्याच्या ताम्रपटात (आठवे शतक) या स्थळाचा उल्लेख `एलापुर’ असा केलेला आहे. अजिंठा येथील कलापरंपरा हरिषेण या वाकाटक सम्राटाच्या मृत्यूनंतर म्हणजे पाचव्या शतकाच्या अखेरीस खंडित झाली आणि तेथून बाहेर पडलेले शेकडो कलावंत नव्या राजवटीच्या आश्रयाखाली वेरूळच्या लेण्यांवर काम करू लागले, असे एक मत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी भोसले हे वेरूळची पाटीलकी चालवीत होते. अठराव्या शतकात अहिल्यादेवी होळकर (१७५६–९५) यांनी इला नदीच्या काठी घृष्णेश्वर हे ज्योतिर्लिंगाचे मंदिर बांधले. अहिल्यादेवींनी माणकेश्वर मंदिराचा (कैलास लेण्याचा) जीर्णोद्धार करून तिथल्या धूपदीपासाठी वर्षासन बांधून दिले, अशीही माहिती मिळते. आतापर्यंत हे कैलास लेणं प्राचीन काळात तीन वेळा रंगवले गेले. या लेण्यांच्या परिसरात सातवाहनकालीन (इ. स. पू. दुसरे शतक ते इ. स. तिसरे शतक) वास्तूंचे अवशेष सापडल्याची नोंद झाली आहे.
सध्याच्या वेरूळ गावाच्या पश्चिमेला असलेल्या बालाघाटच्या डोंगरात औरंगाबाद-वेरूळ या मार्गावरच लेणी खोदण्यात आलेली असून त्यांची एकंदर संख्या ३४ आहे. अनेक लहानमोठी लेणी या डोंगरात पसरलेली आहेत. मुख्य समूहातील दक्षिणेकडील भागात १२ लेणी असून ती बौद्ध धर्मीयांची आहेत. त्यानंतर १७ लेणी हिंदू धर्मीयांची असून, त्यानंतर उत्तरेकडील ५ लेणी जैन धर्मीयांची आहेत. वेरूळच्या बौद्ध लेण्यांचा प्रारंभ सहाव्या शतकाच्या सुरुवातीस व्यापक प्रमाणात सुरू झाल्याचे दिसते. परंतु त्यातील अनेक प्रकल्प पुरेशा पैशांअभावी इ. स. ६०० च्या आसपास बंद पडले असावेत.
कैलास लेणे :
`आधी कळस मग पाया’ हे वचन ह्या वास्तुरूपात पाहावयास मिळते. क्रमांक १६ चे कैलास लेणे आहे. या लेण्याच्या निर्मितीस राष्ट्रकूटांचा राजा दंतिदुर्ग याच्या कारकीर्दीत प्रारंभ होऊन, पहिल्या कृष्णराजाने (सुमारे ७५६-७७३) त्यास पूर्ण रूप दिले. पुढील राजांच्या काळात या शिवमंदिराच्या ओव्या, सरितामंदिर, लंकेश्वर लेणे, मातृकामंदिर इ. खोदण्यात आली. कैलास लेणे हे शैलमंदिर आहे. या लेण्याच्या कलात्मक आविष्कारात पल्लव-चालुक्यकालीन शैलींची छटा दिसून येते, तसेच विमान, गोपुर इ. घटकांत द्राविड शैली स्पष्ट होते. `माणकेश्वर’ असाही त्याचा उल्लेख सापडतो. सर्वच दृष्टींनी हे लेणे भव्य असून, ते वेरूळचा मुकुटमणी मानले जाते. राष्ट्रकूट राजे शिवोपासक होते. त्यांनी अठरा शिवमंदिरे बांधल्याचा उल्लेख राष्ट्रकूटांच्या कोरीव लेखांतून येतो. वेरूळाप्रमाणेच घारापुरी येथे राष्ट्रकूट राजांनी कित्येक शिवकथा प्रसंग साकार केलेले आहेत. ही लेणी ही राष्ट्रकूट राजांची कलाक्षेत्रातील अनुपम व अतुलनीय देणगी आहे. येथे गुंफांचे साधारण तीन समूह आढळतात. त्यांत अनुक्रमे बौद्ध, हिंदू आणि जैन या धर्मांतील देव-देवतांचे शिल्पाकृती आहे. दक्षिणेला बौद्ध आणि उत्तरेला जैन लेणी असून हिंदू लेणी या दोहोंमध्ये आहेत. राष्ट्रकूटांची कीर्ती धर्म, विद्या, साहित्य आणि कला यांना त्यांनी दिलेल्या आश्रयामुळे अजरामर झाली आहे. लेणी जवळ ऐलोगंगा नावाची नदी वाहते. लेणीस ऐलोरा लेणी असेही म्हणतात.
वेरूळला ३४ लेणीची रचना तीन प्रकारच्या समूहात विभागल्या गेल्या आहेत. १ ते १२ बौद्ध लेण्यांचा समूह असून १३ ते २९ हिंदू लेणी समूह तर ३० ते ३४ जैन लेणी समूह आहेत.
वेरुळचा ही लेणी वरून खाली अशी खोदून तयार करण्यात आली आहे. शिखराची निर्मिती अगोदर, नंतर गाभारा व पायथ्याचा भाग बनवला गेलेली असी अदभूत शिल्प स्थापत्य शैली बघण्यास मिळते. समोरच्या भागात भव्य दरवाजा मंडप असून उंच अशी कोरीव दोन हत्ती व दोन ध्वज स्तंभ दोन्ही बाजूने खडकात कोरलेली आहेत. यातील उजव्याकडील हत्तीच्या मूर्तीची पडझड झाली आहे. दोन्ही ध्वजस्तंभ संपूर्ण परिसरातून आपले लक्ष वेधून घेत असतात.
पावसाचं पाणी मंदिर परिसरात थांबू नये म्हणून ड्रेनेज सिस्टिम बनवण्यात आलेली आहे. त्यामुळे या भागात पाऊस पडला तरी या मंदिरात पाणी थांबत नाही. ते सर्व पाणी या नाल्यांमधून जमिनीच्या आत निघून जातं. लेणीच्या भित्तीवर कोरीव खडकात अद्वितीय शिल्पकला ज्यात गौतम बुद्धांची मूर्ती, भगवान शंकराच्या तांडव करताना असलेल्या अनेक वेगवेगळ्या भावमुद्रा तसेच ब्रम्हा, विष्णू, महेश देवतांचे मूर्ती देखील बघायला मिळतात. रावणाने शंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी कैलास डोक्यावर घेतला त्या प्रसंगाचे शिल्प आहे. भिंतीवर शिल्पात कोरलेल्या या मुर्तीसोबतच वेरूळ लेणीत बौद्ध धर्मीय चैत्यविहार तसेच स्तूप बघायला मिळते.
१९५१ साली भारत सरकारने अति प्राचीन वास्तूंचा ठेवा जपण्यासाठी लेण्यांना ‘राष्ट्रीय स्मारक’ म्हणून घोषित केले. सांस्कृतिक माहितीच्या आधारावर हा ठेवा जपण्यासाठी वेरूळ लेणीस १९८३ साली संयुक्त राष्ट्रांची शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना (UNESCO) युनोस्कोने जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समाविष्ट केले. त्यामुळे जगभरातील पर्यटक येथे येतात. या लेणीला बघण्यासाठी लाखोंच्या संख्येने भारतीय तसेच विदेशी पर्यटक दरवर्षी हजेरी लावतात. वेरूळ लेणीजवळच घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर आहे. त्यामुळे नेहमीच येथे पर्यटकांची वर्दळ बघण्यास मिळते.
खंत : जगभरातून पर्यटक येथे हे वैभव पाहण्यास येत असतात. परंतु हा एवढा अमूल्य ठेवा आपल्या शहरात आहे याचे भान येथील प्रशासनाला बहुदा नसावे. कारण येथे जाणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. वेरुळ ते अजंठा या सुमारे १०० किलोमीटर अंतरावरील रस्त्यामध्ये अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. संपूर्ण रस्त्यात कुठेही लाईटची सोय नाही. वाटेत एकदाच पेट्रोपंप असून, रात्री येथून प्रवास करताना केवळ गुगल मॅपचा आसरा घ्यावा लागतो. मुख्य वळणावर दिशादर्शक फलकांचा अभाव दिसून येतो. रस्त्यावर झालेली दुकानदारांची अतिक्रमणे ही अजून एक डोकेदुखी ठरत आहे. जेणे वाहतुककोंडीस अजून वाढ होते. हे प्रशासनाने सुधारणे गरजेचे आहे.
लेणी पाहण्याची वेळ : सकाळी ६ ते सायंकाळी ६ पर्यंत. (मंगळवारी लेणी बंद असते)
तिकीट दर : ४० रुपये प्रति माणसी.
पाहण्याचा वेळ : साधारणपणे ३ ते ४ तास. (खरे तर शांतपणे ही लेणी पाहण्यासाठी अनेक महिने लागतील.)
हा ब्लॉग आपणास कसा वाटला या विषयी जरुर लिहा.
4 comments:
छान 👍
very nice information.
मस्त
छान
Post a Comment