लॉकडाउनमुळे गेली दोन वर्षे कुठे बाहेर हिंडायला जमले नाही. मात्र, मे महिन्याच्या अखेरीस समुद्रकिनाºयावर हिंडण्यासाठी हरिहरेश्वर- दिवेआगर हे ठिकाण नक्की केले. दोन दिवसांत हा परिसर निवांत पाहून आलो त्या पर्यटनाविषयी....
सकाळी ६.३० ला पुण्याहून ताम्हीणीघाटमार्गे जाण्यासाठी निघालो. वाटेत जोशी वडेवाल्यांकडे नाष्टा करून पुढचा प्रवास सुरू केला. शनिवार व रविवार सोडून प्रवास असल्यामुळे गर्दी नव्हती. नाहीतर या घाटात वाहतुककोंडीमध्येच अडकायला होते. पूर्वी हा घाट रस्ता फारच खराब होता. मात्र, सरकारच्या कृपेने सिमेंटचा पक्का रस्ता तयार झाला होता. काही ठिकाणी दुहेरी वाहतूक होईल असे रस्ते बांधल्याने प्रवास सुखकर होतो. वाटेत कैरी, जांभुळ, करवंदे असा रानमेवा घेऊन आपला उदरनिर्वाह चालविण्यासाठी बसलेली कातकरी माणसं रस्त्याच्या कडेला दिसत होती. चार पैसे मिळतील या आशेने हे लोक येथे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत उन्हात बसलेली असतात. त्यांच्याकडून रानमेवा घेऊन पुढचा प्रवास सुरू केला.
उंचच उंच डोंगर, खाली खोल दरी, वेडीवाकडी वळणे, प्लस व्हॅली पाहत ताम्हीणी घाट मार्गे विले भागाड एमआयडीसीतून हा रस्ता खाली उतरतो. पावसाळयात या ठिकाणी मनमोहक धबधबे असतात. तासगाव, निझामपूर, माणगावमार्गे म्हासळाला पोहचलो. पांगळोली येथून जस्वली मार्गे आम्ही हरिहरेश्वरला गेलो. जस्वली येथून डावीकडे एक रस्ता दिवेआगरला जातो.
दुपारचे १२ वाजले होते. तसे पुणे ते हरिहरेश्वर हे अंतर ३ तासांचे परंतु वाटेत ठिकठिकाणी थांबत गेल्याने वेळ वाढला.
हरिहरेश्वर-
कोकणपट्टीतील एक निसर्गरम्य असे पवित्र तीर्थस्थान. ‘दक्षिण काशी’ म्हणून रायगड जिल्ह्यातील हे ठिकाण ओळखले जाते. एक दोन दिवसांच्या सुट्टीत रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन-हरिहरेश्वर ही गावे पर्यटकांत लोकप्रिय आहेत. वर्षभर या ठिकाणी राज्याच्या विविध भागातून तसेच परराज्यातूनही पर्यटक येतात. एका बाजुला हरिहरेश्वराचा डोंगर तर दुसºया बाजुला समुद्र यामुळे पर्यटन आणि तीर्थक्षेत्र असे दोन्हीही होतात. येथील समुद्रकिनाºयावर पूर्वजांना पिंडदान करण्याचे धार्मिक कार्यक्रम होतात. हरिहरेश्वर, कालभैरव योगेश्वरी, सिद्धिविनायक व हनुमान अशी चार मंदिरे या परिसरात आहेत. तसेच समुद्रकिनारी असणारे गायत्रीतीर्थ, वक्रतीर्थ, विष्णुपद, सूर्यतीर्थ, यज्ञकुंड, विष्णुतीर्थ अशी अनेक ठिकाणे आहेत. मंदिर जरी समुद्र किनाºयावर असले तरी प्रदक्षिणा मार्ग डोंगरावरुन व शेवट समुद्राजवळच्या खडकांवरून जातो. सर्वसाधारणपणे प्रथम काळभैरवाचे दर्शन, नंतर हरिहरेश्वराचे दर्शन घेऊन परत काळभैरवाचे दर्शन घ्यावे अशी येथे प्रथा आहे. या दोन्ही देवळात दर्शन घेतल्यावर कराव्या लागणाºया प्रदक्षिणेचा मार्ग डोंगर आणि समुद्राजवळच्या खडकांवरून जातो. या मार्गावरील शे-दीडशे पायºया खाली उतरून त्या डोंगराची प्रदक्षिणा केली जाते. या संपूर्ण प्रदक्षिणेचे अंतर एक कोस असल्याने तिला कोसाची प्रदक्षिणा असे म्हणतात.
मात्र, आम्हाला ते भाग्य लाभले नाही. मंदिर व्यवस्थापनाने जून ते सप्टेंबर असे ४ महिने हा मार्ग बंद केल्याचा फलक आम्हाला मंदिरासमोरच दिसला. त्यामुळे आमचा हिरमोड झाला. मंदिरात शिवशंकराचे दर्शन घेतले. काही वेळ समुद्राच्या लाटा पाहण्यात गेल्या. प्रदक्षिणा मार्ग बंद असला तरी प्रदक्षिणा जेथे संपते त्या ठिकाणाहून थोडे अंतर जाता येते. मात्र, आम्ही पोहचलो तेव्हा भरती असल्यामुळे हा मार्ग पूर्ण पाण्याखाली गेला होता. दुपारचा १ वाजला होता. भूकही लागली होती त्यामुळे हा नाद सोडून आम्ही जेवाणासाठी मंदिर परिसरात असलेल्या घरगुती हॉटेल्सकडे वळालो. येथे १२० रुपयांना थाळी होती. जेवण करून पुन्हा मंदिर परिसरात असलेल्या कैलासपती झाडाच्या सावलीत बसलो. कैलासपतीचे फुल खूपच सुगंधी, दिसायलाही सुंदर. ओहोटी लागण्यास अजून २ तास होते. दुपारी ४ वाजता ओहोटी सुरू झाली. एव्हना समुद्र सुद्धा शांत होत होता. प्रदक्षिणा संपते त्या मार्गातून काही अंतर आम्ही पार केले.
या ठिकाणी मोठ्या कातळात समुद्राने मोठी कला निर्माण केली आहे. लाखो-कराडो वर्षांपासून येथील कातळाला समुद्राच्या लाटा व वाºयामुळे नक्षीदार जाळी, पॉटहोल्स तयार झाले आहेत. किनारपट्टीच्या धूप प्रक्रियेद्वारे निसर्गाने कोरलेल्या विविध भौगोलिक संरचनांसाठी देखील ओळखले जाते. मात्र, काही ठिकाणी लाटा थेट अंगावर येत होत्या. तेव्हा हा नाद काही परवडण्यासारखा नाही हे समजून आम्ही परतलो. येथे लाटा अति जोरात येतात आणि अनेक वेळा समुद्र खवळल्यासारखा होतो.
एक धोक्याच्या सुचना:
हरीहरेश्वरचा समुद्रकिनारा हा बाहेरुन बघायलाच उत्तम आहे. यात पोहण्यासाठी उतरू नये त्याकरता येथून जवळच असलेला दिवेआगरचा किनारा उत्तम आहे. प्रदशिणा मार्ग भरती व ओहोटीमुळे नेहमीच आकर्षित ठरतो. पण येथील स्थानिकांचा सल्ला ऐकूनच पुढे जावे. कधी जोरदार लाट येऊन कुणाला घेऊन जाईल सांगता येत नाही. त्यात त्त्या खडकात झालेल्या कपारींमुळे जीव वाचण्याची शक्यता शून्य आहे. वर्षभरात या ठिकाणी अनेक पर्यटक मृत्यूमुखीही पडतात.
श्रीवर्धन
श्रीवर्धन हे ऐतिहासिक ठिकाण आहे. 16 व्या, 17 व्या शतकात हे महत्त्वाचे व्यापारी केंद्र म्हणूनही प्रसिद्ध होते. प्रथम अहमदनगरचा निजाम आणि नंतर विजापूरचे आदीलशाह यांनी महत्त्वाचे बंदर म्हणून असलेले महत्त्व ओळखून त्याचा वापर केला होता. पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ यांचे हे जन्मगांव. मात्र सध्या श्रीवर्धन येथील या पेशव्यांच्या पुतळ्याखेरीज येथे काहीही राहिले नाही. श्रीवर्धनचा समुद्रकिनारा प्रेक्षणीय आहे. मात्र, वेळेअभावी मी तो पाहिला नाही.
वेळास किनारा
संध्याकाळी दिवेआगरपासून जवळच सुमारे १५ किलोमीटर असलेल्या वेळासचा किनारा पाहण्यासाठी गेलो. प्रत्येक समुद्रकिनारा हा काही ना काही तरी वेगळेपण जपत असल्याचे दिसते. त्याप्रमाणे वेळासला कासवांचे नैसर्गिक प्रजोत्पादन होते. फार पूर्वी या कासवांच्या अंड्यांची चोरी तसेच खाण्यासाठी त्याचा वापर केला जाई. पर्यावरणप्रेमींनी याला आळा घालत कासवांच्या अंड्यांची जपणू केली आहे. एका मोठ्या दगडावर स्थानिकांनी मंदिर बांधले आहे. ते पाहण्यासारखे आहे.
दिवेआगरला जाताना भरडखोल नावाचे गाव आहे. या ठिकाणी मासेमारी चालते.
दिवेआगर :
हरिहरेश्वरला रामराम करून आम्ही दिवेआगरला जाण्यासाठी निघालो. हे अंतर सुमारे ३० ते ३५ किलोमीटरचे आहे. दिवेआगरला जाण्यासाठी दोन मार्ग जातात. एक शेखाडीगावातून जो समुद्रालगतच दिवेआगरला जातो. तर दुसरा बोर्लिपंचतन मार्गे यात शेखाडीगावातून जाणारा रस्ता पर्यटकांसाठी पर्वणीच ठरतो. कारण एका बाजूला छोटे डोंगर तर दुसºया बाजूला दिवेआगरपर्यंत समुद्रकिनारा असा हा रस्ता आहे. वाटेत श्रीवर्धन, वळवटी, अरवी समुद्रकिनारे आहेत. प्रत्येक किनाºयावर थांबणे शक्य नसल्याने नेत्रसुख घेत आम्ही दिवेआगरला पोहोचलो. आधिच राहायची सोय केली असल्याने जागा शोधण्याची अडचण नव्हती.
दिवेआगर पाहाण्यासारखी ठिकाणे
दिवेआगर नारळ, सुरू आणि सुपारीच्या झाडांनी झाकलेल्या किनाºयासाठी प्रसिद्ध आहे. येथील समुद्रकिनारा शांत आहे. निसर्गाच्या सानिध्यात आराम करण्यासाठी आणि सूर्यास्ताच्या दृश्यांचा आनंद घेण्यासाठी येथे अनेक पर्यटक येतात. सर्व समुद्रकिनाºयावर दिसणारे विविध खेळ जसे बोटिंग, पॅरासेलिंग, बनाना राईडस, घोडेस्वारी आनंद इथे लुटता येतो. येथील सी-फुड म्हणजेच मासे आणि इतर कोकणातील स्थानिक पदार्थ खूपच प्रसिध्द आहे. हे ठिकाण उकडीचे मोदकासाठी प्रसिद्ध आहे. कोकणची खासियत म्हणजे नारळी, पोफळीची बने, आंबा, फणस, सुपारी साठी दिवेआगर प्रसिद्ध आहे. रोठा सुपारीचे या ठिकाणी मोठ्याप्रमाणात उत्पादन केले जाते.
रुपनारायण मंदिर
दिवेआगरला श्री सुवर्ण गणेश मंदिर तसेच रुपनारायण मंदिर प्रसिद्ध आहे. सुवर्ण गणेश मंदिरातील गणपतीच्या सोन्याचा मुखवटा प्रसिद्ध आहे. काही वर्षांपूर्वी येथील मुखावटा चोरीला गेला होता. तो परत मिळाला. मंदिरात सध्या आपल्याला तो पाहायला मिळतो. रुपनारायण मंदिरातील मूर्ती आकर्षक असून, उंच आणि सुबक मूर्ती आहे. ही मूर्ती एकच दगडात कोरलेली आहे. या मूर्तीच्या दोन्ही बाजूला दशावतार कोरले आहेत. मंदिरा बाहेरील विहीरीची रचना देखील सुंदर आहे.
पर्यटनासाठी उत्तम काळ
दिवेआगरला हिंडायला जाण्याचा काळ म्हणजे हिवाळा. हिवाळ्यात येथील तापमान जास्त थंड असते. कारण जून ते आॅक्टोबरपर्यंत पाऊस असतो. तर उन्हाळा प्रचंड गरम आणि दमट असतो. आॅक्टोबर ते मार्च असा कालावधी नक्कीच सुखकारक ठरेल.
कसे पोहचाल :
दिवेआगर या ठिकाणी रस्त्याने तसेच रेल्वे मार्गाने जाता येते. महाराष्ट्र राज्य परिवहनच्या बसेस मुंबई, पुणे, श्रीवर्धन आणि पनवेल येथून दिवेआगरसाठी मिळतात. तसेच स्व:ताचे वाहन असल्यास मुरुड जंजिरा पाहून दिघी येथून जेट्टीने देखील प्रवास करता येतो.
राहण्याची सोय :
समुद्रकिनाºयालगतच्या जवळ असलेल्या बहुतांश ठिकाणी ‘होम स्टे’ अर्थात स्थानिक रहिवाशांच्या घराच्या शेजारी बांधलेल्या रुम्समध्ये पर्यटक राहू शकतात. एसीची सोय, गरम पाण्याची सोय या ठिकाणी असते. तसेच पुणे-मुंबईकडच्या धनाढ्य लोकांनी येथील जमिनी विकत घेऊन त्यावर अलिशान हॉटेल्स देखील बांधलेली आहेत. अर्थात त्यामध्ये राहण्यासाठी चांगलेच पैसे मोजावे लागतात. ‘होम स्टे’मध्ये १५०० ते २००० असे दर आकारले जातात. अर्थात पर्यटन काळात हे दर कमी जास्त होऊ शकतात. अनेक घरातून निवासाची तसेच भोजनाची सोय होऊ शकते. गाव छोटे असल्याने मोजकीच हॉटेल्स आहेत.
2 comments:
छान 👌👌👌
छान
Post a Comment