Friday, November 16, 2018

बारा मोटांची विहिर
सर्वसाधारपणे विहीर म्हटली की आपल्या डोळ्यापुढे गोल आकाराची सुमारे १५ फुट व्यास असलेली व १०० फुट खोल अशी वर्तुळाकार आकार डोळ्यासमोर येतो. एक रहाटाने पाणीवर ओढण्यासाठी तजवीज केलेली असते.  पण सातारा शहराच्या उत्तरेस १३ किमी अंतरावर कृष्णानदीच्या तीरावर लिंब नावाचे गाव आहे. या गावात बारा मोटेची अष्टकोनाकृती आणि शिवलिंगाकृती विहीर आहे.  सातारा जिल्ह्यातल्या लिंबगावात सुमारे ३०० वर्षे जुनी बारामोटेची विहीर  आहे. इ.स.वी.सन. १७१९ ते १७२४ या दरम्यान छत्रपती शाहूमहाराजांची पत्नी वीरुबाई यांनी ही अष्टकोनी दगडी विहिर बांधल्याचं सांगितल जाते. सुमारे १०० फूट खोल आणि ५० फुट रुंद असा या विहिरीचा आकार आहे. विहीरीचे बांधकाम हेमाडपंती आहे. विहीर बांधताना दगड एकमेकांना जोडण्यासाठी चुना सिमेंट अशा कोणत्याही गोष्टीचा वापर केला नाही. संपूर्ण दगडातून अतिशय कोरीव शिल्प उभं केलं आहे.  येथील स्थानिकांसाठी पाण्याचा एक चांगला मार्ग आहे. शाहूमहाराजांनी येथे ३३०० आंब्याची कलम लावून इथे मोठी आमराई तयार केली होती. 
या विहिरीच्या वर राजमहाल बांधलेला आहे. या विहिरीतूनच चोरवाटेने या महालाकडे जाणाºया दगडी पायऱ्या आहेत. या महालाला मध्यभागी चार खांब आहेत, प्रत्येक खांबावर वेगवेगळीशिल्पे कोरलेली आहेत.  विहिरीच्या भिंतीवर व्याल आणि शलभ शिल्पे कोरली आहेत.  व्याल म्हणजे वाघाचे तोंड आणि सिंहाचं शरीर. ही शिल्पे राज्याची समृद्धी आणि पराक्रम सांगतात. विहिरीच्या दक्षिणकडील भिंतीवर ४ हत्तींवर आरूढ झालेल्या वाघाचं शिल्प हे मराठ्यांचे दक्षिणेतील  वर्चस्व प्रदर्शित करते आणि उत्तरेकडे असलेली झेपावणारी व्याघ्र शिल्पं पुढच्या उत्तरेकडील मोहिमेचा संकेत देतात. 


विहिरीत सुरुवातीला उतरतानाच मोठी दगडी कमान दिसते. उतरायला दगडी पायºया आहेत. कमानीतून उतरल्यानंतर आपण उप विहिरीत जातो. उप विहिरीला तळापर्यंत जाणाºया पायºया आहेत.  अष्टकोनी विहीरीच्या प्रत्येक कोनात नागदेवतेची मूर्ती आहे. विहीरीतील वरील बाजूच्या छोट्याश्या जागेत कमळ, हत्ती, गणपती, मारुती ही शुभ चिन्हं कोरली आहेत. महालाच्या दुसºया मजल्यावर जाण्यासाठी दोन चोरवाटा आहेत. विहीर आणि तिच्यावर बांधलेला महाल हा शिवकालीन स्थापत्यकलेचा एक उत्तम नमुना म्हणता येईल. मुख्य विहीर अष्टकोनी असून जोडून आयताकृती दुसरी विहीर तयार केली आहे.  या दोन्ही विहिरींना जोडणारी दुमजली इमारतीमध्ये एक महाल आहे. 
या विहिरीवर १५ मोटांची जागा आहेत. पण, प्रत्यक्षात १२ मोटाच सुरू होत्या.   यावरूनच या विहिरीला बारामोटेची विहीर हे नाव पडले असावे.  विहिरीतील पाणी खेचण्यासाठी बैैलांच्या जोडीचा वापर केला जाई. त्या गाडीची दगडी चाके अजूनही आहेत.  इतिहासातील अनेक घटनांची साक्षीदार असणारी ही बारामोटची विहीर आवर्जून पाहायला हवी. सदरची जागा साताºयाचे उदयनराजे भोसले यांची ही खासगी मालमत्ता असल्याचा फलक ही या ठिकाणी आपणास पहावयास मिळतो. 

विहीरीच्या बाहेर स्थानिकांनी घरी तयार केलेली सेंद्रीय हळद, कांदा, कडधान्ये, पालेभाज्या, सातारातील गरम मसाला, कांदा लसूण मसाला, ओली हळद आदी वस्तू पर्यटकांना स्वस्त दरात विक्रीसाठी ठेवलेल्या आहेत.कसं जावे : 

  • पुण्याहून साताºयाला जाताना साताºयाच्या अलीकडे नऊ किलोमीटरवर लिंबफाटा आहे. तिथून तीन किलोमीटरवर आत ही विहीर आहे.रस्ता डांबरी असला तरी ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. 
  • तिकीट : १० रुपये प्रति व्यक्ती असे तिकीट आहे.   


No comments:

कॉपी करू नका