Sunday, November 22, 2015

पुण्यनगरीचा मानबिंदू - सिंहगड

22/11/2015

दिवाळीची सुट्टी संपत आली होती. मुलाला पायी किल्ला चढण्याचा अनुभव देण्यासाठी सिंहगडावर जाण्याचे ठरले. यावर्षी  त्याच्या इतिहासाच्या पुस्तकात तानाजी मालुसरेंवर असलेला धडा असल्याने अनायासे ती जागा प्रत्यक्ष पाहून ही होईल व त्याचे पदभ्रमणही होईल यासाठी सिंहगडावर जाण्यास निघालो त्याविषयी....पुण्यनगरीचे दोन मानबिंदू एक म्हणजे शनवारवाडा व दुसरा किल्ले सिंहगड. पुण्यातून नैऋत्य दिशेला उंच आकाशात दिसणारा व आकाशवाणी केंद्राचे दोन टॉवर असलेला किल्ला म्हणजे सिंहगड. सिंहगडाबाबत काहीजणांना लहानपणी शाळेतील शिकलेला ‘गड आला पण सिंह गेला’ या धड्यातील यशवंती घोरपड व ‘आधी लगीन कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचं’ असे म्हणणारा तानाजी मालुसरे आठवतो. पण या शिवाय जास्त काही सिंहगडाविषयी सांगता येत नाही. मात्र, एन्जॉय म्हणून मित्रमैत्रिणींसोबत, पिकनिक स्पॉट, एक दिवसाचा चेंज, थ्रील अनुभवण्यासाठी दुचाकी अथवा चारचाकीवरून उगाच आपण काही तरी जगावेगळे पाहत आहोत. याचा प्रत्याय आणून देतात. हल्ली सुट्टीच्या दिवशी घराबाहेर तेही निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन येण्याचे वेड वाढू लागले आहे. खरेतर सिंहगडावर वर्षभर पर्यटक येत असतात, पण पाऊस सुरू झाला, की तो जास्तच वाढतो. पुण्यापासून जवळ असलेल्या सिंहगडावर ऐरवी सुट्टीच्या दिवसा खेरीज सुद्धा हजारोजण किल्यावर ये-जा करत असतात.  त्यात पुणे परिसरातील विशेषत: बाहेरून येणाºया कॉलेज तरुण-तरुणींचा भरणा अधिक असतो हे सांगावयास नकोच. पानशेत धरण, खडकवासला, सिंहगडचा परिसर या कॉलेजकुमारांनी व्यापून गेलेला असतो. अनेकजणांना  केवळ एन्जॉयमेंट करण्यासाठी या स्थळाचा वापर करताना पाहून चिडही येते. मोठमोठ्यांदा मोबाईलवरील गाणी वाजवत, टिंगलटवाळ्या करत ही मंडळी किल्यावर भटकताना दिसतात. वेगवेगळ्या दरवाज्यांजवळ सेल्फी काढून ही मंडळी जणूकाही आपणामुळे या स्थळाचे महत्व वाढते आहे हे इतरांना मेसेज पाठवून करतात. असो...

पुण्याहून अवघ्या २४ किलोमीटरवर हा सिंहगड किल्ला आहे. सह्याद्रीच्या पूर्व रांगेवर पसरलेल्या भुलेश्वराच्या रांगेवर हा किल्ला आहे.  गडाच्या पायथ्याजवळील आतकरवाडीतून वर चढणारी पायवाट आहे. पण ज्यांना गड चढायचा त्रास  नको अशांसाठी गोळेवाडीतून एक सोपी घाटवाट चांगल्या डांबरी रस्त्याने आपणाला थेट गडावरही पोहचवते. याशिवाय सह्याद्रीतील अस्सल ट्रेकर्स कात्रज-सिंहगड, कोंढणपूर-कल्याण-सिंहगड, खानापूर-सिंहगड, सिंहगड-राजगड-तोरणा अशा गडांवरून ही यात्रा पूर्ण करतात.
आम्ही सकाळी ९ ला पायथ्यापाशी आतकरवाडीला पोहचून सिंहगडाची वाट चढण्यास सुरूवात केली. जसजसे वर चढू लागतो तस तशी घरे, शेती, रस्ते छोटे होऊ लागले. आजुबाजुचे  हिरवे रान, डोंगर, त्यावरील ऊन-सावलीचा खेळ, सुसाट वारा व धुके याचा अनुभव घेत सिंहगडाचे हे राजबिंडे रुप मनात साठवत आम्ही पुढे जात होतो. वाटेत दूर दिसणारी वाहने व रस्ता पाहून मुलाने मला विचारले,‘‘बाबा यापेक्षा आपण गाडीने वर आलो असतो तर लवकरच पोहचलो असतो ना’’? या प्रश्नाचे उत्तर मी केवळ ‘हो ना’ असे म्हणत टाळून नेले. मुलाला गड, किल्यांची आवड निर्माण व्हावी हाच उद्देश. मुलाने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत तासाभरात आम्ही गडमाथ्यावर दाखल झालो. काल अचानक रात्री थोडा पाऊस पडून गेल्याने अनेक ठिकाणी माती ओली होती. त्यात ढगाळ वातावरणाने थकवा जाणवला नाही. पुणे दरवाज्याच्या परिसरात पर्यटकांचा जथ्था पाहून आज रविवार व सुट्टीचा दिवस असल्याने गर्दी झाल्याचे लक्षात आले. आम्हीही याच गर्दीचा एक भाग होऊन संपूर्ण किल्ला पाहण्यासाठी निघालो. संपूर्ण किल्ला मुलाला दाखवून पिठलं भाकरीचा आस्वाद घेत दुपारी ४ला किल्ला सोडला. ऐव्हाना गडगडाट होऊन पाऊस येण्यास सुरूवात झाली.

सिंहगडाविषयी : 

 

सिंहगडावर प्रवेश करण्यासाठी प्रथम पुणे मार्गाने गेल्यास तीन दरवाजे लागतात.  दोन दरवाजे मराठेशाहीतील तर तिसरा यादवकाळातील. या तिसऱ्या दरवाज्यावरील नक्षीकाम कमळांची रचना हे त्याचे पुरावे. विशेष म्हणजे पुणे दरवाज्याचे चित्र टपाल तिकीटावरही आले आहे. पुढे थोड्या अंतरावर लिहलेला घोड्यांची पागा हा फलक दिसला. खरे तर हे कातळात खोदकाम करून केलेली सातवाहन कालीन लेण. मधोमध खांब सोडलेल्या खोल्या, आतमध्ये बसण्यासाठी ओटे, समोर मोकळे प्रांगण ही सारी विहाराची रचना. पण कुणाच्यातरी डोक्यात घोड्याची पागा अशी कल्पना आली आणि ती रुढही झाली. खरे तर घोड्याची उंची पाहता या ठिकाणी घोडा कसा बांधता येईल याचेच आश्चर्य वाटते. अशाच पद्धतीची दोन खोदकामे वाटेत गणेश टाके आणि देव टाक्याच्या पाठीमागे एका भूमीलगत टाक्यातही दिसतात. हा गड किमान दोन हजार वर्षांपासून असावा असा अभ्यासकांचा अंदाज आहे.  तर अशा या गडाचे प्राचीनकाळी नाव होते कौंडिण्यदुर्ग. कौंडिण्यऋषींच्या वास्तव्यावरून हे पडले असावे. पुढे यादवकाळात या जागी मंदिर बांधले गेले. अपभ्रंश होत या कौंडिण्यदुर्गचा झाला ‘कोंढाणा’ यातूनच गडाखालच्या गावालाही नाव मिळाले कोंढणपूर.  येथून पुढे समोरच दारुकोठार आहे तिथून पुढे काही अंतरावरच गणेश टाके आहे. आणखी पुढे गेल्यावर डाव्या हाताला किल्लेदाराच्या वाड्याचे अवशेष आहेत. येथून अमृतेश्वर मंदिराकडे जाताना उजव्या हाताने टिळकांच्या बंगल्यापाशी जाता येते. स्वातंत्र्यप्राप्ती आधी सिंहगडावर लोकमान्य टिळकांचा सहवासही लाभला आहे.  बंगल्याच्या मागच्या बाजूलाच  राजाराममहाराज यांची समाधी आहे. ३ मार्च १७०० ला त्यांचा इथे मृत्यू झाला होता. किल्यावरील अमृतेश्वर भैरवाचे मंदिर सगळ्यात जुने मानले जाते. काहीच अंतरावर आहे देवटाके. संपूर्ण किल्यावरील हा एकमेव पिण्याजोग पाणी. या देवटाक्यापासून उजव्या हाताने नरवीर तानाजी मालुसरे च्या समाधीपाशी पोहोचतो. देवटाक्याकडून सरळ खाली गेले की कल्याण दरवाजा लागतो.   येथून कल्याणपूर या गावात उतरता येते. कल्याण दरवाज्यावरून तसेच पुढे गेले की आपण झुंजार बुरुजाकडे जातो. या  भागातील तटबंदी अजून चांगल्या स्थितीत आहे. तेथून पुढे डोणागिरीचा कडा पाहून गडाला प्रदक्षिणा पूर्ण होते.

इतिहास व ठळक घटना

सिंहगडाचे आधीचे नाव कोंढाणा. पूर्वी हा किल्ला आदिलशाहीत होता. मराठे, मुघल व आदिलशाही या तीन सत्तांमधे हा सिंहगड अनेक वेळा फिरला. सन १६४८-४९ मधे शहाजीमहाराजांच्या सुटकेसाठी हा गड आदिलशाहला द्यावा लागला. इ.स. १६४९ मध्ये शहाजी राजांच्या यांच्या सुटकेसाठी शिवाजी राजांनी हा किल्ला परत आदिलशहाला दिला. पुरंदरच्या तहात जे किल्ले मोगलांना दिले त्यामध्ये कोंडाणा पण होता. मोगलांतर्फे उदेभान राठोड हा कोंडाण्यावरचा अधिकारी होता.  शिवाजी महाराज जेव्हा आग्राहून सुटून परत आले तेव्हा त्यांनी दिलेले गड परत घ्यायला सुरुवात केली. शिवाजीमहाराजांचे विश्वासू सरदार आणि बालमित्र तानाजी मालुसरे आणि त्यांच्या ५०० मावळ्यांनी हा किल्ला एका चढाई दरम्यान जिंकला. माघ वद्य नवमी दि. ४ फेब्रुवारी १६७२ च्या रात्री हे युद्ध झाले. या लढाईत तानाजींना वीरमरण आले आणि प्राणाचे बलिदान देऊन हा किल्ला जिंकल्यामुळे शिवाजी महाराजांनी ‘गड आला पण सिंह गेला’  असे गौरवोद्गार काढले. शिवरायांच्या निधनानंतर हा गड कधी मोगलांकडे तर कधी मराठ्यांकडे राहिला. यामध्येच एक जुलै १६९३ मध्ये नावजी बलकवडे आणि विठोजी कारके या मराठावीरांनी तानाजींच्या पराक्रमाची पुनरावृत्ती करत गड जिंकला. छत्रपती राजाराममहाराजांच्या मृत्यूनंतर दोनच वर्षांनी औरंगजेबाने सिंहगड पुन्हा जिंकला आणि त्याचे नाव ठेवले ‘बक्षी-दा-बक्ष’! याचा अर्थ दैवी देणगी. पण औरंगजेबाची ही देणगी त्याच्याकडे दोनच वर्षे राहिली. मराठ्यांनी पुन्हा हा गड जिंकला आणि तो १८१८च्या पेशवाईच्या अखेर मराठे-इंग्रज लढाईपर्यंत त्यांच्याकडेच राहिला. शेवटच्या लढाईनंतर इंग्रजांनी हा गड घेतला. त्या वेळी इंग्रजांना गडावर ६७ तोफा, त्यांना पुरेल एवढा दारूगोळा, जडजवाहीर, दागिने, मौल्यवान वस्तू आणि रोख रक्कम असा मोठा खजिना मिळाला.  पुढे अनेक दिवस हे इंग्रज गडावरील ही लूट टोप्यांमध्ये भरभरून आणून पुण्याच्या बाजारात विकत होते.

सिंहगडावरील माहिती फलकानुसार

सध्या फलकाची दुरवस्था झाली आहे. 

‘‘सिंहगडाचे मूळचे नाव कोंढाणा, इसामी नावाच्या कवीने फुतुहस्सलातीन किंवा शाहनामा-इ-हिंद या फार्शी काव्यात (इ. १३५०) महमद तुघलकाने इ.१६२८ मध्ये कुंधीयाना किल्ला घेतल्याची माहिती येते. त्यावेळेस हा किल्ला नागनायक नावाच्या कोळ्याच्या ताब्यात होता. अहमदनगरच्या निजामशाही कारकिदीर्तील कोंढाण्याचे उल्लेख इ. १४८२, १५५३, १५५४ व १५६९ च्या सुमारसचे आहेत. इ.१६३५ च्या सुमारास कोंढाण्यावर सिदि अवर किल्लेदार असताना मोगल व आदिलशाह यांनी मिळून कोंढाणा घेतला. यावेळेस (इ.१६३६) आदिलशाहचा खजिना डोणज्याच्या खिंडीत निजामाचा सरदार मुधाजी मायदे याने लुटला.
शहाजी राज्यांच्या काळात सुभेदार दादोजी कोंडदेव मालवणकर यांच्या ताब्यात कोंढाणा असल्याचा उल्लेख आदिलशाही फर्मानात आहे.
दादोजी कोंडदेव आदिलशाहीचे नोकर असले तरी ते शहाजी राजांशी एकनिष्ठ असल्याने शिवाजी राजांनी त्यांच्या मृत्यूपर्यंत (इ.१६४७) कोंढाणा घेण्याचा प्रयत्न केला नाही. त्यानंतर लगेचच हा गड राजांनी ताब्यात घेतला.
इतिहासकार श्री.ग.ह. खरे यांच्या मते तानाजी प्रसंग घडण्यापूर्वीच कोंढाण्याचे नाव 'सिंहगड' झाल्याचे कागदोपत्री पुरावे आहेत. कै.ह.ना. आपटे यांच्या कादंबरीतील मात्र तानाजी प्रसंगानंतर या किल्याचे नाव सिंहगड झाले असा उल्लेख आहे. शिवाजी राजांच्या काळात व त्यानंतर हा किल्ला कधी मराठ्यांकडे तर कधी मोगलांकडे ताब्यात होता.

या युद्धाबाबत सभासद बखरीत पुढीलप्रमाणे उल्लेख आढळतो : 

‘‘तानाजी मालुसरेंनी ‘कोंडाणा आपण घेतो. असे कबूल करून वस्त्रे, विडे घेऊन गडाचे यत्नास  ५०० माणूस घेऊन गडाखाली गेला आणि दोघे मावळे मदार्ने निवडून रात्री गडाच्या कड्यावरून चढवले. गडावर उदेभान रजपूत होता त्यांस कळले की, गनिमाचे लोक आले. ही खबर कळून कुल रजपूत कंबरबस्ता होऊन, हाती तोफा-बार घेऊन, हिलाल (मशाल), चंद्रज्योती लावून बाराशे माणूस तोफाची व तिरंदाज, बरचीवाले चालून आले. तेव्हा मावळे लोकांनी फौजेवर रजपुतांचे चालून घेतले. मोठे युद्ध एक प्रहर झाले. पाचशे रजपूत ठार झाले. उदेभान किल्लेदार खाशा त्यांशी व तानाजी मालुसरे सुभेदार यांशी गाठ पडली. दोघे मोठे महाशूर, एक एकावर पडले. तानाजीचे डावे हातची ढाल तुटली. दुसरी ढाल समयास आली नाही. मग तानाजीने आपले डावे हाताची ढाल करून त्याजवरि वोढ घेऊन, दोघे महारागास पेटले. दोघे ठार झाले. मग सूयार्जी मालूसरे (तानाजीचा भाऊ) याने हिंमत धरून, कुललोक सावरून उरले राजपुत मारले. माघ वद्य नवमी दि. ४ फेब्रुवारी १६७२ च्या रात्री हे युद्ध झाले. ’’

पहाण्यासारखी ठिकाणे :

दारूचे कोठार : 

तिसऱ्या दरवाजातून आत शिरताच डाव्या हातास दारू गोळ्याचे कोठार लागते. गडावर आज टिकून असलेली ही एक इमारत. या कोठारावरच ११ सप्टेंबर १७५१ रोजी वीज पडून गडावर मोठा स्फोट झाला होता. त्यावेळच्या फडणीसांचे घर उध्वस्त होऊन सर्व माणसे मरण पावली होती.  याच्या दुरुस्तीसाठी ८७०० रुपये खर्च पडल्याचीही नोंद आहे. पुढे याच इमारतीत ब्रिटिशांनी काही काळ चर्चही थाटले होते.

लोकमान्य टिळक बंगला : 

 रामलाल नंदराम नाईक यांच्याकडून खरेदी केलेल्या जागेवरच्या ह्या बंगल्यात बाळ गंगाधर टिळक येत असत. टिळक १८८९ मध्ये गडावर राहण्यास आले. इथल्या निसर्गरम्य एकांतात त्यांनी ‘आर्क्टिक होम इन वेदाज’ हा ग्रंथ आणि ‘गीतारहस्य’ची मुद्रणप्रत तयार केली.   टिळक आणि महात्मा गांधीजींची भेटही येथेच झाली.  याशिवाय नेताजी सुभाषचंद्र बोसही १९३१ साली सिंहगड भेटीवर आले होते. ते येथे मुक्कामाला होते. 

श्री अमृतेश्वर भैरव मंदिर : 

कोंढाणेश्वराच्या मंदिरावरून थोडे पुढे गेले की डावीकडे हे अमृतश्वराचे प्राचीन मंदिर लागते. भैरव हे कोळ्यांचे दैवत आहे. यादवांच्या आधी गडावर कोळ्यांची वस्ती होती. मंदिरात भैरव व भैरवी अशा दोन मूर्ती आहेत.

देवटाके :  

या टाक्याचा उपयोग पिण्याचे पाणी म्हणून होतो. औषधी पाणी म्हणून देवटाक्याचे महत्व आहे. खरे तर जमिनीतून फिल्टर होऊन येणारे पाणी औषधीच. संपूर्ण गडावर हॉटेल विक्रेत्यांसाठी हे एकमेव पाण्याचा स्त्रोत. केवळ हॉटेल विक्रेते याचा वापर करू शकतात. कारण पाणी उपासण्यासाठी दोरी त्यांच्या प्रत्येकाकडेच असते. एका अर्थी हे बरे झाले निष्कारण येणारे पर्यटक पाण्याचा हातपाय, तोंड धुण्यासाठी या अमूल्य पाण्याचा वापर करताना मी पूर्वी पाहिले आहे.

कल्याण दरवाजा : 

 

गडाच्या पश्चिमेस हा दरवाजा आहे. कोंढणपूरवरून पायथ्याच्या कल्याण गावातून सिंहगडावर येता येते.  एकामागोमाग असे दोन भक्कम दरवाजे आहेत. यापैकी वरच्या दरवाज्याच्या दोन्हीकडील बुरुजांच्या भिंतीत श्रीशालीवाहन शके १६७२ कारकीर्द श्रीमंत बाळाजी बाजीराव पंडित प्रधान असा शिलालेख आढळतो. हत्ती व माहूत अशी दगडी शिल्पे होती.  कल्याण दरवाजाचा बुरूज काही वर्षांपूर्वी ढासळल्याच्या बातम्या पेपरातून आल्या. मात्र, यंदा गडावरील तुटक्या दरवाज्यांचे, बुरूजांचे, तटबंदीची पुर्नउभारणी करण्यात आल्याने समाधान वाटत आहे. जागोजागी सुचना फलक, कचरा टाकण्यासाठी सोय, मार्गदर्शक फलक, तानाजी मालुसरे यांच्या समाधीशेजारील परिसराचे होणारे सुशोभीकरण यामुळे सिंहगड लवकरच सजणार आहे.

उदेभानाचे स्मारक : 

कल्याण दरवाजाच्या मागच्या बाजूस वर असलेल्या टेकडीवर  सध्या  चौकोनी दगड दिसतो. ते उदेभान राठोडचे स्मारक म्हणून ओळखले जाते. मोगलांतर्फे उदेभान हा सिंहगडचा किल्लेदार होता.

झुंजार बुरूज :

 झुंजारबुरूज हे सिंहगडचे दक्षिण टोक होय. उदयभानूच्या स्मारकापुढे समोरची टेकडी उतरून या बुरुजावर येता येते. येथून समोरच टोपीसारखा राजगड, त्याच्याच उजवीकडे तोरणा हे गड दिसतात तर खाली पानशेतचे खोरे दिसते. पूर्वेकडे लांबवर पुरंदर दिसतो. पण हे वातावरण स्पष्ट असेल तरच ओळखता येतात.

डोणगिरीचा उर्फ तानाजी कडा : 

झुंजारबुरूजावरून मागे येऊन तटाच्या भिंतीच्या बाजूने पाय वाटेने तानाजीकड्याकडे जाता येते. हा कडा गडाच्या पश्चिमेस आहे. या ठिकाणाहूनच ५०० मावळ्यांसह तानाजी मालुसरे वर चढले होते.
  

राजाराम स्मारक : 

राजस्थानी पद्धतीची देवळासारखे ही वास्तू आहे. चौकोनी बांधकाम, चारही दिशांना निमुळते होत गेलेले छत अशी ही वास्तू आहे. छत्रपती राजाराम महाराज यांची ही समाधी. मोगली फौजेला सतत ११ वर्षे टक्कर देणाºया राजाराम महाराजांचे वयाच्या अवघ्या ३० व्या वर्षी शनिवार दि. २ मार्च इ.स. १७०० या दिवशी सिंहगडावर निधन झाले. पेशव्यांतर्फे या स्मारकाची उत्तम व्यवस्था ठेवली जायची.  ऐन कड्यालगत ही वास्तू आहे.
  

तानाजी मालुसरेंचे स्मारक : 

 

अमृतेश्वर मंदिराच्या पाठीमागे तानाजी मालुसरेंचे स्मारक आहे. शिवकाळातच बांधलेल्या या चौथऱ्यावर सुरुवातीला २० फेब्रुवारी १९४१ रोजी तानाजींचा अर्धपुतळा बसवला गेला. पुढे २४ मार्च १९७६ रोजी पहिला पुतळा काढून त्याजागी आजचा धातूचा पुतळा बसविण्यात आला.  तानाजी स्मारक समितीच्या वतीने हे बांधण्यात आले आहे. माघ वद्य नवमी दि. ४ फेब्रुवारी १६७२ या दिवशी झालेल्या लढाईत तानाजी मालुसरे मारले गेले. पण तानाजींच्या प्रयत्नांने गड जिंकला. दरवर्षी माघ वद्य नवमीस येथे मंडळातर्फे तानाजीचा स्मृतिदिन साजरा केला जातो.

यंदा दीपावलीचे औचित्य साधून कोंढवे-धावडे येथील भुलेश्वर तरुण मंडळाने सिंहगडावरील पुणे दरवाजा व पादचारी मार्गावर विद्युत रोषणाई केल्याने गडावरील पादचारी मार्ग व पुणेद्वार उजळले निघाल्याच्या बातम्या पेपरात वाचण्यात आल्या.  दरवर्षी सेवाभावी संस्था व दुर्गप्रेमी संस्थांचे कार्यकर्ते दिपोत्सव साजरा करीत असतात.

खंत : 


 

पूर्वी गडावर झुणका-भाकरी, दही-ताकापुरता असलेला स्थानिक लोकांचा रोजगार ठीक होता. गडावर वाढलेले सध्याचे बाजारू पर्यटनही सिंहगडाच्या पर्यावरणाला त्रासदायक ठरू लागले आहे. पण आता गडाच्या पायथ्यापासून ते गडावर सर्वत्र पसरलेली छोटीखानी हॉटेल्स पाहून आश्चर्य वाटते. पर्यटकांसाठी उभारण्यात आलेल्या या हॉटेल्समध्ये पिठलं भाकरी, भजी, दही, ताक तयार करून विकले जाते. चुलीवरील भाकरी ही ठरते जाहिरात. सध्याच्या तरुणांना सिंहगडाचे महत्त्व विचारले असता गरमा-गरम पिठलं भाकरी, दही ताकासाठी प्रसिद्ध असल्याचे त्यांच्याकडून सांगतले जाते. या बरोबरच काकडी, पेरू, चिंचा, बोर, चन्यामन्या बोर, आवळे, वाफवलेल्या शेंगा या रानमेव्यांबरोबरच हल्लीचे मुलांचे आवडते कुरुकुरे, बर्फाचे गोळे, आईस्क्रिम विक्रीस ठेवण्यात आले आहे. पर्यटक  या गोष्टी खरेदी करून भलेही स्थानिकांना चार पैसे मिळत असतील. पण यातून वाढणारे प्रदूषण, गडावरील प्लॅस्टिकचा कचरा, अनावश्यक पाण्याचा होणारा वापर याचा ताळमेल कसा साधणार. गडावर केवळ मोजकीच स्थानिकांची हॉटेल्स ठेऊन पर्यटकांची सोय होऊ शकते. अन्य अनधिकृत विक्रेत्यांना थारा न दिल्यास काही प्रमाणात तरी हानी कमी पोहचेल. वन विभागाकडून पायथ्याखालून गाडीने गडावर येण्यास दुचाकीस २० रुपये व चारचाकीस ५० रुपये असे शुल्क घेऊन सोडले जाते. पर्यावरणास काही हानी पोहचल्यास दंड म्हणून १०० रुपये उपद्रव शुल्कही आकारला जातो. सध्या याची अंमलबजावणी जोरात सुरू आहे. गडावर मद्यपान, सिगरेट, कचरा करण्यास बंदी आहे. अशा आशयाच्या सूचनाही जागोजागी लिहून ठेवल्याने थोडातरी अटकाव होत आहे. गडावर साध्या वेशात फिरणारे वनखात्याचे तसेच पोलीस पाहून जरा हायसे वाटते. गळ्यात गळे घालून फिरणारी जोडपी, हुल्लडबाजी करणारे तरुण याचे प्रमाण यामुळे काहीसे तरी कमी होऊ लागल्याचे दिसून येत आहे. याबद्दल वनविभागाचे मनावेत  तेवढे आभार कमीच. पण केवळ येईल त्याला गडावर प्रवेश देण्यापेक्षा काही अजून निर्बंध टाकणे गरजेचे आहे. आॅक्टोबरमध्ये सिंहगडाच्या घाटात दरड कोसळून आठवडाभर येथील रस्ता बंद होता. हा पर्यावरणाचा ºहास टाळणे गरजेचे आहे. हिरव्यागर्द झाडी, शांत निवांत सकाळ वा संध्याकाळ आणि भन्नाट वारा याचा अनुभव घ्यायचा असेल तर सिंहगडला नक्कीच भेट द्यायला हवी. पण तीही इतिहास समजण्यासाठीच.  सिंहगडाला दररोज शेकडो पर्यटक भेट देतात, पण त्यातले अनेकजण गड कुठे दिसलाच नाही असे म्हणत नाक मुरडतात. आपल्या पूर्वजांचे रक्त येथील मातीत पडल्याची मनात कोठेतरी जाण ठेऊनच. स्वराज्य व आपल्या राजाबद्दल निष्ठा कशी असावी, याची ओळख  तानाजी मालुसरेंनी आपल्या पराक्रमातून व बलिदानाने दाखवून दिली. स्वत:च्या मुलाचे लग्न बाजूला ठेवत, स्वराज्यातून गेलेला हा गड जिंकण्यासाठी त्यांनी आपले बलिदान दिले होते. याचे कुठेतरी भान ठेवल्यास नक्कीच सिंहगडासारख्या पवित्र ठिकाणी भेट दिल्याचे सार्थक होईल.

कसे जाल :

  • सिंहगड पुण्यापासून सुमारे ३५ किलोमीटर अंतरावर आहे.
  • पुणे दरवाजा : स्वारगेट वरून सुटणाऱ्या पुणे-सिंहगड  बसने आतकरवाडीपर्यंत पोहचून तेथून पायी एक ते दीड तासात गडावर जाता येते. स्वारगेट - आनंदनगर - वडगांव - खडकवासला - सिंहगड पायथा. अशी या मार्गावरील गावे आहेत. ५० ते ५६ क्रमांकाच्या बस या मार्गावर धावतात.
  • पुणे-कोंढणपूर : स्वारगेट वरून सुटणाऱ्या पुणे-कोंढणपूर बसने कोंढणपूरला उतरून कल्याण गावातून गडावर पायी जाता येते.

सिंहगडावरून काय पहाल :

  • पुरंदर, राजगड, तोरणा, वातावरण स्पष्ट असेल तर लोहगड, विसापूर, तुंग हे किल्ले, एनडीए, खडकवासला धरण असा प्रचंड मुलूख गडावरुन दिसतो.

पुण्यनगरीचा मानबिंदू - सिंहगड छायाचित्रे

आपल्याला हा फेरफटका कसा वाटला या विषयी नक्की लिहा.

1 comment:

Mugdha Dhaygude said...

खूप छान लिहिले आहे. मुलाला सिंहगड बद्दल माहिती लिहायची होती. तुमच्या या माहितीचा खूप उपयोग झाला.
त्याला तुमचा ब्लॉग वरील अधून मधून नक्कीच दाखवत जाईन.

कॉपी करू नका