हे स्मारक महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे आहे.
शहरातील हे एक पर्यटनस्थळ असून ते निजामकालीन आहे.
येथे पाण्यावर चालणारी चक्की (पिठाची चक्की) आहे.
याच कारणामुळे या ठिकाणाला पानचक्की असे म्हणतात.
या ठिकाणावर येणारे पाणी शहराच्या बाहेरून जमिनीच्या खालून एका नहरीद्वारे आणले जाते. नंतर हेच पाणी २० फुट उंचीवरुन एका मानवनिर्मित धबधब्याच्या स्वरुपात एका मोठ्या हौदमध्ये पडते. भिंतीवर नेण्यात आलेले पाणी खाली हौदात पडते. हा हौद साधारणत: १६० फूट लांब आणि ३१ फूट रुंद आहे. या हौदात पडणारे पाणी नंतर खाम नदीत जाते.
मलिक अंबर खरा अभियंता :
नैसर्गिकरित्या रेती आणि चुन्यातून वाहणारे पाणी शुद्ध, स्वच्छ आणि जंतुमुक्त व प्रदूषणमुक्त होत असल्याचा शोध मलिक अंबरने त्या काळी लावला होता. याच तंत्राचा पुरेपुर वापर मलिक अंबरने केला. १७ व्या शतकात खडकी शहर वसवताना मलिक अंबरने जेव्हा नहरींच्या योजनेचा प्रस्ताव दरबारात मांडला. तेव्हा दरबारातील इतर मंत्र्यांनी त्याला तीव्र विरोध दर्शवला होता. पाषाणातून पाण्याचा झरा काढण्याची योजना म्हणजे ग्रहताऱ्यांतून पाणी काढण्यासारखे आहे, अशी खिल्ली उडवण्यात आली होती. गुरुत्वीय तंत्रज्ञानाचा विशेष अभ्यास करून त्याने शहरात नहरींचे बांधकाम करण्यास सुरुवात केली. मलिक अंबरनं तत्कालीन शहराच्या उतत्रेस असलेल्या बनटेकडीपासून नहरींच्या निर्मितीला सुरुवात केली. टेकडी परिसरातील पाषाणी भाग कोरून भूगर्भात एक जलाशय तयार करण्यात आला. पाषणातून पाझरणाऱ्या झऱ्यांचे पाणी तसेच जवळपासच्या नदीनाल्यांचे पाणी या जलाशयात साठवण्यात आले. या जलाशयाची खोली अंदाजे ४५ फूट एवढी आहे. उंच भागावरून हे पाणी सहजपणे जलाशयात साठत होते. येथून मातीच्या पाइपद्वारे संपूर्ण शहराला पाणीपुरवठा केला जात असे. सुमारे चार मैलांवरून नहरींच्या माध्यमातून इथे पाणी आणण्यात आलं. येथील नहरींचे पाइप खापराचे आहेत. हौदाच्या मागील बाजूला उद्यान, दोन मोठे हॉल आहेत. वास्तुशास्त्राचा हा उत्तम नमूना आहे. मात्र योग्य संवर्धन न केल्यामुळे या दोन प्रमुख नहरींसह इतरही लहान-मोठ्या नहरी नामशेष झाल्या आहेत. त्या पुनर्जिवीत करण्यासाठी मलिक अंबरासारखा दुसरा कुशल अभियांत्रिक किंवा पाणी समस्या सोडवण्यासाठी तळमळ असलेलीच व्यक्ती हवी. कारण सध्या छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) मध्येच काय महाराष्ट्रात सर्वत्र पाण्याची गंभीर समस्या भेडसावत आहे. केवळ जाती-पातीचे राजकारण करण्यातच सध्या सर्वांचा वेळ चालला आहे.
पाण्याचा प्रवाह भिंतीमधून नळाद्वारे छोट्या खोलीत आणला आहे. येथे लोखंडी पात्याचे भक्कम चक्र दांड्यावर बसविला आहे. पाण्याचा प्रवाह पात्यावर कोसळतो. त्यामुळे दाब निर्माण होऊन चक्र फिरण्यास सुरुवात होते. त्यामुळे भले मोठे दगडी जाते फिरत असे. या जात्यात धान्य टाकून दळून घेतले जात होते. उर्वरित पाणी हौदात पडते. बाबा शहा मुसाफिर यांच्याकडे येणाऱ्या यात्रेकरूंची संख्या अधिक होती. यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात येणाऱ्या यात्राकरुंसाठी जेवणासाठी लागणारे पीठ दळण्याची यंत्रणा असावी यासाठी पाण्यावरून पिठाची गिरणी चालवली जायची आणि त्या चक्कीत धान्य दळून त्याचे पीठ केले जायचे. त्यावरून पाण्यावर चालणारी चक्की म्हणजे पाणचक्की नाव पडले,
तिकीटाचा दर : 10 रुपये
पाहण्याचा वेळ : १ तास