महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यात असून पश्चिम घाटातील एक प्रसिद्ध, जैवविविधता असणारे ठिकाण आहे. जवळच असलेला अजिंक्यतारा, सज्जनगड, कास तलाव, बामणोली येथील कोयना धरण्याचे जलाशयाचा फुगवटा व वासोटा किल्ला, ठोसेघर, वजराई धबधब्यामुळे सातारा अनेक पर्यटकांच्या आवडीचा ठरू लागला आहे. येथील “कास पठार ” हे “Kas Pathar Flower Valley” म्हणून नावारुपाला आले आहे. हे फुलांचे पठार पाहण्यासाठी नुकताच येथे फेरफटका केला त्या विषयी……
आजूबाजूच्या जंगलात आढळणाऱ्या कास वृक्षावरून कासपठार हे नाव पडले. अशी एक कथा आहे. कासाचा अर्थ प्रादेशिक भाषेत तलाव असाही होतो आणि पठारावरील प्रमुख कास तलावाच्या उपस्थितीमुळे त्याचे नाव कास पडले आहे. जागतिक वारसास्थळ असलेल्या कास पठावर विविधरंगी फुलांचा हंगाम सुरू झाल्याचे प्रसिद्धीमाध्यमातून कळाले आणि कासला भेट देण्याची इच्छा जागृत झाली. लगेच वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन बुकिंग केले. ठरल्या दिवशी सकाळी लवकरच निघून सातारा गाठला. वाटेत ढगाळ वातावरण असल्याचे पाहून पठारावर नक्की कसे वातावरण असेल याची शंकाच आली. नागमोडी वळणे घेत साताऱ्यातून कासपठाराकडे जाणाऱ्या रस्त्याने पठारावर पोहचलो. बारीक पाऊस असल्याने वाटेत धुक्याचे साम्राज्य पसरले होते. वनसरंक्षक दलाची चेकपोस्टवर तिकीट चेक करून कास पठारावरील पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाडीतून पाचच मिनिटात गेट क्रमांक १ वर आम्हाला सोडले. गेटमधून आत गेल्यावर सर्वत्र हिरवीगार झाडे, बाजूला कुंपण व त्यामध्ये डोकावत असलेली विविधरंगाची फुले पाहायला मिळाली. मात्र, पाऊस जास्त, धुके व सूर्यप्रकाशाचा अभाव असल्याने काही फुले कुजली असल्याचे लक्षात आले. जेवढे शक्य तेवढे येथील परिसर आम्ही हिंडून पाहिला. मात्र, जोराचे वारे, पाऊस यामुळे फुले पाहण्यात अडचण येत होती. गेट क्र.१ मधून तिकीट दाखवून आपण प्रवेश करतो. येथे फुललेल्या फुलांभोवती कुंपण टाकून मधोमध चालण्यासाठी चांगला रस्ता केला आहे. जंगली आल यांची मोठी मोठी फुलं दूरवर नजर जाईल इथवर पसरली आहेत. टोपली कारवी, आभाळी यांची निळसर फुलं दिसतात. गेट क्रमांक ४ पाहून थोड्या विश्रांतीनंतर आम्ही कास तलाव पाहण्यास निघालो. पठारावर येथील स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून दिला असल्याचे दिसून आले. महिलावर्गाला तसेच पुरुषवर्गाला कासपठारावर तयार केलेल्या संरक्षक जाळीच्या देखरेखीसाठी तैनात केले आहे. त्यामुळे अतिउत्साही पर्यटक या नैसर्गिक संपत्तीला बाधा पोहचविणार नसल्याची खबरदारी हे कर्मचारीघेत आहेत. तसेच येथील पर्यटकांना मार्गदर्शन करण्याचे काम ही हे करतात.
दाट धुके, गार वारे आणि सततच्या पावसामुळे यंदा कास पठारावर ही फुले उमलण्यास काहीशी उशीरा सुरूवात झाली आहे. सध्या पठारावर दीपकांडी, चवर, अभाळी, भुईकारवी, सोनकी या फुलांचा तुरळक स्वरुपात बहर आला आहे. पठारावर निवरा शेड एकाच ठिकाणी असल्याने आणि तेही अपुरी जागा असल्याने अनेक पर्यटक पावसातच भिजत असल्याचे दिसले. पावसाने उघडीप दिली आणि उन पावसाचा खेळ सुरू झाला तरच पठारावर यंदा मोठ्याप्रमाणात फुलांचा बहर पाहता येणार आहे.
कासपठारला भेट देण्याचे नियोजन करताना वेळ महत्त्वाची आहे. फुले बहरण्याचा मुख्य हंगाम ऑगस्टमध्ये सुरू होतो आणि ऑक्टोबर मध्यापर्यंत चालू राहतो. या कालावधीत फुले हळूहळू त्यांचे रंग बदलत असतात. पिवळ्या आणि जांभळ्यापासून गुलाबी आणि पांढऱ्या रंगात बदलणारे ही फुले आहेत. फुलांच्या विविध प्रजाती त्यांच्या सौंदर्याचे प्रदर्शन करत असतात. फुलांचे वेळापत्रक पाऊस आणि सूर्यप्रकाशासारख्या हवामानाच्या परिस्थितीवर अवलंबून असते. सहलीचे नियोजन करण्यापूर्वी स्थानिक हवामान अंदाज आणि फुले बहरण्याचा मुख्य हंगाम लक्षात घेणे गरजेचे आहे. बऱ्याच दुर्मिळ फुलांच्या प्रजाती या कालावधीत बघण्यास मिळतात. कास पठार प्रसिद्धीस आल्यापासून वर्षानुवर्षे पर्यटकांचे लोंढे कासपठारा कडे वाढत आहेत. पण हा हंगाम २० ते २५ दिवसासाठीच असतो. पूर्वी प्रति महाबळेश्वर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पठारावर अनेक मनमोहक दृशे आपल्याला बघायला मिळतात.
कास पठाराला भेट वेळ
साधारण ऑगस्टपासूनच इथे फुलं फुलायला सुरुवात होत असली तरी सप्टेंबर ते ऑक्टोबर हा कालावधी कास पठाराला भेट देण्याचा चांगला कालावधी आहे. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासुन फुलांचा चांगला बहर बघायला मिळतो. तरीसुद्धा कासपठाराच्या वेबसाईटवर फुलांचा हंगाम सुरू झाल्याचे पाहूनच या ठिकाणी जावे. www.kas.ind.in या कास पठाराच्या अधिकृत वेबसाईटवरून आपण ऑनलाईन बुकिंग करू शकता.
कसे पोहोचाल?
कास पठार हे पुण्याहून १३५ तर मुंबईहून २५५ किमी अंतरावर आहे. मुंबई, पुणेपासून येत असाल तर सातारा इथे पोहोचावे. येथून कास पठार हे २५ किमी अंतरावर आहे. एका छोट्याश्या घाटाने येथे पोहचता येते. आपल्या खासगी वाहनाने येत असाल तर साताऱ्याहून थेट कासकडे जाऊ शकता.
साताऱ्याहून भाड्याने गाडी करूनही आपण कासला जाऊ शकता.ST बसने जाणार असाल तर सातारा बस स्थानकातून बामणोली एसटी बस आपल्याला कास पठारावर घेऊन जाते. बामणोलीची बस साताऱ्याहून अंदाजे दीड दोन तासांनी असते.
ऑनलाईन तिकीट :
www.kas.ind.in या कास पठाराच्या अधिकृत वेबसाईटवरून आपण ऑनलाईन बुकिंग करू शकता. कास पठाराला भेट देण्यासाठी प्रतिव्यक्ती १५० इतके शुल्क आकारले जाते. ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने इथे बुकिंग स्वीकारले जाते. पण फुलांच्या बहराच्या कालावधीत इथे होत असलेल्या गर्दीमुळे आपण ऑनलाईन बुकिंग करूनच जावं. तसेच ऑनलाईन बुकिंग केल्यावर त्यांची प्रिंट देखील सोबत बाळगावी. मोबाईलमधील स्क्रीनशॉट ग्राह्य धरला जात नाही. १२ वर्षांखालील मुलांना तिकीटाची गरज नसते. १०० प्रति तास याप्रमाणे गाईडची सेवा देखील मिळू शकते. शनिवार रविवारी आपल्याला इथे गाईडची सुविधा मिळत नाही.
कास पठारावरील फुले
सुमारे ६५० जातींची फुलं आपल्याला कास पठारावर बघायला मिळतात. त्यापैकी ३० प्रजातींची फुलं अशी आहेत जी आपल्याला फक्त आणि फक्त कास पठारावरच बघायला मिळू शकतात. तसेच फुलं आणि वनस्पती मिळून सुमारे ८५० प्रजाती इथे बघायला मिळतात. सीतेची आसवे, सोनकी, मंजिरी, तेरडा, सोनकी अशी विविध रंगांची फुले वेगवेगळ्या वेळी बहरतात. येथे तेरड्याच्या कुळातील प्रजाती खूप प्रमाणात आढळतात. याशिवाय जंगली हळद, नरक्या इत्यादी वनस्पती देखील इथे आढळून येतात. कास पठारावरील अनेक वनस्पती औषधी असल्याचे आढळून येतात.
या शिवाय आपल्याला हवी असल्यास पुस्तके देखील उपलब्ध आहेत. ५० रुपयांपासून ते ५०० पर्यंत यांच्या किंमती आहेत. त्यात प्रत्येक फुलांच्या जाती व त्याचे नाव यांचे उल्लेख केलेले आहे.
कास पठारावर प्रवेश
कास पठाराला भेट देण्यासाठी दिवसभरातून तीन बॅचेसमध्ये प्रत्येकी १००० पर्यटकांना आत सोडण्यात येते. सकाळी ७ ते ११, ११ ते ३ आणि दुपारी ३ ते ६ अशा तीन वेळांमध्ये इथे भेट देता येते. एकूण दिवसभरातून ३००० पर्यटकांना आत सोडण्यात येते. सुटीच्या दिवशी व हंगाम ऐन भरात असेल तर ऑनलाईन तिकीट काढून जाणेच सोईचे ठरेल. कारण येथे रस्ता छोटा असून, साताऱ्यातून कासपठावर येण्यास १ तास लागतो. वाटेत घाट असल्याने वाहतूककोंडी होण्याची दाट शक्यता असते.
कास पठारावर फुले पाहण्यासाठी स्वत:ची गाडी घेऊन थेट जाता येते नाही. त्यासाठी वनसंरक्षक दलाने उभारलेल्या पार्किंगवरून गाडी पार्किंगची चांगली सोय केली आहे. येथून पुढे कास तलाव बामणोलीला तसेच वासोट्यावर जाता येते. पार्किंग विभागात आपण आपल्या गाड्या लावल्यावर तिथून पुढे त्यांची मोफत बससेवा उपलब्ध आहे. पाचच मिनिटांत आपण कास पठाराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ येऊन पोहचतो. येथे एकूण ४ प्रवेशद्वार असून मुख्य प्रवेशद्वारावर आपल्याला सोडण्यात येते. तेथे तिकीट दाखवून आपला पायी प्रवास सुरू होतो. सर्व बाजूला रंगीबेरंगी सुंदर फुलांचे बगीचे तयार झालेले आपल्याला दिसून येतात. मुख्य प्रवेशद्वाराजवळून सुमारे २ किलोमीटरवर असणाऱ्या कुमुदिनी तलाव पाहता येतो.
कास पठार हे अत्यंत सच्छिद्र लॅटराइट खडक (जांभा) पासून बनलेले पठार आहे. मातीचा पातळ थर. माती वर्षभर पाणी टिकवून ठेवू शकत नसल्यामुळे केवळ मुसळधार पावसातच वनस्पती जीवन टिकवून ठेवते. कासची वनस्पती या विशिष्ट ठिकाणी मर्यादित आहे. कारण पठार हे बेसाल्टचे बनलेले आहे. ज्वालामुखी पासुन बनलेला खडक आणि त्यावरच्या अतिशय पातळ तांबडी (मुरुमाच्या मातीसारखे) थरामुळे तसेच आजूबाजूच्या पोषक हवामानामुळे इथे हे आश्चर्य आपल्याला बघायला मिळते.
कास पठाराजवळ बघण्यासारखं काय काय आहे?
कास तलाव, कुमुदिनी तलाव, वासोटा किल्ला, अजिंक्यतारा किल्ला, सज्जनगड, तापोळा, कोयना अभयारण्य, वजराई धबधबा, ठोसेघर धबधबा, पाचगणी आणि महाबळेश्वर इत्यादी ठिकाणं आपण बघू शकता. येथे राहण्याची तसेच कॅम्पिंग वगैरे साठी परवानगी नसली तरी इथे जवळपास आपल्याला राहण्यासाठी हॉटेल, कॉटेज तसेच होमस्टे इत्यादी सुविधा उपलब्ध आहेत.
काही सूचना
- फुलं, पानं तोडू नका. इकडेतिकडे थुंकू नका.
- कचरा करू नका. प्लॅस्टिकच्या बाटल्या, खाद्यपदार्थांचे रॅपर, गुटख्याचे पाऊच पठारावर टाकू नका.
- इथे उघड्या पठारावर फुलं बघताना उन्हाचा, व पावसाळ्यात जाणार असाल तर पावसाचा, थंडीचा त्रास जाणवू शकतो. रेनकोट, स्वेटर, कानटोपी जवळ ठेवा.
- येथे आपल्याला नाचणीची भाकरी, पिठलं, ठेचा इत्यादी पदार्थ मिळतात.
- शनिवार व रविवार अथवा सार्वजनिक सुट्टीचे दिवस टाळा.
- सकाळी लवकर किंवा सायंकाळच्या वेळेत गर्दी कमी असते, उन्हाचा त्रास होत नाही.
- शक्यतो ऑनलाईन बुकींग करूनच जा. जेणेकरून तिथे गेल्यावर ऐनवेळेस निराशा व्हायला नको.
- कास व्यवस्थापन कडक शिस्तीचे असून तिथे योग्य ती शिस्त पाळा आणि त्यांना सहकार्य करा.
अती-पर्यटनामुळे धोक्यात आलेले हे आणखी एक ठिकाण बनत आहे. वीस-एक वर्षांपूर्वी इथे कुठल्याही परवानगी शिवाय जाता यायचे. २५ वर्षांपूर्वी वासोट्याला येथून एसटीने गेलो. तेव्हा जाताना याच पठारावर गेलो होतो. वाटेत दिसणारे हे अदभूत सौंदर्य त्यावेळेस परत येथे आपल्याला येथे येण्यासाठी खुणावेल याची कल्पना देखील नव्हती. कास पठारावरच्या फुलांपेक्षा बेजबाबदार पर्यटक आपल्याकडे अधिक आहेत. याचीच प्रचिती येथे आली. कास तलावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका ठिकाणी एक महिला तिथलं जंगली फुलझाड मुळासकट तोडून नेताना दिसल्या. त्यांना असे करू नका म्हटल्यावर एवढी फुले आहेत. एखादे नेल्याने काय होते. असा उलट उत्तर मलाच दिले. सर्वांनीच असे केल्यावर कसे चालेल. ही नैसर्गिक संपत्ती फक्त याच मातीत आणि याच वातावरण टिकते हे ही त्यांना समजवून सांगितले. पण त्यांच्या लक्षात आले नाही. असो....
सातारा येथील कास पठार निसर्गाचा अद्भूत चमत्कारच आहे. आवर्जुन येथे भेट द्यावी. पण येथील संपत्तीला आपल्याकडून कोणताही धोका न पोहचवताच….
आपल्याला हा ब्लॉग कस वाटला या विषयी आपली प्रतिक्रिया येथे जरूर कळवा…
2013 साली भेट दिलेला कास पठार