Thursday, September 19, 2024

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी सार्वजनिक ट्रस्ट संग्रहालय

भारतातील पहिल्या सार्वजनिक गणपती असलेल्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी सार्वजनिक ट्रस्टच्या
वरद विघ्नेश्वराचे दर्शन घेऊन शेजारीच असलेल्या भाऊसाहेबांचा जुना वाडा पाहण्याचा नुकताच योग आला. विद्येचे माहेरघरानंतर आता मेट्रो सीटी म्हणून पुण्याची ओळख होत आहे. 
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ सगळ्यांना माहीत आहे. मात्र हा वाडा आणि याचं महत्त्व लोकांना कळावे यासाठी 2022 मध्ये जीर्णोद्धार करुन हा वाडा लोकांसाठी खुला करण्यात आला. 
भाऊसाहेब रंगारी यांचं मूळ नाव भाऊ लक्ष्मण जावळे. भाऊसाहेब हे राजवैद्य होते. शालूंना रंग देण्याचा त्यांचा पारंपारिक व्यावसाय होता. त्यावरुन त्यांना रंगारी हे उपनाव पडलं. शालुंवरुन त्यांचं दुकान असलेल्या बोळाला शालुकर बोळ असं नाव पडलं होतं.   हा जुना वाडा नुकताच पुर्नरुज्जीवत करण्यात आला. वाड्याची डागडुजी करून हा जुना ऐतिहासिक ठेवा नवीन पिढीसाठी जतन करण्यात आला आहे.  
भाऊसाहेब रंगारी संग्रहालय 
या ठिकाणी संग्रहालय तयार करण्यात आले असून, बांधकाम करताना सापडलेल्या वस्तू या ठिकाणी ठेवल्या आहेत. या ठिकाणी बंदूका, तलवारी पहायला मिळतात. तसेच सध्या वापरात असलेला भाऊ रंगारी गणपतीचा मिरवणुकीचा सुरेख रथही आपल्याला येथे दिसून येतो.  ही वास्तू म्हणजे भारतीय वास्तू कलेचा उत्तम नमूना. जुने सागवानी लाकूड, पागोटे ठेवायला खुंटी, देवळी, वरच्या माडीवर जाण्यासाठी तयार करण्यात आलेला लाकडी जीना, गुप्त भुयारी मार्ग, लाकडी झोपाळा, झुंबर आपल्याला पाहायला मिळतात. चिंचवडगावातील क्रांतीवीर चापेकर यांचा वाडा हा देखील असाच जतन करून ठेवला आहे.  १० एप्रिल १९५८ साली वयाच्या ९५ व्या वर्षी या गणेशोत्सवासाठी झिजणाऱ्या भाऊसाहेबांचे निधन झालं.














इंग्रजांशी लढण्यासाठी क्रांतिकारकांना जागा मिळावी यासाठी हा वाडा होता. त्याकाळी इथ गुप्त मार्ग, भुयारी मार्ग होते. शास्त्रे लपवायला जागा होती. पूर्वी जसा वाडा होता तसाच वाडा पुन्हा एकदा उभारण्यात आला आहे. 
हा वाडा खरंतर दवाखाना म्हणून ओळखला जायचा कारण भाऊ रंगारी हे राजवैद्य होते. मात्र इथ क्रांतिकारकांच्या गुप्त बैठकी व्हायच्या. 1892 साली भाऊसाहेब रंगारी यांनी आणि त्यांच्या तेरा सहकाऱ्यांनी याच भवनात बसून सार्वजनिक गणेशोत्सव सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. वाड्याचं नुतनीकरण करताना वाड्यात कोणतेही नवीन साहित्य वापरले गेले नाही.  

प्रत्येकाने एकदा तरी भाऊसाहेबांचा हा वाडा आवर्जून पहावा. 

कसे जाल : अप्पा बळवंत चौकातून पायी तसेच सकाळ ऑफीसच्या मागे.

No comments:

कॉपी करू नका