Thursday, September 19, 2024

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी सार्वजनिक ट्रस्ट संग्रहालय

भारतातील पहिल्या सार्वजनिक गणपती असलेल्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी सार्वजनिक ट्रस्टच्या
वरद विघ्नेश्वराचे दर्शन घेऊन शेजारीच असलेल्या भाऊसाहेबांचा जुना वाडा पाहण्याचा नुकताच योग आला. विद्येचे माहेरघरानंतर आता मेट्रो सीटी म्हणून पुण्याची ओळख होत आहे. 
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ सगळ्यांना माहीत आहे. मात्र हा वाडा आणि याचं महत्त्व लोकांना कळावे यासाठी 2022 मध्ये जीर्णोद्धार करुन हा वाडा लोकांसाठी खुला करण्यात आला. 
भाऊसाहेब रंगारी यांचं मूळ नाव भाऊ लक्ष्मण जावळे. भाऊसाहेब हे राजवैद्य होते. शालूंना रंग देण्याचा त्यांचा पारंपारिक व्यावसाय होता. त्यावरुन त्यांना रंगारी हे उपनाव पडलं. शालुंवरुन त्यांचं दुकान असलेल्या बोळाला शालुकर बोळ असं नाव पडलं होतं.   हा जुना वाडा नुकताच पुर्नरुज्जीवत करण्यात आला. वाड्याची डागडुजी करून हा जुना ऐतिहासिक ठेवा नवीन पिढीसाठी जतन करण्यात आला आहे.  
भाऊसाहेब रंगारी संग्रहालय 
या ठिकाणी संग्रहालय तयार करण्यात आले असून, बांधकाम करताना सापडलेल्या वस्तू या ठिकाणी ठेवल्या आहेत. या ठिकाणी बंदूका, तलवारी पहायला मिळतात. तसेच सध्या वापरात असलेला भाऊ रंगारी गणपतीचा मिरवणुकीचा सुरेख रथही आपल्याला येथे दिसून येतो.  ही वास्तू म्हणजे भारतीय वास्तू कलेचा उत्तम नमूना. जुने सागवानी लाकूड, पागोटे ठेवायला खुंटी, देवळी, वरच्या माडीवर जाण्यासाठी तयार करण्यात आलेला लाकडी जीना, गुप्त भुयारी मार्ग, लाकडी झोपाळा, झुंबर आपल्याला पाहायला मिळतात. चिंचवडगावातील क्रांतीवीर चापेकर यांचा वाडा हा देखील असाच जतन करून ठेवला आहे.  १० एप्रिल १९५८ साली वयाच्या ९५ व्या वर्षी या गणेशोत्सवासाठी झिजणाऱ्या भाऊसाहेबांचे निधन झालं.














इंग्रजांशी लढण्यासाठी क्रांतिकारकांना जागा मिळावी यासाठी हा वाडा होता. त्याकाळी इथ गुप्त मार्ग, भुयारी मार्ग होते. शास्त्रे लपवायला जागा होती. पूर्वी जसा वाडा होता तसाच वाडा पुन्हा एकदा उभारण्यात आला आहे. 
हा वाडा खरंतर दवाखाना म्हणून ओळखला जायचा कारण भाऊ रंगारी हे राजवैद्य होते. मात्र इथ क्रांतिकारकांच्या गुप्त बैठकी व्हायच्या. 1892 साली भाऊसाहेब रंगारी यांनी आणि त्यांच्या तेरा सहकाऱ्यांनी याच भवनात बसून सार्वजनिक गणेशोत्सव सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. वाड्याचं नुतनीकरण करताना वाड्यात कोणतेही नवीन साहित्य वापरले गेले नाही.  

प्रत्येकाने एकदा तरी भाऊसाहेबांचा हा वाडा आवर्जून पहावा. 

कसे जाल : अप्पा बळवंत चौकातून पायी तसेच सकाळ ऑफीसच्या मागे.

कोरीगड



पवना धरणाच्या जवळपास असलेले तुंग, तिकोना, लोहगड, विसापूर. याच किल्यांच्या मागे असणारा कोरीगड हा किल्ला. पूर्वी रेवदंडा, चौल येथून समुद्रामार्गे येणारा माल हा घाटावरती म्हणजे जुन्नर, नाणेघाटात नेण्यासाठी या मार्गाचा वापर केला जाई. या मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला फारच महत्वाचा ठरतो. मुळशी धरणाच्या पश्चिमेला आणि लोणावळा आणि पाली यांच्या दरम्यान, सव्वाष्णी घाटाच्या माथ्यावर कोरबारस मावळ आहे. बारा मावळापैकी हे एक मावळ.  सह्याद्रीच्या दोन डोंगररांगांच्या मधल्या खोऱ्याला "मावळ" म्हणतात. 
          पुण्यात एकूण १२ मावळ आहेत. हा मावळ विस्तीर्ण असल्यामुळे त्याचे बारा भाग करण्यात आले. आंदर मावळ, कानद खोरे, कोरबारसे मावळ, गुंजन मावळ, नाणे मावळ, पवन मावळ, पौड खोरे, मुठा खोरे, मोसे खोरे, रोहिड खोरे, वळवंड खोरे, हिरडस मावळ तर अशा या कोरबारस मावळात कोरीगड आणि घनगड असे दोन किल्ले आहेत. तैलबैल्या ही निर्सगाची प्रचंड भिंती देखील येथेच आहे. मावळात विशेष करून पवना धरण परिसरात प्रामुख्याने चार किल्ले. तुंग, तिकोना, लोहगड, विसापूर.  हे सर्व पाहण्यासाठी तीन ते चार दिवसांची वेळ लागतो. या बरोबरच कोरीगड, घनगड, सुधागड आणि सरसगड (पाली) असे अनेक ट्रेक या भागात करता येतात. 

लोणावळा येथील शिवलिंग.


लोणावळा आयएनएस येथील पठावरावरून दिसणारा कोरीगड व फुले.



लोणावळा आयएनएस येथील पठावरावरून दिसणारा कोरीगड व फुले.

कोरीगडाकडे जाणारा मार्ग

कोरीगडाकडे जंगलातून जाणारा मार्ग






कोरी हे कोळी समाजातील एका पोटजातीचे नाव असल्याने, या किल्ल्याला कोरीगड असे नाव मिळालं. या किल्ल्याला कोराईगड आणि शहागड अशा नावांनीही ओळखले जाते. शहागड हे नाव गडाच्या पायथ्याशी असलेल्या पेठ शहापूर या गावावरून मिळाले आहे. इतिहासात या किल्ल्याला तशी बरीच नावे आहेत. कोरीगडाच्या पायथ्याला गडाची माहिती असणारा फलक लावल्याने गडाची चांगलीच माहिती मिळते. 




कोरीगडावरून दिसणारे ॲम्बी व्हॅली येथील घरे

कोरीगडारील टाके


कोरीगडारील गणेशमूर्ती

कोरीगडावरील पायरी मार्ग



कोरीगडाचा मुख्य दरवाजा





पाहण्यासारखी ठिकाणे
येथील पायऱ्या अजूनतरी सुस्थितीत दिसून येतात. पावसाळ्यात भुशी डॅम येथील पायऱ्यांवर जसे पावसाचे 
पाणी पडते तसे पावसाचे पाणी येथील पायऱ्यांवर पडून सुंदर असा धबधबा तयार होतो. पेठशहापूरच्या वाटेने वर येताना पायवाट संपल्यावर पायऱ्या सुरू होतात. पायऱ्या चढताना उजव्या बाजूला एक गुहा आहे. गुहेच्या बाजूला गणेशाची मूर्ती आहे. पुढे पायऱ्या चढून गेल्यावर उजव्या बाजूला एक कातळात लपलेले पाण्याचे टाके आहे. परंतु हे पाणी पिण्यायोग्य नाही.  टाके पाहिल्यावर पुढे गेल्यावर डाव्या बाजूला एक गुहा दिसते. या गुहेच्या समोर खालच्या बाजूला एक पाण्याचे टाक आहे.
येथून पुढे किल्ल्याच्या गणेश दरवाज्याजवळ पोहोचतो. या दरवाज्याची बांधणी पूर्वाभिमुख गोमुखी तसेच चार बुरुजांनी संरक्षित आहे.
प्रवेशद्वारातून किल्ल्यावर प्रवेश केल्यावर दोन्ही बाजूला पाहारेकर्‍यांसाठी देवड्या आहेत. देवड्यांच्या पुढे वाट काटकोनात वळते आणि येथे असलेला किल्ल्याचा दुसरा दरवाजा जो आज उध्वस्त झालेला दिसतो.


शंकराचे मंदिर

महादेव मंदिर आणि इतर ठिकाणे
गणेश दरवाजातून वर आल्यावर समोरच महादेवाचे मंदिर दिसते. या मंदिराच्या अंगणात ४ तोफा ठेवलेल्या आहेत.
मंदिराच्या मागे दोन तलाव आहेत. तलावांजवळ वाड्यांचे अवशेष आढळतात.


तटबंदी

कोराई देवी मंदिर
या तोफेच्या पुढे गडाची देवता कोराई देवीचे मंदिर आहे. मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे. दक्षिणोत्तर पसरलेल्या कोराईगडावर आज एकही ऐतिहासिक वास्तू शिल्लक नाही. गडाची तटबंदी मात्र शाबूत आहे. येथून अँम्बी व्हॅलीचे सुंदर दृश्य दिसते. गडावर श्री शंकर, श्री विष्णू आणि गडमाता कोराईची छोटेखानी मंदिरे आहेत.  



कोरीगडावरावरून दिसणारा लोणावळा परिसर




गडमाथा आणि तटबंदी
किल्ल्यात प्रवेश केल्यावर भलेमोठे पठार दिसते. गडमाथा दक्षिणोत्तर पसरलेला आहे. साधारणत: दीड किलोमीटर लांबीची असलेली तटबंदी खूपच सुंदर अशी आहे. तटबंदीवरून संपूर्ण गडाला फेरी मारता येते. येथून खाली असलेले अँम्बीचा नव्याने उभारण्यात आलेली घरे, छोटा तलाव, पूल तसेच दूरवर दिसणारा तुंग किल्ला व  लोणावळयाजवळचा ड्युक्सनोज (नागफणी) ही दिसतात.  संपूर्ण गड पाहाण्यासाठी एक तास लागतो. 

गडावरील सुंदर तलाव.






दुपारी २ नंतर गडावर दाट धुके पसरले.

धुक्यात हरवला गड
सकाळी गडावर १२ पर्यंत पोहाचल्याने गड पाहता आला. मात्र दुपारी २ नंतर संपूर्ण गडाने धुक्याची चादर ओढली गेली. दहा ते पंधरा मिनिटांतच संपूर्ण गडावर धुके आल्याने अन्य काही पाहता येणे शक्य नव्हते. त्यामुळे आम्ही परतीचा मार्ग अवलंबला. 









कसे जायचे ?
पेठशहापूर मार्गे
पुणे किंवा मुंबई मार्गे आल्यानंतर भुशी डॅमच्या रस्त्याने आपले वाहन असल्यास येथील गडाच्या पायथ्याशी येता येते. तसेच लोणावळ्याला पोहोचल्यानंतर एसटी बसने आयएनएस शिवाजी मार्गे आंबवणे किंवा भांबुर्डेला जाणारी बसने अथवा  सहारा प्रकल्पाकडे जाणारी बसने देखील येथे जाता येते. या वाटेत भुशी डॅम तसेच आय  एन एस शिवाजी नेव्हीचा तळ लागतो. सुमारे १६ किमी अंतरावर असलेल्या पेठशहापूर गावातून जाणारी पायवाट जंगलातून आपल्याला पायऱ्यांपर्यंत घेऊन जाते. वाहनतळाच्या येथून मोबाइल टॉवर दिसतो. तीच वाट पकडून गर्द झाडीतून आपली पायपीट सुरू होते. येथून सुमारे अर्धा तासात गडावर पोहोचता येते.

वाहनतळ : पेठशहापूर गावा बाहेर रस्त्यावर वाहनतळ आहे. या वाहनतळापासून चालत गेल्यावर डाव्या बाजूला एक पायवाट दिसते. येथून गडावर जाण्यासाठी साधारणपणे अर्धा तास लागतो. वाहने लावण्यासाठी टू व्हीलरला ५० तर कारसाठी 100 रुपये असा दर आहे. आम्ही गेलो तेव्हा गर्दी नव्हती. तसेच या ठिकाणी पार्किंग सांभाळणारा व्यक्ती सुद्धा नव्हता.

हा ब्लॉग कसा वाटला. या विषयी आवर्जून लिहा


कॉपी करू नका