Friday, January 22, 2016

जझीरे मेहरूब : जंजिरा किल्ला

महाराष्ट्राला सुमारे ७५० किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. सृष्टिसौंदर्याने नटलेल्या या सागरी किनाऱ्याजवळ प्रेक्षणीय, ऐतिहासिक घटनांना उजाळा देणारी अनेक पर्यटनस्थळे आहेत. अनेक गिरीदुर्ग, जलदुर्ग, वनदुर्ग या ठिकाणी पर्यटकांचे स्वागत करण्यासाठी शतकानुशतके उभे आहेत. या समुद्र किनाऱ्यावरील किल्ले पाहणे म्हणजे एक आगळा वेगळा आनंदच. हा आनंद घ्यायचा झाल्यास सुरूवात होते ते रेवस बंदरापासून व संपते तेरेखोलला. अलिबाग-मुरुड परिसरात अनेक पर्यटनस्थळे विकसित झालेली आहेत. मांडवा, सासवणे, आवास, किहीम, अलिबाग, वरसोली, नागाव, आक्षी, काशिद, नांदगाव, रेवदंडा, मुरुड या ठिकाणी मनमुराद आनंद लुटता येतो. वर्षभर या ठिकाणी पर्यटकांची ये-जा सुरू असते. नारळी फोफळीच्या वनांमधून फिरताना कोकणी माणसाचे, समाजाचे दर्शन घडते. रायगड जिल्ह्यात मुरुड तालुक्यात चहूबाजूंनी सागरी पाण्याचा वेढा पडलेला, राजापुरीच्या खाडीच्या तोंडावर मोक्याच्या जागी अजेय जंजिरा किल्ला आहे. त्या विषयी...

जुन्या द्रुतगती मार्गावरून खोपोलीला आलो. तेथून अष्टविनायकापैकी एक असलेल्या पालीच्या गजाननाचे दर्शन घेऊन रोह्याला गेलो. पाली-रोहा-नागोठाणे-साळाव-नांदगाव मार्गे मुरुडला जाता येते मात्र, साळवला न जाता वाटेत डावीकडे असणाऱ्या फणसाड अभयारण्यातून सुपेगावमार्गे गेलो. एव्हाना दुपारचे १२.३० वाजले होते. सुपेगावमार्गे जाण्याचा माझा हा तिसरा अनुभव होता. वाटेत फणसाड अभयारण्य स्वागत करते.  सोबतीला  गुगल मॅपची मदत होतीच. त्यामुळे वाट चुकण्याचा प्रसंग नव्हता. घनदाट अभयारण्यातून चांगला काळा डांबरीरोड तयार केलेला आहे. एकदम शॉर्प टर्न असल्याने शक्यतो गाडी नवीन चालविणाºयांनी या ठिकाणाहून जाणे टाळावेच. वाटेत घनदाट जंगल असल्याने शक्यतो दिवसाढवळ्या येथून बाहेर पडणेच चांगले. अर्ध्या तासातच वेडीवाकडी वळणे घेत आम्ही मोºया बंदराजवळ पोहचलो. येथून जंजिºयाला जाण्यासाठी बोटीची सोय होऊ शकते. या खेरीज राजपुरी गावातूनही शिड्याच्या बोटीने जंजिºयाला जाता येते.

किल्याचे स्थान :

रायगड जिल्ह्याच्या पश्चिमेला अरबीसमुद्र पसरलेला आहे. या समुद्राला लागूनच मुरुड तालुक्यातील मुरुड नावाचे गाव आहे. अलिबागपासून जवळपास ५० कि.मी. अंतरावर मुरूड हे एक तालुक्याचे गाव. गावाचा परिसर निसर्गरम्य आहे. नारळी-पोफळीच्या बागांनी या गावाचा परिसर हिरवागार झाला आहे. परिसरात काही इतिहासकालीन वास्तूंचे अवशेष अजूनही पहायला मिळतात. या गावात असलेला इतिहासकालीन राजवाडा ‘नवाबा’चा राजवाडा' म्हणून प्रसिद्ध आहे. समुद्रकिनारी दंडा आणि राजपुरी ही गावे आहेत. मुरुडपासून राजपुरी चार पाच किलोमीटर अंतरावर आहे. गावाच्या पश्चिमेला समुद्रात सुमारे २ किलोमीटरवर एका बेटावर जंजिरा किल्ला आहे. राजपुरीहून येथे जाण्यासाठी शिडाच्या होड्यांची सोय आहे.


थोडा कंटाळवाणा; पण हवाहवासा वाटणारा प्रवास :

आजपर्यंत शत्रूला पटकन वश न झालेला हा अजिंक्य सिद्दयांचा जंजिरा किल्ला.  आमच्या ताब्यात येण्यासही सुमारे ३ तासांचा वेळ गेला. उन्हाचा मारा सोसत, कंटाळलेल्या स्थितीत ही मोर्ऱ्या बंदरात तिकीट रांगेत उभे होतो. मोर्ऱ्या बंदरातून किल्ल्यावर जाण्यासाठी दर अर्धा तासाने बोटीची सोय होते. आम्ही किल्ल्यावर जाण्यासाठी डिझेलच्या लाँचमध्ये बसून गेलो. प्रथमत: भल्या मोठ्या रांगेत उभे राहून तिकीट घ्यायचे. तिकीट तसे किरकोळच आहे. २२ रुपये प्रौढांसाठी तर ११ रुपये १२ वर्षांखालील लहान मुलांसाठी. एक वेळेस फक्त ४५ तिकीटेच दिली जातात. तिकीट देणाऱ्या माणसाशी कुठलीही चौकशी केली असा वाट पाहावी लागेल. सांगता येत नाही, राजपुरी बंदरातून जा ना, अशी उत्तरे दिली जातात. तिकीट काढल्यानंतर तासभर वाट पाहावी लागते. नावाड्यांनी सोसायटी स्थापन केली आहे. जास्त कटकट करणाऱ्या प्रवाशांना सोसायटीकडे तक्रार करण्याचा सल्ला दिला जातो. नावाड्यांचा धंदा व्हावा म्हणून पर्यटकांची छान दमवणूक करतात.  जास्त घाई करणाऱ्यांना फक्त ५० रुपये देऊन किल्ल्याच्या भोवताली फिरवून आणण्याचे आश्वासन दिले जाते. मात्र त्यासाठी ४५ माणसांची तयारी हवी. किल्ल्यावर सोडण्यासाठी येणाऱ्या लाँच परतीचे पॅसेंजर घेऊन येते. मग तिकीटे काढलेली नवीन पर्यटक लाँचमध्ये बसतात. तेथून ही लाँच जंजिºयाकडे जाण्यासाठी निघते. किल्याच्या मुख्य दरवाज्यासमोर अनेक शिड्याच्या होड्या पर्यटकांनी भरून थांबलेल्या दिसतात. मग एक-एक करीत आपल्या लाँचमधील माणसे दुसऱ्या शिडाच्या होडीत बसवली जातात. मग ही शिडाची होडी दरवाज्याजवळ येऊन माणसे तेथील नावाड्यांच्या मदतीने खाली करतात. या सगळ्या द्रवीडप्राणायाने गोंधळ व संभ्रम निर्माण होतो. सरळ लाँचनेच आपल्याला का  नाही सोडले? तर मुरुड जंजिरा पर्यटन संस्थेतर्फे  शिडांच्या होडींचा धंदा चालू राहण्यासाठी केलेली ही उपाययोजना असल्याचे न सांगताच लक्षात येते. ज्या नावेतून आपण आलो तीच नाव सुमारे ४५ मिनिटांनंतर येथे आवाज दिल्यानंतर दरवाज्यामध्ये  येऊन थांबायचे यानंतर नाव चुकल्यास भाडे जास्त आकारले जाते अशी धमकीवजा घोषणा नावाड्याकडून केली जाते. म्हणजेच मोºया बंदरातून निघालेली लाँच अर्ध्यातासातच किल्याच्या दरवाज्यापाशी येऊन थांबते. तेथून शिडाच्या होडीत बसायचे नंबर लागेल तसा शिडाच्या होड्यातून किल्यावर उतरायचे या सगळ्या गोष्टीला दीड तास तरी सहज लागतो. प्रत्यक्षात किल्ला पाहण्यासाठी ४५ मिनिटांचाच अवधी दिला जातो. असो.  सर्व पर्यटकांना नावाडी आपुलकीने वागवताना दिसतात. पोट भरण्यासाठी एकमेव मार्ग असलेल्या येथील लोकांना पर्यटक म्हणजे देवच. आदबीने चौकशी करून किल्ला पाहण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला १०० रुपये याप्रमाणे गाईडची सोयही केली जाते.  खरे पाहता थोडी इतिहासाची आवड असल्यास स्वत:हून हा किल्ला पाहता येणे शक्य असते. येथील गाईड अभिमानाने ‘‘तुम्हारा शिवाजी भी ये किला जीत नाही पाया’’ असे अभिमानाने सांगतात. शंभर रुपये देऊन ही बडबड ऐकण्यापेक्षा स्वत: किल्ला पाहिलेला बरा.  आम्ही गाईड न घेताच हा किल्ला पाहिला. होडीतून उतरताना होणारी इतरांची होणारी धांदल पाहण्यात चांगली मजा येते. भरती असल्यास नाव जोरात वरखाली होत असते अशातच नावाड्याच्या हाताला धरून बरोबर पायरीवर उडी मारावी लागते. चुकून पाय घसरला की थेट समुद्राच्या पाण्यात छोटी डुबकी होते.

जंजिºयाविषयी :

मुरूडच्या पुढे दंडा आणि राजपुरी ही गावे समुद्रकिनारी आहेत. जंजिरा किल्ला राजपुरी गावाच्या पश्चिमेला समुद्रात एका बेटावर बांधलेला आहे. अरबी भाषेतील ‘जझीरा’ या शब्दावरुन तो आलेला आहे.  ‘जझीरा’ म्हणजे बेट त्याचा अपभ्रंश झाला जंजिरा. मेहरूब शब्दाचा अर्थ चंद्रकोर.  ‘जझीरे मेहरूब’.  सुमारे ५०० वर्षे आपले स्वतंत्र अस्तित्व टिकवून आजही भक्कमपणे उभा असलेला हा किल्ला. यादवकाळात दंडाराजपुरी हे भरभराटीस आलेले महत्वाचे व्यापारी बंद म्हणून प्रसिद्ध होते.  दहाव्या शतकाच्या सुमारास राष्ट्रकुटांचे मांडलिक शिलाहार राजांचे कोकणावर राज्य होते. तेव्हापासून राजपुरी बंदराचा उल्लेख इतिहासात आपल्याला मिळतो. पण जंजिºयाचा इतिहास सांगताना आपल्याला १५ व्या शतकापासून सुरूवात करावी लागते. या बेटावर पूर्वी एक मेढेकोट होता. राजपुरीला मुख्यत: कोळी लोकांची वस्ती होती. या कोळ्यांना समुद्री लुटारू आणि चाचे लोकांचा नेहेमीच त्रास होत असे. तेव्हा या चोरांना आळा घालण्यासाठी या दगडी बेटावर मेढेकोट उभारण्यात आला. मेढेकोट म्हणजे लाकडाचे मोठाले ओंडके एका शेजारी एक ठोकून तयार केलेली भव्य तटबंदी. या तटबंदीमध्ये कोळी लोक सुरक्षितपणे रहात असत. त्यावेळी त्यांचा प्रमुख होता राम पाटील. हा मेढेकोट बांधण्यासाठी त्यावेळी निजामी ठाणेदाराची परवानगी घ्यावी लागली होती. साहजीकच मेढेकोटाची सुरक्षितता लाभताच राम पाटील त्या ठाणेदाराला जुमानेसा झाला.
जुन्नरच्या मलिक अहमदने १४८५ मध्ये जंजिरा जिंकण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा कोळ्यांचा नेता होता रामभाऊ कोळी. राम पाटीलाचा पराक्रमापुढे मलिकने हात टेकले. यानंतर चार वर्षानंतर एक व्यापारी जहाज जंजिºयाच्या तटाला लागले. पिरमखान नावाचा व्यापारी व त्याच्या सिद्दी नोकरांनी सुरतेहून आल्याची बतावणी केली व आसरा मागितला. राम पाटील सहजासहजी आपल्याला मेढेकोटच्या जवळही फिरकू देणार नाही, याची कल्पना पिरमखानला होती. आपण दारूचे व्यापारी आहोत, असे भासवून त्याने आपले गलबत खाडीत नांगरली. राम पाटीलाशी स्नेह राहावा म्हणून दारूचे काही पिंपे भेट म्हणून पाठवली.  रात्री पिरमखानने मेढेकोट पाहण्याची इच्छा व्यक्त केली. पिरमखान मेढेकोटात गेला. रात्री सर्व कोळी दारू पिऊन झिंगले असताना पिरमखान बाकीच्या गलबतांमधून असलेले सैन्य तेथे उतरवून रात्रीच्या अंधारात भयंकर कापाकापी झाली, सर्वांची कत्तल करून मेढेकोट ताब्यात घेतला. पुढे पेरीमखानाच्या जागी बुºहाणखानाची नेमणूक झाली. राम पाटीलला निजामशहाकडे पाठवून त्याचे धर्मांतर केले. पुढे स्वतंत्र गमावलेला राम पाटील १५२८ मध्ये पुन्हा बंडखोरी करू लागला. तेव्हा पिरमखानाने त्याचे डोके उडवले. इ.स. १५२६ ते १५३२ च्या कारकीर्दीनंतर इ.स. १५३२ मध्ये पिरामखान मरण पावला. पुढे १५६७ मध्ये हुसेन निजामशहाच्या हुकुमानुसार लाकडी बांधकामाऐवजी दगडी कोट बांधण्यास सुरुवात केली. हे काम इ.स. १५७१ पर्यंत सुरू होते. आणि याचाच तयार झाला दगडी कोट ‘किल्ले मेहरुब’ नावाने ओळखला जाऊ लागला. पुढे १५५७ मध्ये अलर्गखान याची येथे नेमणूक झाली. १६१२ याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा इब्राहीमखान याची नेमणूक झाली. याच्या मृत्यूनंतर १६१८ ते १६२० च्या कालावधीत सिद्धी सुरुदखान हा ठाणेदार झाला. इ.स.१६१७ मध्ये सिद्दी अंबर याने बादशहाकडून स्वतंत्र सनद मिळवून जहागिरी प्राप्त केली. जंजिरा संस्थानचा हा मूळ पुरुष समजला जातो. यानंतर सुमारे १९४८ पर्यंत २० सिद्दी नवाबांनी जंजिºयावर ३३० वर्षे सत्ता गाजवली. सिद्दी मुहमंदखान हा शेवटचा सिद्दी असताना ३ एप्रिल १९४८ मध्ये जंजिरा संस्थान भारतीय संघराज्यात विलीन झाले.

अजिंक्य किल्ला

जंजिºयाचे हे  सिद्दी हे मूळचे अरबस्तानाशेजारच्या अबिसीनियामधील म्हणजेच हबसाणातून (सध्याचा अफ्रिकेतील एथोपीया) आलेले.  धर्माने  मुस्लिम आणि पंथाने सुन्नी असणारे हे लोक सैद या जमातीचे होते. म्हणून त्यांना पुढे सिद्दी म्हणून लागते. हे दर्यावर्दी लोक शूर, काटक व दणकट होते. त्यांनी प्राणपणाने जंजिरा लढवला. जंजिरा संस्थानाला 'हबसाण जंजिरा ' असे म्हणत. त्या वेळच्या नाण्यांवरही हबसाण जंजिरा असा उल्लेख आहे. किल्याच्या प्रवेशद्वारावर एक मुद्रा कोरली आहे, ज्यात सिद्दी लोकांचे चित्र दिसते. उर्दू भाषेत लिहिलेली ही वाक्य आहेत.  जंजिºयाचे हे सिद्दी आफ्रिकेतून आले होते. किल्यामध्ये जवळ जवळ १९६० पर्यंत वस्ती होती. नंतर त्या सर्व लोकांना किल्ला सोडण्याचा आदेश दिला गेला. मग ते मुरुड आणि नजिकच्या परिसरात स्थायिक झाले. १४ आॅगस्ट १६५७ मध्ये छत्रपती शिवाजीमहाराजांनी रघुनाथ बल्लाळ सबनीस यांच्या हाती मोहीम दिली होती पण त्या स्वराज्याच्या पहिल्या मोहिमेत अपयश हाती आले. मे १६६९ ला महाराजांनी स्वत: मोहीम आखली. पण ती यशस्वी होऊ शकली नाही. या मोहिमेत अपयश हाती आले पण महाराजांनी जिंकलेल्या भागाची चोख व्यवस्था ठेवली होती तसेच दंडा राजपुरीला आरमारी गलबतांचा काफिला सज्ज ठेवला होता. शिवाजी महाराजांनी या किल्याजवळच सुमारे ५ ते ६ कि.मी. अंतरावर पद्मदुर्ग नावाचा मजबुत किल्ला उभारला होता.  यानंतर १६८२ मध्ये छत्रपती संभाजीमहाराजांनीही जंजिरा घेण्याचा प्रयत्न केला. संभाजीमहाराजांनी सुद्धा राजपुरीचा डोंगर फोडून सेतू बांधला होता. ज्याप्रमाणे प्रभू रामचंद्राने लंकेवर स्वारी करण्यासाठी रामसेतू बांधला, त्याप्रमाणे उसळत्या सागरामध्ये ८०० मीटरचा सेतू संभाजी महाराजांनी बांधला. जंजिरा ९०% नेस्तानाबूत केला होता. मात्र, ऐनवेळी खुद्द औरंगजेब दख्खनमध्ये उतरल्याने स्वराज्यासाठी संभाजीमहाराजांना ही मोहीम अर्धवट ठेवावी लागली.  पोतुर्गीज , इंग्रजांनाही हा किल्ला मिळवता आला नाही.  छत्रपती शिवाजी महाराजांनी सहा वेळा तर छत्रपती संभाजी महाराजांनी एकदा व पेशवेकाळात पाच वेळा असे एकूण बारा प्रयत्न मराठ्यांकडून केले गेले. पण मुळातच चोहोबाजूंनी पाण्याने वेढलेल्या, प्रचंड लाटा, अभेद्य तटंबदी, अभेद्य सिद्दीची कडवट माणसे तसेच किल्ला बांधताना दोन दगडांच्या सांध्यात शिशे ओतल्याने दगड





झालेला हा किल्ला. यामुळे जंजिरा घेण्याचा प्रयत्न फसला गेला. भक्कम बांधकाम आणि आजूबाजूला समुद्र, याशिवाय जंजिराच्या तटावर ५७२ तोफा होत्या. सध्या सुमारे ७५ लहान मोठ्या तोफा किल्यात दुरवस्थेत विखुरलेल्या स्वरुपात दिसून येतात. शत्रूच्या छातीत धडकी भरवतील अशा तीन अजस्त्र तोफा आहेत.  ‘चावरी’, ‘लांडा कासम’ आणि सर्वात मोठी व लांब मारा करून शकणारी ‘कलाल बांगडी’ तोफ. किल्ल्याला अभेद्य ठेवण्यात या तोफांची खरी कामगिरी आहे हे नक्कीच. किल्याचे प्रवेशद्वार पूर्वाभिमुख आहे. होडीने आपण प्रवेशद्वारापर्यंत पोहोचतो. या प्रवेशद्वाराच्या आत एक लाकडी दार आहे. प्रवेशद्वाराजवळ एक भिंतीवर शिल्प आहे. एका वाघाने चारही पायात चार हत्ती पकडले असून, शेपटीत एक हत्ती गुंडाळला आहे, असे ते शिल्प आहे. या चित्रातून जणू काही बुºहाणखान इतर सत्ताधीशांना सुचवतो आहे की, ‘तुम्ही हत्ती असाल, मी पण शेर आहे. या किल्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याचे धाडस करू नका. नाही तर गाठ माझ्याशी आहे.’’  सिद्दीने इथल्या सर्व शाह्यांना गुंडाळून टाकल्याचे ते चिन्ह आहे. या किल्ल्यातील सिद्दी सरदारांनी हा किल्ला सदैव अजिंक्य राखला.

किल्याविषयी :

किल्याची तटबंदी अभेद्य तर आहेच. पण एकामागून एक असे २२ अधिक २ बुरुजांची साखळी या किल्लाला अधिक अभेद्य करते. आपण प्रवेश करतो तो मुख्य दरवाजा येथून दोन बुरुजांमधील अंतर सुमारे ९० फुटांपेक्षा जास्त आहे. गाईडशिवाय गाड पाहावयाचा झाल्यास दरवाज्यातून आत शिरल्यावर उजवीकडील तटबंदीवरून तोफा पाहत गेल्यास अर्धा किल्ला पाहता येतो. तटबंदीवर जाण्यासाठी जागोजाग आतून पायºया आहेत. या पायºयांखालील मागील बुरुजांमध्ये सैनिकांसाठी टेहळणी करण्यासाठी खोल्याही बांधल्या आहेत. येथील दगडी कमानीवरील नक्षीकाम सुंदर आहे.  किल्याच्या महाद्वारावर नगारखाना आहे.
तटबंदीमधील कमानीमध्ये तोंड बाहेरू करून तोफा रचलेल्या आहेत. गडावरील पाहण्यासारख्या तोफा म्हणजे कलालबांगडी, लांडाकासम व चावरी. प्रचंड उन्ह, पाऊस आणि थंडीतही या तोफा इतके वर्षे टिकून आहेत. विशेष म्हणजे उन कितीही असले तरी या तोफांवर आरामात हात ठेवता येतो. उन्हामुळे त्या गरम होत नाहीत. बुरुजांच्या तटात खोल्या, कोठारे, उघड्या जंग्यांमधून बाहेर ‘आ’ वासून  डोकावणाऱ्या अजस्त्र तोफा व तेथून दिसणारे समुद्राचे दर्शन मनाला भुरुळ घालते. किल्ल्याच्या मध्यभागी सिद्दी रसूलखानाचा वाडा पडक्या अवस्थेत दिसून येतो.


संपूर्ण किल्ल्यावर पाण्याचे दोन मोठे गोडे तलाव आहेत. विशेष म्हणजे त्या काळी  हे पाणी पिण्यासाठी वापरत असत. अजूनही गडावरील तलाव पर्यटकांसाठी बंद करून  वरती पिण्यासाठी वापर केला जातो. पाणी पिण्यासाठी मोफत मात्र बाटलीत भरून घेण्यासाठी १० रुपये मोजावे लागतात. बरोबरच आहे. कारण पर्यटकांनी या तलावांमध्ये रिकाम्या बाटल्या, प्लॉस्टिकच्या पिशव्यांचा कचरा टाकून आपले अस्तित्व दाखवून दिले आहे.  तटबंदीवरुन आजुबाजूचा प्रदेश दिसतो. यात कासा उर्फ पद्मदुर्ग सामराजगड हेही येथून दिसतात. याशिवाय गडावर  पीरपंचायतन, घोड्याच्या पागा, सुरुलखानाचा वाडा सध्या पडकी इमारत दिसते

....आणखी काही फोटो पाहण्यासाठी येथे क्लिक करा....

 

सदर :  

किल्ल्याच्या बाहेरून दिसणारी तटबंदीच्या आतमध्येही छोटेखानी तटबंदी हे या किल्ल्याचे वैशिष्टच म्हणावे लागेल. बालेकिल्ल्याच्या मागे इमारत आहे. यालाच सदर असे म्हणतात. तलावाच्या बाजूने काही पायºयांनी थोडे वर गेल्यावर बालेकिल्ला (किल्ल्यावरील उंच भाग) लागतो. आज तेथे एक झेंडा वंदनासाठी उभारलेला आहे. येथून किल्ल्याचा परिसर तसेच समुद्रकिनाऱ्यांच्या परिसरावर लक्ष ठेवणे सहज शक्य होत आहे.

दर्या दरवाजा : 

गडाच्या पश्चिम बाजूला तटातून बाहेर पडण्यासाठी छोटा दरवाजा आहे. यालाच दर्या दरवाजा असे म्हणतात. संकटकाळी बाहेर पडण्यास याचा उपयोग होत असावा.

 

काही टिप्सच :

  • शक्यतो शनिवार व रविवार व इतर सार्वजनिक सुट्ट्या सोडून जंजिरा पहावा. अन्यथा प्रचंड गर्दीला सामोरे जावे लागेल.
  • किल्ला पाहण्यास फक्त ४५ मिनिटांचा कालावधी दिला जातो. आपण ज्या बोटीतून आलो आहे त्या बोटीचे नाव लक्षात ठेवावे. परत येताना दरवाज्यात थांबून बोटीचे नाव घेतल्यावर त्याच बोटीत बसावे अन्यथा चुकीच्या ठिकाणी पोहचाल.
  • किल्ल्यावर जरी पाणी असले तरी काही लोकांना ते पचत नाही. तेव्हा शक्यतो जवळ पाण्याची बाटली ठेवावी.
  • मुरुड गावात राहाण्याची सोय होऊ शकते. गावात जेवणाची सोय होते.
  • किल्ल्यावर जाण्यासाठी मुरुड गावापासून अर्धा तास लागतो. बोटींच्या क्षमतेनुसार. एका बोटीत सुमारे ४५ माणसेच बसवतात.
  • तिकीट दर : प्रौढांसाठी २२ रुपये (येऊन-जाऊन),  १२ वर्षांखालील : ११ रुपये

जंजिºयाला जाण्याच्या वाटा :

  • अलिबागमार्गे (मुंबईकरांना पेण, पनवेल मार्गे येण्यासाठी) : अलिबागमार्गे यायचे झाल्यास अलिबागवरुन रेवदंडामार्गे मुरुडला जाता येते. मुरुड गावातून बोटसेवा आहे. हे अंतर सुमारे ५० ते ५५ किलोमीटर आहे.
  • पाली-रोहा-नागोठाणे-साळाव-नांदगाव मार्गे:  (पुणेकरांना पाली-रोहा मार्गे येण्यासाठी : अलिबाग मार्गे न मुंबई गोव्या हायवेमार्गे जाता येते. फणसाड अभरण्यातून हा मार्ग जातो. वाटेत सुपेगाव लागते.
  • दिघीमार्गे:   कोकणातून यावयाचे झाल्यास महाड-गोरेगाव-म्हसळे-दिघी मार्गे किल्ला पाहण्यासाठी बोटसेवा उपलब्ध आहे.

....आणखी काही फोटो पाहण्यासाठी येथे क्लिक करा....

...हा ब्लॉग कसा वाटला या विषयी जरूर प्रतिक्रिया लिहा...

No comments:

कॉपी करू नका