Thursday, November 12, 2015

मढे घाट - नरवीर तानाजी पराक्रम

२०/९/२०१५ (रविवार)

‘मढे घाट’

नरवीर तानाजी मालुसरे यांच्या आठवणींना उजाळा देणारा ‘मढे घाट’. कोकणात उतरणाºया अनेक वाटा आहेत. त्यापैकीच तोरणा किल्याच्या पाठीमागील या वाटेविषयी....


गजाननाचे आगमन होऊन तीन दिवस झाले होते. रविवारी गौरीपूजन. किल्ले सिंहगडच्या मागील बााजूस असलेल्या मोगरवाडीत जेवणाचे आमंत्रण होते. काहीच किलोमीटरवर असलेला मढे घाट ही पाहून येऊ असे वडिलांनी सुचविले.  पावसाळ्यात यंदा कुठेच न गेल्याने जायचे ठरवले. सकाळीच घर सोडले. खडकवासला धरणाच्या बाजूने रस्ता कापत डाव्या बाजूला सिंहगड व परिसरातील वाढलेली सिमेंट काँक्रिटची जंगले बघत आमची गाडी पुढे जात होती. पुण्यापासून खडकवासाला व तेथून खानापूरगावातून सिंहगडवर न जाता सिंहगड डाव्या बाजूला ठेऊन मोगरवाडी या गावी जायचे होते. दोनशे ते अडीचशे वस्ती असलेले हे सिंहगडच्या पाठीमागील छोटे गाव. गाव तसे शिवकालीन. कारण  शिवकाळात मोगली छावण्या या परिसरात पडत असत. किल्याच्या परिसरात या छावण्या असत. मोगलवाडी या शब्दाचा पुढे मोगरवाडी असा नामोल्लेख सुरू झाला. १० वाजता चहा, नाष्टा घेऊन मढे घाट पाहण्यासाठी निघालो. मोगरवाडीपासून वेल्हा सुमारे १९ किलोमीटरवर तेथून पुढे ३२ किलोमीटरवर मढे घाट होता. 

 
खरेतर अनेकजण पुणे-नसरापूर-वेल्हा मार्गे मढे घाटात जातात. परंतु सिंहगड किल्याच्या मागील बाजूस असलेला पाबे घाट नुकताच चांगला केल्याचे समजले. पूर्वी सिंहगडावर अनेक वेळा वेगवेगळ्या मार्गाने वाºया झाल्या होत्या. त्यामुळे हा परिसरात चांगलाच आठवणीत होता. तेथून पाबे घाट १० किलोमीटरवर होता. घाट छोट्या छोट्या डोंगरावरून वेडीवाकउी वळणे घेत गेलेला. सिंहगडाचा विस्तार कसा आहे, हे पाबे घाटातून चांगले दिसते. रस्ता चांगलाच होता. ग्रामीण भागातून गेला असला तरी कोठेही खड्डे नव्हते. का यंदा पाऊस पडला नाही म्हणून तर रस्ते टिकले नसतील ना अशी ही शंका मनात आली. एका ठिकाणी ओढ्यात मनसोक्त डुंबत असलेले दोन बैल व गुराखी दिसले. दोन दिवसांपूर्वी पडलेल्या पावसाने यंदा प्रथमच ओढा भरल्याचे त्यांनी सांगितले. एकंदरीत पुढील वर्षी दुष्काळ नक्कीच असल्याची कुणकुण काहीशी आली. पर्यावरणाचा जो काही आपल्याकडून ºहास होतोय तेचेच हे परिणाम. असो. 
 
 
 

पाबेघाटातून अर्धा तासातच तोरणा किल्याच्या पायथ्याशी असलेल्या वेल्हे गावात पोहोचलो. तेथून पुढे मढे घाट ३२ किलोमीटरवर होता.  साडेबारा वाजून गेले होते. उशीर होऊ नये म्हणून गावात न थांबता तसेच पुढे गेलो. धरणाच्या कडेकडेने छोट्या वाड्यावस्त्या बघत आमची गाडी पुढे जात होती. मधेच थांबून गावकºयांना मढे घाट कुठे आहे असे विचारत पुढे जात होतो. तोरणा किल्याला प्रचंडगड असे का म्हणतात? याचे उत्तर त्याचा आवाका पाहून होतो. किल्याच्या खालून त्याचे रौद्र रुप पाहतच राहावे असे वाटते. आभाळात घुसलेले बुुरुज, तटबंदी केवळ अंदाजे दिसत होती. वाटेत कानंदीचं खोरं, भट्टी, पासली ही गावं सोडून आम्ही केळदला येऊन पोहोचतो. वेल्हे-केळद व केळद गावापासून दीड किलोमीटरवर मढे घाट असल्याचे समजले. 
 
 
 




तोरण्याजवळ असलेला मढे घाट हे ठिकाण पुण्यापासून अवघ्या ७० किमी अंतरावर. पावसाळ्यात या ठिकाणी दाट धुके, धबधबे व एकूणच निसर्गाचा चमत्कार पहावयास मिळतो. भटकंतींचा आनंद लुटण्यासाठी व ट्रेकिंगची आवड असणारे अनेकजण या ठिकाणाला आवर्जून भेट देतात. त्यातच दोन दिवसांपासून वरणराजाची कृपा झालेली होती. धो-धो पावसाने सर्वत्र पाणी झाले होते. ऐन पावसाळ्यात थंड झालेले ओढे, नाले, धबधबे पुन्हा सुरू झाले होते. पाहावे तिकडे पसरलेली हिरवळ, काहीसे पसरलेले धुके व ढग पाहत मन प्रसन्न झाले. सह्याद्रीच्या या भागाचं हे रूप खरेच पाहण्यासारखे आहे.
केळद गावाबाहेर वेळवण नदीवरचा छोटा पूल ओलांडून मढेघाटाकडे  आमची गाडी पोहचली. गाडी मोकळ्या मैदानावर उभी करून पुढील अंतर पायी निघालो. मोकळ्या-ढाकळ्या रस्त्याचे हे दीड किलोमीटरचे अंतर. पाऊस काहीसा येत जात होता. वडिलांचे गुडघे दुखत असून देखील थोड्याच्या चढणीचे हे अंतर पार केले. फार पूर्वी या ठिकाणाबद्दल वाचले होते. आज प्रत्यक्षात येथे आलो. याचा आनंद त्यांच्या चेहºयावर दिसत होता. रविवार असल्यामुळे भटकंती करणारे अनेक वीर या ठिकाणाही आल्याचे दिसले. कोण टू व्हिलरवर मैत्रांसोबत तर कोण मैत्रिणींसोबत. पंधराच मिनिटात वाटेने चालत एकदाचे मढे घाटातील त्या प्रसिद्ध धबधब्यापर्यंत आम्ही पोहचलो. नेहमी धबधब्याखाली मनसोक्त डुंबणारे यावेळी धबधबा जेथून सुरू होतो तेथून पाहत असल्याने वेगळाच आनंद होत होता. कोकणातील वाड्यावस्त्यांचे सुंदर दृश्य दिसत होते. धो-धो पडणारा तो धबधबा पाहून मन प्रसन्न झाले. दोन अडीच तासांचा प्रवास सार्थकी लागल्याने आनंदही झाला.  ओढ्यातच मी व माझ्या मुलाने बैठक मारून डुंबण्याचा आनंद घेतला. अंग पुसून  होतच होते. तो पर्यंत ताडताड-ताडताड पाऊस कोसळू लागला. एकदम ढग, धुके व पावसाने सर्व परिसर भरून गेला.  डोक्यावर छत्री घेऊन सुके कपडे सांभाळत झाडाच्या आढोश्याला येऊन थांबून राहिलो. सुमारे पंधरा मिनिटांनंतर काहीसा पाऊस कमी झाला. परतीचा मार्ग धरला. वाटेत पायी चालत येताना असलेल्या हॉटेलमध्ये गरमा गरम आले घातलेल्या चहा पिऊन, गप्पा मारत आम्ही परतीला लागलो.

‘मढे’घाटाविषयी थोडे :

अंधाºया रात्री कोंढाण्यावर स्वारी केलेले वीर तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाने सिंहगड ओळखला जातो.  शिवाजी महाराजांच्या शूरवीराने गड सर केला, पण स्वराज्याचे अनमोल असे रत्न नरवीर तानाजी मालुसरे या लढाईत पडले. पुढे शिवाजीमहाराजांनी त्यांचा ‘गड आला पण सिंह गेला’ या शब्दात गौरव केला.  मालुसरे गडावर पडले. गड जिंकला. मावळ्यांनी त्यांचा मृतदेह मूळगावी नेण्याचे ठरविले. तळकोकणातील पोलादपूरच्याजवळील उमरठ हे ते गाव.  कोकणात नेताना केळद गावाजवळील या घाटरस्त्याचा वापर केला गेला. या टेकडीवरून खाली उतरणाºया मागार्ला मढे घाट म्हणतात. ग्रामीण भाषेत मृत व्यक्तीला ‘मढे’ असे संबोधतात. त्यावरून या पायवाटेतील घाटाला मढे घाट असे म्हणतात. भटकी मंडळी मढ्या, उपांड्या किंवा मढ्या शिवथरघळ, कावळ्या किल्ला अशा भटकंत्या करतात. केळदहून पुढे मढे घाट सुरू होतो. पायवाटेने कोकणातील कर्णवाडी साधारणपणे २ ते ३ किलोमीटर अंतरावर असणाºया या गावात उतरतो.   मढे घाट, पुण्यापासून अगदी एका दिवसात सहज जाऊन येण्यासारखी जागा आहे. फक्त स्वत:चे वाहन असावे एवढेच.  हा घाट पुणे आणि रायगड जिल्ह्यांच्या सीमेवर आहे. पूर्वी घाटावरील गावांना व तळकोकणातील महाड, बिरवाडी बंदरांना जोडणाºया महत्त्वाच्या घाटावाटांमध्ये या घाटाचा उल्लेख येतो.  सह्यादी पर्वताच्या अनेक डोंगररांगा आहेत. प्राचीन काळापासून ते आजच्या अत्याधुनिक युगातही हया वाटा अजूनही वापरत आहेत. डोंगर एका बाजूने चढून गेल्यास दुसºया बाजूने उतरण्यासाठी या घाट रस्त्याचा वापर करावा लागतो. काही वाट या फक्त आणि फक्त पायी जाणे शक्य असते, तर काही गाडी रस्ते किंवा रेल्वेने शक्य आहे. मढे घाट, सवाष्णी घाट, बोचे घळ, बोप्या घाट, बैलघाट, शिंगणापूरची नाळ अशी कितीतरी घाटवाटा सह्याद्रीच्या वेड्यांना खुणावत असतात.

काहीसे मनातील :

नरवीर तानाजींच्या सिंहगड पराक्रमानंतर त्यांच्या मृत्यूची दु:खद आठवण ज्या सह्याद्रीने अजूनही जुपून ठेवली आहे. तो हा रांगडा मढे घाट. पावसाळी पर्यटनाच्या नावावर सध्या अनेक पर्यटन व ऐतिहासिक स्थळांची सुरू असलेली विटंबना पाहून मन खिन्न होते. मोठमोठ्यांदा गाणी लावून, हातात बाटल्या घेऊन झिंगत चाललेली ‘मढी’ बघीतली की वाटते. यांच्यातील एखादा तरी या ठिकाणावरून पडला पाहिजे. म्हणजे बाकीच्यांची तरी मस्ती जिरेल. या तळीरामांचा स्वैराचार मनाला अस्वस्थ करून जातो. खरे तर अशा ठिकाणी पर्यटनकाळात पोलिसांनी चौकी उभारून चेकिंग करूनच पर्यटकांना सोडले पाहिजे. जेणेकरून ऐतिहासिक स्थळे, व निसर्गाचा मान, आदब राखला जाईल. खरे तर याचे भान प्रत्येकानचे ठेवायला पाहिजे. छत्रपती शिवाजीमहाराज की जय म्हणत घाणारडी व्यसने करत असलेली तरणाईला लगाम लावायलाच हवा. व्यसनासाठी न जाता मोकळ्या मनाने जाऊन निसर्गाचा खरा आनंद घ्यायचा असेल तरच या ठिकाणी जावे हीच अपेक्षा.

कसे जाल :

  • मढे घाट, उपांड्या घाट अशा वाटांना भेट द्यायची असेल, तर स्वत:चं वाहन सोबत असलेलं बरे.
  • पुण्यातून सकाळी लवकर निघून एका दिवसात पाहता येण्यासारखे हे ठिकाण आहे.
  • फक्त पावसाचा अंदाज बांधून हे स्थळ पहा. कारण धो-धो पावसात हे ठिकाण अवघड होऊ शकते.
  • पुण्यापासून अंदाजे ७० किलोमीटर अंतरावर
  • घाटमाथ्यावरच्या गाव केळद गावाजवळ हा घाट आहे.
  • मढेघाटात जाण्यासाठी पुण्याहून दोन मार्ग आहेत.
  • एक पुणे-सातारा रस्त्यावरील नसरापूर फाट्याहून राजगड किल्याशेजारून वेल्ह्याला जाणारा
  • दुसरा खडकवासला धरणामागच्या खानापूरहून डाव्या हाताला पाबे गावाकडून वेल्ह्याला येणारा.
  • वेल्ह्याच्या बाजारपेठेतून हा रस्ता आपल्याला केळद गावाकडे घेऊन जातो.  
  • वेल्ह्यावरून किंवा नसरापूरहूनही थेट केळदपर्यंत जीपही ठरवता येते.  पण हे थोडे खर्चिक व वेळकाढू काम आहे.
  • मढे घाटाच्या वाटेवर हॉटेल असून, जेवणाची सोय होऊ शकते.

No comments:

कॉपी करू नका