Monday, November 18, 2024

वाह...दख्खनचा ताज!

औरंगजेबाच्या मुलाने आईच्या आठवणीत उभारली वास्तू




दक्षिणेतील ताजमहल म्हणून ओळख असलेला छत्रपती संभाजीनगर शहरातील “बीबी का मकबरा” हे स्मारक म्हणून प्रसिद्ध आहे. स्मारकास  “दक्षिणेतील ताजमहल” असे देखील म्हणतात. बीबी का मकबरा” ही वास्तू पूर्वीच्या औरंगाबाद, सध्याच्या छत्रपती संभाजीनगर शहरातील बेगमपुरा नगरामध्ये असून जवळून खांब नदी वाहते. येथून जवळच औरंगाबाद लेणी, पानचक्की, सोनेरी महल यासारख्या प्रसिद्ध वास्तू देखील आहेत.
ही वास्तू आग्राच्या ‘ताजमहल’ ची प्रतिकृती आहे. हा मकबरा 1676 मध्ये  बांधला गेला. औरंगजेब याची राणी रबिया-उल-दौरानी (दिलरास बानो बेगम) यांचा मुलगा आजम शहाने आपल्या आईच्या स्मरणार्थ ‘बीबी का मकबरा’ म्हणून बांधली.




हे छत्रपती संभाजीनगर हे शहर एक ऐतिहासिक आकर्षण बनले आहे. इतिहासप्रेमी, वास्तुकला रसिक, आणि देशी तसेच विदेशी पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहे.औरंगाबाद रेल्वे स्थानकापासून ५ किमी अंतरावर बीबी का मकबरा ही औरंगाबादमध्ये एक सुंदर समाधी आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाद्वारे देखरेख केलेले, बीबी का मुकबरा हे औरंगाबादमधील पर्यटन स्थळांपैकी एक आहे.
बीबी का मकबरा व ताजमहल यामध्ये साम्यता असावी पण खर्च कमी असावा म्हणून बीबी का मकबराचा फक्त कळसाचे बांधकाम पांढऱ्या संगमरवरात बांधले गेले आहे. या समाधीसाठीचा संगमरवर जयपूरजवळच्या खाणीतून आणण्यात आला होता. 









कबरीच्या चारही बाजूने संगमरवरी जाळ्या बसवल्या आहेत.  यामध्ये संगमरवरचा कमी प्रमाणात वापर झाला आहे. मुख्य करून लाल आणि काळा दगड, तसेच मुख्य गोल घुमटासाठी संगमरवर वापरले गेले आहे. 
भिंतींना पांढऱ्या मातीच्या मिश्रणाचे प्लास्टर करून नक्षीदार आणि सुशोभित केले आहे. मुख्य घुमट संगमरवर बनवलेला आहे आणि भिंतींवर तसेच घुमटावर नाजूक नक्षीकाम केलेले आहे. 
येथेच मधोमध आजम शाहची आई दिलरास बानो बेगम यांची कबर आहे. कबरीच्या वरच्या बाजूस असणाऱ्या नक्षीदार खिडक्यांमधून सकाळी सूर्याची किरणे आणि रात्री चंद्राचा प्रकाश कबरीवर पडेल अशी रचना प्रसिद्ध वास्तूविशारद ‘अत्ता-उल-अल्ला’ यांनी केली आहे. मकबऱ्याच्या सुरक्षेसाठी येथे भक्कम तटबंदी उभारण्यात आली आहे. तटबंदीच्या चारही बाजूंना अष्टकोनी बुरूज आहेत.









मकबऱ्याभोवती एक विस्तीर्ण बाग आहे. मुघल शैलीतील चारबाग रचना आहे. बागेत फुलांची झाडे लावली आहेत. फवारे, आणि पाण्याचे वाहते झरे आहेत. पण आम्ही दुपारी गेलो असल्यामुळे आम्हाला ते पाहायला मिळाले नाही.
चार कोपऱ्यात उभे असलेले मिनारामुळे हे स्मारक ताजमहलची आठवण करून देते.  या मकबऱ्याच्या निर्मितीत केवळ सात लाख रुपये इतका खर्च लागला होता, जो ताजमहालच्या निर्मितीत लागलेल्या जवळपास ३.२० करोड रुपयांन पेक्षा खूप कमी होता. येथे रात्रीची विद्युत रोषणाई तसेच पाण्याचे करंजे सुरू केले आहेत.

कॉलिन मॅकेन्झी  १८१६ साली बीबी का मकबराचे चित्र रेखाटले आहे. ते ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीत लष्करी अधिकारी होते. या पेटिंगकडे पाहून पूर्वी बीबी का मकबरा कसा असावा याची कल्पना येते. 


हे सुधारायला हवे : 

जगप्रसिद्ध वेरूळ-अजिंठा लेणी, दौलताबादचा किल्ला, बीबी का मकब-यामुळे औरंगाबाद शहर पर्यटनाच्या जागतिक नकाशावर येते. या पर्यटनस्थळांमुळेच औरंगाबादला राज्याच्या पर्यटन राजधानीचा दर्जा मिळालाय पण येथील प्रशासनाच्या उदासिनतेमुळे पुरातन वास्तू सातत्याने दुर्लक्षित राहिल्या आहेत. 
जगातील सात आश्चर्यांपैकी एक असणा-या ताजमहालाची प्रतिकृती असलेला बीबी का मकबराही शासनाच्या अनास्थेला बळी पडतोय. मकब-याच्या अनेक भिंतींचे प्लास्टर जागोजागी उखडले आहे. सुशोभिकरणासाठी लावलेल्या झाडांची कटिंग न केल्यामुळे दुरवस्था झाल्याचे दिसून येते. 
पर्यटकांसाठी प्रशासनाने आतमध्ये पिण्याच्या पाण्याची मोफत सोय करून देणे गरजेचे आहे. दोन वर्षांपूर्वी येथील एका मिनाऱ्याचा थोडा भाग कोसळला होता. मकबरा परिसरातील मिनार वर जाण्यास पर्यटकांना बंदी आहे. 
अपुऱ्या सुविधा असल्याने पर्यटक मकबऱ्याकडे पाठ फिरवतात

पाहण्याची वेळ : सकाळी ८ ते रात्री ८ पर्यंत.
तिकिट दर : प्रत्येकी २५ रुपये.
बंद : शनिवारी बंद असते.

बीबी का मकबरा जवळील पर्यटन स्थळे:
१. औरंगाबाद लेणी (बीबी का मकबरापासून ३.५ किमी अंतरावर)
२. पानचक्की (बीबी का मकबरापासून २.५ किमी अंतरावर)
३. सिद्धार्थ उद्यान व प्राणी संग्रहालय (बीबी का मकबरापासून ४ किमी अंतरावर)
४.  देवगिरी किल्ला (बीबी का मकबरापासून १७ किमी)
५. भद्रा मारुती मंदिर (बीबी का मकबरापासून २८ किमी अंतरावर)
६. वेरूळ लेणी (बीबी का मकबरापासून २९ किमी अंतरावर)
७. घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग (बीबी का मकबरापासून ३० किमी अंतरावर)


No comments:

कॉपी करू नका