इंग्रज लेखकांच्या लेखांत अजंठा लेणीचा उल्लेख ‘अजिंठ्याची लेणी’ असा असला, तरी तेथील स्थानिक लोक त्यांचा उल्लेख ‘फर्दापूरची लेणी’ असा करतात. छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यात सुमारे १०० किलोमीटर असलेली ही लेणी आहे. सह्याद्री पर्वताच्या सातमाळ रांगेतील इंध्याद्री शाखेत ही लेणी कोरलेली आहे. या लेणीचा शोध १८१८ मध्ये शिकारीसाठी आलेल्या बिट्रीश अधिकारी स्मिथ ह्या अधिकाऱ्याला ही लेणी प्रथम दिसली.
ही गुहा वेरुळ लेण्यांपेक्षा बरीच जुनी आहे. वाघूर नदीच्या काठावर, अजिंठा लेणी घोड्याच्या नालाच्या आकाराच्या या डोंगरात ही लेणी कोरली आहेत. ही लेणी युनेस्कोच्या जागतिक वारसामधील स्थळ आहेत. अनेक विदेशी पर्यटक या ठिकाणी लेणी पाहण्यासाठी येथे येतात. येथे एकूण ३० बौद्धधर्मीय लेणी आहेत. त्यांतील ९, १०, १९, २६ व २९ ही चैत्यगृहे असून बाकीचे पंचवीस विहार आहेत. या लेण्यांमधील भिंतींवर भगवान बुद्धांच्या अनेक शिल्पांसोबतच बौद्ध धर्माशी संबंधित अनेक चित्रे काढण्यात आली आहेत. तीस लेण्यांपैकी प्रत्येक गुहांमध्ये एक चैत्यागृह आणि एक विहार आहे. चैत्य गृह लेण्यांमध्ये देवतेची पूजा केली जात होती, उर्वरित लेणी विहार आहेत, ज्यात बौद्ध अनुयायी आणि विद्यार्थ्यांसाठी निवासस्थान म्हणून काम करत होत्या.
इतर शैलगृहांप्रमाणे अजिंठ्याची शैलगृहे त्यांतील वास्तुकलेसाठी आणि मूर्तिकलेसाठी प्रसिद्ध असली, तरी येथील लेणी मुख्यत्वे चित्रकलेकरिता प्रख्यात आहेत. चित्रे काढण्यासाठी भिंतींवर प्रथम माती, शेण, भाताचा भुस्सा किंवा ताग आणि तूस ह्यांच्या वस्त्रगाळ मिश्रणाचा गिलावा चढवीत आणि त्यावर चुन्याचा एक हलका हात मारून किंवा संदलाचा चकचकीत पातळ थर चढवून त्यावर गेरूने प्रथम चित्रांची बाह्यरेषा रेखाटून त्यात क्रमाक्रमाने रंग भरीत. अजिंठ्याच्या चित्रकारांनी मुख्यतः पांढरा, काळा, पिवळा, हिरवा, तांबडा आणि निळा हे रंग आपल्या चित्रकलेत वापरले आहेत. यांपैकी पुष्कळसे रंग नैसर्गिक पदार्थांपासून केलेले आहेत व अशी मातीतील मूलरंगद्रव्ये अजिंठ्याजवळ सापडतात. चित्रप्रसंग जातकादी ग्रंथांतील बुद्धाच्या कथांतून निवडलेले आहेत. याशिवाय बौद्ध धर्मग्रंथांतून वर्णिलेल्या काही देवदेवता, यक्ष, किन्नर, गंधर्व, अप्सरा आणि निरनिराळे प्राणी यांचीही चित्रे आहेत. छतांवर आणि स्तंभांवर वेलबुट्टीचे नमुने चितारलेले आढळून येतात. स्त्रियांच्या चित्राकृती चित्रकारांनी इथे काढल्या आहेत. काही लेणी अपूर्ण आहेत व काही पडझड झाल्यामुळे खराब झाली आहेत.
मंडपाच्या तिन्ही बाजूंस भिक्षूंकरिता खोल्या खोदलेल्या असून मंडपाच्या भिंतींवर चित्रे आहेत. ही चित्रे जातकादी कथांतील असून त्यांतील पद्मपाणीचे चित्र प्राचीन चित्र सुंदर आहे. राजकन्या आणि अप्सराही यांचीही चित्रे रेखाटली आहेत. एकात बुद्धाची भव्य मूर्ती आणि दुसऱ्यात दोन यक्षांच्या भव्य मूर्ती आहेत. किन्नर ह्यांच्या चित्राकृती आहेत. नागराजा, हत्ती, घोडे आदी प्राणी दाखविले आहेत. येथील लेण्यांतील विहारात काही ठिकाणी अष्टकोनी स्तंभ असून सर्वांवर नक्षीकाम केले आहे. लेणीमध्ये खांबावर वेलबुट्या कोरलेल्या असून, प्रत्येक खांबावर सारखीच वेलबुट्टी कशी कोरली असेल याचे आश्चर्य वाटते. येथील चित्रप्रसंग जरी बुद्धजीवनावर आधारित असले, तरी त्या सर्वांतून तत्कालीन समाज कसा असावा यावर प्रकाश पडतो. बरीचशी चित्रे काळाच्या ओघात नष्ट झालेली आहेत. भित्तिचित्रांचे जतन हा एक मोठा प्रश्न आहे.
ही लेणी अर्धवट कोरली गेली आहे. अर्धवट लेणी असली तरी त्याकाळी खोदकाम करून जमिन एकसारखी कशी करत असतील, खोदकाम करताना सुरूवात कुठे करत असतील, खिडक्या, भिक्षुंसाठी निवास कसे करत असतील याची कल्पना येथील खोदकाम पाहताना दिसून येते.
वेळे अभावी मला ही संपूर्ण लेणी शांतपणे पाहता आली नाही. त्यामुळे येथे जेवढे पाहिले तेवढेच वर्णन केले आहे. ही लेणी पाहण्यासाठी कमीत-कमी दोन ते चार दिवस नक्कीच लागतील किंबहुना त्यापेक्षा जास्तच दिवस.
कसे जावे : छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) पासून सुमारे १०० किलोमीटर अंतरवर आहे. स्वत:चे वाहन असल्यास थेट अजंठा लेणीच्या पायथ्यापर्यंत पोहचता येते. शिवाय छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) पासून येथे एसटी देखील आहेत. शिवाय खासगी वाहनाद्वारे येथे पोहोचता येते.
पर्यावरणाच्या दृष्टीने लेणीपर्यंत खासगी वाहने घेऊन जाण्यास परवानगी नाही. त्यामुळे सर्वच वाहने खाली पायथ्याशी ठेवावी लागतात. येथून महाराष्ट्र एसटी सेवेकडून वरपर्यंत एसटीची सोय केली आहे. शेवटची एसटी खालून प्रवासी वाहतूक ५ वाजता बंद होते. सायंकाळी ६ वाजता लेणीवरून शेवटची एसटी ६ वाजता निघते. प्रत्येक प्रवाश्याला याच एसटीतून जावे व यावे लागते. वर जाण्यास १५ मिनिटांचा वेळ जातो.
लेणीच्या पायथ्यापाशी कोरीव काम केलेल्या अनेक वस्तू पाहण्यास मिळतात. ज्यात प्रामुख्याने गौतम बुद्धांच्या मूर्ती आहेत. याशिवाय वेगवेगळे खडक देखील आहेत.

तिकीट दर : २५ रुपये प्रति माणसी.
अजंठा लेणी पायथापासून वर लेणीपर्यंत एसटीने : प्रति व्यक्ती १५ रुपये.
कार पाकिंग : 75
लेणीची वेळ : सकाळी ६ ते सायंकाळी ६ पर्यंत. (सोमवारी बंद असते)
No comments:
Post a Comment