Wednesday, March 19, 2014

मावळसृष्टी

पर्यटकांच्या भटकण्याच्या यादीत कोकण, महाबळेश्वर, लवासा, ताम्हीणी घाट, माळशेज घाट ही स्थळे भाव घावून जातात. या नेहमीच्या या ठिकाणांऐवजी एखाद्या नव्या व निवांत ठिकाणी हिंडायला प्रत्येकालाच आवडते. नेहमीच्या पर्यटनस्थळांवर वाढणारी गर्दी व त्यापेक्षाही त्यांचा नकोसा असलेला उच्छाद, हुल्लडपणा नको असतो. पुणे-मुंबईपासून तासाच्या अंतरावर असलेल्या लोणावळा-खंडाळा परिसरातील मावळातील पर्यटनस्थळांकडे पर्यटक आकर्षित होऊ लागला आहे. येथील ऐतिहासिक किल्ले, पवना, भुशी डॅम, धबधबे, नवीन उभारण्यात आलेली मंदिरे पाहण्यासाठी पर्यटक येथे येऊ लागला आहे. निर्सगाने मुक्तहस्ताने सौंदर्याची उधळण या परिसरावर केली आहे. मावळातील काही परिसर सोडला तर पर्यटनदृष्टया हा परिसर उपेक्षित राहिला आहे त्या विषयी.... 


सध्या विकएंड साजरा करण्याचा प्रघात आपल्याकडेही सुरू झाला आहे. दोन-चार दिवस सलग सुटी आल्यास घरातील मंडळी कुठे तरी बाहेर जाण्याचा बेत आखतात. मग चर्चा सुरू होते ती नवीन ठिकाणे पाहण्याची पण तिच तिच ठिकाणे पाहून कंटाळलेल्या पर्यटकांना नवे पर्यटनस्थळ पाहिजे असते. अशीच काही पर्यटन स्थळे त्यांचे स्वागत करण्यासाठी मावळात आहेत.  त्यातच पुण्याला पर्यटननगरीचा दर्जा मिळाल्यानंतर देशी- विदेशी पर्यटकांची पावले आपोआप वळू लागली. लोणावळा, खंडाळा, महाबळेश्वर या ठिकाणांना आणखीन एक नवा पर्याय म्हणून ‘लवासा’, सहारा सिटीसारखे मानवनिर्मित शहरे स्वागतासाठी तयार होऊ लागली आहेत.
छत्रपती शिवाजीमहाराजांच्या सैन्यातील सैनिकांना मावळे म्हणत. हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या कार्यात महत्त्वपूर्ण सहभाग असलेल्या या मावळ्यांना ‘मावळे’ हे नाव पडले ते ‘मावळ’ सह्याद्रीच्या दोन डोंगररांगांच्या मधल्या खोºयात पसरलेले आहे. सह्याद्रीला खेटून आणि देशावरचा भाग डोंगरावरून उतरणाºया नदीचे खोरे  म्हणजे  मावळ.  पुणे जिल्ह्यात एकूण बारा मावळ आहेत. यात आंदर मावळ, कानद मावळ, कोरबारसे खोरे, गुंजन मावळ, नाणे मावळ, पवन मावळ, पौड मावळ, मुठा खोरे, मुसे खोरे, रोहिड खोरे, वळवंड खोरे, हिरडस मावळ यांचा समावेश होतो.  यातील तीन मावळ लोणावळा-खंडाळा परिसरात येतात ते म्हणजे आंदर, पवन आणि नाणे मावळ. पवन मावळात पवना नदी उगम पावते आणि वाहते म्हणून याला पवन मावळ म्हणतात. मराठेशाहीच्या पराक्रमाची साक्ष देणारे लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना, राजमाची किल्ले या परिसरात आहेत. तर कार्ला, भाजे, बेडसे या बौद्धकालीन लेण्या देखील आहे. एकविरा देवी, भंडारा डोंगर, भामचंद्रा डोंगर, तुकाराममहाराजांच्या वास्तव्याने पावन झालेली देहूनगरीही या परिसरात आहे. पवनामाई व इंद्रायणी नदी या परिसरातून वाहते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पुणे जिल्ह्यातील १७ नवीन पर्यटन स्थळांना ‘क’ दर्जाचे पर्यटन स्थळ म्हणून मान्यता देण्यात आली आहे.  या यादीत मावळ तालुक्यातील लोणावळा, खंडाळा, कार्ला,  तुंग आणि तिकोना किल्ल्यांचा समावेश करण्यात आला आहे. या किल्यांच्या विकासासाठी पर्यटन आणि सांस्कृतिक खात्याच्या वतीने वीस कोटींचा निधीही मंजूर करण्यात आला आहे. पुरातन लेणी म्हणून ओळखल्या जाणाºया कार्ला लेणीला ‘क’ दर्जा प्राप्त झाला आहे. महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) वतीने कार्ला येथे सुमारे ३ कोटी ६६ लाख रुपये खर्च करून जलक्रीडा केंद्राची उभारणी करण्यात आली आहे.  पर्यटनातून या भागातील लोकांना रोजगार मिळावा तसेच पर्यटकांची संख्या वाढावी यासाठी महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत.


मावळात वर्षाविहाराचा आनंद

पर्यटकांना आकर्षित करणारे मोठे जलाशय तर मावळचे वैशिष्ट्यच म्हणावे लागेल. पवना, वळवण, आंद्रा, भुशी, तुंगार्ली, शिरोता, ठोकळवाडी, वडीवळे धरणे मावळच्या समृद्धतेची साक्ष देतात.   पावसाळ्यात मावळातील निसर्गसौंदर्य बहरू लागते. डोंगरातून धबधबे खळाळून वाहू लागतात व आपसूकच पर्यटकांचे पाय धरण क्षेत्राकडे वळतात. वर्षाविहाराचा आनंद लुटण्यासाठी सुटीच्या दिवशी या परिसरात पर्यटक गर्दी करतात. पावसाळ्यात दहा लाखांहून अधिक पर्यटक लोणावळ्याला येतात. लोणावळ्यातील प्रसिद्ध चिक्की, जेली खरेदीसाठी येथील दुकानांतून ग्राहकांची गर्दी असते. धरणाच्या जलाशयात बोटिंग व्यवसाय, गाइड, फोटोग्राफी यांसारखे व्यवसाय सुरू झाले आहेत. या देखण्या परिसरामध्ये नौकाविहाराचीही व्यवस्था सुरू करण्यात झाली आहे. एक दोन दिवस निवांत पाहण्यासारखी ठिकाणे या परिसरात असताना लोणावळा व खंडाळ्यातील मोठ्या हॉटेलचे दर मात्र सर्वसामान्यांच्या खिशाला न परवडणारसारखे आहे. हे दर आवाक्यात आल्यास या भागात येणाºया पर्यटकांची संख्या वाढू शकेल. यामुळे पर्यटक लोणावळा खंडाळ्यापुरताच मर्यादित न राहता उर्वरित  मावळातील पर्यटनाला चालना मिळू शकेल. संततधार पाऊसाने मावळातील आतील गावातील रस्ते खराब होतात. काही गावांचा संपर्कही तुटतो.  पर्यटकांचे जथ्थेच्या जथ्थे गाड्या भरून  आल्याने लोणावळा, खंडाळा परिसरात वाहतूक, पार्किंग आणि शुल्कवसुलीचे नियोजन ढासळते. पावसाळ्यात तर पोलिसांना गर्दी आवरता येत नाही. गाडी पुढे सरकत नाही. ४-४ तास ट्रॅफिक जॅमचा अनुभव येथे आलेल्या पर्यटकांना घ्यावा लागतो. यातून होणाºया दुर्घटना, पाण्यात वाहून जाणे, किरकोळ वादावादी आदी दुर्घटनांना पर्यटकांना सामोरे जावे लागते.
 आंदर मावळ व नाणे मावळाच्या परिसरातील नव्या नैसर्गिक स्थळांचा शोध घेत पर्यटक येथे पोहचू लागला आहे. उंच डोंगर, शांत वातावरण, हिरवाईमुळे बॉलीवूडमधील चित्रपट निर्मातेही या भागाकडे आपला मोर्चा वळवितात. अनेक हिंदी चित्रपटांचे चित्रीकरणही या भागात करण्यात आले आहे.  नाणे व आंदर मावळामध्ये खास पावसाळ्यातील निर्सगाची देखणी सजावट पाहण्यासाठी या भागात येतात.

ट्रेकर्स लोकांची पंढरी

थंड हवेचे ठिकाण म्हणून ‘लोणावळा-खंडाळा’ प्रसिद्ध आहेच. पण तरुणांच्या आवडत्या ट्रेकिंगसाठीही हे क्षेत्र प्रसिद्ध आहे. मावळातून कोकणात उतरणाºया पायवाटा व मोठे घाटरस्ते आहेत. पावसाळा सुरू झाला की तरुणांच्या चर्चेत येतो तो लोणावळा खंडाळाचा परिसर. हिरवागार डोंगर, हिरवी-पोपटी भातखाचरे, कडेकपारीतून कोसळणारे धबधबे व सोबतीला सह्याद्रीच्या अंगाखांद्यावरील शिवाजीमहाराजांचे गडकोट. त्यांना येथील निर्सग वेड लावतो. मग वेडे होण्यासाठी भटक्यांची पावलेही या मावळाकडे वळतात. लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना, राजमाची किल्ला, ढाकचा बहिरी म्हणजे ट्रेकर्स लोकांची पंढरीच. कुणी इथल्या लेण्या-दुर्गावर निघतात, काही इथल्या धरणांवर विसावतात, काहींना फक्त इथल्या वाटांवर फिरण्यात मजा वाटते. विविध जातीची फुले, पक्षी पाहण्यात वेळ निघून जातो. हाडशी जवळील सत्यसाई मंदिर, लोहगडाजवळील प्रति पंढरपूर परिसर, देहूरोडजवळील कुंडमळ्यात निसर्गाची किमया पाहता येते. इंद्रायणी नदीच्या पाण्याने येथील कातळात रांजणखळगे तयार झाले आहेत. मावळातली दिवसभराची ही भटकंती चिंब भिजवून टाकते.
 येथील सगळाच भाग निसर्गत:च सुंदर आहे. येथे पोहचण्यासाठी घाटरस्ते, मोठे टुमदार बंगले, भव्य हॉटेल्स, हेलीपॅड, उद्याने, धरणे पर्यटकांना आकर्षित करतात. हा सारा परिसर अमूल्य अशा झाडा-झुडुपांचा आहे. मावळातील या परिसरात अनेक औषधी वनस्पती सापडतात. शनिवार, रविवार या ठिकाणी असंख्य ट्रेकर्स पाठीवर बॅग घेऊन येथील डोंगरवाटा तुडवताना दिसतात. मात्र, दळणवळणा अभावी खासगी वाहन घेऊनच ही  भटकंती करावी लागते.
भरपूर पाऊस, सुपीक जमीन अशा जमेची बाजू असताना या भागात़ील शेतकºयांना मात्र योग्य मार्गदर्शनाअभावी या गोष्टींचा पुरेसा फायदा होताना दिसत नाही. धरणे आणि पाण्याचा मुबलक साठा असताना शेतकरी मात्र तहानलेले आहेत. पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गाचा बरचसा भाग हा मावळातून गेल्याने हा परिसर ओळखला जाऊ लागला. गहुंजे येथील क्रिकेटप्रेमींचे सुब्रोतो स्टेडियमुळे तर मावळ आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखले जाऊ लागले.
पुणे-मुंबईपासून तासाच्या अंतरावर येथील ठिकाण असल्याने साहजिकच या परिसरात गृहप्रकल्पांना वाढती मागणी होऊ लागले. ‘निसर्गाच्या कुशीत ‘स्वत:चे हक्काचे घर’ अशा जाहिरातींना प्रचंड प्रतिसाद येऊ लागला आहे. यासाठी शेतकºयांच्या जमिनी कवडीमोलाने खरेदी करून बांधकाम होऊ लागले आहे. बांधकामासाठी वृक्षतोड, डोंगराच्या जवळील जागा खरेदी करून डोंगराची लचकेतोड थांबवली पाहिजे. धरणाच्या परिसरात बांधकामे होऊ लागली आहे. येथील झपाट्याने होणाºया विकासावर कोणाचातरी अंकुश असणे गरजेचे आहे. अन्यथा हे पर्यटनक्षेत्र धनाढ्य लोकांच्याच हाती राहून सर्वसामान्य पर्यटकांना मात्र, यापासून वंचित राहावे लागेल. लोणावळा, खंडाळात हळूहळू मानवी प्रदूषणाचा फटका बसत आहे. ऐतिहासिक किल्ले व नैसर्गिक वरदान असलेला हा परिसर आहे. हा ठेवा जपण्यासाठी सरकारकडून योग्य उपाययोजनांची गरज आहे. पर्यटकांसाठी नवा पर्याय ठरू लागलेल्या या क्षेत्रात दळणवळणाचा अजूनही अभाव दिसून येतो. या सर्व गोष्टींचा विचार पर्यटनाच्या दृष्टीने होणे गरजेचे आहे अन्यथा निर्सगाची हानी होऊन झालेले पर्यटन कायम कामाचे राहणार हाच प्रश्न आपणापुढे उभा राहतो.

 

मावळातील प्रेक्षणीय पयर्टन स्थळे  

पवना धरण
लोहगड
विसापूर
तुंग
तिकोना
ढाकचा बहिरी
नागफणी
प्रति पंढरपूर
ड्युक्सनोज (नागफणी)
बिर्ला गणेश मंदिर
शिरगावचे साईबाबा मंदिर
देहूगाव
घोरावडेश्वर मंदिर
आय्यप्पा स्वामींचे मंदिर
बेडसा, भाजे, कार्ला ही लेणी
श्री क्षेत्र सत्यसाई पांडुरंग मंदिर, हाडशी, पुणे

Friday, March 14, 2014

चित्रबलाकावर ‘अवकळा’

दोन आठवड्यांपूर्वी इंदापूरजवळ असलेल्या सासुरवाडीला जाण्यासाठी निघालो. पुणे - सोलापूर महामार्गाने प्रथम सिद्धटेकच्या गणपतीचे दर्शन घेऊन पुढे राशिनमार्गे भिगवणला गेलो. वाटेत चिंचेच्या झाडावर घरटी केलेल्या या चित्रबलाक पक्षांनी आमचे स्वागत केले.  मागील आठवड्यात या उजनी धरणाच्या परिसरात प्रचंड गारपिट झाली. रोहित पक्षी (फ्लेमिंगो), चित्रबलाक (पेंटेड स्टॉर्क) यांचे सारंगागार म्हणून प्रसिद्ध असलेल्या इंदापूर, भिगवण व उजनी परिसरातील या क्षेत्राला अवकाळी गारांच्या पावसाचा तडाखा बसला.  वर्तमानपत्रात आलेल्या बातम्यां वाचून मन्न खिन्न झाले. ऐन विणीच्या हंगामात गारांचा पाऊस झाल्याने पक्षांचा हंगाम वाया गेला आहे. सुमारे ५०० अंडी व ६०० च्या जवळपास पक्षी मृत्युमुखी पडले वाचून मन दु:खी झाले. इंदापूराहून या पक्षांना पाहून येऊन मला जेमतेम काहीच दिवस झाले होते. त्या विषयी....

        


  गजानानचे दर्शन घेऊन राशिन मार्गे भिगवणला जाण्यासाठी निघालो. रस्ता चांगला असल्याने पाऊण तासात डिकसळला पोहचलो. वाटेत चिंचेच्या झाडावर चित्रबलाक पक्षांची घरटी पाहिली. साधारणपणे २ ते अडीच फुट उंच असलेला हा पक्षी मुलाने प्रथम एवढ्या जवळून पाहिल्याने आनंदाने उड्याच मारल्या.  दुसºया दिवशी सकाळी इंदापूरातील तहसील कार्यालयाच्या जागेत असलेल्या चिंचेच्या झाडांवरील चित्रबलाकाची घरटी पाहण्यासाठीही गेलो. शेजारी लोकवस्ती असून देखील चित्रबलाक पक्षी दर वर्षी आपले घरटी करतात. झाडाखाली पिल्लांसाठी आणलेल्या माशांचा सडा पडलेला दिसला. एवढ्या लांबून कोणत्याही नकाशाशिवाय हे पक्षी दरवर्षी कसे येतात? याचे आश्चर्य वाटल्यावाचून राहिले नाही.  रोहित पक्षी मात्र धरणक्षेत्राच्या आतील बाजूस असल्याने मला पाहता आले नाही.

चित्रबलाक पक्ष्याविषयी :
पिवळ्या रंगाची मोठी आणि लांब चोच, चेहरा पिवळ्या रंगाचा त्यामुळे हा पक्षी मोठा मजेशीर व चेहºयाने गरीब दिसतो.   उर्वरित अंगावर पांढरी पिसे आणि त्यावर हिरवट काळ्या खुणा, पंख गुलाबी असून छातीवर आडवा काळा पट्टा नर व मादी दिसायला सारखेच असतात. पिल्लांसाठी आणलेला खाऊ देत असताना त्यांचा होणारा आवाज मजेशीर होता.







दोष निसर्गाचा का मानवाचा?
अवकाळी पावसाने महाराष्ट्रभर झालेला निसर्गाचा कोप व गारपीट यामुळे शेतकऱ्यांचे ओतोनात नुकसान झाले. हे नुकसान कदाचित भरूनही निघेल. मायबाप सरकार किरकोळ रकमा व दिलासा देऊन शेतकऱ्यांना तारेल देखील. विणीचा हंगामासाठी आलेल्या या पक्ष्यांची अंडी व नवजात पिले अवकाळी गारांच्या माºयाने मृत्यूमुखी पडली. उजनी जलाशयाला लागून असलेल्या भादलवाडी तलावावर या परिसरात चित्रबलाकांसह,  ग्रे हेरॉन, करकोचा, फ्लेमिंगो (रोहित पक्षी) या शिवाय अन्य पक्षांची ये-जा सुरू असते.  उजनी धरण पाणलोट क्षेत्रातील मासे, बेडूक, साप, इतर कीटकांवर हे पक्षी गुजराण करतात.  दर वर्षी नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवडयात चित्रबलाक इंदापूरला येतात. उजनी धरणाच्या परिसरात त्यांची अनेक घरटी दिसून येतात. गवत, काड्या वगैरे वापरून ते मोठे घरटी बनवितात. चिंचेच्या झाडावर साधारणपणे पंचवीस ते तीस घरटी पाहून जणू ही त्यांची मोठी कॉलनीच आहे आहे असे वाटले. सोबतीला वटवाघूळ देखील स्वत:ला उलटे टांगून या पक्षांचा दिनक्रम पाहत बसलेली दिसली. कच्छच्या रणातून दर वर्षी विणीच्या हंगामासाठी येणाऱ्या या सैबेरियन चित्रबलाक पक्षांना मानवनिर्मित प्रदूषणाचा चांगला फटका बसला आहे. जागतिक तापमानवाढ, निसर्गातील हवामानाचे होणारे बदल, धरणातील जलप्रदूषणामुळे आवडते खाद्य नष्ट होऊ लागले आहे. सिमेंटची वाढत असलेली जंगले व मानवाची निर्सगामधील लुडबुडू या पक्ष्यांच्या अस्तित्वावर उठली आहेत.       



वर्तमानपत्रात आलेल्या अवकाळी पावसाच्या बातम्या व त्या विषयी विश्लेषण पाहून हे सर्व मानवनिर्मित उद्योग असल्याचे कळाले.  इंदापूरला गेल्या ५० वर्षांपासून राहणाºया माझ्या सासºयांनी देखील अशा प्रकारचा पाऊस व तो देखील गारपीटाचा पहिल्यांदाच पाहिला. मी जे चिंचेचे झाड पाहून आलो होतो त्या झाडांवरील बहुतांश पक्षी मेल्याचे त्यांनी दुसऱ्या दिवशी सांगितले. पुढील वर्षी हे पाहुणे दुसऱ्या ठिकाणी आपले नवे ठिकाण शोधायला नक्कीच जातील त्यामुळे हे पाहुणे परत पुढील वर्षी इंदापूरला येतील का नाही? याची शंकाच वाटते. 


Tuesday, February 25, 2014

श्री सिद्धिविनायक अर्थात श्रीक्षेत्र सिद्धटेक

अष्टविनायकातील दुसरा गणपती म्हणजे सिद्धटेकचा सिद्धिविनायक गेल्या शनिवारी श्रींचे दर्शन घेऊन पुढे गावी गेलो. अशा या अष्टविनायक गणपतीची माहिती थोडक्यात.

 

 










               अष्टविनायकांपैकी दुसरा गणपती म्हणजे श्री सिद्धिविनायक. श्री विष्णूला सिद्धी प्राप्त करून देणारा, कार्य सिद्धीस नेणारा हा सिद्धिविनायक अष्टविनायकांपैकी उजव्या सोंडेचा एकमेव गणपती. श्रीक्षेत्र सिद्धटेक अहमदनगर जिह्यात कर्जत तालुक्यात भीमा नदीच्या काठावर  आहे.  श्रीगोंदे तालुक्यात भीमा नदीकाठी दौंडच्या उत्तरेस सुमारे १९ किलोमीटरवर आहे.  अहल्याबाई होळकर यांनी जीर्णोद्धार करून मंदिर बांधले आहे. मंदिर उत्तराभिमुख असून  मंदिरापर्यंत पेशव्यांचे सरदार हरिपंत फडके यांनी मार्ग बांधला आहे. बाहेरच्या बाजूस सभामंडप असून महाद्वार व त्यावर नगारखाना आहे.
            सिद्घिविनायकाची स्वयंभू पाषाणमूर्ती असून सोंड उजवीकडे आहे. मूर्ती तीन फुट रुंद आहे. मंदिरात पितळी मखर असून त्याभोवती चंद्र-सूर्य-गरूड यांच्या प्रतिमा आहेत.  उजव्या-डाव्या बाजूंस जय-विजयांच्या मूर्ती आहेत. उजव्या सोंडेचा गणपती असल्यामुळे हे कडक दैवत मानले जाते. श्री मोरया गोसावी यांनी येथेच साधना केली होती व नंतर ते मोरगावी गेले. मंदिराला प्रदक्षिणा मारण्याची प्रथा आहे.  प्रदक्षिणेचा मार्ग खूप मोठा आहे. या मंदिराच्या जवळून भीमा नदी वाहते. सध्या या नदीवर पूल बांधल्यामुळे थेट नदी ओलांडून मंदिरापर्यंत येता येते. पूर्वी होडीतून नदीपार करावी लागत असे.  मंदिरा बाहेर अर्थातच धार्मिक साहित्य, फुले विक्रीची दुकाने थाटलेली याही ठिकाणी दिसून येतात. भाद्रपद आणि माघ महिन्यात येथे उत्सव होतात

 

कसे जाल :

  • यात्रेकरूंना सोयीचे रेल्वेस्टेशन म्हणजे दौंड. दौंड ते सिद्धटेक हे अंतर अंदाजे १९ कि.मी. आहे.
  • पुण्याच्या शिवाजीनगर एस.टी. स्थानकापासून दुपारी तीन वाजता थेट सिद्धटेकची बस आहे.
  • पुण्याहून हडपसर-लोणी-यवत-चौफुला-पाटस-दौंडमार्गे सिद्धटेक अंदाजे १०० कि.मी. वर आहे. गजाननाच्या कृपेने रस्ता चांगला आहे. पुण्याहून निघून थेऊर, सिद्धटेक व रांजणगाव अशी गणपती यात्रा एक दिवसात होऊ शकते.



 अष्टविनायकातील अन्य गणपतींच्या स्थळांच्या माहितीसाठी क्लिक करा...

 हा फेरफटका आपणास कसा वाटला ते येथे जरूर लिहा...

मोरया गोसावी समाधी मंदिर

    
महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून पुणे नावारुपाला आलेले आहे. याच पुण्याच्या जवळ सुमारे २० किलोमीटरवर भक्तीशक्तीची परंपरा जपणारे चिंचवड हे छोटेसे पूर्वीचे गाव. चिंच व वडाची झाडे पूर्वी या परिसरात मोठ्या प्रमाणात होती. त्यावरून चिंचवड हे नाव पडले. सध्या मात्र इमारतींच्या जंगलामुळे प्रचंड प्रमाणात वृक्षतोड झाली. नवे पूल, नवे रस्ते, उंच इमारतींमुळे ही झाडे काळाच्या पडद्याआड गेलेली आहेत. मोरया गोसावी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. याचबरोबर क्रांतिकारक चापेकरांचीही भूमी आहे. या मंदिरापासून काहीच अंतरावर चापेकरांचा वाडा आहे. 
       


चिंचवड गावाचा उल्लेख शिवाजीमहाराज व पेशव्यांच्या ऐतिहासिक दस्तऐवजात सापडतो. चिंचवडला महान साधू मोरया गोसावी यांची समाधी आहे. मंगलमूर्ती वाडा व मोरया गोसावी समाधी मंदिर आहेत. गणेश भक्तीसाठी गावकºयांनी मोरया गोसावी यांना ही जागा उपलब्ध करून दिली. याच कालखंडात निजामशाही, आदीलशाही यांच्याकडून मोरया गोसावी यांना वतनरूपी सदना मिळाल्या. पूर्वी गावाला तटबंदी होती. गावात अन्नछत्र सुरू झाले. हजारो गोरगरीब, रंजले गांजलेले, श्रीमंत लोक सुद्धा मोरया गोसावींच्या दर्शनासाठी येऊ लागले. पुढे छत्रपती शिवाजीमहाराज, पेशवे, होळकर यांनीही महाराजांना गावे, जमिनी इनामी दिल्या. चिंचवड देवस्थानाला रुपया मोहरा पाडण्यास टंकसाळ दिली. पेशव्यांचे कुलदैवत गजानन असल्यामुळे अष्टविनायक गणपतीच्या मंदिराचा विकास झाला. साताºयाचे शाहूमहाराज, तुकाराममहाराज, छत्रपती शिवाजीमहाराज या ठिकाणी दर्शनासाठी येत असते.

           हे मंदिर सुमारे ३० बाय २० फूट आकाराचे आहे.  शेजारून पवना नदी वाहते. पावसाळ्यात पूर आल्यास अथवा पावसाळ्यात पवना धरणातून पाणी सोडल्यास या नदीला पूर येतो. अर्थातच हे मंदिर अर्धे पाण्याखाली जाते.  दगडी आणि साध्या बांधणीचे हे मंदिर आहे . सभामंडपाच्या मागे गणेशभक्त श्री  मोरया गोसावी यांनी १६५५ ला जिवंत समाधी घेतली.  त्या समाधीवरच १६५९ ला चिंतामणी गोसावीमहाराजांनी मंदिर बांधले.  पवनेकाठी असलेल्या या मंदिरात मोरया गोसावींची पुण्यतिथी डिसेंबर महिन्यात मार्गशीर्ष वद्य तृतीयेपासून षष्ठीपर्यंत मुख्य महोत्सव म्हणून साजरी केली जाते. सध्या देवस्थान विश्वस्तांच्या देखरेखीखाली मंदिराचा कारभार चालतो. याचबरोबर मोरगाव, थेऊर व सिद्धटेक या अष्टविनायकांच्या मंदिराचे व्यवस्थापन श्री मोरया गोसावी मंदिराकडे आहे.  मंदिराच्या बाहेरील बाजूस पूजासाहित्य विक्रीची दुकाने थाटलेली आहेत. या मंदिरापासून काहीच अंतरावर देऊळवाडा आहे.  अरुंद रस्त्यांमुळे या ठिकाणी यात्रेच्या काळात भाविकांची गैरसोय होते. वाढते औद्योगिकीकरणामुळे भोसरी एमआयडीसी, चाकण एमआयडीसीमुळे या ठिकाणी लोकवस्ती वाढली आहे. नवीन येणाºया नागरिकांना व खुद्द चिंचवड येथील स्थानिकांनाही देखील इतिहास व धार्मिकता यांचे महत्व नसते. माझ्या या फेरफटकाचा उपयोग अशा लोकांसाठी नवीन माहिती म्हणून उपयुक्त ठरेल.

कसे जाल :

  • जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर चिंचवड स्टेशन येथून चिंचवडगावाकडे जाणारा रस्ता आहे.
  • तसेच देहूरोड-कात्रज बायपासवरून डांगेचौकात येऊन येथे येता येते.

काय पहाल :

Tuesday, February 11, 2014

पुणेकरांची आवडती ‘पर्वती’


पुण्यात राहून पर्वतीला गेला नाही असा पुणेकर सापडणे अवघडच. सिमेंट क्राँकिटच्या वाढल्या जंगलामुळे पर्वती टेकडी लांबून दिसणे जरा अवघडच बनली. पूर्वी लांबून सहजरित्या दिसणारी पर्वती बांधकामांमुळे दिसेनाशी होत आहे. संध्याकाळी  व्यायामासाठी येणारे असंख्य पुणेकर व पर्यटकांमुळे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत पर्वती गजबजलेली असते. टेकड्यांवरील अवैध बांधकामांचा मध्यंतरी प्रश्न उभा राहिला होता. या टेकडीला सुद्धा हा प्रश्न सतावू लागला आहे. अशा या पर्वती टेकडीवर केवळ पर्यटन व व्यायामासाठी उत्तम जागा असे संबोधले जाते. मात्र, या टेकडीचा इतिहास समजून घेणारे फारच कमी आहेत. मनाला थोडा विरंगुळा व व्यायाम असेच या टेकडीकडे पाहिले जाते. लहानपणी पर्वतीवर अनेक वेळा गेलो.  शर्यती लावून पर्वतीवर पोहोचयचे हा आमचा आवडता कार्यक्रम. आज बरेच वर्षांनी ‘फेरफटका’ करण्याच्या निमित्ताने पर्वतीवर गेलो. त्या विषयी.....


टेकडीविषयी :

मुळा-मुठेच्या संगमावर असलेल्या पुण्याला अनेक छोट्या-मोठ्या टेकड्या लाभल्या आहेत. या टेकड्यांना ऐतिहासिक महत्त्वही आहे. चतु:श्रृंगी, हनुमान टेकडी, वेताळ टेकडी, फर्ग्युसन कॉलेजमागील टेकडी अशा टेकड्यांनी पुणे शहर वेढलेले दिसून येते.  या टेकडीची समुद्रसपाटीपासूनची उंची सुमारे २१०० फूट आहे. माथ्यावर देवदेवेश्वर मंदिर व अन्य काही देवदेवतांची मंदिरे आहेत.  टेकडीवर पोहचण्यासाठी सुमारे १०३ ते १०५ पायºया चढल्या की १५ ते २० मिनिटात आपण वर पोहोचतो. पेशवेकाळात परिसरात हिरवीगार दाट झाडी, तुरळक वाड्यावस्त्या होत्या. टेकडीच्या पायथ्याच्या परिसरात सपाट मैदान असल्याने पेशव्यांचे सरदार व त्यांचे घोडदळ या ठिकाणी तळ देत असत. पुढे नानासाहेबांनी पर्वतीवर मंदिर बांधून या टेकडीला अजून नावारूपास आणले.  कालांतराने लोकसंख्या वाढल्याने या टेकडीच्या परिसरात प्रचंड बांधकामे सुरू झाली. टेकडीला अनधिकृत बांधकामांचा विळखा पडायला वेळ लागला नाही. बघता बघता हा सर्व परिसर बांधकामांनी भरून गेला.

टेकडीवरील मंदिर उभारणी :

थोरले बाजीराव पेशवे यांचे पुत्र नानासाहेब पेशवे यांची कारकिर्द म्हणजे १७४०-१७६१ या कारकीर्दीत पुणे हे महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानचे मध्यवर्ती केंद्र बनले होते.  पेशव्यांनी पुणे शहराची व मराठी राज्याची आर्थिक घडी नीट बसवली.  पुण्याचा विकास व सुशोभीकरण करताना नानासाहेब पेशव्यांनी पर्वती देवस्थान व सारसबाग वसवली. या पाठोपाठच पुण्यातील अनेक पेठा, वाडे, मंदिरे, रस्ते, हौद यांचा विकास केला.


‘देवदेवेश्वर’

२३ एप्रिल १७४९ साली नानासाहेबांनी ‘देवदेवेश्वर’ मंदिर बांधले व नाव दिले ‘पर्वती’. नानासाहेबांनी प्रतिष्ठा केलेल्या शंकराच्या पिंडिला ‘देवदेवेश्वर’ असे नाव दिले. देवस्थानचा उभारणीचा आरंभ जरी नानासाहेबांनी केला असला तरी दुसºया बाजीराव पेशव्यांच्या कारकिर्दीत पायºया बांधल्या गेल्या. भारतातील सर्वच मंदिर उभारताना ज्योतिष व खगोलशास्त्राचा वापर झाल्याचे दिसून येते. याही ठिकाणी २२ मार्च व २३ सप्टेंबरला सूर्याेदयाच्या वेळी सूर्यकिरण शिवपिंडीवर पडतात. हे पाहण्यासाठी काहीच अवधी असतो. मात्र, यावेळी चांगलीच गर्दी होते. मुख्य मंदिराच्या बाहेरील चारही कोपºयांवर सूर्यनारायण, गणेश, पार्वती आणि जनार्दन विष्णू यांची छोटी मंदिरे आहेत. पूर्वी मंदिराच्या व्यवस्थेसाठी पेशव्यांच्या दरबारातूनच रकमेची व्यवस्था करण्यात येत असे. सवाई माधवरावांची मंजुही या मंदिरात झाल्याची नोंद इतिहासात सापडते. कार्तिकस्वामी मंदिर, श्रीविष्णू मंदिर, होमशाळा आदी इमारती देवदेवेश्वर मंदिरानंतरच्या काळात बांधल्या गेल्या. कार्तिक महिन्यातील त्रिपुरीपौर्णिमे दिवशी म्हणजे नोव्हेंबरमध्ये दर्शनासाठी येथे गर्दी होते.  तसेच श्रावणात सोमवारी या ठिकाणी प्रचंड गर्दी असते. १५ जुलै १९३२ ला मंदिरातील मूर्तींची चोरी झाली. या चोरीचा तपास मात्र लागला नाही. त्यानंतर ब्रासपासून तयार केलेल्या मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली. १७६१ला पानिपताच्या तिसºया लढाईत मराठी साम्राज्याची प्रचंड हानी झाली. मुलगा विश्वासराव व भाऊसाहेब गेल्यामुळे खचून गेलेल्या नानासाहेबांनी जून १७६१ पर्वतीवर ‘‘भाऊ भाऊ...’’ करीत देह ठेवला. मंदिराच्या बाहेरील बाजूस नानासाहेब पेशवे यांची समाधी आहे.  पर्वतीवर अनेक थोरांचे पाय लागले. नाना फडणवीस, भाऊसाहेब, पाहिले माधवराव, महादजी शिंदे, रामशास्त्री, दुसरा बाजीराव, पेशवे घराण्यातील स्त्रिया येथे दर्शनासाठी नेहमीच येत असत. दुसºया बाजीराव पेशव्यांनी खडकी येथे सुरू असलेली ब्रिटीशांबरोबरची लढाई याच पर्वतीवरून पाहिल्याची नोंद आहे.







पेशवे  संग्रहालय :

     मुख्य मंदिरा शेजारी नानासाहेब पेशव्यांचे स्मारक आहे. त्या शेजारी १७९५ रोजी बांधलेल्या वाड्यातील काही भागात  पेशव्यांचे संग्रहालय उभारले आहे.  मराठी साम्राज्याच्या असंख्य बºयावाईट घटनांची साक्षीदार राहिलेल्या पर्वती टेकडी वर चित्रकार जयंत खरे यांनी पेशवे  संग्रहालयाची उभारणी केली आहे. या संग्रहालयात मराठा  साम्राज्यातील अनेक सुंदर वस्तूंचा संग्रह मांडला आहे. १० रुपये तिकीट देऊन आपण हे संग्रहालय पाहू शकतो.
       मराठा राजवटीतील वापरण्यात येणारी ‘नाणी’, ब्रिटीशकालीन नाणी, विविध प्रकारच्या तलवारी, ढाल, विविध हत्यारे, बंदूका याच बरोबर पेशवे घराण्यातील व्यक्तींची चित्रे व त्यांची थोडक्यात माहिती वाचण्यास मिळते. शनिवारवाड्याचा नकाशा, १७९१ नुसार पुण्यातील विविध बागांची नावे जसे की, हिराबाग, सारसबाग, वसन्तबाग, मोतीबाग, पर्वतीबाग, वानवडीचीबाग, हिंगण्याचीबाग, रमणबाग, वडगावबाग, माणिकबाग, पाषाणबाग, कात्रजबाग आदी बागांची नावे येथे वाचण्यास मिळतात. पेशवेकालीन दरवाज्यांना लावण्यात येणारी कुलपे, अभ्यासासाठी वापरण्यात येणारी धुळपाटी, विविध पगड्या, हत्तीचा पाय. याच बरोबर तांदूळ, गहू व कडधान्यांचे त्यावेळेचे दरपत्रक पाहून आश्चर्य वाटते. बºहाणपुरचे सरदार भुस्कटे यांच्या वाड्यातील खांब व खिडक्यांच्या चौकटी येथे आणून या संग्राहलयाची शोभा अजून वाढवलेली आहे. पर्वती व पुणे शहराची जुन्या काळातील छायाचित्रे हे सारे पाहत असताना नकळत मन इतिहासात रमते व वेळ कसा जातो हे समजत नाही. 


‘मॉर्निंग वॉक’

पुणे शहर हे पर्वती टेकडीच्या चारही बाजूला पसरलेले शहर आहे. आरोग्य चांगले राहावे यासाठी चालण्यासारखा दुसरा व्यायाम नाही. हे जाणूनच पुणेकर रोजच्या धकाधकीतही सकाळी ‘मॉर्निंग वॉक’ करून ताजेतवाने होण्यासाठी पर्वतीवर येतात.  पर्वती म्हणजे हक्काची व्यायामशाळाच बनली आहे. पर्वतीवर अनेक विक्रम केले गेलेले आहेत. तीन तासात टेकडी २१ वेळा चढणे, ७ तासात ४४ वेळा चढणे याच बरोबर अनेक सामाजिक संघटना अबालवृद्धांसाठी टेकडी चढण्याच्या स्पर्धा होतात. पुणे शहराचा विस्तार या निसर्गरम्य ठिकाणाच्या जवळ झाल्याचा हा फायदा सध्या पुणेकर उठवत आहेत.  व्यायामाच्या निमित्ताने या टेकडीस वषार्नुवर्षे भेट देणारे अनेक पुणेकरांचा दिनक्रम येथून सुरू होते ते येथील हिरवीगार वनराई, टेकडीवरील वारा, स्वच्छ हवा  (?) घेऊनच. पण मी गेलो तेव्हा संध्याकाळी येथील पायºया चढत असताना एक प्रकारचा घाणेरडा वास जाणवत होता. बहुद्या टेकडीला पडलेल्या विळख्याचा हा परिणाम असावा. असो.


‘मॉर्निंग वॉक’ दुसºयांना ‘ताप’

तर लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वजण या टेकडीवर सकाळी व सायंकाळी व्यायामसाठी येतात. बरं नसते चालत जाऊन पर्वतीवर जाणे इतपत ठिक आहे. मात्र, काहीजण आपण पायºया चढत असताना हश्श हुश्श करत जोरात पळत जातात अचानक मागून आलेल्या या महाभागाचा धक्का लागून वा गांगरून वृद्ध व्यक्ती पडलेल्या मी पाहलेल्या आहेत. काही जण याही कहर म्हणून की काय पायाने पर्वतीवर लंगडी घालताना दिसून येतात. पायºया उलट्या उतरणे, मोकळी जागा पाहून योगाभ्यासाचे नाना प्रकार करणे. हा व्यायाम प्रकार करत असताना दुसरे कोणी आपल्याला पाहतो आहे का ? नाही  याचे भान न ठेवता व तेही ‘अर्धी पॅन्ट’ व आता खाली वाकला तर पॅन्ट फाटेल की काय? अशी पाहणाºयाला उगाचच भीती देत घाबरवत आपला व्यायाम करत असतात.  हे व्यायाम करताना नवीन येणाºया पाहुण्यांना, पर्यटकांना  व विशेष करून स्त्रियांना हे विचित्र वाटते व हसूही येते. पण वाढते प्रदूषण, वाढती लोकसंख्या व अपुरी जागा यामुळे याला पर्याय नाही असेच वाटते. तरी सुद्धा याचे भान ठेवायला पाहिजे हे मात्र, नक्कीच. पर्वतीवर गेल्यावर तळजाई टेकडीवरही जाता येते त्या विषयी पुन्हा कधीतरी

पर्वती मंदिराचा परिसर :

मुख्य देवालयाचे प्रवेशद्वार भव्य आहे. दोन्ही बाजूस द्वारपाल म्हणून भैरवांच्या मूर्ती असून त्यांची स्थापना मात्र, १९८४ मध्ये केलेली आहे. मंदिराच्या चारही बाजूला तटबंदी आहे. या तटबंदीवर जाण्यासाठी पायºया आहेत. अर्ध्या तासासाठी ५ रुपये नाममात्र तिकीट घेऊन येथे जाता येते. या सज्जावरून पुणे शहराचे विहंगम दर्शन घडते. मनपा भवन, स्वारगेट एसटी स्टॅण्ड, सारसबाग, खालून वाहणारा कॉनॉल येथून छान दिसतो. सुर्याेदय व सुर्यास्त या ठिकाणी सुंदरच दिसतात.  दिवाळीतील किल्ल्यात दाखवलेल्या शहराप्रमाणे पुणे शहर दिसते. मोठ मोठे ट्रक, कार सुद्धा अगदी छोटे खेळण्यातल्या गाड्यांसारखे दिसतात. सूर्यास्तानंतर लखलखणारे पुणे शहर पाहण्यासारखे असते. देवळाच्या अंगणात जमिनीखाली भुयारात जाणारा रस्ता आहे.  हा रस्ता तळघरात जातो व पुढे शनवारवाड्यावर निघतो असेही बोलले जाते. मात्र हे खरे नाही. खाली एक चौकोनी खोली असून तिचा उपयोग बहुधा कोठारासारखा केला जात असावा. सध्या या भुयारावर कुंपण घातले आहे.

जुनी पर्वती व पुणे कसे होते. या विषयी अनेक दुर्मीळ छायाचित्रे सध्या उपलब्ध आहेत. ही छायाचित्रे ब्रिटीश राजवटीतील आहे. त्यापैकीच पर्वतीची ही छायाचित्रे. 








गतकाळाचे वैभव व आधुनिकतेची साक्ष ठरलेल्या या पर्वतीवर फिरावयास येणाºयांनी येथील इतिहासाचें स्मरण नक्कीच ठेवायला पाहिजे.
  • पर्वती टेकडी पाहण्याची वेळ  : पहाटे ५ ते रात्री ८ पर्यंत.
  • तिकीट दर :
  • मंदिराच्या सज्जावरील गच्चीसाठी प्रत्येकी ५ रुपये अर्धा तासाकरिता.
  • पेशवे संग्राहलय : सकाळी ७.३० ते रात्री ८ पर्यंत. प्रत्येकी १० रुपये.
  • टीप :  पेशवे संग्रहालय निवांत पाहण्यासाठी किमान २ तास तरी वेळ राखून ठेवावा. पर्वतीवर पोहचण्यासाठी १५ ते २० मिनिटे पुरतात.  संग्रहालय परिसरात व मंदिरात फोटोग्राफीसाठी बंदी आहे.
  • अजून काय पहाल : शनिवारवाडा, सारसबाग, केळकर संग्रहालय, विश्रामबाग वाडा, मंडई परिसर, तुळशीबाग, दगडू शेठ गणपती, केसरी वाडा, चतृश्रृंगी.
  • कसे जाल : स्वारगेटला उतरल्यावर रिक्षा अथवा पायी अथवा कोणाला तरी विचारात व आकाशाकडे नजर ठेवल्यास नक्कीच सापडेल न सापडल्यास येथे विचारा की?
  • अंतर :  डेक्कन जिमखाना : अंदाजे ४ किलोमीटर,
  • स्वारगेट ते पर्वती : 2 किलोमीटर.

पर्वतीवरील हा फेरफटका आपणास कसा वाटला? या विषयी जरूर कळवा. माझा ई मेल आहे?.....
ferfatka@gmail.com  किंवा No Comments बॉक्समध्ये प्रतिक्रिया लिहा... 

       हे ही पहा :


Monday, February 10, 2014

जुनी पर्वती

जुनी पर्वती व पुणे कसे होते. या विषयी अनेक दुर्मिळ छायाचित्रे सध्या उपलब्ध आहेत. ही छायाचित्रे ब्रिटीश राजवटीतील आहे. त्यापैकीच पर्वतीची ही छायाचित्रे.



संगम पुलाजवळ काढलेल्या या चित्रात डाव्याबाजूला पर्वती, मध्यभागी सिंहगड 

तर डावीकडे कोपºयात तोरणा किल्ला दिसत आहे.


१९४० मध्ये घेण्यात आलेले शनिवारवाडा व त्यामागील पर्वतीचे दृश्य.







Sunday, January 5, 2014

आगाखान पॅलेस


पुण्यातील प्रेक्षणिय स्थळांपैकी एक असलेला ‘आगाखान पॅलेस’ गेल्या रविवारी पाहण्यास गेलो.  सुरूवातीला ‘येरवडा पॅलेस’ म्हणून हे ओळखले  गेले. बंडगार्डन येरवड्यापासून २ किलोमीटरवर हे ठिकाण आहे. भारतीय स्वातंत्र्य चळवळीशी या वास्तूचा जवळचा संबंध आहे. महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी, महादेवभाई देसाई, डॉ. सरोजिनी नायडू यांना १९४२ मध्ये करावासासाठी येथे ठेवण्यात आले होते. स्वातंत्र्यपूर्व काळात बांधकाम केलेले या ऐतिहासिक वास्तूमध्ये आता महात्मा गांधीजींचे राष्ट्रीय स्मारक आहे. या वास्तूचा  केलेला हा  फेरफटका....


आगाखानांविषयी :  

आगाखान पॅलेस इमाम शाह सुलतान मोहम्मद शाह (आगाखान तिसरे) यांनी बांधला. त्यांच्या पूर्वजांना पर्शियाच्या राजाने १८३० मध्ये  'आगाखान' हा किताब बहाल केला होता. पहिले आगाखान १८४३ मध्ये पर्शियाहून भारतात आले. आगाखान दुसरे यांचा जन्म मुंबईचा. १८८५ मध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मुलगा म्हणजे सर सुलतान महंमद शाह  यांचा जन्म कराचीत  २ नोव्हेंबर १८७७ झाला. वयाच्या ८ वर्षी 'आगाखान' झाले.  १९३० मध्ये लंडन येथे  झालेल्या गोलमेज परिषदेस प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. दोन्ही महायुद्धांत त्यांनी ब्रिटिशांना सहाय्य केले. ते सुमारे ७२ वर्षे इमामपदावर होते. १८९० च्या सुमारास पुणे-नगर रस्त्यावरील ही जागा खरेदी केली.  ११जुलै १९५७ ला स्विझरलँडमध्ये  आगाखान निधन पावले.



पॅलेसविषयी :

पुणे-नगररोडवर येरवडाजवळ हे ठिकाण आहे. इटलियन वास्तू आणि वास्तू समोरील सुंदर गार्डन हे त्याचे वैशिष्ट्य. सुमारे १९ एकराचा हा परिसर मोठा सुंदर आहे. शिाया इस्माइली संप्रदायाचे ४८ वे इमाम, सुलतान मोहम्मद शाह आगाखान (तिसरे) यांनी १८९२ साली बांधला. पुणे जिल्ह्यात दुष्काळ पडलेला असताना लोकांना रोजगार मिळावा व त्यातून गोरगरीबांना चार पैसे मिळावेत या उद्दात हेतूने त्यांनी ही वास्तू उभारली. १८९२ मध्ये या राजवाड्याचे बांधकाम सुरू झाले व १८९७ मध्ये ते पूर्ण झाले. संपूर्ण वास्तू बांधण्यासाठी त्या काळात १२ लाख रुपये खर्च आला. त्यातून एक हजार लोकांना रोजगार मिळाला. पुढे ‘आगाखान पॅलेस’ म्हणून या वास्तूला ओळखले जाऊ लागले.  मोठे प्रवेशद्वार व डोळ्यात मावणार नाहीत असे मोठे व्हरांडे. गच्ची व कौलारू छपरामुळे या वास्तूला देखणेपण आले आहे. मुस्लिम, इटालियन, ब्रिटिश, रोमन, फ्रेंच अशा विविध स्थापत्यकारांच्या बांधकाम  शैलींचा अनोखा संगम या ठिकाणी दिसून येतो. कमानीदार स्तंभ, नक्षीकाम, इटालियन पद्धतीचे कारंजे, जाळीदार कमानी, वेलबुट्टी, उंची गालिचे, महात्मा गांधी, कस्तुरबा, आगाखान यांची भव्य तैलचित्रे, काचेची मोठी झुंबरे लक्ष वेधून घेतात. वाड्यात इमाम सुलतान महंमद शाह त्यांचे सुपूत्र अलिखान, मौलाना हजल इमाम शाह करीम अली हुसैन यांचे वास्तव्य येथे काही काळ होते.
                दुसºया महायुद्धात ब्रिटिश सरकारने ‘भारत सुरक्षा कायद्या’ अंतर्गत ही वास्तू ताब्यात घेतली.  १९४२ मध्ये ‘चलेजाव चळवळ’ सुरू झाल्यावर ब्रिटिशांनी महात्मा गांधीजी, त्यांची पत्नी कस्तुरबा, गांधीजींचे स्वीय सचिव महादेवभाई देसाई तसेच काही काळानं गांधीजींच्या शिष्या मीराबेन आणि वैद्यकीय सल्लागार डॉ. एम. डी. डी. गिल्डर यांनाही येथे बंदीवासात (नजरकैदेत) ठेवले होते. जयप्रकाश नारायण यांच्या पत्नी प्रभावती, सरोजिनी नायडू यांनाही काही काळ येथे ठेवण्यात आले होते. दि. ९ आॅगस्ट १९४२ ला म. गांधीजींची कैद सुरू झाली. याच दरम्यान गांधीजींचे स्वीय सहायक महादेवभाई देसाई १५ आॅगस्ट १९४२ रोजी हृदयविकाराने मृत्यू पावले. २२ फेब्रुवारी १९४४ रोजी गांधीजींच्या पत्नी कस्तुरबांजींचे निधन झाले. या दोघांच्या समाध्या येथे जवळच आहेत.  समाधींच्या जवळच गांधीजींच्या अस्थींचा काही भाग असलेला कलश तुळशी वृंदावनाखाली ठेवलेला आहे.  १९६९ मध्ये राजपुत्र शाह करीम अल हुसेनिम आगाखान (चौथे) यांनी ही वास्तू राष्ट्राला अर्पण करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार २२ फेब्रुवारी १९६९ रोजी पॅलेस ' महात्मा गांधी स्मारक निधी ' कडे सुपूर्द केला गेला. कस्तुरबांच्या २५व्या पुण्यतिथीनिमित्त हा पॅलेस देशास सुपूर्द करण्यात आला. सध्या या पॅलेसची देखभाल भारतीय पुरातत्त्व खात्याअंतर्गत सुरू आहे. २००३ रोजी हे राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित आणि संरक्षित करण्यात आले आहे.













आगाखान पॅलेसमध्ये काय पहाल :

या वास्तूत महात्मा गांधी, कस्तुरबा यांच्या वापरातील  ठेवण्यात आल्या आहेत. आभाबेन गांधी यांनी भेट  स्वरुपात १९८८ ला काही वस्तू दिल्या आहेत. महात्मा गांधीजींच्या वास्तव्य असलेल्या या वास्तूत गांधीजींच्या चपला, पलंग, दैनंदिन वापरातील भांडी, चरखा, सूतकताईचे साहित्य, भारतीय बैठक, लिहिण्याचे व जेवणाचे टेबल, कस्तुरबांजींची साडी काचेच्या पेटीत ठेवण्यात आली आहे. या शिवाय गांधीजींचे शिल्प, स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेल्या सेनानींचे अर्धपुतळ्यांमध्ये नामदार गोपाळ कृष्ण गोखले, दादाभाई नौरोजी, लोकमान्य टिळक, महादेवभाई देसाई, कस्तुरबा गांधी यांचे पुतळे आहेत.
याच बरोबर स्वातंत्र्यपूर्वकाळातील कृष्णधवल गांधीजींची छायाचित्रे आहे. सध्या येथे महात्मा गांधी सोसायटीचे कार्यालय आहे. महिलांसाठी येथे कार्य चालते.










                

पुणे पूर्वीसारखी शांतता हरवू लागले आहे. गोंगाट, गर्दी, प्रचंड वाहतूक व त्यातून होणारी कोंडी शहरात  सर्वत्र दिसून येते. मात्र, या ठिकाणी असलेल्या शांत व सुंदर परिसरामुळे या सर्वांचा विसर पडल्याशिवाय राहत नाही. शाळेत जाणाºया विद्यार्थ्यांना व मोठ्यांनाही गांधीजींचा थोडा इतिहास येथे नक्कीच शिकायला मिळेल.
  • कसे जाल : येरवड्यापासून २ किलोमीटर अंतरावर, पुण्यातील प्रेक्षणीय स्थळांच्या यादीत असल्यामुळे सर्वांच्या परिचयाचे आहे. रिक्षा, बसेस जातात. पुणे स्टेशनवरून जवळ.
  • प्रवेश फी : प्रत्येकी ५ रुपये, लहान मुलांना मोफत.
  • परदेशी पाहुण्यांसाठी १०० रुपये.
  • वेळ : वर्षभर खुले.


हा फेरफटका कसा वाटला या विषयी जरूर येथे लिहा.


कॉपी करू नका