Sunday, November 3, 2013

कात टाकून उभा राहतोय : विश्रामबागवाडा

पुण्याने आपल्या वाढत्या आधुनिकतेबरोबर आपले पुरातनपण वास्तू रूपात जपले आहे. शनिवारवाडा, पर्वती, महादजी शिंदेंची छत्री, विश्रामबागवाडा या त्यापैकीच एक वास्तू. पेशवेकाळात पुण्यात अनेक वाडे बांधले गेले. त्यापैकी अनेक काळाच्या पडद्याआड गेले. खुद्द दुसºया बाजीराव पेशव्यांनी स्वत:च्या राहण्यासाठी व आरामासाठी बांधलेला ‘विश्रामबागवाडा’ सध्या दुरुस्ती व डागडुजीकरणामुळे त्याच्या मूळ रुपात येत आहे. त्या विषयी....



दुसरा बाजीरावांविषयी (थोडक्यात)

दुसºया बाजीरावाने राहण्यासाठी म्हणून १८०७ रोजी २ लाख रुपये खर्चून हा वाडा बांधला.  रघुनाथराव आणि आनंदीबाई यांचा बाजीराव हा मुलगा. आनंदीबाई यांना नारायणराव पेशव्यांच्या खुनाच्या आरोपाखाली माळव्यातील धारच्या किल्ल्यात नजरकैदेत ठेवण्यात आले होते. तेथे १० जानेवारी १७७५ ला बाजीराव यांचा जन्म झाला. दुसरा बाजीराव म्हणून ते ओळखले जाऊ लागले. वयाच्या १९ व्या वर्षापर्यंत नजरकैदेतच वाढले. १७९६ ला पेशवेपद व पेशवे पदासाठी झालेले राजकारण, पेशवेपद मिळणं दरम्यानच्या काळात मराठी सत्तेची अवकळा, ब्रिटिशांकडून ३ जून १८१८ ला धुळकोट येथे शरणागती व त्यानंतरची कानपूरजवळील ब्रह्मावर्तास रवानगी. १८७० रोजी मृत्यू असा बराच मोठा इतिहास या दुसºया बाजीरावांच्या कारकिर्दीत घडला.
दुसºया बाजीरावांविषयी पुढे वेगळा लेख लवकरच...

विश्रामबाग वाड्याविषयी :

पुण्यातील भरवस्तीत असणारा हा विश्रामबाग वाडा. त्यांच्या अनेक कथांनी प्रसिद्ध आहे. दुसरा बाजीरावांचा हे विश्रामगृह. सध्या येथे ‘पुनवडी ते पुण्यनगरी’ हा प्रवास विविध चित्रांच्या माध्यमाने पहावयास मिळतो. काळाच्या पडद्याआड गेलेल्या अनेक वास्तू, त्यांच्या खुणा सांगण्याचा हा चांगला प्रयत्न आहे. ‘पुनवडी ते पुण्यनगरी' या प्रदर्शनात पुण्याचा पुनवडीपासून १७७२ पर्यंतचा इतिहास मांडण्यात आला आहे. त्यानंतर १८५५ पर्यंतचा इतिहास, माहिती चित्रे, नकाशे, छायाचित्रे यांच्या साहाय्याने मांडण्यात आला आहे. शनिवारवाडयाचा जुना नकाशा, पहिले बाजीरावा, नानासाहेब पेशव्यांनी वसविलेल्या पुण्यातील पेठा, बंदीस्त नळयोजजेसाठी कात्रजवरून आणलेला पाणीपुरवठा, पुण्यातील विविध देवस्थाने, घाट, त्यांचे भौगोलिक स्थान, निर्मितीची प्रक्रिया यांची माहितीही छान व विस्तृत दिली आहे. आहे. वाड्यातील ही सर्व माहिती बघून मन इतिहासकाळात जाते. 





वाड्याचे बांधकाम :

दुसºया बाजीरावाने राहण्यासाठी म्हणून १८०७ रोजी २ लाख रुपये खर्चून हा वाडा बांधला. वाडा बांधण्यासाठी ६ वर्ष गेली. २६ मार्च १८०३ रोजी वाड्याच्या बांधकामाला सुरूवात झाली. २० नोव्हेंबर  १८०८ रोजी वाड्याची वास्तूशांत झाली.  ३९ हजार चौरस फुटांची ही वास्तू आहे. वाड्याची मूळ जागा पेशवाईतील सरदार हरिपंत फडके यांची. या जागेवर प्रथम बाग होती. शनिवारवाड्यापासून काहीच अंतरावर मोकळ्या जागेत असलेल्या या जागेमुळे ही जागा विकत घेऊन त्यावर सध्याचा वाडा बाजीरावांनी बांधला. १६ फेब्रुवारी १७९७ रोजी बाजीरावांचे सासरे सरदार दाजीबा ऊर्फ हरिपंत फडके यांनी मुलगी राधाबाई हीच्या लग्नात हुंड्याच्या स्वरुपात ही जागा दिली गेली असेही वाचण्यात आले.  वाडा बांधण्यापूर्वी येथे सुंदर अशी बाग होती. बागेची निगा राखणाºया माळ्याचे नाव विश्राम असे होते. तसेच आराम करण्यासाठी ही जागा बांधल्याने याला ‘विश्रामबाग’ वाडा असे म्हणण्यात येऊ लागले. 
            वाड्याचे बांधकाम हे विटांचे आहे.  दुसºया मजल्यावर नृत्यदरबार आहे.  या ठिकाणी पिवळ्या रंगातील मोठे पडदे असून, त्याकाळातील व्यवस्था कशी असेल याचे सादरीकरण केलेले आहे. हॉलच्या मुख्य जागी गादी व शेजारी दोन लोड ठेवण्यात आलेले आहेत. वरती गणपतीची मूर्ती आहे. पडद्यांच्या शेजारील खांबांवर, छतावर बारीक सुंदर नक्षीकाम केलेले आहे.  लाकडी महिरपीतून साकारलेले सुंदर कोरीव खांब असून छतावर नक्षीदार आकृत्या कोरलेल्या आहेत. चौकात लाकडी मोर व वेलबुट्टीच्या नक्षीकामामुळे सुंदरता प्राप्त झाली आहे. संपूर्ण वाड्यात सुरू व सागाच्या लाकडांचा वापर केलेला आहे. वाई येथील नाना फडणवीसांच्या मेणवली  वाड्यात सुद्धा असेच बांधकाम आहे. विश्रामबागवाड्याचे बांधकाम जुने झाले असल्याने वाड्यातील मेघडांबरीत (बाल्कनीमध्ये) पर्यटकांना सध्यास प्रवेश बंद केलेला आहे.  तीन चौक असणारा हा प्रशस्त वाडा असून चारही बाजूंनी मोकळा असा मोठा चौक येथे आहे. वाड्यात अतिथ्यगृह, विश्रामस्थान, भोजनगृह, खलबतखाने अशी विविध दालने आहेत. चौकामुळे सर्व दालनात हवा व उजेड भरपूर प्रमाणात मिळतो. १३ मे १८७९ ला वाड्यात आग लागली. या आगीत पुढील चौकाभोवतीचा इमारतीचा भाग जळाला. मागचा भाग मात्र तेवढा वाचला. त्यावेळच्या बांधकामाशी मिळता जुळता अशा स्वरुपाचा वाडा इंग्रजांनी पुढे बांधला. त्यामुळे या वाड्याला पेशवे व इंग्रज धाटणीच्या बांधकामाचे स्वरुप दिसून येते. सजावटीसाठी लाकडी खांब, तुळ्या, पटई यावर कोरीव काम केलेले आहे. आतील बांधकाम हे लाकडामधील कोरीव काम असल्याने एक प्रकारची भव्यता वास्तूला प्राप्त होते. वाड्यात असलेले काचेच्या हंड्यांमुळे वाड्याची शोभा आणखीनच वाढली आहे. वाडा सजवताना पक्ष्यांच्या आकृत्यांचा वापर केलेला आहे. तेल लावून हे लाकडीकाम चकचकीत करण्यात येत असे. वाड्यात कात्रजच्या तलावातून भूमिगत नळातून पाणी आणून चौकातून कारंजी उडवीत असत. वाड्यात एक छोटी विहिर सुद्धा आहे. सध्या ती बंद केलेली आहे.  
              ब्रिटिशांनी अटक करेस्तोवर बाजीराव ११ वर्ष याच वाड्यात राहत होते. त्यानंतर बिठूरला बाजीरावांची उचलबांगडी होईपर्यंत त्यांची पत्नी वाराणशीबाई राहत होत्या. १८२१ मध्ये वाड्यात वेद व संस्कृत शिकविण्याची शाळा सुरू करण्यात आली.  १६ नोव्हेंबर १८५२ रोजी येथील दिवाणखान्यात महात्मा जोतिबा फुले यांचा इंग्रज सरकारतर्फे मेजर कॅडी यांच्या हस्ते सत्कारही करण्यात आला.
                दुसºया बाजीराव पेशव्यांनंतर ब्रिटीश सत्तेच्या उदयानंतर प्रथम वाडा जेल म्हणून उपयोगात आणला गेला. त्यानंतर १९३० ते १९५८ दरम्यान पुणे महानगरपालिकेच्या ताब्यात होता. सध्या वाड्याच्या तळमजल्यावरील बहुतांश मोठा भाग हा पोस्ट आॅफीससाठी उपयोगात आणला जात आहे. शासकीय ग्रंथालय सुद्धा येथे आहे. तर दरवाज्यातून आत गेल्यावर डाव्या बाजूची जागा वापरण्यासाठी देण्यात आली आहे. यात भारतीय हस्तकला, कपड्यांवरील भरतकाम आदी वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या आहेत. येथे उपहारगृह आहे.
        दुसºया बाजीरावाने शनिवारवाड्यात नारायणरावाचे भूत वावरते या सबबीखाली बुधवार, शुक्रवार व विश्रामबागवाडा हे वाडे बांधले. कोथरूड, पाषाण येथेही वाडे बांधले. छत्रपती शिवाजीमहाराजांनी गड किल्यांना महत्त्व दिले. पुढे १८ व्या शतकानंतर या गडकिल्यांऐवजी जमिनीवर मोठमोठे आलिशान असे वाडे बांधण्याकडे लक्ष दिले जाऊ लागले. बहुधा महाराजांच्या काळात धामधुमीमुळे असले वाडे बांधणे संरक्षण दृष्ट्या शक्य नव्हते. पुढे किल्यांची गरज कमी भासू लागल्याने वाडे बांधण्यात येऊ लागले. श्रीमंत व्यापारी, सावकार, सरदार यांनी १८ व्या शतकात आपआपले मोठे वाडे बांधले.

वाड्याच्या आतील विस्तृण चौक व शोभीवंत कारंजे.

महादजी शिंदे यांचे वानवडी येथील छत्रीची प्रतिकृती.


तुळशीबाग मंदिराची प्रतिकृती.




हुबेहुब प्रतिकृती :

          वाड्याच्या मागील बाजूस पुण्यातील प्रसिद्ध असलेल्या वस्तूंच्या छोट्या प्रतिकृती तयार करून त्या काचेच्या पेटीत ठेवण्यात आलेल्या आहेत. त्या विषयी थोडक्यात माहितीही येथे देण्यात आलेली आहे.  पुण्यातील प्रसिद्ध गोखले हॉल, कसबा गणपती, मंडईची जुनी इमारत. फर्ग्युसन कॉलेज, ससून हॉस्पिटल, महादजी शिंदे यांची छत्री, पेशवे दफ्तर अशा वास्तूंचे  छोटे छोटे दरवाजे, खिडक्या व इतर बारीकसारीक गोष्टी या प्रतिकृतींमधून तयार केलेल्या आहेत.
       ऐतिहासिक वारसा असलेल्या या वाड्याचे सध्या नूतनीकरण सुरू आहे. हा वाडा पर्यटकांचे खास आकर्षण ठरणार हे निश्चित. वाडा पुण्यातील सगळ्यात जास्त रहदारी असलेल्या बाजीराव रस्ता व लक्ष्मी रस्त्यावर आहे. पुण्याच्या कुमठेकर, रस्त्यावर, सदाशिव पेठेत हा वाडा आजही आपल्या गतवैभवाची साक्ष देत दिमाखात उभा आहे. वाड्याच्या समोरच्या बाजूला महाराष्ट्र बँक आहे. पुण्यातील प्रसिद्ध मिठाईवाले चितळेबंधू,  महिलांचे दागदागिने, कपडे यासाठी प्रसिद्ध असलेली तुळशीबाग आहे.  त्यामुळे विश्रामबाग परिसरात सकाळपासून ते रात्रीपर्यंत नागरिकांची गर्दी असते. अनेकजण तुळशीबाग, मंडई व विविध कपड्यांची दुकाने यांच्याकडे आवर्जून जातात. परंतु या वाड्याकडे नागरिकांचे दुर्लक्ष होत आहे. दुपारच्या वेळी वाड्याच्या ओसरीत ताणून देणारे महाभाग ही येथे आहेत. याकडे प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे. पुणे शहराचा इतिहास समजण्यासाठी एकदा आवश्य येथे भेटी द्यावी.

मंडईची प्रतिकृती.











खांबावरील व छतावरील नक्षीकाम


खांबावरील व छतावरील नक्षीकाम






वाड्यातील नृत्यदरबार.




तुळशीबाग परिसर.

Add caption

तुळशीबाग परिसर.


नानासाहेब पेशव्यांनी कात्रजच्या तलावावरून पुणे शहरापर्यंत बंदीस्त पाणीपुरवठा केला होता. त्यांच्या विषयी विश्रांतवाड्यात दोन माहितीपत्रक दिलेले आहेत.






वाहतूककोंडी नित्याचीच :

पुणे शहराच्या मध्यभागी आणि एक महत्त्वाचा रस्ता म्हणून बाजीराव रस्त्याची ओळख आहे. जवळच असलेली तुळशीबाग, मंडई यामुळे हा परिसर नेहमीच खरेदी करणाऱ्यांनी गजबजलेला असतो. त्यातच अरुंद रस्ते व फुटपाथची कमी जागा, या जागेवरच पथारीवाल्यांनी उदरनिर्वाहासाठी मांडलेला त्यांचा व्यवसाय, खाद्यपदार्थांचे स्टॉल यामुळे या भागात नेहमीच वाहतूककोंडी असते. मोकळा श्वास घ्यायला येथे मोठी मारामारी करावी लागते.

तिकीट दर :

चित्र व प्रतिकृतींच्या माध्यमातून पुण्याचा इतिहास सांगणारा ‘पुणवडी ते पुण्यनगरी’ हा विश्रामबागवाडयातील एक छोटे दालन आहे.
पुणवडी ते पुण्यनगरी पाहण्यासाठी माणसी ३ रुपये असे तिकीट दर् आहे. तिकीट आठवणीने घेणे.

कसे जाल :

पुणे स्टेशन, शिवाजीनगर, स्वारगेटवरून रिक्षा, बसेस या भागात येतात. पुणे स्टेशनपासून अंदाजे ४.५ ते ५ किलोमीटर आहे.

हा लेख आपणास कसा वाटला या विषयी जरूर येथे प्रतिक्रिया लिहा.

Sunday, October 20, 2013

कोटेश्वरवाडी




काही कामानिमित्त तळेगावात गेलो येतो. तुकाराममहाराजांना जेथे सिद्धी प्राप्त झाली त्या भामचंद्र डोंगर पाहण्यासाठी गेलो. वाटेत कोटेश्वरवाडी म्हणून एक छोटेसे गाव लागते. कुंडमळा व इंदोरीचा भुईकोट किल्ला यांच्या मध्यावर इंद्रायणीकाठी असलेल्या कोटेश्वरवाडी येथे पुरातन हेमाडपंती कोटेश्वराचे मंदिर असल्याचे येथील ग्रामस्थ सांगतात.  तळेगाव-चाकण महामार्गावर कोटेश्वरवाडी हे सुमारे पाच हजार लोकवस्ती असलेले हे गाव. महाराष्ट्रातील बहुतेक शंकराची प्राचीन मंदिरे ही नदीकाठी तयार गेलेली आहेत. या नदीच्या घाटावर दशक्रिया विधीचा कार्यक्रम या ठिकाणी करता यावा हा उद्देश. मंदिराजवळून बाराही महिने  दुथडी भरून इंद्रायणी नदी वाहत असते. इंदोरीच्या हद्दीत दक्षिणेकडे असलेल्या कुंडमळ्यात खालच्या खडकांवर कोसळणाºया पाण्यामुळे तयार झालेल्या खोल दºया व रांजणखळगे मोठ्या प्रमाणात तयार झालेले आहेत. जणू काही निसर्गाची कृपाच. हा परिसरही खूपच निसर्गरम्य आहे.
            मंदिरावर कळस नसून मंदिर अगदी नदीच्या काठावर बांधलेले आहे. मंदिराबाहेर नंदी असून, मंदिराला दोन खांब आहे. खांबावर थोड्याप्रमाणात कलाकुसरही केलेली आहे. ग्रामस्थांनी शंकराच्या पिंडीवर तांब्याचे आवरण घातलेले आहे. हे मंदिर जरी खूप प्रशस्त नसले तरी येथील शांत वातावरण व नदीचा परिसर पाहण्यासारखा आहे. नदीकाठावरून भंडारा डोंगर दिसतो.
 कोटेश्वरवाडी




भामगिरी पाठारी वस्ति जाण केली - भामचंद्र डोंगर



जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराममहाराजांच्या वास्तव्याने पावन झालेले देहूगाव व जेथे महाराजांना पंधरा दिवस समाधी लागली असा भामचंद्र डोंगर पाहण्यास गेलो. त्या विषयी...

           परमेश्वराच्या भेटीसाठी तब्बल पंधरा दिवस तहानभूक विसरून तुकाराममहाराजांनी जिथं समाधी लागाली. ते ठिकाण म्हणजे भामचंद्राचा डोंगर किंवा भामगिरी.  तुकाराममहाराजांची घोरवाडेश्वर, भंडारा डोंगराप्रमाणेच भामचंद्र डोंगर ही अभंग लिहिण्याची प्रेरणास्थळे होती.  येथील शांत व सुंदर वातावरणामुळे विठ्ठलाची आस लागलेल्या महाराजांना  निर्गुण, निराकार विठ्ठलाची भेट झाली. देहूगावातील मुख्य मंदिरातून समोरच एक मोठा डोंगर दिसतो तो भंडारा डोंगर याच भंडारा डोंगराच्या समोर कातळकड्याची जणूकाही उलटी टोपी घालून निसर्गाच्या सान्निध्यात एकांतात समाधी लावून बसलेला भामचंद्र डोंगर आहे.

धन्य देहूगाव पुण्यभूमी ठाव । तेथे नांदे देव पांडुरंग ॥१॥

तुकोबांची जन्मभूमी, कर्मभूमी असलेले देहू गाव पुण्यभूमी आहे. देहू गावाला धन्यत्व-पुण्यत्व आले ते तेथे नांदत असलेल्या पांडुरंगामुळे. देहूगावातील संत तुकाराममहाराज व  आळंदीतील संत ज्ञानेश्वरमहाराज असे दर्शन करणारे अनेक भक्त या भंडारा व भामचंद्र डोंगरावर गेल्यावाचून राहत नाही. देहूतून सुमारे १२ ते १३ किलोमीटरवर असलेल्या भामचंद्र डोंगराच्या पायथ्यापासून वरपर्यंत जाण्यासाठी पायवाट आहे.

पाऊणतासात ८ किलोमीटर :

भंडारा डोंगरावर अनेकवेळा गेलो. मात्र तेथून काही अंतरावर असलेल्या भामचंद्रावर जाण्याचा योग काही केला येत नव्हता. रविवारी तळेगावात एका कामासाठी गेलो होतो. काम संपवून भामचंद्र पाहण्यासाठी निघालो. तळेगाव-चाकण महामार्गावर भंडारा डोंगराच्या पुढे गेल्यावर देहूगावातून येताना एक फाटा लागतो. या फाट्याकडे न जाता संत जगनाडे महाराजांच्या सुदुंबरे या गावापर्यंत येऊन तेथून सात ते आठ किलोमीटरवर भामचंद्र डोंगर आहे. हे अंतर कापण्यासाठी तब्बल पाऊणतास गेला. कारण रस्ता. रस्ता कसा तयार करतात याची येथे प्रचिती येते. मोठे मोठे दगड टाकून कच्चा रस्ता तयार केलेला आहे. काही ठिकाणी जेमतेम बरा रस्ता म्हणता येईल असा रस्ता आहे. तुकाराम महाराजांच्या वास्तव्याने देहू गावाला आज तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला आहे. पर्यटकांचा ओढा या तीर्थक्षेत्राकडे वाढला आहे. मात्र, प्रशासन रस्त्यांची अवस्था सुधारेल अशी आशा करण्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नाही. कंबरतोड  रस्ता पार करून डोंगराच्या पायथ्याशी पोहोचलो.  रामभरोसे दुचाकी लावून वर जाणाºया रस्त्यावर बसलेल्या गुरख्याला रस्ता हाच ना. अशी खात्री करून घेऊन पुढे जाण्यासाठी निघालो. पाच मिनटे चाललो असेल तेवढ्यात चरण्यासाठी आलेली गुरे ढोरे दिसली. त्यातील एक तर वाटेवरच वाट अडवून उभा होता. कसेबसे मीच थोडी वाट वाकडी करून पुढे निघालो. जाताना त्याचे दोन फोटोही काढले. घाबरून अंगावर येण्याची मलाही भीती. थोडे पुढे गेल्यावर वासुली गावातील एक भाविक त्यांच्या दोन लहान नातवंडांना डोंगरावर दर्शनासाठी जात असल्याचे पाहिले. मी एकटाच असल्याने त्यांच्या सोबत चालू लागलो. डोंगराविषयी त्यांना काय माहिती आहे याबद्दल मी जाणून घेतले. त्यांनी चांगली माहितीही सांगितली. आमचाही एक फोटो काढाल का? असे त्यांच्या नातवंडांने विचारले. ठिक आहे काढतो. पण पाठवू कसा? तर  ‘मेल’वर पाठवा असे तो म्हणाला.  २० मिनिटातच  डोंगरावर पोहोचलो. उभी चढाई असल्याने चांगली दमणूक होते. पण थंडगार व स्वच्छ हवेमुळे दमणूक कळत नाही.
            

सुदुंबरे रस्त्यावरून दिसणारा भामचंद्र डोंगर.


   भामचंद्र डोंगर तसा आडवाटेवरचा. एखाद्या तपस्वी मुनीप्रमाणे समाधी घेऊन एकांतात तपश्चर्या करीत बसलेला. सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून तुटल्याने एकटा पडलेला, दाट झाडी असलेला. भामचंद्र डोंगररांग पूर्वकडून पश्चिमेकडे पसरली आहे. डोंगर रांगेच्या पश्चिमेला असलेल्या गावातील नवलाख उंबरे नावाच्या गावामुळे नवलाख्या डोंगर असे ही काहीजण म्हणतात. हा डोंगर म्हणजे अर्ध्या डोंगरापर्यंत गर्द हिरवी झाडी व वरती सुमारे ८०० ते ९०० फूट कातळकडा आणि तोही उलटी टोपीच्या आकाराचा. याच काताळात गुहा आहेत.  डोंगरावरील एकंदरीत झाडीवरून तुकोबामहाराजांच्या काळात या ठिकाणी यापेक्षाही दाट झाडी असणार.  डोंगर परिसर व आजुबाजूच्या परिसरात त्याकाळी चांगले जंगलच असणार याची खात्री होते.
    

सुदुंबरे रस्त्यावरून दिसणारे भामचंद्रावरील मंदिर.


भामचंद्र डोंगर


डोंगरावर जात असताना दाट झाडी


डोंगरावर जात असताना दाट झाडी

      झाडीतला रस्ता संपवून छोटेसं पठार लागत. या पठावरावर दगडांनी बांधलेला चौथरा आहे. वासकरमहाराज या ठिकाणी कीर्तन करीत. तेथून पुढे निघालो या ठिकाणी सातवाहनकाळातील लेण्या आहेत. पहिल्या गुहेत  शंकराचे मंदिर आहे. बाहेर सभामंडप व आत छोटे शिवलिंग आहे. गुहेबाहेर पाण्याचं टाकंही आहे. मंदिराच्या शेजारील गुहेत लोखंडी जाळ्या ठोकून बंद केलेली आहे. तिचा उपयोग वारकरी धर्मशाळेसारखा करतात. थोडे पुढे जाऊन जेमतेम एक माणूस वर किंवा खाली येऊ शकेल अशा दगडात पायºया खोदून ठेवलेल्या आहेत. एका बाजूला रेलिंगची सोय केल्यामुळे सुरक्षा वाढली आहे. अंदाजे पन्नास ते साठ पायºया चढून वर गेलो. तेथेही एक छोटी गुहा आहे. आतमध्ये विठ्ठल रखुमाईच्या मूर्ती आहेत. शेजारीच भिंतीवर तुकाराममहाराजांचे शिल्प कोरलेले आहे. महाराजांचे दर्शन घेऊन पुन्हा खाली आलो. मुख्य गुहेतून खाली आलो. तर आणखीन एक गुहा येथे दिसली. काही विद्यार्थी इथ राहून संतपंरपरेचा अभ्यास करतात.
     

भामचंद्रावरून दिसणारा भंडारा डोंगर व परिसर. उजवीकडे जाधववाडी धरण परिसर



    तब्बल चारशे साडेचारशे वर्षांपूर्वी या ठिकाणची परिस्थिती कशी असेल याचा विचार करू लागलो. गर्द हिरवाईने, झाडीझुडपांनी हा प्रदेश सजलेला असले. या डोंगरावरील ही गुहा महाराजांनी का निवडली असेल याचेही उत्तर मिळाले. ते येथील निरव शांततेत. केवळ पक्ष्यांच्या आवाजा व्यतिरिक्त कुठलाही आवाज या ठिकाणी नव्हता. शांतता. अशा शांततेत मन एकाग्र करून तुकाराममहाराजांची समाधी लागत असेल यात शंकाच नाही.
     


शंकराच मंदिर


मंदिरासमोरील मोठी परात



डोंगरावरील पाण्याचं टाकं


मुख्य मंदिराकडे जाण्याची वाट


मुख्य मंदिराकडे जाण्याची वाट


भामचंद्र डोंगर परिसर विकास समितीने इथं चांगली सुधारणा केलेली आहे. सौर दिवेही लावले आहेत. पिण्याच्या पाण्याची सोय आहे. डोंगरमाथ्यावरून भंडारा डोंगर दिसतो. लांब देहू गावातील गाथा मंदिरही दिसले.  भंडारा डोंगराप्रमाणेच भामचंद्रावरही पायवाटेवर दोन्ही बाजूला वनखात्याने वृक्ष लागवडी केल्याने अजून हिरवळ व दाट झाडी निर्माण झाली आहे. एकंदरीतच येथील शांत वातावरणात नक्कीच समाधी लागेल असेच हे ठिकाण आहे. डोंगराच्या जवळच जाधववाडी नावाचे छोटे धरण दिसते. तेथून जवळच सुधा नदीचे उगमस्थान आहे, ही नदी जांबवडे,  सुदवडी, सुदुम्बरे, येलवाडी मार्गे देहूतील इंद्रायणी नदीला जाऊन मिळते.  एकदा तरी तुकाराममहाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या  भामचंद्र डोंगर व शेजारील श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर येऊन त्यांच्या चरणावर मस्तक ठेऊन आशीर्वाद घ्यावा आणि निसर्गाचा आनंद घ्यावा.

पावसाळ्यात येथून धबधबा वाहतो.


रेलिंगचा आधार घेऊन येणारे पर्यटक मागे चाकण परिसर

     ईश्वरप्राप्तीसाठी महाराजांनी भंडारा, भामचंद्र व घोरावडेश्वर सारख्या एकांतवास असलेल्या ठिकाणी समाधी लावून विठ्ठलाचे चिंतन केले. एकदा तुकाराममहाराज घरी परत न आल्याने त्यांचे बंधू कान्होबा आजुबाजूच्या परिसरात त्यांना शोधू लागले. शोधत-शोधत ते भामचंद्रावर आले. तेथे त्यांना तुकाराममहाराज दिसले.  निवार्णीचा संकल्प करून तब्बल पंधरा दिवस महाराज ध्यान करत होते. तुकोबांच्या अंगावर मुंग्या, विंचू, सर्प चढले, ते अंगाला झोंबले व पीडा देऊ लागले. वाघाने झेप घातली. मात्र तुकोबांचा निश्चय ढळला नाही. पंधराव्या दिवशी सत्याचा साक्षात्कार झाला. साक्षात ईश्वर प्रकट होऊन त्यांचे रक्षण केले. ज्या स्थळी देव तुकोबांना भेटले, त्या पवित्र स्थळाचे पावित्र्य आणि स्मृती अखंड राहण्याकरिता त्या ठिकाणी कान्होबांनी काही दगड रचले. त्यानंतर कान्होबांनी येथे तुकोबांची प्रतिमा कोरून घेतली. मूर्तीच्या मागे विंचू व पाठीमागे साप व वाघ कोरलेले आहेत.

साक्षात्काराविषयी तुकाराममहाराज म्हणतात,

पंधरा दिवसांमाजी साक्षात्कार झाला।
विठोबा भेटला निराकार ॥1॥
भामगिरी पाठारी वस्ति जाण केली।
वृत्ती स्थिरावली परब्रम्ही ॥2॥
निर्वाण जाणोनि आसन घातले
ध्यान आरंभिले देवाजीचे ॥3॥
सर्प विंचू व्याघ्र अंगाशी झोंबले।
पीडू जे लागले सकळीक ॥4॥
दिपकी कर्पूर जैसा तो विराला
तैसा देह झाला तुका म्हणे॥5॥


अशा या निसर्गाने रम्य ठिकाणी महाराजांना अभंग लिहिले.

वृक्ष वल्ली आम्हां सायरीं वनचरें ।
पक्षी ही सुस्वरें आळविती ॥1॥
येणों सुखें रुचे एकांताचा वास ।
नाही गुण दोष अंगा येत ॥2॥
आकाश मंडप पृथुवी आसन ।
रमे तेंथे मन क्रीडा करी ॥ध्रु॥

या अभंगाचा येथे प्रत्याय येतो.





वासुली गावाचा परिसर व औद्योगिकीकरण.

वाढते औद्योगिकरण :

गेल्या काही वर्षात भामचंद्र डोंगर समितीचे नाव पेपरात येत आहे. त्याला कारण ही तसेच आहे. चाकण एमआडीसी, नवीन होणारे विमानतळ, तळेगाव एमआडीसी असा हा सर्व परिसर झपाट्याने वाढत आहे. मोठे रस्ते , अनेक विदेशी कंपन्या येथे कंपन्या सुरू करत आहेत. श्रीक्षेत्र भामचंद्र डोंगराचा तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात तूर्तास तरी समावेश करण्यास राज्य सरकारने नकार दिला आहे. श्रीक्षेत्र देहू-आळंदी, भंडारा व पंढरपूरचा तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात समावेश करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहे. मात्र, अन्य तीर्थक्षेत्रांप्रमाणेच भामचंद्र डोंगराचाही या आराखड्यात समावेश करावा, अशी मागणी जगद्गुरू संत तुकाराम महाराज साक्षात्कार भूमी सेवान्यासाचे संस्थापक मधुसूदन पाटील महाराज यांनी राज्य सरकारकडे केली होती.  काही जमिनींवर खाणमालकांनी जागा खरेदी करून डोंगरचा काही भाग खोदण्यास सुरूवात केली आहे. मधुसुदन महाराजांनी आंदोलन छेडल्यानंतर  हे काम थांबविण्यात आले. शिंदे वासुली गावाजवळ उभ्या होत असलेल्या 'डाऊ' कंपनीच्या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी वारकरी संप्रदाय रस्त्यावर उतरले आहेत. वाढते औद्योगिकीकरणामुळे पर्यावरणाचा होणारा ºहास ही पुढची भीती नक्कीच पुढे राहणार आहे.

सुदुंबरे गावातून येणारा रस्ता.




वाट अडवून उभा असलेली गाय.



कसे जावे :
  • पुणे-मुंबईकडून रेल्वेने येत असाल तर रेल्वेमार्गावर तळेगावला उतरून एसटी, अथवा खासगी वाहनाने तळेगाव चाकण रस्त्यावरील संत जगनाडे महाराजांच्या सुदुंबरे या गावापर्यंत येऊन तेथून सात ते आठ किलोमीटरवर भामचंद्र डोंगर आहे. मात्र हा रस्ता  दगडी असल्याने शक्यतो या फाट्याच्या पुढे चाकणहून भामचंद्र डोंगराकडे जाण्याचा रस्ता चांगला आहे.
  • तळेगाव पासून ११ किमी अंतरावर खालुंब्रे गाव आहे. या गावातून डाव्या बाजूचा रस्ता चाकण एम. आय. डी. सी. फेज - २ ला जातो. या रस्त्याने हुंडाईचा प्लांट - सावरदरी गाव यामार्गे ५ किमीवरील वसुली नाक्यावर जाता येते.  येथून जवळच डोंगरावर जाता येते.
  • स्वत:चे वाहन असल्यास एक दिवसात देहूगाव, गाथा मंदिर भंडारा व नंतर भामचंद्र, इंदुरीचा किल्ला अशी एक दिवसाची छोटी ट्रिप होईल. भामचंद्र डोंगराच्या पाथय्यापर्यंच वाहन जाते. तेथून पुढे १५ ते २० मिनटे पायपीट करून डोंगरावर जाता येते. शक्यतो अंधार पडायच्या आत डोंगरावरून खाली यावे. वाटेत कुठेही खाण्याचे पदार्थ मिळत नाही.
  • चाकणमार्गे भामचंद्र पाथया अंदाजे पंधरा किलोमीटर अंतरावर आहे.


दिसणारा परिसर :

डोंगरावरून देहूतील गाथा मंदिर, भंडारा डोंगर, जाधववाडी धरण परिसर, चाकण परिसर दिसतो.


 फेरफटका आपल्याला कसा वाटला याविषयी जरूर प्रतिक्रिया द्या. अथवा मेल करा.

कॉपी करू नका